tukaram gatha 601 to 700

सार्थ तुकाराम गाथा 601  ते 700

सार्थ तुकाराम गाथा ६०१  ते ७००


६०१
उगेचि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥
नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥

अर्थ

माझे मन जर निश्चळ राहिले असते तर उगाच एवढी तळमळ का करावी लागली असते?तुमचे कौतुक मला कळत नाही सर्वोत्तम खेळ तुम्हीच खेळता.आमच्या जीवाला तुम्ही नाना छंदाने नाचवता.आणि तुम्ही अनेक प्रकारच्या त्यांच्या पुढे भलत्या प्रकारची हाव वाढविता.तुकाराम महाराज म्हणताततुम्ही तुमची कीर्ती वाढविण्यासाठीच आमची चेष्टा करतात.


६०२
आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥
झालें तेंव्हा झालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे झाले ॥ध्रु.॥
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुध्द त्यासी शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥३॥


६०३
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥
सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥

अर्थ

तुम्ही मला टाळणार नाही हा भरवसा मला आहे.तुम्ही मग असे का समजता की,मी अधीर आहे.माझा उद्धार तुम्ही लांबणीवर का टाकला आहे?एकदा काय ती आमची करकर मिटवून टाका.आमच्या करकरी पासून तुमची सुटका होणार नाही हे जर तुम्हाला कळले आहे तर एवढे का विनवणी करायला लावत आहात?तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फार सभाग्यवान आहात देवा,कारण मला मुक्त करणे फारसे कठीण नाही पण तरीदेखील तुम्ही माझा उद्धार करण्याविषयी एवढा कंजूष पणा का दाखवत आहात.


६०४
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन ते ॥२॥
तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥

अर्थ

आहो देवा तुम्हाला आमचा विसर पडेल त्यामुळे आम्ही सारखे तुमच्या दारी येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत.तुम्ही या कडे लक्ष द्यावा पतीताला तुम्ही पावन करता असें तुम्हांला ब्रीद आहे.ती जबाबदारी तुम्ही का घेत नाही ते सांगा?मी द्रव्य अथवा अर्थाला भुकेला नाही,तेव्हा मला भलत्या थापा मारून मी कशालाही फसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझा देह अभिमान सहित तुम्हा वरून ओवाळून टाकेल.


६०५
जडलों अंगाअंगीं । मग ठेवींये प्रसंगीं । कांहीं उरिजगी। लोकीं आहे पुरती ॥१॥
ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥
गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचे ठायीं । निवाड तो तई । अवकळा केलिया ॥२॥
तुका म्हणे ठावे । आम्हां असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥

अर्थ

देवा मी तुमच्या अंगाला येऊन भिडलो आहे.आता या प्रसंगी मी तुमचा मोठे पणा शिल्लक ठेवणार नाहि.तुझा माझा कसा संबध आहे,ते लोकांना माहित आहे.मी धीर धरला आहे.तो पर्यंत तू विचार कर संधी मिळताच मी तुला धरून ठेवले तर आमचे बळ किती महान असते हे तुला कळून येईल तुझ्या चरणावरून माझे मस्तक हटवणार नाही.तुला हालचाल करू देणार नाही.आश्यावेळी आपल्या कर्तव्याला कोण चुकले हे सर्वाना कळून येईल.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कसे आहात यांची मला जाणीव आहे.तुमच्या दाराशी जे भक्त येतील त्यांना तुझ्या नावाने ओरडून-ओरडून देण्याची व असेच ओरडत ठेवण्याची सवय तुम्हाला पहिल्या पासूनच आहे.


६०६
आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥
माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥
नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तेंचि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥
नाहीं येत बळा । आतां तुह्मासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥

अर्थ

आम्ही शक्तीहीन आहोत,तुम्ही आमचे कसे काय कराल?ते कळत नाहि.कोणाचे हि काम तुम्ही करत नाही अशा प्रकारचे निगड तुम्ही स्वतःच्या पाठीमागे लावून घेता ही तुमची खूप जुनी सवय आहे म्हणून मी येथे खोळंबलो आहे.माझे मला देऊन टाका जो ठेवा मी तुमच्या कडे ठेवला आहे.मी अधिक काही हाव धरीत नाही.काही संबंध नसताना मी तुमच्या गळ्यात पडलो असे समजू नका,तुम्ही जे म्हणाल ते मी अंगीकार करेन व तसाच वर्तन करील.देवा चारचौघा संतांमध्ये बसून आपल्या भांडणाचा नीकाल लावण्याचा प्रसंग येईल आणि अशा वेळेस तुम्ही देणे लांबणीवर टाकणे म्हणजे हा अनुचित प्रकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळा,मी तुमच्यावर बळजबरी करीत नाही.तुमच्या पाया पडून विंनती करतो कि या भांडणाचा निकाल आता तुम्हीच लावावा.


६०७
काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका ॥१॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥
धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुर ॥३॥

अर्थ

तुझी कृपा असल्या शिवाय आम्ही तुझ्यावर कशी साकडे घालावे,म्हणून आपल्यावर संकट घालणे योग्य वाटत नाही.आम्ही पूर्वी प्रमाणेच दिन पणाने तुमच्या पुढे काकुळतीस येऊन आर्ततेने हाक मारत राहू.भय धरून आता चिंता करत काय बसू?तुमच्याशी नाते जोडले आहेना त्या आप्त पणाचा काय उपयोग.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भावहिनजीव आहोत.म्हणून देव आमच्या पासून दूर गेला आहे.


६०८
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥१॥
आशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान निंश्चितीचें ॥ध्रु.॥
दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥३॥

अर्थ

मी कोणत्याही श्रेष्ठांचे वचनाचे उल्लंघन केले नाही,असे असता आमच्या पासून नारायण का दूर झाला?याच शंशायाने मन नारायणाला आळवीत आहे.या शंशायामुळे माझ्या मनाची समाधान स्थिती स्थिर नाही.तुम्हाला तुमच्या दासांचा विसर पडतो हा तर अनुचित प्रकार आहे सर्व धर्मनीती तुमच्या पायापाशी चा आहे.तरी तुम्ही असे का वागता? तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला चिंतेच्या डोहामध्ये बुडवतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?


६०९
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥
क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फलकट वेंचि तें तें होय ॥३॥

अर्थ

देवा बालकाच्या आईने बालकाचा जीव जाईपर्यंत जर त्याचा त्याग केला तर ही मोठी आश्चर्‍याची गोष्ट आहे.हे नारायणा तुम्ही दुर्बळ झाला आहात की आमचे बोलणे तुमच्या कानापर्यंत येत नाही नेमके कमीपणा आहे तरी कोठे?अहो देवा मी क्षणाक्षणाला तुमची करून भाकत आहे तरीदेखील तुम्ही माझ्याकडे लक्षही देत नाहीत माझा सांभाळ तुम्ही करत नाही ठीक आहे हे माझे काही तरी अभाग्याचा काळ आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या बोलण्यात तुम्हाला काही रुची वाटत नाही त्यामुळे आमचे बोलणे फोलपटा सारखे निरस झाले आहे.


६१०
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मीच माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥
तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥

अर्थ

मी अनुभवाने स्वामी पुढे बोलतो की मी तुमचा दास नाही.कारणमी एवढा अट्टाहासाने तुझ्यापुढे बडबड करतो आहे तरीदेखील तू त्याला काहीच प्रत्युत्तर का देत नाहीस?अहो देवा प्रेम आणि बोलण्यात रसाळपणा जर आपल्या दोघांमध्ये नसेल तर मग माझ्या चित्तामध्ये तुमचे विषयी विश्वास कसा उत्पन्न होईल.तुकाराम महाराज म्हणतात हे कृषिराजा तुम्ही सर्व चतुराची शिरोमणी आहात त्यामुळे माझ्या बोलण्याचा तुम्ही तुमच्या मनाशीच विचार करा.


६११
काय आह्मीं आतां पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥
काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥
तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥

अर्थ

देवा आम्ही आता भक्तपणाचा आव आणून या भोळ्या भाबड्या माणसांना फसवून आमचे पोटच भरावे काय?तुमचे असेच मत असेल तर मला सांगा.उगाचच आमचा जीव कासावीस होत आहे.काव्याची रचना करून आम्ही केवळ शब्दांची जोडत करत रहावे काय? तुकाराम महाराज म्हणतात या दंभाच्या दुकानांमध्ये गुंतून राहून स्वतःचा घात करून घ्यावा काय?


६१२
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥
तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥

अर्थ

तुझ्या भेटीचे वर्म काय आहे ते दाखव,ते वर्म मी कसे जाणून घेऊ?विषय सुखात रंगून माझी वृत्ती हीन झाली आहे.म्हणून मी तुझ्या चरणी शरण आलो आहे.तुम्ही जर मला धीर दिला तर,तुझ्या ठायी माझे मन स्थिर होईल.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपल्या सत्ता बळाने माझ्या सारख्या बाळकाचे प्रेमाने रक्षण करावे.


६१३
सांगों देवा नेणा काय । बोलाची आवडी ॥१॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासें जाणतसां ॥२॥
तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥

अर्थ

हे प्रभू तुमचे अमृतासारखे शब्द नेहमी कानावर पडावे असे वाटते.हे तुम्हाला वारंवार सांगावे लागेल काय?हे विश्वंभरा थट्टेने देखील माझ्याशी चुकवा चुकाव करू नकोस.माझ्या ज्या काही आवडी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा,तसे तुम्ही अंतर्‍यामी आहात.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्याशी समाधानाने बोलाल तर मी मानाने मोकळा होईल.


६१४
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुके ॥१॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तई नाचेन ॥ध्रु.॥
स्वामी कळे सामाधान । तरि मन उल्हासे ॥२॥
तुका म्हणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥

अर्थ

निर्धारपणे कर्म केले तर,त्याचे गोड फळ प्राप्त होते.त्या कार्‍याचे कौतुक होते.तुझ्या पायी माझा भाव दृढ झाला म्हणजे मी आनंदाने नाचेन. स्वामींचे अस्तित्व कळले की आणि स्वामी च्या ठिकाणी माझे मन एकाग्र झाले तर मनाला समाधान प्राप्त होईल आणि,मन उल्हासित होईल.तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाने त्याच्या चरणांशी दृढ राहण्या विषयी आश्वासन द्यावे आणि प्रेमाचा वर्षाव करावा.


६१५
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥
नव्हों कोणांचीच कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥२॥
आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥


६१६
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥
तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥
सेवेच्या अभिळासें । मन बहु जालें पिसें ॥२॥
अरे भक्तपराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ

मला तुझा आधार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा(आस)आहे.तुमच्या पाशी सर्व काही आहे मला जर त्यातून थोडे दिले तर तुम्हांला काय कमी पडणार आहे?तुझ्या सेवेच्या इच्छेने माझे मन वेडावून गेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे भक्त पराधीना (भक्तांच्या आधीन असणाऱ्या) माझ्या अंतकरणाचे समाधान कर नारायणा.


६१७
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
कासया हो रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥
तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥

अर्थ

तुम्ही सगुण रूपात येऊन तुम्हालाच अडकवून घेतले आहे,आता चुकवा चूकवी का करता?आता आम्हला तुम्ही मायाजाळात कसे गुंतवू शकाल?तुम्ही आम्हाला तुमच्या भक्ती विषयी शहाणे केलेत.तुम्ही नावा रुपाला का आलात?तुकाराम महाराज म्हणतात आता कोणाचाही हवाला देऊन चालणार नाही.


६१८
माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥
मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥
आतां अनारिसा । तेथे न व्हावें सहसा ॥२॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥

अर्थ

माझी भक्ती भोळी आहे.मी फार एकनिष्ट तुमच्याशी आहे.असा छान चाललेला भक्तीचा सोहळा सोडून मी का निराळा राहू?देवा तुझ्याशी माझे असे नाते जुळले आहे की आता मी तुझ्याशी बिलगून राहावे.तुकाराम महाराज म्हणतात तू आता तुझे पाय दोन्ही जोडून निट उगाच उभा रहा.


६१९
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीं सेवन लेंकुरें ॥ध्रु.॥
तरो निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥
तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥

अर्थ

माझा तुझ्यावर हक्क आहे.म्हणून मी असे शब्द बोलतो.आंम्ही भक्त म्हणजे तुझी छोटी बालके आहोत.याच करणा मुळे आमचे बोलणे सलगीचे आहे.कोणतीही शंका न धरता आम्ही तुझ्या जवळ राहू. तुकाराम महाराज म्हणतात हरी विषयी मला ऐवढी गोडी लागली आहे की,आता कसली भिन्नता मनात येणार?


६२०
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥
देह समर्पीजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥

अर्थ

हरीच्याच चिंतने काळ घालावा.एकांत राहावे,गंगास्नान करावे.देवाची पूजा करून तुळशीप्रदक्षिणा कराव्या.आहारात व्यवहारात नियम असावे.इंद्रियावर संयम असावा,जास्त बडबड नसावी,जास्त झोप हि नासावी.परमार्थ हे महा धन आहे,त्या योगे हरीच्या चरणांची प्राप्ती करून घे.हे सर्व जतन होण्या साठी हे नियम आहेत.तुकाराम महाराज म्हणतात देह हा देवाला समर्पण केला पाहिजे,त्याचा भार स्वतःवर घेऊ नको,म्हणजे अवघा आनंदच तुला होईल.


६२१
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥

अर्थ

आम्ही विष्णुदास मेणाहूनही मऊ नम्र शीतल शांत आहोत.तसेच आम्ही कठीण आहोत की दगडासही भेदू.आम्ही देह बुद्धीने मरून सुद्धा आत्मस्तीतीने जागे आहोत.आम्हाला जो जो जे जे मागेल आम्ही त्याला ते ते देऊ.आमची नेसलेली वस्त्रे सुद्धा आम्ही त्याला देऊ,पण जर एखादा नाठाळ असेल तर आम्ही मात्र त्याच्या डोक्यात कठी घालू.आई वडील माया करतात त्या पेक्षाही आम्ही मायाळू आहोत,पण शत्रू पेक्षाहि घात पात करू.अमृतापेक्षाही आम्ही गोड आहोत आणि विष पेक्षाही आम्ही कडू आहोत.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अवघे सगळेच गोड आहोत. पण ज्याच्या त्याच्या पद्धती प्रमाणे आम्ही त्याचे लाड पुरवितो.


६२२
गाढवाचें तानें । पालटते क्षणक्षणें ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥
तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥

अर्थ

गाढवाच्या शिंगारा मध्ये क्षणाक्षणाला बदल झालेला दिसतो.त्या प्रमाणे अधम मनुष्याचा स्वभाव असतो.त्याचे मन कधी एकनिष्ट नसते.गाढवाचे पोर जन्मल्यावर चांगले दिसते.पण ते जसे जसे वाढत जाते तसतसे ते कुरूप दिसते. तुकाराम महाराज म्हणतात गाढव केव्हाही ओरडते.त्याला काळ वेळ कळत नाहि.


६२३
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥
गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीनचि बुद्धी करुनी ठेवा ॥ध्रु.॥
विचाराचें कांहीं करारे स्वहित । पापपुण्यांतीत भांडवल ॥२॥
तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखेंचि ॥३॥

अर्थ

दुसऱ्याचे धनआणि दुसऱ्याची पत्नी याचा विटाळ मानवा.या पासून जो दूर राहतो तो सोवळा(शुद्ध) आहे.गद्य पद्य ग्रंथ रचून दुसऱ्याची उपाधी करून घेऊ नये.आपली बुद्धी स्वाधीन करून ठेवा.विचारांचे काही स्वहित करा,पाप पुण्यातील भांडवल निवडून आत्म नंदाचे भांडवल जोडावे.तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या प्राप्तीसाठी काही वनात वगैरे जावे लागत नाही,सर्व विश्वा मध्ये तो विश्वात्मा व्यापक आहे.


६२४
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इछितिया ॥१॥
उदंड त्या गाई म्‍हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥

अर्थ

जगात बाभळीचे आणि रुई चे झाडे थोडी आहेत का?पण आपल्याला हवी ती फळे कल्पतरूच देऊ शकतो.गाई,म्हैसी,शेळ्या अनेक आहेत,पण त्या सर्वांपेक्षा कामधेनु वेगळीच आहे.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो देवाचे दर्शन घडवितो असा संत महात्मा मिळणे फार दुर्लभ आहे.


६२५
जळो तैसा प्रेमरंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥
सासूसाठी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥
मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥२॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥३॥
बक ध्यान धरी । दावी सोंग मस्य मारी ॥४॥
तुका म्हणे सर्प डुले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥

अर्थ

पतंगाला दिव्या विषयी प्रेम असल्याने तो दिव्यावर झडप घालतो,व जळून जातो.हे कसले प्रेम?सासू मेली म्हणजे सून रडते पण तिच्या मनात वेगळाच भाव असतो.कपटी मनुष्य वरवर गोड बोलतो,त्याच्याही मनात भाव निराळाच असतो.वृंदावन नावाचे फळ बाहेरून गोजिरवाणे असते,पण ते आतून कडू असते ते हातात घेऊ नये.नदीच्या तीरावर बक(बगळा)ध्यानस्त बसलेला असतो पण तो मासे पकडण्यासाठी बसलेला असतो.तुकाराम महाराज म्हणतात ज्या प्रमाणे नाग डोलतो त्या प्रमाणे ढोंगी माणूस हरीची कथा चालू असताना मान डोलवण्याचे सोंग आणतो.


६२६
वेशा नाहीं बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणीं क्षोभा ॥१॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥
सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥
याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें हीत ॥३॥
तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥

अर्थ

साधुसंतांनी घातलेल्या वेशेला मी दोष देत नाही तर त्यांच्या अंतकरणात जे अवगुण आहे त्याला मी दूषण देत आहे. माझ्या बोलण्याचा राग माणू नका.अन्न जीवन जगण्याचे मुख्य साधन आहे हे कोणाला कळत नाही परंतु त्याचा अन्नामध्ये विष कालवले तर ते अन्न आपल्या जिवास घातक ठरेल.सोने शुद्ध आहे हे कोणाला माहित नाही, पण जर सोन्याचे अलंकार करणाऱ्या कारागिराने सोन्याला इतर धातू चा डाग लावला तर ते सोने शुद्ध राहत नाही.एखाद्या मनुष्याची जात उच्च कुळातील आहे परंतु त्याच्या अंगामध्ये अवगुण असतील अधम लक्षण असतील तर तो उच्च कुळात जन्माला आलेला असून देखील वाया जातो त्याचे उच्च कुळात जन्माला येणे म्हणजे एक प्रकारचे सोंग घेतल्यासारखे आहे.तुकाराम महाराज म्हणतात रणांगणामध्ये जो शुर पणे लढाई करतो तोच खरा शूर असतो नुसतेच वर शिपायाचे कपडे घातलेले किंवा वस्त्र परिधान केले तर तो शूर ठरत नाही तो केवळ व शस्त्राचे भार वाहणारा ठरतो.


६२७
अणुरेणुयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुनि सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥
तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥

अर्थ

मी अणुरेणु पेक्षाही सूक्ष्म व आकाश ऐवढा मोठा आहे.मी भ्रम रुपी आकार सर्व गिळून टाकला आहे.ज्ञेय,ज्ञाता व ज्ञान हि त्रिपुटी मी सांडली आहे आणि अंतकरण रूप घाटाच्या ठिकाणी नीज बोधाचा दीप प्रकाशित केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता मी केवळ लोकांवर उपकार करण्यासाठी उरलो आहे.


६२८
धन्य आजि दिन । झालें संताचें दर्शन ॥१॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥२॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥३॥

अर्थ

आजचा दिवस धन्य आहे संताचे दर्शन झाले म्हणून.त्यांच्या दर्शनाने पाप,ताप,तसेच दैन्य याचे तुटातुटी झाली आहे.माझे समाधान झाले असून तुमच्या पायाशी माझे मन विसावले आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्या दिवशी संत घरी येतात,तो दिवस दिवाळी व दसरा आहे.


६२९
हेंचि माझें धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥

अर्थ

देवा तुमचे चरण वंदन करणे हेच माझे धन आहे.आमचे चित्त तुम्हाला अर्पण करून आम्ही जीवन व्यतीत करू.देवा माझ्या सारखा अनाथ जिवाचा तुम्ही सांभाळ केला.तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला हात जोडून विनंती करतो की,तुम्ही माझ्या जवळ राहा मी तुमचा दिन दास आहे.


६३०
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागे ॥१॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥
निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखा ॥२॥
योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणें ॥३॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥

अर्थ

हे माझ्या फजित खोर मना तुला किती सांगावे,कोणाच्याही मागे मागे जाऊ नकोस.आपण आपल्या देहा संबंधितांशी स्नेह धरला की आपल्याला दुःख होते अशा प्रकारचे प्रेमसुख हे फार कठोर असते.कोणी निंदा करो स्तुती करो किंवा दया माया करो,या सुखः दुःखा चि चाड मी धरणार नाही.योगी राज लोक जे आहे ते एकांतात आसनावर बसून राहतात,ते याच साठी.त्यांना इतर जनाशी सानिध्य नको असते.तुकाराम महाराज म्हणतात अरे मनात संसार संबंधितांची उपाधी किती कठीण आहे याविषयी स्वतःशीच विचार करून पहा आणि वज्रा सारखा कठीण तू व्हावे.


६३१
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींच चांगली ॥१॥
तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥
हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥
उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥
तुका म्हणे हित । हेंचि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥

अर्थ

तुझ्या मध्ये मी एकरूप व्हावे,अशी माझी बुद्धी असेल तर त्या बुद्धीला आग लागो.मला विधी निषेधाचे पालन करणे याविषयीच आवड आहे.हे देवा,तू माझा स्वामी आहे आणि मी तुझा सेवक आहे.तू उच्च पदावर आणि आम्ही खाली असावे असे तू कौतुक तू करावे,ह्यात काही भेद नसावा.पाणी पाण्यास कधी पीत नाही,वृक्ष कधी आपली फळे खात नाही.त्याला खाणारा म्हणजे त्याचा भोक्ता हा वेगळा असतो,तो त्याचि गोडी जाणतो.हिरा हा कोंदणात शोभून दिसतो.सुवर्णाची शोभा दागिन्याच्या रूपाने दिसते.या प्रमाणे सर्व व्यवहार भेदात होतात.जर ते एकच असेल,तर दुसरे कसे बरे जाणावे?उन्हात तापल्यावर थंडगार सावलीत सुख लाभते.बालकाच्या योगाने आईला पान्हा फुटतो.एकाला दुसरे न भेटता त्यांना सुख कसे प्राप्त होईल?तुकाराम महाराज म्हणतात असे वेगळे राहण्यातच मला हित वाटते.मी तुझ्याशी एकरूप होऊन मुक्त होणार नाही.एकत्व जाणून आणि त्याचा अनुभव घेऊन,तू देव आणि मी भक्त बनून मी सदैव तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करत राहणार आहे.


६३२
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥
जातीचें तें झुरे येर येरासाठी । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरीजन प्राणसखे ॥३॥

अर्थ

आपल्याला ज्याच्या बद्दल आवड आहे,त्याचे बोलणे हे नेहमी आवडते.असे वाटते कि,त्याचा समाचार घ्यावा. एका जातीचे म्हणजे एकाच आवडीचे दोघे एक मेकांसाठी झुरत म्हणजे झिजत असतात.ते शरीराने दूर पण मनाने एक असतात.एकमेकांच्या भेटीची ते अपेक्षा धरतात,त्यांना कुणी थांबविले तर ते त्यांच्या विषयी पुन्हा पुन्हा विचारतात,तुकाराम महाराज म्हणतात हरीभक्त हे माझ्या जीवाचे जीवन आहे.ते माझे प्राण साखेच आहेत.


६३३
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥
पंढरीसि जावें उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥
तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाठी ॥३॥

अर्थ

प्रपंचात राहून समाधानी राहतो, जो पांडुरंगाचे चिंतन करतो,त्याला पांडुरंगच साह्य करतो.पंढरीला जावे असे जो मनात ठरवतो,त्याला पांडुरंग भेटल्या शिवाय राहत नाही.जरी देहात बळ नसले,देह पराधीन असला तरी पांडुरंगाचे चिंतन कधीही सोडू नये.तुकाराम महाराज म्हणतात चिंतन करता करता देह पडला तरी त्याची परवा करू नये.परत पांडुरंगाची भक्ती करण्या साठी मनुष्य जन्म मिळतो.


६३४
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥
न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥
तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥

अर्थ

माझ्या अंगी मोठेपणा का आला?मी दिन होते तेच बरे होते देवा.संतांची सेवा हे उत्तम साधन आहे,आणि आवडीने मी हरी नाम गाईन.मी कोठे हि गेलो,तरी मला कोणी विचारले नसते त्या योगाने मी समाधानी झालो असतो सुखी झालो असतो.तुकाराम महाराज म्हणतात लोकांनी माझा अव्हेर केला असता तर केशीराजाने माझा सांभाळ केला असता.


६३५
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं ॥१॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूतांच्या मत्सरावरी बुद्धी ॥२॥
तुका म्हणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥

अर्थ

मी चतुर झालो असा मोठा अभिमान माझ्या अंगी आला आहे,पण तो माझ्या अंगी देवाविषयी भाव नसल्या मुळे रिता म्हणजे पोकळ आहे.आता पुढे मी वयाला जाईल हे काही नवल नाही,कारण माझ्या मध्ये काम क्रोध यांनी वास केला आहे.जगाच्या मधील सर्व गुणदोष एकत्र होऊन माझ्या मनात ते शिरले आहे.भुताच्या म्हणजे प्राणीमात्रांचे मत्सर करावा आशी माझी बुद्धी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना उपदेश करतो पण मात्र मी एकाही दोषापासून सुटलो नाही.


६३६
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥
लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥
मधुरा वाणी होटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥३॥

अर्थ

ज्यांच्या अंगी दया आहे ते या जगात धन्य आहे.कारण ते येथे फक्त उपकारासाठी आलेले आहेत,त्यांचे घर हे वैकुंठा मध्ये आहे.ते कधी लटिके(खोटे)बोलत नाही,ते देहासंबंधी उदास असतात.तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या ओठात कायम मधुर वाणी असून,त्याच्या पोटी लोकांचे गुणदोष सहन करण्या इतकी भरपूर जागा आहे.


६३७
कांडील्या कुटिल्या होतो मांडा । आळसें धोंडा पडतसे ॥१॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥
तरटापुढें बरें नाचे । सुते काचें मुसळ ॥२॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥

अर्थ

चांगले कणिक असले तरच मांडा हा पदार्थ चांगला होतो.अन्यथा कनिकाचा धोंडाच पदरात पडतो.आम्ही जे तुम्हाला काही सांगतो त्याचा राग मनात धरू नको.तरट संबंध घेतले तर मुसळ त्यामुळे झिजत नाही.पण दोरीचे वेढे मुसळाला असले आणि दोरी सतत फिरवली तर त्या मुळे मुसळाला काचे पडतात. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या मूर्ख मनुष्याला जर वठणीवर आणायचे असेल तर काठी हे त्याचे सार आहे.


६३८
कळों येतें तरि कां नोहे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥
जाणतांचि होतो घात । परिसा मात देवा हें ॥ध्रु.॥
आंविसासाठी फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठे बळीवंत ॥३॥

अर्थ

सर्व काही समजते तरीदेखील काहीच न समजल्या सारखे काही लोक करतात असे ते का करतात ते काही कळत नाही परंतु असे केल्याने ते भ्रमाच्या बंधनात गुंतून पडतात. देवा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावे की सर्व काही समजत असून देखील काही लोक न समजल्या सारखे करतात त्यामुळे त्यांचा घात होतो. मासा अडकवण्यासाठी गळाच्या टोकाला आमिष लावले जाते आणि त्या आमिषा पोटी मासा गळाला लागतो त्याप्रमाणे मनुष्य इच्छा आणि धन या दोन गोष्टींमुळे भ्रमात गुंततो व बंधनात अडकतो. तुकाराम महाराज म्हणतात जे होणार आहे ते होणारच कारण पूर्व कर्म हे फार बलवंत असते.


६३९
मोकळें मन रसाळ वाणी । याचि गुणीं संपन्न ॥१॥
लक्ष्मी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥
नमन ते नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥

अर्थ

मनुष्याचे मन मोकळे असावे वाणी रसाळ असावे याच गुणांनी मनुष्य संपन्न असावा.यालाच लक्ष्मी संपन्न म्हणावे त्यांचे जगणे म्हणजे भाग्याचे आहे.सतत नम्रता त्यांच्या अंगी असते,ती नम्रता कधी बदलत नाही.तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांचे नाव घेतेले,तरी मानला संतोष होतो.


६४०
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥
पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥
तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥

अर्थ

शेवटची विनवणी हि संताना आहे ती तुम्ही संतजनांनी ऐकावी एवढेच माझे म्हणणे आहे,माझा विसर तुम्हाला कधीच पडू देऊ नका.याच्या पुढे अधिक काय बोलू?तुम्हाला सारे काही कळत आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पाया पडलो आहे,माझ्या वर कृपेची सावली करा.


६४१
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ॥२॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥३॥
तुका म्हणे आहें पाईकचि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥४॥

अर्थ

मी माझ्या बुद्धीने अभंग रुपी कवित्व करत आहे असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी लक्षात घ्या की मी माझ्या वाणीने जे काही बोलतो आहे ती वाणी माझ्या स्वतःची नाही.माझ्या युक्तीने मी काहीच बोलत नाही मला प्रत्यक्ष विश्वंभर बोलवितो आहे.मी तर पामर आहे.मी पामर आहे मला अर्थभेद काय कळणार गोविंद जसा माझ्या वाणीला वदवून घेत आहे तशी माझी वाणी वदत आहे.निमित्त मात्र म्हणून मला बसविले आहे,तेथे मी म्हणून काही नाही सारी स्वामी सत्ता आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी खरोखर भगवंताचा पाईक आहे त्याचा सेवक आहे हरिनामाची मुद्रा मी माझ्या जवळ बाळगीत आहे.


६४२
आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥
सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥
येथें नाहीं लाज भक्तीभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥
सदैव ज्यां कथाकाळी घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥५॥

अर्थ

आम्हीच हरीचे गुण गावे आणि तुम्ही ऐकणाऱ्या श्रोत्यांनी देवाचे नाम न घ्यावे असे काही देवाने सांगितले नाही.म्हणून तुम्ही हि रामराम म्हणा आणि हाताने टाळी वाजवा,तसेच आपल्या स्वहितासाठी प्रेमाने नाचा,डोला.जी गोष्ट सहज होत आहे ती करण्यास आळस काय म्हणून करावा?हात व पाय हे शेवटी अग्नीच खाऊन घेणार आहे.भक्ती भावात येथे काही लाज धरायची नसते,जो कोणीही हसेल त्याला येथे ब्रम्हहत्येचे पातक लागेल.जसा ज्याचा भाव असेल तसे त्याने निरोपण करावा,देवाला तुमचा गाण्यात ताल बरोबर आहे कि नाही यांची काळजी नसते,तुकाराम महाराज म्हणतात ज्याला नेहमी हरी कथा श्रवण करण्यास मिळते तो खरा भाग्यवान आहे इतर सर्व केवळ दगड म्हणूनच जन्माला आलेले आहेत.


६४३
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥
देव न लगे देव न लगे । सांठवणाचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥
दुबळा तुका भावेंविण । उधारा देव घेतला ऋण ॥४॥

अर्थ

आहो,देव घ्या कोणी,देव घ्या कोणी तो देव आयता घर विचारीत आला आहे असे मी म्हणले तर मला लोक म्हणाले देव नको,देव नको कारण आमच्या घरी देवाला राहण्यासाठी जागा शिल्लक नाही असे लोक मला म्हणू लागले.आहो,लोकहो देव मंदावला,देव मंदावला म्हणजे देवाचा भाव कमी झाला मी काय करू?आहो,लोकहोदेव फुकट घ्या,देव फुकट घ्या त्याला काही दमडी किंमत नाही.तुकाराम महाराज म्हणतात भावेविण मी दुबळा आहे,उधार मागून घेतला आहे,केवढे हे ऋण माझ्या डोक्यावर आहे.


६४४
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥
साधनें संकट सर्वांलागीं शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ध्रु.॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥
तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडे । येरांसी तों पडे वोस दिशा ॥३॥

अर्थ

संपूर्ण जग म्हणजे विष्णूचे स्वरूप आहे हे केवळ वैष्णवांना माहित आहे इतर ज्ञानाचा भार वाहणाऱ्या लोकांनी आपल्या माथ्यावर भार(ज्ञानाचा) वहावा. अनेक प्रकारचे साधने म्हणजे संकटच आहे त्यामध्ये अहंभाव हा शिण झाला पाहिजे.अहंकारचाम्हणजेच अहम भावाचा नाश करणे हे फार कठीण आहे.एक वेळ वज्राचा नाश करता येईल पण मायाजाल तोडता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्तीचे खरी वर्म तुम्हाला केवळ भजनातच सापडते बाकीच्यांना मात्र दिशा ओस पडतील.


६४५
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥ध्रु.॥
अंगी वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥२॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥

अर्थ

परमार्थ करताना इतर साधनांपैकी देवाने हरिकीर्तनाची गोडी निवडली आहे त्याला हरिकिर्तन अतिशय आवडते. मग तुम्ही हरिभक्त आणि आपल्या बळावर अधिकार संपन्न व्हा मग हरी तुम्हाला त्याची गोडी देईल.वैराग्याच्या बळावर सहा विकारांना(काम क्रोध लोभ मत्सर अहंकार)यांना जिंकावे. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही कीर्तनाची गुडी लावून घ्या हरिकीर्तन करा आणि अधिकार संपन्न होऊन हरित च्या प्रेमाची गोडी चाखा असे मी ओरडून सांगत आहे.


६४६
कायावाचा मन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥१॥
अवघें आलें आंत पोटा पडिलें थीत । सारूनि निंश्चित जालों देवा ॥ध्रु.॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥२॥
तुझ्या रिणें गेले बहुते बांधोनी । जाले मजहूनी थोरथोर ॥३॥
तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेई देवा ॥४॥

अर्थ

माझे काय वाचा मन हे तुझ्याकडे गहान ठेवले आहे.तुला साधावा यासाठी मी तुझे प्रेम रुपी कर्ज घेतले आहे.आता अवघे माझ्या पोटात आहे बाकीचे सर्व प्रकार बाजूला ठेवून मी निश्चिंत झालो आहे. आता तुला देण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही हे तुला आधीच्या परिस्थितीवरून ठाऊक आहे.तुझ्या कर्जाला बरेच जण बांधून गेले तुझ्या कर्जत गुंतले आहेत आणि माझ्या पेक्षाही ते मोठे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझ्या खतामध्ये (खातावनी) जे जे असे गुंतले आहे त्यांना तू आपले से करून घे.


६४७
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥
उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥
तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥

अर्थ

पंढरीच्या बाजारात जन्म मरण चुकते असा माल आला आहे. तो तुम्ही घ्या जेथे पुंडलीकाने पांडुरंग पपरमात्म्याला विठेवर उभा केला आहे अशा पंढरी गावात इनामाची पेठ भरले आहे. तो माल घेण्याकरता सर्व जण सरसावले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात बापहो, तुम्हाला जर हा माल हवा असेल तर तुम्ही खरे माप (म्हणजे भक्ती भावाने तिथे जा.)घेवून या.


६४८
लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं तेचि ठायीं ॥ध्रु.॥
माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥२॥
तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥

अर्थ

हे लक्ष्मी वल्लभा, दिनाच्या नाथा हे पद्मनाभा तुझ्या पायी सुख आहे मला त्याच ठिकाणी ठेव. माझी एक छोठीशी इच्छा आहे तू तर फार उदार आहेस,तू उदारांचा राजा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या भोगाने मला फार पिडा होत आहे म्हणून तू त्वरेने धाव घे.


६४९
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥
प्रेम झोंबे कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥
राहो लोकाचार । पडे अवघा विसर ॥२॥
तुका म्हणे ध्यावें । तुज व्यभिचारभावें ॥३॥

अर्थ

कायम तुझ्या पाया पडून तुला आम्ही जागे करतो.तुझे प्रेम आमच्या कंठात ठसलेले राहो.माझा देह कायम तुम्हाला लोटांगण घालो.आता माझा लोकाचार नाहीसा होवो, मला सर्वांचा विसर पडो. तुकाराम महाराज म्हणतात हे प्रभू मला तुझे व्यभिचार भावाने ध्यान घडो.


६५०
टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥१॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥
तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥

अर्थ

टाळ विणा हे वैकुठाचे मार्ग आहे.ज्यांना कोणाला वैकुंठाला जायचे आहे त्यांनी हरीच्या दासां बरोबर त्यांच्या सोबत जावे.व पुण्याची शिदोरी लवकर तयार करावी ते सर्वांना साद देत आहेत तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे.तुकाराम महाराज म्हणतात ते सर्व वैष्णव विठ्ठलाचे नाव मोठ मोठ्याने घेत व गात जात आहेत.


६५१
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥
आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥
करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥
तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईन ॥३॥

अर्थ

हे,देवा मी वाया जात आहे.मला भक्ती व सेवा कशी करावी ते कळत नाही.आता तुमच्या पुढे हात जोडून मि निवांत उभा आहे.आणखी काय करावे ते कळत नाही म्हणून तुमचे पाय अवलोकित आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या प्रकारचे दान माझ्या पदरात घालाल ते दान मी घेईन.


६५२
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥
आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ध्रु.॥
पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥३॥

अर्थ

जीवाच्या जिव्हाळ्याला आम्ही डोळ्याने पाहू.आम्हांल विठ्ठल हा एकच देव आहे बाकी सर्व व्यर्थ आहे.तो पुंडलिकाच्या पाठीशी कटेवर हात ठेऊन उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात रखुमाईचा पती विठ्ठल आम्ही आमच्या चित्ता मध्ये धरून राहू.


६५३
जीव खादला दैवते । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥१॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हां आम्हां सये । विघडाविघड केली ॥ध्रु.॥
बोलतां दुश्चिती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥२॥
भलतेचि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥३॥
नका बोलों सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥४॥
तुम्हां आम्हां भेटी । नाहीं जाली जीवेंसाठी । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥५॥

अर्थ

व्दैत रुपी बुद्धीला अव्दैत रूपी बुद्धी म्हणते ,महाभूत रूपी विष्णू दैवताने माझा जीव खाल्ला आहे अशाप्रकारचे भूत माझ्या अंगाला लागले आहे ते काही केल्या माझ्या शरीराला सोडत नाही. ते भूत काही केल्या माझ्यापासून वेगळेच होत नाही त्याच्यापुढे काही उपायही चालत नाही.या महाभूताने तुझा(व्दैतबुद्धे) व आमचा विघडा विघड केला म्हणजे वियोग केला आहे.असे बोलताना अरे मी भ्रांतीत पडलो मला मी म्हणण्याचे सुद्धा भान राहिले नाही.मी भलतेच बरळतो आहे.लोकांपासून मी वेगळा झालो आहे,मला माझे मुल बाळ काही आठवत नाही.सये(व्दैतबुद्धे) तू मुळीच बोलू नको कारण मला एक शब्दही सहन नाही.वाचा खुंटोनी(बंद)करून ज्यांना इथे बसायचे असेल त्यांनी राहावे. तुकाराम महाराज म्हणतात तुझी व माझी भेट यापुढे होणारच नाही.तुम्ही निट पहा,माझा जीवच हरी रूप झाला आहे हरी माझ्या नेहमी दृष्टी जवळ आहे हे तुम्हाला दिसून येईल.


६५४
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥
तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥

अर्थ

माझे आराध्य द्वैवत हे पंढरपूरचा विठ्ठल हाच आहे.त्या एक पंढरीराया वाचून आम्ही दुसरे काहीच जाणत नाही.मी विठ्ठलाचा दास आहे,त्याच्या ठिकाणी मी अंकित आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता काही झाले तरी माझ्या बुद्धीत कोणताही अथवा कुठलाही पालट होणार नाही.


६५५
आतां आम्हां हेचि काम । वाचे गाऊ तुझें नाम । वाहुनियां टाळी प्रेम । सुखें आनंदे नाचावें ॥१॥
अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥
गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥३॥


६५६
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥
ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥
नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥२॥
तुका म्हणे कर्म बळिवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥३॥

अर्थ

चोरट्या कुत्र्याला कितीही मारले तरी ते मोठ्याने ओरडते,परंतु आपले चाळे ते सोडत नाही.देवा,अश्या प्रकारचे जे दुराचारी असतात ते आपल्या जीवाचा स्वतःच घात करून घेत असतात.त्यांचे नाक कापले तरी त्यांना काही फरक पडत नाही.फजित खोर होऊन दारोदारी हिंडत असतात.तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे कर्म हे फार बलवान असते त्यांना ते चांगल्या मार्गाकडे सरू देत नाही.


६५७
मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥
अवघाचि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥
पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठाची ॥२॥
तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥३॥

अर्थ

मुनी ऋषी हे गर्भावासाच्या भेणे मुक्ती मार्गाला लागले,परंतु आम्हा विषाणू दासांना हा गर्भवास अतिशय सोपा आहे.आमचा सर्व संसार हा ब्रम्हरूप झाल आहे,म्हणून आमचे पूर्ण जीवन विठ्ठल रूप होऊन गेले आहे.पुराणात वैकुंठ प्राप्तीच्या अवघड साधना सांगितल्या आहे.मात्र आम्हाला वैकुंठाची वाट अतिशय सोपी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व लोकांसहित ईश्वराच्या प्रेमाचा आंनद अखंड पणे अनुभवत राहू.


६५८
न करावी स्तुति माझी संतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥१॥
भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥

अर्थ

माझी तुम्ही संत जनांनी स्तुती(मी साधू आहे) करू नये,त्यामुळे मला अभिमान होईल.या भाराने मला भवनदी तून पार होता येणार नाही.तसेच तुम्हा संत सज्जनांचे पाय दुरावतील.तुकाराम महाराज म्हणतात माझी स्तुती केली तर मला गर्व होईल आणि त्यामुळे विठ्ठलाचा आणि माझा वियोग होईल.


६५९
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥

अर्थ

हे संतजन हो तुमच्या दासांचाही दास मला करा.हाच आशीर्वाद माल द्यावा.नवविधा भक्तीचे जे वर्णन आहे जी बोलली जाते ती भक्ती तुम्ही माझ्या कडून करून घ्यावी.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाच्या आधारे मी भवनदी सहज तरुन जाईल.


६६०
चोरटें काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥
बुद्धीहीन नये कांहींचि कारणा । तयासवें जाणा तेंचि सुख ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी ते कर्म वोढवलें ॥३॥

अर्थ

एक साधा चोर चोरी करण्यास निघाला,तो स्वतःच्या घरात जसा वावरतो तसे दुसऱ्याच्या घरी वावरू लागला.त्यामुळे त्या घराचा मालक जागा झाला.त्यामुळे चोराचा काहीही फायदा झाला नाही.उलट मालकाने कान,हात,पाय काढून त्याची फजिती केली.त्याप्रमाणे अज्ञानी माणसाच्या सान्निध्यात राहून काही सुख मिळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपल्या कामातील वर्म समजत नाही,त्याला त्याचे कर्म फार दुखः कारक होते.


६६१
समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥
अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥

अर्थ

एखाद्या श्रीमंताचे मुल जर केविलवाणे दिसले,तर लोक कोणाला हसतील राजाला हसतील की मुलाला.ते मुल ओंगळ असले,तरी त्याचा पिता प्रेमाने सांभाळ करतो.तुकाराम महाराज म्हणतात तसाच मी पतित असलो,तरी तुझ्याच नावाचा शिक्का धरण करून तुझाच झालो आहे.


६६२
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥१॥
सहज गुण जयाचीये देहीं । पालट तो कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी थुंकोनि टाकी ॥२॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुलें मतें ॥३॥

अर्थ

गाढवाला जरी चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊन राख अंगाला लावून घेणार.त्या प्रमाणे ज्याचा स्वभावी गुण जसा असेल तसा तो सहज बदलू शकत नाही.माकडाच्या गळ्याला जर मौल्यवान मनी बांधला तरी तो चावून थुंकोन टाकणारच.तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे वाईट माणसाला आपले हित कळत नाही,तो आपल्या मताने अज्ञान वाढवीत असतो.


६६३
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥
शिकविलें कांहीं न चलती तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥
वंदूं निंदूं काय अभक्त दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥


६६४
जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥
म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥
संतां ब्रम्हरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥२॥
तुका म्हणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥३॥

अर्थ

माझी भक्ती पाहू लोक मला मान देतात,परंतु माझ्या अंतरंगात मी तसा झालो नाही असे मला वाटते.देवा म्हणून माझा उद्धार कसा होईल यांची मला चिंता वाटते.सर्वांच्या देखत माझे अंतरंग तुझ्या समोर प्रकट करण्याची मला लाज वाटते.संताना सर्व जग हे ब्रम्हरूप दिसते,त्यामुळे माझे अवगुण त्यांना दिसत नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला मी तर कसा आहे हे ठाऊक आहे,तुम्ही सर्व जाणता आहात.


६६५
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥
कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध झालें ॥२॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥

अर्थ

काम क्रोध हे माझ्या शरीरात भरलेले आहे पण मी मात्र वरवर कोवळे (मृदू)बोलतो.मी असा असून सुद्धा तुमच्या पायाशी बसण्याची परवानगी मला कशी मिळाली,हे माझे मलाच कळत नाही. संतानी पुराणातील अनुभव देवून चित्त शुद्ध कशा प्रकारे असले पाहिजे हे सांगितले आहे परंतु माझे चित्त अजून शुद्ध झाले नाही.तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्धी कशी असते हे मला अनुभवाद्वारे दाखून द्या.


६६६
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥
तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥
रामकृष्णहरी मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे तुमचें सेवितों उच्छिष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥

अर्थ

हे संत जन हो तुमची स्तुती करण्याचा माझा अधिकार नाही,तुमचा योग्यतेचा विचार सुद्धा मला कळत नाही.तुम्हा संतांचा दुर्बल असा मी दास आहे.तुमच्या चरणांवरजवळ ठेवून तुम्ही माझे माझे रक्षण करा.रामकृष्ण हरी या मंत्राचा मी आवडीने उच्चार करतो.त्या विठोबाचे चरण मला आवडते.तुकाराम महाराज म्हणतात हे संत जनहो तुमचे उच्छिष्ट मी सेवन करतो,तरी तुम्ही मला क्षमा करवी.


६६७
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥
आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥
बहु काकुलती । आलो असे मागें किती ॥२॥
तुका म्हणे देवा । आजि सफळ झाली सेवा ॥३॥

अर्थ

अनेक जन्मापासून जन्म मृत्यू चे ओझे माझ्या माथ्यावर होते.आता तो भार उतरला कारण तुम्ही माझा अंगीकार केला.मी जन्मो जन्मापासून काकुळतीला आलो आणि तुमची किती वेळा विनंती केली देवा.तुकाराम महाराज म्हणतात तुझी भेठ झाल्या मुळे माझी या जन्मात सेवा सफल झाली आहे.


६६८
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥
अवचित निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥
यावें जावें पुढें ऐसेचि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥
तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥

अर्थ

तुम्ही तुमच्या बुद्धीत बदल अवश्य करा,कारण हा नर देह पुन्हःपुन्हः मिळत नाही.आपुल्या हितासाठी तुम्ही काहीच सायास म्हणजे प्रयत्न करत नाही,तुमचे चित्त घर,दार,पत्नी,मुले,बाळे या कडे लागले आहे.अवचीत तुम्हाला हे मनुष्य जन्माचे भाग्य लागले असून,मग पुढे गर्भावासाची विपत्ती का भोगता?जर मनुष्य जन्म मिळाला नाही तर,इतर प्राणी मात्रांच्या जन्मात फिरावा लागेल व नरक वास भोगावा लागेल.तुकाराम महाराज म्हणतात यांची सर्वांनी आठवण धरावी व हरी नामाचे स्मरण करा नाही तर तुमचे काही बरे नाही.


६६९
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥
दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥३॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंम्ही देवा ॥४॥

अर्थ

आम्ही पतीतांनी पातके करावे आणि तुम्ही पतितपावन आहात आणि आम्हाला तुम्ही संकटातून मुक्त करावे.आम्ही मर्‍यादा न ठेवता पापे वाढवितो,आणि तू त्यातून मुक्त करतोस.कधीही काहीच अपेक्षा न करता संकटात तू भक्तांचे रक्षण करतोस.तू दयासिंधु आहेस,पतितांना पावन करणारा आहेस हिच वचने आम्हाला अनेक ग्रंथातून सापडली आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही अन्याय केले तरी तू कृपावंत आहेस आमचे दोष तू पोटात घेतोस.


६७०
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥ध्रु.॥
भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥२॥
थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥३॥
तुका म्हणे कृपादानी । फेडि आवडीची धणी ॥४॥

अर्थ

जो परमात्मा असा विठ्ठल हा भक्तांचा विसावा आहे,त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या कडे धावा घ्यावा.त्या परमात्म्याच्या हाती भक्ती प्रेमाचा खाऊ आहे,तो मोठ्या कौतुकाने तुमच्या मुखी घास भरविणार आहे.देव आपल्या भक्तांना कासेला लावून विनासायास भव सागरातून पार करतो.देवाला थोर भक्तांची फार आस आहे आवड आहे,तो सभोवताली दृष्टी ठेऊन त्या थोर भक्तांची एकसारखी वाट पाहत असतो.तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल कृपादानी कृपेचे दान देणारा आहे तो आपल्या प्रेमाची तृप्ती करत असतो.


६७१
अखंड जया तुझी प्रीति । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥
पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागें न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥ध्रु.॥
तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशीं ॥२॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । आता माझा आव्हेर ॥३॥

अर्थ

ज्यांना अखंड कायम तुझी प्रीती लाभली आहे मला त्याची संगती लाभू दे.आणखी दुसरे काही मागून मी तुम्हाला त्रास देणार नाही.या संताच्या पाया पुढे मी उगाचच पडून राहीन,मग काही मागणार हि नाही काही करणारही नाही.तुझी आण शपथ घेऊन मी सांगतो देवा.तुमच्या दाराशी मी धरणे धरून बसलो आहे,त्यामुळे तुम्हांला व आम्हाला पिडा होते ती नाहीशी करा.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे विठ्ठला,तुम्ही माझा अव्हेर कधीही न करावा.


६७२
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें । शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥

अर्थ

या विष्णुदासांनी आपल्या संगतीने दोषी पातकी असलेल्या लोकांना पवित्र केले.त्या वीर विठ्ठल भक्तांकडे कोण वाकड्या नजरेने पाहीन ते विठ्ठलाचे प्रेम भरलेले शूर वीर आहेत.त्यांच्या पुढे काही अशुभ जरी आणून ठेवले तरी ते शुभ होऊन त्यांच्या पुढे येऊन उभे राहते.त्या विष्णूदासंकडे प्रेम सुखाच्या राशी असतात त्यामुळे त्यांच्या कडे पाप औषधाल देखील मिळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात या हरी दासाने नामघोषाने सारी पृथ्वी वैकुंठ मय केली आहे.


६७३
जन देव तरी पायाचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥

अर्थ

सर्व लोक देवाचे स्वरूप आहे,त्यांच्या पाया पडावे.त्यांचे दोष लक्षात ठेऊ नये.अग्नीचे कार्य हे थंडी कमी करणे आहे,पण मग अग्नीला पदरात बांधून नेता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात विंचू व सर्प हि नारायणाचीच रूपे आहेत पण त्यांच्या स्पर्श न करता त्यांना दुरून नमस्कार करावा.


६७४
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥
आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेंचि ॥ध्रु.॥
जगरूढीसाठी घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी ॥३॥

अर्थ

भूत,भविष्य व वर्तमान ज्याला कळावे असे वाटते तो तर भाग्यहीन आहे.आम्ही विष्णू दासांनी सदैव देवाचे स्मरण करावे,प्रारब्धाप्रमाणे भोग भोगावे.ज्ञानी भविष्याचे ज्ञान असणार्‍या लोकांनी त्यांना पैसे मिळावेत म्हणून दुकान थाटून बसेल असतात.त्यांना नारायण भेटत नाही उलट तो त्याला त्रास देतो.तुकाराम महाराज म्हणतात आधीच हा प्रपंच अवघड आहे अशा परस्थितीत रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यास पिडा वाढतच जात असते.


६७५
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे ।
हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडवी आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा हे तुज न करितां ॥ध्रु.॥
आविसें मिन लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणोनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापमाये कवण रया ॥२॥
पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण सायासे नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्वा नास जालीं बाळें ॥३॥
गोडपणें मासी लिगाडीं गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥

अर्थ

गारुड्याने पुंगी वाजविली तर सर्प त्या आवाजाला भुलून जातो,त्या वेळी गारुडी पाश टाकून सर्पाला पकडतो मग तो त्याला पेटाऱ्यामध्ये घेऊन दारोदारी हिंडतो व आपले पोट भरतो.सर्प बरोबर गुंतून जातो पांडुरंग माझी पण अशीच अवस्था झाली आहे मी या संसार पशामध्ये पूर्ण गुंतून गेलो आहे.माझ्यावर कृपा करून मला यातून सोडवा.माझे काहीच चालत नाही.देवा तुझी माझ्यावर कृपा नाही त्यामुळे मी यामध्ये आधीच गुंतलो आहे यातून मी बाहेर पडतच नाही त्यामुळे तू माझ्यावर कृपा कर.मासा पकडण्यासाठी गळ्याच्या टोकाला माशाला आमिष म्हणून काहीतरी लावले जाते आणि त्या आमिषाला भुलून तो मासा त्या गाळाला अडकतो.पाण्यातील मासा ते आपले भक्ष आहे असे समजू त्याला धरण्याचा प्रयत्न करतो तो कोळीच्या ताब्यात सापडतो.कोळी त्याला बाहेर काढतो.तो तडफडतो.त्यावेळी त्याचे रक्षण करणारे कोण आई बाप आहे.पिलाला त्याचे आई वडील घरट्यात ठेऊन बाहेर जातात परत येऊन पाहतात पारध्याच्या पाशात पिले सापडलेली असतात.पिलांच्या प्रेमामुळे पारध्याच्या जाळ्यात पक्षीण स्वतःला पारध्याच्या जाळ्यात अडकून घेते व आपले जीवन संपवते.तुकाराम महाराज म्हणतात चिकट गुळावर माशी जाऊन बसते तेंव्हा तिचे पाय तेथे गुंतून रहातात.तेंव्हा उडण्यासाठी प्रयत्न केल्याने पंखाच्या फडफडण्याने पाय अधिकच गुंतून जातात.तेंव्हा हे पंढरीनाथा आता तू धावत ये या संसार पाशातून सोडव.


६७६
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जनामधीं होता गांठी ॥२॥
तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥

अर्थ

देवा माझी जात हीन आहे तर मला कसला अभिमान,तुला तर लोक मान देतात.देवा या गोष्टीचे अजिबात मला काही सुख दुखः नाही.ज्याचा जसा गुण असतो त्याला त्याप्रमाणे लोक भाव देतात एखाद्या चिंधीत जर धन बधले तर लोक ती चिंधी माथ्याला धारण करतात.तुकाराम महाराज म्हणतात लोक ज्यांना वंदन करतात तो वेगळा(सर्वगुणसंपन्न) आहे,मला दुर्बळाला त्या विषयी काहीच घेणे देणे नाही.


६७७
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥
जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागेलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृतसंजीवनी लोटलीसे ॥२॥
आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥
सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आसे ॥४॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥५॥

अर्थ

विठाबाई माऊली हि आमुची शीतल साउली आहे,कायम प्रेमाचा पान्हा आम्हाला पाजते.तीच्या कुशीत जाऊन मी माझ्या इच्छेला येईन तोपर्यंत तीचा कृपारूपी प्रेमपान्हा पीत राहीन.हि विठाबाई माऊली आपल्या कृपेने माझा सांभाळ करीन.तिच्या मुळे अमृताची संजीवनी लोटली आहे.माझ्या आनंदाला ठाव राहिला नाही त्याला सागराची काय उपमा द्यावा?मी जर सैर वैर चललो तर माझ्या विठाबाईलाच संकट पडते.माझ्या मागे पुढे राहून ती माझे रक्षण करते.तुकाराम महाराज म्हणतात मला चिंता कशी असते हे माहित नाही.मी या विठाबाईचे लडिवाळ लाडके तान्हे बाळ आहे.


६७८
सुटायाचा कांहीं करितो उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धी बळ माझें ॥ध्रु.॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥
विधिनिषेधाचे सांपडलों चेपे । एक एका लोपे निवडेना ॥३॥
सारावें तें वाढे त्याचियाचि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥
तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशिक्तहीन जालों देवा ॥५॥

अर्थ

मी या संसारुपी सागरातून सुटण्यासाठी प्रयत्न करायला गेलो तर माझे पाय अधिकच गुततात.त्यामुळे अश्या दुखाच्या पेचात मी पडलो आहे.माझी यातून मुक्ती होण्यासाठी बुद्धीही हरपली आणि माझ्या अंगी बळ नाही प्रारब्ध क्रियमाण आणि संचित माझ्या कडे धाव घेतात.विधीनिषेधाच्या चक्रात मी चेपलो आहे.एकाच्या लोपाने दुसऱ्याचा लोप होतो म्हणजे विधीचे पालन करू गेले असता निषेध पाळला जात नाही आणि निषेध जर पळलाच नाही तर विधीचे योग्य पालन कसे होणार.संसारातील कामे दूर सरावे असे वाटले तर ती वाढतात.अशा मुळे मी दुखी कष्टी झालो आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा,आता मी शक्तिहीन झालो आहे,तुम्ही आता यातून माझी सोडवणूक करा.


६७९
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥
ऐसा पडिलों काचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥
विचारिता कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥

अर्थ

या संसारात मला भीती वाटत आहे पण मला हा संसार काही सुटतच नाही.अश्या संकटात मी पडलो आहे,म्हणून मी तुझा धावा करत आहे.मी या प्रपंचाचा विचार करून पहिला पण माझे मन काही माझ्या ताब्यात येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी काय करू मी मुक्त होण्याच्या विचारत माझ्या मनाचा प्रवेश होत नाही.


६८०
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥
ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥
तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥४॥

अर्थ

हे पांडुरंगा तू लगेच धावत ये,आणि मला उचलून आपल्या पदरात घे.तुझा आश्रय मला आहे तरी मी मला मी परदेशी असल्या सारखे वाटत आहे.हे प्रभू मला या भवसागरातून सोडून मुक्त कर.तुला कोणी आडे म्हणजे विरोध करेल असा कोणी नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा माझ्या कडे येण्यासाठी तू का विलंब करत आहेस?


६८१
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥

अर्थ

माझी विठाबाई माऊली माझ्या वरील प्रेमाने ती प्रेमरूपी पान्ह्याने पान्हावली आहे.ती विठाबाई मला प्रेमाने कुरवाळीत आहे,व ती विठाबाई मला जवळून एक क्षण भरही दूर करत नाही व दूर जात नाही.मी जी मागणी करत आहे ती मागणी ती विठाबाई पूर्ण करते व ती विठाबाई निष्टुर नाही ती विठाबाई अतिशय कोमल आहे.तुकाराम महाराज म्हणतात हि विठाबाई माझ्या मुखात ब्रम्ह रसाचा घास भरवत आहे.


६८२
आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥
आमुचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥२॥
तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला आम्ही आमच्या हृदयातील भाव तुझ्या चरण कमलावरती अर्पण करून मोकळे झालो आहोत.आम्ही जो हट्ट प्रेमाने तुझ्या जवळ करावा,तो तू पुरवावा.आम्ही असा हट्ट करणे हा आमचा नेम आहे,आणि तुम्ही तो हट्ट पुरवावा हा तुमचा स्वभाव धर्म आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही आम्हाला जी काही सेवा सांगितली आहे ती आम्ही जाणतो आहोत.


६८३
केलें पाप जेणें दिलें अनुमोदन । दोघांसी पतन सारिखेचि ॥१॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥
देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥२॥
तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥३॥

अर्थ

एखाद्याने पाप केले आणि त्या पापाला एखाद्याने ज्या कोणी अनुमोदन म्हणजे सहमती दिली तर त्या पापाला ते दोघे दोषी असतात.नवनिता मध्ये थोडे जरी विष मिळविले तरी ते नवनीत लोणी विषमय बनते त्या प्रमाणे पापी विचार असणाऱ्या दुर्जनापासून नेहमी दुर राहावे.जर एखादे ओढाळ जनावर शेतामध्ये गेले किंवा घुसले तर त्या जनावराला हैक हैक म्हणून हाकलून द्यावे आपण आपले कर्तव्य करावे.तुकाराम महाराज म्हणतात एखादे कर्म(सत्कर्म)जर अवघड असेल तर ते कर्म केले जर नाही तर त्या कर्माचा(सत्कर्माचा)लाभ कसा होईल?


६८४
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
विठ्ठल जागृति स्वप्नीसुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलाविण ॥२॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥
तुका म्हणे ते ही विठ्ठलचि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥

अर्थ

ज्याचा गीतात विठ्ठल आहे,ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे,ज्याच्या विश्रांती मध्ये विठ्ठल,भोगा मध्ये विठ्ठल आहे,ज्याच्या आसनामध्ये विठ्ठल शायानामध्ये विठ्ठल,ज्याच्या भोजनामध्ये व प्रेत्येक घसा ला विठ्ठल आहे,जागेपणात,झोपेत स्वप्नात अर्धवट झोपेत विठ्ठल आहे विठ्ठला शिवाय दुसरे काहीच दिसत नाही,ज्याचे सर्व अलंकार हे विठ्ठलच आहे,ज्याचा सर्व निर्धार हा विठ्ठलच आहे,तुकाराम महाराज म्हणतात तेच लोक विठ्ठल झाले,त्यांचे संकल्प विकल्प हे विठ्ठल रूपच होऊन जातात.


६८५
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥

अर्थ

संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात.ज्या संतांची सेवा देवाला करायला आवडते त्या संतांचे वर्णन करण्या इतका माझा अधिकार काय?जो निर्गुण असा परमात्मा सगुण साकार होऊन संतांची सेवा करतो पूजा करतो आणि त्यांना दंडवत घालतो,तीर्थे स्वत स्वच्छ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात,पापी लोकांच्या पापाचे हरण करून ते मलीन झालेले असतात व ते निर्मळ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात. म्हणून तेथे अस्ष्टमहासिद्धीनां कोणी विचारत नाही.त्यांना कोणी जवळ फिरकू देत नाही.त्यांचा अडथळा कोणी जुमानत नाही.तुकाराम महाराज म्हणतात संत हे बलवंत शोरोमणी आहेत.तरीही विठ्ठलाच्या चरणी त्यांनी निकट वास्तव्य केले आहे.


६८६
जो मानी तो देईल काई । न मानी तो नेईल काई ॥१॥
आम्हां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥
आधीन तें जना काई । जल्पें वांयांविण ठायीं ॥२॥
वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥

अर्थ

या जगात जो आम्हाला मान देतो तो आम्हाला काय देणार आणि जो आम्हाला मानीत नाही तो आमचे काय नेणार आमच्या साठी सर्व भूती तो विठ्ठल आहे.वाटेल तर तो आमच्या चित्ती राहो.आपल्या जवळ काही नसताना लोक आपल्या ठिकाणी अभिमान बाळगत असतात.तुकाराम महाराज म्हणतात कोणी आम्हाला वंदन केले काय किंवा कोणी आमची निंदा केली काय ते सर्व तुलाच कडे लागते विठ्ठला.


६८७
भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥
तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥
पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळिंगुनि मिठी देईन पांयीं ॥२॥
चरणीं दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥
तुका म्हणे उत्कंठित हे वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥

अर्थ

भक्ताच्या भावबळाने तू लहान कसा झालास,हे मोठे नवल.तुझ्या ध्यानाचे वर्णन मागे म्हणजे पूर्वी संतानी केले आहे.कृपा करून ते तुझे ध्यान मला दाखवा देवा.हे देवा मी तुला डोळे भरून पाहीन तुझ्या संगे हितगुजच्या गोष्टी ही करीन,मग तुला आलिंगन देऊन तुझ्या चरणांना आलिंगण देईन.तुझ्या चरणां कडे दृष्टी ठेऊन तुझ्या समोर माझे दोन्ही मी हात जोडून उभा राहीन.तुकाराम महाराज म्हणतात मी सांगितलेल्या या गोष्टींची मला फार वासना आहे,तेंव्हा माझी हि वासना तू पूर्ण कर.


६८८
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥
आणीक उपाय नेणेंचि कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥
नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥
कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥
तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल भूक या डोळियाची ॥४॥

अर्थ

हे प्रभू मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे कि पुराणातही असेच सांगितले आहे कि,तुम्ही फार कृपाळू आहात.तुझे वर्म मला कळेल असा उपाय मला माहित हि नाही आणि मी जाणतहि नाही.मला साधे नुसते धड काही नीट बोलताही येत नाही म्हणून मी तुम्हाला सर्व भावे शरण आलो आहे.हे प्रभू तुम्ही माझ्यावर थोडा जरी कृपेचा वर्षाव केला तरी तुमच्यासाठी हे काही मोठे काम नाही,माझे मात्र पुष्कळ श्रम वाचतील.तुकाराम महाराज म्हणतात हे हरी तू मला तुझे श्रीमुख दाविले तर माझ्या डोळ्यांची भूक हरेल.


६८९
सर्वभावें आलों तुजचि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥
आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
माझिये जीवींचेकांहीं जडभारी । तुजविण वारी कोण दुजे ॥३॥
तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥
तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥४॥

अर्थ

हे देवा मी तुला सर्व भावे शरण आलो आहे,अगदी काया,वाचा व मना सहित.आणखी दुसरे माझ्या मनात काहीच येत नाही,माझी सारी इच्छाही तुझ्या पायाशी राहिली आहे.माझ्यावरील संकटांचा जडभार तुझ्या वाचून दुसरे कोण निवारण करील?आम्ही तुझे दास आहोत आणि तू आमचा ऋणी आहे हे फार मागे पासून असे चालत आले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही तुझ्या दाराशी धरणे घेतले आहे,आमच्या हिशोबासाठी तुला आम्हाल भेट द्यावी लागेल.


६९०
कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥
केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥
म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥२॥
माझिया मनाचा हाचि पै विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥३॥
तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलों मी ऐसा साच भावें ॥४॥

अर्थ

संतांच्या मुखी मी असे कधी ऐकेल की,पांडुरंगाने माझा अंगीकार केला आहे तेंव्हा माझ्या जीवाला धीर येईल.मला फार आशा आहे म्हणून मी तुमच्या तोंडाकडे आणि चरणांकडे पाहत आहे.माझ्या मनाला तुझा पुरेपूर विश्वास आहे म्हणून मी दुसऱ्या कोणत्याही साधनांचे प्रयत्न करत नाही.तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या मुखातून मी जेंव्हा हे ऐकेल तेंव्हाच मी समाधानी होईल व मी तरलो असा मला भरवसा येईल.


६९१
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठी । भक्तीकाजें विठ्ठला ॥१॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥
होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियाचे अवतार ॥२॥
केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साठी हातीं सांपडसी ॥३॥

अर्थ

भक्तांच्या कामासाठी तुला फार कष्ट झाले आहे,म्हणून हे पांडुरंग तू तुझे दोन्ही हात कटेवर ठेऊन भिवरेच्या तीरी उभा राहिला आहेस.हे पांडुरंगा तू फार दमला आहेस,फार कष्ट करून तू आमच्या साठी पुन्हः पुन्हः अवतार घेतला आहेस.तू आम्हासाठी फार सोपा आहेस परंतु दैत्या साठी तू कृतांत आहेस.तू क्षीर सागरात होतास पण पृथ्वीवर दैत्य फार झाले त्यामुळे तू गवळ्यांच्या घरी अवतार घेतलास.तुकाराम महाराज म्हणतात तुला पुंडलीकाने भक्तीने पंढरपूरला आणले,कारण तू फक्त भक्ती भावा साठी हाती सापडतो.


६९२
गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥
सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु.॥
चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥२॥
हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूप ॥३॥

अर्थ

अवचित विठ्ठलाचे नाम मुखी आले ते गोड लागले आणि त्याने पोटच भरले व विठ्ठल म्हणता माझे पाप नाहीसे झाले.तुम्ही सर्वांनी खरे माना कारण महापातकी अजामिळ त्या चांडाळाचा देखील भगवंताने उद्धार केला.नामामुळे त्याचा उद्धार झाला.गोविंदाचे नाम वाचेने वेळोवेळी घेतल्यावर चित्ताला आनंद मिळतो समाधिसुख मिळते.तुकाराम महाराज म्हणतात हेकेवळ संतच अनुभवाने जाणतात व ज्याला गरज आहे तोच हे रूप शोधत असतो.कारण देव हा अरूप असुन रुपास येतो.


६९३
रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचीया ॥१॥
त्यांचा महिमा काय वर्णु मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥
तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥
मायबापें पिंड पाळीयेला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥
संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥
तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥

अर्थ

सूर्य,दीप व हिरा म्हणजे अलंकार हे यांच्या प्रकाशाने जे दिसणारे आहेत तेच ते दाखवितात.परंतु संतांच्या दर्शनाने जे अदृश्य आहेत म्हणजे न दिसणारे(देव)आहे ते दिसते.अश्या या संतांचा महिमा मी पामर काय वर्णन करणार?ज्या संतांचा महिमा ब्रम्हादेवाला सुद्धा कळात नाही.शरीराला ताप आल्यावर शीतल करण्याचे काम हे चंदन करते.पण त्रिगुणाचा जो ताप आहे तो या संतांच्या संगतीने दूर होतो आई वडिल मुलांचे पालन करतात परंतु जन्म मरण हे संतांच्या संगतीनेच चुकते.तुकाराम महाराज म्हणतात संतानी आपल्याला जवळ बोलाविले नाही तरी आपण होवून श्रद्धेने संतांपाशी जावे.


६९४
हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥
आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥
भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥
तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥३॥

अर्थ

तुम्ही सकळ जणांनी हरी हरी म्हणा,त्यामुळे तुमच्या मायाजाळाचा नाश होईल अन्य साधनांच्या भरीस तुम्ही पडू नका त्याने तुमचीच फसगत होईल.भक्ती भवाने तुलसीचे पान आणि जल म्हणजे पाणी हे श्रीहरीला अर्पण करा व मी पतित आहे असे वेळोवेळ म्हणून त्या हरी पुढे हात जोडा.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी हा फार कृपाळू आहे.तो नामासाठी आपल्याला भवसागरातून पार करेल.


६९५
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥
नाठेळाची भक्ती कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥
सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥
तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंदधिंद सिंदळीचे ॥३॥

अर्थ

एखादया व्यक्ती जवळ पुष्कळ पैसे असूनही “माझ्या कडेच काही नाही उलट तूच मला काहीतरी दे” असे म्हणून सज्जन व्यक्तींना तो त्रास देतो.नाठेळाची म्हणजे ढोंगी लोकांची भक्ती आणि कुचर म्हणजे कामचुकाराची शक्ती हि व्यर्थ असते.ते लोक स्वतःच्या घरातल्या देवांची पूजा करत नाही आणि बाहेच्या देवाला हात जोडून स्वतःची भक्ती दाखवितो.तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व प्रकार म्हणजे माकड चाळे आहे,एखाद्या व्यभिचारिण स्त्रीचे(सिंदळीचे)प्रमाणे वागणे जसे धिंदधिंद म्हणजे निंद्य आहे त्या प्रमाणेच.


६९६
ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥
चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥
त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥
तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुष्या ॥३॥

अर्थ

काही कुळात असे काही पुत्र जन्माला येतात कि,ते त्यांच्या पूर्वजांना बुडवितात म्हणजे अधोगतीला नेतात.या पुत्रांच्या भाग्याच्या वाट्यात चाहाडी तसेच चोरी करणे हेच त्यांचे भांडवल असते.यांच्या योगाने पृथ्वी दुखी होते,त्यांचा भार तिला पृथ्वीला सहन होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात असे हे पापी कुत्र्या प्रमाणे असतात,ते स्वतः आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात.


६९७
आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥
कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ध्रु.॥
आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥२॥
तुका म्हणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥३॥

अर्थ

हे बाबांनो आतां तुम्ही जागा रे तुम्ही जागा रे कारण तुमच्या मध्ये कामक्रोधादी चोर जो पर्यंत निजला आहे तो पर्यंत तुम्ही लवकर देवा कडे पळा.तुमच्या जीवनात पुढे दुखः आहे हे तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही देवाकडे धाव का घेत नाही?आतां तरी असे नका करू रे, नका करू रे तुमच्या जवळ जो काही वेळ आहे तो तरी तुम्ही असे लोकांमध्ये लुटवू नका रे.तुकाराम महाराज म्हणतात अरे या प्रपांच्यात दुसऱ्याला दुःख होत आहे हे पाहून तरी तुम्हाला भय का वाटत नाही?


६९८
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥
घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥
घाला पडे थोडेंच वाटे । काम मैंदाचें चपेटे ॥२॥
तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥

अर्थ

आपली मुदल जर जतन झाली तर मग लाभ होणे सहज शक्य आहे.हृदयमंदिरात भक्ती भाव हा ठेव आहे त्याला गाठ मारून ठेवा.त्याचे तुम्ही रक्षण करा त्याला मिठी मारून ठेवा.कामरूपी मैंद शत्रूचा घाला पडेल,त्या पासून तुम्ही सावध राहा.तुकाराम महाराज म्हणतात अंतरात कपटपणा ठेऊन बाहेर दंभ मिरविणे खोटे आहे.


६९९
मज अंगाच्या अनुभवें । काही वाईट बरें ठावें ॥१॥
जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥
वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥
तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥

अर्थ

मला माझ्या स्वतःच्या अनुभवाने काय बरे आणि काय वाईट हे समजले आहे.या गोष्टींपासून मी वेगळाच राहणार आहे कारण मागे झालेले आणि पुढे काय होणार या विचाराचा मनावर काहीच परिणाम होत नाही.हे जग ओस आहे हे माहित असून देखील त्याच्याकडे पुन्हा जाणे म्हणजे एक प्रकारचे दुखणेच ओढुन घेतल्यासारखे आहे.तुकाराम महाराज म्हणतात म्हणून आपण देवालाही आपल्या बरोबर घेऊन जाऊ म्हणजे तो आपल्याला योग्य ठिकाणी पाहोचविल.


७००
पाववावें ठाया । असें सवें बोलों तया ॥१॥
भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥
न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥
तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥

अर्थ

आम्हाला तू आमच्या ठिकाणी पोहोचव असे आपण देवाला म्हणूया.ज्याचा जसा भक्तिभाव देव विषय असेल तसा देव त्याच्याशी वर्तन करत असतो जो खोटेपणाने दिवशी वागतो त्याचा खोटेपणा मुळे त्याच्यापुढे दुःख होते.म्हणून आम्ही देवाशी काही अंतर न ठेवता काहीच भेद आम्ही ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचे हे जीवा भावाचे सत्य वागणे देवाला मानवते.


सार्थ तुकाराम गाथा ६०१  ते ७००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *