सार्थ तुकाराम गाथा 1601 – 1700

सार्थ तुकाराम गाथा 1601 – 1700


अभंग क्र.१६०१
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥
सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥
कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥
हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥३॥
तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥
तुका म्हणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥५॥

अर्थ

अरे तुझ्या आयुष्यातील कितीतरी काळ, घटका, पळ गेले आहेत तरी या भव सागरातील उपाधींना तू माझे माझे असे का म्हणत आहेस? हा काळ हातात सळ घेऊन बसला आहे तुझ्या आयुष्यातील शेवटची वेळ आली की तो काळ तुला एक पळ, एक घटका देखील इकडेतिकडे होऊ देणार नाही. अरे तुझे केस पिकले, तुला कानाने ऐकायला कमी झाले, डोळ्याने दिसायला कमी झाले तरी तुला अजून कसे कळत नाही? अरे हित तुला समजत नाही तरी तुझ्या तोंडात माती पाडून तू घेत आहेस. अरे तुला माहित आहे की एक दिवस मी देखील जाणार आहे तरीदेखील घर कुठे बांधावे, त्याचा पाया कोठे घ्यावा, म्हणजे घर मजबूत होईल ते चांगले झाले पाहिजे याविषयी शोध घेतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू वेगाने पंढरीराया ला शरण जा.


अभंग क्र.१६०२
आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त ॥१॥
फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥
प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥

अर्थ

हे माझ्या मायबापा आता तूच माझ्या पापाला प्रायचित्त देऊ शकतो. देवा ते पाप म्हणजे मी आजपर्यंत अनेक दुष्ट, अज्ञानी, वेड्या मनुष्यांची बोलून फजिती केली त्याचा मला विटाळ झाला आहे तो विटाळ तूच निवारण करून टाक. देवा आता तू मला तुझा प्रेम रस पान द्यावे आणि माझ्या अंतःकरणात तुझा वास कर. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तूच माझ्या जिवाचा जिवलग आहेस.


अभंग क्र.१६०३
कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा ॥१॥
अंगीं असोनियां बळ । होसी खटयाळ नाट्ट्याळ ॥ध्रु.॥
आम्ही नरकासी जातां । काय येईल तुझ्या हातां ॥२॥
तुका म्हणे कान्हा । क्रियानष्टा नारायणा ॥३॥

अर्थ

देवा तू अंगाराखून काम करणारा आहेस तुला जर मी हाक मारली तर तू का येत नाहीस? देवा तुझ्या अंगी असे बळ आहे की तू हवे ते करू शकतोस तरीही तू असा खट्याळ आणि नाठाळ का झालास.? अरे देवा आम्ही जर नरकाला गेलो तर तुझ्या हाताला काय येणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे कृष्णा, कान्हा, नारायणा तू क्रिया नष्ट आहेस.


अभंग क्र.१६०४
माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा भाक देई ॥१॥
पाहतां तंव उफराटें । घडे तई भाग्य मोठें ॥ध्रु.॥
बहु साधन मोलाचे । यासी जोडा दुजें कैचें ॥२॥
नका अनमानूं विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥३॥

अर्थ

देवा माझे पाय असावे आणि तुझे डोके असावे असे काहीतरी करण्याचे वचन तू मला दे. असे पाहिले तर हे उरफाटे दिसते पण असे जर घडले तर मी माझे मोठे भाग्य समजेल. हे साधन खूप मोलाचे आहे आणि या साधनाला दुसऱ्या कोणत्या साधनांची जोड असू शकेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला जे काही मागितले आहे ते फार विचारपूर्वक मागितले आहे ते तुम्ही आम्हाला देण्यास हायगय करू नका कारण यापूर्वी आम्हाला तसा धडा झाला आहे.


अभंग क्र.१६०५
पवित्र तें अन्न । हरीचिंतनीं भोजन ॥१॥
येर वेठया पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥
जेऊनि तो धाला । हरीचिंतनीं केला काला ॥२॥
तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें॥३॥

अर्थ

हरिचिंतन चालू असताना जे अन्नसेवन केले जाते ते अन्न पवित्र आहे. हरिचिंतन केल्याशिवाय अन्न भक्षण करणे म्हणजे ते चामड्याच्या पिशवीत काहीतरी भरावे असेच होते. हरिचिंतन करता करता अन्नाचा काला करूनच जो जेवण करतो तो खरा तृप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात भोजन करताना विठ्ठल नाम घेतले तर त्या अन्नाला मोठी गोडी येते.


अभंग क्र.१६०६
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥
अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥
काय नाहीं सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥३॥

अर्थ

हे पुरुषोत्तमा हा तुझ्या चरणाचा महिमा आहे. तो महिमा म्हणजे असा आहे की अंध व्यक्तीला देखील माणिक मोत्याची चांगल्याप्रकारे पारख होऊ शकते आणि मुका व्यक्ती स्पष्ट बोलू शकतो. हे पंढरीनाथा तुझ्या हातात कोणती सत्ता नाही? तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तू तर माझ्या सारख्या अज्ञानी व्यक्तीकडूनही काव्य करून घेतले आहेस.


अभंग क्र.१६०७
बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥
पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥
आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥
तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥

अर्थ

प्रारब्ध, कर्म हे फार बलवंत असतात त्यामुळे तेच शरीराला भोग घडवितात. प्रारब्ध कर्म पापी मनुष्याला पुढे घालून आणखी पतनाला नेत असतात. जे वाईट कर्मे केलेली असतात, जे वाईट आचरण केलेले असतात ते पोटात सलतात कारण त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा‌ ज्याणे तुझे भजन आणि सेवा केली नाही त्याच्याकडून तर नक्कीच पाप घडते असते.


अभंग क्र.१६०८
जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारितया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥
निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥
खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुश्चित्ता रे देखोनि तें न्यावें । म्हणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें ॥२॥
संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरी थोर पुण्यें बहुतीं ॥३॥

अर्थ

खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥४॥@
खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख । आप पर ते ही नाहीं देहभाव सकळिक ॥५॥@
शिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥६॥@
बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी । घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणया ती पासी ॥७॥@
धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥८॥@
ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें त�


अभंग क्र.१६०९
देवें देऊळ सेविले । उदक कोरडेचि ठेविले ॥१॥
नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणापें पाहीं ॥ध्रु.॥
पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥
वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥
तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥

अर्थ

हा देव आपल्या देहरूपी देवळामध्ये राहतो व आपल्या स्वस्वरूपाचे पाणी कोरडे करून ठेवतो. अरे हा माझा स्वःताचा विचार किंवा अभिप्राय नाही तर तू याचा विचार स्वतःचीच करून पहा. अविद्या रूप पाटाला मी देह आहे असा भ्रमाचा पूर आला आणि त्या पुराने संपूर्ण नद्या आणि समुद्र तुडुंब भरले आहे. मायारूपी वांजेच्या घरी जीवरूपी तान्हे बाळ आहे आणि त्याचे दोन कान म्हणजे मी आणि माझे यांच्यात‌ भ्रमाची बाळी घातली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला काय म्हणायचे आहे ते तुम्ही समजून घ्या आणि माझ्या बोलण्याचा गोडपणा त्याला समजेल ज्याला खरंच अनुभव आहे.


अभंग क्र.१६१०
अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥२॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थाचे ॥३॥

अर्थ

हे नारायणा निर्जीवामध्ये चेतन आणणे हे तुम्हाला अशक्य नाही तुम्ही हे सहज करु शकता. माझ्या स्वामीने मागे एक गुरुपुत्रला परत आणले आहे असे पोवाडे आम्ही ऐकले आहे. परंतु देवाने आता अशा गोष्टी प्रत्यक्ष का दाखवू नये? आम्ही थोर भाग्यवंत आहोत की आम्ही स्वतःला त्यांचे दास म्हणून घेतो आहे आणि आम्ही स्वतःला त्यांचे दास म्हणून घेतो हे काय थोडे आहे काय. तुकाराम महाराजांचा नारायणा तुम्ही तुमच्या सामर्थ्याचे सोहळे आम्हाला दाखवा आणि माझे डोळे निववा म्हणजेच शांत करा.


अभंग क्र.१६११
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंतें काय । न सरे आय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥
यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥

अर्थ

खरा दाता तोच जो नारायणाचे स्मरण करणे घडवितो. जो दाता दान देतो पण त्या दानाने भूक भागत नाही अशा नाशवंत दानाचे काही उपयोग आहे काय? संत आपल्याला सन्मार्ग दाखवितात त्यांनाच काकुळतीला येऊन शरण जावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्या दात्याच्या दानाने कोणतेच कर्तव्य उरत नाही, राहत नाही त्याचेच खरे उपकार मानावेत.


अभंग क्र.१६१२
लाडकी लेक मी संताची । मजवरी कृपा बहुतांची ॥१॥
अखई चुडा हातीं आला । आंकण मोती नाकाला ॥ध्रु.॥
बोध मुराळी शृंगारीला । चवऱ्यांयशीचा सिक्का केला ॥२॥
तुका तुकी उतरला । साहानकेचा कौल दिला ॥३॥

अर्थ

मी संतांची लाडकी लेक आहे त्यामुळे माझ्यावर सर्व देवांची व लोकांची कृपा आहे खूप जणांची कृपा माझ्यावर आहे. संतांनी माझ्या हाती अक्षय चुडा म्हणजे अबाधित सत्यरुपी कंकण घातले आहेत आणि नाकामध्ये मुक्ती रुपी मोत्याची नथ घातली आहे. मी बोध रुपी शृंगार केला आणि चौऱ्यांशी योनीचा शिक्का ज्याच्यावर आहे अशी माळ घातली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या कृपेच्या कसाला उतरलो त्यामुळे संतांनी मला सहानुभूतीचा कौल दिला आहे.


अभंग क्र.१६१३
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥३॥

अर्थ

काही लोक संतांना मान देत नाहीत त्यांचा सन्मान करीत नाहीत परंतु मुसलमान लोकांना ते देव समजतात. हे देवा असे लोक पोटासाठी गुलाम झालेले असतात परंतु आशे मुळे वासनेमुळे त्यांची विटंबना होते. असे लोक नीच लोकांच्या पायाला लोटांगण घालतात आणि त्यांचे चरण वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही कारण ते अज्ञानामध्ये जगत असतात.


अभंग क्र.१६१४
अहो कृपावंता । होय बुद्धीचा ये दाता ॥१॥
जेणें पाविजे उद्धार । होय तुझा पायी थार ॥ध्रु.॥
वदवी हे वाचा । भाव पांडुरंगी साचा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे अंतर वसावा ॥३॥

अर्थ

हे कृपावंत दाता तूच मला चांगली बुद्धी देणारा हो म्हणजे त्यामुळे माझा उद्धार होईल व तुझ्यापायी मला आश्रय मिळेल. माझी वाणी माझ्याकडून पांडुरंगाचे नाम वदवून घेईन आणि त्याच ठिकाणी खरी भक्ती भाव ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही माझ्या अंतःकरणात येऊन रहा.


अभंग क्र.१६१५
नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥
विटेवरी भावे ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥

अर्थ

मला जो मंत्र माहित आहे तो मंत्र मी सर्वांना सांगितला आहे आणि कोणालाही मी त्या मंत्रापासून वंचित ठेवले नाही. आणि तोच मंत्र मी माझ्या जीवाशी घट्ट धरून ठेवला आहे. विटेवर असलेल्या समचरणाच्या ठिकाणीच मी माझा भक्तिभाव ठेवला आहे व त्याच ठिकाणी माझी दृढ भक्ती, विश्वास ठेवून मी माझी कंबर कसली त्यामुळे मी संसारातून पार पडलो. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वी जे भक्त उद्धार पावले त्या भक्तांनी हा मार्ग मोकळा करून ठेवला आहे.


अभंग क्र.१६१६
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥
रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥
तुका म्हणे भय धरी रज्जूसाठीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥

अर्थ

पाणी उतारावर गतीने तर सारख्या जमिनीवर स्थिर पणाने आणि खाचखळग्यांच्या ठिकाणी खळखळ करत वाहते. ब्रम्‍हज्ञान प्राप्त होण्याचे वर्म सोपे आहे परंतु मन स्वाधीन नसल्यामुळे ते प्राप्त होत नाही आणि माणसाच्या चित्तात गाढा भ्रम आहे की “मी देह” आहे त्यामुळे ब्रम्‍हज्ञान होण्यास कठीण जाते. पाण्यात सुर्‍याचे प्रतिबिंब पडते ते प्रतिबिंब म्हणजे तुम्ही सूर्य समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात रस्त्यात दोरी पडली की दोरी सर्पा सारखी दिसते मग माणसे त्या दोरी चे भाय मनात धरतात परंतु ते भय कोठपर्यंत असते जोपर्यंत आपल्याला दोरीचे ज्ञान होत नाही तोपर्यंतच.


अभंग क्र.१६१७
आवडी येते गुणें । कळों चिन्हें उमटती ॥१॥
पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥
डोहोळेयाची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥
तुका म्हणे मागून घ्यावें । मना खावें वाटे तें ॥३॥

अर्थ

आवडीचा व्यक्ती समोर आला मग आपण त्याच्याबरोबर कसे वागतो यावरूनच त्याच्याविषयी आपले किती प्रेम आहे ते समजून येते. त्या व्यक्तीविषयी असलेले पोटातील प्रेम ओठा द्वारे बाहेर पडते कारण मन चित्ताला ग्वाही असते. गर्भवती स्त्रीला हे खायचे, ते खायचे असे डोहाळे लागते पण खरेतर ती भूक गर्भाची असते परंतु डोहळ्याच्या रूपाने ते बाहेर पडते, ताट एकदम चकाचक धुतले की त्यामध्ये कशाचेही प्रतिबंध ऊमटते अगदी त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात एकदा मनुष्य पंक्तीत जेवण्यास बसला तर तो त्याला जे वाटेल ते मागून घेतो व खात असतो.


अभंग क्र.१६१८
काय ऐसी वेळ । वोढवली अमंगळ ॥१॥
आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥
पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥
तुका म्हणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी ॥३॥

अर्थ

देवा आज अशी वाईट वेळ माझ्यावर का बरे ओढवली असेल? आज माझे मन दुखावले गेले आहे आणि कथे काळी मला कष्ट झाले आहे. माझे पूर्व जन्माचे काहीतरी पापच आहे त्यामुळे मला कथेच्या वेळी या वाईट दुष्ट लोकांचे दर्शन झाले. तुकाराम महाराज म्हणतात हे दुष्ट लोक कथेला आलेले नसून त्यांचे काहितरी म्हणणे मला सांगण्या करिता ते इथे आलेले आहेत.


अभंग क्र.१६१९
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥
प्रारब्ध हे पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥
तुका म्हणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥

अर्थ

किती वेळा जन्माला यावे आणि किती वेळा या संसार दुखाने फजित व्हावे? म्हणून माझा जीव भ्याला आणि विठोबाला शरण गेला. माझे प्रारब्ध कर्म बलवान आहेत त्यामुळे मी कितीही पुढे गेलो तरी ते संपतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझी अशी रोकडी फजिती होत आहे ते तुम्ही जाणून घ्यावे.


अभंग क्र.१६२०
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥
तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥
होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥
तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥

अर्थ

मी संसाराच्या भेटीला जात असताना सर्वांची सेवा करण्याच्या मोठ्या अडचणीत सापडलो होतो. पण भक्ती मार्गानेच माझ्यावर मोठी कृपा केली त्यामुळे मला विठ्ठलाची भेट झाली. माझ्या माथ्यावर संसाराची खूप मोठे ओझे होते. तुकाराम महाराज म्हणतात मला आता सद्गुरु कोण भेटेल याविषयी चिंता लागली आहे?


अभंग क्र.१६२१
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥
गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥
उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥
तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥

अर्थ

आहो तुम्ही पंढरपूरला जा कारण तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. पांडुरंगाला जे भक्त अनन्य भक्तीने शरण जातात त्या भक्तांचे कोणत्याच प्रकारचे दोष न पाहता त्यांना पांडुरंग आपल्याप्रमाणेच उच्चपदावर बसवितो. पांडुरंग भक्तांना या भवसागरातून पार पाडण्याकरता आपले दोन्ही कर कटेवर ठेवून वीटेवर उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाला आपल्या भक्तांच्या भेटीसाठी फार तातडी असते तो फार उतावीळ झालेला असतो आणि त्याच्या भेटीने भक्तांना फार मोठा लाभ होतो.


अभंग क्र.१६२२
या रे हरीदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥
रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें नामाचि आवडी ॥ध्रु.॥
येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥
वांकुडीया माना बोल बोलावे आरुष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥
आपुलालें आनंदे एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥
तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥५॥

अर्थ

हे हरिदासांनो तुम्ही सर्व या आपण सर्व एकत्र येऊन कळीकाळाला जिंकू आणि आपल्या बाळा पुढे त्याचे काय चालेल? अध्यात्माला विविध रंगाने रंगवून टाकू अध्यात्मा विषयी घमेंड म्हणजे अभिमान धरा आणि तसेच विविध प्रकारचे छंद परमार्थामध्ये धरा व परमार्थ करताना हास्यविनोद करून हरिनामा विषयी आवड वाढवा अशाप्रकारे परमार्थ केल्याने सर्वांना सुख होते. आणि नारायणाची प्राप्ती होते व नारायणाचे ही पूजन अंतकरणात घडते. आनंदाने हरीनाम घ्यावे आणि त्या छंदात माना डोलाव्यात ज्याला ज्या प्रकारच्या भक्तीचा छंद असेल त्या प्रकारची भक्ती नारायणाला आवडते, गोविंदाला आवडते. प्रत्येकाने आपल्या आनंदाने एकापेक्षा एक अधिकार संपन्न होऊन नटावे परमार्थामध्ये कोणीही लहान-मोठा, उच्च-नीच असा भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ मध्ये कोणीही भक्ती आणि प्रेमाचा भंग करू नये. देव आणि भक्त यांच्या मध्ये जर कोणी भेद केला तर त्याला मोठे पातक लागते.


अभंग क्र.१६२३
देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥
देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥ध्रु.॥
देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥

अर्थ

देव सर्वज्ञ आहे आणि तो त्याच्या सत्तेने सर्वत्र व्यापलेला आहे. तो फार चतुर आहे फार चतुर आहे तो सर्वांचे अंतकरण जाणूण भक्ताच्या अंतकरणात वास करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देव सर्वांपासून निराळा आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणताही विटाळा नाही तो विटाळा पासून अलिप्त आहे.


अभंग क्र.१६२४
माझ्या मुखें मज बोलवितो हरी । सकळांच्या अंतरीं नारायण ॥१॥
न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥
तुका म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥

अर्थ

जो नारायण सर्वांच्या अंतकरणात वास करतो तोच नारायण मला बोलवितो आहे. कोणत्याही प्राणी मात्रांचा द्वेष करू नये कारण सर्व प्राण्यांमध्ये हरी वास्तव्य करतो आहे हे मी जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही हिताचा उपदेश करताना जर कठोर शब्दांमध्ये बोलत असलो तरी तो उपदेश द्वेष किंवा मत्सर या भावनेने नसून तो त्यांच्या उद्धारासाठी आहे त्यामुळे आम्ही जरी बोललो तरी त्याचा कोणताच दोष आम्हाला लागत नाही.


अभंग क्र.१६२५
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥१॥
कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥
पुढिलांसाठी पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥
तुका म्हणे कुटती हाडें । आपुल्या नाडें रडती ॥३॥

अर्थ

पशुहत्या करून जो मांस खातो त्याने वैरीच जोडून ठेवला आहे. आपल्यासारखाच पशुचाही जीव आहे असे जाणत नाहीत त्यांची यमलोकी कोन किव करील. पुढे असलेल्या पशूची मान कापण्यास हा मनुष्य सुरी परजून ठेवतो आणि मान कापत असताना आपले बोट कापले जाईल म्हणून बोट बाजूला ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना यमदूत पुढे त्यांची हाडे कुठून कुठून मारतात मग आपल्या कर्माची फळे भोगतांना हे लोक रडतात असतात.


अभंग क्र.१६२६
तुज जाणें तान्हें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥
तुज ठावें होतें पातकी मी खरा । आधींच कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥
अंक तो पाडिला हरीचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां लागीं ॥३॥

अर्थ

हे पांडुरंगा मी तुमचे तान्हे बाळ आहे मी तुमच्या मूळ स्वरूपाला जाणू शकत नाही तरीही तुम्ही माझी उपेक्षा का केली हे तुम्ही मला सांगा? तुला माहित आहे की मी पतकी आहे तर मग तू आधी मला का थारा दिला, का तुझ्या पाया जवळ मला आश्रय दिला? देवा मी हरी भक्तांमध्ये जरी पहिल्या क्रमांकावर नसेल परंतु मी हरी भक्तांचे पंक्तीत तर बसलेलो आहे, त्यामुळे माझ्या मध्ये तुम्ही पंक्ती भेद करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही तुला खरोखर जिंकले आहे आणि आमच्या मध्ये काही उणेपुरे जर असेल तर त्याची जबाबदारी तुमची असेल.


अभंग क्र.१६२७
आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्नें । शब्दाचींच शस्त्रें यत्न करूं ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्द वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करूं ॥३॥

अर्थ

आमच्या घरी अभंग रुपी शब्दाचे धन आहे व तेच आमचे शस्त्रे आहेत आणि त्याचाच आम्ही अभ्यास करू. अभंग रुपी शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन आहे व ते अभंग रुपी धन रत्न आम्हा लोकांमध्ये वाटु. तुकाराम महाराज म्हणतात हे अभंग‌रुपी शब्द आमचा देव आहे आणि त्याचाच म्हणजे अभंग रुपी शब्दाचाच आम्ही गौरव करू.


अभंग क्र.१६२८
ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं ॥१॥
रिघों पाहे माजी बळेंचि त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥
तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्यांच्या गळां ॥३॥

अर्थ

संत आणि विष्णुदास यांच्या घरी ब्रम्‍हज्ञान काकुळतीला येऊन म्हणते की, तुम्ही मला स्वीकारा परंतु संत आणि विष्णुदास त्यांचा अव्हेर करतात. ब्रम्‍हज्ञान संत आणि विष्णुदास यांच्या घरी बळेच प्रवेश करू पाहतात परंतु विष्णुदास व संत त्याला हाकलून लावतात. तुकाराम महाराज म्हणतात संत आणि विष्णुदास यांच्यापुढे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न चालत नाहीत पण असे असले तरी देहा विषय उदास असलेल्या संतांच्या आणि विष्णुदास यांच्या गळ्यात ब्रम्‍हज्ञान बळेच पडते.


अभंग क्र.१६२९
कासया लागला यासी चौघाचार । मुक्तीचा वेव्हार निवडिला ॥१॥
ग्वाही भक्तांची घालूनियां वरी । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥
तुम्हां वेगळ्या आपुल्या ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥२॥
भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥३॥
ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नसे सत्ता तुज देवा ॥४॥
तुका म्हणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥५॥

अर्थ

देवा आम्हीही तुमच्याप्रमाणे मुक्त झालो आहोत, तरी हा निवाडा चारचौघांमध्ये नेण्याचे काय कारण? देवा आपल्यामध्ये जो करार झाला आहे त्याचे निकाल पत्र माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर भक्तांच्या स्वाक्षऱ्या देखील साक्ष म्हणून आपण घेतल्या आहेत. देवा या भव सागरातील सर्व “मी माझे माझेच” म्हणत होतो त्यामुळे मी व तुम्ही वेगवेगळे आहोत असेच मला भासत होते. देवा आता तुम्ही आणि आम्ही एकच आहोत याचा निकाल पूर्वी लागलेला आहे, तुम्ही आम्ही मुक्त आहोत याचा निकाल पूर्वीच लागलेला आहे त्यामुळे व्यर्थ कटकट आता नको आहे. आम्ही तुमच्या जवळच सेवारूपी ठेवा ठेवला होता तो आता आमच्या हाती लागला आहे त्यामुळे आता त्यावर तुमची सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही कितीही खटपट करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मी माझा वाटा घेऊन मोकळा झालो आहे.


अभंग क्र.१६३०
जाती पंढरीस । म्हणे जाईन तयांस ॥१॥
तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥
चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥३॥

अर्थ

पंढरिला जाणर्‍याला जे म्हणतात मी पुढे नंतर केव्हातरी पंढरपूरला जाईन किंवा जातो, आम्हाला संसार आहे असे जे कोणी म्हणतात ते महारा प्रमाणेच आहेत. जे कोणी पंढरी रायाचे दर्शन घेतात त्यांच्या मनात भक्तीभाव असो किंवा नसो. तुकाराम महाराज म्हणतात आणि जे चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात ते कोणत्याही जातीचे जरी असले तरी काही हरकत नाही ते धन्य आहेत, श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत.


अभंग क्र.१६३१
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥१॥
तें हें ब्रम्ह विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर्व्यापी बाही । धांडोळितां कोठें नोहे ॥२॥
योग याग तपें । ज्याकारणें दानजपें ॥३॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥
अवघी लीळा पाहे । तुका म्हणे दासां साहे ॥५॥

अर्थ

पांडुरंगाने अनेक प्रकारचे सोंगे संपादन केले आहेत आणि तेच ब्रम्‍ह चंद्रभागेच्या तिरी विटेवर उभे आहे. आणि तेच ब्रम्‍ह सर्वांच्या अंतरंगात व बाह्य रंगात व्यापलेले आहे आणि त्याचा शोध घ्यायला गेले तर तो सापडत नाही. ज्याच्यासाठी योग, याग, तप, दान, जप इत्यादी साधने केली जातात व कोणी त्याला कोणत्याही प्रकारचे भोग दिले किंवा नाही दिले तरी ते भोग तो भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जगाची प्रलय, उत्पत्ती आणि स्थिती ही ज्याची लीला आहे तोच भक्तांनाही सहाय्य करतो हीच त्याची लीला आहे.


अभंग क्र.१६३२
ज्याचे गर्जतां पवाडे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥
चिंतितां जयासी । भुक्तीमुक्ती कामारी दासी ॥२॥
वैकुंठासी जावें । तुका म्हणे ज्याच्या नांवें ॥३॥

अर्थ

ज्याचे पोवाडे गर्जुन केले असता कळिकाळ देखील शांत बसतो, तो दुसरा तिसरा कोणीही नसून पंढरीराया आहे. आणि याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर सहा शास्त्र, चार वेद, आठरा पुराणांना तुम्ही विचारून पहा. त्याचे चिंतन केल्यावर भक्ती व मुक्ती या काम करणाऱ्या दासी होतात. तुकाराम महाराज म्हणतात असा हा पांडुरंग आहे त्याचे नाव जरी घेतले तरी वैकुंठ प्राप्त होते.


अभंग क्र.१६३३
ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन पडे ॥१॥
तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥
शिणला सहस्त्र तोंडें । शेष फणी ऐसें धेंडें ॥२॥
तुका म्हणे मही । पत्र सिंधु न पुरे शाई ॥३॥

अर्थ

या हरीचे किर्तीचे वर्णन करीत असताना श्रृती आणि शास्त्र देखील मुक्या झाल्या. मग तुमची किर्ती वर्णन करण्याकरता मग माझी वाचा किती पुरी पडणार आहे देवा ? हजारो तोंड असणारा शेष देखील या हरीची किर्ती वर्णन करता करता थकून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा या हरीची किर्ती लिहावयास जरी गेलो तरी पृथ्वीएवढा कागद घेतला आणि समुद्राएवढी शाई जरी घेतली तरी ती कमी पडते.”


अभंग क्र.१६३४
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥
न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तेंही अमृत पाहीं ॥ध्रु.॥
न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं यम बाधा ॥२॥
तुका म्हणे नारायणा । येतां गोळ्या वारी बाण ॥३॥

अर्थ

ज्याचे रक्षण साक्षात देव करतो त्याला कोण मारू शकेल एवढेच नाही तर तो रानावनात अनवाणी जरी फिरला तरी त्याला एक काटा देखिल मोडणार नाही. त्याला अग्नीत जरी जाळले तरी जळणार नाही, पाण्यात बुडवले तरी बुडणार नाही त्याला काहीच होत नाही. एवढेच काय पण त्याला वीष जरी दिले तर त्या विषाचे अमृत होते. तो कधीही परमार्थाची वाट चुकत नाही तो कधीही अडचणीत सापडत नाही आणि यम बाधा तर त्याला कधीच बाधत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर कितीही गोळ्या किंवा बाणांचा वर्षाव झाला तरी नारायण त्याचे रक्षा करतोच.


अभंग क्र.१६३५
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥
दिनानाथ ब्रीद संभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धारिले ॥२॥
तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥

अर्थ

हे द्वारकेच्या राया माझ्या सखया तू कोठे गुंतला आहेस मला भेट देण्यासाठी तू इतका वेळ का लावला आहेस? देवा तुझे ब्रीद म्हणजे दिनानाथा आहे म्हणजे दिनांचा नाथ आहे दिनांचा तू उद्धार करतोस तुझ्या दीनानाथ या ब्रिदाचा तूच सांभाळ कर हे ब्रीद तुझेच आहे त्यामुळे मला भेट देण्यासाठी माझे पाप आणि पुण्य पाहू नकोस. देवा सारे चराचरामध्ये तुझे पतितपावन हे ब्रीद प्रसिद्ध आहे आणि तू अनेक पातकी लोकांचा आज पर्यंत उद्धार केला आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात देवा द्रोपती च्या धावेला तु जसा धावून गेलास त्याप्रमाणेच माझ्या मदतीला तू धावून यावे.


अभंग क्र.१६३६
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥
कोठें गुंतलासी भक्तीप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥
काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चलवे ॥२॥
काय माझे तुज गुण दोष दिसती । म्हणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥
काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका म्हणे ॥४॥

अर्थ

हे देवराया तू कोठे गुंतला आहेस कोणाच्या मदतीला तर तू धावून गेला नाहीस किंवा तुला निद्रा तर आलेली नाही ना? अरे देवा तू नक्की कोठे गुंतलेला आहे, तू गोपी सुखात गुंतला नाही ना कारण गोपींचे मुख तू का एकदा पाहिले तर ते तुला काही सुटतच नाही. अरे देवा तुझ्या कोणत्या भक्तावर संकट आले नाही ना कारण मग तू त्याचे संकट निवारण करण्यास गेला असशील किंवा माझ्याकडे येण्याचा मार्ग दूर आहे त्यामुळे तु मला भेट देण्यात येत नाहीस? हे लक्ष्मीपते माझे काही अपराध तुला दिसून आले आहे काय म्हणून तू असा माझ्यावर रागावला आहेस? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा माझ्या जे भाग्यात आहे ते सांगा मी तुमची भेट केव्हा होईल ते सांगा मी तुमची वाट डोळ्यात प्राण ओतून पाहत आहे देवा.


अभंग क्र.१६३७
परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजीं कानकोंडें ॥ध्रु.॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥
जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥
बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥

अर्थ

काही पापी लोक असे आहेत की परस्त्रीला माता म्हणताना त्यांचे चित्त लाजते. परस्त्रीला माता मातेप्रमाणे समजा असे तो त्याच्या तोंडाने सांगतो परंतु सांगताना मात्र त्याच्या अंतःकरणातील कानावर हात असतो. धर्म आणि धारिष्ट लोकांना सांगत असतो पण स्वतःच्या उष्ट्या हाताने देखील तो कावळ्याला उडवीत नाही. जो जसे कर्म करत असतो तसे प्रसंगानुसार त्याला ते कर्म आठवत असते. तुकाराम महाराज म्हणतात जो जसे बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो तो मनुष्य अमोल आहे तसेच अनमोल ही आहे.


अभंग क्र.१६३८
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥
वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाठीं गेला ॥२॥
तुका म्हणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देईल दुःख ॥३॥

अर्थ

असत्य वचन केव्हाही बोलू नये त्याचा दुसऱ्याला लाभ होत असेल तरीही बोलू नये. एवढेच काय लग्न जुळवून आणण्याचा परोपकार घडत असेल तरीही खोटे बोलू नये. जो कोणी खोटे बोलेल तो पतनास जाईल हे सत्य आहे व याला साक्ष देखील आहे मागे झालेली एक कथा मी सांगत आहे ती तुम्ही ऐका. एकदा असे झाले की युद्ध चालू होते त्यावेळेला “अश्वत्थामा मेला असे जोरात म्हण असे म्हण व तो मनुष्य आहे की हत्ती आहे असे हळू हळू बोल” असे स्वतः भगवंत श्रीकृष्ण श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले व धर्मराजाने देखील तसेच केले पण ज्यावेळी धर्मराजा स्वर्गात जात होता त्यावेळी त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. तुकाराम महाराज म्हणतात हे लोकांनो तुम्ही आता तरी सावध व्हा खोटे बोलू नका तुम्ही जर खोट बोलला तर तुम्हाला तुम्ही खोटे बोलण्याची भावना शेवटी दुःख देईल.


अभंग क्र.१६३९
जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥१॥
सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥
फोडिली गोंवरी । ऐसी दिसे तोंडावरी ॥२॥
तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥

अर्थ

वाईट व्रुत्ति च्या मनुष्याच्या तोंडाला आग लागो त्याच्यासारख्या पापीला तिच्या रांडा आईने तिला जन्म का दिला असेल. की त्याच्या भुवया वर नेहमीच आठ्या पडलेल्या असतात आणि पोटात कामक्रोध भडकलेला असतो त्यांच्या तोंडावर नेहमीच गोवरी फुटलेली आहे असेच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशांच्या चित्तामध्ये कधी कोणत्याही प्रकारचे समाधान नसते.


अभंग क्र.१६४०
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥
कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥२॥
खेळे दयूतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥
निजतां आला मोहो । वीतां म्हणे मेला गोहो ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥५॥

अर्थ

काही माणसे असे आहेत की ते फार खातात ढुंगणाने सारखे पादण्याचा मारा चालूच ठेवतात. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना आपले इंद्रिय आपल्या आधीन कसे ठेवावे हेच समजत नाही. असे हे मूर्ख लोक आपले कुले म्हणजे ढुंगण उघडे ठेवून खाली पडतात आणि त्यांना लोक हसले की मग त्यांच्याकडे हे मूर्ख लोक रागाने पाहतात. असे लोक द्यूत खेळून सर्व पैसा हरल्यानंतर माझ्यावर जुलूम झाला असे बोंबलत फिरतात द्यूत खेळून वाईट कर्म करतात. एखादी स्त्री आपल्या पतीबरोबर झोपली निजली तर त्यावेळी तिला संभोग करताना मोह आवरत नाही आणि नंतर बाळंतपणाच्या वेळी त्रास झाला की म्हणते माझा नवरा संभोगाच्या वेळी मेला का बरे नाही त्याने काय मला हा वैताग करून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याने आपल्याला मनुष्य पण मिळाले असूनही मनुष्य पणाची मोठी हानी करून घेतलेली आहे.


अभंग क्र.१६४१
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥
तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥२॥
तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥

अर्थ

पतिव्रता स्त्रीला इतर कोणत्याही पुरुषाची स्तुती ऐकणे आवडत नाही कारण ती त्या पतीशी एकनिष्ठ भावनेने एकरूप झालेली असते तिच्या ध्यानी मनी नेहमी तिचा पती असतो. अगदी त्याप्रमाणे माझे मन विठ्ठलाच्या ठिकाणी एकरूप झाले आहे. एका विठ्ठला वाचून मला दुसरे काही आवडत नाही. सूर्य किरणांमध्ये उमलणारे कमळ केवळ सूर्यकिरण पडल्यावरच उमलते ते रात्री चंद्रप्रकाशात उमलत नाही आणि कोकिळा फक्त वसंत ऋतु मध्येच गायन काम करते. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही मातेचे बाळ असो ते बाळ केवळ त्याच्या स्वतःच्या माते पुढे नाचते त्याच मातेचे बोल बालकाला आवडत असते इतर कोणाचेही बोल त्याला आवडत नाही.


अभंग क्र.१६४२
पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥
काय करावें घोकिलें । वेदपाठ वांयां गेलें ॥ध्रु.॥
वेदीं सांगितलें न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥
हा वेदीचा अनुभव । तुका देखे जीवशिव ॥३॥

अर्थ

वेदांत शिकलेल्या मनुष्याला पंडित म्हटले की फार बरे वाटते. परंतु तसे पाहिले तर तो मूर्ख आहे. कारण त्याने केलेले अक्षर पठण वाया गेलेले आहे व ते वेद पठण करून काय करायचे आहे? सर्व भूत मात्र मध्ये ब्रम्ह एकच आहे मग तो पंडित या अनुभवाप्रमाणे वागतही नाही आणि मग वेद पठणा चा काय उपयोग आहे? तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा मला अनुभव आहे आणि तसे मी वागत ही आहे आणि सर्वत्र मी जीव शिवब्रम्ह ऐक्य ही पाहत आहे.


अभंग क्र.१६४३
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥
अवघें सम ब्रम्ह पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥
रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥
तुका म्हणे तोचि दास । त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥

अर्थ

जो विठ्ठलाला नित्य भजतो त्यालाच खरे पंडित म्हणावे. सर्वत्र ब्रम्‍ह समान आहे आणि सर्व काही विठ्ठल आहे असे तो नेहमी पाहतो. विश्वातील कोणतीही जागा रिकामी नसून तेथे विठ्ठल आहे आणि सर्व भूतमात्रा मध्ये वासुदेव आहे असे त्याला वाटत असते. तुकाराम महाराज म्हणतात तोच खरा हरीचा दास आहे आणि त्याला नुसते पाहिले तरी सर्व दोषांची निवृत्ती होते.


अभंग क्र.१६४४
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥
नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥
अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥२॥
तुका म्हणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥३॥

अर्थ

हे पंडित जनहो मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही ऐका. आहो तुम्ही धनासाठी किंवा मान पानासाठी नरस्तुती करू नका एवढी विनंती माझी तुम्ही ऐका. अन्न आणि वस्त्र हे प्रारब्धाच्या अधीन आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही तुमची वाणी नारायणाची स्तुती करण्याकरिता करा, त्याने तुम्हाला सुख प्राप्त होईल.


अभंग क्र.१६४५
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥

अर्थ

लोकांनो तुम्ही टाळ आणि विणा हे विठ्ठल स्वरूप माना आणि तोंडाने विठ्ठल असे म्हणा तसाच उच्चार करा. विठ्ठल सर्व प्रकारचे भांडवल आहे त्यामुळे तोंडाने विठ्ठल विठ्ठल असे बोला. सर्व प्रकारचा नाद भेद हे विठ्ठलच आहे त्यामुळे तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा छंद लागू द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात सुख आणि दुखः यावेळी नेहमी विठ्ठल विठ्ठल असा छंद लागू द्यावा त्यामुळे माझ्या मुखा मध्ये नेहमी विठ्ठला हेच नाम आहे.


अभंग क्र.१६४६
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥
काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥
काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥२॥
तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥

अर्थ

देवा तू मला भेट दिली आणि दोन शब्द माझ्याशी बोलला तर तुझे काही खर्च होणार आहे काय. मी तुझे रूप चोरून घेतो की काय या भीतीने तर तू लपून राहत नाहीस ना देवा? आम्हाला माहित आहे कि तुझे राहण्याचे स्थान हे वैकुंठ आहे मग आम्ही तुला ते वैकुंठ मागू अशी भीती तुला वाटते आहे की काय देवा, आम्हाला तुझ्या वैकुंठाची काय करायचे आहे आम्हाला केवळ तुझी भेट व्हावी एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा आम्हाला तुझ्याकडून शित भर दशी सुद्धा नको आम्हाला तुझ्या दर्शनाची आवड आहे आम्हाला तू दर्शन द्यावे म्हणजे झाले.


अभंग क्र.१६४७
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥
त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥
तुका म्हणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥

अर्थ

संत निंदा ज्या घरी होते ते घर, घर नसून साक्षात यमपुरीच आहे. त्याच्या पापाला दुसरा कोणताही जोड नाही आणि त्याच्याबरोबर इतर जे लोक राहतात त्याच्यामुळे त्यांनादेखील पीडा प्राप्त होते. ज्याला संत निंदा फार आवडते तो जातीचाच नरकवासी आहे म्हणजे तो नेहमी नरकवास भोगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य दुष्ट आहे व तो स्पष्ट गाढव आहे असेच जाणावे.


अभंग क्र.१६४८
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥
हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥
पांडवांचा साहाकारी । राज्याहुनि केले दुरी ॥२॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥३॥

अर्थ

देवाच्या मनात जे आले आहे ते केल्याशिवाय देव थांबत नाही आणि तेथे कोणाचे काही चालत नाही. राजा हरिश्चंद्र आणि ताराराणी हे दोघेही राजाराणी असूनही डोंबाच्या घरी त्यांनी पाणी वाहिले. प्रत्यक्ष देवच पांडवाचा सहाय्यकारी होतात तरीदेखील देवाने त्यांना राज्यापासून वेगळे ठेवून वनात पाठविले. तुकाराम महाराज म्हणतात याकरिता शांत राहून जे काही होईल ते फक्त साक्षी रूपाने पहा.


अभंग क्र.१६४९
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥१॥
उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे हा गोविंद नाना छंदें ॥ध्रु.॥
मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥२॥
तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाठी ॥३॥

अर्थ

निजल्यावर जर नामस्मरण केले तर देव आपल्या शेजारी उभा राहतो आणि बसल्यावर किंवा कीर्तन करत असताना जर हरिनाम गाईले तर देव डोलत असतो. जो उभा राहून आपल्या मुखाने नारायणाचे नाम गात असतो त्याच्यापुढे गोविंद नाना छंदाने नाचत असतो. मार्गाने चालत असताना जर हरीचे नाम घेतले तर हा चक्रपाणी त्याचे रक्षण करण्याकरिता त्याच्या मागे पुढे उभा असतो. तुकाराम महाराज म्हणतात नारायणाला नामाची अवीट गोडी आहे आणि एका नामा करिता हा देवा प्रेमाने अगदी कोठेही त्वरेने धावत येतो.


अभंग क्र.१६५०
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥
आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रम्हांडाचा ॥३॥

अर्थ

मी माझा काम क्रोध विठ्ठलाला वाहिला असून त्याचीच म्हणजे विठ्ठलाची आवड मनात धरली आहे. आता संसाराकडे पाठीमागे वळून कोण पाहतो कारण माझा देह भावच नाहीसा झाला आहे. अरे मी तर सुखाने रिद्धी सिद्धी ला लाथा मारल्या आहेत मग नश्वर धनाला कोण किंमत देतो? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विठोबाचेच दास आहोत व त्या कारणामुळेच सर्व ब्रम्हांडाचा ग्रास करून आम्ही स्वस्त आहोत.


अभंग क्र.१६५१
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥
नेत्री अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥
तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥

अर्थ

तात्काळ अभिमान जाईल असे स्थळ कोठे आहे काय, होय आहे ते स्थळ म्हणजे पंढरपूर आहे आणि अभिमान तेथे तात्काळ जातो आणि दुर्जनांचा हृदयालादेखील दयेचा पाझर फुटतो. येथे नेत्राला आनंदाश्रूच्या धारा लागतात आणि संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहतात. तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो तुम्ही जीव ब्रम्‍ह ऐक्याचा अभेद्य रूपकला पंढरी वाचून कोठे पाहिला आहे काय?


अभंग क्र.१६५२
पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी ॥१॥
धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्सव ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी लोटांगणीं । प्रेम सुखाचिया खाणी ॥२॥
अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥३॥

अर्थ

पंढरी पंढरी असा उच्चार केला तरी सर्व पापाचे दहन होते. त्यामुळे जगामध्ये पंढरी धन्य धन्य आहे की जेथे नामाचा महोत्सव नेहमी होतो. हे क्षेत्र असे आहे की तिथे नेहमी प्रेम सुखाचा वर्षाव होतो आणि जे भक्त तेथे वास्तव्य करतात त्यांच्या ठिकाणी रिद्दिसिद्धी लोटांगण घालते. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठापेक्षाही पंढरी एक अक्षराने म्हणजे भूवैकुंठ या नावाने मोठे आहे त्यामुळे पंढरी एक क्षेत्र वैकुंठा पेक्षाही श्रेष्ठ आहे.


अभंग क्र.१६५३
घालीं भार देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥
देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥
व्यवसाय निमित्त । फळ देतसे संचित ॥२॥
तुका म्हणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥

अर्थ

आपल्या योगक्षेमाचा भार देवावर घालावा त्याकरिता संपूर्ण देश आपल्या डोक्यावर घेण्याची गरज नाही. हा नरदेह प्रारब्धाच्या आधीन आहे त्यामुळे त्याचा तुम्ही जेवढा हव्यास धराल तेवढा तुम्हाला त्रास होईल. व्यवसायामध्ये किंवा कोणतेही कर्म करताना तुम्हाला जो काही लाभ होतो किंवा जे काही फळ मिळते ते केवळ निमित्त आहे परंतु त्यामागे खरे कारण संचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःभोवती गोल गोल फिरल्याने भोवंड म्हणजे चक्कर येते व तेथेच दम जिरतो.


अभंग क्र.१६५४
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥
शांती धरणें जिवासाठी । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥
देह लेखावा असार । सत्य परउपकार ॥२॥
तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रम्हरसी ॥३॥

अर्थ

पूर्वसंचित कर्मामुळे अनेक प्रकारचे भोग भोगण्यास येते त्यामुळे ते सर्व भोग प्रारब्धाच्या स्वाधीन करून आनंदाने राहावे. आपल्या जीवासाठी शांत स्वरूप धारण करणे हे चांगले आहे आणि उत्तम दशा हीच आहे. देहाला असत्य समजून सतत परोपकार करणे हेच सत्य मानावे. तुकाराम महाराज म्हणतात आपली खरी वतनदारी म्हणजे ब्रम्‍ह रसात उडी घ्यावी हीच आहे.


अभंग क्र.१६५५
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥
ऐकोनि मरसी वृथा । जंव आहेसि तुं जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥
पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥
आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥५॥
घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्ती मुखें नाम ॥६॥
तुका म्हणे मुक्ती । नाहीं आसचि ये चित्ती ॥७॥

अर्थ

महाराज हरिकथा करत असताना मध्येच येऊन त्यांना एका मनुष्याने विचारले महाराज मला ब्रम्हरस हवे आहे तेव्हा आपण मला उपदेश करावा आणि त्यावर महाराज त्याला म्हणतात, अरे हरिकथा चालू असताना असे मध्ये बोलणे हे चांगले आहे काय आणि तुला जर गुरु करायचा असेल तर येथे बसू नको चालता हो. अरे येथे विठ्ठल कथा चालू आहे आणि या कथेच्या पुढे वेडेवाकडे बोललेले मला सहन होणार नाही. अरे तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत हरिकथा ऐक आणि ते तू करत नसशील तर तुझा जिवंत असूनही काहीच उपयोग नाही. ज्यांना आपल्या आब्रुतीची आवड आहे त्यांनी हरिकथा चालू असताना माझ्यापुढे असे वेडेवाकडे बडबड करू नये. जर मला कोणी ब्रम्‍हज्ञान विषयी काही विचारीत असेल तर मी त्याला असे उत्तर देईल की हरिकथा आवडीने ऐकताना हरिकथाच तुला ब्रम्‍ह ज्ञानाचा उपदेश करील. आम्ही विठ्ठलाचे शूरवीर भक्त आहोत. कळिकाळ देखील आमच्या पुढे आला तरी आम्ही त्याचे शिर फोडू. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि हरीचे गीत व कीर्ती गात राहू. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीची इच्छा देखील आमच्या चित्तात येत नाही.


अभंग क्र.१६५६
आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग । वृत्ति येतां मग बळ लागे ॥१॥
मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले अवयव आवरीतां ॥ध्रु.॥
आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥२॥
तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥३॥
तुका म्हणे बाह्य रंग जो विटला । अंतर निवाला ब्रम्हरसें ॥४॥

अर्थ

एकदा की वृत्ती अंतर्मुख झाली तर तिला बाह्य अवस्था समजत नाही आणि वृत्तीला बहिर्मुख करण्यास फार कष्ट लागतात. मद्यधुंद व्यक्तीला ज्याप्रमाणे आपले अवयव आवरता येत नाही आपले इंद्रिये त्याच्या स्वाधीन नसतात अगदी त्याप्रमाणे ज्याची वृत्ती अंतर्मुख झालेली असते त्याची अवस्थाही अशीच असते. त्याचे इंद्रीय त्याच्या स्वाधीन नसतात आणि त्याची वृत्ती अंतर्मुख झालेली असते तो कधीही कोणाशी काहीही बोलत नाही आणि जरी तो बोलला तरी दुसऱ्याच्या हितासाठीच बोलतो आणि त्याला सुख-दुःख याची जाणीवही राहत नाही. अंतर्मुख वृत्ती विषयी त्याने जर लोकांना अनुभव सांगितला तर लोकांना त्याचे आश्चर्य वाटते एवढेच नाही तर, हे काहीतरी विपरीत तच आहे असे लोकांना वाटते. तुकाराम महाराज म्हणतात जो बाहेर अंगाला पूर्णपणे विटला तो अंतर्मुख होऊन ब्रम्हरसामध्ये स्थिर झाला आहे.


अभंग क्र.१६५७
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥
नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काई निजसुखा ॥२॥
तेचि पुण्यवंत परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥
तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥४॥

अर्थ

ज्याची वासना समुळ नष्ट झाली त्याला ब्रम्‍ह रसाच्या गोष्टीचा अनुभव येतो. त्याला कोणत्याही प्रकारचे विटाळ नसते व तो नेहमी सोहळ्यात असतो तो सर्वांपेक्षा वेगळा असतो शुद्ध असतो एवढेच नाही तर मी ब्रम्‍ह आहे ही जाणीव देखील त्याच्या ठिकाणी नसते. त्याचे मन स्थिर असते, चंचल नसते स्वरूपस्थितीच्या ठिकाणी त्याचे मन स्थिर असल्यामुळे त्याला स्वरूपाची जाणीव तरी कशी असणार? जो शरण आलेल्या नरनारी ला प्रबोध करतो म्हणजे उपदेश करतो तो खरा परोपकारी आहे असे समजा. तुकाराम महाराज म्हणतात अशा ब्रम्‍ह रसाच्या ठिकाणी तल्लीन असलेल्या ब्रम्‍हज्ञान्याच्याजवळ त्याचे पाय होऊन मी राहील व ब्रम्‍ह रस सेवन करीन.


अभंग क्र.१६५८
जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥१॥
दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥
मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥२॥
तुका म्हणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥३॥

अर्थ

आपण जशा प्रकारची भक्ती करू तशा प्रकारचे देणे देव देत असतो परंतु आपण जर सात्विक मनाने भक्ती केली तर काय असाध्य आहे? जो अनन्य भक्तीने हरीचा दास झालेला असतो त्याची कृपासिंधू हरी सर्व प्रकारची अंतरंगातील व्यथा जाणतो व त्याची कधीही उपेक्षा करत नाही. लहान बाळाला कोणत्या वेळी काय मागावे हे समजत नाही परंतु त्या बाळाला कोणत्या वेळी काय द्यावे, काय करावे लागते याचे वर्म हे कोणालाही समजणार नाही ते केवळ त्याच्या आईलाच समजते आणि ती आई त्या बालकाला काहीच कष्ट होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या बाबतीत हा अनुभव माझ्या अंगी भिनलेला आहे देव भक्तांची उपेक्षा करतो हे मी मानत नाही.


अभंग क्र.१६५९
परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥
घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥
तुका म्हणे एकां थडता थवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥

अर्थ

जो मनुष्य परद्रव्य आणि परनारी यांचा भोग घेतो तिथून पुढे त्याच्या भाग्याचा ऱ्हास होतो अशा मनुष्याच्या गाठी म्हणजे पदरात अधःपतन बांधले जाते ते काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा तीन वर्षांनंतर तरी त्याचे अधःपतन होतेच. पुढे आपला घात होणार आहे याची जाणीवही त्याला होते आणि त्याचा परिणामही त्याला निश्चित होतो. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या दगडाला धडक दिली तर आपलेच डोके फुटते तसे परतद्रव्य आणि परनारीचा भोग घेतला तर काळ त्याच्या मागे लागतो आणि त्याचा ऱ्हास लवकरच होतो होतो.


अभंग क्र.१६६०
आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाही त्रयलोकी ॥१॥
देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
जैसा केला तैसा होय । धावे सोय धरोनि ॥२॥
तुका म्हणे असो सुखें । गाऊं मुखे विठोबा ॥३॥

अर्थ

आम्हा हरिदासांना त्रेलोक्या मध्ये कोणत्याही प्रकारचे भय नाही कारण आमच्या मागे पुढे प्रत्यक्ष देव उभा आहे. आणि सर्व संकटापासून तो आमचे रक्षण करतो. भक्त ज्या स्वरूपाचे चिंतन करतो देव ते स्वरूप धारण करतो व त्यांच्या मदतीला नेहमी सज्ज असतो आणि भक्तांचे कार्य करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नेहमी आमच्या मुखाने हरीचे नामचिंतन करू व सुखाने राहू.


अभंग क्र.१६६१
समर्थाचें केलें । मोडिलें कोणां जाईल ॥१॥
वांयां करावी ते उरे । खटपट सोस पुरे ॥ध्रु.॥
ठेवा जो ठेविला । आपुलाला तैसा खावा ॥२॥
ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥
तुका म्हणे कोटी । वाळे जाले शूळ पोटी ॥४॥

अर्थ

प्रत्यक्ष जे समर्थाने तयार केले आहे ते कोणाकडुन मोडले जाईल? त्याने तयार केलेली कोणतीही गोष्ट मोडण्याचा प्रयत्न केला तर ती व्यर्थ खटपट होऊन शेवटी श्रम होतील. जसे आपले संचित आहे त्याप्रमाणे ते भोगावे. जो समर्थांच्या विरुद्ध व्यर्थ बडबड करतो त्याची शेवटी फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात असे कोटी अभक्त आहेत की जे भगवंताला विरोधात गेले परंतु शेवटी त्यांच्या पोटात शुळच बसला व्यर्थ श्रम झाला.


अभंग क्र.१६६२
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली निंश्चिती तुझ्या पायीं ॥१॥
कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥
नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । म्हणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥
वेडा मी अविचारी न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥४॥

अर्थ

हे देवा उत्तम गती कोणती व अधोगती कोणती हे काही मला माहीत नाही परंतु तुझ्या पायी अवीट आनंद आहे त्यामुळे मी तुझ्या पायी निश्चिंत होऊन राहिलो आहे. कर्म आणि धर्म म्हणजे काय यासाठी उपाय काय करावा लागेल हे मला काही माहीत नाही परंतु मी तुझ्या ठिकाणी एकनिष्ठ भक्ती भाव ठेवला आहे. हे देवा पापाचे निवारण कसे करावे पुण्य कसे करावे हे मला काही कळत नाही त्यामुळेच मी तुझे पाय धरले आहे देवा. देवा मी वेडा अविचारी आहे विचार कसा करावा हे मला कळत नाही त्यामुळे मी माझा सर्व भार तुझ्यावर टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला काय करता येणार नाही, तुला काय अशक्य आहे आणि माझ्यासारख्या दिन र्दुबाळाचे तुझ्यासमोर काय चालणार आहे?


अभंग क्र.१६६३
देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥
देऊनियां जीव । वडिलीं साधिला हा ठाव ॥२॥
तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥

अर्थ

देवा ही माझी वतनदारी आहे की, मी तुझ्या पायाच्या ठिकाणी नेहमी रहावे. देवा मी या वतनदारीचा अभिमान धरीन व याचे जतन करिन. या वतनदारी जागा माझ्या वडिलांनी जीव देऊन साध्य केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा ही माझी सेवा वंशपरंपरागत म्हणजे जुनी आहे.


अभंग क्र.१६६४
तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥
हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तेची देवा ॥ध्रु.॥
देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूंचि बळी ॥२॥
अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥
तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥४॥

अर्थ

देवा तू मला मनुष्य जन्म दिला हे तुझे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत आणि त्यासाठी तुझा उतराइ होण्याकरता मी तुझा दास झालो आहे. परंतु केवळ तुझा दास झालो असे म्हटल्यावर मी तुझा उतराइ कसा झालो हे वर्म मला काही कळाले नाही, जो मार्ग पुढे नीट आहे तोच मार्ग मला दाखव. भक्त पणाचे रक्षण तुम्हीच करा आणि दोन्ही पक्ष तुम्हीच चालवत आहात असे तुम्ही समजा. अहो देवा तुम्हाला शरण आलेल्या भक्तांचा तुम्ही अभिमान धरता कारण तुम्हाला तुमचे दीनानाथ, पतित-पावन हे ब्रीद सांभाळायचे आहे व त्याचे तुम्हाला रक्षण करायचे आहे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी फार काही जाणत नाही पण माझ्या उद्धारा संबंधीचा विचार तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेला आहे.


अभंग क्र.१६६५
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥
पीतांबरें छाया करी लोभपर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥
तुका म्हणे हेचि करावें जीवन । वाचे नारायण तहान भूक ॥३॥

अर्थ

मार्गाने चालताना पावला पावली पांडुरंग माऊलीचे चिंतन करत जावे. जगातील सर्व सुख तो तुम्हाला वेळोवेळी देतो आणि त्याच्या आवडीचा रस तो तुमच्या कंठा मध्ये ओतत असतो. देव भक्तांचे रक्षण करण्याकरता आपल्या पीतांबरा ची छाया त्यांच्यावर धरतो व भक्तांच्या मुखातून आपल्या विषयी कोणते कौतुकाचे बोल निघत आहे ते ऐकण्यासाठी तो उत्कंठित असतो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या वाचेने नारायणाचे नाम गात रहावे असेच करावे त्यामुळे आपल्याला तहान भूकेचे भान राहणार नाही.


अभंग क्र.१६६६
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥
ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकाची राशी ॥ध्रु.॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥
तुका म्हणे भय । करा जवळी तें नये ॥३॥

अर्थ

देवा मी आता तुमचा दास झालो आहे तरी आता तुम्ही माझे सर्व संसार पाशा तोडून टाका. देवा मी तर पातकांची राशीच हे पण असे असले तरी माझ्यावर दया करून तुम्ही तुमच्या पायाशी मला आश्रय द्यावा. देवा माझ्या माझे सर्व प्रकारचे बंधन तुम्ही नाहीसे करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा जन्ममरणाचे भय माझ्याजवळ कधीच येणार नाही असे तुम्ही करा.


अभंग क्र.१६६७
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥
तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥
नव्हती मोडामोडी । केली मागें तेचि घडी ॥२॥
तुका म्हणे दिला ठाव । पायीं लागों दिला भाव ॥३॥

अर्थ

देवा सर्वांच्या अंतःकरणातील तुम्ही जाणाणारे आहात मग माझ्याविषयी असा वेगळेपणा तुम्ही तुमच्या मनामध्ये का येऊ दिला? मी तुमची सेवा करावी आणि माझा तुम्ही अव्हेर का बरे करता? देवा आपल्या दोघांमध्ये सेवक व स्वामी असा भाव आहे आणि जर तुम्हाला हा भाव आवडलाच नव्हता तर तुम्ही मागेच याची मोडामोड का बरे केले नाही? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा भक्तिभाव तुमच्या पायाशी एक रूप केला आणि आता तुम्ही माझा अव्हेर करतात ते तुम्हाला चांगले दिसत नाही.


अभंग क्र.१६६८
पवित्र होईन चरित्र उच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥
आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
गाईन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥२॥
तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥

अर्थ

देवा मी तुमचे चरित्र उच्चार करीन आणि तुझ्या गोजिऱ्या रूपात च्या आधारे पवित्र होईन. देवा माझी बुद्धी अपुरी आहे आणि म्हणावे एवढे पुण्यही माझ्याकडे नाही त्यामुळे मी तुझ्या पायाला सारखी सारखी मिठी मारत आहे आणि तुझे रूप माझ्या डोळ्याने पाहात आहे. हरीचे गुणगान श्रेष्ठ संतांच्या आधारेनच गायिन आणि माझे पुढील आयुष्य त्यांच्या विचारानेच व्यतीत करीन. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मी तुझे नाम माझ्या मनामध्ये सतत ठेवीन.

 


अभंग क्र.१६६९
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥
कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं येईल दया ॥२॥
तुका म्हणे तरी नाहीं फांकों देत । सर्वाचें उचित सांपडलें ॥३॥

अर्थ

आपल्याला चांगला मनुष्य देह मिळाला आहे तो असाच वाया जाऊ देणे चांगले आहे काय. आपल्याजवळ देवाच्या सेवेचे काहीतरी ऋण असू द्यावे. असे केल्याने केव्हातरी हरी आपल्याला भेट देईल कारण आपल्या माथ्यावर त्याच्या सेवेचा भार आहे त्या देवाची नितांत सेवा केल्याने शंभर जन्माच्या शेवटी का होईना पण कृपाळू देवाला आपल्या विषयी


अभंग क्र.१६७०
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिकाचि ॥१॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥
तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे ठायी होईल ते ॥३॥

अर्थ

माझा एकही दिवस हरी सेवेवाचून जात नाही परंतु साध्य काहीच होत नसल्याने व्यर्थच शिणच होत आहे असेच मला वाटत आहे देवा. देवाच्या किंवा माझ्या माथ्यावर कर्तव्याचा दोष असला पाहिजे, पण तसे म्हणावे तर मी माझे कर्तव्य व्यवस्थित करत आहे, ठीक आहे जर माझ्या नशिबातच काही फल नसेल तर काय करावे, आणि असेल तर भेटेलच. आपल्या सेवेचे काही ऋण त्याच्यावर असेल तर तो आपल्याला त्याच्याशी बोलू देईल नाही तर तो आपल्याला त्याच्याजवळ उभा करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण जसजशी सेवा करू तसतशी देवाची व आपले अधिकच ओळख होत चालते व हरीचे नीजस्वरूप कसे आहे हे समजते.


अभंग क्र.१६७१
करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवका दरिद्र लाज नाहीं ॥१॥
मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥२॥
तुका म्हणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥३॥

अर्थ

विश्वंभराने ठाणले तर काय करणे त्याच्यासाठी अशक्य आहे तो सर्व काही करू शकतो असे असले तरी आपल्या सेवकाची सेवा किती दिन म्हणजे सेवकाने जी सेवा केली पाहिजे त्या मानाने आपण केलेली सेवा अतिशय कमी आहे तरीदेखील याविषयी तो लाज बाळगत नाही. असेच प्रत्येक सेवकाने आपल्या मनाशी म्हटले पाहिजे आणि आपल्याकडूनच हरीच्या सेवेत काहीतरी कमी पडले असेल, नाही तर हरीने आपला अव्हेर केला असता काय असा विचार केला पाहिजे. हरीचे नाम चिंतन केले कि, हरी आपल्याला जन्म मरण घेऊ देत नाही विश्वंभर इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आपल्याला करू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे कितीतरी पापी होते की त्यांची गणती ही करणे अवघड होते परंतु केवळ नामचिंतने त्यांचा उद्धार देवाने केला.


अभंग क्र.१६७२
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥
किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥
माजल्या न कळे उचित तें काय । न द्यावें तें खाय द्यावें सांडी ॥२॥
तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥

अर्थ

अरे तू संध्या केशवाच्या नामाने करतो परंतु सर्व गोष्टींचा आरंभ तो केशव आहे त्याचे तुला काहीच ज्ञान नाही, अशा मूर्खांना किती सांगावे किती यांची फजिती तरी किती करावी कारण यांच्या जवळ त्यांचे हित आहे तरीदेखील त्यांना कळत नाही. सत्तेच्या जिवावर असे मूर्ख लोक माजल्यासारखे करतात त्यांना जे खाऊ नको सांगितले तर ते लोक तेच खाणार आणि आपण जे खायला देऊ त्याचा ते स्वीकार करत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक मूर्ख लोक आहेत की ते अंधारामध्ये घराचा दरवाजा समजून भिंतीला डोके आदळत असतात.


अभंग क्र.१६७३
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥
तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥
काय करावीं ती बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥
तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैसी संसर्गे ॥३॥

अर्थ

दुधाने भरलेल्या घागरी मध्ये दारूचा एक थेंब जरी पडला तरी ते दूध शुद्ध राहत नाही. त्याप्रमाणे जे स्वतःला खूप हुशार व शहाणे समजतात अशा मूर्ख लोकांच्या तोंडून हरिकथा केव्हाच श्रवण करू नये कारण त्यांचे मन अहंकाराने टाळलेले आहे. एखाद्या मुलीच्या ठिकाणी सौंदर्‍याचे बत्तीस लक्षणे आहेत परंतु तिला नाकच नाही तर मात्र ते सर्व लक्षण वाया जातात. तुकाराम महाराज म्हणतात अन्नामध्ये जर माशी पडली तर ती माशी पोटांमध्ये जाऊन तिचा संसर्ग करते व तिच्या संसर्गाने आपल्याला वांती होते त्याप्रमाणे अहंकारी व मूर्ख लोकांच्या मुखाने हरी कथा ऐकू नये कारण ती आपल्याला पचनी पडत नाही.


अभंग क्र.१६७४
सांगावें हे बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥
नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥
तुका म्हणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥

अर्थ

जे आपल्याला पोटात मुझे ज्या चांगल्या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये आहेत ते इतरांना सांगावे जर सांगू नये असे वाटत असेल तर त्याची बुद्धी खोटी आहे आणि परिणामी ती बुद्धी आपल्याला दुःख देते. आपले मन जिंकून कोणताही व्यवहार हा धर्मनितीने करावा मग प्रत्येक व्यवहाराला आपले मनच साक्षी राहते. कोणाशीही बोलताना चांगले बोलावे बोलताना वाईट शब्द वापरू नयेत आणि जर वाईट शब्द वापरले तर त्याचा व्यर्थ शिणच होतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता संसाराच्या खटपटीला खूप भिलो आहे आणि आता हे संसारिक खोटे शब्दही मला नकोसे झाले आहेत.


अभंग क्र.१६७५
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥
जीतां भुक्ती मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥
तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥

अर्थ

हे गंगा माते मी जे काही बोलत आहे ती विनंती तू ऐक मी तुझ्या चरणी मस्तक ठेवत आहे. हे भागीरथी तू महा दोषांचे निवारण करणारी आहे आणि सर्व तीर्थांचे ही तू स्वामिनी आहेस. तुझ्या तीरी राहणाऱ्या सर्व लोकांना, जीवना मुक्ती, मोक्ष आणि सर्व प्रकारचे ऐहिक सुख मिळतात .तुकाराम महाराज म्हणतात हे गंगे माता मी संतांचा पोसणा दास आहे आणि संत हे विष्णुदास आहेत आणि मी जे काही शब्दरूपी पुष्प बोललो आहे ते शब्द त्यांनीच तुझ्यासाठी पाठविले आहे.


अभंग क्र.१६७६
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥
तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥

अर्थ

हे देवा तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी तर दिन रंक अनाथ आहे. हे विश्वनाथ मी तुमचा भक्त आहे तुम्ही थोडी का होईना पण माझ्यावर दया करा. देवा तुमच्याजवळ भक्तांना देण्यासाठी काय उणे आहे आणि मी तर अल्प संतोषी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला तुम्ही काहीतरी प्रेमरूपी भातुके म्हणजे खाऊ पाठवा.


अभंग क्र.१६७७
पिंड पदावरी । दिला आपुलिया करीं ॥१॥
माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥
केलें कर्मांतर । बोंब मारिली हरीहर ॥२॥
तुका म्हणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥

अर्थ

मी माझ्या हाताने माझा पिंड विष्णू पदावर ठेवला आहे. त्यामुळे गया या तीर्थ ठिकाणी जाऊन पिंडदान करण्याची मला गरज नाही व त्यामुळेच पित्रांचे देखिल ऋण फिटले आहे. सर्व कर्म करून मी हरी आणि हर या नामाचे बोंब मारली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या वरील सर्व पितरांचे जे काही ऋण ओझे होते ते उतरले आहे.


अभंग क्र.१६७८
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥
तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥
जीवींचें ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ

हे मथुरेच्या राजा श्रीकृष्ण तुझ्या पायी माझे दंडवत आहे. मी तुमच्या कृपेने पोहोचला जाणारा भक्त आहे त्यामुळे तुम्ही माझा समाचार घ्यावा. आणि हीच माझी अर्त भूत इच्छा माझ्या पोटी आहे त्यामुळे मी तुमचे नाम माझ्या कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुम्ही माझ्या मनातील सर्व ओळखा.


अभंग क्र.१६७८
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥
तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥
नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥
जीवींचें ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ

हे मथुरेच्या राजा श्रीकृष्ण तुझ्या पायी माझे दंडवत आहे. मी तुमच्या कृपेने पोहोचला जाणारा भक्त आहे त्यामुळे तुम्ही माझा समाचार घ्यावा. आणि हीच माझी अर्त भूत इच्छा माझ्या पोटी आहे त्यामुळे मी तुमचे नाम माझ्या कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुम्ही माझ्या मनातील सर्व ओळखा.


अभंग क्र.१६७९
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥
हिरोनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
दावूनियां रूप डोळां । मन चाळा लावियेलें ॥२॥
आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥
बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥४॥
तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥५॥

अर्थ

जिकडे जावे तिकडे देव माझ्या पाठीशी लागलेला असतो म्हणून त्याच्या स्मरणला तर तुटतच नाही. माझे सर्व भांडवल म्हणजे माझे चित्त आहे आणि तेच देवाने हिरावून नेले आहे. याने तर माझे रूप मला दाखवले आणि ते रूप मी माझ्या डोळ्याने पाहिले त्यामुळे मला तोच छंद लागलेला आहे. माझ्या तोंडाने असे ठरविले आहे की हरी वाचून कोणाचेही नाम घ्यायचे नाही आणि कानाने तर हरीच्या कथे वाचून कोणाच्याही गोष्टी ऐकायचं नाही व ते मला आवडतही नाही व इतर कथा मी ऐकत देखील नाही. हरीच्या छंदात मी काय बोललो आहे याची देखील मला आठवण राहत नाही आणि माझ्या वाणीला तर हरिनामाची इतकी आवड लागली आहे की त्या आवडीने त्याच्याकडेच मी ओढ घेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरी विषयी माझ्या मनामध्ये अखंड आवड राहिली आहे.


अभंग क्र.१६८०
नको ऐसें जालें अन्न । भूक तहान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥
जाऊं नेदीं करितां सोस । क्षमा दोष करवीन ॥४॥
तुका म्हणे याचे पाठी । आता साटी जीवाची ॥५॥

अर्थ

मला अन्न नकोसे झाले आहे आणि तहान भूक तर कोठे गेली समजत नाही. कारण माझ्या जीवाला गोविंदाची आवड लागली आहे आणि त्याची सेवा मी तृप्त होईपर्यंत करणार आहे. या गोविंदाच्या सेवेपुढे मी माझ्या देहाचे सर्व धर्म सर्व कर्म ते बाजूला राहिले तर खुशाल राहू देत. हा देह धारण केल्याचे फळ म्हणजे नारायणाची सेवा आहे आणि त्याच्या सेवेत जाणारा देखील सर्वकाळ धन्य आहे. या गोविंदाची सेवा करताना मला कितीही कष्ट झाले तरी मला त्याची पर्वा नाही आणि माझ्याकडून जे दोष घडतील त्याची क्षमाही मी त्याच्याकडून करुन घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझा जीवच या गोविंदाला अर्पण केला आहे आता त्याची पाठ कधीही मी सोडणार नाही.”


अभंग क्र.१६८२
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥
म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥
वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिकचि प्रेम चढे घेतां ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥

अर्थ

देवाला मी कधीही कठोर शब्दात बोललो नाही तरीही देवात आणि माझ्यात असे अंतर का पडले आहे? माझ्या देहाला आता देवाचे आलिंगन केव्हा पडेल यासाठी मला तळमळ लागली आहे. देह त्याच्यासाठी लाचावला आहे त्यामुळे देवाचा वियोग मला सहन होत नाही. आणि वेळो वेळा हरीचे नाम माझ्या वाचनात येत आहे आणि जसजसे हरीचे नाम मी घेत आहेत तसतसे देवाविषयी माझे प्रेम वाढतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे माझी आई तू मला तुझ्या कडेवर घे व माझी समजूत काढा.


अभंग क्र.१६८३
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥
सुखें सेवीन अमृत । ब्रम्हपदींचें निश्चित ॥ध्रु.॥
तुमचा निज ठेवा । आम्ही पाडियेला ठावा ॥२॥
तुका म्हणे देवराजा । आतां लपलेती वांयां ॥३॥

अर्थ

आता देवापुढे मी कोणत्याही प्रकारचे कष्ट करणार नाही केवळ ब्रम्‍हरसच आनंदाने सेवन करीन. ब्रम्‍हपदाचे अमृत मी सुखाने व निश्चिंती ने आणि आवडीने सेवन करेल. देवा तुमच्या नीजस्वरूपाचा ठेवा आम्ही माहीत करून घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमच्यापासून लपवून बसला आहात परंतु आम्हाला तुमच्या विषयी सर्व काही समजले आहेत त्यामुळे तुम्ही जे काही वागत आहात म्हणजे आमच्यापासून लपून बसत आहात ते सर्व व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल.

अभंग क्र.१६८४
जेथें जेथें जासी । तेथें मजचि तूं पाहासी ॥१॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥
चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥
तुका म्हणे पोटीं । देवा घालुनि सांगें गोष्टी ॥३॥

अर्थ

मी जेथे जाईल तेथे तू मलाच पाहणार आहे. मी माझा भक्तिभाव असा विकसित करीन की जगातील कोणतीच जागा शिल्लक राहणार नाही. आणि देवा माझे चित्त तुमच्या पायाशी एकरूप झालेले आहे ते तुमच्या वर पाळद ठेवून म्हणजे नजर ठेवून आहे. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तुमचा मी शोध घेईल व माझा तुम्ही शोध कराल. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाला माझ्या पोटात साठवून ठेवेल म्हणजेच मी ब्रम्‍हरूप होईल आणि मग त्याच्या स्वरूपाच्या गोष्टी लोकांना सांगेन.


अभंग क्र.१६८५
मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि तोचि अंतीं अवसान ॥ध्रु.॥
भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तोचि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाठी । अमृत तें पोटी सांठविलें ॥३॥
दयावंत तरी देवाचि सारखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥
तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥५॥

अर्थ

अर्थ:–विष्णूच्या दासाला मुक्तीची चिंता भेडसावत नाही किंवा त्याला तो कठीण आहे असे देखील नाही तसेच संसार कसा असतो किंवा तो कसा करावा हे तो जाणत देखील नाही कारण त्यांच्या चित्ती गोविंदच जडून गेला असल्याने त्यांच्या आदी, अंती आणि अवसानी तोच बसला आहे.म्हणजेच कोणतेही कर्म करण्याचे कारण देवच असून आणि ज्यांच्यासाठी करायचे ते देखील त्यांस देवाला अर्पण करण्यासारखे असते त्यामुळे त्याच्या ध्यानीमनी देखील तोच वसतो.तसेच त्याच्या वाट्याला जे जे भोग येतात ते सर्व ते नारायणाला अर्पण करून व स्वतः त्या भोगापासून नामानिराळी राहून सदैव देवाच्या नामस्मरणात ते मग्न असतात आणि देवाला प्रसन्न कण्याच्या ज्या ज्या मंगळ ओव्या आहेत तेच गाण्यात त्यांना आनंद मिळतो.तसेच स्वतःची पूर्ण शक्ती आणि बुद्धी ते इतरांच्या कल्याणासाठी व सामान्यांवर उपकार करण्यासाठी ते खर्च करतात, नामस्मरणामुळे कृपारूपी अमृत जे त्यांच्या पोटी साठलेले असते ते इतरांनां कसे देता येईल ह्यासाठीच त्यांची धडपड असते.अशी ही वैष्णव मंडळी अंतःकरणाने अत्यंत दयावंत असून देवासारखीच भासतात किंबहुना देवात आणि त्यांच्यात फरक हा जाणवतच नाही, कारण ह्यांना आपले


अभंग क्र.१६८६
सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती ॥१॥
नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥

अर्थ

अर्थ :– माझ्या हाती तुला साध्य करण्याचे वर्म लागले आहे त्यामुळे आता मी खऱ्या अर्थाने निश्चिन्त झालो आहे.त्यामुळे माझे मन देखील आता इंद्रियांच्या ओढीने धाव घेत नाही किंबहुना माझी सर्वच इंद्रिये अतिशय समाधानी झाली आहेत.तसेच माझ्या मनाला आता कसलाही आणि कोणताही हेवा नाही, सर्वच अपेक्षांचा आणि संचिताचा त्याच्याकडून त्याग झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढेच नव्हे तर माझ्या मनाने आता एवढी मजल मारली आहे की सर्व काम आणि कामना ह्यांचा त्याला विसर पडून ते फक्त आणि फक्त आता हरीचे नाम घेण्यात गुंतले आहे.


अभंग क्र.१६८७
सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन किडा ॥१॥
ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीन ते शिरीं जाईन मागें ॥२॥
तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥

अर्थ

मी वैष्णवांचे उच्छिष्ट सेवन करेल आणि त्यांच्या अंगणात लोळेण कारण त्यांच्या पायाची धूळ त्या अंगणाला लागलेले आहे. आणि वैष्णव ज्या ठिकाणी स्नान करतात त्या ठिकाणी मी एखादा किडा मुंगी होऊन राहील कारण असे केल्याने वैष्णवांच्या चरण तीर्थाचे मला रोज तीर्थ पिण्यास मिळेल. देवा असाच जन्मला दे की जेणेकरून मला संतांची संगती घडेल कारण हीच आवड मला आहे. वैष्णवांचे चरण रज जेव्हा माझ्या अंगावर येतील तेव्हा मी त्या रजाला वंदन करीन आणि ते चरणरज मी माझ्या मस्तकावर धारण करीन व ते चरणरज सतत माझ्या अंगावर यावे यासाठी मी सतत त्यांच्या मागे मागे फिरेल. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व जगाचे मीथ्य त्व जाणले त्यामुळेच वैष्णवांच्या ठिकाणी माझी निष्ठा झाली


अभंग क्र.१६८८
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥
आतां झडझडां चालें । देई उचलूं पाउलें ॥ध्रु.॥
सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥२॥
तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥

अर्थ

देवा तुला आलिंगन देण्यासाठी माझे दंड बाहू स्फुरण पावत आहेत. त्यामुळे हे विठाई तू पावले शीघ्रगतीने टाक. देवा आता हसंगतीने चालणे सोड कारण तूझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला उत्कंठा लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तू लवकर चालत माझ्याकडे ये.


अभंग क्र.१६८९
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥
कंठ कंठा मिळों देई । माझा वोरस तूं घेई ॥ध्रु.॥
नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥
टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥
हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥
तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥

अर्थ

हे पांडुरंगा माझी भेट घेण्याकरता तुला एवढा वेळ का लागत आहे ज्या कारणामुळे तुला इतका वेळ लागत आहे आता ते कारण बाजूला सार. देवा तू माझ्या गळ्याला गळा मिळव माझी भेट घे आणि माझ्या भक्तीचा रस तू प्रशांत कर. माझी भेट घेताना तुझे पितांबर आणि अलंकाराची तू सावरासावर करू नकोस. देवा माझ्या लौकिकाचे तू कौतुक करू नकोस आणि माझ्यासाठी काही खाऊ आणला असेल तर तो बाजूला टाकून दे. देवा मला आलिंगन देताना मी अपवित्र आहे म्हणून अंग चोरी करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा तू मला आलिंगन दिले की मग तुझे अलंकार व पितांबर तू सावरत बस.


अभंग क्र.१६९०
दावूनियां कोणां कांहीं । तेचि वाहीं चाळविलीं ॥१॥
तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥
तुका म्हणे पायांसाठी । करींतो आटी कळों द्या ॥५॥

अर्थ

देवा तुम्ही तुमच्या भक्तांना काहीतरी आमिष दाखवून फसविले आहे तसेच मलाही फसवत आहात काय? देवा माझा भक्ती भाव अतिशय शुद्ध आहे त्यामुळे माझ्याशी तुम्ही तसे काही करू नका. परमार्थामध्ये भक्ती उत्कृष्ट पद्धतीने न व्हावी यासाठी रिद्धी सिद्धी आड येत असतात. उन्हात झळायामुळे मृगजळाचा भास होतो मग हरीण त्याच्यामागे ऊर फुटेपर्यंत पळत असते व ते मृगजळ त्याला आपल्याकडे मोहन घेते. मूर्ख व्यक्ती आरश्यामध्ये धनाचे प्रतिबिंब दिसले की ते धन घेण्यासाठी चरफड करते. तुकाराम महाराज म्हणतात देवा केवळ तुमच्या पायाची प्राप्ती व्हावी यासाठी मी आता आटाआटी करत आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे.


अभंग क्र.१६९१
कृपेचा ओलावा । दिसे वेगळाचि देवा ॥१॥
मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकट साई काचें ॥ध्रु.॥
जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥२॥
तुका म्हणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या कृपेचा ओलावा जाणवला की मग लक्षण काही वेगळेच दिसतात. देवा मला तुझ्या दर्शनाची खरोखरी इच्छा आहे मग माझे समाधान करण्यासाठी संसारातील माइक पदार्थ जरी फुकट मला कोणी जरी दिले तरी ते मला नको. बांधकामाचे काम कळसापर्यंत व्यवस्थित गेले म्हणजे त्या बांधकामाचा पाया पक्का आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या घरी सर्व पदार्थ आहेत व भक्त जे काही मागतील ते तू त्यांना देऊ शकतोस.


अभंग क्र.१६९२
तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥
आगा पंढरीच्या उभा विटेवरी । येई लवकरी धांवा नेटे ॥ध्रु.॥
पालवितों तुज उभरोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥
तुका म्हणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥

अर्थ

देवा तु आज पर्यंत केलेले कोणतेही कार्य व्यर्थ गेले नाही त्यामुळे आम्ही तुझी कास धरली आहे. हे पंढरीषा विटेवर उभे असलेल्या पांडुरंगा तू लवकर धाव घे व आमच्याकडे धावत लवकर ये देवा. हे देवा मी माझे दोन्ही हात वर करून तुला माझ्याकडे बोलावीत आहे तरी हे कृपावंता तू माझ्या कडे पहावेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी वेदांमध्ये असे ऐकले आहे की तुला खूप कान आहेत खूप डोळे आहेत मग माझ्या वेळेसच तू असा आंधळा बहिरा का झाला आहेस.


अभंग क्र.१६९३
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥
जाणतसां तुह्मीं लाघव रूपाचें । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥
काय म्हणऊनि आलेती आकारा । आम्हां उजगरा करावया ॥२॥
तुका म्हणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥३॥

अर्थ

देवा तू आमचा कंटाळा करावा हे चांगले नाही जर तुला आमचा कंटाळा करायचाच होता तर आम्हाला तुझ्या स्वरूपाची प्रिती का लावली? देवा तुम्हाला तुमच्या रुपाची ताकत तर माहीतच आहे आणि तुमच्या रूपामुळे आमचा जीवभाव नाहीसा होतो हे ही तुम्हाला माहित आहे. देवा तुम्हाला आम्हाला दर्शन घ्यायचे नाही तर तुम्ही आकारालाच का आलात केवळ आम्हाला दुःखच द्यायचे आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आज पर्यंत तुमची खूप भीड ठेवली आहे आता यापुढे तुमची भीड कोण ठेवतोय.


अभंग क्र.१६९४
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥
काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥
अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥
रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥
सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥
तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥

अर्थ

देवा मी माझ्या हाताने चारचौघांमध्ये तुमचा पितांबर धरून ओढीन मग ही गोष्ट चांगली दिसणार आहे काय? मी तुम्हाला जोपर्यंत सवलत दिली आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या दोघांमध्ये काय ठराव झाला आहे याविषयी विचार करा. जोपर्यंत तुझ्या पायात आणि माझ्यात अंतर आहे तोपर्यंतच मी तुला बोलू देईल नंतर एकदा की मी तुझ्या पायाशी मिठी मारली की मग मी तुला हालुच देणार नाही. देवा तुम्ही जर माझ्यावर रुसला आहात तर मग मी तुमची समजूत काढीन पण एकदा की तुमची मी समजूत काढली तर मला भेटण्या विषयी तुम्ही तातडी करा. देवा तुझ्या पायाची प्राप्ती ज्या कारणामुळे होईल त्याच ठिकाणी आम्ही आमचा भक्तिभाव दृढ करून ठेवु देवा. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की तुझ्या प्राप्तीचे वर्म मला समजले की मग तुझी प्राप्ती करण्यासाठी जे काही खटपट करावी लागते ती चुकलीच समजा


अभंग क्र.१६९५
निष्ठुर उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि ॥१॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥
मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥
तुका म्हणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥

अर्थ

देवा मी तुम्हाला जर काही कठोर शब्दात बोललो असेल तरी तुम्ही राग धरू नका कारण आपला संबंध जुनाच आहे. हे रुक्मिणीकांता पांडुरंगा तूच माझा जन्मदाता आहेस तूच माझा जन्मदाता आहेस. देवा माझ्या मूळ स्वस्वरूपाचा ठेवा मी तुमच्या जवळ ठेवला आहे व मला त्याचा अधिकारही आहे केवळ द्वैता मुळेच मी तुमच्यापासून दूर झालो आहे. देवा मी पोटासाठी काहीतरी व्यवहार करू लागलो व त्यामुळे मी तुमच्यापासून अंतरलो. आपल्या दोघांमध्ये स्वामी आणि सेवक असा संबंध होता परंतु नंतर माझा संतांशी संग झाला व त्यांनी तू देव आणि मी भक्त दोन्ही एकच आहोत असे सिद्ध करून दाखवले. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तू आणि मी एकच आहोत त्यामुळे आता आपल्यामध्ये कोणतेच बंधन नको.


अभंग क्र.१६९६
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥
सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥
अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥
तुका म्हणे नाही भेद । देवा करू नये वाद ॥३॥

अर्थ

देवाच्या गोष्टी सांगताना फार गोड वाटतात कारण हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे मला खूपच सुख झाले आणि ते मी माझ्या मुखाने देखील सांगू शकत नाही. हरित आणि माझ्यात कोणतेच अंतर राहिले नाही मग आता कष्ट तरी कशाकरता करू? तुकाराम महाराज म्हणतात आता जे सुख प्राप्त झाले आहे तेच आपल्या जिवाशी धरू आणि त्याचे जतन करू.


अभंग क्र.१६९७
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥
तूंचि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥
वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥
तुका म्हणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥

अर्थ

देवा आपल्यामध्ये जर वाद झाला तर त्या ठिकाणी मी माघार घेणार नाही परंतु आपल्यामध्ये जर संवाद झाला तर मला चांगलेच वाटेल.अरे देवा तुला मोठेपणा कोणामुळे आहे तर आमच्या मुळेच आहे पाय जर नसेल तर नुसते डोके असून काही उपयोग आहे काय?देवा आम्ही तुझ्या सेवेचा भार वाहत आहोत तेही अनेक दुःख सहन करून.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यात आणि माझ्यात काहीच अंतर नाही त्यामुळे तू निष्कारण माझ्याशी वाद करू नको.


अभंग क्र.१६९८
तुज नाहीं शक्ती । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥
ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥
लपोनियां आड । आम्हां तुझा कैवाड ॥२॥
तुका म्हणे तुजसाठी । आम्हां संवसारें तुटी ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या हाती काहीच शक्ती नाही त्यामुळेच तो आम्हा भक्तांकडून काम करून घेतोस. यासंबंधी तू स्वतः याचा अनुभव घेऊन पहा आता यासंबंधी आणखी काही बोलायचे बाकी राहिले नाही. देवा तु मायेच्या आड लपून बसतोस त्यामुळे नास्तिक लोक तू नाहीस असे म्हणतात, पण त्यावेळी आम्हाला तुझा कैवाड म्हणजे तुझी बाजू घ्यावी लागते म्हणजेच तू आहे असे असे सिद्ध करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यासाठी आम्ही संसार बंधनही तोडले आहेत.


अभंग क्र.१६९९
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥
झडलें उरलें किती । आम्ही धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥
कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥
तुका म्हणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या ठिकाणी पाप आणि दोषांचा आभाव आहे. देवा तुझ्या ठिकाणी किती दोष आणि गुण राहिले आणि नष्ट झालेत हे आम्ही आमच्या चित्ता तर ठेवले आहेत. देवातुझा तु जातीहिन, धर्मभ्रष्ट आणि क्रियानष्ट आहे हे मला कळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरी विषय बोलण्याकरीता त्याच्या संबंधित काहीच ताळमेळ लागत नाही.

 


अभंग क्र.१७००
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥
नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥
शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥
तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥३॥

अर्थ

देवाशी भांडण केले की हितच होते आणि उचित काय आहे हे समजते लगेच ळूनही येते. याकरिता आम्ही देवाशी भांडण करणे थांबवणार नाही आणि आमच्यामधील जो भेद आहे तोच याला कारण आहे की आम्ही एकमेकांशी बोलू शकतो म्हणजे देव आणि मी वेगळा आहे त्यामुळेच मी देवाशी बोलू शकतो जर मी अद्वैतरूपाने देवाला पाहिले तर मी त्याच्याशी बोलू शकत नाही कारण त्यावेळी देव आणि मी एकच असु. देवा सारस नावाचे पक्षी यांची एकमेकांशी भेट जरी झाली नाही तरी ते शब्दानेच भेटतात त्याप्रमाणे आम्ही तुझ्याशी बोलणे थांबवणार नाही कारण तुझ्याशी बोलणे झाले म्हणजे भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आळस धरू नये सारखा देवाशी संवाद करावा आणि जर देवाशी संवाद केला नाही तर देवाच्या कार्‍यात अडथळा होईल.


सार्थ तुकाराम गाथा 1601 – 1700

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *