सार्थ तुकाराम गाथा ११०१ ते १२००

सार्थ तुकाराम गाथा 1101 ते 1200

सार्थ तुकाराम गाथा ११०१  ते १२००


अभंग क्र.११०१
देव भक्तालागीं रूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥
स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागीं कर्कशा करुनी ठेवी॥२॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥

अर्थ

देवभक्तांना संसार करू देत नाही कारण भक्त जर संसार करू लागले तर ते भक्ती करणार नाही त्यामुळे देव प्रतिकूलता निर्माण करतो .भक्ताचे जर भाग्य उजळावे तर त्या भक्ताला अभिमान निर्माण होतो त्यामुळे देव त्याला करंट‌ा करतो. बायको जर गुणवती द्यावी तर तो तिच्या मोहात पडतो त्यामुळे देव त्याला बायको किरकिर करणारी देतो .तुकाराम महाराज म्हणतात‌ या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे त्यामुळे याविषयी मी इतरांना अधिक काय सांगू?


अभंग क्र.११०२
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥
अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥
येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥
देह तंव जाणार । घडेल हा परउपकार ॥३॥
येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥
गांठी पडली ठका ठका । त्याचे वर्म जाणे तुका ॥५॥

अर्थ

एकदा वाघाने एका कोल्ह्याला असा उपदेश केला की, अरे मला फार भूक लागली आहे त्यामुळेच तुला मी खावे असे मला वाटत आहे .तरी तू मला सुखाने तुला खाऊ दे .तुला मरण काही चुकणार नाही मग तू मला तरी मला का उपाशी मारतोस ?ते ऐकून कोल्हा त्याला म्हणतो की अरे तू म्हणतो ते अगदी योग्य आहे आणि ते मला पटले देखील पण तू तुझ्या तोंडाने असा निवड करतो आहेस की माझ्यावर उपकार कर, मला खाण्याची इच्छा तुला झाली आहे पण तू जर मला सोडून दिले तर तुला परोपकार करण्याचे पुण्य मिळेल त्यामुळे तूच सांगितलेला हा निर्णय तूच समजून घे म्हणजे झाले .तुकाराम महाराज म्हणतात एका ठकाला दुसऱ्या ठका ची गाठ पडली तर ते एकमेकाला कसा स्वार्थी उपदेश करतात ते मला माहित आहे.


अभंग क्र.११०३
जेथें आठवती स्वामींचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥

अर्थ

जेथे हरीच्या पायाचे चिंतन चालू असते तेच ठिकाण उत्तम आणि रम्य असते .हरिचिंतन रानात वनात एकांतात केव्हाही चित्ताला समाधानच देते. ज्यावेळी गोविंदाचे चिंतन करण्याचा संकल्प आपण करतो तो काळ धन्य आहे व आनंद देणारा काळ आहे .तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य जीवनात ज्या ज्या वेळी हरीचे चिंतन करतो ,नारायणाचे चिंतन चित्तात करतो तो काळ लाभदायक आहे आणि यालाच उत्तम भाग्य देखील म्हणतात.


अभंग क्र.११०४
तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥
माझा बळीया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥
शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥
कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥
वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥
हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥
वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य॥६॥
छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥
शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥
मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥
पांचाळीसी गांजितां वरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥
गजेंद्र स्मरे राम राम। त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥
तुका म्हणे हरीरूप जाले । पुन्हा नाहीं जन्मा आले ॥१२॥

अर्थ

हे कळिकाळा मी तुला केव्हाच भिणार नाही कारण माझ्या चित्तामध्ये नामा विषयी विशेष जिव्हाळा आहे. अरे माझा पाठीराखा कोण आहे ते तुला माहीत आहे काय ,अतिशय बलाढ्य असा संतांना सतत सहाय्य करणारा नारायणच माझा पाठीराखा आहे. मी तुला त्याच्या काही कथा सांगतो ते ऐक .ज्यावेळी शंखासुराने चारही वेद चोरुन सागरात नेले त्यावेळी या नारायणाने त्याचा वध करून चार वेद परत आणले. कुर्म अवतारात या हरि ने आपले हात-पाय लपून मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि देवांची मदत केली आणि चोरून अमृत पिणाऱ्या राहू दैत्याचा याने शिरच्छेद केला. वराह अवतारामध्ये याने हिरण्याक्षाचा वध करून पाताळात नेलेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर धरून वर काढले. पुढे त्याने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आपल्या भक्ताचे म्हणजे प्रल्हादाचे रक्षण केले. त्यानंतर त्याने वामनाचे र�


अभंग क्र.११०५
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥
भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥
म्हणोनि विवेकें । कांहीं करणें ते निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥

अर्थ

सर्व भूतमात्रांना अन्न जरूर खायला द्यावे परंतु धन देतांना विचार करून द्यावे. जेथे बीज टाकल्यावर उत्कृष्ट प्रकारे ते बीज उगवेल तेथेच बीज टाकावे. दया बुद्धीने सर्पाला जर दूध पाजले तर ते पुण्य होत नाही तर पाप होते .अघोरी मंत्र जप केले तर पाप होते आणि दुःख विकत घेतल्या सारखे होते. भूमी सर्वत्र एकच आहे पण तिचे प्रकार वेगवेगळे आहेत म्हणजेच माळ जमीन, काळी जमीन, उत्तम जमीन, मध्यम जमीन, कनिष्ठ जमीन असे वेगवेगळे जमिनीचे भेद आहेत. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही कर्म करताना विवेकबुद्धीने कर्म करावेत ते केव्हाही चांगलेच जसे मिष्टांन्न आहे पण त्याला चवच नाही तर ते फिके आहे म्हणजे ते जेवणार्‍याला आवडत नाही ते अन्न चविष्ट नाही.


अभंग क्र.११०६
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥
देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥
विश्वासीं निर्धार । विस्तारला विश्वंभर ॥२॥
तुका म्हणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥

अर्थ

साधकाने सर्व भार देवावर घालून आयाचित(जे काही मिळेल त्यामध्ये समाधानी राहणे) वृत्तीने ,संतोष वृत्तीने रहावे हेच खरे परमार्थाचे सार आहे .आपला देह देव सांभाळतो हे समजून आपला देह योग्य कर्माकडे वळवावा. या विश्वाचे पालन पोषण करणारा एक विश्वंभर सर्वत्र विस्तारलेला आहे याविषयी दृढ विश्वास ठेवावा. तुकाराम महाराज म्हणतात विश्वासाचे बळ या जगात सगळ्यात मोठे आहे.


अभंग क्र.११०७
वर्त्ततां वासर । काय करावें शरीर ॥१॥
ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥
नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥
तुका म्हणे भले । जन्मा येऊनियां ज्याले ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला अरे हे शरीर मर्‍यादितरहित वागत असेल तर हे शरीर ठेवून काय करावे? त्यामुळे हे देवा माझे मन तुझ्या पायाच्या ठिकाणी नेमून ठेव. हे श्रीपती माझी वृत्ती तुमच्या पायापासून इतर कोठेही फाकु देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात जे मनुष्य जन्माला येऊन असे जगतात तेच खरे जगतात.


अभंग क्र.११०८
केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥
तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥
ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥
घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥

अर्थ

मी अशी प्रतिज्ञा म्हणजे निश्चय केला आहे की मी त्या पंढरीराया ला त्याच वेळी दान मागेल ज्यावेळी हा पंढरीनाथ मला मूळ पाठवून त्याच्याकडे पंढरीला बोलवेन. त्यावेळी मी मला जे हवे आहे ते मागेन. तोपर्यंत मी माझे पोट भरण्याचे काम करेन .आजपर्यंत मी मला हे नको ते नको असा व्यर्थ बोभाटा केला आहे त्यामुळे मला परमार्थाची खरी वाट सापडली नाही व मी स्वैर पणाने फिरत होतो .जो आपल्या स्वामी चा आदर करतो स्वामी त्याच्यावर कृपा करतात. स्वामी ने केलेल्या आज्ञेचे पालन केल्यावर स्वामीच्या मित्रत्वाचा अनुभव येतो .तुकाराम महाराज म्हणतात आता माझा माय बाप पांडुरंग याच्या सत्तेने जे घडायचे असेल ते घडो आता त्यात कसली चिंता मी करणार आहे मी आता केवळ पंढरीला जाण्याची वाट पाहत आहे.


अभंग क्र.११०९
नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेम भाव ॥१॥
उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥
यंत्र मंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥

अर्थ

अरे जर तुझ्या मनात भक्ती प्रेम भाव नाही तर मग तू डोळे झाकून मंत्रजप काय करतोस? अहो तुम्ही रामकृष्ण हा मंत्र म्हणा याने तुमचे सर्व गर्भवास तुटतील .अरे तुम्ही यंत्र पूजा ,मंत्र पुजा याच्या खटपटीत जर पडालं तर पिशाच्च योनीला जाल. तुकाराम महाराज म्हणतात सर्वांचे सार आणि वेदाचे बीज म्हणजे रामकृष्ण हे नाम आहे आणि हाच मंत्र तुला ह्या भवसागरातून पार पाडील.


अभंग क्र.१११०
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥
तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥

अर्थ

संत‌ ज्या मार्गाने चालत आहेत त्या मार्गातील त्यांच्या पायाची माती माझ्या अंगाला लागो .इतर साधने करण्याची काय गरज आहे आणि संतांच्या पायाच्या धुळीने काय मिळणार नाही तर सर्व काही प्राप्त होणार आहे. संतांचे उच्चिष्ट मी माझे पोट तृप्त होईपर्यंत सेवन करेल .तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव संतांच्या पायावर निश्चय पणाने अर्पण केलेला आहे.


अभंग क्र.११११
जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥
आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥
तुका म्हणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणा संत ॥३॥

अर्थ

बाळ कसे ही असो पण ते त्याच्या आईला आवडते ते बोबडे जरी बोलले तरी त्याचे बोल त्याच्या मातेला गोड वाटते. ती माता त्या मुलाला दागिने घालते ,जेऊ घालते ,चांगले कपडे घालते आणि त्या बाळाला पाहून तिलाच सुख वाटते ,आनंद वाटतो .तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो मीही तुमचे लाडके बाळ आहे मीही माझे बोबडे बोल बोलत आहे त्यामुळे माझे हित कशात आहे हे तुम्हीच जाणा.


अभंग क्र.१११२
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥
गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥
लेकराची गांड स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्वीज पाय ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

अर्थ

देवाचे वस्त्र जर फाटले तर नवे आणावे असे कधीच वाटत नाही पण निर्लज्ज मनुष्य त्यांच्या बायकोला उंच नवी साडी आपण होऊन आणतो .गाईचे पालन करावे असे मनात विचार चुकून सुद्धा येणार नाही परंतु लालसेने घोड्याचा खरारा मात्र नक्की करतो .एखाद्या मनुष्याच्या लेकराने संडास केली तर तो स्वतः धुण्यास धाव घेतो पण ब्राम्‍हणाचे पाय धुवावे असे तो कधीही म्हणत नाही .तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांच्या तोंडावर थुंकावे हे माणसे नरकवास‌ भोगण्यासाठीच यमाकडे जातात.


अभंग क्र.१११३
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥
अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥
द्वीजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुर्कांचे दासीचा लेंक होय ॥२॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥


अभंग क्र.१११४
ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥
शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन । पुरींचें भ्रमण याजसाठी ॥ध्रु.॥
याजसाठी जप याजसाठी तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥
याजसाठी संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥

अर्थ

ब्रम्‍हज्ञान हे केव्हाही उठता-बसता झाले असते तर वेद आणि शास्त्र यांनी “ज्ञानाचा अधिकार फार मोठा आहे” असे सांगून हींपुटी म्हणजे कष्टी का झाले असते ?ब्रम्‍ह ज्ञानाविषयी सहाही शास्त्रांमध्ये भांडण चालू आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठीच तप तिर्था टन सांगितले आहे आणि तप तिर्थाटन हे सर्व साधने ब्रम्‍हज्ञान समजावण्यासाठीच आहे आणि व्यासांनी ही ब्रम्‍हज्ञान कळावे यासाठी अनेक ग्रंथ केलेले आहे .तुकाराम महाराज म्हणतात ब्रम्‍हज्ञान समजण्यासाठी संतांच्या पायाची सेवा करावीच लागते तरच हा भवसागर ही तरता येतो.


अभंग क्र.१११५
गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥
नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणें तयां गति कैसी होय ॥२॥
कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हासी संगती न लगे त्यांची ॥३॥
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥

अर्थ

गायत्री मंत्र शिकवणारे जे कोणी लोक असतील त्यांनी शिकवण्याचे मोबदल्यात धन द्रव्य घेतले तर त्यांची गती त्यांना यमलोकी नेत असते. जे कोणी आपल्या कन्येची विक्री करतात ते अघोर नरकवास नक्की भोगतात हरिनाम घेऊन जे द्रव्य मागतात त्यांची गती काय होईल ते काहीच कळत नाही त्यांची गती काय होईल हे त्यांनाच माहीत .आम्हाला त्या पाप्यांची संगती देखील नको .तुकाराम महाराज म्हणतात आमची संगती करणारा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आम्हाला दुराचारी मनुष्याची संगती नको आहे.


अभंग क्र.१११६
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥
वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥
तुका म्हणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥

अर्थ

साधूच्या दर्शनाची लाज जो गव्हारा म्हणजे मूर्ख मनुष्य आहे तोच धरतो आणि वैश्येच्या घरी फुले नेण्याकरिता त्याला लाज वाटत नाही . वैश्या, दासी, मुरळी या जगात निंद्य म्हणजे ओवळी आहेत आणि त्या तुला सोवळी म्हणजे चांगल्या शुद्ध कशा वाटतात ?तुकाराम महाराज म्हणतात आरे नीच माणसा, निर्लज्जा, हलकटा आता तरी थोडीशी लाज धरा, अशा माणसांना चपलेचा टाचणे खाली मारले पाहिजे.


अभंग क्र.१११७
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसे चोहोटां आदरेशीं ॥१॥
न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥ध्रु.॥
देवाब्राम्हणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बैसे दुगपधीशीं अत्याआदरें॥३॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीन । कां रे रामराणा विसरसी ॥४॥

अर्थ

काही माणसे असे आहेत की त्यांना देव दर्शन घेण्यासाठी देवळात जाण्यासाठी त्रास वाटतो परंतु चव्हाट्यावर बसून लोकांच्या टवाळ्या करण्यास मात्र त्यांना आनंद वाटतो. त्या मनुष्याला स्नानसंध्या करण्याची आवडत नाही. राम राम हा मंत्र मुखाने ते कधीही म्हणत नाहीत परंतु गुडगुडी किंवा बिड्या अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस ओडण्यासाठी ते तयार असतात या व्यसनाविषयी त्यांना विशेष प्रेम वाटते .देव आणि ब्राम्‍हण यांच्या चरणावर हा कधीही लोटांगण घालणार नाही परंतु दासींच्या चरणावर हा प्रेमाने लोटांगण घालतो .चंदनाचा सुगंध सोडून माशी मोठ्या आवडीने दुर्गंधी पदार्थावर बसते .तुकाराम महाराज म्हणतात अरे भाग्यहीना तू शूद्र भोगासाठी रामरायाला का बरे विसरलास?


अभंग क्र.१११८
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥
उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥२॥
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥

अर्थ

हे नारायणा माझ्या मनामध्ये कधीही वाईट दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस .आता तू माझ्या चित्तालाच असे कर की माझे चित्त तुझे चरण घट्ट धरून राहतील .माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी जो भक्तिभाव उत्पन्न झाला आहे तो सिद्धीस म्हणजे फलप्राप्ती होईल पर्यंत जावो. तुकाराम महाराज म्हणतात आता या लाभा पेक्षा इतर कोणताही लाभ उरला नाही.


अभंग क्र.१११९
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा शेवटीं ॥१॥
तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥
उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥
तुका म्हणे बिंबछाया । ठायीं पावली विलया॥३॥

अर्थ

बीजातून वृक्ष फळाला येतो आणि शेवटी वृक्षातूनच त्याचे पुन्हा बीज उत्पन्न होते, हे देवा तुझे माझे देखील तसेच आहे, म्हणजेच तुझ्यातून मी जन्माला आलो आणि माझ्यातून तू, म्हणजेच माझ्यात तू आता इतका सामावला आहेस की माझा मीपणा जाऊन, द्वैत जाऊन शेवटी तूच राहणार आहेस.ज्याप्रमाणे पाण्यापासूनच तरंग निर्माण होतात आणि शेवटी ते पाण्यातच सामावतात.म्हणजेच तरंग उदकापासून वेगळे नसून त्या पाण्याचे अंगचं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे छाया जशी ज्या बिंबापासून निर्माण होते आणि शेवटी ती त्या बिंबातच विलीन पावते.म्हणजेच कितीही अशा गोष्टींमध्ये दुजेपण किंवा वेगळेपण दिसून आले तरी शेवटी ते एकच असतात हे कळून येते.


अभंग क्र.११२०
साखरेची गोणी बैलाचिया पाठी । तयासी शेवटीं करबाडें ॥१॥
मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥
ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥
तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चौऱ्यासीचा फेरा फिरों नको ॥४॥

अर्थ

बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी जरी दिली तरी त्याला कडबाच खावा लागतो .उंटाच्या पाठीवर मालाच्या पेट्या जरी दिल्या तरी त्याला त्याचा काहीच उपयोग होत नसून त्याला काटेरी झुडपेच खावे लागतात. त्याप्रमाणे मनुष्य हा संसार वाढविण्या करता वेगवेगळे उद्योग धंदे आशेपोटी करतो पण तो ज्यांच्यासाठी उद्योग धंदे करतो तेच त्याला शेवटी यमाच्या हाती बांधून देतात .ज्याप्रमाणे साखरेची गोडी ओझे वाहणाऱ्या बैलाला न मिळता, ज्याला त्याचा लाभ होतो त्यालाच कळते त्याप्रमाणे या संसारात धन मिळवण्याकरिता जे बिचारे लोक कष्ट करतात त्यांना त्याचा लाभ होत नाही दुसरे त्याचा भोग घेतात आणि त्या बिचार्‍याला केवळ धन कमवायचे आणि कष्ट रक्षण करण्याचा व्यर्थ त्रास होतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे मुर्खा गव्हारा भक्ती कर मूर्खपणाने चौर्यांशी लक्ष योनी चा फेरा फिरू नकोस.


अभंग क्र.११२१
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गर्‍हवार बोभाट जनामध्यें ॥१॥
लटकेचि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥
तुका म्हणे अंतीं वांझ तेचि खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥

अर्थ

एका बाईने चिरगुट्याच्या घड्या घालून पोटाला बांधले आणि ते गरोधरपणा मुळेच वाढलेले पोट आहे असे लोकांना दाखविले आणि मी गरोदर आहे असे ती लोकांना दाखवत होते ,तिला डोहाळे लागले आहे असे खोटे प्रकार ती करू लागली वस्तुस्थितीने तिच्या पोटात मूल नव्हते आणि स्तनात दूध दही नव्हते .तुकाराम महाराज म्हणतात शेवटी तिला काही मुलबाळ नसल्याने ती वांजच आहे असे ठरले आणि लोकांमध्ये तिची फजिती झाली याप्रमाणे काही मनुष्याला अनुभव नसताना आम्हाला सर्व काही माहित आहे असे दाखवण्याची सवय असते परंतु यांच्या क्रियेतून अनुभवाची कोणतीही गोष्ट दिसून येत नाही त्यामुळे त्यांची फजिती होते.


अभंग क्र.११२२
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायाशी न विसंबे ॥१॥
विसरणे रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥
विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥
तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥

अर्थ

माझ्या विठोबाला माझी सर्व चिंता आहे त्यामुळे मी त्याच्या चरणाला कधीही विसरणार नाही. विठोबाची सावळी मूर्ती माझ्या जीवाचे जीवन आहे त्यामुळे त्याचे ते रूप क्षणभरदेखील मी विसरणार नाही. जर मी हरीला एक क्षणभर देखील विसरलो तर मोठ्या लाभला चुकलो असे समजेल .तुकाराम महाराज म्हणतात या विठोबाचे पाय म्हणजे अमृत संजीवनी आहे आणि ते पाय माझ्या हृदयात सर्वकाळ आहेत.


अभंग क्र.११२३
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचताती पुढें संसाराच्या ॥१॥
झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥
हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥
तुका म्हणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥

अर्थ

संसाराच्या पुढे भोगाच्या छंदाने नाचणारे माकड काय उपयोगाची ? केलेल्या पापांचा झाडा यमदूत त्यांना विचारतात त्यावेळी ते त्यांना दात विचकतात मग त्यावेळी त्यांना शिक्षा करण्याकरिता यमदूत त्यांच्यावर प्रहार करतात. लोकांमध्ये मानसन्मान वाढविण्याकरिता हे लोक हात हलवीतात, दात दाखवितात कान व मान हलवून वेगवेगळ्या प्रकारचे सोंग करतात .तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक शब्द ज्ञानाचा भार आणि संसाराचा भार वाहतात अशा लोकांची किती फजिती होते याची गणतीच नाही.


अभंग क्र.११२४
थोर ते गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥
व्यर्थ भरोवरी केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥
घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥

अर्थ

गुरुचा उपदेश घेताना तुला सुख वाटते परंतु तुला देहाभिमान बाजूला सारता आला पाहिजे .भरपूर ओव्यांचे व वेदांचे पाठांतर तु केले पण जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत हे सर्व व्यर्थ ठरते .घोड्याच्या पाठीवर खूप ओझे असते पण त्याला त्याचा काही लाभ नसतो अगदी तसेच तू कितीही वेद अभ्यास केला व त्याचे पठण केले पण जर तुझे अंतकरण शुद्ध झाले नाही तर ते सर्व व्यर्थ ठरेल अंतकरणात जर भक्तिभाव नसेल तर काहीच उपयोग होणार नाही केवळ पाठांतराचे ओझे तुझ्या माथ्यावर आहे असे समजावे .तुकाराम महाराज म्हणतात की तुला जर पंढरीनाथाची प्राप्ती व्हावी असे जर वाटत असेल तर तू अंतःकरणा मध्ये निष्ठावंत भक्ती प्रेम धारण कर.


अभंग क्र.११२५
जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥
सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ध्रु.॥
खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥
साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥३॥

अर्थ

अरे नरा तू मनुष्य जन्माला आला आहेस त्यामुळे तू पंढरीला जाच आणि वारकरी हो. चंद्रभागेचे इतके पवित्र वाळवंटात असताना तू वैकुंठाची इच्छा का करतोस ? त्या वाळवंटामध्ये खांदयावर पताकांचे भार असलेले गळयात तुळशीची माळ आणि कपाळाला अबीर बुक्का लावलेले खूप वारकरी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी त्या वाळवंटातील साधू संतांना वारकऱ्यांना लोटांगण घालीत आहे.”


अभंग क्र.११२६
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥
भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥
तुका म्हणे केली प्रतिज्ञा याचसाठी । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥

अर्थ

संतांची निंदा करून ज्याचे तोंड बाटले आहे ते तोंड नाही तर चांभाराचे कातडे भिजवण्याचे प्रत्यक्ष कुंड आहे असे समजावे .जे दुष्ट लोक दुसऱ्यांचे धन वापरतात कोणत्याही स्त्रीचा भोग घेतात त्यांच्या आचरणावरून ते भेसळीचे वीर्य म्हणजे अशुद्ध बीजाचे आहे असे जाणावे .जो कोणी संतांची जात,कुळ इत्यादी गोष्टींची फाजील चौकशी करतो त्याचा विटाळ धरावा त्याच्या सावलीला देखील स्पर्श करू नये .तुकाराम महाराज म्हणतात लोक संतांविषयी फाजील चौकशी करतात ते लोक चांडाळ अशुद्ध बीजाचे आहे या बद्दल माझी काहीही शंका नाही आणि मी त्यांचे तोंड देखील पाहणार नाही अशीच मी प्रतिज्ञा केलेली आहे.


अभंग क्र.११२७
बहु टाळाटाळी । होते भोवताहे कळी ॥१॥
बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
मुरगाळीता कान । घुसमाडील सावधान ॥२॥
अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥

अर्थ

मनुष्य जीवनामध्ये परमार्थाची टाळाटाळ होते त्याला कारण म्हणजे कळी काळच आहे. पण याचे परिणाम चांगले होणार नाहीये. याचे भय मनुष्याने आपल्या मनात ठेवायला पाहिजे .पण काळ ज्या वेळेस अशा माणसांचा कान मुरगळून त्यांना नरकात घुसडेल तेव्हाच ते सावध होतील. तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी अबोलका आहे असे कोणीही समजून घेऊ नका, असे जर कोणी वाईट वागतांना दिसेल ,परमार्थाची उपेक्षा कोणी करताना दिसेल तर मी त्याला बोलल्या शिवाय राहणार नाही.


अभंग क्र.११२८
जिव्हे जाला चळ । नाही अवसान तें पळ ॥१॥
हेंचि वोसनावोनी उठी । देव सांठविला पोटीं ॥ध्रु.॥
नाहीं ओंढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥२॥
तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥

अर्थ

माझ्या जिभेला हरी नामाचा इतका छंद लागलेला आहे‌ की मी आता एक फळ देखील विश्रांती घेत नाही. माझ्या देहामध्ये हा हरी इतक्या प्रमाणात साठला गेला आहे की मी घरातून जरी उठलो तरी देखील या हरीचे नाम माझ्या मुखातून येते .मला या हरी नामाची इतके वेड लागले आहे की हरिनामा मुळे कोणताही प्रसंग आला की तो मला बराच वाटतो .हे हरिनाम घेण्याविषयी मला कोणताही अडथळा येत नाही .तुकाराम महाराज म्हणतात माझी वाचा मला अनावर झाली असून हरिनाम घेतल्यावाचुन मला रहावतच नाही.


अभंग क्र.११२९
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥
कैचें पुण्य तिये गांठी । व्रतें वेची लोभासाठी ॥ध्रु.॥
वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥
मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥
तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमल ॥४॥

अर्थ

पती बाहेरगावी गेला असेल तर सुखरूप घरी यावा यासाठीच पत्नी नवस करते पण ते व्रत ती लोभासाठी करते त्यामुळे तिच्या ठिकाणी पुण्य राहत नाही. संतान वाढवावे घरांमध्ये धनधान्याची वाढ व्हावी यासाठी लोक यज्ञयाग असे कर्म करतात .हे असे केले तर परीस देऊन त्याच्याबदल्यात गारगोटे मागितल्या सारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात सोमल नावाचे विष भरपूर द्रव्य देऊन विकत घ्यावे तसेच मूर्ख मनुष्य सकाम बुद्धीने व्रत करतात आणि ते व्यर्थ वाया घालवितात.


अभंग क्र.११३०
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥

अर्थ

जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.


अभंग क्र.११३१
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥
पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटबंदी ॥ध्रु.॥
कोटि घरें जेथें काशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥

अर्थ

हे लोक हो लंकेमध्ये रावणाची घरे किती होती ती जशीच्या तशी तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही ऐका. पाच लक्ष घरे पाषाणाची, सात लक्ष घरे विटे बंदी होती ,कोटी घरे काशाची होती आणि तांब्याची व कांचनाची सात कोटी घरी होते .तुकाराम महाराज म्हणतात सांगायचे तात्पर्य एवढेच की ज्या रावणाची एवढी संपत्ती होती तो रावण मेल्यानंतर त्याच्या संपत्तीमधील एक कवडी देखील त्याच्या बरोबर घेऊन गेला नाही.


अभंग क्र.११३२
व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनीं राघोबाचा ॥१॥
ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं ठेवियेली ॥ध्रु.॥
पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥
तुका म्हणे धरा विठोबाची सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥

अर्थ

गणिका नावाची वैश्या म्हणजे व्याभिचारी स्त्री होती तिला पोपट खूप आवडायचा. तिने एक पोपट पाळला त्या पोपटाचे नाव तिने ‘राघोबा’ असे ठेवले आणि तिच्या जीवनाच्या अंत काळी तिने त्या पोपटाला फक्त राघोबा या नावाने हाक मारली पण तिने पोपटाला रागोबा म्हटले तर देवा तू तिला जे अचल भवन ‘वैकुंठ’ आहे तिथे घेऊन गेला .म्हणूनच हे हरी तुझी कीर्ती दीनानाथ ,पतितपावन ,अनाथांचा आश्रय म्हणून सर्वत्र पसरलेली आहे .तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे लोकांनो तुम्ही कोणत्याही उपायांनी का होईना विठोबाचे पाय धरा ,असे अनेक उपाय आहेत की त्याने विठोबा रायाचे पाय धारण करता येईल त्याची गणती ही करता येणार नाही.


अभंग क्र.११३३
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥
सुह्रदी सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥
कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥
तुका म्हणे नेले वाहुनी विमानी । मी ही आईकोनी विश्वासलों ॥३॥

अर्थ

गजेंद्र नावाचा एक हत्ती आपल्या परिवारासह एका सरोवरात जलक्रीडा करत होता. त्यावेळी त्या गजेंद्र चा पाय एका नक्राने म्हणजे मगरीने धरला आणि त्यांचे हजारो वर्ष युद्ध चालू होते शेवटी तो गजेंद्र युद्ध करून करून जर्जर झाला. नंतर त्याचे सर्व नातेसंबंधी त्याला संकटात सोडून निघून गेले शेवटी त्या गजेंद्राने तुझी वाट पाहिली त्याने तुला आर्ततेने हाक मारली. हे कृपेच्या सागरा नारायणा त्यावेळी तू धावत जाऊन त्या गजेंद्र चा व नक्राचा उद्धार केला .तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा देवा तु त्या दोघांनाही विमानात बसून नेले ही कथा मी पुराणात ऐकली आहे त्यामुळेच तुझ्याविषयी माझा विश्वास दृढ झाला आहे.


अभंग क्र.११३४
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥
कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥
कैं बसावें वाहनीं । कैं पायीं अनवाणी ॥३॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसनें तीं जीर्णे ॥४॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥
कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥
तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥

अर्थ

अहो कधी आपल्या प्रारब्धानुसार डोक्यावर पाणी वाहण्याची वेळ आली तर पाणी देखील वहावे तर कधीकधी सुखाने पलंगावर झोपावे. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करून घ्यावे. कधीकधी विविध प्रकारचे पंचपक्वान्न खावे तर कधीकधी प्रारब्धाने कोरड्या भाकरी मिळाल्या तर त्या देखील खाव्यात. कधी चांगल्या प्रकारच्या वाहनात(बैल गाडी घोडे हत्ती) बसून फिरावे तर कधी अनवाणी पायी देखील जाण्याची वेळ आली तर चालावे. प्रारब्धानुसार आपल्याला जर चांगल्या प्रकारचे वस्त्र मिळाले तर कधी ते घालावे तर कधीकधी जीर्ण फाटलेले वस्त्र देखील घालण्याची वेळ आली तर घालावे. कधी संपत्तीचा भोग घ्यावा तर कधी विपत्तीचा देखील भोग घ्यावा. कधीकधी संत सज्जनांची संगती मिळते तर कधी कधी दुर्जनांशी गाठ भेट पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानी लोक तेच जाणावे की ज्यांना सुख आणि दुःख हे सर्व समान आहे.क


अभंग क्र.११३५
उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥
चर्म रंगूं लागे रोहिदासासंगे । कबिराचे मागे शेले विणी ॥२॥
सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥
नरहरीसोनारा घडु फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी ॥४॥
नामयाची जनी सवें वेची सेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥६॥
अर्जुनाचीं रथीहोय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥७॥
गौळियांचे घरीं अंगें गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥
यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥
मिराबाई साठी घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी ॥११॥
पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१२॥

अर्थ

भक्त उच्च जातीचा आहे की नीच जातीचा आहे हे काहीही भगवंत पाहत नाही तर त्याची शुद्ध भक्तिभाव पाहूनच देव त्याचे कार्य करण्यास तत्पर असतो. विदुर दासीपुत्र आहे तरी देवाने त्याच्या घरी कण्या खाल्ल्या आणि दैत्याच्या म्हणजे हिरण्यकश्यपूचा घरी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. रोहिदासांच्या मागे कातडे रंगू लागला तर कबीरांच्या मागे शैले विनवू लागला. सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला तर सावतामाळी बरोबर त्यांचा मळा खुरपु लागतो. नरहरी सोनार यांच्याबरोबर भट्टी फुकून सोने घडू लागला तर चोखा महारा बरोबर त्यांची मेलेली ढोरे ओढू लागला. नामदेवांची दासी जनी हिच्याबरोबर गौर्‍या वेचु लागला .आणि धर्मराजाच्या घरी पाणी वाहून त्याची घरे झाडली ,नामदेवां सोबत जेवण्यासाठी देवाने कोणताही संकोच धरला नाही आणि ज्ञानदेवा साठी याने भिंत चालवली. अर्जुनाच्या रथावर हा देव सारथी म्हणून स्वार झाला आणि गरीब सुदाम्याचे पोहे याने आवडीने सेवन केले .नंदराजाच्या घरी याने गायी वळल्या आणि बळीराजाच्या दाराचा हा भगवंत द्वारपाल झाला .एकनाथांच्या घरी भक्तीचे ऋण फेडण्या करिता त्याने गंगेचे पाणी कावडीने आणले आणि अंबरीश राजासाठी देवाने दहा गर्भवास सोसिले. ज्यावेळी मिराबाई ला विष दिले गेले त्यावेळी तिला जगविण्यासाठी देवाने स्वतःला ते विष प्राशन केले आणि दामाजीपंतांच्या हुंडीची भरपाई करण्याकरता देवच पाडेवार झाला. गोरोबाकाकांच्या बरोबर गाडगे तयार करू लागला आणि त्यासाठी डोक्यावर मातीही वाहू लागला आणि नरहरी मेहत्याची हुंडी देवाने स्वतः भरली .तुकाराम महाराज म्हणतात भक्त पुंडलिकासाठी हा देव अजूनही तिष्ठत उभा आहे ही त्याची कथा धन्य आहे.


अभंग क्र.११३६
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥

अर्थ

देवा तुझ्या भेटीची मला आस लागली आहे. मी तुझी वाट रात्रंदिवस पाहत आहे .पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चकोराचे जीवनच आहे त्यामुळे तो चकोर चंद्र उगवण्याची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे देवा मी तुझी वाट पाहत आहे. सासरी गेलेल्या मुलीने दिवाळीच्या वेळेस माहेर कडुन कोणीतरी बोलावण्याची जशी वाट पहावी त्याप्रमाणे माझे मन पंढरीची वाट पाहत आहे .जसे भूक लागल्यानंतर लहान मुले शोक करते ते फक्त त्याच्या मातेचीच वाटत पाहते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे देवा आम्हाला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे आणि त्यामुळे तू लवकर धावत आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझे श्रीमुख दाखवायचं.


अभंग क्र.११३७
आले संत पाय ठेविती मस्तकीं । इहउभयलोकीं सरता केलों ॥१॥
वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥
अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघेंचि मंगळ संतभेटी ॥२॥
तुका म्हणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥३॥

अर्थ

संत घरी आले आणि मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यामुळे मी इहलोकात आणि परलोकात धन्य झालो. मी संतांचे पाऊले वंदीन त्यांच्या चरणावर लोटांगण घेईन कारण संतांच्या दर्शनाने माझ्या सर्व इच्छांची तृप्ती झाली आहे. आता माझे सर्व पूर्वपुण्य अनुकूल झाले कारण संतांच्या भेटीने सर्व मंगलमय झाले. तुकाराम महाराज म्हणतात देवा संतांच्या दर्शनाने मी आज कृतकृत्य झालो संतांची सेवा कशी करावी हे मला कळत नाही परंतु संतांचे दर्शन मला आज माझ्या डोळ्यांनी झाले.


अभंग क्र.११३८
करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥
रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥
नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचि ते वाणी गुण वदे ॥२॥
मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥३॥
उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढे ॥४॥
तुका म्हणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुम्हां भिन्न नाहीं माझा ॥५॥

अर्थ

देवा हा देह पोसण्याकरता मी संसाराचे व्यवहार करतो आहे .पण तुमच्या पाया विषयी मला किती प्रीती आहे हे तुम्हाला मी वेगळे सांगायला हवे काय ते तुम्हाला कळत नाही काय देवा? तुझे रूप मी माझ्या डोळ्याने पाहात आहे आणि संसाराचे सोंग करण्याची संपादनी मी करत आहे. देवा आम्ही आमच्या वाणीला संसारात कामापुरते बोलायचे असे सांगितले आहे आणि तुमचे गुणगान आमची वाणी सतत करत असते. तुमच्या दर्शनाचे माझ्या डोळ्याला उत्कंठा आहे. परंतु मला धनधान्य मिळावे ही तळमळ मुळीच नाही बर का देवा. मी कसातरी हा प्रपंच चालवत आहे परंतु माझ्या जीवनसूत्र ची दोरी तुझ्या हातात असल्यामुळे ती तुझ्याकडेच ओढ घेत आहे .तुकाराम महाराज म्हणतात मी असा निर्वाण करतो की माझा जीव तुमच्याहून भिन्न नाही.


अभंग क्र.११३९
कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥
कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥ध्रु.॥
कां रे माझें माझें म्हणसील गोत । न सोडविती दूत यमाहातीं ॥२॥
कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥
तुका म्हणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥४॥

अर्थ

अरे माझी पोरी ,माझे गुरेढोरे असे काय म्हणतोस ?ज्यांनी तुला जन्म दिले आहे ते आईबाप तरी तुझे आहेत काय ?कोणी जर गेले तर तू व्यर्थ तळमळ आक्रोश का करतोस ,अरे माझे हे आप्त, गोत्र असे‌ म्हणत तु बसलास, हेच लोक तुला तुझ्या अंतकाळी यमाच्या हातून सोडणार नाहीत. तू स्वतःला मी फार बलवान आहे असे का म्हणून घेतो आणि तू जर खरच बलवान आहेस तर मग तुला मेल्यावर सरणावर उचलून का ठेवावे लागते ?तुकाराम महाराज म्हणतात अरे तू स्वतः विषयी काहीच भरवसा धरु नकोस त्यामुळे तू लवकरात लवकर पांडुरंगाला शरण जा.


अभंग क्र.११४०
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥
मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥
उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥
उरलें तें एक हेंचि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥
तुका म्हणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥

अर्थ

हे करूणाकरा मी तुझा मनापासून धावा करत आहे त्यामुळे तुम्ही लवकर धावत‌ या आणि मला या भवसागरातून सोडवा. माझी करूण वचने ऐकून माझ्या भेटीकरिता उतावीळ व्हावे .देवा मी मागेपुढे पाहिले तर मला तुमच्या वाचुन सर्व ओस दिसले त्यामुळे मी तुमच्या चरणावर माझा भक्तीभाव अर्पण करून आता तुमची वाट पाहत आहे. विठ्ठला मायबापा तुम्ही आता माझ्या भेटी करता थोडा देखील उशीर करू नका माझ्यासाठी आता तुमच्या भेटीवाचुन काहीच उरले नाही .आणि या जगाविषयी श्युन्य मत माझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही एवढेच करा की तुमचे विटेवरचे समचरण मला लवकर दाखवा.


अभंग क्र.११४१
न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥ध्रु.॥
न मनीं ते योगी न मनी ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥

अर्थ

जे लोक मनात वेगळे आणि वागताना वेगळे वागतात असे माणसे ज्ञानी असो वा पंडित असो मी त्यांना मानत नाही .असे लोक स्वतःचा देह पोसतात आणि दुसर्‍याला उपदेश करतात परंतु त्यांच्या अंतकरणात प्रेमाचा लवलेशही नसतो. ज्यांच्याकडे प्रपंचाची भरपूर साधने असतात अशा योगी आणि हरिदास यांना मी मानत नाही .तुकाराम महाराज म्हणतात मी या ज्ञानी ,पंडित ,योगी ,हरिदास यांना बाह्यतः नमस्कार करतो परंतु मला ते आवडतात ज्यांची चित्तशुद्धी झाली आहे.


अभंग क्र.११४२
कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥
काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥२॥
काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥
काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥४॥
तुका म्हणे भाव नाहीं करीसी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥५॥

अर्थ

अरे वेड्या जर तुझ्या मनात हरी विषय खरा भक्तिभाव नसेल तर मग तू पाषाणाच्या ,पितळाच्या व अष्टधातू च्या मूर्तींची पूजा का करतोस? अरे हरी प्राप्ती करून घ्यायची असेल तर मनामध्ये शुद्ध भक्तिभाव पाहिजे आणि शुद्ध भक्तिभाव हेच मोक्षाचे साधन आहे असे उपनिषद व भाद्गवतगीतेत सांगितले आहे .अरे तू वेळोवेळा जर विषयात गुंतून राहिलास तर मग तू कितीही जपमाळ केले आणि कंठात कितीही तुळशीच्या ,रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर त्या माळा काय करणार? अरे नुसतीच पंडित वाणी बोलून काय उपयोग आहे आणि बोलून काय करशील आणि तू अक्षर पठण केले तर त्यामुळे फक्त तुला अभिमानच होईल तुझी बुद्धी जर शुद्ध झाली नसेल तर मग तू कितीही कुशल गायन केलेस तर त्याचे काय करशील ?तुकाराम महाराज म्हणतात जर तू देवाची सेवा सात्विक व शुद्ध श्रद्धेने केली नाही तर तु देवाच्या आशीर्वादा योग्य कसा काय होणार?


अभंग क्र.११४३
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥
होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥
देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥
तुका म्हणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥

अर्थ

एखाद्या मनुष्याने दगडाच्या देवाच्या प्रतिमेचे श्रद्धेने पूजा केली तर त्याला त्याच्या भावनेनुसार फळ प्राप्त होते. सात्विक श्रद्धेचे रक्षण केले पाहिजे आणि त्याचे रक्षण करताना अनेक विघ्ने ,अडथळे निर्माण होत असतात. त्यांना बाजूला सारून त्यांचे रक्षण करावे लागते कारण देव शुद्ध भक्ती व श्रद्धने आपल्याशी जोडला जातो. आपल्या इच्छेनुसार कोणत्याही भक्तीचा स्वीकार करावा .नवविधाभक्ति पैकी कोणत्याही एका भक्तीचा स्वीकार करावा पण जर श्रद्धा नसेल तर ती भक्ती व्यर्थ ठरते. तुकाराम महाराज म्हणतात जसे बीज पेरु तसे अंकुर उगवते व तसेच झाड उगवते फळही त्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे ज्याची जशी श्रद्धा असेल तसेच त्याला फळ प्राप्त होईल.


अभंग क्र.११४४
अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥
संघटणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥
उचिताच्या कळा । नाहीं कळत सकळा ॥२॥
तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥३॥

अर्थ

ज्या माणसांचे अंतकरण गोड असते, प्रसन्न असते त्यांच्या आवडीची इच्छापुर्ती होते. जर लोकांशी संघटन ठेवले तर आपल्या अंगांमध्ये विविध प्रकारचे गुण दोष उत्पन्न होतात व मनोभंग होतो. त्यामुळे कोणाशीही संघटन करू नये .बऱ्याच लोकांना उचित काय अनुचित काय हे कळतच नाही .तुकाराम महाराज म्हणतात जर आपण अंधश्रद्धा वान व्यक्तींचे संघटन केले तर देव, संत आणि वेद यांच्या ठिकाणी आपली अभावना उत्पन्न होते आणि तेच आपल्या नाशाचे मूळ कारण होते.


अभंग क्र.११४५
कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥
विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥
काय वानरांची अंगींची ते शक्ती । उदका तरती वरी शिळा ॥२॥
तुका म्हणे करी निमित्तचि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥३॥

अर्थ

हे संत जन हो तुम्ही मला देव मानून माझ्या डोक्यावर मोठे पणाचा भार का ठेवतात ?नारायण भिन्न भिन्न प्रकारे आपले चातुर्य दाखवून या जगामध्ये वावरतो आणि अनेक प्रकारचे पुतळे येथे नाचवीतो. दगड पाण्यावर तरावा एवढी शक्ती एवढे कर्तव्य वानरांच्या अंगी आहे काय ?तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण कोणतेही कार्य करताना कोणाला तरी निमित्त करून आपण स्वतः अधिष्ठान राहून जडा कडून कार्य करून घेतो.


अभंग क्र.११४६
पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥
तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥
काय उणें तुम्हां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥३॥

अर्थ

हे संत जन हो तुमच्या पाया पडणे हेच माझे मुख्य भांडवल आहे कारण तुमच्या पायांची स्तुती मी करणे शक्य नाही. तरीदेखील मी सलगी करून तुमचे कौतुक केले. कारण मी तुमचे लाडके बाळ आहे तुम्हा संतांच्या घरी काय उणे आहे. तुम्हाला तर माझी सर्व परिस्थिती माहीत आहे .तुकाराम महाराज म्हणतात तुम्हा संतांच्या चरणी नतमस्तक व्हावे हिच माझी सेवा आहे या वाचून दुसरे मी काही करू शकत नाही.


अभंग क्र.११४७
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी ॥१॥
सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
एकसरें चिंत्त ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥२॥
तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही माझी वाणी अशी वदावा म्हणजे माझ्या वाणीतून असे शब्द बाहेर यावे की जेणेकरून तुमचे स्तुती रुपी शब्दपुष्पे संतांच्या चरणांवर समर्पित व्हावी .हे पांडुरंगा माझ्या सर्व संकटाचा भार मी तुमच्यावर घालावा आणि तुम्ही त्याचा परिहार करावा. देवा तुमच्या पायी मी माझे चित्त ठेवून निवांत झालो आणि तुम्ही केलेल्या कृपाशीर्वादातून मी उतराई झालो .तुकाराम महाराज म्हणतात हे देवा काय वाचा मन मी तुमच्या चरणी ठेवले व आता माझे कर्तव्य संपले आहे.


अभंग क्र.११४८
नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥१॥
कृपेचा वोरस न समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥
तुमची उष्टावळी ते माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥
परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥
तुका म्हणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥४॥

अर्थ

हे संत जन हो तुमच्या पायी मी नमावे म्हणजे नम्र व्हावे हेच उचित आहे कारण तुमच्या आशीर्वादानेच माझे हित होणार आहे .तुम्ही माझ्यावर कृपा केली त्यामुळे माझ्या पोटात आनंद मावत नाही .संतांनो मी तुमची स्तुती करण्याऐवजी तुम्हीच माझी स्तुती करत आहात. मी तुमचे उरलेले अन्न खाणे हेच माझे भोजन आहे तुमचे अंगण झाडावे व झाडलेल्या अंगणातून कचऱ्याचे ढीग उचलून टाकावे हेच माझे कर्तव्य आहे पण असे माझ्या नशिबी नाही की जेणेकरून मला तुमच्या पायाची अखंड मिठी पडेल. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्तामध्ये अखंड हरीची आठवण राहील अशी कृपा तुम्ही माझ्यावर केली तेही मी तुमची कोणतीही सेवा केली नाही तरी, त्याबद्दल मला धन्य वाटत आहे.


अभंग क्र.११४९
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥
काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥
अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥
लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची ॥४॥

अर्थ

माता आपल्या बाळाचा गौरव करत नाही काय, आणि त्याचा लळा ती पूर्ण करीत नाही काय? माता तिच्या बाळाची सेवा करत नाही काय ,आणि सेवा केल्याने तिला बरे वाटत नाही काय ?ते बाळ अमंगळ जरी असले किंवा दिसण्यास कसेही असले तरी त्या मातेला त्याचा कंटाळा येतो काय ती त्याचा कंटाळा कधीही धरत नाही, उलट त्या बाळाला उचलून कंठाशी लावते किंवा त्याला मिठी देते. ती माता बालकाला अलंकार परिधान करते आणि त्या बालकाला पाहून मातेलाच संतोष होतो तिला खूप आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जन हो तुम्ही माझी स्तुती करणे योग्य नाही परंतु तुम्हाला माझा अभिमान असल्यामुळे तुम्ही माझी स्तुती करतात जशी आई आपल्या मुलाचा अभिमानाने गौरव करते अगदी त्याप्रमाणेच.


अभंग क्र.११५०
माझिया मीपणावरी पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।
पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥
काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझें मुख ॥ध्रु.॥
काया वाचा मनें अघटित करणें । चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥
लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कुचरवादी निंद्य ॥३॥
आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।
भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट शब्द हीन ॥४॥
संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचार वृद्धि पापा ।
तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥

अर्थ

माझ्या “मी(अहंकार)” पणावर दगड पडो आणि जगात माझे जे नाम झाले ,माझे जे भूषण झाले आहे त्याला आग लागो. माझ्या पापाला पारावार नाही त्यामुळे मी अनेक दुःखाचे डोंगर भोगत आहे. मी भूमीला भार झालो आहे माझी काय फजिती होत आहे हे मी किती सांगू .माझे दुखने ऐकून दगडही फुटेल. स्त्री-पुरुष ,उत्तम वर्णातील लोक, चांडाळ हे सर्वजण डोळ्याने माझे मुख देखील पाहत नाहीत. माझ्या काया, वाचा ,मनाने ,चक्षूने ,हाताने ,पायाने निंदा, द्वेष ,घात ,दुसऱ्यांचा विश्वास तोडणे ,व्याभिचार असे अनेक अनहित कर्म केलेले आहेत माझ्या हातून वाईट कर्मे घडलेली आहेत आता ते मी कसे सांगू ?संपत्तीच्या मदाने माझ्या हाताने अनेक महापाप घडले मी दोन पत्नीमध्ये भेद करत होतो. पितृवचनाची मी अवज्ञा केली असा मी अविचारी ,कुटील कुच्चर ,भांडखोर आहे .मी आता माझे किती अवगुण तुम्हाला सांगू ते सांगण्याकरिता देखील जीभ वळत नाही. मन थरथर कापते. मी कधीही भूतदया केली नाही कोणावर कधीही उपकार केले नाही. माझ्या शब्दांना धीर नाही स्थैर्य नाही. मी विषय लंपट आहे माझ्याकडे आता बोलण्यासाठी शब्दच नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत महानुभव तुम्ही माझे बोलणे ऐका मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा माझे अवगुण अविचार वाढले आहे मग पांडुरंग माझा स्वीकार करील कसा याविषयी विचार करा मला सांगा हे मायबाप हो मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर येवढा उपकार करा मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा.


अभंग क्र.११५१
फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥
तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥
गोकुळासी आलें । ब्रम्ह अव्यक्त चांगलें ॥३॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥
निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥
आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥

अर्थ

वसुदेवाने मथुरेच्या तुरुंगांमध्ये देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या कृष्णाला उचलून गोकुळात यशोदे जवळ आणून ठेवले आणि यशोदेला झालेली योगमाया रूप कन्येला देवकी जवळ आणून ठेवली. अशाप्रकारे कन्येची आणि चक्रपाणी हरीचे आदलाबदल करण्यात आली .ज्या वेळी कृष्णाने जन्म घेतला त्यावेळी जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला.श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेव देवकीच्या हातातील सर्व बंधने आपोआप तुटून गेली .अव्यक्त चांगले ब्रम्‍ह गोकुळात नाम रूपाला आले. नंद-यशोदा धन्य आहेत की ज्यांनी श्रीकृष्णाला पाहिले .भगवान श्रीकृष्ण श्रावण वद्य, अष्टमीला, रोहिणी नक्षत्र ,वार बुधवार आणि मध्यरात्रीला जन्माला आले .पृथ्वी ही आनंदली कारण तिचा भार कृष्णाच्या जन्मामुळे हलका झाला .तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या जन्मामुळे कंस भयभीत झाला आणि भयाच्या भोवऱ्यात सापडून गरगर फिरू लागला.


अभंग क्र.११५२
सोडिलेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥
करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥
उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥
तुका तेथें वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥

अर्थ

श्रीकृष्ण भेटीने सर्वांच्या हृदयातील संशयाच्या गाठी सुटल्या गेल्या. गोकुळातील सर्व नारी श्रीकृष्णाचे औक्षण करू लागल्या व त्याला जीवाभावाचे दान देऊ लागल्या. भगवंताने जन्म घेऊन आपल्या अलौकिक रूपाने सर्वांना मोहून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी भगवंताचा जन्म झाला त्या वेळी गोपी स्त्रिया तेथे जन्माला आल्या मग त्यावेळी मी देखील तेथे दारावर उभा राहून एकि मागे एक गोपींना आत पाठवण्यासाठी बारी देत होतो.


अभंग क्र.११५३
मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥
केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥
न धरिती मनीं । कांहीं संकोच दाटणी ॥२॥
तुका म्हणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥

अर्थ

भगवंताचा जन्म झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी आलेल्या गोपी भगवंत श्रीकृष्णाला पाहिले की तेथेच तटस्थ उभे राहात .त्यांच्या हाताला धरून त्यांना बाजूला केल्याशिवाय त्या गोपी तेथून बाजूला जातच नव्हत्या. गर्दीतही गोपी भगवंताचे मुख पाहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा संकोच मानत नव्हते .तुकाराम महाराजांचा देवाने आपल्या स्वरूपाच्या मोहाने सर्वांचे देहभाव हरपून टाकले होते.


अभंग क्र.११५४
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥
गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥
तुका म्हणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥

अर्थ

श्रीकृष्णाच्या जन्मामुळे गोकुळातील सुखाला अंतपार नव्हता. नंदाच्या घरी बाळकृष्ण जन्माला आल्यामुळे सर्व नरनारीनां आनंद झाला. सर्वांनी आपल्या घरावर गुढ्या(भगव्या पताका) उभारल्या दाराला तोरण बांधले आणि आनंदाने हरिकथा करत हरि गुण गात होते .तुकाराम महाराज म्हणतात श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या छंदात रंगवून टाकले आणि सर्वांना आपल्या रूपाने मोहून टाकले.


अभंग क्र.११५५
विटंबिला भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥
खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥
तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥
तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥

अर्थ

कंसाने बालकृष्णास मारण्यास महाबळ भट नावाच्या ब्राम्‍हणस पाठविले. तो आल्यानंतर नंद यशोदेने त्याला बसण्यासाठी पाट दिला. आपण मोठे त्रिकालज्ञानी ज्योतिषी आहोत असे तो म्हणाला असे म्हणून नंद-यशोदाला त्याने मोहित केले. आणि नंतर त्याने श्रीकृष्णाचे मुद्दाम विरुद्ध भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी भगवंताने तो ज्या पाटावर बसला होता तोच मायेने उडविला आणि त्या भटाच्या पाठीवर बसविला म्हणजे जोरात मारला. तो खोटे बोलत होता त्याचा अंतर्भाव पाहून श्रीकृष्ण विश्वंभराला ते सहन झाले नाही .ज्या प्रकारचे खोटे भविष्य तो भट सांगत होता त्या प्रकारचे दान त्याला देण्यास भगवंताने सुरुवात केली .तुकाराम महाराज म्हणतात नंतर देवाने पुतणाला ही मारले तिच्या स्तनातील दूध पिऊन तिचा प्राण ही देवाने पिऊन टाकला.


अभंग क्र.११५६
प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥
मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥ध्रु.॥
जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥२॥
हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥३॥

अर्थ

प्रेम देवाचे देणे आहे आणि प्रेमानेच माणसाचा देहभाव नाहीसा होतो. प्रेमाने देश कालाची देखील मनाला शुद्ध राहत नाही. ज्या हरी भक्तांच्या मनात प्रेम असते ते लज्जा विरहित असतात ,भाग्यवंत असतात. हरिनाम कीर्तीचे पोवाडे त्यांच्या ठिकाणी ओसंडून वाहत असते .हरिभक्त जन्माला येऊन हरीचे दास होतात आणि त्यामुळे त्यांना अविनाशी अशा पांडुरंगाची प्राप्ती होते. हरिभक्त हरी ची भक्ती करतात त्या कारणाने आणि परब्रम्ह त्यांच्याशी एकरूप होतात त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा गर्भवास भोगावे लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात मी आता असाच संकल्प करतो की, माझ्या हातून सदा पुण्यकर्म घडो आणि माझ्या मुखातून सदा हरिनाम जप घडो ,असे संकल्प जे हरी भक्त करतात त्यांच्या गावी चुकून देखील पाप येत नाही.


अभंग क्र.११५७
तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥
ऐशियाच्या उपदेशें । भवबंध कैसें नासे ।
बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥
आणिक नाहीं जोडा । देव म्हणवितां तया मूढा ॥२॥
आणिकांचे न मनी साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥३॥

अर्थ

जो म्हणत असेल की मी देव पाहिला आहे तर तो लबाडा चाही शिरोमणी आहे. अशा लबाड माणसाच्या उपदेशाने कसा भावबंध नाश पावेल सांगा बरे ?अभिमानाने तो मनुष्य स्वतः नरकाला जातो आणि त्याच्याबरोबर दुसऱ्यालाही नरकाला घेऊन जातो. जो स्वतःला देव समजतो अशा माणसाच्या जोडीला या जगात कोणीही नाहि .तुकाराम महाराज म्हणतात श्रेष्ठ साधुसंतांनी जरी चांगला उपदेश केला तरी हे दांभिक मनुष्य कोणालाही चांगले म्हणत नाहीत.


अभंग क्र.११५८
होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥
येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥
धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥

अर्थ

हरी आणि गुरुच्या कृपेने ज्याला देव प्राप्त झाला असेल त्याला सर्वत्र देवाची प्रचिती येते .यावाचून इतर रेमट कथा करणाऱ्या लोकांनी लोकांच्या मनाचे मनोरंजन करण्याकरिता कोणतेही रमेट कथा करत बसाव्यात. जो पोट भरून जेवतो त्याला इतरांची तहानभूक कळत नाही त्याप्रमाणे जो देवरूप झालेला असतो तोच सर्वत्र सुख पाहतो .तुकाराम महाराज म्हणतात येथे प्रत्यक्ष अनुभव पाहिजे नुसताच शब्द ज्ञानचा वापर करण्यात अर्थ नाही तो कामी येत नाही.


अभंग क्र.११५९
कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥
म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥
कथे कांहीं अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्तां चित्त । समरसीं खंडणा ॥२॥
कां वैष्णव पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोढविला मस्तक ॥३॥
ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥
घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥

अर्थ

हे श्रोत्यांनो हरिकथा चालू असताना मधून का उठून जाऊ नये ते मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. कथा चालू असताना स्वतः पांडुरंग तेथे कथा ऐकण्यासाठी तिष्ठत उभा असतो आणि आपण जर मधून उठलो तर त्या पांडुरंगाची अवज्ञा केल्यासारखा प्रकार होतो त्यामुळे कथेत बसण्याचा धीर धरावा आणि कथा भक्ती भावपूर्वक व लक्ष देऊन ऐकावी. ज्याला हा भवसागर तरुन जायचा असेल त्याने मी सांगितले तसे ऐकावे. कथा चालू असताना कोणत्याही गोष्टी अनुमात्र म्हणजे थोड्या देखील बोलू नये कारण तेथे देव आणि भक्त यांच्या चित्ताचा मिलाप झालेला असतो म्हणजे दोघेही एकरूप झालेले असतात आणि आपण जर मध्येच बोललो तर त्यात बिघाड होतो .वैष्णवांना का पुजावे श्रद्धेने ऐकायचे असेल तर ऐका. वैष्णवांच्या पायाची धूळ म्हणजे रजकण चरणरज आपल्या मस्तकाला लावता यावी म्हणून भगवान शंकर देखील आपले मस्तक पुढे करत असतात त्यामुळे वैष्णवांना पुजावे देव वैष्णवांचा अंकित आहे हे तुम्ही जाणून घ्या. तो देव या जगतामध्ये राहून देखील या जगापासून अलिप्त आहे विलक्षण आहे आणि असा देव वैष्णवां करिता सगुण-साकार झाला आहे .तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांचा एवढा अनन्यसाधारण महिमा आहे ,त्यामुळे मी वैष्णवांच्या चरणी लोळणी घालून त्यांच्या चरणावर लोटांगण घालत आहे वैष्णवांचे चरण धुवून, धुतलेल्या तीर्थ ला मी माझ्या मस्तकाला, माथ्याला लावतो.


अभंग क्र.११६०
अनुभवे आलें अंगा । तें या जगा देतसे ॥१॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥
उतरूनि दिसे कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥
तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥

अर्थ

मला जो अनुभव आला आहे तो मी या जगाला देत आहे. माझे हे शब्द म्हणजे नुकतेच हातात काहीतरी दयावे व अंदाजेच त्याचे वर्णन करावे अशापैकी नाहीतर ते शब्द म्हणजे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि त्या शब्दात त्या शब्दाच्या मुळात माझ्या अंतरीचा ओलावा आहे. माझे हे शब्द म्हणजे मी घेतलेल्या अनुभवाच्या कसावर खरे उतरलेले आहेत आणि त्याची मान्यताही संतांनी दिलेली आहे हे शब्द म्हणजे शुध्द शांतरस आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे शब्द म्हणजे सिध्दांतावाचून दुसरे काहीच नाहीत याविषयी प्रत्यक्ष साक्ष देऊन मी हे तुमच्यापुढे ठेवले आहे ती साक्ष म्हणजे माझ्या अनुभवाची आहे.”


अभंग क्र.११६१
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाहय ॥१॥
लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥
एकांती लोकांतीं स्त्रियांशीं भाषन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥
तुका म्हणे ऐशा साधनीं जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥

अर्थ

परमार्थातील साधकाची दशा संसाराविषयी उदास असावी .आणि त्याच्या अंतःकरणात काम क्रोध आणि बाह्यरंगात संसार विषयी कोणतीही उपाधी नसावी .साधकाने लोलुप असू नये ,निद्रेला नियंत्रित ठेवावे तसेच कमी जेवावे. साधकाने परस्त्रीशी एकांतात किंवा लोकांतात देखील बोलू नये .तुकाराम महाराज म्हणतात या वचनाचे जो साधक पालन करून त्या वचनाच्या ठिकाणी स्थिर राहील त्यालाच हरीच्या व गुरूच्या कृपेने ज्ञान प्राप्त होईल.


अभंग क्र.११६२
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥
तेथींचा आनंद ब्रम्हांडीं न समाये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥
भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥२॥
तुका म्हणे आम्हां ब्रम्हांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥

अर्थ

आमच्या अंतरंगात हरीच्या मूळ स्वरूपाचा प्रकाश होता परंतु अज्ञानाने तो झाकला गेला होता पण आता हरीच्या स्वरूपाची ज्योत आमच्या अंतरंगात पुन्हा पेटली आहे त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्या या आनंदाला कोणती उपमा देऊ हेच मला सुचेनासे झाले आहे .पुंडलिकाने निर्गुण स्वरूपाला त्याच्या भक्तीच्या रवीने मंथन करूनच सगुण साकार केले व त्या निर्गुण निराकार ब्रह्माला विटेवर उभे केले. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ब्रह्मांड म्हणजे पंढरीच आहे कारण तेथे भक्तीची मोठी साठवण आहे.


अभंग क्र.११६३
कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥
कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥
नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मीयेलो ॥२॥
तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥३॥

अर्थ

देवा माझे चित्त तुझ्या पाया च्या ठिकाणी नाही मग मला तू संसारात का घातले? देवा तुझ्या विषयी मला जर नित्यनवे प्रेमच नाही तर मग तू मला मनुष्यजन्म मला का घातले? देवा तुझ्या नामा वाचुन माझी वाचा अमंगळ आहे तर मग अशा चांडाळा तू निर्माणच का केलेस ?तुकाराम महाराज म्हणतात जर माझा सखा विठ्ठला माझ्याजवळ नाही तर माझ्या शरीराला आग लागो.


अभंग क्र.११६४
प्रारब्धेचि जोडे धन । प्रारब्धेचि वाडे मान ॥१॥
कासोस करिसी वांयां । भजे मना पंढरीराया ॥ध्रु.॥
प्रारब्धेंचि होय सुख । प्रारब्धेचि पावे दुःख ॥२॥
प्रारब्धेचि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥

अर्थ

प्रारब्धाने धनप्राप्ती होते आणि प्रारब्धाने च मान वाढतो त्यामुळे हे मना सर्व जर प्रारब्धाने होते तर मग व्यर्थ हव्यास तू काय करतोस? हे सर्व सोडून दे आणि पांडुरंगराया चे भजन कर प्रारब्धाने सुख दुःख होते .तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्धनेच पोट भरते त्यामुळे मी माझे पोट भरण्याकरता केव्हाही कोणालाच काहीही मागितले नाही आणि त्याचा बोबाटा ही केलेला नाही.


अभंग क्र.११६५
हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥
अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥
मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥
राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया ॥३॥

अर्थ

देवा एकतर माझी जात हीन आहे आणि त्यावर संतांनी माझी भरपूर स्तुती केली आहे. देवा मी परमार्थामध्ये जे काही प्राप्त केले आहे ते सर्व हरण करण्याकरताच अभिमान माझ्या अंगी राहायला पाहता आहे. देवा अहंकाराने मला असे वाटायला लागले की या जगामध्ये मीच सर्व काही जाणत आहे .तुकाराम महाराजांचा देवा स्तुती व अभिमान यांनीच मी वाया चाललो आहे त्यामुळे तुम्हीच माझे रक्षण करावे.


अभंग क्र.११६६
माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥
हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥
नागवी धावणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥२॥
राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण तारी ॥३॥
तुझ्या केल्याविण । स्थिर वश नव्हे मन ॥४॥
तुका म्हणे हरी । सूत्र तुझ्या हातीं दोरी ॥५॥

अर्थ

जर आईनेच आपल्या मुलाचा गळा कापला तर त्या बाळाचे रक्षण कोण करणार ?देवा हे काय तुम्हाला कळत नाही काय मग मला गरिबाला तुम्ही स्तुतीच्या(लोकांनी केली) मार्गाने नेऊन उगाच का फसवितात? एखाद्या कठीण प्रसंगी एखाद्याने त्याच्या मदतीला कोणाचातरी धावा करावा आणि जो मदतीसाठी येणार आहे त्यांनेच त्याला लुटावे, मारावे मग त्याचे रक्षण कोणी करावे ?जर राजाने प्रजेला लुटले तर तेथे कोणी कोणाला सहाय्य करावे? देवा तु मला तुझे केल्याशिवाय माझे मन स्थिर होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझे सर्व सूत्रे तुझ्याच हाती आहेत.


अभंग क्र.११६७
गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥
ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥
वेश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळा सारिखा सारिखा पापरासीं ॥२॥
चरणींच्या रजें अहिल्या तारिली । रूपवंत केली कुबजा दासी ॥३॥
पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥४॥

अर्थ

मला हरीचे गुणगाणं तालबद्ध स्वरबद्ध गाता येत नाही पण मी कसे का होईना पांडुरंगाचे गुणगान गाईन आणि त्याला शरण जाईल. सर्व ब्रह्मांडाचा नायक जो आहे त्याचाच मी अंकित आहे त्यामुळे मी बलवान झालो आहे आणि या कारणामुळे यम आणि कळिकाळ मला काय करणार आहे? गणिका नावाची वैश्या व अजामेळ सारखा महापाप राशी तरला गेला व ज्याच्याचरणरजाने अहिल्या सारखी स्त्री तरली गेली आणि कुबजा दासी तिला रूपवंत केले. तुकाराम महाराज म्हणतात हिरण्याक्षाने पृथ्वीला पाताळात नेले व हरीने त्या पृथ्वीला पातळ काढून एवढी मोठी पृथ्वी ज्या हरीने तारली त्याच्यासाठी आम्हाला तारणे हे काहीच कठीण नाही.


अभंग क्र.११६८
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥
अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥
तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥

अर्थ

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर खाल्ली या न्यायाने गाजराची पुंगी तयार करण्यासाठी काही कष्ट करावे लागत नाही आणि समजा गाजराची पुंगी नाही वाजली तर ती खाऊन टाकली तरी चालते, त्याप्रमाणेच या जगामध्ये अध्यात्म करताना कोणत्याही प्रकारची गुरुभक्ती, हरिभक्त न करता अनेक नवनवीन साधू तयार झाले आहेत. देहामध्ये अभिमान त्यांनी‌ जतन केला आहे. अशा लोकांनी कितीही पाठ पाठांतर केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. या अशा माणसांच्या ठिकाणी ज्ञान कमी असते परंतु त्यांच्या अंगी अभिमानाचा ताठा फार मोठा असतो .तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे लंड म्हणजे अभिमान वृत्तीच्या माणसांचे‌ हाणून मारून तोंड फोडा.


अभंग क्र.११६९
परद्रव्य परनारी । अभिलासूनि नाक धरी ॥१॥
जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥
सोवळ्याची स्फीती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥२॥
तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥

अर्थ

जो कोणी परद्रव्य किंवा परनारी यांची इच्छा करुन नाक धरुन प्राणायम करण्याचे ढोंग करतो. अशा दांभिक मनुष्याच्या आचरणाला आग लागो तो गाढव व्यर्थच आपल्या आचाराचा भार वाहात आहे. सोहळयाची स्थिती मी कोणालाच स्पर्श वगैरे करत नाहीये असे तो सर्वत्र सांगत फिरतो पण त्याचे चित्त मात्र क्रोधाने विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “असे मनुष्य अंतरंगात वेगळे आणि बाह्यरंगात वेगळे आचरण करुन फक्त सोंग दाखवित फिरतात.”


अभंग क्र.११७०
टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥
अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥
मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥२॥
तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥३॥

अर्थ

काही मनुष्य शरीराला बारा टिळा लावतात उंच टोपी घालतात आणि या जगात मीच एक उच्च गोसावी आहे असे दाखवीत . त्यांच्या पोटी विषयांना थारा असतो असे मनुष्य वर-वर साधू पणाचे सोंग मिरवितात .आपल्याला जनमाणसात मान मिळावा यासाठी ते कोरून मुद्रा लावतात. तुकाराम महाराज म्हणतात अशी कितीतरी माणसे नरका ला गेले आहेत आणि पुढेही जातील.


अभंग क्र.११७१
ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥
स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोढविली ॥ध्रु.॥
भांगभुकीं हें साधन। पची पडे मद्यपान ॥२॥
तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥

अर्थ

कलियुगामध्ये असे अनेक साधुसंत झाले आहेत की त्यांच्या तोंडामध्ये तंबाखू आहे आणि नळीने गुडगुडे ओढणे त्यांना फार आवडते. हे साधुसंत स्नानसंध्या सोडून देतात आणि भांग ,गांजा ओढण्यात तल्लीन झालेले असतात .भांग घोटणे भुरकी खाणे तसेच चारचौघांमध्ये बसून दारू पिणे हे त्यांच्या पचनी पडलेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक सोंगी ढोंगी आहेत मग त्यांना पांडुरंग कसा दिसेल ,कसा त्यांच्यामध्ये वास्तव्य करेल?


अभंग क्र.११७२
जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी ॥१॥
आपघर ना बापघर । चिंती मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥
सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥
तुका म्हणे अस्सल जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥

अर्थ

जी जातिवंत व्याभीचार करणारी स्त्री आहे तिला जरी सांगितले की “व्यभिचार करू नये”. तिला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न कोण करेल कारण ती कोणाचेही ऐकणार नाही .ती तिच्या घरी असो किंवा बापाच्या घरी असो तिच्या चिंतनाता नेहमी व्याभिचारच असतो. त्या स्त्रीचा पती जरी तिच्या जवळ झोपलेला असला तरी तिचे चित्त परपुरुषा विषयासक्त असते. तुकाराम महाराज म्हणतात तीच खरी अस्सल व्यभिचारी जातीची आहे कारण “जातीसाठी खाती माती” म्हणजे तिला लोक जरी नाव ठेवत असले तरी तिचा स्वभाव ती सोडत नाही म्हणजे ती अस्सल व्यभिचारी आहे.


अभंग क्र.११७३
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥
हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥
चाळवूनि हातीं । साकर म्हणोनि द्यावी माती ॥२॥
तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥

अर्थ

जर डोळस मनुष्याने आंधळ्या व्यक्तीची काठी होऊन त्याला पर्वताच्या कड्यावरून ढकलून दिले तर असे त्याचे वागणे उचित आहे काय? त्यामध्ये त्याला काही लाभ आहे काय ?आणि त्याचे त्यामध्ये काही हित होणार आहे? अंध व्यक्तीच्या हातात साखर म्हणून माती द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात आणि त्या डोळस व्यक्तीने आंधळ्या व्यक्तीच्या वाटेवर काटे पसरविणे हे योग्य आहे काय ,त्याप्रमाणे देवा तुम्ही डोळस आहात आणि मी अंध आहे त्यामुळे तुम्ही मला या भवसागरातून तारण्यासाठी योग्य मार्ग दाखवा.


अभंग क्र.११७४
प्रीतिचिया बोला नाहीं पेचपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥१॥
तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥
वेडे वांकडे ते बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥
तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥

अर्थ

प्रेमाच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कपट नसते आणि दोन प्रेमळ मनुष्य हे एकमेकांचे बोलणे गोड मानून घेतात. त्या प्रमाणे हे विठोबा राया माझ्या आणि तुझ्यात प्रेमाचे नाते आहे त्यामुळे तू माझे बोलणे गोड मानून घ्यावा. लहान मूल वेडेवाकडे बोबडे बोलते तरी देखील आई बापाला त्या बालकाचे बोल गोड वाटतात .तुकाराम महाराज म्हणतात हे माझ्या जीवाच्या सख्या जिवलगा पांडुरंगा तुला माझी दया कृपा करुणा येऊ द्यावी.


अभंग क्र.११७५
माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥
आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥
वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥२॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥


अभंग क्र.११७६
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥
उदंडचि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥
त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥

अर्थ

जर तुम्हाला थोरवी करायची असेल तर विठ्ठलाची करा मानवाची कीर्ती कोणालाही सांगू नका .असे मनुष्य अनेक आहेत कि ते जन्माला आलेत आणि मेलेत‌ हि. पूर्वी असे अनेक राजे झाले आहेत की ते नंतर रंकही झालेत आणि अनेक रंक देखील राजे झालेले आहेत . अशा लोकांचे वर्णन मात्र चराचरात कोणीही करत नाही ,पण विठ्ठलाचे वर्णन चारही वेद, सहाही शास्त्रे करतात .नारायण अक्षय आहे व त्याची कीर्ती कळत नाही त्यामुळे नारायणाचे ध्यान सतत करत राहावे .तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर विठ्ठलाचे ध्यान सतत तुमच्या चित्तामध्ये करत राहाल तर तुमच्या जन्म आणि मरण याची व्यथा दूर होईल.


अभंग क्र.११७७
नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥
नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥
तुका म्हणे करीं फकिराचे परी । रात्रंदिवस हरी येईल वाचे ॥३॥

अर्थ

देवा पोटी संतान देऊ नको कारण मोहजाळात जर मी अडकलो तर मला तुझे ध्यान होणार नाही .देवा धन आणि भाग्य हे तर देऊच नको कारण तो एक जीवाला उद्वेगच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला फकीर आणि दरिद्री कर मग मात्र मी तुझे रात्रंदिवस माझ्या मुखाने नाम घेईल आणि माझ्या मुखात तुझे नाम सतत येत राहील असेच तू कर.


अभंग क्र.११७८
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥
भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥४॥
तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥

अर्थ

जो मनुष्य उत्तम उद्योग धंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला, उत्तम करतो त्याचं मनुष्याला उत्तम गती मिळेल .आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल. जो मनुष्य केव्हाही परनिंदा करत नाही आणि परस्त्री व परनारी यांना आई ,बहीण यांच्या समान मानतो व सर्वांवर परकर करतो ,तसेच जो सर्व प्राणिमात्रांना वर नेहमी दया करतो, गायी सारखेच इतर प्राण्यांचे पालन पोषण करतो आणि आडराणी तहानलेले जीवांना पाणी पाजतो ,जो शांत राहून कोणाचे मन दुखवत नाही कोणाशीही वाईट वागत नाही तो आपल्या वाडवडिलांचे महत्त्व वाढवितो .तुकाराम महाराज म्हणतात आदर्श युक्त गृहस्थाश्रमा साठी हेच फळ आहे आणि वैराग्याचे हेच परम बळ आहे.


अभंग क्र.११७९
हरी म्हणतां गति पातकें नासती । कळिकाळ कांपती हरी म्हणतां ॥१॥
हरी म्हणतां भुक्ती हरी म्हणतां मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणतां ॥ध्रु.॥
तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरी म्हणतां ॥२॥
तुका म्हणे भावें जपा हरीचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥

अर्थ

हरीचे नाम घेतल्याने सर्व पापाचे नाश होतात. आणि सद्गती प्राप्त होते आणि कळिकाळ देखील हरिनाम घेतल्यावर थरथर कापतो .हरी म्हटल्यानंतर भुक्ती मुक्ती प्राप्त होते आणि जन्म मरण रुपी येरझार नाहीसे होतात संपतात. हरिनाम घेतल्यानंतर संसार बंधने तुटतात आणि तप ,अनुष्ठान असे इतर कोणतेही साधन करण्याची गरज लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भावपूर्वक हरिनाम घेतल्यानंतर काळात देखील तुम्हाला शरण येणार.


अभंग क्र.११८०
नये वाटूं मन । कांहीं न देखावे तें भिन्न ॥१॥
पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावी दिवसराती ॥ध्रु.॥
नये काकुळती । कोणा यावें हरीभक्ती ॥२॥
तुका म्हणे साई । करील कृपेची विठाई ॥३॥

अर्थ

साधकाने पंचवीषयाकडे मन पांगु देऊ नये आणि प्राणी मात्रा मध्ये भूतमात्र मध्ये केव्हाही भेद करू नये .आपल्या चित्तामध्ये रात्रंदिवस विठोबाचे चरण असू द्यावे .भक्ताने हरी शिवाय इतर कोणालाही शरण जाऊ नये इतर कोणालाही काहीच मागू नये. तुकाराम महाराज म्हणतात असे जर हरिभक्त वागू लागले तर मग विठाबाई माऊली त्याच्यावर कृपेची सावली करेल.


अभंग क्र.११८१
सकळ देवांचें दैवत । उभें असे या रंगात ॥१॥
रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥
रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥
तुका लुटिताहे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥

अर्थ

सर्व दैवताचे दैवत जो हा विठ्ठल तो कीर्तन व भजन याच्या रंगांमध्ये उभा आहे. हे माझे बाप हो तुम्ही शुद्ध भक्तीचे माप घेऊन कीर्तन आणि भजनाचा रंग लुटा. शुक, नारद आणि पुष्कळ संतांनी हा रंग लुटला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी हा रंग लुटत होतो त्या वेळेला पांडुरंग मला साह्य झाला आहे.


अभंग क्र.११८२
उशीर कां केला । कृपाळुवा जी विठ्ठला ॥१॥
मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निंश्चिती ॥ध्रु.॥
कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥२॥
तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥३॥

अर्थ

हे कृपाळू विठ्ठला मला भेटण्या विषयी तुम्ही इतका उशीर का केलास मला कोणाच्या तरी हाती स्वाधीन करून तुम्ही निश्चिंत झाला आहात काय? मी कोठ पर्यंत धीर धरू आणि माझे मन तरी कुठपर्यंत स्थिर करू .तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझा जीव काकुळतीला येऊन तुमची करुणा भाकत आहे.


अभंग क्र.११८३
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥
नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरी गोविंद ॥ध्रु.॥
धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥
गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥
बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥४॥
संगउपचारें कांटाळे । सुखें भलतें ठायीं लोळे ॥५॥
कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥
केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥
अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥

अर्थ

हा तुकाराम फार वेड आहे आणि अविचारी आहे आणि हा हरिभजना विषय फार बडबड करत आहे .माझ्या वाणीला नित्य सर्व काळ राम कृष्ण गोविंद हरी या नामाचा छंद लागला आहे. पांडुरंगा विषयीचा माझा दृढ भक्तिभाव आहे आणि या पांडुरंगा वाचून इतर कोणालाही मी आता मानत नाही. गुरु ज्ञानामुळे मला सर्वत्र हरीच आहे असा अनुभव येत आहे आणि त्या वाचून मी इतर कोणत्याही पदार्थाचा विचार करत नाही .मी शुद्ध संतांशिवाय कोणाचाही उपदेश ऐकत नाही आणि कथेमध्ये मी तल्लीन होऊन इतका नाचतो की मला माझ्या कपड्याची देखील शुद्ध राहत नाही .विषयाचा भोग घेणे या विषयी मला फार कंटाळा आला आहे .आणि हरी सुखामध्ये मी कोठेही लोळतो .कोणी काहीही उपदेश केला तरी तो मला कळत नाही मी माझ्या वाणीने विठ्ठल विठ्ठलच म्हणतो .माझी फजिती अनेकांनी केली तरी मी माझ्या वाणीने हरीचे नाम नित्य सर्वकाळ घेतो .तुकाराम महाराज म्हणतात अहो पंडित जनहो हा तुकाराम वेडाच आहे त्यामुळे तुम्ही त्याची उपेक्षाच करा.


अभंग क्र.११८४
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥
अंतरीं पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥
बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥
पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥
भक्तीभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥


अभंग क्र.११८५
तुज घालोनियां पूजितों संपुटी । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥
तुज नाचऊनि दाखवूं कौतुक । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥
तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥
तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तुत्वासी ॥३॥
तुका म्हणे आतां होऊनि परिमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥


अभंग क्र.११८६
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥
करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥
जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥
तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥

अर्थ

देवा मी तर पापाची राशीच आहे तुझी सेवा करण्याची मी टाळाटाळ करीत होतो. मी सेवा चोर आहे पण असे असले तरी मी तुझ्या पायाजवळ येऊन बसलो आहे .याकरिता देवा तुम्ही मला दंड करा .मला जो पदोपदी मान मिळत आहे त्याची तुम्ही खंडांना करा .देवा मी इतका पापी आहे की मी लोकांकडून माझी सेवा करून घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळेच देवा मी धड तुझाही झालो नाही आणि संसाराचा ही झालो नाही दोन्हीकडेही मी चोर झालो आहे.


अभंग क्र.११८७
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥
आवतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥
लोभ्या काळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥

अर्थ

गुजराती स्त्री एकावर एक घागरी ठेवून हात सोडून चालतात पण ती घागरी पडणार नाहीत याची देखील ते दक्षता घेतात. अगदी त्याप्रमाणे तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे ध्यान लागू द्यावे , जसा एखादा भिकारी मला कोणी जेवण्याचे आमंत्रण देतो का याची वाट पाहतो ,आणि एखाद्या लोभी मनुष्याने एखाद्या व्यक्तीला व्याजाने पैसे द्यावे व त्याचा हिशोब लावावा, की आता किती दिवस झाले पैसे देऊन ,त्याचे व्याज किती झाले असावे याचा हिशोब अगदी एकाग्रचित्ताने तो लोभी मनुष्य जसा करतो तसेच माझे चित्त तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लागावे .तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा मला ही तुझाच ध्यास लागू द्या मला दुसरी कोणतीही व्यथा नको.


अभंग क्र.११८८
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥

अर्थ

मी समस्त लोकांच्या पाया पडून विनंती करीत आहे की तुम्ही हाताने टाळी मुखाने विठ्ठलाचे नाम घेत राहा .विठ्ठल विठ्ठलच तुम्ही वेळोवेळा म्हणत रहा. हा सुखाचा सोहळा स्वर्गातही नाही .कृष्ण विष्णू हरी गोविंदा गोपाळा नाममंत्र हा वैकुंठी ला जाण्याचा सोपा मार्ग आहे .हरीचे नाम घेण्यास सगळ्यांना अगदी सर्वांनाच अधिकार आहे .कलियुगामध्ये हरिनामानेचा उद्धार होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरिनामा पाशी चारही मुक्ती आहे असे पुष्कळ ग्रंथांमध्ये वर्णन आहे.


अभंग क्र.११८९
लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥१॥
लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥
लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥३॥
लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥
लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥४॥

अर्थ

हे माणसे खोटे आहे खोटेच हसतात व रडतात. खोट्या माणसाजवळ खोट्याच उड्या मारतात ,हे माझे, हे तुझे हे देखील खोटेच आहे .आणि खोट्या अभिमानाचे ओझे देखील खोटेच आहे. खोटेच गातात खोटे ध्यान करतात आणि खोट्याची संगतती देखील खोटेच करतात .भोगही खोटाच आहे आणि त्यागही खोटाच आहे आणि वनात जाणारा देखील खोटा आहे .या जगात सर्व मायाच आहे आणि सर्व व्यवहार खोटेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मी ही खोटा आहे आणि मी जो उपदेश करत आहे तो देखील खोट आहे आणि या खोट्या लोकांना मी जे काही सांगत आहे तेही खोटेच आहे.


अभंग क्र.११९०
जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥
शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥
तापलिया तेला बावन चंदन । बुंदे एक क्षण शीतळ करी ॥२॥
पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥
तुका म्हणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥

अर्थ

काही लोक म्हणतात आम्ही कृतकृत्य झालो मला त्यांच्ये आश्चर्य वाटते. कारण कोणत्याही प्रकारची परमार्थिक साधने न करता हे कसे कृतकृत्य झाले, आता मला त्यांच्याविषयी काही धीर धरवत नाही मी त्यांच्याविषयी जे काही बोलतो आहे ते तुम्ही ऐका .जर अन्न शिजवले तर त्याची ग्वाही हात आणि दात देतात तर मग जीभेने चव घेतली तर जिभेला अन्नाची चव कळणार नाही काय? उकळलेल्या तेलामध्ये बावन चंदन उगळून टाकले तर ते लगेच थंड होते. जे खरे पारखी असतात ते समोरच्याच्या अंतकरणातील सर्व विशेष भेद ओळखतात. परंतु जे अज्ञानी असतात ते सौंदर्‍यालाच भुलतात ते वरवरच पाहतात कारण त्यांना लावण्याचा छंद असतो. तुकाराम महाराज म्हणतात सोने कसाला लावले की त्यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार केले जातात त्याप्रमाणे जे लोक आम्ही कृतकृत्य झालो असे म्हणतात त्यांची खरी परीक्षा अनुभवी संत घेतात परंतु अज्ञानी मनुष्य तसे न करता त्या कृतकृत्य म्हणणाऱ्या मनुष्याच्या वरवरच्या पोशाखाला भुलतात आणि त्याच्याकडेच पळतात.


अभंग क्र.११९१
हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥

अर्थ

संसारातील माया देवाला अर्पण करावी हीच थोर भक्ती आहे आणि ती देवाला आवडते .अनंताने संसारांमध्ये जसे ठेवले असेल तसे राहावे आणि चित्तामध्ये समाधान असू द्यावे. जर संसारांमध्ये एखाद्या गोष्टीची हानी झाली आणि त्याचा उद्वेग वाटला तर त्यामुळे वेगवेगळे दुःख प्राप्त होतील आणि जसे संचित असेल तसेच भोग भोगले पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे संसाराचा योगक्षेमाचा भार देवावर घालावा आणि हा संसार देवाच्या चरणावर वाहून द्यावा.


अभंग क्र.११९२
जन्मा येणें घडे पातकाचे मूळ । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥
मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥
ठाउकाचि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥२॥
तुका म्हणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥

अर्थ

जन्माला येण्याचे मूळ कारण म्हणजे आपले पाप आहे आणि आपल्या संचिताच्या फळा नुसार आपल्याला सुख दुःख भोग प्राप्त होतात. मग त्याविषयी कोणत्याही प्रकारचे दुःख मानून घेऊ नये आणि देवावर रुसून तरी काय उपयोग आहे? सर्वांना माहीत आहे संसारात दुख आहेच मग कोणत्याही गोष्टीचा चित्तात व्यर्थ शिण करून घेऊ नये .तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्याच नामाची आठवण ठेवावी आणि मग त्या नामाच्या ओघात जन्ममरणाचे दुख विसरून जावे.


अभंग क्र.११९३
आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥
मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥
तुका म्हणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥३॥

अर्थ

आता मी तुम्हाला जो काही उपदेश करत आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुण किंवा दोष काढू नका. मी उपदेश करताना कठोर शब्द वापरतो परंतु ते कठोर शब्द जर कोणाचा अपमान करण्यासाठी किंवा कोणाचा छळ करण्यासाठी असेल तर मला विठोबाच्या पायाची शपत आहे. माझा तसा काही उद्देश नसतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या उपदेशांमध्ये काय हेतु आहे हे त्या पांडुरंगालाच माहित आहे जगाला माझ्या अंतरंगातील भक्तिभाव कळणारच नाही.


अभंग क्र.११९४
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥
चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥
तुका म्हणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥

अर्थ

देवा तुझी ख्याती अशी आहे की तुझ्या कृपा आशीर्वादाने वांज गाय देखील दूध देते. पण देवा मी तुला अशी संसारिक गोष्ट मागणार नाही मला फक्त तुझ्या चरणांचे दर्शन दे एवढेच. चातक पक्षासाठी पावसाच्या एका थेंबाची गरज असते परंतु त्याच्यासाठी मेघ भरपूर प्रमाणात वृष्टी करतो. राजहंस नावाच्या पक्षाला अमोलिक मोती खाणे आवडते. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्राम्‍हणदेवा मी असे बोलल्या मुळे तुम्हाला एवढे का बरे बोचले. .(तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे.)


अभंग क्र.११९५
परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥
न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥
पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केले ते निराळे द्विज देवा ॥३॥

अर्थ

देवा मी तुमच्यापेक्षा दूर आहे तुमच्या पासून वेगळा आहे तसेच तुमच्या नाम रूपा पासून वेगळा असून मी व्यवहारत: भिकारी आहे. मी निच जातीतला आहे मी निच जातीत जन्माला आल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा रुसवा आणि संकोच धरत नाही .बसल्या जागेवर मला संतांची उच्चिष्ट खाण्यास सेवन करण्यास मिळावी हीच माझी इच्छा आहे. आणि ती इच्छा देवाने पूर्ण करण्यासाठी व्यवस्थाही केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्राम्हण देवा तुम्ही आम्ही वेगळे आहोत आणि तुम्हीच आमच्यापासून निराळे झाले आहात .(तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे.)


अभंग क्र.११९६
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राम्हण बैसलेती ॥२॥
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥

अर्थ

अहो चिंतामणी देवा तुमचे दैवत गणपती यांना जेवण्यास बोलवा आणि दुसरे पात्र तुमच्या शेजारी टाकून त्यांना भोजन करण्यास बसवा .त्यावेळी चिंतामणी म्हणाले अहो तुकोबा आमची एवढी मोठी थोरवी कसली आमची तर अभिमानाने फजिती झाली आहे.खूप उशीर झाला होता अन्न शिळे होत चालले होते ब्राम्‍हण आपल्या ताटावर तसेच तटस्थ बसलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अहो चिंतामणी देवा मी तुमच्या पुण्याइने देवाला गणपती रायाला बोलावुन आनु शकतो आणि खरोखर महाराजांनी विनंती करतातच पांडुरंग राया गणपतीच्या अवतारात तेथे आले. .(तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे.)


अभंग क्र.११९७
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥
भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥
कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्ताचें तुका म्हणे ॥३॥

अर्थ

तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या गणपती मोरयाला अन्नग्रहण करण्यासाठी बोलावताच श्री विठ्ठल गणरायाच्या रूपात तेथे अन्नग्रहण करण्यासाठी आले आणि त्यांना पाहताच “लक्ष्मीचा पती नारायण जो सर्व अन्नाचा भोक्ता आहे” या अर्थचा मंत्र म्हणून महाराजांनी व सर्वांनी प्राणहुती घेतली व देवच सर्वांचा पालन करता आहे, भोक्ता आहे ,कर्ता आहे ,करविता आहे आणि तोच पूर्ण काम आहे असा हा विश्वंभर सर्वांवर कृपादृष्टी ठेवून सर्वांचा सांभाळ करणारा आहे , तो सर्व ब्राम्‍हणांना सावकाश होऊ द्या अशी प्रार्थना करीत आहे .तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे देव आणि भक्तांचे एका पंगतिला भोजन होत आहे त्यामुळे प्रत्येक घासाला गोविंदाचे नाम घेत भोजन करावे.


अभंग क्र.११९८
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥
तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याती ॥३॥

अर्थ

ज्यावेळी चिंचवडच्या गणपतीस प्रार्थना करून महाराजांनी भोजन करविले आणि देव त्यांच्या विनंतीस मान देऊन भोजन करण्यास आले वमककगगग जेवण झाल्यावर तेथील चिंतामणी ब्राम्‍हणांनी तुकाराम महाराजांची स्तुती करण्यास सुरुवात केली त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले अहो चिंतामणी देवा माझा स्वामी पांडुरंग तुम्हा ब्राम्‍हणांची लाथ त्याच्या छातीवर धारण करतो मग माझ्यासारख्या पतीताचे तेथे काय चालणार आहे? माझ्यासारखा पतीत कोण लागून गेला ?अहो ब्राम्‍हण देवा तुमच्या चरणस्पर्शाने तिर्थे पवित्र होतात मग माझ्यासारख्या दुर्बळाचा तेथे काय अधिकार आहे ?तुकाराम महाराज म्हणतात अहो चिंतामणी देवा तुम्ही ब्राम्‍हण देवालाही वंद्य आहात मी हिन जातीत जन्माला आलो आहे .(अशा प्रकारचे विनयपूर्वक भाष्य तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या गणपतीची सेवा करणाऱ्या चिंतामणी ब्राम्‍हण देवास केले.)


अभंग क्र.११९९
वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभींच ॥१॥
स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥
सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया पुरे कोंभ नये ॥२॥
तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥

अर्थ

आरंभापासूनच आपण ज्या दैवताला, गुरूला वंदन करतो त्यांच्याविषयी नेहमी वंदनीय भावना ठेवली तरच चांगले, नाही तर त्यापेक्षा सुरुवातीला त्यांच्याशी संबंध न ठेवलेले चांगले. ज्याला आपले स्वहित करायचे आहे त्याने हे माझे आहे बोलणे ऐकावे. मनुष्याच्या अंगी धैर्य असणे हा मोठा मौल्यवान गुण आहे. एखाद्या रोपट्याला वरच्यावर पाणी घालावे लागते नाहीतर ते एकदा कि वाळले तर मग त्यावर कितीही पाणी वाहिले तरी त्याला कोंब फुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात दगडाला देवपण येण्यासाठी अनेक टाकीचे घाव सोसावे लागते आणि मूर्ती तयार करत असताना मूर्तींमध्ये फुटली तर त्या मूर्तीचा दगड लोक ढुंगन पुसण्यासाठी करतात, तात्पर्य कोणतेही कार्य करतांना धीराने करावे.


अभंग क्र.१२००
आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥
वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥
तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥

अर्थ

आम्हा हरिदासांना विठ्ठल हेच भांडवल आहे आणि आमचे धन, वित्त सर्वकाही विठ्ठलचा आहे. आमच्या या भांडवलामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा नाही त्यामुळे चित्तामध्ये समाधान आहे आणि आम्ही चित्त समाधान करून लागेल तेवढे ते नाम सेवन करतो. तुकाराम महाराज यामागे अनेक लोकांनी द्रव्य मिळवले आहे पण ते द्रव्य कोण संगे गेलेले ही नाही व कोणा बरोबर आलेले देखील नाही पण आमच्या जवळचे विठ्ठल नाम रुपी भांडवल आहे ,धन आहे, द्रव्य आहे, ते नेहमी आमच्या बरोबरच राहते.


सार्थ तुकाराम गाथा ११०१ ते १२०० समाप्त. (sant tukaram maharaj abhang)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *