सार्थ तुकाराम गाथा ३01 ते ४00

सार्थ तुकाराम गाथा 301 ते 400

सार्थ तुकाराम गाथा 301 ते 400


अभंग क्र. 301
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥
संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥.
संल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥
तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥

अर्थ

हरीने माझ्या देहात निरंतर घर करून रहावे.म्हणजे कायमस्वरूपी माझ्यासंगे जेवताना झोपताना भोजन करताना माझ्याबरोबर देवाने राहावे.त्यामुळे माझ्या मनातील संकल्प-विकल्प हे जळून जाऊन पापपुण्य ही माझ्या मध्ये येणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात असे झाले म्हणजे माझा सर्वकाळ चांगला व या गोविंदा सोबत जाईल.


अभंग क्र.302
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥
घरीं देवाचा अबोला । त्यासि तेंचि सवे त्याला ॥ध्रु॥.
नाहीं पाहावें लागत । एका एकींच ते रितें ॥२॥
तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥

अर्थ

या भू लोकांमध्ये अशी एक प्रथा पडून गेलेली आहे,कि लोक देवाशी अबोलाधरतात देवाचे नाव घेत नाही त्यामुळे देवही त्याच्याशी अबोला धरून जो जसे वागेल तसेच तो वागतो.हे पाहण्याची गरज नाही की देव लोकाला आठवत नाही कारण लोक देवाला आठवीत नाही त्यामुळे दोघांचे एकमेकांविषयी हृदय मोकळे आहे.तुकाराम महाराज म्हणतात याच कारणामुळे देवात आणि लोकांत मोठे अंतर पडले आहे.


अभंग क्र.303
करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

अर्थ

देवपूजा करताना अचानक घरी संत साधू आले तर,देवपूजा बाजूला सारून संत पूजा प्रथम करावी.जशी शाळीग्रामाची विष्णू मूर्ती असते तसेच संतही कोणत्या जातीचे असो त्यांचे पूजन केले पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव घरी येणे म्हणजे देवपूजा करण्यापेक्षाही अधिक भाग्य आहे त्यामुळे अशी संधी आली तर कोणीही ती संधी न दवडता त्या संधीचा फायदा करून घ्यावा.


अभंग क्र.304
ज्यांची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥
करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥.
असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥

अर्थ

ज्याची खरी सेवा आहे निष्काम सेवा आहे त्याच्या जीवाला मग कसले भय राहणार आहे?त्याने प्रत्यक्ष हरीशी म्हणजे आपल्या स्वामीबरोबर वाद-विवाद जरी केला तरी तो त्याला अधिकाधिक आनंद वाटतो.आपले आचरण शुद्ध धर्माला धरून असावे मग दुसऱ्या कोणाचीही दोष जरी त्यांनी दाखविले तरी ते सहन करतात.तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी जे काही बोलते त्याला प्रत्यक्ष विठ्ठल प्रमाणात मानत आहेत.


अभंग क्र.305
देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥
तेचि येताती ढेकर । आनंदाचे हरीहर ॥ध्रु.॥
वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥
तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥

अर्थ

देवाची प्राप्ती झाल्यामुळे माझा जीव गोड झाला आणि आता संसार कडू वाटत आहे. या हरीची प्राप्ती झाल्यामुळे मला आनंदाची ढेकरे येत आहेत. हे देवा तुमच्या मध्ये दुसऱ्याला आकर्षित करण्याची ताकत आहे सामर्थ्य आहे.तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळे मला आनंदात तहान भूक लागत नाही.


अभंग क्र.306
नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥
उत्तमा उत्तम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥
नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥
तुका म्हणे वर्णु काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥

अर्थ

हरीचे नाम सर्व साराचे हि सार आहे त्यामुळे यमाचे किंकर नाम घेतल्याने साधकांना शरण येतात.या जगामध्ये सर्वात उत्तमात उत्तम असे हरीचे नाम आहे म्हणून पुरुषोत्तमाचे नाम घ्या.नामजपाने साक्षात शंकराचा कंठ दाह शांत झाला आणि वाल्या कोळी याचाही उद्धार झाला.तुकाराम महाराज म्हणतात मी आता आणखी काय वर्णन करू? या विठोबाचे चरण हे भवसागरातून तारणारे आहेत.


अभंग क्र.307
गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥
परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥
मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥२॥
तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥

अर्थ

मी हरीचे गीत गात आहे पण माझ्या अंतःकरणात भक्तीभावनाही या संसारात माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून मी प्रयत्न करीत आहे.पण हे देवा तू पतितपावना आहेस असे तुझे ब्रीद आहे म्हणून माझा उद्धार कर.मी मोठ्या हुशारीने तुझा भक्त आहे असे म्हणतो आणि माझ्या चित्तात लोभ मोह आस हे विकार आहेत.तुकाराम महाराज म्हणतात मी बाहेरून भक्तीचा वेश दाखवतो पण माझ्या चित्तात त्याचा लेशही नाही.


अभंग क्र.308
द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥
माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥
कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥
भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥
तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥

अर्थ

आपल्याजवळ ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी जो कोणत्याही प्रकारचे दानधर्म करीत नाही त्या मनुष्यास नंतर न्यायालयात राजदरबारात उभे केल्यास दंडास पात्र करून त्याला दंड केला जातो.त्याच्या आईने त्याला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस सटवी तेथे नव्हती काय? बहुतेक त्यामुळेच तो जगला असावा.हरिकथा चालू असताना त्याला झोप लागते पण स्त्रीसंग करताना जसा कुत्रा कुत्रीचा मागे रात्रभर लागतो तसा त्या वेळी रात्री तो कामातुर होऊन, त्याला झोप येत नाही.या अशा मनुष्याने आपल्या धर्मपत्नीला एखादे लुगडे जरी घेऊन द्यायचे म्हटले तरी तो घ्यायचा नाही पण दासीचे वस्त्र उराशी घेऊन झोपतो.तुकाराम महाराज म्हणतात असे मनुष्य गाढवा पेक्षाही नीच आहेत असे समजावे.


अभंग क्र.309
मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धन आणि मान ॥१॥
ऐशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥.
पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥

अर्थ

मुखाने ब्रम्‍हज्ञान सांगतो आणि मनामध्ये धन आणि मान याची अपेक्षा करतो.अशा माणसाची सेवा केली तर काय सुख प्राप्त होणार आहे या जिवाला?या कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी अनेक लोक संत झालेले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये जर यापेक्षा कोणीही विरळा संत आहे तरच त्याच्या चरणी मी लोटांगण घेतो.


अभंग क्र.310
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥
अनुतापें स्नानविधि । यज्ञ सिद्धी देहहोम ॥२॥
जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥

अर्थ

माझ्या मनामध्ये अनेकप्रकारचे विकार घर करून होते त्याचे आता मी एकदमच मुंडण करून टाकले आहे हेच माझे प्रायचित्त आहे.मुख्य म्हणजे अहंकार नावाचा जो दोष आहे त्याला मी ओस पाडले आहे. विषयांमुळे मला जो अनुताप झाला त्यामध्ये मी स्नान केले व आत्मज्ञान रुपी अग्नीमध्ये देहाचे हवन केले.तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान यामुळे जीव व शिव यांचा विरोध होत होता आता त्याचा म्हणजे अज्ञानाचा त्याग करून मूळ स्वरूप जे ब्रम्‍ह आहे ते मीच झालो आहे.


अभंग क्र.311
त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥
पाषाणाचे पोटीं बैसला दुर्दुर । तया मुखीं चारा कोण घाली ॥ध्रु.॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

अर्थ

या देवाला त्रैलोक्याचे पालन करताना कंटाळा येत नाही आमचे कसले ओझे आहे.पाषाणाच्या पोटात बेडूक बसलेला असतो मग त्याच्या पोटात कोण अन्न घालते.काही पक्षी, अजगर हे कधीही अन्न शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत पण तरीही तो त्यांचे पोट भरतो.तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगावर सर्व भार घातला तर तो दयाघन कधीही कोणाची उपेक्षा करीत नाही.


अभंग क्र.312
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥
वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥
पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥
तुका म्हणे दींन । त्यांचा हरतिया सीण ॥३॥

अर्थ

हे नारायणा माझ्या दुःखाचे तुम्ही खंडण करा.माझी वृत्ती तुमच्या चरणांजवळ राहू द्या आणि तुम्ही माझ्या मनात तुम्ही वस्ती करा माझ्या चित्ता रहा.मला हे फळ मिळवून द्या आणि एवढा माझा लाड तुम्ही पुर्ण करा.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही दिन लोकांचे दुःख दूर करा.


अभंग क्र.313
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥
हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥
तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥२॥
तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी देवा ॥३॥

अर्थ

तुझ्या नामसंकीर्तनाने सर्व दोष पळतात.देवा हे वचन खोटे तर नाही ना?आमच्या हातून काही पाप होवू नये याची भीती तुम्हाला वाटते तर आम्हाला जन्माला येण्याची भीती वाटते.तुकाराम महाराज म्हणतात तुमचे नामसंकीर्तन केल्याने भक्ताला कळीकाळाची भीती नसते त्यामुळे मी तुमचे नामस्मरण कायम करत असतो.


अभंग क्र.314
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥
मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥
दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥
तुका म्हणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥

अर्थ

देवा मी तर दिना पेक्षाही दिन आहे तरी पण तुला माझा अभिमान आहे.मी तुला शरण आलेलो आहे त्यामुळे हे देवा तू माझे स्वहित म्हणजे कल्याणकर.हे दीनानाथा कृपा घना तुझे ब्रीद, तू दयाळू आहेस याचे पालन केले पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात तू जर माझ्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला हे असे शोभणार नाही.


अभंग क्र.315
नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥
भोगी भोगविता । बाळासवें तोचि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥

अर्थ

मी फक्त अन्न खाण्याकरता जगण्याला स्थान दिले असे नाही मी अन्न खातो कारण या जनार्दनाचा मान राखावा म्हणून.सर्व चांगले कर्म करताना व इतर वेळेस देवाला मी साक्षी केले आहे.भोगी आणि भोगविता तोच आहे जसे बाळका बरोबर त्याचा पिता असल्यावर तोचं त्याला खाण्यापिण्याचे व्यवस्था करतो त्याप्रमाणे हा देव माझी सर्व व्यवस्था करतो आहे.तुकाराम महाराज म्हणतात चांगले व वाईट कर्मे ज्या ठिकाणी जळून जातात अशा उच्च ठिकाणी मी विराजित झालो आहे.


अभंग क्र.316
काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥
कोपला पाटील गांविचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥
आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥
भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥

अर्थ

आता काय खावे कोणाच्या आधारावर रहावे कोठे जावे? गावचा पाटील आणि गावातील लोक माझ्यावर रागावले आहेत क्रोधित झाले आहेत त्यामुळे आता कोण मला भिक घालणार? हे लोक मला म्हणतात की मी मर्‍यादा सोडली आहे आणि त्याचा निवाडा करण्यासाठी मला न्यायालयात दाखल केले आहे व मला दोषी ठरविण्यात येत आहे.गावातील प्रस्तापित लोकांनी मी वाईट आहे असे सर्वांना सांगितले आहे व माझा गरिबाचा यांनी सर्वांनी घात केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता यांचा संग चांगला नाही या विठ्ठलाचे भजन करणे हेच उत्तम आहे व आता त्याला शोधीत जाणे हेच चांगले.


अभंग क्र.317
संत मागे पाणी नेदी एक चूळी । दासीस आंघोळी ठेवी पाणी ॥१॥
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

अर्थ

संतांनी जर थोडे पाणी प्यायला मागितले तर चूळ भरण्या इतके पाणी देखील हा एखादा मनुष्य देत नाही पण एखाद्या दासी करता अंघोळ करण्याकरता पाणी तापवून ठेवतो.संत जर दिसले तर तो संतांना पाहून त्यांच्याकडे पाठ करतो आणि दासीच्या मुलांना जर पाहिले तर मुके घेतो.संतांचे त्यांच्या पाठीमागे तो टवाळ्या करण्याचे काम करतो पण मात्र दासीच्या चोळ्या मात्र आवडीने धुतो.तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका तो माणूस मेल्यानंतर यमलोकात त्याचे भोग भोगण्या करिता जातो.


अभंग क्र.318
आशाबद्ध वक्ता । धाक भय श्रोतयाच्या चित्ता ॥१॥
गातो तेची नाही ठावे । तोंड वासी काही द्यावे ॥ध्रु .॥
जाले लोभाचे मांजर । पोट भरी दारोदार ॥२॥
वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥३॥
बहिरेमुके एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥४॥
माप आणि गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥५॥

अर्थ

एखादा वक्ता हरिकीर्तन करण्याकरता हरी कथा करण्याकरता एखाद्या गावात जर आला आणि त्याच्या मनात द्रव्याची आशा असेल तर त्या गावातील श्रोतेत्यांच्या चित्तात हा आपल्याला द्रव्य मागेल असाच धोका निर्माण होतो.ज्या भगवंताविषयी तो गातो त्या भगवंताविषयी त्याला काहीच ज्ञान नसते परंतु तो आवेश धरून तोंड वासून गाणी गातो पण त्याच्या मनात चाललेले विचार म्हणजे यांनी मला माझे गाणे ऐकून मला पैसे द्यावे असे असते.तो वक्ता म्हणजे लोभाचे झालेले मांजर होय पोट भरण्याकरता तो दारोदार फिरत असतो.त्याने गायलेले भजन आणि श्रोत्यांनी ऐकलेले भजन हे दोन्हीही वयाला जाते कारण दोघांचेहीमन लोभी असते.बहिरा आणि मुका हे जसे एकत्र आल्यावर व्यर्थ होय तसेच आशाबद्ध वक्ता व त्याच्या कथेला भूललेला श्रोता हे दोन्ही एकत्र येणे म्हणजे तसेच होय.तुकाराम महाराज म्हणतात गोणीतून धान्य मापाने बाहेर काढल्यावर जसे गोणी आणि माप दोन्हीही मोकळेच राहतात तसेच आशा बद्ध वक्ता आणि त्याला भूललेला श्रोता हे दोन्हीही तसेच रिकामे राहतात.


अभंग क्र.319
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥१॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥
विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥४॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥

अर्थ

विठ्ठला तू सर्व जगाचा राजा आहेस आणि जगाला जीवन देणारा जीव आहेस.हे विठ्ठला तुझ्या जवळ सर्व औदार्‍याची राशी आहे तुझ्याजवळ सर्वप्रकारच्या सिद्धी आहेत.विठ्ठला तुझे हे नाव किती गोड आहे आणि तू भक्तांचे सर्व लाड पुरावितोस.हे विठ्ठला तुझे श्रीमुख अतिशय चांगले आहे सुंदर आहे त्यामुळे मला तुझे ध्यान लागले आहे.विठ्ठला तुझे नाम घेतल्यावर वाणी अशी रसभरीत वाटते माझ्या जीवाने तुझा ध्यास घेतला आहे.विठ्ठला तुला भेटण्या करता मी तुकाराम शोक करीत आहे तेव्हा तू त्वरेने मला भेटण्याकरिता ये.


अभंग क्र.320
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥
एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥
जालीं दोनी नामें एकाचि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥
तुका म्हणे दाखविली मुक्ताफळीं । शिंपलेचि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥

अर्थ

आतापर्यंत या संसाराला मी कवटाळून बसलो होतो पण आता आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी यातून बाहेर पडलो. दह्यातून निघलेले ताक जसे पुन्हा दह्यात मिसळले जात नाही तसा मी या संसारात पुन्हा मिसळणार नाही. दह्यातून जसे ताक आणि लोणी हे दोन नावं निर्माण होतात पण त्यांचे गुण वेगवेगळे असतात तसेच आत्म विचाराने देह आणि आत्मा हे वेगळे वेगळे आहे असे लक्षात येते.तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्यातून जरी मोती वेगळा केला व नंतर पुन्हा त्याला शिंपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते शिपल्या संगे जोडले जात नाही.


अभंग क्र.321
बरवा बरवा बरवा देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥
पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥
अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥
मन जालें उन्मन अनुपम गहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥३॥

अर्थ

देवा तू खूपच चांगला आहेस, खूपच चांगला आहेस, खूपच चांगला आहेस. त्यामुळे तु मला जीवापेक्षाही जास्त आवडतोस देवा. तुझे मुख डोळ्याने पाहिल्यानंतर व तुझे गुण कानाने ऐकल्यानंतर डोळे व कान दोन्ही संतुष्ट होतात देवा. तुझे लक्षण वर्णन केले असता माझ्या आठही अंगातून शीण आणि सर्व भाग नाहीसा होतो. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात देवा तुझ्या अनुपम्य आणि गहण अशा रूपाने माझे मन उन्मन झाले व तुझा महिमा मला काही कळत नाही रे देवा.


अभंग क्र.322
सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥
गाईसी देखोनि बदाबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥ध्रु.॥
फुले पाने वेश्येसी नेतसे उदंड । देऊं नेदी खांड ब्राम्हणासी ॥२॥
बाइलेच्या गोता आवडीने पोसी । मातापितयांसी दवडोनी ॥३॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥४॥

अर्थ

नास्तिक मनुष्य जर घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी मोठी मेजवानी करतो पण जर संत घरी आले तर त्यांच्यासाठी मात्र ठोमरा म्हणजे जाड तांदळाचा भात करतो.त्याच्या दारात जर गाय आली तर तो त्या गाईला बदाबदा मारतो पण त्याला घोड्याचे लीद काढणे खरारा करणे यातच गोडपणा वाटतो.नास्तिक मनुष्य वैश्येला फुले, खाण्यासाठी पाने नेऊन देतो मात्र ब्राम्‍हणाला सुपारीचे एक खांड देत नाही.सासरकडच्या माणसांना तो अतिशय जीव लावतो पण आई-वडलांना घराच्या बाहेर काढून देतो.तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका त्याचा धिक्कार करा असा माणूस नरकातच जाणार कारण तेथेच त्याचे भोग त्याला मिळणार आहे.


अभंग क्र.323
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥
नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥
तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥

अर्थ

जे सोलीव सुख म्हणजे आत्यंतिक सुखाचा गाभा आहे तो विठ्ठल वैष्णवांच्या दारामध्ये उभा असतो.वैष्णवांच्या दारातच तुळशीवृंदावन आहे सडा घातलेला आहे रांगोळ्या काढलेल्या आहेत व अशा पवित्र वातावरणातच तो परमात्मा नाचत असतो.वैष्णवांच्या गळ्यात नेहमी तुळशीची माळ असते असते व त्यांच्या अंगावर गंध लावलेले असतात असे ते वैष्णव सुशोभित असतात.वैष्णवांचे मुख म्हणजे नेहमी हरीचे गुणगान गात असतात आणि त्याचे कपाळ हरी चरण धुळीने माखलेले असतात.तुकाराम महाराज म्हणतात आशा वैष्णवांना मोक्ष प्राप्तीची इच्छा नसते तर मोक्षाला त्यांची इच्छा होते.


अभंग क्र.324
तीर्थें केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥
योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थे घडिलीं पाहीं ॥३॥

अर्थ

कोट्यावधी तीर्थे केली आणि जर पंढरी नाही पाहिली,तर त्याच्या जगण्याला आग लागो कारण त्याने विटेवर उभे असलेले पांडुरंग परमात्म्याचे समचरण पाहिले नाही.त्याने योगा आणि योग अनेक केले पण जर विटेवरील समचरण पाहिले नाहीतर त्याचा काय उपयोग?तुकाराम महाराज म्हणतात विटेवर उभा असलेला पांडुरंग याचे तुझे दर्शन घेतले तरच सर्व प्रकारचे तीर्थे घडले असे जाण.


अभंग क्र.325
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥
नाहीं जात जीव होत नाहीं हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥
नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या म्‍हैसी गाई व्हाव्या ॥२॥
हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लापणीक वरी साच भाव ॥३॥
तुका म्हणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥

अर्थ

माझे असे कोणते काम अडले होते म्हणून मी तुला मुद्दाम बोलावून घेईन तुला कष्ट देईन.माझा काय जीव जाणार नव्हता किंवा माझ्यावर काही प्रसंग ओढावला नव्हता पण मला सहजच तुझे स्मरण झाले त्यामुळे मी तुला आठविले.देवा मला कसलीही चिंता नाही किंवा मी उपवासी आहे असे नाही मला अन्नधान्य किंवा गायी म्हैसी असावे असेही वाटत नाही. महाराज म्हणतात देवा माझ्या अंतरंगात खरा भाव आहे की खोटा भाव आहे याचे तुला चांगलेच ज्ञान आहे.तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा हे माणसे तुम्हाला नाशिवंत पदार्थासाठी बोलावितात व तुमच्या पायाचे स्मरण न करून नुसकान करून घेतात.


अभंग क्र.326
आविसाचये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥
मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥
अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥

अर्थ

मासे पकडण्याचे जे सामुग्री असते त्याच्या टोकाला मासे पकडण्यासाठी माशाला आमिष म्हणून लावलेले असते मग मासा त्या आमिषाला बळी पडून तो गळ तोंडात पकडतो व घसा फुटून मरण पावतो.मग मरणाच्या वेळी तो तळमळ करतो व त्या वेळी त्या कृपाळू देवाचे स्मरण करतो.तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी मरणाच्या वेळेस जो देवाचे नामस्मरण करतो त्याच्या सुखाला पारावर नाही कारण तो वैकुंठाला जातो.


अभंग क्र.327
तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे त्याचें ॥१॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥
अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥२॥
तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥३॥

अर्थ

हे हरी तुझ्यावर जे आसक्त आहेत ज्यांचे तुझ्यावर प्रेम आहे त्या भक्तांचे दर्शन मला घडू दे.त्यांची जाती व त्यांचा भाव हे किती शुद्ध आहे हे सांगण्याची गरज नाही कारण त्यांच्या हाताला पायांना व सर्वांगाला तुझ्या भक्ती वाचून दुसरा व्यापारच नाही.त्या भक्ताने त्याच्या सर्व इंद्रियांचा मेळा करून त्याचे डोळे फक्त तुझ्या स्वरूपावरच रोखले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुझ्या आड लपेल आणि ते भक्त आले की मला त्या भक्तांचे दर्शन घडू दे एवढे माझे कोड तू पूर्ण कर.


अभंग क्र.328
विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥
सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥
आपुलेंचि मन । करवी आपणां बंधन ॥२॥
तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥३॥

अर्थ

देहाची छाया प्रमाणे ब्रह्मा ची माया तिने सर्व विश्व व्यापले आहे व सत्य हे ब्रम्ह आहे हे त्याने झाकले आहे.म्हणूनच तर सत्य हे भोळ्या वर गेले आहे म्हणजे या विश्वात सत्याला विसरून सर्व अविद्येकडे जात आहेत म्हणजे सत्याला विसरून या जगात अविद्येची थोरी आहे.मायेत गुंतलेले आपले मन हे आपल्यालाच बंधनकारक ठरते.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्हीच या मायेचा गुंता म्हणजे कोडे तुम्हीच सोडवा.


अभंग क्र.329
पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥१॥
रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥२॥
तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्ते ॥३॥

अर्थ

आपल्या पासून अनेक रोगांची उत्पत्ती होते मग त्या रोगांना आप्त म्हणवे का म्हणजे आपले म्हणावे का?रानामध्ये अनेक प्रकारच्या औषधी असतात मग त्यांना निरपराधी म्हणावे काय.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्या शरीराचे ज्यांच्याशी हितकारक संबंध असते ते सर्व आपले आप्त असतात आपले असतात.


अभंग क्र.330
नव्हे शब्द एक देशी । सांडी गिवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
मोकलिलें जावें बाणें । भाता जेणे वाहिला ॥२॥
आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥

अर्थ

माझे शब्द म्हणजे कोण्या एका मताचे खंडन किंवा मंडन करणारे नाहीत किंवा अर्थ सांगणारे नाहीत.माझी वैखरी वाणी म्हणजे विश्वव्यापक परमात्मा त्याच्याप्रमाणेच आहे.ज्याप्रमाणे भात्याने बाणाला बरेच दिवस राखलेले असते परंतु बाण त्याला सोडून धनुष्याला धरून बाहेर सुटतो त्याप्रमाणे माझी वाणी या परमात्म्याच्या आधारावर जगत असते व ते या परमात्मा वाचून अन्य कोठेही मोकाटपणे जात नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता येथे मी बोलत नसून माझ्या प्रत्येक शब्दावर माझ्या स्वामीचा म्हणजे या विठ्ठल परमात्मा चा शिक्का आहे.


अभंग क्र.332
माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥
देवा अभिमान नको । माझे ठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥
देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥२॥
हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥

अर्थ

माप म्हणते मी धान्य मोजतो त्यामुळे मी श्रेष्ठ आहे पण त्याचा जो धनी आहे मालक आहे तो त्यामध्ये धान्य ओततो एरवी त्याला रिकामेच ठेवतो.देवा माझ्या ठिकाणी असा अभिमान निर्माण होऊ देऊ नका.देशांमध्ये जो सत्ताधारी राजा असतो त्याच्याच शिक्क्याला महत्त्व असते त्याच्याशिवाय दुसऱ्या कशालाही महत्त्व नसते.तुकाराम महाराज म्हणतात या जगात खऱ्या सत्तेचे सूत्र ज्याच्या हातात असते त्याचीच थोरी या जगामध्ये असते.


अभंग क्र.333
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥
जालें वार्‍या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥२॥
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥३॥

अर्थ

देवाचा महिमा सांगण्यासाठी कोणी देशोदेशी फिरले होते काय? पण माझा बाप हा पांडुरंग हा समर्थ आहे कि त्याची कीर्ति चे माप वाऱ्या हाती झाले आहे वाऱ्याच्या सरशी त्याचे अलौकिक सामर्थ्य सर्व जगात पसरलेले आहे.या जगामध्ये अशी कोणाची सत्ता आहे तर या परमात्म्यचीच ही सत्ता आहे त्याच्या सत्तेने सर्वजण बोलतात सर्वांना प्रेरणा मिळते.तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये विठ्ठलाचीच सर्व सत्ता आहे असा माझा दृढ निश्चय झाला असून त्या कारणामुळे मला कसलेही भय राहिले नाही.


अभंग क्र.334
सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । तेथे मी हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥

अर्थ

सर्वांच्या चरणी मी मस्तक ठेवून अशी विनंती करीत आहे, जे कोणी श्रोता असेल किंवा वक्ता असेल या सर्वांनी जे काही खरे आहे हे पारखुन त्याचा स्वीकार करा.नामसंकिर्तन धान्याचा भांडार मी फोडला आहे याचा मालक म्हणजे तो विठ्ठल परमात्मा आहे मी फक्त तो माल वाहण्याचे हमाली करीत आहे.तुकाराम महाराज म्हणतात या नामरूपी मालाचे सामर्थ्य सगळीकडे पसरले आहे संतांच्या पारखीने तो माल खऱ्या कसाला उतरला आहे.


अभंग क्र.335
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥
अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥
फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥
तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥

अर्थ

या विश्‍वंभरा चा कोणी कितीही विचार केला किंवा त्याच्यावर कोणी कितीही आभ्यास केला तरी त्याचा शेवट कोणालाही लागलेला नाही.तो परमात्मा अणु रेणू पेक्षा हि सूक्ष्म आहे आणि स्थूल पदार्थापेक्षा ही अतिस्थूल आहे व वेदही त्याविषयी विचार करून शेवटी त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणू लागले.एका फळात अनेक कीटके असतात त्यांच्यासाठी त्या फळा येवढेच त्यांचे आकाश असते असे फळ एका झाडाला किती असतात असे झाड या भूतलावर किती असतात? या अनंताने आपल्या उदरात अर्जुनाला अनेक गोष्ट अनेक सृष्टी अनेक कृष्ण अनेक लोक दाखविले.तुकाराम महाराज म्हणतात याकरिता तुम्ही संतांची कास धरा तसे न करता तुम्ही जर अनंताचा शोध घेण्यास निघाल तर तुमचा जीव कसा वाचेल त्यामुळे संतांची कास धरून तुम्ही परमात्म्याचा शोध करा म्हणजे तुम्हीही परमात्मरूप व्हाल.


अभंग क्र.337
स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥
परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥
रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रम्हांडें हीं ॥२॥
तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥

अर्थ

तुमची स्तुती करायला मी करेन पण देवा जिथे वेदाला ही तुमची स्तुती करण्यासाठी शब्दच सुचत नाही तेथे माझ्या स्तुतीचा काय प्रभाव पडणार आहे.पण काय करणार देवा तुझी स्तुती करण्यासाठी माझी जिव्हा लाचावली आहे तुझी स्तुती करण्यासाठी माझी इच्छा होत आहे.पण देवा तुमची स्तुती करण्याइतकी माझी बुद्धी पुरेशी नाही कारण तुमच्या एका रोमा वर अनेक ब्रह्मांडे होतात आणि जातात.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आहो तुम्ही या जगतामध्ये तुम्हीच खरे व्यापक आहात आणि तुमच्या स्वरूपाचे वर्णन कोणी करू शकेल अशी कोणाची वाचा असू शकत नाही.


अभंग क्र.338
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥
सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चिदानंद नारायणा ॥२॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा कळों येसी ॥४॥

अर्थ

तुझे वर्णन हे विठ्ठला तूच ते करू शकतो पण तुझे वर्णन करू शकेल असा या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही.सहस्र मुख असलेला शेष बापुडा तुझे वर्णन करून करून थकला शेवटी त्याच्या जीव्हाला चिरा पडल्या पण तो तुझे वर्णन पूर्ण करू शकला नाही.कारण हे नारायणा तू अव्यक्त अलक्ष अनंत आनंदरूप निर्गुण सच्चिदानंदरुप आहेस.ज्याचा जसा तुझ्याविषयी भाव असेल तसे रुप घेऊन तू सगुणसाकार होतो.तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तू जर आम्हाला स्वतः तिचे रूप दाखवले तरच आम्हाला कळून येईल.


अभंग क्र.339
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥
हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥२॥
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥३॥

अर्थ

हरी भजनाचा आनंद घेताना आनंदाचा महापूर आला आहे व या महापुरात हरी प्रेमा विषयी लाटा उसळत आहे.या विठ्ठलनामाचे सांगडी आपण आपल्या कमरेला बांधून या भवसागराच्या पलीकडे पोहून जाऊ. अरे माझ्या भाईनों तुम्ही सर्वजण यामध्ये उडी मारा.आता सुदिन पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या भजन नदीत आनंदाने उडी मार येथे अमृत रुपआनंदाचे पाणी कमी पडणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अनेक जन्मीची पुण्याई आहे त्यामुळे हा भक्तीमार्गाचा ओघ आपल्याकडे आला आहे.


अभंग क्र.340
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिले या चित्ता पासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥ध्रु.॥
पडिले वळण इंद्रियां सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥३॥

अर्थ

माझ्या चित्तामध्ये पांडुरंगा वाचून दुसरे काहीही नाही या गोष्टीचा मी आता मनापासून निश्चय केला आहे.माझ्या ध्यानामध्ये ही पांडुरंग आहे आणि मनामध्येही पांडुरंग आहे जागृतीत पांडुरंग आहे स्वप्नामध्ये पांडुरंग आहे.माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण लागले आहे एका पांडुरंगा वाचून दुसरीकडे माझे इंद्रिय धावत घेत नाही दुसरा कोणताही विषय माझे इंद्रिय जाणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांनी मला ज्याची ओळख करुन दिली आहे त्याचे ते सगुणरूप विटेवर उभे आहे.


अभंग क्र.341
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥
पुराणींचा अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
इंद्रियांचे आम्ही पांगिलों अंकित । त्यांच्यारगें चित्त रंगलेसे ॥२॥
एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥
तुका म्हणे जरी मोकलिसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥

अर्थ

मी कोणत्या साधनेने तुमच्या भक्तीचा अनन्याधिकारी होईन हे मला समजत नाही.पुराणातील अर्थ मनात आणला कि भक्तीमध्ये किती मन विरक्त करावे लागते याचा विचार केला की माझे मन कासावीस होते.कारण आम्ही इंद्रियाचे पूर्णपणे अंकित झालो आहोत त्या इंद्रियांच्या विषयांतच आम्ही रंगून गेलो आहोत.हे देवा मला एकाच इंद्रियांचे दमन करता येत नाहीतर सर्व इंद्रियांना मी ताब्यात कसे ठेवू?तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता तुम्ही जर आता उपेक्षा बुद्धीने माझा त्याग कराल तर मी पूर्णपणे वाया गेलो असे समजा.


अभंग क्र.342
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥
कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥
व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निर्वीकार ॥२॥
रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥३॥
अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥
अचेत चेतलें भक्तीचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥५॥

अर्थ

योगी लोक जे प्रयत्न करुन ध्यानधारणा करून हरीचे अस्पष्ट रूप पाहतात या स्वरूपाचा त्यांना फक्त आभास होतो हे स्वरूप आम्हा भक्तांना साक्षात स्पष्ट दिसते. दोन्ही कर कटेवर ठेवून तो विटेवर उभा आहे व त्याची अंगकांती ही सावळी व दैदीप्यमान आहे.त्याने सर्व व्यापूनही तो सर्वांपेक्षा वेगळा आहे व सर्वांच्या आत राहूनही तो निर्विकार आहे. ज्याला कसले ही नाम नाही रूप नाही अशा स्वरूपाचे मी मनामध्ये ध्यान करतो.ज्याला अंत नाही पार नाही कोणत्याही प्रकारचे वर्ण नाही जाती नाही कुळ नाही हात नाही पाय नाही कोणत्याही प्रकारचे अवयव नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे असे परब्रम्ह भक्तांच्या सुखा करिता सगुणसाकार झाले आहे.


अभंग क्र.343
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥
कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिती मती दावीं मज ॥३॥
तुका म्हणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥


अभंग क्र.344
निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥
पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥२॥
तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥

अर्थ

निगमाचे वन म्हणजे वेद रुपी आरण्य व त्यामध्ये हरीला शोधण्याचा व्यर्थ शिण करून घेऊ नका.तुम्हाला जर तो देव पाहायचाच असेल तर मी त्याचा पत्ता तुम्हाला सांगतो त्याने दही व दुधाची मटकी फोडली म्हणून यशोदा मातेने त्याला उखाळशी बांधून ठेवले आहे.हरी ची प्रति कशी करून घ्यावी याचे वर्म तुम्हाला न कळल्यामुळे तुम्ही व्यर्थ हे गोंधळात पडलेले आहात.तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो तुम्ही तुमच्या चित्तात असलेला अहंकार टाकून द्या मग तुम्हाला सुखाने हरीची प्राप्ती होईल.


अभंग क्र.345
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥
मीच मज राखण जालों । ज्याणें तेथेचि धरिलों ॥ध्रु.॥
जें जें जेथें उठी । तें तें तया हातें कुंटी ॥२॥
भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥

अर्थ

माझे मन माझ्या मनाला व बुद्धी बुद्धीला वळवीत आहे.अशाप्रकारे मीच माझा राखणदार झालो आहे व इंद्रिय विषयांकडे धाव घेणार तोच मी त्यांना थांबवीत आहेत.मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या ठिकाणी जे काही विकार निर्माण होतात त्याचे मन व बुद्धी हेच त्यांना खुंटी घालतात.तुकाराम महाराज म्हणतात मनातील विचारांची भरती आणि ओहोटी उदय आणि विलय यांचा मी साक्षी राहिलो आहे


अभंग क्र.346
ब्रम्ह न लिंपे त्या मळें । कर्माअकर्मा वेगळें ॥१॥
तोचि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥
शोच अशौचाचे संधी । तन आळा तनामधीं ॥२॥
पापपुण्या नाही ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥

अर्थ

ब्रम्‍ह कधीही पाप आणि पुण्य या मलाने लिप्त होत नाही कारण ते कर्म आणि अकर्म यापासून वेगळे आहे. ज्याने कोणी ब्रम्‍ह स्वरूपाचा अनुभव घेतला आहे तोच त्याचे स्वरूप जाणू शकतो.जसे गवताचे आळे असून त्यातच गवत असते तसेच ते ब्रम्‍ह शुद्ध आणि अशुद्ध यांच्या पलीकडील आहे जरी त्याचा यांच्याशी संबंध असला तरी.तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी सहजच ब्रम्‍ह भाव असतो त्या ठिकाणी पापपुण्यला जागा नसते.


अभंग क्र.347
काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥१॥
तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥
रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्धी ते ठायीं ॥२॥
काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥३॥
वर्णआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥
तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥५॥

अर्थ

जोपर्यंत मनामध्ये पूर्णपणे समाधान पूर्वक अंतकरण तयार होत नाही तोपर्यंत मग तो मनुष्य कितीही वनांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन राहिला तरी काय उपयोग आहे काय? जर तसे काही असते तर जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी आहेत त्यांना त्याचा लाभ झाला नसता?जर धान्याचे कोठार म्हणजे पेवे मध्येशिरले तर लगेच अन्न खाता येईल काय?अंतःकरण जर शुद्ध नसेल तर कितीही यज्ञकुंडातील राख अंगाला लावली असली तरी काही उपयोग आहे काय?वर्णाश्रम धर्माचा मनुष्याला कंटाळा आला तर तो त्याचा त्याग करतो.तुकाराम महाराज म्हणतात साधकावस्थेमध्ये असताना आशेचा पूर्णं निरास होणे महत्त्वाचे असते बाकी सर्व प्रयत्न म्हणजे एक प्रकारचे सोंग होय.


अभंग क्र.348
तेंही नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तेंही नव्हे ॥१॥
तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तेंही नव्हे ॥ध्रु.॥
त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तेंही नव्हे ॥२॥
तेंही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तेंही नव्हे ॥३॥
तुका म्हणे एकचि आहे । सहजिं पाहें सहज ॥४॥

अर्थ

तू जे काही करशील ती भक्ती नाही आणि ज्याचे ध्यान करत आहेस त्यातही भक्ती नाही कारण भक्ती करशील तर त्यात कर्तेपणा आणि ध्यान करशील तर त्यामध्ये ध्याता हा अहंकार उत्पन्न होतो.लोकांना ब्रम्‍हज्ञान सांगणे हि भक्ती नाही आणि मानाने तूला ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रमाणे भक्ती करणे ही भक्ती खरी नाही.लोकांना त्रासून कांटाळणे व अशुभ बडबड करणे ही भक्ती नाही.पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे किंवा नागवे फिरणे यालाही भक्ती म्हणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे एकच लक्षण आहे ते म्हणजे तू कोणतेही कर्म कर पण त्या कर्माकडे तू अभिमानाने नाही तर सहजतेने लक्ष देऊन पहा.


अभंग क्र.349
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु.॥
विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तोचि एक सोसी ॥२॥
तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥

अर्थ

वैराग्याच्या गप्पा मारणे हे सोपे आहे पण प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण आहे त्या वेळेस ढुंगण फाटते.वैराग्य सोप्पे नाही रे बाबा आहो आम्हाला जर कोणी म्हटले आम्ही वैराग्यशील आहोत तर ते आम्हाला खरे वाटणार नाही.प्रत्येक घासाघासाला विष सहन करावे लागते आणि जो कोणी ते सहन करतो तो धन्य आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि जो कोणी असे करून दाखवीन त्याचे पाय मी माझ्या चित्तातधारण करेल.


अभंग क्र.350
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु.॥
हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥२॥
तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥३॥

अर्थ

हे देवा मी भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी होईल.मुखाने विठोबाचे नाम घेणे हा माझा मुख्य धर्म आहे व हाच माझा नित्य नेम आहे.संतांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवणे हिच माझी उपासना आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि हे देवा हिच माझी भोळी सेवा आहे.


अभंग क्र.351
सांठविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥
त्यांची सरली येरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥
हरी आला हाता । मग कैंची भय चिंता ॥२॥
तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥३॥

अर्थ

ज्यांनी कोणी या हरिला आपल्या हृदयरूपी मंदिरात आत्मतत्वाने साठविले आहे, त्यांची जन्ममरण रुपी येरझार संपली व त्यांनी केलेले सर्व व्यवहार हे सफल झाले.प्रत्यक्ष जर हरीच हातात आला म्हणजे हरी आपला झाला तर मग कसली भय आणि कसली चिंता.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी जर प्रसन्न झाला तर मग तो भक्तांचे मागे कोणतेही कर्म व विकार उरू देत नाही.


अभंग क्र.352
मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥
मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥
आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥
तुका म्हणे भेटी । पुरे एकचि शेवटीं ॥३॥

अर्थ

हे देवा तुमचा तो असणारा मोक्ष तुमच्या जवळच ठेवा.मला त्या मोक्षाचे अंतरापासून आवड नाही मला फक्त तुमच्या भक्तीची आवड आहे.हे देवा तुमच्याजवळ असे विविध प्रकारचे मोक्ष असतील किंवा अनेक प्रकारचे दान असतील ते तुम्ही तुमच्या जवळच ठेवा ते तुम्हीच जतन करून ठेवा.तुकाराम महाराज म्हणतात मला शेवटी तुमचे दर्शन तुमची भेट होणे एवढेच महत्त्वाचे आहे.


अभंग क्र.353
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥१॥
तरी आम्ही जालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । जाय ठाया ठाव पुसोनियां ॥२॥
तुका म्हणे आतां अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥३॥

अर्थ

हरीच्या सगुणरूप भक्तीमार्गात एक वेगळाच आनंद आहे तो म्हणजे हरी नामरूपी मोत्याची माळ ओवली जाते.म्हणूनच तर आम्हीही निर्गुणाच्या विषयी उदास झालो आहे कारण आम्हाला मोक्ष हा मुळीच आवडत नाही.देवा तुझ्या ह्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला देण्या-घेण्याचा व इतर कोणताही व्यवहार करता येतो पण जर एकदा तुझ्या निर्गुण स्वरूपाचे ज्ञान झाले तर मग तुझ्या सगुण स्वरूपाचे जे व्यवहार करतो ते सर्व व्यवहार त्याचा ठावठिकाणा पुसून जाते.तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा मला असे अभय द्या कि “मी तुला अभयदान दिले” असे तुम्ही एकदा मला म्हणा म्हणजे मला सर्व मिळाले असे समजणे योग्य.


अभंग क्र.354
भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥
तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥
मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥२॥
तुका म्हणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥३॥

अर्थ

अरे जर स्वतः पांडुरंग परमात्माच आपल्याला या भवसागरातून तारण्यासाठी आपल्या पुढे चालत आहे मग तुला यापलीकडे जाण्यासाठी काय अवघड आहे?हा पांडुरंग परमात्मा एक उत्कृष्ट नावाडी आहे तो तुला या भावासागारातील पाणी तुझ्या अंगालाच काय तर हात पाय यांनासुद्धा लावू देणार नाही थोडेदेखील पाणी तुझ्या हाता व पायांना लागणार नाही.यांच्या आधाराने तर पूर्वी अनेक साधुसंत हा भवसागर तरुन गेलेले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आपणही त्या पांडुरंगाच्या मागे तत्परतेने धावत जाऊ.


अभंग क्र.355
नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥
असें तुमचा रजरेण । संतां पायीं वाहाण ॥ध्रु.॥
नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तीभाव करीं देखीं ॥२॥
नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥
नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ॥४॥
कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥५॥

अर्थ

हे संत हो तुम्ही मला दिलेला सन्मानरूपी अलंकार हा खूप मोठा आहे पण तो अलंकार मला शोभत नाही.अहो मी तर तुमच्या पायाच्या धुळीचा कण आहे तुमच्या पायाची वाहन आहे.मला तुमच्या सारखी ब्रम्हस्वरूपाची ओळख नाही पण दुसऱ्याचा भक्तीभाव पाहून तसा वागत आहे.मला शून्याकार भाव म्हणजे समाधी अवस्था समजत नाही तसेच क्षर व अक्षर हेही मला समजत नाही.आत्मा व अनात्मा याचा विवेक माझ्या चित्तात शिरत नाही.तुकाराम महाराज म्हणतात मला काहीही कळत नाही समजत नाही हे मात्र नक्की पण मला मात्र एक समजते की तुमच्या संतांच्या चरणांवर लोटांगण घ्यावे तुमचे दर्शन घ्यावे.


अभंग क्र.356
सत्य साचे खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥
येणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ती जेणें ॥ध्रु.॥
भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥
तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥३॥

अर्थ

या जगतामध्ये सत्य बरोबर आणि खरे काही असेल तर ते विठोबाचे नाम आहे आणि तेच बरे आहे.या नामाने संसारातील भावबंधन तुटतात व इह परलोकी आपली कीर्ती राहते.ज्याच्या मनामध्ये हरी विषयी विठ्ठला विषयी विश्वास दृढ आहे त्यालाच हरीची भेट त्वरित होते.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंतरामध्ये विठ्ठला विषयी भोळी भक्ती असते त्याला कळीकाळाला कसे जिंकावे हे चांगले समजते.


अभंग क्र.357
सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥१॥
आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥
आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥
तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥

अर्थ

जे सत्य म्हणजे हरी आहे ते आवडते पण जे सत्य आहे याविषयी संशय धरला तर त्यावरील विश्वास उडतो.तुमच्या कृपादाना मुळेच तर आम्हाला ह्या गोष्टी समजल्या आहेत शुद्ध सोने कोणते व अशुद्ध सोने कोणते हे समजल्यावर अशुध्दाचा त्याग केला जातो.त्यामुळे आता आम्हाला खरे सुख व खोटे सुख कळून आले आहेत. खोटे सुख आम्हाला लाभले तर त्याचा त्याग आम्ही पटकन त्याग करू कोणताही उशिरा लागू देणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा खरे खोटे समजण्याकरता बुद्धी रुपी डोळ्यांमध्ये विवेकरुपी अंजन असणे गरजेचे आहे आणि त्याकरिता तुझीच सेवा करणे आवश्यक आहे.


अभंग क्र.358
करावें चिंतन । तेचि बरें न भेटून ॥१॥
बरवा अंगीं राहे भाव । तंग तोचि जाणा देव ॥ध्रु.॥
दर्शणाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥२॥
तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥

अर्थ

देवाला न भेटता त्याचे चिंतन करत रहावे हेच उत्तम.देवाला न भेटता देवाचे चिंतन करणे हा जो अंगी असलेला भक्तीभाव आहे तो सर्वोत्तम आहे कारण तो भक्तीभाव देवाला भेटण्याकरता आतुर झालेला असतो व असे ज्याच्या मनी असेल त्यालाच देव समजावे.देवाची भेट झाली नसल्यामुळे देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे मन आतुर झालेले असतात.तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चिंतन व देवाचे ध्यान हे देवाच्या वियोगातच होते म्हणजे त्याची भक्ती होते व ती भक्ती इतकी प्रबळ असते कि तो भक्त भक्तीनेच देव होतो हे सर्व होण्याला कारण म्हणजे मन असते कारण मनाला देवाच्या भेटीची आवड लागलेली असते.


अभंग क्र.359
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥
सहज पूजा याचि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥
अवघें भोगितां गोसावी । आदीं आवसानीं जीवी ॥२॥
तुका म्हणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥

अर्थ

या संसारामध्ये जे जे काही प्राप्त होईल तेते देवाच्या सेवेकरता देवाला समर्पण करावे.यालाच सहज पूजा असे म्हणतात आणि हीच पूजा घडण्याकरता आपला अभिमान मात्र गळून गेला पाहिजे.जीवाच्या आधीपासून अंती पर्यंत सर्व भोग हा श्रीहरीच भोगत आहे असे समजावे.तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे मी भोक्ता आहे व हे सर्व भोग माझे आहेत हा अभिमान बाजूला ठेवला तर भगवंता मध्ये व आपल्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही.


अभंग क्र.360
नसे तरी मनी नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनी । विठ्ठलनामसंकीर्तनी ॥ध्रु.॥
दंभस्फोट भलत्या भावें । मज हरीजन म्हणावावे ॥२॥
तुका म्हणे काळांतरी । मज सांभाळील हरी ॥३॥

अर्थ

एखाद्याच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम नसेल तरी चालेल परंतु त्याच्या वाणीमध्ये भगवंताचे नामस्मरण चालू पाहिजे.विठ्ठलाचे नामस्मरण करीत त्याचे नाम चिंतन करीत माझा देह पडावा अशी माझी इच्छा आहे.मग मला लोकांनी दांभिक म्हटले तरी चालेल परंतु तुझे नामस्मरण नित्य माझ्या वाणीत वसु देलोकांनी मी तुझा हरिभक्त आहे असे म्हंटल्यावर मला नाव ठेवले तरी चालेल.तुकाराम महाराज म्हणतात येवढेच जरी केले तरी काही काळानंतर माझा सखा हरी हा माझे रक्षण करील असा विश्वास मनात ठेवावा.


अभंग क्र.361
नये जरी कांहीं । तरी भलतेचि वाहीं ॥१॥
म्हणविल्या दास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥
समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥२॥
तुका म्हणे सत्ता । वरी असे त्या बहुतां ॥३॥

अर्थ

तुला कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसेल तरी चालेल,मी हरीचा दास आहे असे जरी तू म्हटले तरी तुला जन्म मृत्यूचा कोणीही वेठीस धरणार नाही.कारण श्री हरीचे नाम हे समर्थ आहे व त्याचे नाव घेतले तर मग कोणताही माल म्हणजे कोणताही मनुष्य जन्म मृत्यूच्या तावडीतून सुटतो.तुकाराम महाराज म्हणतात त्या समर्थाची सत्ता सर्वांवर असते.


अभंग क्र.362
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥
म्हणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥
नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥२॥
तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंचि कोडें ॥३॥

अर्थ

अन्नाचा त्याग करणे व वैराग्याने वनात जाऊन राहणे हे मला शक्य होत नाही.म्हणून हे नारायणा मी तुला अति करून तेणे तुला शरण आलो आहे.वेदाअक्षरं पठण करण्याचा अधिकार मला नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवा आयुष्य थोडे आहे आणि अडचणी फार आहेत.


अभंग क्र.363
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥
ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥
एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥
प्रकाराचें तीन । तुका म्हणे केलें जन ॥३॥

अर्थ

एखाद्या प्रासादिक कवीने चांगले कवित्व केले आणि त्याच्या केलेल्या कवितेतून शब्द चोरून दुसर्‍या एखाद्या चोरट्या कवीने कवित्व केले तर त्यापासून त्याला काय लाभ होतो ?अहो नुसतेच भुसा चे कांडण करून काय फायदा आहे आणि सत्य कर्मामध्ये अडचणी निर्माण करून काय फायदा होतो? चोरून केलेल्या कवित्वाची कीर्ती तर होते त्यामुळे लोक त्या कवीच्या पाया देखील पडतात पण तो कवी शेवटी नरकात जातो .तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करूनच देव साध्य होतो पण असे चोरून काव्य करून त्याचा आश्रय घेऊन केवळ फजिती होते.


अभंग क्र.364
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥
दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥
बीज पृथिवीच्या पोटीं । तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥

अर्थ

ज्यादा बोलणे हे हि चांगले नाही व कमी बोलणे हे चांगले नाही कारण ज्यादा बोलल्यावर लोक त्याला वाचाळ म्हणतात व न बोलल्यास लोक त्याला मुका म्हणतात.म्हणून या पेक्षा भिन्न जे आपले स्वरुपबोध यातून बोलणे हे योग्य.सकाळी सूर्योदयाच्या आगोदरचा अंधार व संध्याकाळी सूर्‍यास्ताच्या अगोदर चा अंधार हे दोन्ही सारखेचतसे मौन आणि बोलने हे एकमेकांत अशाप्रकारे जाते.तुकाराम महाराज म्हणतात बीज पृथ्वीच्या पोटात असते व त्यापासून वृक्षाची निर्मिती होते पण बीज आणि वृक्ष या दोघांमध्ये पृथ्वी समान आहे.


अभंग क्र.365
विचारावांचून । न पविजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥
देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥
तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥

अर्थ

विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही.विचार करताना हा देह त्रिगुणा पासून तयार झालेला आहे कोणताही गुण परमार्थ करण्यास अनुकूल नाही हा विचार करावा.त्यामुळे कोणतेही कर्म केलेले असो ते कर्म देवाला अर्पण करावे.तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे आपण कोणतेही कर्म देवाला अर्पण केले तर ते कर्म योग्य आणि उचित ठरते.


अभंग क्र.366
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥
ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥
वसों न सके पाप । जाय त्रिविध तो ताप ॥२॥
तुका म्हणे माया । होय दासी लागे पाया ॥३॥

अर्थ

एक विठोबा चे नाम असे आहे या नामाने भव रोगापासून आपल्याला सुटका करता येते संचित प्रारब्ध आणि क्रियमाण यांच्यापासून होणाऱ्या भोगाचाही त्यामुळे नाश होतो.असे हे विठोबाचे नाम पवित्र आहे त्याचे उच्चार केले असता जन्ममरण रुपी बाधा खंड ते.विठोबाचे नामस्मरण केल्यामुळे त्रिविध तापांचे नाश होतो व कोणत्याही प्रकारचे पाप होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे नामस्मरण इतके अवर्णनीय आहे कि ते सर्व जगाला भुलविणारी माया जे कोणी विठोबाचे नामस्मरण करतात ती माया त्याच्या चरणांची दासी होते.


अभंग क्र.367
मुसावले अंग । रंगीं मेळविला रंग ॥१॥
एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥
सागरीं थेंबुटा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥२॥
तुका म्हणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥३॥

अर्थ

देवा माझे सर्वांग हे ब्रम्हभावाने रंगून गेले आहे कारण माझ्या जीवाचा रंग आत्मत्वा मध्ये मिळवला आहे.जीव आणि शिव हे दोन्ही एकमेकात समरस झाले आहेत.जसे सागरांमध्ये एक थेंब पाणी पडल्यावर ते वेगळे काढता येणार नाही त्याप्रमाणे हे जीव ब्रम्हाशी ऐक्य झाल्यामुळे हे आता वेगळे होणे अशक्य आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे काही नवीन आहे असे तुम्ही समजू नये कारणहे तुम्हाला माहीत आहे की जीव आणि शिव हे दोन्ही मूळचेच ऐक्य रूप आहे.


अभंग क्र.368
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥१॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥
हेचि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥
तुका म्हणे पापा । शिवों नये अनुतापा ॥३॥

अर्थ

याअगोदर झालेल्या वाईट कर्माचा पश्चाताप आला कि त्या पापाचे निवृत्ती एक क्षणही वयाला न जाता होते.पण तो पश्चाताप आपण असे पर्यंत टिकून राहिला पाहिजे तरच चांगले .अशा अनुतापामध्ये मनाला स्नान घडले पाहिजे मग ते झालेले प्रायश्चित्त खरे असते.तुकाराम महाराज म्हणतात अनुताप(केलेल्या वाईट कर्माविषयी झालेले प्रायश्चित्त) ज्यावेळेस होते त्यावेळेला पाप मनाला शिवत नाही.


अभंग क्र.369
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥ध्रु.॥
तपें इंद्रियां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥
मंत्र चळे थोडा । तरि धडचि होय वेडा ॥३॥
व्रत करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥
धर्म धर्मा सत्त्वचि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥
भूतदयेसि आघात । उंचनिच पाहे चित्त ॥५॥
तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥॥

अर्थ

चारीआश्रमांना जे ठरवून दिलेले विहित कर्म आहेत ते जर व्यवस्थित पार पडले नाही किंवा केले नाही तर काहीही उपयोग होत नाही.पण जर भगवंताविषयी भोळी सेवा केली तर तशी ती फार कठीण नाही तेथे फक्त भगवंताविषयी भक्ति भाव हवा आहे.अनेक वर्ष तपे करावी आणि जरी इंद्रियनिग्रह न करावा तर हजारो वर्षांची केलेली तपश्चर्‍या एका क्षणात वाताहात होते.वेदमंत्र उच्चार करतान त्या काही थोडी जरी चूक झाली तर मग तो कितीही शहाणा असेल तरी तो वेडा ठरला जातो अशी भीती तेथे असते.अनेक कर्मे केली पण एखाद्या वेळीचूक आढळली तर मागील सर्व व्रते भंगतात.कोणतेही धर्मकार्य करण्यास सत्व गुण आवश्यक असते नाही तर व्यर्थ शिन होतो.भूत दया करावयास गेले आणि हा लहान हा मोठा व भेद केला तर त्या भूत दयेवर आघात होतो.तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्ती जर सोडली तर इतर सर्व मार्गा मध्ये विधिनिषेधाचे ओझेआहे.


अभंग क्र.370
सोडिला संसार । माया तयावरी फार ॥१॥
धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥
यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठल कृपेची कोंवळी ॥३॥

अर्थ

ज्याने देवा करतात संसार सोडला त्याच्यावर देवाचे अत्यंत माया असते .अशा भक्तांकरिता देव स्वतः त्यांच्या मागे-पुढे त्यांचे रक्षण करण्याकरता राबत असतो त्यांच्यावर होणारे हे सर्व सुख दुखः आपल्या अंगावर देव घेत असतो. या भक्ताने त्या देवाचे नामस्मरण करत राहावा आणि त्या देवाने या भक्तांचे सर्व काम करीत राहावा असा प्रकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात श्री विठ्ठल माऊली हि फार भोळी आहे आणि ती तिच्या भक्तांवर कृपा करण्यासाठी फार कोवळी आहे.


अभंग क्र.371
बैसूं खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥
रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥
विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्हां जीवन शरणागतां ॥३॥

अर्थ

आम्ही जेथे जेथे जेवू-खाऊ खेळु कोणतेही कर्म करत राहू तेथे तुझे नाम घेत जाऊ.रामकृष्ण नामाची माळ आम्ही आमच्या गळ्यात म्हणजे कंठात घालू.हे नाव आम्हाला तारणारे आहे हा विश्वास मनात धरून आम्ही तुझे नाम अखंड घेण्यासाठी आजून दृढनिश्चय करू.तुकाराम महाराज म्हणतात आम्हा शरणागतांना जीवनात तुझे नाम घेणे आता एवढेच काम आहे.


अभंग क्र.372
पाटीं पोटीं देव । कैचा हरीदासां भेव ॥१॥
करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥
एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥
तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥

अर्थ

मागेपुढे देव असताना मग भक्तांना कसले भय आले?म्हणूनच तुम्ही आनंदाने हरिकीर्तन करा कोणत्याही प्रकारचे भय किंवा शंका मनात धरू नका.देव आपल्या सोबत असल्यावर मग काळाचे काय सामर्थ्य चालणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आमचा धनी पूर्णपणे समर्थ असल्यावर आम्हाला कसली कमतरता आहे?


अभंग क्र.373
मनोमय पूजा । हेचि पढीयें केशीराजा ॥१॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रंग ॥ध्रु.॥
अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥२॥
तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥

अर्थ

मनोमन केलेली पूजा त्या केशीराजाला फार आवडते.तुम्ही कल्पनेने जरी त्याला फल पुष्प नैवद्य अर्पण केले तरी त्याला ते मान्य आहे परंतू बह्योपाचाराचा थाट-माट केला तर ते देवाला मान्य नसते.हरी हा भक्तांच्या मनातील कायम शुद्ध स्वरूपाच्या भक्तीभावपूर्वक खुणा जाणतो.तुकाराम महाराज म्हणतात पण जर अंतकरणात खोटा भक्तीभाव असेल तर त्या हरी पुढे ते कसे चालेल?


अभंग क्र.374
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥
नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥२॥
तुका म्हणे नवविध । भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥

अर्थ

खरोखरच ज्याची भक्ती अतिशय जिव्हाळ्याचे आहे तो दैवाचा पुतळाच आहे.त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित असेल,तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला पटत नाही.हरीच्या नामारुपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे,त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण,कीर्तन,मनन इत्यादी नऊप्रकारची भक्ती करणे जाणतो ,तोच मनुष्य खरा शुद्ध मानवा.


अभंग क्र.375
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥

अर्थ

मी घर सोडून याच कारणासाठी वनात जात आहे.कारण हरीच्या सगुण रुपाबद्दल माझ्या मना मध्ये असणाऱ्या प्रेमाला ऐरव्ही दृष्ठ लागेल आणि त्यायोगाने माझ्या मना मध्ये भजन पूजन इत्यादीची जी शुद्ध भावना आहे ती जाऊन माझी बुद्धी कोरडी निष्काम होईल.तसे होऊ नये म्हणून मी अद्वैतशास्त्राच्या गोष्टी ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ”मी ब्रम्ह आहे”असे म्हणणे हा सुद्धा एक भ्रम आहे त्या भावनेचा भ्रम मी आपल्या मध्ये येऊ देणार नाही. (म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये भक्ती घडत नाही असे महाराजांना म्हणायचं आहे.


अभंग क्र.376
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥
नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥२॥
तुका म्हणे दोषी । मी तों पातकाची राशी ॥३॥

अर्थ

देवा री मी या भव सागरामध्ये बुडत आहे तरी तू माझे रक्षण कर.माझे पर्वतप्राय दोष तू पाहू नकोस.आणि माझा उद्धार करण्यासंबंधी भार पडतो असे माणू नकोस.पतितांना पावन करणे हे तुझे ब्रीदच आहे.ते तू पालन कर. तुकाराम महाराज म्हणतात मी मोठा दोषी आहे.पातकांची रसच आहे.तू उद्धार केल्या शिवाय माझा उद्धार होणार नाही.


अभंग क्र.377
अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥१॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥२॥
तुका म्हणे बोली । पुढें कुंटितचि जाली ॥३॥

अर्थ

आम्ही अक्षय अशी परमार्थ रूप इमारत उभी केली आहे ती आता मोडली जाणे शक्य नाही.या इमारतीचा पाया फार खोल आहे.तो सर्वाधार ब्राम्हापर्यंत पोहोचला आहे.ते स्थान असे आहे की, आणखी खाली खणता येणार नाही.आमचा हिशोब थोडासा चुकत होता.काही अव्यवस्था झाली होती. तुकाराम महाराज म्हणतात पण आता ताळाबरोबर जमला आहे.परमार्था विषयी बोलण्यासारखे आणखी काही राहिले नाही.


अभंग क्र.378
न मानावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥
ज्याणें लौकिक हा केला । तो हा निवारिता भला ॥ध्रु.॥
माझे इच्छे काय । होणार ते एके ठाय ॥२॥
सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥

अर्थ

लोकांना तुम्ही आता माझ्याविषयी काही चिंता करू नका.ज्याने हा ऐवढा लौकिक वाढविला आज तो सर्व संकटाचे निवारण करण्यास समर्थ आहे. माझ्या इच्छेप्रमाणे कोणते काम होणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात सुखे आणि दुखे यांपेक्षा मी वेगळा आहे.


अभंग क्र.379
तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥१॥
जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥
तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं ॥३॥

अर्थ

अहो देवा तुमचे थोर भक्त तुमच्या स्वरूपाचा विचार करतात.आणि जप,तप इत्यादी साधनेही ते करतात.पण मी इतका अज्ञ आहे की माझे मन त्या साधनांचा विचारसुद्धा करू शकत नाही.मी सर्व बाबतीत अतिशय दुबळा आहे.म्हणून मला ऐवढेच कळते कि,काकुळतीस येऊन केवळ तुमची प्रार्थना करावी. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा, मज कडू जी काही थोडी फार वेडीवाकडी सेवा होत असेल,तिचा आपण स्वीकार करावा.


अभंग क्र.380
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥१॥
सादावीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥
गातां नाचतां विनोदें । टाळघागरीयांच्या छंदें ॥२॥
तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥३॥

अर्थ

झांज वाजून मोठ्या आनंदाने मी भजनाचा सुखसोहळा करीत आहे.आणि लोकांना मी अशी साद देत आहे की,अहो तुम्हीं जर हरीचे भजन केले,तर तुम्हांला खरोखरच कोणाचेही भय नाही.हरीचे गुणानुवाद गाताना मी पायात चाळ बांधून व हातात टाळ घेऊन तालामध्ये मोठ्या कौतुकाने नाचत आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि पहा,पहा, या मध्ये कोणतेही भय नाही आणि देव प्रत्येक्ष समोर येत आहे.


अभंग क्र.381
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥
सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥
देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥२॥
तुका म्हणे साह्य । देव आहे तैसा आहे ॥३॥

अर्थ

मुक्ती कशाला म्हणावे बंधन कशाला म्हणावे हे मला कळत नाही कारण स्वरुपत आहेच मी मुक्त आहे त्यामुळे मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा बंधनातून मुक्त होण्यासाठी मला काही प्रयत्न करावे लागत नाही.माझी अशीच सुखरूप स्थिती झाली आहे आणि त्या स्थितीत मी कीर्तन करत आहे.माझे मन भयाला पूर्ण पणे विसरून गेले आहे.नाश करण्याला योग्य अशी कोणतीच वस्तू मला माझी पुढे दिसत नाही.तर कोणाचा नाश करण्यासाठी मी कास बळकट करून सज्ज होऊ? तुकाराम महाराज म्हणतात सर्वोतपरी साहय्य करणारा देव अद्वैतपणे जसा आहे तसा आहे.


अभंग क्र.382
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥
तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥
रज्जु सर्प होता । तोंवरीन कळतां ॥२॥
तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥

अर्थ

शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी खडे मांडतात व खडे मांडून मुलांना धडे शिकवतात.आणि मुले खडे टाकून देतात खड्यांना वाचूनच त्यांना आकडे आणि अक्षरे ओळखता येतात. तसेच दोरी हि दोरीच आहे,असे जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत दोरीवर सापाचा भास होतो. तुकाराम महाराज म्हणतात बागुल बुवा मुळात कोठेच नाही हे कळते तेंव्हा त्या बागुल बुवाचे भय राहत नाही


अभंग क्र.383
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥
नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥२॥
तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥३॥

अर्थ

हे माझी वैखरी वाणी तू आता यापुढे सतत हरिनामाचे स्मरण करत रहा.हे रांडे तू हरिनामा वाचून व्यर्थ काहीही बडबड करत जाऊ नकोस.विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण सोडून व्यर्थ बडबड करशील तर,तुकाराम महाराज म्हणतात तुला तुझा स्वामीविठ्ठलाची शपथ आहे.


अभंग क्र.384
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥
मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥
त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्य घ्यावी आतां सेवा ॥३॥

अर्थ

देवा तुला काय करता येणार नाही,म्हणून माझे लज्जा रक्षण कर. हे काम तर तुला मुळीच कठीण नाही.मी तर अपराधाची मूर्ती आहे.देवा, माझ्या कडे कृपा दृष्टीने पहा आणि माझे रक्षण कर ,असे मी त्रिवार सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात आता मज कडून खरी सेवा करुन घे.


अभंग क्र.385
वंदीन मी भूतें । आतां अवघीचि समस्तें ॥१॥
तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥
तुका म्हणे मग । नव्हे दुजियाचा संग ॥३॥

अर्थ

यापुढे आता या भुतलावर जी काही भूत मात्र आहेत ती सर्व देवाचीच रुप समजून त्यांना मी वंदन करेन.अहो नारायण सर्व प्राणीमात्र म्हणजे तुम्हीच आहात अशी भावना मी धरीन.लहानमोठा भेद बाजूला सारून पदोपदी मी सर्वत्र तुम्हांला पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात याविषयी वेद मला प्रमाण आहेत.असे झाल्यावर कोणताही दुजेपणा मनात उत्पन्नच होणार नाही.


अभंग क्र.386
पूजा पुज्यमान । कथे उभे हरीजन ॥१॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ती मुर्ती ॥ध्रु.॥
देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥
गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥
शोक मोह चिंता । यांची नेणती ते वार्ता ॥४॥
तुका म्हणे सखे । विठोबाचि ते सारिखे ॥५॥

अर्थ

हरी कथे मध्ये जे हरिभक्त उभे आहेत ते खरोखर पूज्य आहेत पूज्यमान आहेत.ज्या हरीची कीर्ती ते वाखाणित आहेत,तो हरीच त्यांच्या शरीरात मूर्तिमंत वास करीत आहे.त्यांच्या ठिकाणी देहाची आठवण सुद्धा नाही.आणि केवळ शुद्ध आनंदात ते मग्न आहेत.त्यांना देहाचा अभिमान नाही.हरीनाम घेण्यात लाज नाही,आणि मानसन्मानाचा विचार तर त्यांनी हाकलून दिला आहे.ऐवढेच काय शोक मोह चिंता यांचे नावही ते जाणत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात माझे सखे हरीभक्त खरोखर प्रत्यक्ष विठ्ठलासारखेच आहेत.


अभंग क्र.387
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥
धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥
हिरा हिरकणी । काढी आंतुनि आइरणी ॥२॥
तुका म्हणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥

अर्थ

ज्याचा जसा भक्तांचा भक्तिभाव असेल तसाच देव त्या भक्तांसाठी होत असतो बळेच शक्ती दाखवून देव प्रसन्न करता येत नाही.जात जाती कडे धावते कारण एका जातीच्या माणसांना परस्परांची खुण कळते.खरा हिरा ऐरणीवर ठेऊन त्याच्या वर घाव घातला,तरी तो फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हिरा असो, हिरकणी असो,तो ऐरणीत शिरतो.मन असे हिऱ्यासारखे शुद्ध करावे ते फुटता कामा नये.


अभंग क्र.388
वरीवरी बोला रस । कथी ज्ञाना माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तयां इह ना पर लोक ॥ध्रु.॥
परिस एक सांगे । अंगा धुळीही न लगे ॥२॥
तुका म्हणे हाडें । कुतर्‍या लाविलें झगडें ॥३॥

अर्थ

वरवर ब्रम्‍हज्ञानाचा किंवा ज्ञानाच्या कितीही रसभरीत बोल बोलले तरी अनुभवाचुन ते बोल टरफला सारखे आहेत.अशा ठक लोकांना इह लोकात सुख मिळत नाही व परलोकातही चांगली गती मिळत नाही.दुसऱ्याने सांगितलेलं ऐकून जो तेच बडबडतो त्याला परमार्थाचा अंशही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे नुसतेच शब्द वाचाळपाणाने बोलने,म्हणजे हाडासाठी कुत्री भांडतात तशी भांडणे अशी अवस्था विद्वानांची होत असतात.


अभंग क्र.389
हेचि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥
अवघीं तुझींच ही पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥
न वर्जीत दिशा । जाय तेथेंचि सरिसा ॥२॥
नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥३॥

अर्थ

हे केशिराजा आता मी तुझी अशाप्रकारे पूजा करणार आहे.जे काही समोर दिसते ते तुझे स्वरूप आहे असे समजून मी अभेद बुद्धीने त्याला नमस्कार करीन.कोणतीही दिशा वर्ज्य न करता जिकडे जाईन तिकडे तुझ्या सरस अश्या रुपाला जाणीन. तुकाराम महाराज म्हणतात मी कधीही कोणत्याही गोष्टीत जे गुणदोष असतील,त्याकडे लक्ष देणार नाही.


अभंग क्र.390
आपुलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥१॥
परि हे वाणी वायचळे । छंद करविते बरळे ॥ध्रु.॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥२॥
तुका म्हणे भुली । इच्या उफराटया चाली ॥३॥

अर्थ

या प्रपंचामध्ये एखादी गोष्ट आपली आहे असे सांगण्यासारखी एकही गोष्ट किंवा काहीच नाही म्हटले तरी चालेल, असे काहीही नाही. परंतु हे सर्व माहीत आहे तरी देईल वाणीला व्यर्थच ‘मी आणि माझे’ असे म्हणण्याचे चाळे लागले आहे छंद लागलेला आहे आणि ती व्यर्थ काहीतरी बरळत असते. हा देह पंच भुतांचा मेळ आहे आणि सत्य काय असेल तर आत्मा आहे तो आत्मा आणि देह हे निराळे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु वाणीला “मी आणि माझे” असे म्हणण्याची सवयच लागलेली आहे खरेतर हे सर्व उफराटे आहे.


अभंग क्र.391
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठी वाचा ॥१॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥
तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥

अर्थ

हा भव समुद्र तरून जाण्यासाठी विठ्ठल नावाचा फुकटचा नावाडी आपल्याला लाभला आहे त्याला जर आपल्या वाचणे आपण आळविले तर तो लगेच आपल्या मदतीसाठी धावून येतो.हा देव कटे वर हात ठेऊन उभाचा उभा राहिलेला आहे, कायम सज्ज कधीहि बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा भक्तांच्या पाप पुण्याची शिदोरी पाहत नाहि, त्यांची जात बरी वाईट अगर कुळ उच्च नीच आहे,असा विचार करत नाही.त्याच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट देतो.


अभंग क्र.392
कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥
भुलो नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥
तुका म्हणे जीवें । अनुसरल्या एक भावें ॥३॥

अर्थ

भक्त जणहो पहा हा देव किती कृपाळू आहे त्याला केवळ दिन भक्तच आवडतात.त्यांच्या संसाराचा सर्व भार आपणच घेऊन त्यांच्या योग क्षेमाची चिंता तोच करतो.भक्त ऐखाद्यावेळी चुकले आणि आडमार्गाला लागले तर त्यांना हाताला धरून सरळ मार्गाला आणतो. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त एकनिष्ठपणाने देवाला अनुसरतात,त्यांच्यासाठी तो वर मी सांगिलेल्या सर्व गोष्टी करतो.


अभंग क्र.393
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥
मागें परतवी तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥
येऊनियां घाली घाला । नेणों काय होईल तुला ॥२॥
तुका म्हणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥

अर्थ

हे मन कसे विषयाच्या ठिकाणी गुंतले आहे ते पहा सारखे विषयाकडेच ते धाव घेते.जो या मनाला मागे खेचू शकतो,तो या जगात खरा शूर आहे.हे मन ज्यावेळेस विषय सक्तीचा घाला घालील ,त्या वेळेस तुझी दशा काय होईल ,ते कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आज पर्यंत या मनाने जगात कित्येक शहाण्या लोकांना नाडले(फसविले) आहे.


अभंग क्र.395
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥३॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥

अर्थ

हे माझी वाणी तू अवीट अशा गोड विठोबाचे नाम सतत घेत रहा.आणि आपल्या डोळ्यांना सांगतात,तुम्ही विठोबाचे मुख दर्शन घेण्याचे सुख नित्य घ्या.अहो कानांनो तुम्ही विठोबाचे गुणानुवाद श्रवण करा.हे मना,तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठ्ठलाच्या पायाशी सतत राहा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवा,या केशवाला तू सोडू नकोस.


अभंग क्र.396
धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥
सकळ मंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥

अर्थ

तुझी स्तुती करतांना व गुण वर्णन करताना तृप्तीच होत नाही असे म्हणून महाराज सांगत आहेत.हा पांडुरंग खरच फार सुंदर आहे स्वरूपाने सावळा सुंदर आहे.या भगवंताचे रूप सर्व मंगलाचे सारतत्व आहे व सर्व सिद्धीचे भांडार म्हणजे याचे मुखआहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या ठिकाणी जे सुख आहे,त्याची सीमाच नाही व त्याचे वर्णनही करता येणार नाही.


अभंग क्र.397
जरी मी पतित नव्हतों देवा । तरि तूं पावन कैंचे तेंव्हा ॥१॥
म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका म्हणे याचकभावें । कल्पतरु मान पावे ॥३॥

अर्थ

अरे देवा मी जर पतित नसतो तर पतीतांना पावन करण्यासाठी तू पावन आहेस असे तुला कोण म्हटले असते?म्हणुन माझे पातीताचे नाव आधी आहे व मग तू पावन, कृपानिधी आहेस.(पतितपावन).लोखंडामुळे परिसाचा महिमा वाढलेला आहे.लोखंड नसते ते परीस म्हणजे एक नुसता दगड झाला असता. तुकाराम महाराज म्हणतात याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू इच्छिलेले देतो,असा मोठेपणा त्या वृक्षाला मिळाला आहे.अर्थात विठ्ठलाला संतांमुळेच मोठे पण मिळाला आहे.


अभंग क्र.398
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥
कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥
आठवचि पुरे । सुख अवघें मोहरे ॥२॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥

अर्थ

जर देवाविषयी मनामध्ये एकनिष्ठ शुद्ध भक्तिभाव असेल तर इतर कोणत्याही प्रकारची युक्ति देवाची प्राप्ती करण्यासाठी करावी लागत नाही.हे मर्म मला,माझ्याच शुध्द भावामुळे अगदी जीवा पासून कळले आहे.देवाची सतत आठवण ठेवली तरी पुरे त्या योगाने सर्व सुखाचा अनुभव येतो. तुकाराम महाराज म्हणतात आपले चित्त त्याच्याकडे लागले तर नारायणाला खरोखर तेच आवडते इतर जप,तप, उपवास,तीर्थयात्रा आदी साधनांचा काही उपयोग नाही.


अभंग क्र.399
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्वीकार ॥१॥
पाहा विचारूनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥
तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥२॥
तुका म्हणे तरी । ऐक्यभाव नुरे उरी ॥३॥

अर्थ

देवा मला फक्त एकट्या संतांचा आधार आहे, तू तर निर्विकार आहेस. देवा स्वतःशीच या गोष्टीचा विचार करून तू पहा विनाकारण आमच्याबरोबर दावा करू नकोस. देवा आणि तुला एक शब्ददेखील बोलायची सवय नाही परंतु आम्हाला नेहमी भांडायची सवय आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा अरे तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी ऐक्यभाव म्हणजे जीव ब्रम्‍ह ऐक्यभाव देखील राहत नाही मग आता सांग आपण एकमेकांशी संवाद कसा साधायचा. (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी देवाच्या द्वैत स्वरूपाचे आवड सांगितलेली केली आहे.)


अभंग क्र.400
तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥
आन नेघों देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ॥ध्रु.॥
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥
तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥

अर्थ

हे देवा तुझ्या जवळ एकच मागणे आहे ते म्हणजे आम्हाला तुझी चरणसेवा घडावी.ऐरव्ही चारी मुक्ती किंवा सर्व सिद्धी दिल्यास तरी आम्हीं घेणार नाही.आम्हांला सदा सर्व काळ संत संगतीचे प्रेमळ सुख द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या नामानेच माझ्या सर्व कामना पूर्ण होतात.


सार्थ तुकाराम गाथा 301 ते 400 समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *