सार्थ तुकाराम गाथा 1401  ते 1500

सार्थ तुकाराम गाथा 1401  ते 1500

सार्थ तुकाराम गाथा 1401  ते 1500


अभंग क्र.१४०१

भाग्यवंता हेची जोडी । परवडी संतांची ॥१॥
धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥
जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांठवणें ॥२॥
तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥३॥

अर्थ

जे खरच भाग्यवंत आहेत त्यांना संत संगती हाच मोठा लाभ आहे असे वाटते. त्या भक्तांना असे वाटते की, अभंग असणारे म्हणजे कधीही न संपणारे पांडुरंग रूपी धन आपल्या घरी असावे. हा लाभ इतर लोकांपेक्षा ही वेगळा आहे हा लाभ साठविण्यासाठी आकाश देखील कमी पडते. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग आणि संत यावाचून दुसरी कोणतीही अपेक्षा विष्णुदासांना नसते.


अभंग क्र.१४०२
जरी आलें राज्य मोळविक्या हाती । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥
तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥
वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥
तुका म्हणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥

अर्थ

एखाद्या मोळी विक्या माणसाच्या हाती राज्य जरी आले तरी त्याला आपला पूर्वीचाच धंदा चांगला आहे असेच वाटते. त्याप्रमाणे संसारी मनुष्याला सुंदर नरदेह जरी मिळाला तरी तो त्या नरदेहाच्या तृष्णेचा मजूर होऊन बसतो. त्याला विश्रांती काय आहे हे माहीत नसते त्यामुळे त्याच्या हवेने हाव व कामाने काम वाढतच जाते घरी कितीही सुख असले तरी श्रीमंती असली तरीही तो त्याचा भोग घेत नाही. उलट मिळालेल्या भोगाला काही विघ्ने येतील की काय म्हणून तो नेहमी चिंता करतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला नेहमीच मरणाचे भय वाटते व तो त्याच्यावर कायम उपायही करत असतो.


अभंग क्र.१४०३
कोण होईल आता संसारपांगिले । आहे उगवले सहजचि ॥१॥
केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥
सहजचि घडे आतां मोळ्याविण । येथें काय सीण आणि लाभ ॥२॥
तुका म्हणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥३॥

अर्थ

माझे संसाराचे बंधन केंव्हाच चुकवलेले आहे त्यामुळे कोण या संसाराच्या आधीन होईल? हा प्रपंच ज्या हरीने निर्माण केला आहे तोच हरी हा प्रपंच चालवेल. प्रपंचात काय मिळणार आहे आणि प्रपंचात कोणाशी देणे-घेणे होणार आहे हा प्रपंच सहज घडत आहे त्यामुळे काही लाभ आणि नुसकान झाले तरी काही दुःख मानण्याचे काय कारण आहे? तुकाराम महाराज म्हणतात मी या प्रपंचाला सहज पाहत आहे आणि हा प्रपंच मिथ्य आहे हे हरीने मला दाखविले आहे.


अभंग क्र.१४०४
आम्हां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥१॥
परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥
अभयदान वदें । आम्हां कैंचीं द्वंदें ॥२॥
तुका म्हणे आम्ही । हरीजन साधनाचे स्वामी ॥३॥

अर्थ

आम्ही या हरीला शरण गेलेलो आहोत त्यामुळे आम्हाला एवढी चिंता करण्याची काय गरज आहे ? त्यामुळे मी या प्रपंचातील सर्व खेळ कौतुकाने पाहात आहे. या हरीने आम्हाला अभयदान दिले आहे की तू भिऊ नकोस त्यामुळे आम्हाला लाभ आणि हानी या द्वंद्वाचे भय कसले ? तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही हरीचे सेवक आहोत आम्ही हरीजण आहोत त्यामुळे हरीभजन करणे या साधनेचे आम्ही पात्र आहोत.”


अभंग क्र.१४०५
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥
नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावी तीं ॥२॥
तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥३॥

अर्थ

हरी भक्ताने नेहमी देवाचीच चाड म्हणजे आवड धारावी वेद आणि संत यांना प्रमाण धरून इतर कोणत्याच निषिद्ध कर्माकडे चित्त जाऊ देऊ नये. वाईट कर्म करणाऱ्या माणसांजवळ उभे सुद्धा राहू नये आणि ते कोणाची निंदा करत असतील तर जसे कुत्रे भुंकतात तसेच ते आहेत असे समजावे व त्यांचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात जर साधका जवळ “क्षमा” नावाचे शस्त्र असले तर दुर्जन मनुष्य त्या पुढे काय टिकणार आहे आणि एवढे प्रबळ शस्त्र साधका जवळ असेल तर त्याने दुखी का व्हावे?


अभंग क्र.१४०६
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥
करिती आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥
दया संतां भांडवल । वेची बोल उपकार ॥२॥
तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥३॥

अर्थ

दुष्ट मनुष्याची दृष्टीने नेहमीच नीच असते त्यामुळे तो संतांची निंदा करून त्यांना दुखी करतो. संत आणि दुष्ट हे दोघेही आपापल्या परीने व्यवहार करतात संतां जवळ “दया” नामक भांडवल आहे. ते जरी इतरांना बोलले तरी दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठीच ते बोलत असतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा व्यवहार हा ज्याच्या त्याच्या नुसार ज्याला त्याला चांगलाच वाटतो परंतु फरक फक्त एवढाच आहे की दुष्टांचा व्यवहार त्यांना नंतर दुःख देत असतो तर संतांचा व्यवहार त्यांना सुख देत असतो.


अभंग क्र.१४०७
जग ऐसें बहुनांवें । बहुभावें भावना ॥१॥
पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥
कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥२॥
तुका म्हणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥३॥

अर्थ

त्रिविध गुण, अनेक नावे, अनेक रूपे ज्या ठिकाणी आहे त्याला जग म्हणतात. त्यामुळे इतर काही पाहू नये, जास्त बोलू नये आणि जे सत्य आहे त्याचे रक्षण करावे. जगामध्ये उदार निर्वाहा पुरताच व्यवहार करावा किंवा आपले जे मुख्य कार्य आहे (हरी प्राप्ती) या कार्‍याचे कारण हरिभक्ती चेच जतन करावे. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही तुम्हा संत जणांना सांगितले आहे तेच तुम्ही जतन करा.


अभंग क्र.१४०८
निघाले ते आगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥
पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥
धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥
अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥

अर्थ

देवा मी आता ज्या अग्नीतून( संसार अग्नीतून) बाहेर निघालो आहे ते मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतील पण तसे तुम्ही होऊ देऊ नका. देवा ते सर्वदूर फेटाळून लावावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. देवा तुमच्या ब्रिदाचे म्हणजे पतितपावन या ब्रिदाचे तुम्ही रक्षण करा व तुम्ही ते कृतीत आणा आणि माझा उद्धार करा, मी अजून इथेच आहे म्हणजे प्रपंचात. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी सर्व लोकांना भिऊन सर्वांपेक्षा वेगळा राहून अबोला राहिलो आहे.


अभंग क्र.१४०९
आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी पडिलों ॥१॥
तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥
मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥
तुका म्हणे करुणाकरा । तूं सोयरा दिनांचा ॥३॥

अर्थ

देवा मी निर्जन वनात पडलो आहे तरी पण अशा वेळी माझ्या मनात तुमच्या वाचून कोणीच नाही. मी तुमची वाट पाहत आहे आणि माझी इच्छा, अपेक्षा, हाव नाहीशी झाली आहे. देवा मागे असलेल्या संसाराचा मला वीट आला असून मी त्याच्याशी संबंध तोडला असून त्याचा त्याग केला. तुकाराम महाराज म्हणतात हे करुणाकरा तू दिनाचा सोयरा आहेस.


अभंग क्र.१४१०
धरूनियां सोई परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥१॥
येई पांडुरंगे नेई सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥
बुद्धि जाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥
न चलती पाय गिळत जाली काया । म्हणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥
दिशेच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वाट पाहें ॥४॥
तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥

अर्थ

देवा माझे मन संसारापासून परतले आहे आणि माझ्या मनाने तुम्हाला शरण जाणे हाच एक मार्ग पत्करला आहे. त्यामुळे हे पांडुरंगा विठाबाई तू मला तुझ्या जवळच सांभाळून ने अशी करून वचने मी तुला आळवित आहे. देवा आता माझी बुद्धी परमार्था विषयी साह्य झाली आहे पण माझ्या शरीरामध्ये शक्ती राहिली नाही मी तुझी वाट पाहत आहे आणि तू मला दिसला नाही तर मला दुःख होते व माझ्या डोळ्यातून पाणी येते. देवा मला माझ्या पायाने चालत नाही माझे शरीर थकून गेले आहे त्यामुळे तुम्हाला माझी दया येऊ द्या, देवा ज्या दिशेने वारा येतो त्या दिशेने तोंड करून मी त्या वार्‍याला विचारतो अरे वाऱ्या माझा पांडुरंग माझ्या भेटीला केव्हा येणार आहे, आणि पुन्हा मी हात जोडून तुझी वाट पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला भवन नदीच्या पहिल्या तीराला नेण्यासाठी त्वरा करा.


अभंग क्र.१४११
कौलें भरियेली पोट । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥
ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥
कमवितां लोहो कसे । तांतडीनें काम नासे ॥२॥
तुका म्हणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥३॥

अर्थ

सुज्ञ माता आपल्या लहान लेकराला एक एक घास करून खाऊ घालते व त्याचे पोट भरविते पण मूर्ख माता बालकाला एकदमच जेवु घालण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे सामान्य माणसाने योगाभ्यास करण्यासारखे निग्रहाची साधने करू नये. संतांनी सामान्य लोकांसाठी हरिभक्ती ची सोपी साधना सांगितलेली आहे. सुज्ञ माता आपल्या लहान मुलाचे पालनपोषण कसे करावे हे उत्तम प्रकारे जाणत असते. कोणतेही काम हे दीर्घ काळाने, निग्रहाने व अखंडपणे केल्याने फळाच्या दृष्टीने कसाला येते, अन्यथा एखाद्या कामाविषयी तातडी केल्यास त्या कामाचा नाशही होतो. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलांना खडे जोडून अक्षरांची माहिती दिली तर त्यांना अक्षराची ओळख लवकर होते.


अभंग क्र.१४१२
चालिले न वाटे । गाऊनियां जाता वाटे ॥१॥
बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥
नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥
तुका म्हणे भक्ती । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥

अर्थ

हरिनाम गात पंढरीच्या वाटेने चालले तर नाम सहवासाने चालण्याचा श्रम वाटत नाही. त्यातल्यात्यात वैष्णवांचा संग असेल तर अति उत्तम कारण वैष्णवांच्या संगतीत राहिल्याने श्रीरंग आपल्यासमोर आपोआप येतो. पंढरीच्या वाटेने चालत असताना हरिनाम व वैष्णवांची संगती असेल तर कसलेच भय आडवे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी नामाची भक्ती आधीपासून अंती पर्यंत सुखरूप आहे.


अभंग क्र.१४१३
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थे ॥१॥
शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥
पाठीवरी मोळी तोचि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥२॥
आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी पायां सोई मनाची ॥३॥

अर्थ

मी जसा जसा हा संसार तरुन जाण्याचा प्रयत्न व विचार करतोय तसा तसा हा संसार तरून जाण्यास कठीण होत आहे. ब्रह्मादिक देवांना देखील हे पार करण्याचे सामर्थ्य नाही असेच दिसत आहे. त्यामुळे नारायणा मी तुम्हाला शरण आलो आहे मज दिनाचा तुम्ही अंगीकार करा. तुमच्याकडून मला जे आज्ञा वचन आले आहे त्याचे पालन मी माझ्या शक्तीप्रमाणे करत आहे. पाठीवर मोळी घेतली तर त्याचे ओझे फक्त पाठवलाच नाही तर त्याची कळ तळपायापर्यंत होते. जसा मासा जाळ्यात सापडला जातो त्याच प्रमाने मी या भवसागरात सापडलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता मी तातडी करून तुझी प्राप्ती करून घेईन व माझे मन तुझ्या पायाकडे ओढ घेत आहे.


अभंग क्र.१४१४
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सर्वोत्तमें ॥१॥
सरलाचि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ्य ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥
लागतचि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥२॥
तुका म्हणे केला होय ठाकीऐसा । पुरवावी इच्छा धरली ते ॥३॥

अर्थ

सर्वोत्तम हरीने पुष्कळ जातीच्या भक्तांचा सांभाळ केला आहे व त्यांचा उद्धारही केला आहे. पण असे असले तरी हा देव कोठे कमी पडला आहे काय? तर नाही तो आपल्या स्वरुपस्थित आहे व हरीचा अंतपार आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही व घेताही आलेला नाही. हरी इतका सूक्ष्म आहे की तो अणुच्या ही पोटात समजावतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना देव ज्या आकारात पाहिजे असेल देव त्या आकाराचे रूप धारण करतो आणि भक्तांच्या मनातील इच्छा देव पूर्ण करतो.


अभंग क्र.१४१५
पोट आलें आतां जीवन आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥
काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवाचि ॥ध्रु.॥
वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वेचे ॥२॥
दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥
नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥
तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंदु एकसरें ॥५॥

अर्थ

देवा आता आमचे पोट ब्रम्हानंद भोजनाने तृप्त झाले आहे आणि हेच भोजन तुम्ही इतर भक्तांना ही पुरवावे. पंगतीला बसलेल्या भक्तांना महाराज म्हणतात की तुम्ही हा ब्रम्हानंद भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी तातडी करू नका कारण याने तुमचा जन्म-मरणाचा श्रम नाहीसा होणार आहे, पुढे ते राहणारही नाही. ब्रह्मानंद भोजन पंगतीत उदार असे साधुसंत वाढण्याचे काम करत आहेत त्यामुळे आपण आपल्या स्थितीत बसून रहावे, शांत बसावे. संतांनी उपदेश केल्याशिवाय लोकांना परमार्थ कळणार नाही म्हणून तुम्ही उपदेश ग्रहण करावा. जर सामान्य लोकांनी संतांनी केलेल्या उपदेशाचे ग्रहण केले नाही तर त्यांना संसार दुःखात एकटे राहावे लागेल. नावेचा आणि नावेत असलेल्या सर्व वस्तूंचा भार पाण्यावर असतो त्यामुळे नावेत हलके भारी असे काही वाटत नसते त्याप्रमाणे संतांवर आपला सर्व भार सोपवावा. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही या गोविंदा चे गीत गाऊन सगळीकडे ब्रह्मानंद करू.


अभंग क्र.१४१६
एका हातीं टाळ एका हाती चिपिळया । घालिती हुंबरी एक वाहाताती टाळिया ॥१॥
मातले वैष्णव नटती नाना छंदे । नाही मोक्षपदी चाड भजनीं आवडी ॥ध्रु.॥
हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥२॥
तीर्थी नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका म्हणे हरीहरात्मकची पृथिवी ॥३॥

अर्थ

वैष्णवांच्या मेळ्यात कोणाच्या हातात टाळ असतो, तर कोणी टाळ्या वाजवीते, तर कोणी आनंदाने हुंबरी घालते. वैष्णव भक्ती सुखाने मस्तीत आले असून ते नानाप्रकारे नटलेले आहे. त्यांना मोक्ष पदाची आवड नसून केवळ भजनाची आवड आहे. हे वैष्णव देवाला हाक आरोळ्या देत हरी गीत गातात आणि विविध प्रकारचे वाद्य लागून भजन-कीर्तनाचे सुख सोहळे भोगतात. त्या आनंदात त्यांना रात्र आणि दिवस कोठे जाते हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या वैष्णवांना कोठे तीर्थयात्रेला जावे किंवा वनात जाऊन तप करावे अशी आवड नसते त्यांना सर्व पृथ्वी हरीहरात्मक झाली आहे असे वाटते.


अभंग क्र.१४१७
देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरींच ॥१॥
भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥
पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥
अविनाश जोडी आम्हां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥
पायांवरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥
तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणवितां देवा तुमचींसीं ॥५॥

अर्थ

आम्ही देव सखा केला आहे त्यामुळे आम्हीला कोणाता पुरुषार्थ प्राप्त झाला नाही? देव सखा झाला त्यामुळे सर्व विश्वच आमचे सोयरे झाले आहेत. सर्व विश्वच आमचे सोयरे झाले त्यामुळे आम्ही भाग्यवंत झालो आहोत त्या कारणाने आमच्या नीतिमत्तेला आणि पुण्याला अंत पारच राहिलेला नाही. जिकडे पहावे तिकडे सर्व दिशेला देव दिसत आहे सर्व दिशा देवानेच भरून गेलेल्या दिसतात आणि संपूर्ण त्रैलोक्यात देवाच्या रूपाचा ठसा उमटलेला दिसतो. आम्हा भाग्यवंतांना अविनाश हरीचा लाभ झाला कारण आमचे पूर्वसंचित चांगले होते म्हणून. देवाच्या पायाला मिठी मारावी, त्याच्या पायावर डोके ठेवावे असे आमचे पूर्वसंचित चांगले होते त्यामुळे आमच्यामध्ये हे सामर्थ्य निर्माण झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुमचे आहोत असे म्हणून घेतल्यामुळे आमच्या जीवाला ही समाधान प्राप्त झाले आहे.


अभंग क्र.१४१८
कोण आतां कळिकाळा । येऊं बळा देईल ॥१॥
सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥
लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥
तुका म्हणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥

अर्थ

आता आमच्यापुढे कळीकाळाची सामर्थ्य कोण चालून देणार आहे? आमची सत्ता त्रिभुवन वर झाली आहे कारण देवाने आमच्यावर कृपा केली आहे. आम्ही देवाचे लाडके भक्त आहोत या कारणाने देवा आमच्या योगाक्षेमाचा भार वाहण्यास आणि आमचा सांभाळ करण्यासाठी सतत तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देव आणि भक्त एकमेकांना एक दिवस, एक घटकाच काय परंतु एक क्षणभर देखील विसरत नाही.


अभंग क्र.१४१९
आम्हां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥१॥
उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥
आम्ही शोभे निकटवासे । अनारिसे न दिसो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं ॥३॥

अर्थ

आम्हाला आमच्या पित्याचे म्हणजे हरीचे नाम घेण्यास फार आवडते आणि आमचा पिता ही त्यामुळे संतोषी होतो. आमचे दोघांचेही एकचित्त असल्यामुळे आमच्यात एकमेकांमध्ये प्रेम वाढले आहे. आम्ही एकमेकांच्या जवळ असल्यावर शोभून दिसतो, कधीही वेगवेगळे आम्ही दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाने आमचे सर्वांग शांत केली आहे.


अभंग क्र.१४२०
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥
अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें नासे ॥२॥
तुका म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥

अर्थ

हा देह प्रारब्ध भोगाच्या आधीन आहे त्यामुळे होणारे सुख दुःख क्षणभंगुर आहे. अविनाशी पांडुरंगाच्या चरणावर निष्ठायुक्त भक्ती केली तर अविनाशी सुख प्राप्त होते कारण हरिचरण सर्व कल्याणाचे ठिकाण आहे. या विश्वातील सर्व म्हणजे जेवढा काही पसारा आहे तो क्षणिक आहे कारण विश्वातील जे काही आकाराला आलेले आहे ते सर्व नष्ट होणारे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या चित्तामध्ये नेहमी नारायणाचे चिंतन करावे कारण त्याच्या चिंतना मध्येच सर्वकाही समाधान आहे.


अभंग क्र.१४२१
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥
केलें तरीं आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥
नाहीं भक्तीराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥२॥
तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥३॥

अर्थ

देवा माझे समाधान करणे फार आवश्यक आहे आता माझा अंत तुम्ही पाहू नका. देवा मी तुमचा दास झालो आहे आणि तुमचा दास म्हणून मी शोभेल असेच तुम्ही करा, म्हणजे संतांमध्ये ते बरे दिसेल. पूर्वीच्या भक्तांनी तुझे कोणते उधार बाकी ठेवले नाही आणि त्यांच्यामुळेच तर तू नामारूपाला, आकाराला आला आहेस.


अभंग क्र.१४२२
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारांसी ॥१॥
काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥
केलिया नेमासी उभें ठाऊ व्हावे । नेमलें तें भावें पालटेना ॥२॥
तुका म्हणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥३॥

अर्थ

मी काया, वाचा, मनाने हरी च्या श्रीमुखाच्या दर्शनाची वाट पाहत आहे आणि त्यामुळेच मी बाकी विचारांविषयी उदास आहे. मी मोक्ष घेऊन तरी काय करू, देवा मी जर मोक्ष घेतला तर मला तुमचे सगुण दर्शन होणार नाही. मी खऱ्या निश्चयाने तुमचे दर्शन घेणार आहे आणि माझ्या निश्चयामध्ये कोणताही बदल मी करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला दर्शन देण्याविषयी तुम्ही जसजसा उशीर कराल तर तो उशीर मला फार रडवेल कारण मला आता धीर धरवत नाही.


अभंग क्र.१४२३
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥
केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥
आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥
तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥३॥

अर्थ

देवा मागे संतांनी जो मार्ग तयार करून ठेवला आहे त्याच मार्गाने मी चालत आहे. मी माझ्या बुद्धीने कोणतेही स्वतंत्र मतभेद तयार केलेले नाही. तुला संतांनी कमरेवर हात ठेवून उभे केले आहे व आम्ही तुझ्या त्या स्वरूपाच्या दर्शनाचा हट्ट करत आहोत. आम्ही तुझी लेकरे आहोत त्यामुळे तुम्ही आमचा हट्ट पूर्ण करा. आम्हाला दर्शन न देण्याच्या हट्टाला तुम्ही येऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे सर्व व्यवहार साक्षी पुराव्यानिशी आहे आणि त्याच जोरावर मी म्हणतो की तुम्ही जरी फार थोर आहात तरी पण फार कंजूस आहात कृपण आहात.


अभंग क्र.१४२४
बहुता करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥
लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥
दुजियाचा तंव तुम्हांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥

अर्थ

देवा आज पर्यंत तुम्ही खूप चाळवाचाळवी केली आहे पण आम्हा भक्तांना तुम्ही किती दिवस या भवसागरात गुंतून ठेवणार आहात?देवा तुमच्या दर्शना वाचून मला दुसरी कोणतीही इच्छा नाहीये, माझा उद्धार व्हावा या कारणामुळे मी लाचार पणाने इथपर्यंत आलो आहे. तुम्हाला दुसऱ्यांचा कंटाळा आहे त्यामुळे तुम्ही एकटे एकटे राहत असतात. तुकाराम महाराज म्हणतात हे गोविंदा आता माझ्याशी चाळवाचाळवीचा विनोद करू नका एकदा मन उदार करून तुमचे दर्शन मला तुम्ही द्यावे.


अभंग क्र.१४२५
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥
वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥
अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुकेचि ना ॥२॥
तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥

अर्थ

अधम मनुष्य तीर्थ जळाला पाणी समजतो, देवाच्या प्रतिमेला पाषाण समजतो आणि संतांना सामान्य मनुष्य समजतो. अशा मनुष्याने कितीही चांगले कर्म केले तरी ते वांजेच्या मैथुना प्रमाणे व कंसे न आलेल्या पिकाप्रमाणे वाया जातात. असा अभागी मनुष्य सदा सुतकी चांडाळ असतो. त्याने कितीही चांगले कर्म केले तरी त्याला कोणतेही अधिष्ठान नसल्यामुळे त्याच्या मनातील तळमळ जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची दृष्टी नुसती वर्दळी म्हणजे वरवर पाहण्याची आहे ज्याला देहाचा अभिमान असतो त्याची देहबुद्धी नेहमीच कष्टी व दुखी असते.


अभंग क्र.१४२६
नव्हे मतोळ्याचा बाण । नित्य नवा नारायण ॥१॥
सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥
लाभ हाहोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥२॥
तुका म्हणे नेणों किती । पुरानि उरलें पुढती ॥३॥

अर्थ

नारायणरुपी माल जुना नसून नित्य नवा आहे. नारायणाच्या नामाचे श्रवण केले तरी सुख होते. असे हे नारायण रुपी माल टाकसाळीतील खऱ्या नाण्याप्रमाणे आहे. नारायण रुपी मालाचा लाभ हातोहात आणि अधिकाधिक वाढतच जातो. तुकाराम महाराज म्हणतात नारायण रुपी माल किती आहे याची गणती नाही कारण आज पर्यंतच्या सर्व संतांना हा माल पुरून उरला व पुढेही किती आहे याची गणती नाही.


अभंग क्र.१४२७

घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥
मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥२॥
तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥३॥

अर्थ

संतांनी परमार्थिक दुकान टाकले आहे व त्या दुकानांमध्ये भक्तरूप ग्राहक येतात. त्यांना संत हरिनामरुपी‌ माल दान म्हणून देतात. संत फार उदार आहेत त्यांच्या दुकानांमध्ये हरिनाम रुपी माल अगणित भरलेला आहे त्यामुळे दान मागण्यास आलेल्या भक्त रुपी ग्राहकाला माल देऊन ते तृप्त करतात आणि पुढे येणार्‍या ग्राहकांसाठी हा माल जसाच्या तसा पुन्हा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे हृदयरुप पोती देवाच्या मालाने गच्च भरलेली आहेत ती कधीच रिकामे होत नाही.


अभंग क्र.१४२८
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥१॥
ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥
पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥२॥
भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥३॥
देहअभिमान नको देऊं शरीरी । चढों कांहीं परी एक देऊं ॥४॥
तुका म्हणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥५॥

अर्थ

हे दातारा संसारी माणसाची स्तुती व हरीकथेची विक्री माझ्या हाताने कधी ही घडू देऊ नकोस. अशा कृपेची करूणा मी तुला भाकत आहे आणि तू माझी इच्छा पूर्ण करशील याची मला खात्री आहे कारण तू दारांचा राजा आहे. परस्त्री आणि परधन यांच्या विषयी माझ्या मनाला असक्ती होऊ देऊ नकोस. हे गोविंदा माझ्या हातून प्राणीमात्रांचा मत्सर व संतांची निंदा केव्हाही होऊ देऊ नकोस. देवा माझ्या अंगी देहाविषयी अभिमान निर्माण होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या पायाचा विसर मला वारंवार पडू देऊ नकोस.


अभंग क्र.१४२९

लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥
म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥
एकविध आम्ही स्वामिसेवेसाठी । वरी तोचि पोटीं एकभाव ॥२॥
तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥

अर्थ

हे केशवा लोकांना दाखविण्या पुरतीच मी तुझी सेवा करत नाही. तर मी तुझा अनन्य दास आहे. त्यामुळे मी तुझ्या पायाच्या सेवेचा हट्ट धरला आहे व या वाचून मी दुसरे काहीही जाणत नाही. स्वामीची सेवा करण्याची आमची आवड आहे व एकनिष्ठ भक्ती भाव आहे आणि जसा वरवर एकनिष्ठ भक्तीभाव आहे तसाच अंतकरणात देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला जे काम सांगितले आहे ते मी करत आहे देवा, आता त्यामध्ये धर्म काय आहे की अधर्म काय आहे ते तुम्हालाच माहित.


अभंग क्र.१४३०

ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥
आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजियाचा ॥ध्रु.॥
प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अविचित ॥२॥
तुका म्हणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥

अर्थ

मी ज्या संसाराच्या संगतीने जन्म-मरण रूप दुखात पडलो होतो आता त्या संसाराला मी धुऊन झाडून टाकले आहे. आता मी माझ्या एकट्या मनाशीच विचार करणार इतर कोणतेही ओझे बाकी राहिले नाही. मी प्रसाद सेवन करणार, तोच मला योग्य वेळी संतांच्या उचिष्ट प्रसादाचा लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या हाती तुला प्राप्त करून घेण्याचे वर्म सापडले आहे त्यामुळे मी सर्व चिंता खंत करण्याचे टाकून दिले आहे.


अभंग क्र.१४३१
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥
भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥
पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग । आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥
तुका म्हणे आला उच्छिष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥३॥

अर्थ

उत्तम प्रकारच्या पक्वान्नां मध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात व त्यांची चव देखील भिन्नभिन्न असते. संत त्यांच्या आवडीने भोजन घेत होते त्यावेळी त्यांनी मला तिथे त्यांच्याबरोबर भोजनास बसविले. त्यांनी पंक्ती भेद न करता मला जेवायला बसविले त्यामुळे मला तेथे बसता आले. संतांनी हे परमार्थ रूप भोजन तयार केले आहे व ज्याचा जसा अधिकार असेल तसे त्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य असे अन्न वाढले आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांनी केलेल्या परमार्थ रूप स्वयंपाक मला मिळले व त्यामुळे मला फार आनंद झाला.


अभंग क्र.१४३२
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥
फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं ॥ध्रु.॥
न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥
तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥

अर्थ

संतांकडे नेहमी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान हे गुण आसतात, त्यामुळे मी दरिद्री, मला काहीतरी लाभ होईल या अपेक्षेने त्यांच्याकडे धाव घेत आहे. आता समर्थ संतांकडून जे दान मिळाले ते दान घेऊ आणि एकांतात जाऊन ते सेवन करू. संतांना दान मागण्यासाठी वेळ काळ पाहण्याची गरज नसते तर संत दान देण्यास नेहमीच तत्पर असतात. कधी कधी तर असे होते की संत आपण होऊन दान देतात. तुकाराम महाराज म्हणतात समर्थ संतांनी दिलेल्या भोजनाने पोट भरल्यानंतर देवाचे गौरवास्पद शब्दांनी स्तुती करून मी देवाची पूजा करीन.


अभंग क्र.१४३३
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥
अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाया न देखे ॥ध्रु.॥
नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥२॥
तुका म्हणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥३॥

अर्थ

हे संतांनो मी माझ्या कुळाचाराप्रमाणे तुमची पूजा करीन. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे काही न पाहता मी संतांच्या पायाला वंदन करीन. मी संतांचे समाधान भंगु देणार नाही व लोकांचा खोळंबा होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पापाचा जोपर्यंत झाडा होणार नाही तोपर्यंत माझे, म्हणजे वरील वर्णन केलेले प्रमाणे कर्म मी सोडणार नाही.


अभंग क्र.१४३४
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥
होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥
लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । ज्याचें त्या पुरतें विभागिलें ॥२॥
तुका म्हणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंग ॥३॥

अर्थ

हे अनंता तूच माझा माय बाप आहे त्यामुळे मी जन्ममरणाची चिंता करणे विसरून गेलो आहे. आता यापुढील जे काही प्रकार होतील ते फक्त पाहण्याचे काम मी करणार आहे कारण माझे भय आणि संसाराचा भार यांचा नाश झाला आहे. सर्व उपाधीचे कारण म्हणजे माझा देह आहे, आता मी पाचही तत्वां मध्ये देहाची विभागणी आपापल्या ठिकाणी केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता हा सर्व दुःखमय प्रपंच माझ्यासाठी पारीख म्हणजे परका झाला कारण तू माझा सखा झाला आहे.


अभंग क्र.१४३५
उदार तूं हरी ऐसी कीर्ती चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥
तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥ध्रु.॥
मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥२॥
दिसों देसी केविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका म्हणे जिणें माझें तुज आधीन ॥३॥

अर्थ

हे हरी तू उदार आहे अशी तुझी कीर्ती चराचरामध्ये आहे. आणि हे अनंत तुझी थोरी वेदशास्त्रे, पुराणे गर्जून गात असतात. देवा माझा तुझ्या पायी एकनिष्ठ भक्ती भाव आहे त्यामुळे तू माझे जन्ममरण नष्ट करून टाक. तू देवांचाही देव आहेस सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहेस जे काही मागायचे असेल ते तुला आम्ही मागू व आमच्या अंतःकरणातील गोष्टी तुलाच सांगू. हे दातारा जर आम्हाला कोणाच्या पायाचा आश्रय घ्यायचा असेल तर तुझ्याच पायाचा आश्रय आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आम्हाला केविलवाणा दिसू देशील तर तुझाच कमीपणा यामध्ये होईल आता माझे जीने हे तुझ्या स्वाधीन आहे.


अभंग क्र.१४३६
पाहा किती आले शरण समानचि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥
नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरी मना । केला तो उगाणा घडल्या महादोषांचा ॥३॥

अर्थ

देवा तुला आजपर्यंत कितीतरी भक्त शरण आलेले आहेत आणि तू त्यांना तुझ्या सारखेच केले आहे. व तसे करताना कोणाचाही गुणदोष तू पाहिले नाही. ज्या संतांना तू आश्रय दिला आहे त्यांच्या पेक्षाही खालचा आश्रय मला दे. मला संतांच्या पेक्षाही खालचे स्थान मिळाले तरी चालेल, मी संतांच्या थोरपणाचा हेवा करत नाही. ज्यावेळी तू भक्तांच्या संसाराचा भार नाहीसा करण्यासाठी धाव घेतो त्यावेळी तु त्यांचा आचार, कुळ, गोत्र यांचा विचार करत नाही. मी दगडासारखा आहे कि कसा आहे, हे तू पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू सर्व जाणता आहेस तुझ्या मनात आले तर तू सर्व घडलेल्या पतकाचे नाश करू शकतोस असे तुझे सामर्थ्य आहे.


अभंग क्र.१४३७
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥
लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥
होते गोविले विसरे माप जाले एकसरें । होते होरें वारे तोचि लाहो साधिला ॥२॥
कराया जतन तुका म्हणे निजधन । केला नारायण साह्य नेदी विसंबो ॥३॥

अर्थ

आता जन्ममरण नाहीसे झाले आहे कोणतेही कर्म राहिले नाही. आता देवाला मी काया,वाचा,मन अर्पण करण्याचे विसरून गेलोय. आता आत्मज्ञान रुपमाल विकणे एवढे बाकी राहिले आहे. मला अनंत रूप मोठा माल सापडला आहे आणि हा अनंत रूप आल मला माझ्या घरीच सापडला आहे. माझ्याकडे आलेला माल हातोहात विकला जात आहे. आणि खाली काहीच शिल्लक राहत नाही. मी काया वाचा मनाचा विसार देवाला देऊन आत्मज्ञानाचा माल घेतला आहे. या माला विषयी बरेच दिवस वादविवाद चालू होता परंतु त्वरा करून मी हा माल हाती घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात निजधन जतन करण्याकरिता मी नारायणाला सहाय्य केले होते त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकाला कधीही विसरू देत नाही.


अभंग क्र.१४३८
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे ॥१॥
सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥
वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥
जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पहिला नांवें तुका म्हणे खंडलें ॥३॥

अर्थ

हे पंढरीराया तुझ्या रूपाने माझी काया म्हणजे शरीर भरून टाकावे. आरशामध्ये प्रतिबिंब जरी दिसले आणि ते दिसण्यास एकसारखे जरी असले तरी त्या दोघांमध्ये भिन्नत्व असते. तुझ्याशी माझे जे एक्यत्व झाले आहे त्याचे सुख माझ्याकडे पुष्कळ आहे आणि तुझ्याच सत्तेने त्या सुखाचा उपभोग मी हळूहळू घेत आहे. अडचणीचे चार कोपरे व सर्व मार्ग मोकळे झाले आहे व सर्वत्र सुख आहे. डोळ्यात जेव्हा काविळ असते तेव्हा आरशातील प्रतिबिंब देखील पिवळे दिसते पण कृष्णांजनं डोळ्यात घातले तर पिवळेपणा नाहीसा होऊन भेद नष्ट होतो. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की मनात “अहंम ब्रह्मास्मी” या बोधाचा ठसा अंतरंगात उमटला की मनाला वाटेल तेथे मनाने जावे. आता द्वैताचा फाटा नाहीसा झाल्यामुळे भ्रमाचे खंडन झाले आहे.


अभंग क्र.१४३९
सोसें सोसें मारूं हाका । होईल चुका म्हणऊनि ॥१॥
मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥
नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां पडताळीं ॥२॥
तुका म्हणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥

अर्थ

हे देवा तुमच्यात व आमच्यात चुकामुक होईल त्यामुळे तुम्ही आम्ही हरिनाम चिंतनाने वेळोवेळी तुला हाक मारू. भविष्यात आणि चालू घडीला तुमच्यात व आमच्यात कधीच अंतर पडू नये. माझ्या वाणीने तुझ्या नामाचा वेळोवेळी छंद घेतला आहे व त्याविषयी मी प्रत्येक्ष परीक्षण करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलने त्याच्या पुष्कळ भक्तांना सुखी केले आहे.


अभंग क्र.१४४०
धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥
पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥
नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईन ॥२॥
तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥३॥

अर्थ

देवा मी तुझ्या भेटीची इच्छा मनात धरून तुझ्या गावाला धावत येईल आणि हे विठाई तू जर मला बोलावणे पाठवले तर लवकरच मी तुझ्याकडे धावत येईल. मी त्या प्रेम सुखाने नाचेन आणि तुझी कीर्ती गाईन. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या मेळ्यामध्ये राहून मी संतांच्या पायाला वंदन करीन.


अभंग क्र.१४४१
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥
भोगिलें तें आहे सुख । आतां मुख मोकळें ॥ध्रु.॥
उत्तम तें बाळासाठी । लावी ओठीं माउली ॥२॥
तुका म्हणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥

अर्थ

आई बापाच्या भेटीने मुलाचा सर्व संकोच नष्ट होतो. आई बापाच्या घरी वाटेल ते सुखोपभो घेता येते आणि वाटेल ते खाण्यासाठी मुख नेहमी मोकळे असते. माऊली आपल्या मुलांसाठी चांगले दूध जतन करून त्याच्या ओठाला लावते. तुकाराम महाराज म्हणतात आई बापाच्या भेटीने मुलांचे समाधान होते त्यांचा आनंद मनात मावत नाही.


अभंग क्र.१४४२
उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥
अनुताप अंगी अग्नीचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥
दोष ऐशा नावे देहाचा आदर । विटाळले अंतर अहंभावे ॥२॥
तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥

अर्थ

जे देहा विषयी उदास असतात ते ब्रम्‍हरूपच असतात. त्यांना पाप-पुण्य लागत नाही त्यांच्या अंगी वैराग्याच्या अग्निज्वाळा असतात प्रपंचाच्या मृगजळा ने ते विझत नाही. देहा विषय प्रेम म्हणजे पाप व देहांकाराने अंतकरण वितळते. तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत चित्तातून प्रपंच त्याविषयी खंत गेलेली नसते तोपर्यंत चित्त बद्ध अवस्थेत असते.


अभंग क्र.१४४३
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥
नाहीं तें च घेतां शिरीं । होईल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥
नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥
तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥

अर्थ

भव सागरातील बंधनाचा फासा तोडून टाकून देहा विषयी आशा टाकून देऊ. तुम्ही भवसागराचा आणि देह अभिमानाचे ओझे डोक्यावर घेतले तर तुम्हाला आत्मसुखाचा अनुभव दुरावेल. जे खोटे आहे त्याचे “माझे आणि तुझ्या पणाचे” खोटे ओझे कोणी वागवावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या जगण्यामुळे देव आपल्यापासून अंतर तो त्या जगण्याला काय अर्थ आहे?


अभंग क्र.१४४४
तेंच किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥
आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥
आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥
तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥

अर्थ

हे संतांनो मी आत्तापर्यंत पुष्कळ बोललो आहे पण तेच तेच बोलू तरी किती वेळा? आता ते बोलणे फार झाले आता माझे तुम्हां संत चरणांना दंडवत आहे. तुमच्या विषयी माझ्या मनामध्ये नित्य नवी आवड येऊन राहते. तुकाराम महाराज म्हणतात हे संत चरण दूर समुद्राच्या बंदरावर होते ते आता आमच्या जवळ आले हे फार बरे झाले.


अभंग क्र.१४४५
उपासा सेवटी अन्नासवे भेटी । तैसी माझी मिठी पडो पायी ॥१॥
पुरवीं वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥
बहुदिसां पुत्रामाते सवे भेटी । तैसा दाटो पोटी प्रीतिउभड ॥२॥
तुका म्हणे धन कृपणा सोईरें । यापरि दुसरें नहो आतां ॥३॥

अर्थ

भरपूर दिवस उपवास केला आणि उपवास संपल्यानंतर अन्न खाण्याविषयी जी उत्कंठता असते तशीच उत्कंठता तुमच्या चरणांची मिठी पडणे विषयी असो. हे नारायणा तू आम्हा भक्तांच्या अंतकरणातील सर्व काही जाणतो त्यामुळे माझ्या अंकिताची एवढी वासना पूर्ण करा. खुप दिवसानंतर आईला मुलाची गाठ पडल्यावर भेट झाल्यावर जसा प्रेमाचा उमाळा येतो अगदी तसाच प्रेमाचा उमाळा माझ्या पोटी दाटून येवो. तुकाराम महाराज म्हणतात कंजूस माणसाला जशी धनाची आवड असते त्याप्रमाणेच मला तुमची आवड असू द्या इतर कोणाचीही मला आवड नसू द्यावी.


अभंग क्र.१४४६
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥
संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥
वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हाचि बडिवार मिरवितों ॥२॥
तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणां ॥३॥

अर्थ

युद्धाला निघालेला शूर शिपाई जसा मागे वळून पाहत नाही अगदी तसेच धैर्य माझ्यामध्ये तुम्ही राखावे. हे नारायणा मी संसाराच्या हातून बाजूला झालो आहे आता माझ्यावर कृपा करावी. तुझ्या नामाचे हत्यार मी वागवीत आहे आणि त्याचीच बढाई मी सर्वत्र करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी जर प्रपंचाकडे मागे फिरलो तर त्यात कमीपणा आहे की मोठेपण आहे हे तुम्ही जाणा.


अभंग क्र.१४४७
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥
म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥
सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥
तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा ॥३॥

अर्थ

लोकांकडून पूजा स्तुती करून घेण्यास अधिकार योग्य असावा लागतो, योग्यता असावी लागते. त्या मुळे अयोग्य माणसे बाजूला सारून नारायण आणि संतांची पूजा करा. उत्तम प्रकारचे जेवण सेवन केल्यावर तृप्तीचा ढेकराणे जेवण करणाऱ्याच्या मुखावरील सुख लगेच समजते. तुकाराम महाराज म्हणतात दुधाला मद्य समजने व संतांना सामान्य समजणे योग्य होईल काय?


अभंग क्र.१४४८
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥
याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥
तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥

अर्थ

खरेतर आपल्या जवळच धीर नाही नाहीतर देवाजवळ काय कमी आहे. देवावर आपल्या योग्य क्षैमाचा भार‌ घातला की देव आपल्या दासांची कधीही उपेक्षा करीत नाही. धनप्राप्तीसाठी आपण किती कष्ट करतो तेवढेच कष्ट हरी प्राप्तीसाठी केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा खरे म्हणजे पोटासाठी आम्ही खोटे झालेलो आहोत.


अभंग क्र.१४४९
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥
अंती बोळवणेसाठी । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥
लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥
तुका म्हणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥३॥

अर्थ

कोट्यावधी द्रव्य जरी कमावले तरी आपल्याबरोबर ढुंगणाची लंगोटी देखील येत नाही. अंतकाळी पांडुरंग आपल्याला त्याच्या जवळ बोलवीन त्याकरिता त्याचे नाम कंठात धारण करा. विषय लोभाने लोभी मनुष्याची संगती व्यर्थ ठरते. तुकाराम महाराज म्हणतात मी जगातील लोकांना त्यांच्या हिताचे उपदेश करत आहे कारण त्यांनी त्यांच्या हिताबद्दल मोकळे राहू नये म्हणून.


अभंग क्र.१४५०

कोणापाशीं आता सांगो मी बोभाट । कधी खटपट सरेल हे ॥१॥
कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥
माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥
भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥
तुका म्हणे देतों देवाचें गाऱ्हाणें । माझें ऋण येणें सोसियेलें ॥४॥

अर्थ

आता मी माझे गार्हाणे तक्रार मी कोणाजवळ सांगु, संसाराची खटाटोप केव्हा संपेल? या संसाराच्या जाळ्यातून माझी सुटका केंव्हा होईल आणि माझे समाधान केव्हा होईल? संसारा मुळे माझे प्राण फुटत आहे इतर लोकांना हे दुःख माहित नाही म्हणून ते सुखी आहेत. भोगाच्या आधीच भोगा विषयी माझे मन त्रासलेले आहे आणि ते आता कोठे लपवावे. तुकाराम महाराज म्हणतात देवाविषयी मी संतांकडे तक्रार करत आहे की, देवाने माझे सेवा रुपी ऋण घेतले आहे पण त्याची परतफेड तो करत नाही.


अभंग क्र.१४५१
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥
करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥
भुललिया संसारें । आलें डोळ्यासी माजिरें ॥२॥
तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥

अर्थ

मी संसारापासून वेगळे राहून त्याचे कौतुक माझ्या डोळ्याने पाहत आहे. जगातील लोकांना संसाराचा किती छंद लागला आहे हे डोळ्याने पाहून त्यांची फजिती आपण पाहू. संसाराला हे सर्व लोक भुलले असून त्यांच्या डोळ्यावर धुंदी आली आहे. तुकाराम महाराज म्हणतात संसार जे कोणी गुंतले आहेत त्यापैकी कोणीही आपले डोके वर काढत नाही.


अभंग क्र.१४५२
आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥१॥
चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥
दुजिया पासाव परतलें मन । केलें द्यावें दान होईल तें ॥२॥
तुका म्हणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥

अर्थ

आम्हा पांडुरंगाच्या दासांना सर्व पूर्ण पर्वकाळ म्हणजे पांडुरंगाचे चरणकमल आहे. चित्तामध्ये एक पांडुरंगाचे चरणकमल आहेत आणि त्याची आज्ञा प्रमाण मानून आम्ही राहत आहोत. इतर मायिक पदार्थापासून आमचे मन परतले आहे. पांडुरंग जे दान आम्हाला देईल ते दान आम्ही घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे सर्व नवस पूर्ण झाले आहे पांडुरंगा वाचून सर्वकाही ओस असल्या सारखेच वाटत आहे.


अभंग क्र.१४५३
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥
ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥
अंतरीं तों तुझा वास । आणिकां नाष कारणा ॥२॥
तुका म्हणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥

अर्थ

मला सर्व रसांचा वीट आला असून देवा मला तुझ्या पायाजवळ रहावेसे वाटते. हे नारायणा असे धैर्य माझ्या मनाला दे अशी विनंती मी तुला करत आहे. देवा तुझा माझ्या अंतःकरणात वास व्हावा, त्यामुळे इतर सर्व गोष्टींचा नाश होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंत काळी तू माझे रक्षण करावे असे मला वाटते.


अभंग क्र.१४५४
चंदन तो चंदनपणें । सहज गुणेसंपन्न ॥१॥
वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥
परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥२॥
तुका म्हणे कैंची खंती । सुजाती ते टाकणी ॥३॥

अर्थ

चंदन त्याच्या सुगंध गुणामुळे सहजच संपन्न असतो. चंदनाच्या वृक्षाजवळ जे वृक्ष असतात ते भाग्यवान असतात कारण चंदनाच्या जवळ राहून इतर वृक्षांमध्ये चंदनाचा गुण आपोआप प्राप्त होतो. परिसराच्या अंगी लोखंडाला सोने करण्याची ताकद आहे व तीच ताकद त्याच्या अंगी बाणलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे सर्वगुणसंपन्न असतात त्यांना कसली काळजी आली ते तर स्वतः शुद्ध असतात व इतरांनाही ते शुद्ध करतात.


अभंग क्र.१४५५
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥
हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवि ॥ध्रु.॥
कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥
कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥
भक्ती तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥
तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥

अर्थ

लक्ष चित्त स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करावे आणि तसे होत नाही कारण मन खूप चंचल आहे आणि मन स्थिर करण्याकरिता आसन मुद्रा जिंकावे लागते. आणि गोष्टी या सर्वसामान्य लोकांना असाध्य आहे त्यामुळे नारायणाचे नामचिंतन करावे हे चांगले. वासनेचा, कुटुंबाचा आणि विषय भोगांचा त्याग करणे याचे नाव वैराग्य आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत वर्णाश्रम विहित कर्मे केली पाहिजेत. काम,क्रोध त्यांना शांत करून सर्व प्राणिमात्र, भूतमात्रांना नमन करावे याचेच नाव भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात योग, वैराग्य आणि भक्ती कर्म यांचे साध्य व साधने हे दोन्हीही अवघड आहे आणि तो मार्ग खूप अवघड आहे आणि जो त्या मार्गाने जातो त्यात त्याचा बळी ही जाऊ शकतो त्यामुळे सामान्य माणसांना नाम भक्ती म्हणजे हरीचे नाम घेणे ही साधना करावी व तीच साधना सर्व सोपी आहे.


अभंग क्र.१४५६
ऐसें कांहो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥
श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥२॥
तुका म्हणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥३॥

अर्थ

तुम्ही असे काही का करत नाही की ज्या कारणामुळे तुमचा नाश होणार नाही. सर्व भूतमात्रांना वंदन करून विश्वंभरा शरण का जात नाही श्रुतीचे सर्व सारतत्व हेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात लोकहो हरीला शरण जाण्या ऐवजी दुसरा कोणताही मार्ग नाही तुम्ही हरीला शरण गेलात तर तुमचा पुढे नाश होणार नाही.


अभंग क्र.१४५७
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां ब्रम्हत्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणीं । माहावाक्य ध्वनि बोंब जाली ॥३॥
दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पीलें ॥४॥
तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥

अर्थ

आमच्या शरीराची कळा अवस्था प्रेतासारखी झाली आहे आणि स्मशानाच्या ठिकाणी आमचे लक्ष लागले आहे. काम,क्रोध हे रात्रंदिवस रडत आहेत आणि अविद्या रूप माया हाय हाय करीत बसली आहे. या शरीराला वैराग्याचे गोवऱ्या लागल्या आहेत आणि तत्वमसि या अग्नीने त्या पेटल्या आहेत. संसाराचा घट या प्रेत रुपि शरीराला फिरविला व फोडला आणि महावाक्य रूप ध्वनीची बोंब झाली. मी माझ्या नाम रूपाला तिलांजली दिली व हे शरीर ज्याचे होते त्याला ते अर्पण केले. तुकाराम महाराज म्हणतात गुरुकृपेने ज्ञानदीप उजळले आणि या देहाची राख आपोआप झाली.


अभंग क्र.१४५८
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥
एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याचा त्यागें जाला सुकाळ हा ॥२॥
फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥३॥
नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥४॥
तुका म्हणे दिलें उमटोनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥५॥

अर्थ

मी माझ्या स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्याने पाहिले व तो सोहळा फारच अनुपम्य आहे. त्रीभुवनामध्ये आनंद दाटला गेला आहे आणि सर्वत्र आत्मभाव निर्माण झाल्यामुळे आनंदाचा भोग प्राप्त झाला आहे. माझ्या ठिकाणी देहाभिमान निर्माण झाला त्यामुळे मी संकुचित झालो होतो आता देहाभिमानाचा त्याग केल्यामुळे सर्वत्र सुकाळ झाला आहे. आता जन्म मरणाचे सुतक फिटले मी माझ्या संकुचित बुद्धी मुळे हरी पासून दूर झालो होतो पण नारायणानेच त्याच्या ठिकाणी आश्रय दिला व मी माझा भक्तिभाव नारायणाच्या चरणावर ठिकाणी ठेवून राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या परमार्थिक मरणाचा प्रकार आपल्या अंगी लावून घेतला व अनुभवला आहे मगच या सर्व जगाला माझा अनुभव मी सांगत आहे.


अभंग क्र.१४५९
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीस ॥१॥
एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥
अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥
अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नाही ॥४॥
तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥

अर्थ

मी माझ्या हाताने माझ्या देहाची बोळवण केली आहे आणि सोहंम या ज्ञानाग्नीने पंचमहाभूते जाळून टाकले आहे आता सर्व कार्य पूर्ण झाले असून फक्त नारायणा नारायणा नाम चिंतन करणे बाकी आहे. ज्ञानाग्नीने पेटलेली चिता मोक्ष रुपी अमृत संजीवनी व योगाने शांत केली आहे. एकादशीच्या दिवशी उपवास व हरी जागरण केले व बाराव्या दिवशी भोजन केले. देवाच्या पायाजवळ देहरुपी घट सोहंम या बोधाने फोडला त्यामुळे सर्व देहाची कर्मे समाप्त झाली. आता केवळ हरीच्या नामाशी संबंध राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता सगळीकडे आनंदीआनंद झाला असून जिकडेतिकडे मला गोविंदच गोविंद दिसत आहे.


अभंग क्र.१४६०
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रम्‍हपण सेवटींच्या ॥ध्रु.॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥
पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥३॥
आहे तैसी पूजा पावले सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥
तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार शेवटींचा ॥५॥

अर्थ

विष्णू पदी मी माझा देह अर्पण करून पिंडदान केले आहे. आणि अहंकार, महतत्व, अज्ञान या तीन मूळत्रयांना तिलांजली दिली आहे आणि शेवटी ब्रह्मार्पणमस्तू या एका वाक्याने सर्व संकल्प नाहीसे केले. सर्व जग विष्णुमय आहे हे रहस्य समजले व माझे सर्व सव्य अपसव्य कर्म करण्याचे संपले. अभेद तत्त्वामुळे सर्व जनार्धनच आहे हे समजून आले. व त्यामुळे पिता-पुत्र हे नाते संपले नाहीसे झाले. शास्त्रात सांगितलेल्या प्रमाणे पिंड पूजा झाली आणि त्यामुळे मला श्रद्धाचा पर्व काळ सहज साध्य झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी पिंडदान केल्यामुळे माझ्या सर्व कुळांचा उद्धार मी केला आता त्या जनार्दनाला माझा शेवटचा नमस्कार आहे.


अभंग क्र.१४६१
सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥१॥
विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥
सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठुर नाहीं राग ॥२॥
भेदाभेद नाहीं । तुका म्हणे तिच्याठायीं ॥३॥

अर्थ

विठू माऊली कडे काही मागावयास जर गेलो तर माझ्याकडील संपले तुम्हाला वेळ काही समजत नाही का असे ती विठू माऊली केव्हाच म्हणत नाही. माझी विठ्ठल माऊली कृपाळू आहे ती सदासर्वकाळ प्रेमपान्हा भक्तांना सोडते आहे. ती विठू माऊली भक्तांना मुळे आपल्याला किती त्रास होतो याचा विचार कधीही करत नाही. भक्तांविषयी कधीच ती विठू माऊली निष्ठुर नसते आणि भक्तांवर ती कधीही रागवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल माऊली जवळ भेदाभेद अजीबात नाही.


अभंग क्र.१४६२
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा ठाव नाहीं ॥१॥
करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें उत्तम दंडीलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥२॥
तुका म्हणे वांयां गेलोंच मी आहे । जरि तुम्ही साह्य न व्हा देवा ॥३॥

अर्थ

देवा तुला पहावे अशी इच्छा मी करत आहे परंतु तुझी भेट व्हावी असे आचरण माझे मात्र नाही. देवा तू माझा अभिमान धरला आणि तुझ्या सत्तेने तू माझा कैवारी झाला तर मला तुझ्या पायाचे दर्शन होईल. देवा मी माझ्या बाह्य रूपाने माझ्या शरीराला उत्तम प्रकारे रंगविले आहे परंतु माझ्या अंतरंग मध्ये मनाचे मुंडण मी केले नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला सहाय्य केले नाही तर मी वाया जाईल.


अभंग क्र.१४६३
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥
आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥
व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिज तो काळ नव्हे कांहीं ॥२॥
तुका म्हणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुम्हां हातीं ॥३॥

अर्थ

देवा माझे आचरण किती वाईट आहे याला माझे मनच जाणते आहे, साक्षी आहे आणि माझे गुणदोष मलाच माहित आहेत. हे पांडुरंगा तुम्ही सर्वच जाणता मग प्रसंग पाहूनच तुम्ही माझ्याशी वागावे. व्याही आणि जावई यांच्या पंक्तीला जर एखादा अन्ना विषयी भुकेलेला दरिद्री येऊन बसला तर त्याला जेवण खाऊन न घालता तिथून हाकलून देणे योग्य ठरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे देवा पांडुरंगा मी तुम्हा संत आणि भगवंत यांच्या पंक्तीत येऊन बसलो आहे आता तुम्हाला मी शरण आलो आहे यापुढे काय योग्य आहे व काय अयोग्य आहे हे तुम्हीच करावे.


अभंग क्र.१४६४
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥
आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥
येथें नाहीं जाली कोणांची मिरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥
तुका म्हणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥

अर्थ

समर्थांची सेवा घडल्यामुळे मला कोणाचेही भय राहिले नाही. असे वाटते देवा आता माझ्या मनाने हाच निर्धार धरावा की, तुझ्या चिंतनात अंतर पडू देऊ नये देवाजवळ कृपे विषय दान मागण्यासाठी कधीच व कोणाचीही निराश झालेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ कोणताही भक्त येवो मग तो राजा असो किंवा रंक असो त्या दोघांवरही देवाची सारखीच कृपा असते.


अभंग क्र.१४६५
वैष्णव चोरटी । आलीं घरासी करंटी ॥१॥
आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥
ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥
तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥

अर्थ

वैष्णव देहातील काम,क्रोध चोरणारे चोर आहेत व त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ममत्व नसणारे ते करंटे आहेत व आज आपल्या घरी चोरी करण्यासाठी वैष्णव आले आहेत. त्यामुळे वैष्णवांचा पासून आपले भांडेकुंडे अंथरूण-पांघरूण सर्व जतन करा. चोरटे, करंटे वैष्णव ज्यावेळी देहरूपी घरात घुसतात व देहरूपी घरातील काम,क्रोध अशा प्रकारचे सर्व विकार चोरून नेतात. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव सर्वकाही चोरून नेतात व त्याचा मागमूसही लागू देत नाही याप्रमाणे वैष्णव भक्तांचे सर्व दुख चोरून नेतात.


अभंग क्र.१४६६
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥
नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥
हेचि यांची जोडी । सदा बोडकीं उघडीं ॥२॥
तुका म्हणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥३॥

अर्थ

वैष्णव हे चोरटे आहेत याबद्दल मी पुष्कळ लोकांची गाऱ्हाणी ऐकली आहे. त्यामुळे वैष्णवांवर विश्वास ठेवून नका कारण वैष्णव देहाचा देहभाव नष्ट करणारे चोर आहेत. चोरी करणे हा वैष्णवांचा धंदा असून ते नेहमी असंग असतात. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांनी काही चोरून नेले तर ज्याचा माल चोरून नेला त्याला देखील ते त्याचा पत्ता लागू देत नाहीत.


अभंग क्र.१४६७
आणिकांची सेवा करावी शरीरे । तीं येथे उत्तरे कोरडींच ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा याचकाच्या ॥ध्रु.॥
आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥२॥
आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥३॥
आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा दोन्ही नाहीं ॥४॥
तुका म्हणे करी आपणासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥

अर्थ

इतर कोणाचीही सेवा करण्याचे ठरवले तर शरीराला कष्ट होते परंतु पांडुरंगाची सेवा केवळ शब्द स्तुतीने सेवा घडते असा हा पांडुरंग सहज व सुलभ आहे. तो आपल्या सेवकाला हेलपाटे घालायला लावत नाही हे. इतर कोणाची भेट घेण्यास गेलो तर अनेक काठ्या मध्ये येतात पण, पांडुरंगाची भेट घेण्यास गेलोच तर त्याला एक शब्दाची आडकाठी मध्ये येत नाही. इतर कोणीही वर (आशीर्वाद) दिला तर तो शाश्वत नसतो त्याने काही काळ पोट भरते पण तो टिकत नाही, परंतु पांडुरंगाने जर काही दिले तर ते कल्पांत झाला तरी संपत नाही. इतर कोणाचीही सेवा करताना काही चूक झाली तर ते दंड करतात परंतु पांडुरंगाची सेवा करताना भक्तांकडून काही चूक झाली झाली तरी त्याला तो कष्ट देत नाही आणि मुळात पांडुरंग सेवा घेण्याची इच्छाही करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो भक्त पांडुरंगाची भक्ती भावाने सेवा करतो मग तो उच्च असो की निच‌ असो पांडुरंग त्याला आपल्यासारखा करतो.


अभंग क्र.१४६८
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥
त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥
पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥
उंच निंच नाहीं । तुका म्हणे खळा कांहीं ॥३॥

अर्थ

वाईट वागणे ही दुर्जनाची जातच असते व वाईट वागण्यामुळे त्याच्या तोंडात माती पडत असते. त्या दुर्जनाची बुद्धीच त्याच्या हिताला आड येते कारण तो त्याच्या वाचेने काहीही अनुचित बडबड करतो. दुष्ट लोक हे संतांकडे दोष दृष्टीने पाहतात व त्यांची भीडभाड ते ठेवत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात मूर्खांना उंच नीच काहीच समजत नाही.


अभंग क्र.१४६९
न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥
मायबाप बंधुजन । तूं चि सोयरा सज्जन ॥२॥
तुका म्हणे तुजविरहित । माझें कोण करील हित ॥३॥

अर्थ

अर्थ:–हे देवा हे पांडुरंगा आता तरी कृपा करून तुम्ही माझ्या मनाची आस पुरवावी व मला उदास करू नये, माझी इच्छा अव्हेरू नये. हे नारायणा तुम्ही कृपा करून माझी घोषणा ऐका, माझे काय म्हणणे आहे ते ऐकून घ्या.कारण तूच काय तो मला आता सर्व काही आहेस, तूच माझा मायबाप, तूच माझे बंधुजन, तूच काय तो मला सखा आणि सोयरा आहेस, तुझ्या शिवाय मला इतर कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला कारण माझे जे खरे हित आहे, माझा जो काही उद्धार करायचा आहे तो तुझ्याशिवाय इतर कोणीही करू शकत नाही.


अभंग क्र.१४७०
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥
ते मी नाठवीं घडिघडी । म्हणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥
तुटे भवरोग । जेथें सर्व सुख भोग ॥२॥
तुका म्हणे विटे । धरियेले जें गोमटें ॥३॥

अर्थ

गांजलेल्या आणि नाडलेल्या लोकांना तसेच पीडित आणि रोग्यांनादेखील जीवन सुलभ करण्याचा उपाय म्हणजेच तुझे पाय, तुझ्या पायाचे चिंतन आणि त्यांची सेवा. माझ्याकडून देखील तुझ्या पायाचे सतत चिंतन न झाल्याने माझ्याजीवाची देखील चरफड होते आणि जगणे नकोसे होते. तुकाराम महाराज म्हणतात भवरोगातून तारून जाण्याचा उत्तम मार्ग तसेच खऱ्या सुखाला पदरात पाडून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आणि विटेने देखील आजवर जे धरून ठेवले आहेत ते गोमटे असे तुझे पाय हे सर्व सुखांची खाण आहेत.


अभंग क्र.१४७१
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥
तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥
आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । म्हणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥

अर्थ

हे संत जन हो माझे बोलणे तुम्ही कृपया करून ऐका हे मी तुम्हाला हात जोडून मी विनवीत आहे. काही लोक आपल्याला जे वाटेल ते तर्ककुतर्क करतात, ते काहीही बडबडतात त्यांना कोणी थांबवावे? आमच्या जिवाच्या अंतर्भाव तो रुक्मिणीचा पती पांडुरंग जाणतो आहे. माझे चित्त पांडुरंगाच्या पायी गुंतलेले आहे त्यामुळेच मला त्याच्यावाचून दुसरे काहीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही भाविक माझ्या मताला मिळतात तर काही तर्किक माझे मत मानत नाही त्यामुळे माझ्या चित्ताला खेद होतो व त्यामुळे माझा मनोभंग होत आहे.


अभंग क्र.१४७२
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥
काय पळे सुखे चोर लागे पाठी । न घालावी काठी आड तया ॥२॥
जयाचें कारण तोचि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥
तुका म्हणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥

अर्थ

जगामध्ये असे कोणीही नाही की ज्याला घर-दार, कन्या, पुत्र, घोडे वगैरे आवडत नाही. कडू लिंबाचा रस कोणी घेईल काय, परंतु दुःख, व्याधी, पीडा नष्ट होण्या करिता रोगी मनुष्य मोठ्या आवडीने कडुलिंबाचा रस घेतो. व्यर्थ कोणताही मनुष्य पळत सुटेल काय, परंतु त्याच्या मागे चोर लागले तर तो पडणारच व पळणाऱ्याला कोणीही आडकाठी घालू नये. ज्याचे काम त्यालाच योग्यप्रकारे जमते त्यामुळे ज्याचे त्याचे काम करताना त्याला कोणीही आडवे येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात निजठेवा तेव्हाच सापडतो जेव्हा आपण आपला जीव ओवाळून बळी देतो.


अभंग क्र.१४७३
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥
माग पाहोनियां जातों तोच सोयी । न वजावें कायी कोणी सांगा ॥ध्रु.॥
धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥२॥
वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुम्हां एक सांगतों मी ॥३॥
तुका म्हणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावे ॥४॥

अर्थ

देवा माझ्याकडून काही अन्याय झाला असेल तर तो अन्याय पदरात घ्या व मला क्षमा करा. आणि मला चालण्यासाठी योग्य मार्ग दाखवा मग तो मार्ग मी इतरांना दाखवेल. मागे संत ज्या मार्गाने चालत होते त्याच मार्गाने मी चालत आहे, त्या मार्गाने कोणी जाऊ नये काय? देवा आता मला चांगला सरळ सोपा मार्ग सापडला आहे त्या मार्गाने मी जात आहे मग तुम्ही मला त्रास पीडा का देता?आणि देवा तुम्ही हे लक्षात ठेवा की, मी ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गाने मला कोणी जरी दिसले तरीही मी भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा जर एखादा शूर योद्धा युद्ध करता करता मेला तर त्याला वीरगती प्राप्त होते किंवा तोच योद्धा युद्ध करता करता युद्धात त्याने चांगले पराक्रम करून युद्ध जिंकले तर त्याला सर्व लोकांमध्ये मान प्राप्त होतो.


अभंग क्र.१४७४
नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥१॥
निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥
निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥२॥
आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥३॥
तुका म्हणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥४॥

अर्थ

मी जे काही बोललो आहे ते सर्व शब्द माझे नाही तर प्रत्यक्ष विठोबाचेच आहे. विठोबाच माझ्या मुखातून बोलत आहे मी त्या विठोबाचा मजूर आहे. भक्ती करण्याचा मी निश्चय केला आहे आणि भक्ती करून घेण्यास विठोबाने मला सहाय्य केले व यानेच माझी लाज राखली. आता मला संसारांमध्ये कसलेही भय राहिले नाही. सर्व भय नष्ट झाले आहे त्यामुळे मी आकाश यापेक्षाही मोठा झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा तर सर्व संतांचाच प्रसाद आहे व संतांमुळे मला भक्ती ब्रम्‍हज्ञानाचा लाभ झाला आहे.


अभंग क्र.१४७५
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥
आतां माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥
शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥
तुका म्हणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥३॥

अर्थ

अरे मना तुझ्यात कानाजवळ पांढरे केस मृत्यूची भेट जवळ आले आहे हेच उतारवयात तुला सांगत आहेत. आता हे मना तू सावध हो आणि ओमकार स्वरूप हरिचिंतन करून प्रत्येक दिवस पुण्याचा आहे असे समजून कार्‍याची सिद्धी होईपर्यंत हरीचे चिंतन कर. तुझ्या आयुष्यातील शेवटची घटका, बुडण्याची वेळ लागायचा नाही त्यामुळे सावध हो व याकरिता मृत्यू जवळ आला आहे असे समजूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण हरिचिंतन करण्यात घाल. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हरीचे, कुळदैवतेचे चिंतन कर व हरी वाचून सर्व मिथ्या आहे हे समजून प्रत्येक वेळी हरिचिंतन कर.


अभंग क्र.१४७६
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥
आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥
तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥

अर्थ

ज्या वेळी हरी व मी एकच सूत्रात ओवले जाऊ त्यावेळी मी मागे केलेले अध्यात्मिक प्रयत्न यशस्वी झाले असे समजेन. पाहुणे हे केवळ सुखसोहळा पुरतेच असतात. परंतु हरीच्या सुखापुढे सर्वकाही कमीच आहे. या कारणामुळे हरीच्या ठिकाणी आदर ठेवावा त्यामुळे अध्यात्मिक मार्ग थोडा सोपा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरी सारखा अलभ्य लाभ हातात आल्यानंतर सर्व लाभ आपोआप नाहीसे होतात.


अभंग क्र.१४७७
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥
मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥
जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥
तुका म्हणे निज भोगईल निजता । नाहीं होईल सत्ता दुजियाची ॥३॥

अर्थ

देवाला सर्वच अर्पण करावे त्यामुळे आपले सर्व संचित, प्रारब्ध, क्रियमाण नाहीसे होतात जर प्रारब्ध, संचित, क्रियामाणच नष्ट झाले तर पुन्हा जन्म मरण राहील कोठे कारण कर्मरुपी बीजाचे अंकुर ज्ञानाच्या अग्नीने जळून जातात. ज्या हरीने आपल्याला हा देह दिला शेवटी हा देह त्यालाच अर्पण करून त्याच्या ऋणातून मुक्त व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात जर आपण नीजस्वरूपाच्या ठिकाणीच प्रवेश केला तर आपल्याला भोग ही नीचजस्वरूपाचाच घडेल मग तेथे कोणत्याही अनात्म वस्तूची सत्ता आपल्यावर चालणार नाही.


अभंग क्र.१४७८
जळों अगी पडो खान । नारायण भोगिता ॥१॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥
भोजनकाळीं करितां धंदा । म्हणा गोविंदा पावलें ॥२॥
तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥३॥

अर्थ

मी भोक्ता आहे असे म्हणणे आगीत पडून जळून जावो, दूर कोठेतरी घाणीत पडो कारण भोक्ता हा केवळ नारायणच आहे. अशी ज्याची वाणी वदत असते म्हणजे असे जो कोणी म्हणतो की नारायण सर्व भोक्ता आहे त्याचे सर्व भोग नारायणच भोगत असतो. जेवण करताना किंवा कोणताही धंदा करताना मी जे काही करतो ते सर्व गोविंदाला पावले असे म्हणा मग आपोआपच गोविंदाला ते सर्व काही प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात हरीची भक्ती करताना कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही केवळ सर्व भोग हरीला अर्पण आहे असे म्हणा मग सर्व कर्म त्याला आपोआप अर्पण होते व तेच त्याला आवडते.


अभंग क्र.१४७९
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥
संतांपाशीं ज्याचा नुरेचि विश्वास । त्याचे जाले दोष बळीवंत ॥२॥
तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥३॥

अर्थ

जो संतांना कोणत्याही कारणावरून त्रास देतो त्यांचे उभय लोकात चांगले होणार नाही. असा मनुष्य देवाचाही दावेदार आहे व त्याला पृथ्वी देखील आश्रय देत नाही. ज्यांचा संतांच्या बोलण्यावर विश्वास नाही त्यांचे पाप बलाढ्य आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जसे गाईचे दूध काढण्याकरिता तिचे वासरू पुढे आणावे लागते नाहीतर गाय मारण्याचा धावते, त्याप्रमाणे जर संतांचा आदर केला तर तेव्हाच देव, भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो नाहीतर जो संतांचा आदर करत नाही त्यांचे देव उभय लोकांमध्ये कल्याण होऊ देत नाही.


अभंग क्र.१४८०
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥
उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥
दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाचीच मूर्ती ॥२॥
तुका म्हणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥

अर्थ

स्वच्छ पाण्यामध्ये शेण, मलमूत्र टाकून मनुष्य कसा पवित्र होईल? त्याप्रमाणे जो मनुष्य संतचरण सेवेला विन्मुख होतो त्याचा उद्धाराला कोठेही जागा राहत नाही. जो मनुष्य जहाजाची सांगड तोडतो तो बुडल्या शिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे आताताई मनुष्य आहेत ते संतांना दुःख देतात, असे मनुष्य पापाचीच मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी प्रारब्ध फिरते त्यावेळी संतांना त्रास देण्याची, त्यांना दुखावण्याची अशा मनुष्यांना आपोआप बुद्धी येते.


अभंग क्र.१४८१
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥
तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥
जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥२॥
तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥

अर्थ

देवा मी माझ्या देहाला खूप त्रास द्यावे असे तुम्हाला वाटत आहे की काय हे मला काही कळत नाही. मी तुम्हाला इतक्या वेळा हाक मारतो तरीदेखील तुम्ही माझ्याकडे साधे पहात देखील नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा देवा त्यामुळे माझ्या अंतःकरणाला खूप दुःख होते आहे, देवा मी कंटाळून वनात निघून जावे या उद्देशाने तर तुम्ही माझ्याशी बोलत नाही ना? तुकाराम महाराज म्हणतात नाही तर ट मी एखाद्या पर्वताच्या दरी मध्ये जाऊन राहावे असे तुम्हाला वाटत आहे काय?


अभंग क्र.१४८२
येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा ॥१॥
धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥
जगा कथा नांव । निराशेनें नुपजे भाव ॥२॥
तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥

अर्थ

हे पुरुषोत्तमा केंव्हा तरी तुला तुझ्या नावाची लाज वाटेल आणि केंव्हा तरी तू माझा उद्धार करशीलच. मी धीर धरून राहिलो आहे नाहीतर माझे मन फार त्रासलेले आहे. सर्वत्र हरिकथा करतो आहे व सांगतो आहे की हरीकथा ही भवनदीतून तारणारी नौका आहे. पण माझ्यासारखी तू सर्वांची निराशा केलीस तर देवा लोकांचा भक्तीभाव तुझ्या विषयी कसा वाढणार? तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मी जे काही बोलत आहे हे खरे आहे की खोटे आहे याला तूच साक्षी आहेस.


अभंग क्र.१४८३
नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥१॥
रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥
मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥
तुका म्हणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥३॥

अर्थ

मी जप,तप, अनुष्ठान वगैरे काहीच जाणत नाही आणि काळाने तर माझा पाठलाग केला आहे. या भीतीनेच तर मी देवाच्या पाठीमागे लागलो आहे. आता त्याने माझा सांभाळ करून त्याच्या ब्रिदाचाही सांभाळ करावा व काळ आयुष्याचे माप मोजत आहे. एकदा की हा मनुष्य देह गेला, रात्र झाली मग तेथे कोणाचे काय चालणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात काळ रुपी चोराच्या हातून आत्तापर्यंत जे कोणी वाचले आहेत त्यांनी उरलेले आयुष्य हा मोठा लाभच आहे असे समजावे ,मनुष्य देह आयुष्याचा लेष व अनेक दुःखाचे निवारण करू शकते.


अभंग क्र.१४८४
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी ॥१॥
तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु.॥
आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥२॥
तुका म्हणे गुण झाला । हा विठ्ठल हीनशक्ती ॥३॥

अर्थ

देवा मला आता असे समजले आहे की तुमच्या हातांमध्ये काहीच सत्ता नाही. तुमच्या नावातही काहीच बळ नाही. त्यामुळे आमचे तुमच्या विषयीचे प्रेम होते ते खंडित होत चालले आहे. पण देवा तुमच्या विषय असे बोलणे म्हणजे एक प्रकारचे पापच आहे आणि असे बोलताना आम्हालाही त्रास होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझी शक्तिहीन झाली हे मात्र निश्चित.


अभंग क्र.१४८५
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥
कोण्या पापें उदय केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥
न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥
तुका म्हणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥३॥

अर्थ

देवा माझ्या अंगी असे विकार का लागू दिले आहेत? देवा माझे असे कोणते पाप उदयाला आले आहे की त्यामुळे मला प्रलय दिसत आहे. अरे देवा सापाला जर त्याच्या विषाने त्रास होत असेल तर त्याला होणारा त्रासही मला पाहवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पापाचे फळ हे दुखच आहे हे मला माहीत आहे व दुष्ट लोकांनी पाप केले व त्यांना त्रास झाला तर ते देखील मला पहावत नाहीये.


अभंग क्र.१४८६
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥
न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥

अर्थ

देवा माझ्याकडे येण्यासाठी तुम्ही धाव घ्या, शीघ्रता करा आणि तसे जर तुम्हाला जमत नसेल तर येथून माझा दंडवत घ्या. देवा तुम्ही जर आमच्याकडे धावत आला नाही तर त्यामुळे आपल्या दोघांचाही यामध्ये कमीपणा सिद्ध होईल. देवा आता माझी भेट घेण्याविषयी तुम्ही अधिक धीर धरू नका संथ गतीने तर अजिबात चालू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझी लवकर भेट घेत नाहीत त्यामुळे माझी वाणी तुमची गुणगान करण्यास लाजते आहे.


अभंग क्र.१४८७
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥
मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥
भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥४॥
तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद करा ॥३॥

अर्थ

मालकाने सेवकाला जो निरोप दिला तो मालकाने जसा सांगितला तसा सांगणे हे सेवकाचे कर्तव्य आहे मग तो निरोप बरोबर आहे की चुकीचा ते मालक ठरवून घेईल. मनाचे मूळ हरीचे रूप आहे त्या ठिकाणी ते स्थिर करावे आणि सर्व गुण हरीच्या पायाजवळ आहे असे समजावे. देवा तुमच्या भेटीविषयी मी तातडी करत आहे आणि तुमच्या वरून हा देह ओवाळून टाकावा असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे काम म्हणजे मला भेट देण्याचे आहे त्यामुळे मला भेट देऊन तुम्ही तुमचे ब्रीद सांभाळावे.


अभंग क्र.१४८८
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥
आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥
मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥
तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरी विज्ञापना ॥३॥

अर्थ

उद्वेग केला तर अनेक मार्ग फुटतात म्हणजे, हे करू, का ते करू याच्या काळजीने माझे शरीर माझे राहिले नाही असे मला वाटते आहे देवा. आता याविषयी काय विचार करावा हे पांडुरंगा तुम्ही जाणता. देवा मला तुमच्या दर्शनाची फार इच्छा झाली आहे त्याकरिता माझ्या जिवाचा नाश जरी झाला तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा जोपर्यंत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत तोपर्यंत मी तुमच्या भेटीची मागणी तुम्हाला करत राहणार आहे.


अभंग क्र.१४८९
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥
अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥
क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावेचि वाव ॥२॥
तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥

अर्थ

ज्याच्या संगतीने दुःख होते अशा विषयांच्या ठिकाणी कोण प्रेम करणार? आता सर्व संसार बाजूला ठेवू आणि सावळ्या हरीशी संबंध जोडू. सर्व विषय क्षणभंगुर आहेत याविषयी विचार करून त्याचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले मी हरीच्या रूपाशी संबंध जोडले त्यामुळे मला उत्तम स्थान प्राप्त झाले.


अभंग क्र.१४९०
गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥
उगीच कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥
तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥

अर्थ

दुष्ट मनुष्य सुखाने नरकात गेलात तरी जावो परंतु त्या कलंकी मनुष्याला स्पर्शदेखील करू नये. विटाळलेल्या स्त्रीच्या स्पर्शाने पानवेली ज्याप्रकारे नाश पावते तसेच दुष्ट माणसाच्या स्पर्शाने आपले हित होत नाही. त्यामुळेच त्याच्यात व आपल्यात अंतर ठेवले तरच चांगले. विटाळा ने विटाळ होतो व एकमेकांच्या स्पर्शाने वृक्षाला आलेली चांगली फळे का नासून टाकावे म्हणजे अधमाची संगती करून चांगल्या माणसाने आपले अनहीत का करून घ्यावे? तुकाराम महाराज म्हणतात लोणी जर शेणात घातले तर त्याचा काय उपयोग आहे?


अभंग क्र.१४९१
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥
विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥
भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥
तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥

अर्थ

श्रीपती ने केलेले चरित्र किती वर्णन करावे? पद्मनाभा च्या ठिकाणी दृढ विश्वास ठेवावा म्हणजे तो हरी मोठा लाभ देईल. ज्याचा शुद्ध भक्तिभाव आहे तो, देवाने व गुरूने सांगितलेले काम व्यवस्थितपणे करतो. तुकाराम महाराज म्हणतात देव भोळा आहे परंतु आपला संदेह आपल्याला नागवित असतो.


अभंग क्र.१४९२
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥
कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥
तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥

अर्थ

पूर्वपुण्य असल्याशिवाय मनुष्य परमार्थाकडे वळत नाही कारण पूर्वपुण्य चांगले असेल तरच मनुष्यला परमार्थाची आवड लागते. वरवर हरीची भक्ती केल्याने काहीच उपयोग होत नाही हरीची कृपा होण्याकरिता लाळ घोटावी लागते. धन द्रव्याच्या जोरावर देव जोडला जातो असे केंव्हाही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण केलेले पापच आपल्या स्वहिताच्या आडवे येते.


अभंग क्र.१४९३
अतित्याईं बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥१॥
हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥
अवचटें अग्नि जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥२॥
जैसें तैंसें दावी आरसा । नकट्या कैसा पालटे ॥३॥

अर्थ

एखादया आततायी मनुष्याने गंगेत आत्महत्या केली तर ते पाप त्यालाच लागेल. ज्याने ज्या प्रकारचे कर्म योजले व केले आहे त्याप्रमाणेच त्याला फळ मिळत असते. एखादया मनुष्याच्या शरीराला अचानक जर अग्नी लागला आणि त्यापासून त्याने स्वत:चा सांभाळ केला नाही तर त्याला दु:ख प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, “आरसा जे खरे स्वरुप आहे तेच स्वरुप दाखवित असतो आरशासमोर जर एखादा नकटा उभा राहिला तर त्याचे स्वरुप कसे बदलेन ?”


अभंग क्र.१४९४
हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥
नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥
अवगुणी बाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥
तुका म्हणे फजितखोरा । म्हणता बरा उगा रहा ॥३॥

अर्थ

एखाद्या हेंदर्‍या मनुष्याला कितीही चांगले उद्देशाने त्याचे कान भरविले तरी काहीच उपयोग होत नाही, तो फक्त तुम्हाला मान हलविण्याचे काम करतो, असे जरी असले तरी त्याच्या कानाचे भोके रिकामेच राहतात. अशा नष्ट लोकांना कितीही चांगला उद्देश करण्याचा प्रयत्न केला तरी ते भक्तिपूर्वक ग्रहण करत नाही त्यामुळे मी येथे काहीच स्पष्ट सांगत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त अवगुणांनी बाटले आहे त्याला किती चांगला उद्देश सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो उद्देश कळत नाही.


अभंग क्र.१४९५
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥
काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥
तुका म्हणे येथे करावा उकल । लागेचि ना बोल वाढवूनि ॥३॥

अर्थ

अभक्त मनुष्याने कितीही कुशलता पूर्वक शब्दाला शब्द जोडून कवित्व केले तरी ते देवाला मान्य होत नाही. ज्याच्याकडे खरेच अनुभव आहे त्याचे बोलणे इतर लोकांना पटते व त्या अनुभवाच्या गुणामुळे त्याचे बोलणे सर्वांना आपल्याकडे वेधून घेते. एखाद्या शूद्र धातूला वरवर नुसता सोन्याचा मुलामा लावला आणि तो धातू अग्नी पुढे नेला तर त्याच्यावरील सोने वितळून जाते व त्या धातूचे खरे स्वरूप सर्वांच्या समोर येते अगदी त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने कितीही काव्यरचना केली तरी त्याचे संतांपुढे खरे स्वरूप उघडे पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरोखरच अनुभव आहे त्या ला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही कारण त्याच्या अनुभवावरूनच त्याचे खरे स्वरूप स्पष्ट होते.


अभंग क्र.१४९६
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥
तुका म्हणे याचा धिक्कारचि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥

अर्थ

मूर्ख मनुष्याला कितीही उपदेश केला तरी त्याला समजत नसतो आणि त्याच्या कोणत्याही कामात ताळमेळ नसतो. त्याला चांगले बोललेले व चांगले माणसे समजत नाही. अशांची संगती मंगळ असते वेडगळ माणसांना वेळ आणि काळ कळत नाही व अशा प्रकारच्या माणसांना आपण कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक लोक आहेत की ज्यांची बुद्धी गाढवा होऊनही खालची पातळीची आहे आणि अशांचा धिक्कार करणे हेच योग्य आहे.


अभंग क्र.१४९७
एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती ॥१॥
तेणें जालें अवघें काम । निवारला भवभ्रम ॥ध्रु.॥
परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥
तुका म्हणे फार । नाहीं लागत व्यवहार ॥३॥

अर्थ

आम्ही आमच्या चित्तामध्ये एक रुक्मिणी चा पती म्हणजे पांडुरंग धारण केला आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण झाले आहे व आमचा भव भ्रम म्हणजे जगत सत्या हा भ्रम नाहीसा झाला आहे. आम्हाला परद्रव्य आणि परनारी हे विषयाप्रमाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला यापेक्षा अधिक व्यवहार करावे लागत नाही.


अभंग क्र.१४९८
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥
कैसी जाली दिशाभुली । नवजाति ये वाटे चाली ॥ध्रु.॥
संसाराची खंती । मावळल्या तरी शक्ती ॥२॥
तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥

अर्थ

काही मनुष्य मृत्यूच्या भीतीने नुसतेच पळत असतात परंतु त्यांना हे समजत नाही की मृत्यु तर त्याच्यासोबत आहे. अशा लोकांची दिशाभूल कशी झाली असते ते पहा ज्या मार्गाने मृत्यूचे भय राहात नाही तो मार्ग म्हणजे परमार्थ आहे आणि हे डोळस मनुष्य याच मार्गाने नेमके जात नाहीत. अशी माणसे शक्तिहीन झाली तरी संसाराची काळजी करतच राहतात. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा अशा दिन मनुष्याची बुद्धी चुकलेली असते ते त्याला चुकीच्या मार्गाने नेते.


अभंग क्र.१४९९
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥१॥
लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥
लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥२॥
तुका म्हणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिली तीं ॥३॥

अर्थ

अभिमानाचे तोंड काळे व्हावे कारण अभिमान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व मीच आहे असा भ्रम, अंधार निर्माण करतो. अभिमान आपल्याला होणाऱ्या परमार्थसुखाला हातोहात पळून नेतो व तोंडत दुःखाची माती घालतो. अभिमान झाला की आपल्या ठिकाणी लाज निर्माण होते व लाज निर्माण झाली की आपण संतांना शरण जात नाही व संतांना शरण गेलो नाही तर आपल्या हातून चांगले कर्म घडत नाही आणि चांगले कर्म घडू नये यासाठी जणू लाज उत्पन्न होत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या मनात पाप आहे कुश्चळपणा आहे अशी माणसे विटंबनेच्या डोहात पडतात.


अभंग क्र.१५००
चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लांछन ॥१॥
यासी आह्मीं करणें काय । वर्षो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥
ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥२॥
तुका म्हणे त्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥३॥

अर्थ

चोराच्या मनात नेहमी चोरीच असते आणि मला कोणी पडते की काय ही भीतीही नेहमी असते. आमचे बोलणे असेच आहे त्याला आम्ही काय करणार जसा मेघ भेदभाव न करता सर्वत्र सारखा वर्षाव करत असतो त्याप्रमाणे आम्ही सर्वांना सारखाच व चांगला उपदेश करत असतो. ज्याच्या दुःखावर माशी बसते आणि तो तेथेच हालचाल करतो, त्याप्रमाणे त्याच्या मनात पाप असते त्याचे नाव आम्ही जरी नाही घेतले तरी त्याला आमचे बोलणे झोंबत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंगात खोड असते त्याप्रमाणे त्याला त्याच्या खोडी प्रमाणेच म्हणजे कर्माप्रमाणे फळ मिळत असते.


सार्थ तुकाराम गाथा १४०१  ते १५०० 

2 thoughts on “सार्थ तुकाराम गाथा 1401  ते 1500”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *