chintamani-kalamb-santsahitya.in

तीर्थक्षेत्र चिंतामणी (कळंब)

तीर्थक्षेत्र चिंतामणी (कळंब)

विदर्भातील अष्टविनायकमधील एक गणपती

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंबगावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्‍या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.

लोककथा

ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली, तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव अहल्या ठेवले. अहल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहल्येचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर केला त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहल्येशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणार्‍या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली.

पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहल्येच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून इंद्राने गौतमाचा वेष धारण करून अहल्येशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास केला आणि विदर्भात करंब (कळंब) येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले आणि तिला आदेश दिला की दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्ष करून जावे. तेव्हापासून दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक जमतात. गेल्या शतकात सन १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा अवतरली आहे.

गणेश कुंडाच्या समोरच मुख्य गाभार६यात देवेंद्रवरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती बालगंधर्व यांनी केली आहे. यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च केली.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
src:google.com

तीर्थक्षेत्र चिंतामणी (कळंब)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *