सार्थ तुकाराम गाथा 1501 - 1600

सार्थ तुकाराम गाथा 1501 – 1600

सार्थ तुकाराम गाथा 1501 – 1600


अभंग क्र.१५०१
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥
हुंगों नये गोऱ्हावाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥
अळसियाचे अंतर कुडें । जैसें मढें निष्काम ॥२॥
तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥

अर्थ

बुद्धिहीन मनुष्यांना उपदेश करणे म्हणजे अमृतामध्ये विष कालवल्यासारखेच आहे. शौचाच्या ठिकाणी जाऊन कधीच वास घेऊ नये त्याने दुर्गंधीच येते आणि विटाळ होतो. आळशी मनुष्याचे मन दुष्ट असते, जसे मढे काहीही करू शकत नाही त्याप्रमाणे आळशी मनुष्य हे निष्काम असतात त्यांना काहीही करण्याची इच्छा होतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती अशा बुद्धिहीन निष्काम लोकांच्या हातातुन मला वाचवा.


अभंग क्र.१५०२
न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।
बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥
आणीक काय तुम्हां काम । आम्हां नेदी तरी प्रेम ।
कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥
आह्मीं वेचलों शरीरें । तुम्ही बीज पेरा खरें ।
संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥
एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी ।
जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥
रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।
होईन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥
ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा ।
तुका म्हणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥

अर्थ

देवा मी तुमची सेवा अभिमानाने व मी पणाणे करत नाही तर मी बापडा आहे भोळा आहे म्हणून करतो आहे. मी तुमच्या जवळ जी भक्ती आणि प्रेमाची इच्छा केली आहे तेवढी पूर्ण करा. तुम्हाला अजून दुसरे कोणते काम आहे देवा की, तुम्ही आम्हाला प्रेम देण्याकरता थोडावेळ देखील देत नाहीत देवा. तुम्ही आम्हाला प्रेम दिले तर धर्म आणि अधर्म हे आमच्या जवळ निश्चयाने कसे राहतील? देवा आम्ही तुम्हाला आमचे शरीर अर्पण केले आहे आता तुम्ही आमच्या शरीरांमध्ये भक्ती आणि प्रेमाचे खरे बीज पेरा. त्यामुळे तुमचा व माझा संयोग होईल व दोघांमध्ये एकमेकांविषयी थोडी गोडी वाढेल. देवा एका हाताने टाळि वाजते काय? स्वामीचा सेवक कितीही बलवान जरी असला तरी स्वामी नसेल तर ते चांगले वाटत नाही. हे अनंता तुम्ही नाम रूपाला या म्हणजे आम्ही तुमच्या नाम रुपाच्या सत्तेने आमच्या भक्तीला पुष्टता आणू मग मी तुझा प्रिय होऊन संतांमध्ये मान्य होईल व मग संत आमचे पालन-पोषण करतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जर मला भक्ती आणि प्रेम उधार देण्याचे ठेवले तर मा


अभंग क्र.१५०३
भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥
हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥
नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणीं सकळ ॥२॥
तुका म्हणे जड । मज न राखावें दगड ॥३॥

अर्थ

काही असे लोक आहेत की ते जिवंत असणाऱ्या बापाला जेवण देत नाही परंतु मेल्यावर मात्र पिंडदान करतात. ही तर फसवाफसवी आहे कारण श्रद्धा करिता केलेले अन्न तो स्वतः खात असतो, देवाला नैवेद्य म्हणून गोडधोड अन्न करतात आणि स्वतः खातात. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला असल्या जड असणाऱ्या लोकांप्रमाणे ठेवू नका.


अभंग क्र.१५०४
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥
पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥
जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥
तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥

अर्थ

मी सर्व प्रकारे हीन आहे दिन आहे तरीही संतांनी माझा सांभाळ केला. यामुळेच संतांच्या पायी माझे मस्तक असो व नेहमीच मी त्यांच्यापुढे हात जोडून असो. देवा माझ्यासारख्या दीनदुबळ्यांची सेवा कशी आहे हे तुम्ही जाणता आहातच. तुकाराम महाराज म्हणतात संतान जवळ मी माझा जीव अर्पण करून माझा उद्धार करा अशी किव त्यांच्यापुढे भाकत आहे.


अभंग क्र.१५०५
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥
येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥
होई बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥
तुका आला लोटांगणीं । भक्तीभाग्या जाली धणी ॥३॥

अर्थ

अर्थ:–माझ्या भाग्याचा उदय झाला आहे, माझे भाग्य फळाला आले आहे म्हणून मला आता संतांच्या पायांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. आता त्यांच्या चरणांवर ठेवलेले माझे मस्तक शेवटपर्यंत तसेच राहो, मरणाआधी ते तिथून किंचित देखील हलू नये हीच काय ती आता माझी अपेक्षा, हेच काय ते आता देवाजवळ माझे मागणे आहे.तुकोबाराय आपल्या मनाला बजावतात की हे मना तू आता बळकट हो, धीट हो कारण भक्तिपंथावर चालणे वाटते तेवढे सोपे काम नाही, सरळ नाही म्हणून संतांच्या पायी आता मला लोटांगण घालू दे, त्यांचे मार्गदर्शन मला लाभू दे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तिभाग्य लाभल्यामुळे म्हणजेच एवढा मोठा भाग्योदय झाल्यामुळे माझे मन आता शांत आणि समाधान पावले आहे.


 

अभंग क्र.१५०६
नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणे ॥१॥
जेथें देखो तेथें लांचाचे पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥
आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥
तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्याने देवा पायांपाशीं ॥३॥

अर्थ

देवा नाहीतरी आता तुझ्याकडून चांगला अनुभव येईल कसा कारण तू तर आमचे घर बुडवणारा झाला आहेस देवा. जिकडे पहावे तिकडे सर्व लोक लालसेने वेडे झाले आहेत मग तो परमार्थ असो किंवा व्यवहार असो आणि आमच्या देवालाही काहि दिल्याशिवाय बरे वाटत नाही. कोणीही कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता दान करणे व देण्याकरता नेहमी हात वरती असणे यालाच उदार म्हणतात. नाहीतर एखाद्याने दुसऱ्याला कोणाला तरी एखादा माल दान म्हणून दिला व दुसऱ्याने त्याच्या मोबदल्यात द्रव्य घेतले तर मग हा प्रकार म्हणजे फेटाफिटीचाच झाला मग त्यात उपकाराला तरी कसला? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला तुमची जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे आम्ही तुझी सेवा करू तुम्ही सर्वशक्तीमान आहात तरी तुम्ही कोणाला काहीच देत नाही पण असे असले तरी देखील आम्ही तुमच्या पायापाशी बसून तुमची सेवा करू.


अभंग क्र.१५०७
आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥१॥
तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥
याच कानसुली मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥२॥
तुका म्हणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुम्ही हो श्रीपती साक्षी येथें ॥३॥

अर्थ

मनावर नेहमी संसारिक व्यवहाराचे अभ्यास करणे बिंबले आहेत त्यामुळे देवा आम्ही तुझ्या ठिकाणी एकाग्र कसे राहणार आहोत? तरी आम्ही देवाच्या पायावर आमच्या देहाचे मुटकुळे ठेवले आहेतच म्हणा, कारण इंद्रियांच्या प्रत्येक अवयवा मुळे आम्ही कासावीस झालो आहोत. त्यामुळेच मी आता देवाच्या कानावर जवळ जाऊन म्हणत आहे की, हे देवा तुम्ही मला आता इंद्रीय आणि विषयांमध्ये गुंतून ठेवू नका त्यामध्ये घोटाळु देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात हे श्रीपती देवा तुम्ही आमच्या स्वप्न जागृती आणि सुशुप्तीचे साक्षीदार आहात.


अभंग क्र.१५०८
नसताचि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥
जालों तेव्हां कळलें जागा । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥
गंवसिलों पुढें मागें । लागलागे पावला ॥२॥
तुका म्हणे केली आयणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥

अर्थ

जन्म मरणाचे भय दाखवून तुम्ही माझ्या जीवाला कष्टी केले आहे देवा, जेव्हा मला ब्रम्‍हज्ञान झाले त्यावेळी मला असे जाणवले की जन्म मरणाचे भय आणि त्याविषयी आक्रोश करणे व्यर्थ आहे. मला जन्म मरणाचे भय वाटत होते त्या कारणामुळे मी तुमचा शोध घेण्यास चालू केले नंतर शेवटी मला तुमचा पत्ता मिळाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी सलगी करून देणारे संत आहेत त्यांनी मला तुझ्या पुढे उभे केले व ब्रम्हानंदाचा अनुभव करून दिला.


अभंग क्र.१५०९
हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥
सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कलीसारिखे ॥ध्रु.॥
शरणागत वैऱ्या हातीं । हे निश्चिंती देखिली ॥२॥
तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥३॥

अर्थ

देवा आम्ही अनेक प्रकारचे दुःख पळावे आणि त्याचे व्यर्थ शीण करत बसावे हेच तुमच्या सेवेचे दान आहे काय देवा? तुमची ब्रीदावळी म्हणजे दीनानाथ अशी आहे ती तुम्ही सांभाळा तुम्ही कली सारखे वाईट का झालात? तुम्हाला शरण आलेल्या भक्तांना तुम्ही काळाच्या हाती द्यावे म्हणजे वैर्‍याच्या हाती द्यावे यातच तुम्हाला समाधान वाटते काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमच्या भेटीची इच्छा धरतो आणि तुम्ही उलट वागतात पाय पोटात घेता याला काय म्हणावे?


अभंग क्र.१५१०
कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥
उफराटी तुम्हां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥
साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥२॥
तुका म्हणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥३॥

अर्थ

हे पांडुरंगा तुम्ही याआधी सर्व संतांना भेट दिली परंतु माझ्याच बाबतीत असे का? तुम्ही मला भेट का देत नाहीत देवा तुमची सत्याला धरून वागण्याची क्रिया संपली आहे की काय तुम्ही असे उरफाटे का वागतात? देवा तुमची पूर्वीची वागणूक आणि भक्तांच्या भेटी विषय असलेली तळमळ याविषयी माझे मनच साक्षी आहे देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही समर्थ आहात म्हणजे तुम्ही काहीही करू शकता तुम्ही माझ्या विषय असे का वागत आहात तुमचे हे वागणे मला काहीच कळत नाही.


अभंग क्र.१५११
शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥
भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥
प्रीत कळे आळिंगणी । संपादनीं अत्यंत ॥२॥
तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥

अर्थ

शकुन-अपशकुन याने पुढील होणारे लाभ आणि हानी कळून येते. देवा आता माझे मन भयभीत झाले आहे तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? आपल्यावर समोरच्या व्यक्तीचे प्रेम किती आहे ते त्याने आपल्याला आलिंगन दिल्यावर लगेच समजते काही लोक फक्त वरवर आपल्याला आलिंगन देतात तेही लगेच लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आम्हाला मोकळेच सोडून देणार आहेस हे लक्षात आले तेवढे तरी बरे झाले.


अभंग क्र.१५१२
न होय निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतहान सहावली ॥१॥
तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान भिन्न असों द्यावा ॥ध्रु.॥
नाहीं विटाळिलें काया वाचा मन । संकल्पानें भिन्न आशेचिया ॥२॥
तुका म्हणे भवसागरीं उतार । करावया आधार इच्छीतसें ॥३॥

अर्थ

देवा तुझी प्राप्ती करून घेण्यासाठी आम्हाला कडक उपवास करणे शक्य नाही. आपल्या देहाला कष्ट करून घेणे हे आम्हाला जमत नाही आणि तहान-भूक आम्हाला सहन होत नाही. तरी देवा आम्ही तुला नित्य आळवीत आहोत तुझी करुणा आम्ही नेहमी भाकत आहोत त्यामुळे देवा आमचा अभिमान तू बाळगावा. कोणत्याही प्रकारच्या भिन्नभिन्न आशेने संकल्पनाने माझे काया, वाचा, मन कधीही विटाळलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी या भवसागरातून तरून जाण्याकरता तुम्ही एक मला आधार द्यावा एवढीच माझी इच्छा आहे.


अभंग क्र.१५१३
आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥
मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥
आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें नसावेंचि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥३॥

अर्थ

देवा संतांच्या मुखातून मी तुझी कीर्ती ऐकली आहे त्यामुळे या ठिकाणी आलो आहे. देवा तुम्ही जसा तुमच्या मागील भक्तांचा उद्धार केला तसाच यापुढेही भक्तांचा उद्धार करावा यामध्ये पालट होऊ देऊ नका. आम्हाला केवळ तुझ्या नामाचा आधार व त्याच्यावरच विश्वास आहे आणि तो नामाचा आधार व विश्वास तुटला तर मग आम्हाला दुसरे कोठेही थारा नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी राजा माझ्याविषयी तुमच्याजवळ परके पणा नसावा एवढी विनंती तुम्ही माझी ऐकावी.


अभंग क्र.१५१४
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥
उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ध्रु.॥
लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥
तुका म्हणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥

अर्थ

देवा मोलाचे आयुष्य तुमच्या सेवेत खर्च होत आहे तरीही आमची भवसागरातून सुटका होत नाही याबद्दल खेद वाटतो. हे नारायणा तुम्ही जर मनापासून आमची भवसागरातून मुक्तता करण्याकरिता आलात तर आमचा एका क्षणात परिहार होईल. माझी अवस्था म्हणजे गुळाची चिटकलेल्या माशी प्रमाणे झाली आहे आता यात काही संशयच नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला करुणा भाकणे करीता केवळ वाचेचे बळ उरले आहे त्यामुळे वाचेने तुम्हाला मी आळवित आहे देवा काळाने मला ओढले आहे तरी तुम्ही लवकर धाव घेऊन माझ्याकडे यावे.


अभंग क्र.१५१५
म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥
कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानींच ॥ध्रु.॥
पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पीला ॥३॥

अर्थ

आम्ही भव सागरातील सर्व आशा पाशा पासून आमचे चित्त आवरले आहेत व त्यामुळे आम्ही देहरूपी क्षेत्रांमध्ये संन्यास घेतला आहे. आम्ही सुरुवातीलाच आमच्या चित्ताचे आवाहन केले व त्याचे विसर्जन करून टाकले आता देहरूपी तीर्थक्षेत्र सोडून त्याचे त्या सीमेचे उल्लंघन आम्ही केव्हाही करणार नाही. आता आम्हाला सर्व ठिकाणे परके झाली आहेत आम्ही हरी विषयी एकविध भक्तिभाव ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आता कोणत्याही प्रकारचा कार्य करण्याचा हेवा राहिला नाही कारण आम्ही आमचा जीव देवाला अर्पण केला आहे.


अभंग क्र.१५१६
विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा ॥१॥
पालटलें जैसें देंठ सांडी पान । पिकलें आपण यातपरी ॥ध्रु.॥
न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥
तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळीचा तैसा लवलाहो ॥३॥

अर्थ

हा काळ असे काही खोटे चाळे करतो की, मनुष्याने आयुष्यभर जरी चांगले काम केले तरी शेवटी हा काळ त्याची बुद्धी भ्रष्ट करतो. एखाद्या झाडाचे हिरवे पान पिकल्यावर देठासहित गळून पडावे त्याप्रमाणे आपली शेवटी स्थिती होते. एखाद्या हिन बुद्धीच्या माणसाला न मारता त्याची हिन बुद्धी त्याला दुःख देते आणि ती हीन बुद्धी माजल्या सारखी करून त्याला पुन्हा या संसारत गोवते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे गळाला लागलेला मासा सारखा तळमळ करत असतो त्याप्रमाणे बुद्धिभ्रष्ट झालेले आणि बुद्धिहीन माणसे सारखे तळमळतात.


अभंग क्र.१५१७
नवजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥
म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥
मोकळें हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥
तुका म्हणे कांहीं नेणें । नवजें येणेंपरी वांयां ॥३॥

अर्थ

देवा तुमच्या चिंतना वाचून कोणताही काळ जाऊ नये हीच मुख्य दया तुमची आमच्यावर असू द्यावी. आम्ही जसे आहोत तसे तुमच्या पायाजवळ आहोत म्हणून तुमच्या चिंतना वाचून मोकळे ठेवले तर आम्हाला फार कष्ट होतील. आणि तुमचे जर चिंतन केले नाही तर आम्ही दुर्जन होऊ. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला शास्त्र वगैरे काही माहीत नसले तरी आम्ही वायाला जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे.


अभंग क्र.१५१८
कल्पतरूअंगीं इच्छिलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥
धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥
बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥
तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥

अर्थ

एखादा अभागी मनुष्य जरी असला आणि तो मनुष्य कल्पतरू वृक्षाखाली बसला आणि त्याने जी इच्छा केली तरी त्याची देखील इच्छा पूर्ण होईल. ज्यांनी कोणी आपल्या चित्तामध्ये नारायण साठविला आहे ते लोक धन्य आहेत व त्यांच्या जाती धन्य आहेत. पाणी सर्व बिजांना समान प्रमाणात दिले तरी जसे बीज असेल तसेच अंकुर तयार होते व तसे फळ देखील मिळते त्याप्रमाणे नारायण सर्वत्र समान प्रमाणे समावलेला आहे व ज्याचा जसा गुण असेल त्याला तसेच फळ मिळते. तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या मनुष्याला हिऱ्याची ओळख पटते आणि गाढवाच्या पाठीवर चंदनाचे जरी ओझे दिले असले तरी त्याला चंदनाच्या सुगंधाची ओळख नसते त्याप्रमाणेच चांगल्या मनुष्यालाच नारायणाची ओळख असते त्यामुळे तो सुखी होतो आणि गाढवाच्या पाठीवर जसे चंदनाचे ओझे असते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यरुप गाढवाच्या हृदयात नारायणरुप चंदन असते आणि ज्याला नारायणाची ओळख होते तोच मनुष्य सुखी होतो नाहीतर ओळख न झाल्यास त्या मनुष्याला दुःख प्राप्त होते.


अभंग क्र.१५१९
उकिरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी तेचि चित्तीं ॥१॥
कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥
काय जाणे विष पालटों उपचारें । मुर्खासी अंतर तोंचि बरें ॥२॥
तुका म्हणे काय उपदेश वेड्या । संगें होतो रेड्यासवें कष्ट ॥३॥

अर्थ

गाढवाने उकिरडा पहिला कि ते त्यामध्ये लगेच लोळण घेते त्याप्रमाणे ज्याची जशी जात असेल म्हणजे ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे तो व्यक्ती वागत असतो. मूर्ख माणसाला वाईट तर चांगल्या मनुष्याला चांगल्या गोष्टी आवडतात मौल्यवान माणिकाची किंमत आंधळ्या व्यक्तीला काय समजणार कारण त्याच्या दृष्टीने तो खडाच असतो आणि जर जिभेला चवच नसेल तर कितीही उत्कृष्ट पदार्थाचा भोजन असले तरी ते कसे चांगले वाटेल त्याप्रमाणे मूर्ख मनुष्याला परमार्थ कसा चांगला वाटेल? विषाला कितीही चांगले म्हटले, त्याला चांगले करून प्यावे असे म्हटले तरी ते कडू आहे त्याप्रमाणे मूर्ख माणसाला कितीही चांगला उद्देश सांगितला तरी तो चांगला होत नाही त्यामुळे त्यापासून दूर राहणेचं चांगले. तुकाराम महाराज म्हणतात मूर्ख आणि वेड्या मनुष्याला कितीही चांगला उपदेश केला तरी काहीच उपयोग होत नाही.


अभंग क्र.१५२०
जया शिरीं कारभार । बुद्धि सार तयाची ॥१॥
वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥
आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥२॥
तुका म्हणे शूर राखे । गांडया वाखे सांगातें ॥३॥

अर्थ

ज्याच्यावर मोठा कारभार करण्याची जबाबदारी असते त्याची बुद्धी नेहमी धर्मनीती संपन्न असावी. तो जसे वर्तन करील त्याप्रमाणे सर्व वर्तन करतात आणि त्याचा सद्गुण सर्वांना मिळतो. आपण आपल्या करिता जर अन्न तयार केले तर चांगलेच करतो त्याप्रमाणे आपण जर चांगले वागलो तर आपले पाहून इतर लोकही तसेच वागतात. तुकाराम महाराज म्हणतात शूर मनुष्या बरोबर राहिले की आपले रक्षण होते आणि भित्र्या मनुष्य बरोबर राहिले की आपली फजिती होत असते.


अभंग क्र.१५२१
एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥१॥
कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥
अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥२॥
तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥

अर्थ

परमार्थ करण्याविषयी आपण सर्व एकमेकांना साह्य करू व सन्मार्गाला लागू. आम्ही म्हातारपणी परमार्थ करू असे म्हटले तर पुढे आयुष्य किती शिल्लक आहे कोणालाही ही गोष्ट माहित नाही. आता आपण परमार्थ करू, हरीचे स्मरण सर्वांकडून करून घेऊ व धन्य होऊ. तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणाची आवड धरली तर सर्व काही प्राप्त होते.


अभंग क्र.१५२२
फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥
ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥

अर्थ

फोलपटा प्रमाणे असणारा संसार मिथ्या आहे व सर्व संसाराचेही सार असणारा भगवंत सत्य आहे. हाच विचार मी माझ्या मनामध्ये व सर्व जणांमध्ये जागवित आहे. संसाराचे सर्व कामं बाजूला सारून एक विठोबाचे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा वाचुन कोणताही व्यवहार व्यर्थ आहे आणि मीथ्या आहे.


अभंग क्र.१५२३
शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥
कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥
आवडे ते तेचि यासी । ब्रम्ह रसीं निरसे ॥२॥
तुका म्हणे बहुतां परी । करूना करीं सेवन ॥३॥

अर्थ

हरीच्या शुद्ध नाम रसाने माझी जीभ ओलावली असून जीव्हा अजूनही तृप्त झाली नाही नारायणा विषयी इच्छा केव्हा पूर्ण होणार आहे ते काही कळत नाही? माझ्या जीव्हेला हरीचे शुद्ध हरीब्रम्‍हनामरस आवडते व त्या हरीब्रम्‍हनाम रसाने सर्व निरस केले आहे. नंतर हरीच्या शुद्ध नामरसाची माझ्या जिवाला पूर्ण तृप्ती झाली नाही त्यामुळे मी नारायणाची विविध प्रकाराने करुणा भाकत आहेत.


अभंग क्र.१५२४
असंती कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह ते विकार विरहित ॥१॥
तरि म्हणा त्याग प्रतिपादिलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥
सिजले हिरवे एका नांवे धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥
तुका म्हणे भूतीं साक्षी नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥

अर्थ

सर्वत्र ब्रम्‍ह आहे आणि जे वाईट आहे त्याविषयी तिरस्कार करणे कंटाळा करणे हा काही मत्सर नव्हे आणि जे ब्रम्‍हज्ञानी आहेत ते विकाररहित असतात. वाईटाचा सर्वांनी त्याग करावा असे प्रतिपादन सर्वत्र आहे आणि वाईटाचा सर्वांनी तिरस्कार केलेला आहे आणि असेच चालत आले आहे. धान्य हिरवे असो किंवा शिजलेले असो त्याला आपण धान्य म्हणतो परंतु आपण जेवण करण्याकरता शिजलेले निवडतो त्याप्रमाणे परमार्थामध्ये आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करतो व जे वाईट आहे त्यांचा त्याग करतो. तुकाराम महाराज म्हणतात सर्व भूत मात्रामध्ये एक नारायण साक्षी रूपाने आहे परंतु जे अवगुणी आहेत त्यांना दंड केला जातो आणि जे गुणी आहेत त्यांची पूजा केली जाते.


अभंग क्र.१५२५
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥
बहुरंगें माया असे विखुरली । कुंठिंतचि जाली होतां बरी ॥ध्रु.॥
पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥२॥
तुका म्हणे गेला फिटोनिया भेद । मग होतो देव मनाचाचि ॥३॥

अर्थ

आपले स्वहित कशात आहे व आपले चित्त समाधान कशाने होईल ते जाणून घ्यावे देवाची माया जगात पसरलेली आहे आणि ती आपण वेळेतच कुंठित केली तर बरे होईल. मौन धारण करून आपले चित्त विश्वंभरा चरणी अर्पण करावे करणे यालाच खरी पूजा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनातील भेद नाहीसा होतो तो स्वतः आणि त्याचे मन भगवंत स्वरूप होत असते.


अभंग क्र.१५२६
असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगीच या भारें कुंथा कुंथी ॥१॥
धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तिहीन ॥ध्रु.॥
भ्रमल्यानें दिसें बांधल्याचे परी । माझें मजवरी वाहोनियां ॥२॥
तुका म्हणे धांव घेतलीसे सोई । आतां पुढें येई लवकरी ॥३॥

अर्थ

आपल्या देहामध्ये आत्मा भिन्न आहे परंतु देहा भिमानामुळे तो वेगळा होत नाही. आणि देहाचे पालन-पोषण करण्यात तो निष्कारण अडकून बसतो त्यामुळे हे हरी तू मला बंधनातून सोडवण्याकरता लवकर धाव घे कारण मी शक्तिहीन झालो आहे. मी देहासक्ती धरली आहे, त्याच्या मोहात गुंतलो त्यामुळे मला बांधल्यासारखे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला बंधनातून तुमच्या वाचून कोणीही सोडवणार नाही असे वाटते त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या आणि मला बंधनातून सोडवा.


अभंग क्र.१५२७
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥
ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥
गळ गिळी आमिशे मासा । प्राण आशा घेतला ॥२॥
तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ॥३॥

अर्थ

गाईचे मेलेले वासरु असते मग त्याच्यात भुसा भरला जातो आणि त्याचे भोत तयार केले जाते व तेच भोत गाई पुढे उभे केले जाते व ती गाय त्या भोताला चाटते व पान्हा सोडते परंतु जर त्याच गाई जवळ दुसऱ्या गाईचे वासरू आणले तर ती काय त्या वासराला मारत असते त्याप्रमाणे हे देवा हे सर्व लोक मीथ्या विषयांचा हेवा वाढवून त्यालाच भुलले आहेत. गळाला आळी लावतात व त्याच्या आमिषा पोटी मासा गळाला लागतो व प्राणाला मुकतो. तुकाराम महाराज म्हणतात लोकहो पहा बोकडाच्यापुढे खाटकाने चारा टाकला की त्या बोकडाला त्या खाटका विषय प्रेम वाटते परंतु तोच खाटीक त्या बोकडाला नंतर मारतो.


अभंग क्र.१५२८
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥
अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥
तुका म्हणे ग्यानगंड । देवा सुख पावो नाड ॥३॥

अर्थ

विषयाच्या संगतीने मरण येते परंतु हे सर्व जाणत असून देखील अभागी माणूस विषयांमध्ये गुंततो. अभागी मनुष्य शास्त्राला किंमत न देता विषयांमध्ये गुंतून राहतो आणि त्याच्या स्वतःच्या तोंडावर धोंडा पाडुन घेतो. ज्याला मोक्षच माहित नाहीये त्या गाढवाला काय सांगावे? तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये ज्ञानाने अभिमानी झालेले अनेक माणसे आहेत ते विषयांमध्ये फसत असतील तर खुशाल फसोत.


अभंग क्र.१५२९
मीच विखळ मीच विखळ । येर सकळ बहु बरें ॥१॥
पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥
मीच माझें मीच माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥
आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥३॥

अर्थ

जगामध्ये मलाच माझ्या मीपणाचा अभिमान आहे बाकी सर्व चांगले आहेत. देवा या दोषाबद्दल तुम्ही मला क्षमा केले पाहिजे हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक बोलत आहे. देवा “मी आणि माझे” असे म्हणणे यातच मी अपराध करत आहे. परंतु या अज्ञानामुळेच मला ओझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संसाराविषयी आचवल आहे, आसक्त झालो आहे त्यामुळे पशुवत निर्मनुष्य झालो आहे.


अभंग क्र.१५३०
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥
ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥
भय निवारिता । कोण वेगळा अनंता ॥२॥
तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥

अर्थ

देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने मी देवाकडे येणे-जाणे केले तर देव माझ्यावर निश्चितच कृपा करेल. परंतु माझ्या पदरी जर पाहिले तर तेवढे पुण्य देखील दिसत नाही की मी देवाच्या दर्शनाला जावे. अनंता वाचून माझे कोण दुःख निवारण करील ?तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व भोग दुःख पांडुरंगाने कृपा केली तरच नाहीसे होतील.


अभंग क्र.१५३१
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥
परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥
वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥
तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥

अर्थ

संतांनी अज्ञानी लोकांना जगामध्ये आपण कसे वागावे हे सांगावे व हीच धर्मनीती आहे आणि संतांनी त्यांचे हे कर्म केले आहे परंतु आम्ही इतके मूर्ख आहोत की देहा विषय अहंकार धरतो स्वहित न पाहता चित्तामध्ये अहंभाव धरतो व तो अहंभाव आम्हाला जसे नाचवेल तसे आम्ही नाचतो. ज्या कारणाने आपल्याला पुण्य होईल अशी वाट जो दाखवतो त्याच्या पुण्याला पारावर नाही आणि त्याचे अगणित उपकार आपल्यावर असतात. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही फार उदार आहात आणि जे उचित आहे तेच तुम्ही आज पर्यंत केले आहे.


अभंग क्र.१५३२
लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥
पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥
कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥
तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥३॥

अर्थ

काही स्त्रिया कथेमध्ये लहान मुलांना घेऊन येतात व ते मूल कथा चालू असताना खेळतात, ओरडतात त्यामुळे कथेमध्ये विनाकारण कट निर्माण होते. त्यामुळे तुम्ही त्या स्त्रीला लहान मुलांची किरकिर बंद करण्याविषयी पाया पडून विनंती करा व तरीही तिने ऐकले नाही तर मग तिची कोणत्याही प्रकारची भीड भाड न ठेवता तिला हाताला धरून बाहेर काढून द्या. सुंदर अशा हरी कथेमध्ये ती स्त्री त्या मुलाला कुरवाळते पण त्या स्त्रीला हे का लक्षात येत नाही की मुलाच्या किरकिरिणे हरी कथेतील प्रेमभंग होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या स्त्रीच्या अशा वागण्यामुळे हरकथे मध्ये अंतर पडते, ती स्त्री पुन्हा असे करू नये म्हणून तिची चांगलीच फजिती करून त्या स्त्रीला तेथून हाकलून द्यावे.


अभंग क्र.१५३३
पुण्य उभें राहो आतां । संताचें या कारणें ॥१॥
पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥
संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥

अर्थ

आता संतांच्या पुण्याईने तूम्हाला पंढरीला जाण्याची इच्छा निर्माण होवो. त्यामुळे हे लोकांना तुम्ही पंढरीच्या वाटेला लागा म्हणजे तुम्हाला सर्वांचा सखा विठ्ठल भेटेल. तुम्हाला पंढरी क्षेत्राला जाण्याची इच्छा होलो याकरता बहुत जनांचा संकल्प कळवळा फळाला येवो. तुकाराम महाराज म्हणतात हे पुरुषोत्तमा बहुत लोक असे आहेत की ते पंढरीला येत नाहीत त्यांचेही तू अपराध क्षमा कर व त्यांचाहि तू उद्धार कर.


अभंग क्र.१५३४
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥१॥
प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥
केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥
तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या पराक्रमाची कीर्ती मी संतांच्या मुखातून ऐकली आहे आणि ती खरी देखील आहे त्यामुळे आता माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. देवा माझ्याकडून तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा करवुन घेतली त्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम अधिकच वाढले आहे. देवा मी तुम्हाला आतापर्यंत ज्या काही विनवण्या केल्या आहेत त्या सर्व तुम्ही पूर्ण केल्या व माझ्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझा हे प्रेमरस इतके चांगले आहे की त्यावरून माझे शरीर देखील मी ओवाळून टाकीन.


अभंग क्र.१५३५
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥
संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥
दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वेसी ॥२॥
निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळी ॥३॥

अर्थ

संतांच्या दर्शनाचा योग आला की त्यांची स्तुती करावी. संत हे स्वामी आहेत आणि संतांच्या ठिकाणी चित्त असावे. व त्यांच्या ठिकाणी वृत्ती अखंड असावी इतर कोणत्याही विषयांकडे वृत्ती फांको देऊ नये. दास्यत्व म्हणजे काय आहे तर संतांच्या ठिकाणी एकनिष्ठपणे काया, वाचा, मनाने राहणे याचे नाव दास्यत्व आणि आपण आपल्या जीव दशेने संताहुन भिन्न राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात मी निजबीजाचा अधिकारी आहे त्यामुळे मला जे पाहिजे ते मी त्यावेळी पेरू शकतो.


अभंग क्र.१५३६
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥
राहो अथवा मग जळो आगीमधीं । निवाड तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥
भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥
तुका म्हणे मज नाहीं जो भरवसा । तोवरी सहसा निवाड तो ॥३॥

अर्थ

पतिव्रतेने पती असताना एक शय्येवर झोपले आणि पती मेल्यानंतर त्याच्या चितेवर जाताना डोळे झाकले तर असे लक्षात येते की तिचे पतीवर प्रेम कमी होते व तिचा अधःपातही होतो, मग त्या स्त्रीने पतीच्या चीतेत उडी टाकू अथवा न टाकू तिचे पती विषय किती प्रेम आहे याचा निवाडा झालेला असतो. शत्रू रणांगणावर येण्याआधीच ज्याला भय वाटते अशा फादरधिटाला आपल्या हातातील शस्त्रे देखील ओझे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात संकटाच्या वेळी त्याचे धैर्य टिकते त्याची खात्री झाल्याशिवाय त्यांच्यावर मला भरोवसा ठेवता येत नाही.


अभंग क्र.१५३७
न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥१॥
भरीत्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥
कारणा पुरता । लाहो आपुलाल्या हिता ॥२॥
तुका म्हणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥३॥

अर्थ

परमार्थ धनाचे भांडार इतक्या प्रमाणात भरले आहे की त्याची कोणीही कितीही भजनादि, कीर्तनादी साठी वापर केला तरीही ते कधीच संपत नाही. जो याचा वापर करतो त्याचे पोट तर नक्कीच भरते परंतु पुढे जे वापर करणारे आहेत त्यांच्यासाठी ही हे परमार्थिक धन बाकी राहते व त्यामुळे आपले हित होण्यापुरते तरी हे धन मिळवण्याची घाई तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ हे धन मागण्याची इच्छा धारा म्हणजे तुमची मागणी पूर्ण होईल.


अभंग क्र.१५३८
तरी हांव केली अमुप व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥
जालों हरीदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥
जनावेगळें हें असे अभिनव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिवसीं स्वामी ॠणी ॥३॥

अर्थ

परमार्थामध्ये मी अतिशय धनवान व्हावा यासाठी मी परमार्थाचा मोठा व्यापार करत आहे. शूर शिपायाचा जसा निश्चय असतो त्याप्रमाणे मी ही परमार्थामध्ये हरिदास झालेलो आहे. हरीची प्राप्ती कशी करावी याचे वर्म मला संतांकडून समजले आहे पण हे परमार्थिक धन अलौकिक आहे, सर्वजोणां पेक्षा वेगळे आहे म्हणून ते प्राप्त करून घेण्याकरिता मी माझा जीव बळी दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे परमार्थिक धन प्राप्त करून घेण्यासाठी मी ज्यावेळी तयारीला लागलो त्याच वेळेपासून माझा स्वामी पांडुरंग माझा ऋणी झाला आहे.


अभंग क्र.१५३९
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥
तुम्हांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥
तुका म्हणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥

अर्थ

हे देवा तुला शरण आलेल्या दिन जणांचे दुःख तुझ्या वाचून दुसरे कोण हरणार आहे? हे जगदीशा त्रैलोक्यामध्ये उदाराचा शिक्का तुझ्या वाचून दुसर्‍या कोणाला आहे? देवा तुझ्या वाचून पाप आणि जन्म-मरणाचा ताप दुसरे कोण हरण करणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तां करिता मनापेक्षा ही वेगाने धाव घेणारा तुमच्या शिवाय दुसरा कोण आहे?


अभंग क्र.१५४०
ग्रंथाचे ते अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥
नाहीं भेद म्हणून भलतेचि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥-
तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥

अर्थ

दुष्ट लोकांना धार्मिक ग्रंथांचे अर्थ माहीत नाहीत पण ते केवळ विषय भोगण्या करिता असक्त झालेले असतात. असे हे लोक ‘जग एका परमात्मा पासून झाले आहे’ असे म्हणतात पण त्यांच्या मनाला येईल तसे ते वागतात. विधीचे कोणतेही बंधन ते मानत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे दुष्ट लोक जसे विषाला अमृत नाव ठेवले तरी विषाचा मूळ गुणधर्म विष सोडीत नाही त्याप्रमाणे त्यांना चांगले जरी म्हटले तरी ते चांगले होत नाही त्यांना पाप आणि पुण्य समजतच नाही.


अभंग क्र.१५४१
कायावाचामनें जाला विष्णुदास । कामक्रोध त्यास बाधीतना ॥१॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥
तुका म्हणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥

अर्थ

जे काया, वाचा, मनाने खरोखर विष्णुदास झालेले आहेत त्यांच्या चित्तामध्ये काम क्रोध कधीही बाधा करीत नाही. जो आपल्या मालकाचा विश्वास संपादन करतो तो आपल्या मालकावर ही सत्ता गाजवीतो व तो सेवक मालकाचे सर्व ऐश्वर्य देखील भोगण्यास पात्र होतो. तुकाराम महाराज म्हणतात जर आपले चित्त निर्मळ केले तर तेथे गोपाळ येऊन राहत असतो.


अभंग क्र.१५४२
येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काया ॥१॥
याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥ध्रु.॥
दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥
विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥

अर्थ

हे पंढरीच्या मायबाप तू माझ्या भेटीसाठी लवकर ये तुझ्या वाचून सर्व काही व्यर्थ शिण वाटत आहे आणि आता माझी काया म्हणजे शरीर देखील झाले क्षिण आहे. देवा माझी जात हीन आहे, माझी बुद्धिहीन आहे व माझा कर्म देखील हिन आहे त्यामुळे मी सर्व लज्जा सोडून तुला शरण आलो आहे. देवा तुम्हाला दीनानाथ, दीनबंधू, पतितपावन हि नामे शोभून दिसतात आणि तुमची ही ब्रिदे संपूर्ण जगामध्ये गाजलेली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा कटेवर कर ठेवून वीटेवर तू नीट उभा आहेस आणि आम्हाला तुझे हेच रूप आवडते व आम्ही त्याचं रुपाचे नित्य ध्यान करत असतो.


अभंग क्र.१५४३
हरीचे नाम कदाकाळी कां रे नये वाचे । म्हणतां रामराम तुझ्या बाचे काय वेंचे ॥१॥
पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दात खीळ ॥ध्रु.॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥२॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥

अर्थ

अरे हरीचे नाम कधीकाळी तुझ्या वाचे मध्ये का बरे तुला घेता येत नाही वाचेने राम राम म्हटले तर तुझ्या बापाचे काही खर्च होणार आहे काय? अरे तू पोटा करता रात्रंदिवस खटपट करतो आणि राम राम जर तुला म्हणायला लावले तर तुझी दातखिळी बसते. द्रव्य मिळण्याच्या आशेने तुला दहाही दिशा काम करण्यासाठी पुरत नाहीत पण किर्तनाला जाण्या करतात तुझ्या कायची म्हणजे शरीराची माती फार जड होते काय? तुकाराम महाराज म्हणतात या अशा जीवांना मी काय करू, जो मुखाने राम राम असे म्हणत नाही तो व त्याचे आई-वडील गाढवच आहेत म्हणजे तो गाढवाच्या पोटी जन्माला आला आहे असे समजावे.


अभंग क्र.१५४४
गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥१॥
तेथें करीन अंघोळी । उडे चरणरज धुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥
पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥२॥
तुका म्हणे धन्य जालों । संतसागरी न्हालों ॥३॥

अर्थ

संतांची साजिरी पाऊले म्हणजे गंगा रूप आहेत आणि ती आमच्या जवळ सहजच आले आहेत. ज्या ठिकाणी संतांच्या चरणाची धूळ उडत असते तेथे जाऊन त्या धुळीने मी स्नान करीन. संतां जवळ, त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ व सर्व पर्वकाळ येतात. मी संतांच्या चरणी धुळीने स्नान केले त्यामुळे माझे सर्व पाप पळाले नुसते पळाले नाही तर जळाले सुद्धा व जन्ममरणाचे दुःख नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी आज धन्य झालो कारण आज संत सागरामध्ये मी स्नान केले.


अभंग क्र.१५४५
आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥
घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥
वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभेचि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥२॥
धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥३॥
माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥४॥
नाहीं वाटितां सरलें । आहे तैसेचि भरलें । तुका म्हणे गेलें । वांयांविण न घेतां ॥५॥

अर्थ

पंढरीचा बाजार आमच्याजवळ आहे त्यामुळे आम्हाला सदासर्वकाळ सुखाचा सुकाळ आहे. तेथे वैष्णव राम नाम मुखाने घेण्याकरता नेहमीच सदावीत असतात त्यामुळे आपल्या शक्तीप्रमाणे रामाचे नाम घ्या पुढे काही बाकी ठेवू नका. तुमच्या आयुष्य भर ओसरल्या नंतर तुम्ही वर तोंड करून मराल त्यामुळे तुम्ही उशिर करू नका. पहिली खेप द्वारकेतून निघाली व पुंडलिका करता ती पंढरीमध्ये आली आणि तोच मला पंढरीत आल्या-आल्या पंढरीत विकला गेला व त्यातील थोडा भाग सानकांदिकांना सापडला. ही भूमंडळ धन्य धन्य आहे कारण येथे नामावळी प्रगटली आहे. आणि ज्यांना योगयागादी साधने करणे अशक्य आहे अशा दीनदुबळ्या भक्तांनी हरिनाम रूप नामावळी घेतली आहे व जी भक्त ही नामावळी घेत आहे ती सर्व कायमस्वरूपी सर्वांपेक्षा श्रेष्ठ होऊन राहिले आहेत. हरिनामाचे माप तुम्ही आपल्या हाताने मोजा, येथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आपले चित्त व्यापक बनवा आणि हित व्हावे यासाठी हरिनाम रुपी माल लागलेला आहे, तेवढा तुम्ही घ्यावा. तुकाराम महाराज म्हण


अभंग क्र.१५४६
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥
तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥
विक्षेपिलें धन । तेथें गुंतलेसे मन ॥२॥
नाशिवंतासाठी । तुका म्हणे करिसी आटी ॥३॥

अर्थ

एखादा हिशोब चुकला आणि तो हिशोब लवकर लागला नाही तर डोळ्यात तेल घालून तो हिशोब लावण्यात माणसे तल्लीन होतात. त्याचं तल्लीनतेने आपले हित व्हावे याकरिता आपले चित्त जागे करावे. एखाद्या माणसाने जमिनीत धन पुरून ठेवले तर त्याचे पूर्ण चित्त त्या धना जवळ लागलेलो असते त्याप्रमाणे आपले चित्त हरीच्या ठिकाणी तल्लीन करावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे नाशिवंता साठी तुम्ही किती आटा आटी करतात मग अविनाश हरि साठी प्रयत्न का करत नाहीत?


अभंग क्र.१५४७
करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥१॥
ऐसें जाणत जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥
प्रिया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥२॥
तुका म्हणे एका । हरीविण नाहीं सखा ॥३॥

अर्थ

जतन करून ठेवलेले धन कोणत्याही मनुष्याच्या मरणानंतर कामी आले आहे काय? अरे तु हे सर्व जाणत असून देखील न जाणता का होतोस. स्त्री पुत्र आणि बंधू यांच्याशी तुझा काहीही संबंध नाही. तुकाराम महाराज म्हणतात एका हरी वाचून तुझा कोणीही सखा नाही.


अभंग क्र.१५४८
आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥
आधीं करूं चौघाचार । मग सांडूं भीडभार ॥२॥
तुका म्हणे शेवटीं । तुम्हां आम्हां घालूं तुटी ॥३॥

अर्थ

देवा आम्ही तुला इतक्या कळवळ्याने हाक मारतो तरीही तू आमच्या हाकेला “ओ” का बरे देत नाहीस? हे नारायणा तू आमच्याशी काही बोलत नाहीस याचा अर्थ तू क्रियाहीन आहेस. आधी आम्ही तुझ्याकडे चार चौघे पाठवून देऊ आणि तुझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू आणि तरीही तू नाही ऐकलेस तर मग आम्ही तुझी कोणतीही भीडभाड ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मग शेवटचा पर्‍याय अाम्ही वापरू तो म्हणजे तुमचा आणि आमचा संबंधच आम्ही तोडून टाकू.


अभंग क्र.१५४९
नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥
जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥
चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥
तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां रोकडी गरज ॥३॥

अर्थ

एखाद्या व्यक्तीला केलेल्या उपकाराची जाणीव नसते मग नंतर त्याच्या वर कोणत्याही प्रकारचा उपकार करायचा नाही असे ठरवले जाते. पण देवा आम्ही तुझ्या भिडेने उपकाराचे कार्य करू. परंतु आम्ही जसजसा तुझा लौकिक सांभाळतो तसेतसे तू आम्हाला रडतोस देवा. आपल्या दोघातील भांडण मिटवायचे असेल तर आपण संतांकडे जाऊ मग संत आपले भांडण व आपल्या दोघांचाही निवडा रोखपणे करतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू निर्लज्ज आहेस पण आम्हाला तुझी गरज आहे.


अभंग क्र.१५५०
बहु होता भला । परि या रांडेनें नासिला ॥१॥
बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥
नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥
ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥३॥

अर्थ

देव पहिला फार चांगला होता पण याला मायारूपी रांडे ने पार बिघडवून टाकले. हा देव मायारूपी रांडे जवळ राहून राहून अनेक प्रकारचे रंग करण्याचे आणि खरेखोटे चाळे करण्याचे शिकला आहे. पूर्वी देवाला कोणी काहीच मागत नव्हते परंतु मायेने त्याला जगाचा ऋणी करून ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात देवाला कोणी काही मागायला गेले तर माया त्याला काही मिळू देत नाही उलट कोणी त्याच्याकडे काही मागायला गेले तर ती माया त्याच्या अंगावर धावून जाते.


अभंग क्र.१५५१
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥
नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥
होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥२॥
तुका म्हणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥३॥

अर्थ

आता काय करावे मायेमुळे आम्हाला काही बोलता येत नाही. देवाची एकांतात गाठ घ्यावी असे वाटते परंतु तेही आमच्या हातात नाही कारण देवाची माया आणि जीवाची अविद्या या गुणात आम्ही अडकलो आहोत. परंतु आता काहीही होवो देवाची आणि माझी गाठ होईपर्यंत भीड आणि लाज दोन्ही सोडून दिले पाहिजेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा आधी आम्ही मायेच्या तडाख्यातून मोकळे होऊ.


अभंग क्र.१५५२
केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळें धाकुटीं ॥१॥
न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥
अवघ्यांमध्यें एक वेडें । तोचि खेळवितो कोडें ॥२॥
तुका म्हणे मायबापा । मजवरी कोपों नका ॥३॥

अर्थ

देवा मी तुझे लाडके मुल आहे मी लाडाने तुझ्यापुढे वाटेल ती बडबड केली आहे. देवा नको ते मी माझ्या मुखाने बोललो बडबड केली पण त्याबद्दल मला तुम्ही क्षमा केली पाहिजे. घरांमध्ये सर्वात लहान मूल असते, त्याचे सर्व लाड करतात आणि जास्त लाड करतात. तुकाराम महाराज म्हणतात हे मायबापा मी तुम्हाला वाटेल ती बडबड केली पण मी तुमचे लहान लेकरू आहे माझी चूक पदरात घ्या, माझ्यावर तुम्ही राग धरू नका.


अभंग क्र.१५५३
शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥
आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥
हातीं प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥२॥
तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो ॥३॥

अर्थ

या देवाने मला बोलवण्याचे शिकवले आणि मी बोलत असतानाही त्याने माझे नवल, कौतुक केले. माझे बोल ऐकून देवाने स्वतःचीच करमणूक करून घेतली आहे, देवाने माझ्या हातात प्रेमाचा चांगला खाऊ दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रेमाने पांडुरंगाचा, या विठ्ठलाचा टाहो करत आहे त्यामुळे हा रुक्मिणी चा पती पांडुरंग माझ्याकडे पहात आहे.


अभंग क्र.१५५४
तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरीनामें ॥१॥
दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥
पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥३॥

अर्थ

आहो तेथेच सुखाची वस्ती आहे जेथे हरिभक्त वैष्णव आनंदाने हरिनाम घेऊन हरिनाम गातात व त्या छंदात नाचतात. तेथे दिंड्या असतात, गरुड चिन्हांकित पताका झळकत असतात आणि हरी नामाची गर्जना होत असते. दोषाला त्याठिकाणी मार खाण्याची वेळ आली आहे. त्या त्रासामुळे दोषाला त्याठिकाणी मार खाण्याची वेळ आली आहे आणि या त्रासामुळे दोष चारी दिशेला पळत सुटले आहेत. दोष परत माघारी येत नाहीत परत माघारी येण्याकरता शिल्लक ही राहत नाहीत. हा पंढरीचा राणा आपला देवपणा विसरून वैष्णवांच्या मेळ्यात कायम उभा असतो. निर्गुण स्वरूपाला कंटाळून देवाने वैष्णव करिता सुंदर गोजिरे रुप धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा या सुंदर गोजिर्‍या स्वरूपाला कितीही पाहिले तरी पोट भरत नाही. या सुंदर स्वरूपाला पाहण्याची भूक भुकेली राहते सुंदर गोजिरे स्वरूप असले तर मग कोणाला मुक्तीची आवड वाटते.


अभंग क्र.१५५५
शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥१॥
अरे तूचि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥
घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥२॥
सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥३॥

अर्थ

बरे झाले मी शुद्र वंशात जन्माला आलो त्यामुळे मी दंभाच्या मायेतून वाचलो. हे पंढरीनाथा आता तूच माझा माय बाप आहे मला वेदाक्षर घोकण्यास अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी सर्वभावे दिन आहे आणि जातीने देखील हीन आहे.


अभंग क्र.१५५६
वेडें वांकुडें गाईन । परि तुझाचि म्हणवीन ॥१॥
मज तारीं दिनानाथा । ब्रीद साच करीं आता ॥ध्रु.॥
केल्या अपराधांच्या राशीं । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥
तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥

अर्थ

देवा तुझे नाव माझ्या मुखाने जसे येईल वेडेवाकडे, कसे का होईना पण मी ते गाईनच आणि तुझाच स्वतःला म्हणून घेईल. हे दीनानाथा तु या भवसागरातून मला तार आणि आता तुझे ब्रीद खरे कर. देवा मी आज पर्यंत अनेक अपराध केले आहेत त्यामुळे मी तुझ्याजवळ आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू मला या भवसागरातून तार नाहीतर तू तुझे ब्रीद सोडून द्यावे.


अभंग क्र.१५५७
हरीभक्ती माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥
अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥
आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥
देइन आलिंगण धरीन चरण । संवसारशीण नासे तेणें ॥३॥
कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥
तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड ही वैकुंठीं नाहीं मज ॥५॥
आळसें दंभें भावें हरीचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥
काया वाचा मनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥
हरीचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणीवरी ॥८॥
तुका म्हणे तया उपकारें बांधलों । म्हणऊनि आलों शरण संतां ॥९॥

अर्थ

हरिभक्त माझे जिवलग सोयरे आहेत आणी मी त्यांची पावले माझ्या हृदयात धारण करीन. माझ्या अंतकाळी हेच हरिभक्त मला सोडवण्यासाठी धावत येतील. आणि मी त्यांना बसण्यासाठी माझी मस्त पुढे करील. या जगामध्ये मला वैष्णवांवाचून दुसरे कोणीही सोयरे नाहीत, सज्जन नाहीत. वैष्णवांना आलिंगन देऊन त्यांचे चरण मी धरीन त्यामुळे माझ्या सर्व संसाराचा शीण नाहीसा होईल. वैष्णवांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे कंठामध्ये हरीचे नाम आहे त्यामुळे ते मला या भवन नदीतून तारू शकतात. मी वैष्णवांच्या चरणाला मिठी घालीन आणि त्यांच्या चरणा वाचून मला वैकुंठाची ही इच्छा नाही. जे कोणी लोक आळसाने, दंभाने, भक्ती श्रद्धायुक्त भावनेने कोणत्याही वृत्तीने हरीचे नाम गातात ते माझे परलोकी चे सांगाती आहेत. मी माझ्या काया, वाचा, मनाने वैष्णवांना आलिंगन देईन त्यांच्यापुढे मला माझ्या जीवाचीही पर्वा नाही.


अभंग क्र.१५५८
लटिका तो प्रपंच एक हरी साचा । हरीविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥
लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरीविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥
लटिकिया वित्पत्ति हरीविण करिती । हरी नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥२॥
तुका म्हणे हरी हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठासी ॥३॥

अर्थ

हा प्रपंच लटिका आहे म्हणजे खोटा आहे. एक हरिनामाच सत्य आहे. आणि सर्व इंद्रिय हरविण व्यर्थ आहे. जर मुखामध्ये हरीचे नाम नसेल मनात हरीचे स्मरण नसेल तर मौन करण्याचे सोंग देखील खोटे आहे. आणि हरी वाचून इतर कोणतेही ध्यान करणे म्हणजे स्वप्न भ्रमा प्रमाणे मीथ्या नश्वर आहे. हरीच्या ज्ञानापासून इतर कोणतेही ज्ञान संपादन केले तरी, ज्याच्या चित्तामध्ये हरीचे स्मरणच त्याने संपादन केलेले ज्ञान काहीच उपयोगाला येत नाही आणि तो मनुष्य म्हणजे जिवंत असूनही प्रेताप्रमाणे आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात तू जर हरीचे नाम निर्धाराने धारण केले तर नक्कीच वैकुंठाला जाशील.


अभंग क्र.१५५९
सर्वस्वासी मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥
मोह ममता माया चाड चिंता । विषया कंदुव्यथा जाळूनियां ॥ध्रु.॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशाधडी ॥२॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥
तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥

अर्थ

ज्याला हरीला जिंकायचे आहे त्याने अर्थ, प्राण, जीव, देह सर्वांचा त्याग करावा. सर्व गोष्टीला जो मुकतो तोच हरीला जिंकू शकतो. मोह, ममता, माया, इच्छा, चिंता आणि विषय भोग, व्यथा जाळून लोकलज्जा, दंभ, अहंकार, मत्सर यांना देशोधडीला लावले. शांति, क्षमा, दया या मित्रांना विनंती करून चक्रपाणी हरीला बोलावून्या करिता मूळ पाठवावा. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही जातीचा, अक्षर अज्ञानाचा अभिमान टाकून द्या आणि संतांना शरण जावे.


अभंग क्र.१५६०
एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥
ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥
कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥
तुका म्हणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥

अर्थ

अर्थ:–हे देवा पांडुरंगा संसारापासून होणारे आघात चुकवून, त्याच्या अपेक्षांचे माझ्यावर होणार आघात चुकवून आता कृपा करून एकांताचे सुख माझ्या पदरात घाल. माझ्या ध्यानात निरंतर तुझे रूप असून माझ्या जिव्हेवर सतत तुझे नाम आहे जे मला तुझा विसर किंचितदेखील पडू देत नाही.ज्याप्रमाणे आई आणि तिच्या सानुल्याची भेट होताच दोघांच्या जीवाला सुख लाभते आणि या सुखाची त्याला आवड निर्माण होते तशीच गोडी तू देखील मला भेट देऊन दे. मी तुझी अपार कीर्ती ऐकून तुला शरण आलो आहे कारण शरणागताला तू पाठीशी घालतोस आणि तुझ्या दासाचे तू हित घडवून आणतोस हे मला ठाऊक आहे.


 

अभंग क्र.१५६१
लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥
लटिकाचि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाठी ॥ध्रु.॥
लटिकेचि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरीं । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥
तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिलाही ॥५॥

अर्थ

एखाद्या मनुष्याला हरिकीर्तनच प्रिय नसेल आणि त्याने कितीही ज्ञान संपादन केलेलो असेल, त्याने कितीही ध्यान केलेले असो ते सर्व लटिके म्हणजे खोटे आहे. अशा प्रकारचे दांभिक लोक स्वतःचे पोट भरण्याकरता पारमार्थिक दुकान टाकतात आणि लोकांची फसवणूक करतात. अशा मनुष्याने हरिकथा करत असताना त्याच्या हृदयात जर अष्टसात्विक भाव उत्पन्न होत नसेल तर त्याने कितीही वेद पारायण केले तरी ते व्यर्थच आहे. ज्या मनुष्याला कथेच्या वेळी आळस, निद्रा, झोप येते मनुष्याने कितीही जप-तप असो ते सर्व खोटे आहे. ज्याला हरीचे नाम आवडत नाही, ज्याची खरोखरच चित्तशुद्धी झालेली नाही त्याने आपल्या पारमार्थिकाचे वाटोळे केले आहे असेच जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही सांगतो आहे ते पुराने देखील गर्जून सांगतात आणि मागे झालेले श्रेष्ठ संत देखील हेच सांगतात.


अभंग क्र.१५६२
भूती भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥
ऐसी गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥
माझे तुझे हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांही फार । विचाराचि करणें ॥२॥
तुका म्हणे दुजे । हे तो नाही सहजे । संकल्पाच्या काजे । आपे आप वाढले ॥३॥

अर्थ

सर्व भूत मात्रामध्ये, भूत जीवनामध्ये हा भगवंत वसतो आहे असा भगवत भाव सर्वत्र असावा. देव भेदशून्य असून सर्व जगाला अधिष्ठान आहे. वेदवाणी देखील हेच सांगतात आणि पुराने देखील हेच गर्जून सांगताहेत. स्वतःच्या अनुभवाच्या बळावर सर्व संत देखील हेच गर्जुन सांगत आहेत. माझे आणि तुझे हाच विकार नाहीसा झाला की सर्वत्र एकच परमात्मा दिसतो. या वाचून दुसरा विचार करण्याची काहीच गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात मुळातः द्वैत नाहीच जिवाच्या संकल्पनेनेच द्वैत निर्माण होते व त्यामुळे पुढचे आपोआप वाढले जाते.


अभंग क्र.१५६३
नेणें फुंको कान । नाही एकांतींचें ज्ञान ॥१॥
तुम्ही आइकाहो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥
नाहीं देखिला तो डोळां। देव दाखवूं सकळां ॥२॥
चिंतनाच्या सुखे । तुका म्हणे नेणे दुःखें ॥३॥

अर्थ

कोणाच्या कानात गुरुमंत्र सांगण्याचे मला ज्ञाना नाही आणि एकांतात बसून मी ब्रम्‍ह आहे हे ज्ञान सांगण्याचे तर मी मानत नाही. तरीपण संतजन हो मी जे काही सांगत आहे ते तुम्ही श्रद्धापूर्वक एेका आज पर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिला नाही तो देव आम्ही तुम्हाला दाखवू. तुकाराम महाराज म्हणतात मी हरीचे अखंड नामचिंतन करतो त्यामुळे मी सुखी झालो व त्या सुखा मुळे मला कोणतेही दुःख माहित होत नाही.


अभंग क्र.१५६४
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥
मग जैसा तैसा राहे । कव्य पाहें उरले तें ॥ध्रु.॥
अंतरींचे विषम जाड । येऊं पुढें न दयावें ॥२॥
तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥

अर्थ

तुम्हाला त्याग करायचा असेल तर असा करा की जेणेकरून अहंकार नाहीसा होईल. मग तुम्ही ज्या स्थीतीत आहात त्याच स्थितीत रहा. अहंकार की एकदा नाहीसा झाला की खाली काय उरते ते साक्षी रूपाने पहा. अंतःकरणातील संस्कार पुढे येऊ देऊ नयेत. तुकाराम महाराज म्हणतात तुमचे मन शुद्ध व समाधानी पाहिजेत.


अभंग क्र.१५६५
मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥
देह विसरे आपुला । जवळीं घेतां शीण गेला ॥ध्रु.॥
दावी प्रेमभातें । आणि अंगावरी चढतें ॥२॥
तुका संतापुढे । पायीं झोंबे लाडे कोडे ॥३॥

अर्थ

मातेच्या चित्तामध्ये नेहमी बाळाविषयी विचार असतात. बाळाला जवळ घेतले की त्या मातेला आपल्या देहाचा विसर पडतो आणि तिचा सर्व शिण भाग नाहीसा होतो. आईने बालकाला प्रेमाने खाऊ दाखवला किती बालक तिच्या अंगावर लडीवाळपणे चढते. तुकाराम महाराज म्हणतात मी अगदी त्याप्रमाणे संतांचा बालक आहे व संत माझ्या आईप्रमाणे आहेत मी हे संतां पुढे लाडाने कोड कौतुकाने त्यांच्यापुढे झोंबतो आहे.


अभंग क्र.१५६६
कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥१॥
ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥
कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभ गा विठ्ठला ॥३॥

अर्थ

आज कोणते माझे असे पुण्य फळाला आले आहे की, मला संतांच्या चरणाचे दर्शन झाले. हे नारायणा मला हे काही समजत नाही कळत नाही परंतू माझ्यासारखा दीनांचा या संतांनी सांभाळ केलाय. आजचा कोणता असा शुभ दिवस आहे की मला संतांच्या चरणदर्शनाचा लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला मला एवढा मोठा लाभ कसा झाला हे तेच तुच मला सांग.”


अभंग क्र.१५६७
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥
एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश शुद्ध करी ॥ध्रु.॥
अधीक फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
तुका म्हणे राजहंस ढोरा नांवे । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥

अर्थ

जो मनुष्य आपल्याला मान मिळावा याची इच्छा करतो त्याच्या पदरी अपमान पडतो कारण अभागी मनुष्य कोठेही गेला तरी त्याच्याबरोबर अपयशच असते. एखादयाच्या अंगी एखादा चांगला गुण असला की त्याच्या अंगात एखादा वाईट गुणही असतो आणि अपेक्षेने पुढील नाश होतो हे सिध्द आहे. जास्त फळाची अपेक्षा केली तर ते कुठे लगेच प्राप्त होते आणि वासनेमुळे मनुष्याला भीक मागावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया पशूचे नाव जर राजहंस ठेवले तर त्या अलंकारिक नावाचे त्या पशूला काही उपयोग आहे काय ?”


अभंग क्र.१५६८
संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो ।करितां न सरे अधिक वाढ पाही ।
तृष्णा देशधडी केलों । भक्तीभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों।
मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥
आतां माझी लाज राखें नारायणा । हीन दीन लीन याचकाची ।
करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥
इंद्रियें द्वारें मन धांवे सैरे । नांगवे करितां चिंता कांही । हात पाय कान मुख लिंगस्थान ।
नेत्रद्वारें घ्राण पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय । क्षण एक स्थिर नाहीं ।
करिती तडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझें यास कांहीं ॥२॥
शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंते । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।
सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें ।
तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥३॥

अर्थ

हे ऋषीकेशा या संसारापासून माझी सुटका केव्हा होईल ते मला काही कळत नाही. देवा या भवसागरात मी सुटका होण्यासाठी जो जो प्रयत्न करतोय तो तो मी अधिकच त्यात गुंतत चाललो आहे आणि विषय भोगाच्या आशेने मला देशोधडीला लावले आहे. देवा तुझ्याविषयी भक्तीभाव तुझे भजन हे तर माझ्या ठिकाणी नाहीये त्यामुळे मी तुझ्या चरणाला अंतरलो आहे. या भवसागरात मला अनेक उपाधींनी पूर्णपणे वेढले आहे मला पुढे मागे होण्यासाठी थोडीशीही जागा शिल्लक राहिली नाहीये. हे नारायणा आता तूच माझी लाज राख मी तर सर्व गोष्टींनी हीन आहे दीन आहे म्हणूनच मी तुझ्या ठिकाणी लीन झालो आहे. त्यामुळे देवा माझ्यासारख्या याचकाला आता काय करावे ते कळत नाही माझे काही .


अभंग क्र.१५६९
नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥
ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥
नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥
हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३॥

अर्थ

उठता बसता हरीचे नाम घेतले असता संसाराचा संबंध तुटतो. अशा प्रकारचा महत्वपूर्ण लाभ तुम्ही आपल्या पदरात बांधा की ज्यामुळे विठ्ठलाच्या पायाची मिठी तुम्हाला पडेल. नामावाचून इतर कोणतेही साधन हरी प्राप्तीस नाही मग तू कोणतेही इतर प्रयत्न ककेले तरी ते व्यर्थच होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “याच करता मी सर्वांना हा‍क मारुन आरोळी देऊन सांगत आहे की, नाम घेतल्यावाचून कोणीही राहू नका.”


अभंग क्र.१५७०
प्राण समर्पीला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥१॥
माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥
जाला कंठस्फोट । जवळी पातलो निकट ॥२॥
तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥

अर्थ

हे स्वामी पांडूरंगा आम्ही तुला आमचे प्राण अर्पण केले आहे तरीही आमच्या भेटी करता तुम्ही एवढा उशीर का लावता आहात ? माझ्या सेवेचे उसने ऋण तुमच्याकडे आहे त्याची परतफेड तुम्ही तुमच्या भेटीने करा मनात कोणत्याही प्रकारचा भार राहू देऊ नका. देवा तुम्हाला आळवून आळवून माझा कंठ स्फोट झाला आता मी तुमच्याजवळ येऊन उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही जर आम्हाला भेटच दिली नाही तर तुमची सेवा करणे हे तरी कसे आम्हाला बरे वाटेल ?”


अभंग क्र.१५७१
येणें मार्गे गेले । त्याचे निसंतान केलें ॥१॥
ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥
नागविल्या थाटी । उरों नेदीच लंगोटी ॥२॥
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥

अर्थ

देवा जे या भक्तीमार्गाने गेले त्यांना तुम्ही निसंतान केले आहे. असा हा भक्तीमार्ग अवघड कठीण आहे पण आता हे कोणाला सांगावे ? आतापर्यंत या मार्गातील अनेक भक्तांना देवाने नागविले आहे त्यांच्याजवळ साधी लंगोटी देखील ठेवली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “तोच हा भक्तांचे सर्व काही चोरणारा चोर कटेवर कर ठेवून विटेवर उभा आहे.”


अभंग क्र.१५७२
जोवरी तोंवरी जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥
जोवरी तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥
जोंवरी तोंवरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥
जोंवरी तोंवरी शत्रुत्वाच्या गोष्टी । जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही ॥३॥
जोंवरी तोंवरी माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥

अर्थ

जंबूक म्हणजे कोल्हा तोपर्यंतच ओरडत असतो जोपर्यंत तो पंचानन म्हणजे सिंहाला पाहात नाही. समुद्र तोपर्यंतच गर्जना करतो जोपर्यंत तो अगस्ती ऋषींना पाहात नाही. वैराग्याच्या गोष्टी तोपर्यंतच बोलल्या जातात जोपर्यंत सुंदर स्त्री दृष्टीस पडत नाही. शौर्‍याच्या गोष्टी तोपर्यंतच बोलल्या जातात जोपर्यंत शत्रू समरांगणावर पाहिला जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “या दांभिक लोकांची माळ मुद्रांची भूषणे तोपर्यंतच आहेत जोपर्यंत माझी व त्यांची गाठभेट होत नाही.”


अभंग क्र.१५७३
जोंवरी तोंवरी शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥
जोंवरी तोंवरी शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥
जोंवरी तोंवरी सांगती संतपणाचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुकयासवें ॥३॥

अर्थ

गारा तोपर्यंतच शोभतील जोपर्यंत हिरा प्रकाशीत होत नाही. छोटे छोटे दिवे तोपर्यंतच शोभून दिसतात जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही. “तुकाराम महाराज म्हणतात, “काही लोक तोपर्यंतच संतसंगतीच्या गोष्टी सांगतील जोपर्यंतच माझी गाठ त्यांच्याशी होत नाही.”


अभंग क्र.१५७४
धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥
जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥
भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥
वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरीहरा ॥३॥
कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥
तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥

अर्थ

जगाचे पालन आणि संहार करण्याकरता पांडूरंगानेच दोन रुप धारण केले आहे ते म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू भगवान शंकर कोप धरुन संहार करतात तर भगवान विष्णू दयाळूपणाने पालन करतात. एकाच्या डोक्यावर जटा आहे तर एकाच्या डोक्यावर मुकूट आहे एक पार्वतीचा पती आहे तर एक कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. एकाने अंगाला भस्म लावला तर एक लक्ष्मीचा भोग घेत आहे याप्रमाणे भगवान शंकर आणि भगवान श्रीरंग विष्णू हे उभयरुपाने एकच आहेत. एकाच्या गळयात वैजयंती माळ आहे तर एकाच्या गळयात वासुकी दर्पाचा हार आहे. अशा प्रकारे हरी आणि हर यांचे अलंकार आहेत. भगवान शंकराच्या एका हातात नरकपाळ आहे काखेत झोळी आहे आणि ते स्मशानात वास करतात आणि विश्वंभर भगवान विष्णू सर्व जगतामध्ये निवास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही दोघेही एकरुपच आहेत आणि मी सर्व प्रकारचे संकल्पे बाजूला सारुन त्यांना शरण आलो आहे.”


अभंग क्र.१५७५
उचिताचा भाग होतो राखोंनिया । दिसती ते वांयां गेले कष्ट ॥१॥
वचनाची कांहीं राहेचि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥
विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥२॥
तुका म्हणे एकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥३॥

अर्थ

देवा मी तुमची सेवा तुमचे भजन किर्तन करण्याचा जो उचित भाग मोबदला होता तो राखून ठेवला होता आणि तो मला मिळणार असे मी गृहित धरले होते परंतू आता माझे सर्व कष्ट वाया गेले आहेत असे मला वाटते. देवा तुमचे वचन म्हणजे उध्दार करतो असे होते परंतू तुमचे हे वचन म्हणजे दुष्ट माणसाप्रमाणे खोटे ठरले. देवा तुम्ही मला आज उध्दार करतो उदया उध्दार करतो असे करुन करुन इथपर्यंत धीर धरायला लावला परंतू मी तुमच्यावर विश्वास ठेवला व तुम्ही माझा विश्वासघात करुन माझे घर बुडविले. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मला कोठेही थारा राहिला नाही आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असे तरी कसे म्हणावे ?”


अभंग क्र.१५७६
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥
खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥
सेवी भांग आफू तंबाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥
तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥

अर्थ

लांब लांब जटा वाढवून हातात कुबडी घेऊन ठिकठिकाणी भिक्षा मागत फिरतो आणि कोणी भिक्षा दिली नाही तर तेथून क्रोधाने चालता होतो मग अशा गोसाव्यांना परमार्थामध्ये काय लाभ होणार आहे ? याला चांगले चांगले अन्न खाण्याचा छंद लागलेला असतो आणि कोणी जर चांगले अन्न दिले नाही तर तो लोकांना शिव्याशाप देतो मग अशा तपस्व्याला भगवान शंकराचा बोध तरी कसा होणार. अशा माणसांना भांग अफू तंबाखू हे पुष्कळ प्रमाणात सेवन करणे चांगले वाटते आणि त्याच गुंगीत ते नेहमी असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “असा मनुष्य सर्वास्वाने बुडाला आणि त्याला पांडूरंग अंतरला आहे.”


अभंग क्र.१५७७
अवघीं च तीर्थे घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥
अवघीं च पापें गेलीं दिगंतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥
अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥
तुका म्हणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठलचि एक देखिलिया ॥३॥

अर्थ

चंद्रभागा एक वेळा जरी डोळयाने पाहिली तरी जगातील सर्व तीर्थे घडल्याचे पुण्य घडते. पृथ्वीवरील वैकुंठ म्हणजे पंढरी व पंढरिला डोळयाने पाहिले की, सर्व पापे नष्ट होतात. एक वेळा पुंडलिकाला दृष्टीने पाहिले तर जगातील सर्व संतांची भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एक वेळा विठ्ठलाला आत्मतत्वाने जर पाहिले तर जन्माला आल्याचे सार्थक होते.”


अभंग क्र.१५७८
आम्ही असो निंश्चिंतीनें । एक्या गुणें तुमचिया ॥१॥
दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम म्हणोनि ॥ध्रु.॥
नाहीं तुम्हां धांव घेता । कृपावंता आळस ॥२॥
तुका म्हणे विसरूं कांहीं । तुज वो आई विठ्ठले ॥३॥

अर्थ

देवा तुमच्या केवळ एका गुणामुळेच आम्ही निश्चिंतीने राहातो. तो सद्गुण म्हणजे तुमचे नाम आहे तुमचे नाम घेतल्याने अनेक महापापी दुराचारी तरले आहेत म्हणूनच आम्ही तुमचे नाम प्रेमाने घेत आहोत. हे कृपावंता तुमचे नाव घेतले की तुम्ही कोणत्याही प्रकारचा आळस न करता आमच्याकडे धावत येतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझे आई विठ्ठले तुला मी कसा बरे विसरेन ?”


अभंग क्र.१५७९
अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥
कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥
जातीऐसा दावी रंग । बहु जग या नाव ॥२॥
तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥

अर्थ

मी जे काही बोलत आहे ते माझ्या अंतरंगातील ध्यान आहे आणि त्याच्याच अनुभवाने मी बोलत आहे. अंतरंगातून आलेला अनुभव आणि नुसता वरवरचे शाब्दिक ज्ञान यामध्ये फरक आहे म्हणजे नुकतीच व्यालेली गाय तिच्या सुरवातीला स्तनातून निघलेला चीक आणि नंतर निघलेले दूध हे दोन्ही जरी पांढरे असले तरी दोघांच्याही चवीमध्ये फरक असतो. अनेक जातीचे लोक असतात ते विविध रंगाचे असतात व विविध गुणधर्माचे असतात व हे सर्व मिळून जे तयार होते त्याचेच नाव जग असते जग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “काजव्याचा प्रकाश हा फक्त त्याच्या ढुंगणाभोवतीच असतो त्याप्रमाणे वरवर शब्दज्ञान हे फक्त मर्‍यादापुरतेच असते आणि अंत:करणापासून आलेला अनुभव हा जगमान्य असतो.”


अभंग क्र.१५८०
परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥
दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥
अनाचार कांहीं न साहे अवगुण । बहु होय मन कासावीस ॥२॥
तुका म्हणे माझी एकविध सेवा । विन्मूख तो देवा वाळी चित्तें ॥३॥

अर्थ

सर्व विश्वामध्ये हा विश्वंभर सामावलेला आहे त्यामुळे एखादयाने जर कोणालाही त्रास दिला तर तो आमचा शत्रू आहे. आम्ही त्याला बळाने दंड करु त्याचा त्याग करु त्याचे तोंड आम्ही डोळयाने पाहाणार देखील नाही आणि त्याचा इतका त्याग करु की, त्याला चांडाळाप्रमाणे दूर ठेवू. अनाचार आणि अवगुण या दोषाने जे वागतात मला ते सहन होत नाही आणि त्यांना पाहिले की, माझे मन प्रचंड कासावीस होते. तुकाराम महाराज म्हणतात की, “माझे देवाविषयी एकविध एकनिष्ठ सेवा आहे आणि जो देवाशी विन्मुख राहातो त्याला मी मनापासून वाळीत टाकले आहे.”


अभंग क्र.१५८१
कांहीं न मागे कोणांसी । तोचि आवडे देवासी ॥१॥
देव तयासी म्हणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥२॥
नाहीं नाहीं त्यासमान । तुका म्हणे मी जमान ॥३॥

अर्थ

जो कोणत्याही प्रसंगी कोणालाही काहीच मागत नाही तो देवाला आवडतो. त्यालाच देव म्हणावे आणि त्याच्या चरणी लीन व्हावे. ज्याच्या मनामध्ये सर्व भूतमात्रांविषयी दया असते त्याच्याच घरी चक्रपाणी वास्तव्य करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याच्या समान या जगामध्ये दुसरा कोणीच नाही त्याला मी जामीनदार आहे.”


अभंग क्र.१५८२
नाम उच्चारितां कंठी । पुढें उभा जगजेठी ॥१॥
ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥
ब्रह्मादिकां ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥
तुका म्हणे सार घ्यावें । मनें हरीरूप पाहावें ॥३॥

अर्थ

आपल्या वाणीने आपल्या कंठाने हरीचे नामोच्चार केले असता तो जगजेठी हरी आपल्या पुढे उभा राहातो. अशा प्रकारचीच भावना मनात धरुन हरीनाम चिंतन करावे. जो देव ब्रम्हादिक देवांच्या लवकर ध्यानी येत नाही तोच देव नामसंकीर्तनाच्या साधनाने सहज साध्य होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व साधनाचे जे सार आहे ते म्हणजे हरीनाम आहे ते हरीनाम आपल्या वाणीने घ्यावे आणि मनाने असा विचार करावा की आपण हरीरुपच झालो आहोत.”


अभंग क्र.१५८३
आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूंचि ॥१॥
आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥
प्रल्हाद महासंकटीं रक्षिला । तुम्ही अपंगिला नानापरी ॥२॥
आपुलेंचि अंग तुम्ही वोढविलें । त्याचें निवारलें महादुःख ॥३॥
तुका म्हणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥४॥

अर्थ

हे देवा अडलेल्या लोकांना तूच साहाय्य करतोस आणि आंधळया माणसांच्या हातातील काठी तूच होत असतो त्यांना मार्गदर्शनही तूच करतोस. हे नारायणा जे भक्त अडलेले आहेत पीडलेले आहेत गांजलेले आहेत त्यांचा तूच कैवारी होतोस. देवा तुमचा भक्त प्रल्हाद अनेक प्रकारच्या संकटात महासंकटात सापडला त्याचे रक्षण तुम्ही केले व त्याचा अंगीकार केला. प्रल्हादावर… अनेक प्रकारचे महादु:ख ओढावून आले परंतू तुम्ही ते सर्व दु:ख स्वत:च्या अंगावर ओढून घेतले व त्याच्या सर्व महादु:खाचे निवारण केले. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझे जननी विठाबाई तुझ्या कृपेचा अंत:पार नाही.”


अभंग क्र.१५८४
तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥
म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हेचि करी ॥ध्रु.॥
पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥

अर्थ

तपश्चर्‍या करावी असे वाटते परंतू माझे मन इंद्रियांची संगत करतात व काम क्रोधादी विकार निर्माण करुन माझा घात करु पाहतात. म्हणूनच मला किर्तन हे माध्यम आवडले आणि आता सर्व प्रकारची लाज सोडून मी हेच करीत आहे. मी वेदशास्त्र हे पाहिले त्यांचाही शोध करुन पाहिला परंतू त्यांच्यातही मला एकवाक्यता मिळाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा केवळ नाम या साधनेतच मला कोणताही विकार दिसला नाही त्यामुळे विठोबाचे नामच सर्व साधनांचे सार आहे.”


अभंग क्र.१५८५
गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण ॥१॥
भूतीं नारायण खरा । आप तैसाचि दुसरा ॥ध्रु.॥
न कळतां दोरी साप । राहूं नेंदावा तो कांप ॥२॥
तुका म्हणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥३॥

अर्थ

एखादया मनुष्याने गुरु व्हावे आणि त्याने दुसऱ्याला शिष्य करुन घ्यावे हे अधमपणाचे लक्षण आहे. सर्व भूतमात्रांमध्ये एक नारायण खरा आहे त्यामुळे जसे आपण आहोत तसेच दुसराही आहे. दोरी पडली की दोरीचे ज्ञान न होता सर्पाचा भास होतो व त्यामुळे भय उत्पन्न होते आणि ते भय नाहीसे करुन घ्यायचे असेल तर दोरीचे ज्ञान करुन घेणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “लोकांचे गुणदोष पाहण्याच्या छंदात पडू नये सर्वत्र एक नारायणच आहे हा विचार करावा.”


अभंग क्र.१५८६
अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥
अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥
ब्रम्हहत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥
तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥३॥

अर्थ

ज्याचा अंगीकार नारायणाने केला ते जगात निंदनीय जरी असले तरी त्याने त्यांना वंदय केले. उदाहरण दयायचे म्हटले तर अजामेळ भिल्ल शबरी गणिका वेश्या हे जरी पापी होते तरीही तुम्ही त्यांना तारले त्यांना वंदय केले हे तर प्रत्यक्ष पुराणात सांगितलेले आहे. ब्रम्हहत्याची रासच ज्याच्या हातातून घडली ज्याने अनेक महापातके केले अशा वाल्मिकीचा देखील तुम्ही उध्दार केला त्याला सर्वत्र वंदय केले. तुकाराम महाराज म्हणतात, “या नारायणाने या सर्वांचा अंगीकार केला कारण येथे केवळ तुझे नाम भजन प्रमाण आहे बाकीचा मोठापणा काय जाळायचा आहे काय ?”


अभंग क्र.१५८७
अविट हें क्षीर हरीकथा माउली । सेविता सेविली वैष्णवजनीं ॥१॥
अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरे ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गायनाची ॥४॥
तुका म्हणे केलीं साधना गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥५॥

अर्थ

हरीकथा माऊली हे कधीही न नाशणारे दूध आहे आणि वैष्णवजन याच दुधाचे सेवन करतात आणि पुन्हा पुन्हा भूक लागली की तेच सेवन करत असतात. या हरीकथा माऊलीच्या ब्रम्हानंदरुप दुधापुढे अमृत देखील मागे राहिले आहे. कोणी कितीही पतित पातके असोत ते हरीकथा पंगतीत बसले की पंगती पावन होतात आणि देवासारखे चतुर्भूज होतात. जेथे वैष्णवांचे दाटने म्हणजे गर्दी असते तेथे सर्व प्रकारचे सुख मोहोरत असतात. हरीकथा गायनाची आवड या देवाला असल्यामुळे तो निर्गुण असलेल्या देवाने सगुण गुणवंत रुपाचे सोंग घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या देवाने सर्व साधनांची गाळणी करुन हरीकथा हे एक साधन सर्वश्रेष्ठ ठरवले आहे व त्यामुळेच हरीकथा किर्तनामध्ये हा देव प्राप्त होणे सोपे झाले आहे.”


अभंग क्र.१५८८
धनवंता घरीं । करी धनचि चाकरी ॥१॥
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावेंचि घर ॥ध्रु.॥
रानी वनी द्वीपी । असती तीं होती सोपी ॥२॥
तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥३॥

अर्थ

धनवंताच्या घरी धनच त्याची चाकरी करतो. घरी बसल्या बसल्याच त्याचा सर्व व्यवहार आपोआप होतो घर सोडून कोठेही त्याला जावे लागत नाही. धनवंत माणसाला कोणतीही वस्तू लागत असेल मग ती रानात वनात परदेशात कोठेही असो तरी ती धनाच्या जोरावर मिळणे सोपे असते. तुकाराम महाराज म्हणतात, “धनवंताला कोणतीही वस्तू लागू दया त्या वस्तूची जर भरपूर किंमत दिली तर ती मिळणे अवघड नाही.”


अभंग क्र.१५८९
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
केला ॠणी नारायणा । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥
घालोनियां भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचनासाठी । नाम कंठीं धरियेले ॥३॥

अर्थ

हरीच्या ठिकाणी अनन्य भक्तीभाव ठेवला की मोठे भाग्य होते आणि त्याविषयी माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, “भक्तीभावाच्या जोरावर मी नारायणाला ऋणी केले आहे आणि त्यामुळे तो माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळा राहात नाही. मी माझ्या सर्व योगक्षेमाचा भार त्याच्या माथ्यावर घातला असून त्यामुळे माझी सर्व चिंताच नष्ट झाली आहे.” तुकाराम महाराज म्हणतात, “वेदशास्त्रात पुराणात तसेच पूर्वीच्या संतांनी सांगितले आहे की, हरीचे नाम घेतल्याने हरी तुमचा ऋणी होईल त्यामुळे मी कंठात हरीनाम धारण केले आहे.”


अभंग क्र.१५९०
देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भीक्ष ॥१॥
नेणती हा करूं सांटा । भरले फाटा आडरानें ॥ध्रु.॥
वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥
तुका म्हणे मन मुरे । मग जें उरे तेंचि तूं ॥३॥

अर्थ

देव सर्वत्र आहे सर्व देशामध्ये व्यापलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र सुकाळ आहे पण अभागी मनुष्याला देव दुर्भिक्ष आहे असे वाटते म्हणजे त्याची समजूत अशी असते की देव कोठेच नाही. देव सर्वत्र आहे असे जे मानत नाही ते भ्रमाच्या जाळयात गुंतून आड रानात भटकत राहात असतात देवाने हे विश्वरुपी घर वसविले आहे व त्यामध्ये तो राहातोही परंतू त्याचा शोध आजपर्यंत कोणालाही घेता आला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी तुझे मन मरते म्हणजे तुझ्या मनाची वृत्ती नष्ट होते त्यावेळी जे स्वरुप उरते तेच तुझे खरे सत्य स्वरुप आहे व देवाचेही तेच खरे सत्य स्वरुपच आहे.”


अभंग क्र.१५९१
खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥
आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥
बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सारे करायाची ॥२॥
तुका म्हणे माझी निंश्चितीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥३॥

अर्थ

दोरी खुंटीला बांधली व वावडी आकाशात मोकळी जरी सोडून दिली तरी दोरीमुळे ती वावडी आपल्यापाशी परत येत असते. जो मालाचे रक्षण करतो त्याचा माल चोरी जात नाही त्याप्रमाणे जेवढे कर्ज दयायचे असेल त्याच किमतीची वस्तू गहाण ठेवून कर्ज दिले तर त्याचे पैसे बुडत नाही. शेतामध्ये बीज नेले ते पेरले तर अंकुर येणार परंतू त्याचे त्या अंकुराची फलप्राप्ती होण्याकरीता त्याचे जतन करणे हे मुख्य सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमची सेवा मी निश्चिंत मनाने करत आहे आणि त्या सेवेमुळेच मी तुम्हाला व मला वेगळे उरु दिले नाही.”


अभंग क्र.१५९२
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥
कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥
यज्ञमुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥
तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥

अर्थ

वेद इतका शहाणा आहे तरी देखील त्याने हरीचे वर्णन करण्याविषयी मौन धरले आहे परंतू त्या ताक पिणाऱ्या गोपी प्रत्यक्ष हरीविषयी हरीसोबत राहून त्याचा सुख भोगत आहेत. येथे असे कसे आणि तेथे तसे कसे हे फक्त शहाणे संतच जाणतात. यज्ञाव्दारे देवाला प्राप्त करुन घेण्यासाठी देवाला संतोष करण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात परंतू त्यामध्येही देव चूक काढतो परंतू भिल्लीणीचे उष्टे बोरे सुध्दा त्याला गोड वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाला प्राप्त करुन घेण्याचे एकच वर्म आहे ते म्हणजे देवाविषयी श्रध्दायुक्त भक्तीभाव असणे आणि भक्तीभावावीण कोणतेही कर्म देवाच्या प्राप्तीसाठी केले तरी ते व्यर्थ क्षीणच होतात.”

३४५९(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)@
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥@
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ध्रु.॥@
क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥@
मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥@
स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥@
तुका म्हणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥


अभंग क्र.१५९३
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥
या रे या रे हातोहातीं । काम माती सारावी ॥ध्रु.॥
रोजकीर्द होतो झाडा । रोकडाचि पर्वत ॥२॥
तुका म्हणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥

अर्थ

परमार्थाची इमारत बांधणारे आम्ही मजूर आहोत आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला हा देव प्रेमरुपी मोल भरपूर प्रमाणात देतो आणि सर्वांना प्रेमरुपी मोल देऊनही त्या दात्याच्या भांडारामध्ये भरपूर प्रेमरुपी मोलाचा साठा जसाच्या तसा राहातो. जेवढे कोणी परमार्थिक मजूर असतील ते सर्व येथे या आणि सर्व संसारावरची माती बाजूला सारण्याचे काम करा. येथे रोज जमाखर्चाची नोंद होत असते त्यामुळे जो कोणी जेवढी सेवारुपी मजूरी करेन तेवढे त्याला प्रेमरुपी मोल मिळेल आणि एवढे मोल वाटून देखील त्या दात्याजवळ पर्वताएवढे प्रेमरुपी मोल शिल्लकच राहाते. तुकाराम महाराज म्हणतात, “या परमार्थरुपी इमारतीचा खूप शरीरकष्ट करून पाया खोल नेऊ.”


अभंग क्र.१५९४
स्मशानीच आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥
नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥
झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुह्मीं केलें ॥२॥
तुका म्हणे आतां पाहे अनुभव । घेईन हातीं जीव पांडुरंगा ॥३॥

अर्थ

देवा स्मशानामध्ये मला चितेवर जरी झोपवले तरी मला गादीवर झोपल्यासारखे वाटावे मग हेच कार्य कौतुक आणि हीच तुमची खरी कृपा आहे असे मी समजेन. नाहीतर केवळ देह तादात्मे सुटावे असे शब्द वापरणे म्हणजे केवळ पोकळ बडबड करणे हे व्यर्थ होय. ज्यावेळी सर्व झाडे झुडपे जीव पाषाण हे सोयरे होतील त्यावेळेस तुमचे माझ्यावर कृपादान झाले असे मला वाटेन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पांडुरंगा मी माझा जीव माझ्या हातात धरुन एवढीच वाट पाहात आहे की मला हा अनुभव केव्हा येईन.”


अभंग क्र.१५९५
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥
लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥
उभारिला कर प्रसिद्ध या जगे । करूं केला त्याग मागें पुढें ॥२॥
तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊं दान एक वेळा ॥३॥

अर्थ

आमचा सर्वात मोठा लाभ म्हणजे विठोबाच्या चरणाचे चिंतन करणे होय. ज्याला हा लाभ प्राप्त करुन घ्यायचा असेल त्याने त्याच्या आवडीनुसार जितका पाहिजे तितका घ्यावा. जगामध्ये या लाभाची प्रसिध्दी करण्याकरताच मी माझे हात उभारुन सर्वांना सांगतो आहे आणि यामागेही मी सर्वस्वाचा त्याच्यामुळेच त्याग केला आहे व पुढेही करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “परमार्थामधले दारिद्रय ज्यामुळे कायमचे नष्ट होईल अशा प्रकारचेच दान आम्ही सर्वांना एकदम देऊन टाकू.”


अभंग क्र.१५९६
दधिमाजी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥
अग्नी काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥
तुका म्हणे सुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥

अर्थ

दह्यामध्ये लोणी आहे हे सर्व लोक जाणतात परंतू दह्याचे मंथन करण्याचे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच ते लोणी काढता येते. काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे हे सर्वांना माहित आहे परंतू त्याचे मंथन केल्यावाचून घर्षण केल्यावाचून अग्नी लाकडाला कसा जाळू शकेन ? तुकाराम महाराज म्हणतात, “दर्पणाला म्हणजे आरशाला स्वच्छ केल्याशिवाय मुखाचे प्रतिबिंब कसे दिसेल ? त्याप्रमाणे आत्मा देहात आहे परंतू त्याचे मंथन केले तरच आत्म्याचे ज्ञान होते.”


अभंग क्र.१५९७
नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥
सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

अर्थ

हे मना तू प्रपंचाच्या मोहजाळात मायाजाळामध्ये गुंतू नकोस तुला गिळून टाकण्याकरता काळ जवळ आला आहे. ज्यावेळी तुझ्यावर काळाची झडप पडेल तेव्हा तुला त्याच्यातून तुझे मायबाप देखील सोडवणार नाहीत. त्यावेळी तुला देशाचा राजा चौधरी आणि इतरही तुझे मोठे मोठे नातेवाईकही सोडविणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “एका चक्रपाणीवाचून तुला त्यावेळी कोणीही सोडविणार नाहीत.”


अभंग क्र.१५९८
पुढें जाणें लाभ घडे । तेंचि वेडे नासती ॥१॥
येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥
होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं ते ॥२॥
तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥

अर्थ

एखादया सत्कर्माने पुढे लाभ होणार आहे हे माहित असले तरी हे वेडे लोक त्याचा नाश करतात. अंधारामध्ये विष घ्यायचे आणि कोणाला कळूही देखील दयायचे नाही एवढा कोठे आत्मघातकीपणा असतो काय ? पुढे होणा-या घटनाला अनुसरुनच कर्म करण्याची बुध्दी आपोआप तयार होते व असे कर्म करु नये अशी सावधगिरी ठेवण्याची शुध्दही त्यावेळी राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “असे अनेक लोक आहेत की जे स्वत:ला शहाणे समजतात व अनेक प्रकारचे सोंग लोकांमध्ये दाखवतात अनेक प्रकारचे रंग दाखवतात.”


अभंग क्र.१५९९
ऐका गा हे अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावा ॥ध्रु.॥
नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥२॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥३॥
कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥
तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥

अर्थ

मी सर्व लोकांना हे सांगत आहे की आपले मन शुध्द करा यानेच आपले हित होणार आहे. प्रत्येक वेळी मन शुध्द करुन राहाता येत नसले तरी देखील वेळप्रसंगी सावधान राहावे. कारण तुमच्याबरोबर कोणीही येत नाही केवळ तुमचे संचित कर्मच तुमच्याबरोबर राहाते. काळाने आणखी तुमच्यावर झडप घातलेली नाही त्यामुळे तुम्हाला अजून बराच अवकाश आहे व या कारणामुळे तुमचे सर्व इंद्रिय परमार्थ मार्गाला लावा. ही कर्मभूमी अशी आहे आपण येथे जे प्रयत्न करु ते घडू शकते अशा महिमा या कर्मभूमीचा आहे त्यामुळे आपल्या हिताचा जो व्यवसाय आहे तो “परमार्थ” करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला हा मोठा लाभ आहे त्यामुळे आपण या नरदेहाचा उपयोग परमार्थ करण्याकरता करावा कारण हा देह घडीघडीने वाया जात आहे याचा विचार करावा.”


अभंग क्र.१६००
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥
ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥
संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥

अर्थ

संतसेवा रण्याकरता जो अंग चोरतो म्हणजे कंटाळा करतो अशा अधम व्यक्तीवर माझी दृष्टी देखील पडू नये. अशा दुष्ट माणसाची रांड आई तिने याला जन्मच का दिला असेल तिचे तोंड जळून जावो. संतांच्या चरणी भक्तीभाव ठेवला की देव आपोआप भेटतो. तुकाराम महाराज म्हणतात, “संतसेवा करणे हाच माझा पूर्वजांचा ठेवा आहे.”


सार्थ तुकाराम गाथा 1501 – 1600

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *