सार्थ तुकाराम गाथा ९०१ ते १०००

सार्थ तुकाराम गाथा 901 ते 1000

सार्थ तुकाराम गाथा ९०१ ते १०००


अभंग क्र.९०१
संतांच्या धीक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥
कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतारी मोकलितां ॥ध्रु.॥
मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥
तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघें बरें ॥३॥

अर्थ
संतानी ज्याचा धिक्कार केला आहे त्याचे जिने अमंगळ आहे व तो सर्व विश्वाचा शत्रू आहे.जर एखाद्या पतीने त्याच्या पत्नीचा त्याग केला असेल तर तिचे कुळ व रूप हे संसारिक दृष्ट्या व्यर्थ आहेत.झाडाच्या मुळाचे जर रक्षण केले तर मग झाडाला चांगली फळे येण्यास काय उणे असते.त्याप्रमाणे आपल्या हिताच्या गोष्टी रक्षण करणे व सांभाळ करणे याला चातूर म्हणावे.तुकाराम महाराज म्हणतात अंधारामध्ये हातात दिवा असावा म्हणजे जेथे प्रयत्न करायचा तेथे त्या योग्य ठिकाणी प्रयत्न करवा.


अभंग क्र.९०२
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥
तुका म्हणे कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥

अर्थ
एखाद्या झाडाचे मूळ ज्या प्रमाणे अंग भेदते त्या प्रमाणे जर आपण चंगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्या च्या जीवावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते.येथे काहीही अवघड नाही फक्त जो पर्यंत आपण त्या विषयी आभ्यास करत नाही तो पर्यंत गोष्ट अवघड वाटते.आहो सध्या दोऱ्याच्या घर्षणाने मोठ्या दगडाला चीर पडते आणि जर आपण थोडे थोडे हळू हळू विष खाल्ले तरी ते पचनी पडते.तुकाराम महाराज म्हणतात गर्भाशया मध्ये बाळाला बसण्या साठी एकेकी जागा असते का बाळ नऊ महिने बसेल एवढी जागा हळूहळू होतेच.


अभंग क्र.९०३
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥
न म्हणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥
कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥
देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥

अर्थ
अहो तुम्ही अमर आहात तुम्ही अमर आहात हे खरे आहे कि खोटे हे तुम्हीच पहा.हा पंच भुताचा देह माझा नाही असे म्हणाल तर मग तुम्हाला भरवसा कळेल.अहो सगळे काही आपणच आहोत मग भय कशाचे?तुकाराम महाराज म्हणतात तुम्हीच तर देव आहात बरे फक्त तुम्हचे तुम्ही मूळ स्वरूप ओळखा म्हणजे तुमचे लक्षात येईल.


अभंग क्र.९०४
काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥१॥
फावल्या त्या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥
नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें विव्हळतसे ॥२॥
एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥३॥

अर्थ
मला कुठल्याही प्रकारचे काहीही कर्तव्य नाही बाकी काही काम नाही आता मी पूर्ण पणे रिकामा आहे.जे काही घडत आहे ते सर्व प्रारब्धाने घडते व मी ते फक्त निश्चळ बसून पाहण्याचे काम करत आहे.लोकांना नसते छंद लागले आहेत म्हणजे हा देह म्हणजे मी आहे व या देहा संबंधी असलेले लोक या छंदा मुळे सर्व जगाला दुखाणे त्रास होत आहे.तुकाराम महाराज म्हणतात पण मी मात्र एकटाच आहे सर्वांना पासून निराळा आहे.


अभंग क्र.९०५
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥
काढिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥
नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥
याजसाठी हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥
तुका म्हणे अनुभव बरा । नाहीं तरी हस्तपाय चोरा ॥५॥

अर्थ
मी हातात विवेकरुपी काठी घेऊन या पंचमहा भुताच्या देहाला मारण्या साठी त्याच्या मागे लागलो आहे.मी या देहाला ज्या ठिकाणी माणसे जळतात म्हणजे स्मशानी नेऊन निजविले आहे.या देहाने मला यामागे अनेक प्रकारचे सुख दुख भोगावयास लावले म्हणून मी त्याचा सूड घेत आहे.मला कसलेही भय वाट नाही कारण मी माझे सुख व दुख देवाला अर्पण केला आहे.याच साठी मी मनाचा विवेकाने निग्रह करून देहाचे निर्वाण केले आहे.अहंकाराला संपविले पाहिजे आणि हे जमत नसेल तर मग हे देवा निदान माझ्या हातून वाईट कर्म हि घडू देऊ नका.


अभंग क्र.९०६
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप ॥१॥
प्रेमेछंदें नाचे डोले । हारपले देहभाव ॥ध्रु.॥
एकदेशीं जीवकळा । हा सकळां सोयरा ॥२॥
तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥३॥

अर्थ
अहो हरी कीर्तन चांगले आहे चांगले आहे कारण हरी कीर्तन करणार्यांचे अंग हे हरी रूपाचा होतात.म्हणून त्या हरी कीर्तनत प्रेमाने आंनदाने नाचावे दोलावे मग तुमचा देह भाव आपो आप नाहीसा होईल.जीव दश हि मर्‍यादित असते परंतु हरी हा सर्व व्यापक आहे.तुकाराम महाराज म्हणतात द्वैत रुपी भय गेले कि त्या वेळेला फक्त देवच उरतो.


अभंग क्र.९०७
न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥
एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥
संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सवेचि ॥२॥
तुका म्हणे नारायणीं । पावो वाणी विसावां ॥३॥

अर्थ
मला कोणाशीही काहीही बोलण्याचा प्रसंग येऊ देऊ नका कारण हा सर्व उपाधीचा प्रकार आहे.आहो नारायण तुमच्या नामाविना सर्व काही व्यर्थच आहे हे मला कळले आहे.अन्य विषय कडे मन जर नेले तर पाप पुण्य होते.तुकाराम महाराज म्हणतात म्हणून हे नारायण माझ्या वाणीला तुझ्याच ठिकाणी विसावा घेऊ दे.


अभंग क्र.९०८
प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावसे ॥१॥
करितां घायाळांचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥
आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥२॥
तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥

अर्थ
प्रारब्धा मुळेच लोक सुख दुख भोगतात.जखमी माणसाला जरी आपण उचलले तरी तरी त्याच्या रक्ताने आपले अंग माखले जाते.अपेक्षा धरली तर पिडाच होते म्हणून कोणतीही अपेक्षा न धरता आपेक्षाचा त्याग करावा.तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रकार पाहून माझा जीव भय भीत झाला आहे म्हणून या उपाधीच्या बाहेर मी पडलो आहे.


अभंग क्र.९०९
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥
आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु.॥
नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें ते निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥
अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चाले ऐसी बोली तुका बोले ॥३॥

अर्थ
विविध प्रकारच्या विषयांमुळे बुद्धीवर पडदा पडतो व बुद्धीचा लोप होतो आणि संदेह उत्पन्न होणे म्हणजे एक प्रकारचे पापच नाही काय? त्यामुळे आपण स्वतः याविषयी विचार करून पाहावा आणि मन प्रसन्न ठेवावे मन प्रसन्न असणे हेच सर्व गोष्टीचे सार असून मन प्रसन्न आहे किंवा नाही या गोष्टीविषयी देखील मनच साक्षी आहे. आपले मन मुळात हाच निर्मळ शुद्ध बुद्ध होते परंतु नाम वर रूप यांनी युक्त असलेला देह याला “मीपणाचा” विटाळ लागला. तुकाराम महाराज म्हणतात आंधळ्या मनुष्याला स्वतः व्यवस्थित चालता येत नाही डोळस मनुष्य त्याला जसं चालवेल तसे तो चालतो त्याप्रमाणे संत आपल्याला जसे मार्गदर्शन करतील आपण तसे वागावे कारण आपण अंध आहोत व संतांना डोळे आहेत.


अभंग क्र.९१०
जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥१॥
संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥
लटिक्यांचा अभिमान । होता सीण पावविते ॥२॥
तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥३॥

अर्थ
माझे नाव रूप पाप हे सर्व जाळून जाओ.या देहाला मी मी म्हंटले पण हि मातीच आहे पण आता यासंतांना शरण जाऊन त्यांच्या चरण रजाने मी पानाचे ओझे उतरून जाओ.खोट्या गोष्टीचा अभिमान धरला कि व्यर्थ शीण होतो.तुकाराम महाराज म्हणतात खरे स्वरूप सुख म्हणजे अरुपाचे म्हणजे आत्म्याचे व नाम तसेच रूप रहित असण्याचे आहे.


अभंग क्र.९११
निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥
जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥
शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥२॥
तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥३॥

अर्थ
आपल्या पोटासाठी आपल्या कडून अनेकांची निंदा स्तुती होते व आपल्या अनेक प्रकारची सोंगे आपल्याला दाखवी लागतात.ज्याच्या मनात धीर नाही क्षमा नाही त्या माणसाने जरी जटा अंगाला राख फासले तर ते शरीराची विटंबना आहे.ज्या प्रमाणे प्रेताला अनेक प्रेकारची वस्त्रे व शृंगार घाले तर ते व्यर्थ असते त्या प्रमाणे दांभिक माणसाचे परमार्थ व्यर्थ आहे.तुकाराम महाराज म्हणतात रागात तो दांभिक माणूस भलते सलते चावाळतो बोलतो त्या वेळी त्याची सत्य परिस्थिती समोर येते.


अभंग क्र. ९१२
भिक्षा पात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायीं नाहीं भाव । भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हेचि अभाग्य रोकडें । मूळ आणि अविश्वास ॥२॥
काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥

अर्थ
देवाच्या नवा खाली जे भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागतात त्यांचे जिणे लाजिरवाणे असते त्यांच्या जगण्याला आग लागो अश्या माणसाची नारायण कायम उपेक्षा करतो.अश्या माणसांना हरीच्या चरणावर विश्वास नसतो त्यांची भक्ती म्हणजे हि वरवरची आहे जो पर्यंत हरी चरणावर दृढ श्रद्धा ठेऊन त्याच्यावर जीवन अर्पण केले जात नाही तो पर्यंत अश्या माणसांची भक्ती म्हणजे एक प्रकारचा व्यभिचार आहे.देवाच्या नवा खाली दिन होऊन जागा पुढे जगापुढे साकडे घालणे हे एक प्रकारचे अभाग्य आहे असे करण्याचे कारण त्याचा देवावर दृढ विश्वास नसणे.तुकाराम महाराज म्हणतात आहो हा विश्वंभर काय करू शकत नाही?फक्त तुम्ही सत्य निर्धार करून या नारायणाचे चरण कमल दृढ धरा हेच सर्व सार आहे.


अभंग क्र.९१३
भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥१॥
योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ती चालता ॥ध्रु.॥
पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥
तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥

अर्थ
हरी हा त्याच्या भक्तांच्या भाव याचा भुकेला आहे त्यामुळे हरी भक्तांचा कधीही नाश होत नाही त्यामुळे योग भाग्य शक्ती घरी चालत येतात.पित्याचे धन हे पुत्रालाच मिळणार आहे त्यापासून त्याल कोण आडवणार आहे म्हणजे देवाच्या प्रेम हे फक्त त्याच्या भाक्तालाच मिळणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या हरीचे लहान मुले आहोत आम्ही त्याच्या कडेवर बसून निर्भय राहू आमचा सर्व भर त्याच्यावरच आहे आम्ही त्याचावर च निर्भर आहोत.


अभंग क्र.९१४
कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥
कोण यांचें मना आणी । ऐके कानीं नायकोनि ॥ध्रु.॥
घरोघरीं सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥२॥
तुका म्हणे आपुल्या मति । काय रितीं पोकळ ॥३॥

अर्थ
देवाविषयी काहीही माहित नसलेल्या देवा विषयी कुठल्याही प्रकारचे प्रेम नसलेले माणसे जे शिकले आहेत ते फक्त सांगतात त्याला कुठल्याही प्रकारचे प्रेम नसते अश्या या गोष्ठी कोरड्या व चावट पणाचे आहेत.व अश्या चावट व्यक्तीचे बोलणे कोण मनापासून ऐकेल?ऐकले तरी ते लोकांनी न ऐकावे.हे असे लोक घरो घरी जाऊन लोकांना ज्ञान सांगतात परंतु जसे कण टाकून भुसा कांडावा तसे ते असते.असे अल्प ती लोक तुकाराम महाराज म्हणतात असे अल्प मती असणारे लोक जे ज्ञान सांगतात ते निरर्थक व पोकळ असते.


अभंग क्र.९१५
नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥१॥
देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें ॥ध्रु.॥
लाभ कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥२॥
तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥३॥

अर्थ
खरतर प्रपंच हा नव्हताच पण आता हे देवा त्याचा पदर झाडू दे.जे सद्चीद आंनद मला पाहायचे होते ते मी आता साक्षित्वाने पहिले आहे.हा आंनदाचा लाभ कळून आल्या मुळे आता देवाचे लाभ कळून आले आहे व आता लाभ व हानी या पासून आम्ही वेगळे राहू.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकटेच आहोत मग हा बाह्य पसारा मी लोकांमध्ये का मांडू?


अभंग क्र.९१६
सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥
ऐसें बरवें वचन । करितो तो नारायण ॥ध्रु.॥
असे प्रारब्ध नेमें । श्रमचि उरे श्रमे ॥२॥
सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥३॥

अर्थ
प्रपंच हा माझा आहे असे जर विचार केले तर दोष वाढतच जातात व तो प्रपंच काही केल्या पालटत नाही आपण जे करतो आहे ते मी करतो असे म्हणण्या पेक्षा नारायणाच करत आहे असे म्हणणे योग्य होय.खरे तर प्रारब्धाने चसर्व गोष्ठी होत असतात पण प्रपंचाचे अधिक कष्ट घेतेले तर त्यामुळे कष्टच होतात.तुकाराम महाराज म्हणतात जर आपण सुख चित्तात धरले तर शांती आपोपाच मिळेल.


अभंग क्र.९१७
काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥
देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥
सातांपांचांचें गोठलें । प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोग सांभाळीं ॥२॥
फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका म्हणे मधीं । कोठें नेघें विसावा ॥३॥

अर्थ
शरीराला हरी भजनाचे शिवाय दुसरे काय काम आहे जे काही कर्म आपल्या वाट्याला आले आहे ते उचित मार्गाने करावे तेंव्हा हरीचे प्रेम व कृपा आपल्याला मिळेल त्यावेळेला हरीचे प्रेम मिळेल.नारायणाला प्रेमाने हाक मारील मग बंधने कशी राहतील?मग माझी प्रेमाची हाक ऐकून तो पंढरीचा राणा धावत माझ्या कडे येईल.हे शरीर सात धातू व पंच महाभूते यांच्या सहाय्याने बनले आहे व प्रारब्धाने हे आकाराला आले आहे मग हे भोग भोगण्या करिता त्याच्या स्वाधीन राहु.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या प्रारब्धाने हा नर देह आपल्याला प्राप्त झाला आहे आता हीच संधी साधून बुद्धी सावध करून विश्रांती न सतत या देवा ला हाक मारत राहू.


अभंग क्र.९१८
न लगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥
येतो बैसलिया ठाया । आसनें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरेचि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥२॥
घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव। तुका म्हणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥३॥

अर्थ
हरीची प्राप्ती करण्यासाठी देश काळ मंत्र विधान याची गरज नसते त्याची करुणा भाकली की त्याची प्राप्ती होते.आपण जेथे जाऊ बसू त्या ठिकाणी हा हरी येतो हरी भजन केले कि हि काया म्हणजे शरीर पवित्र होते व हेच पवित्र शरीर त्याचे अधिष्टान होते.भक्तांच्या मनात चाललेला विचार कल्पनेचा तो साक्षी असतो भक्ताने दिलेले अन्न धान्य तो मटामता यो आवडीने खातो.तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या मनातील भाव ओळखू तो परमात्मा त्यांना त्यांच्याशी ऐक्य करून घेतो.


अभंग क्र.९१९
भक्तिसुख नाहीं आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥
नसावे जी तुह्मी कांहीं निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥ध्रु.॥
एकाएकीं मन नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥२॥
तुका म्हणे वाचा गुणीं लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥३॥

अर्थ
भक्ती प्रेमसुख हे हरी भक्तां वाचून इतर कोणालाही कळणार नाही. मग तो कोणीही असो पंडित असो ,वाचक असो ,ज्ञानी असो तरीदेखील त्यांना भक्ती सुख समजणार नाही. मग कोणी आत्मनिष्ठ किंवा जीवन मुक्त जरी झाले तरी त्यांना भक्ती सुख दुर्लभ आहे .तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही श्रद्धेने भक्तिभावनेने नारायणाचे नाम घेतले तरच तो तुमच्यावर कृपा करेल ,नक्की करेल आणि मग तुम्हाला भक्तीचे खरे वर्म व मर्म कळेल.


अभंग क्र.९२०
मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥
संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥
होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥
तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥

अर्थ
हे देवा आम्ही जर आमचा वाटा आमची मागणी तुम्हास मागावयास आलो तर तुम्ही कोठे लपून बसला?आमचा तुमच्या कडे वाटा आहे हे संत या वाचनाचे साक्ष आहेत.मग मी तुझ्या दारात धरणे धरून बसेल व तुला बाहेर जाऊ देणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण मी अक्षर रूप आहे व तुझ्या माथ्यावर देव पणाचा भार आहे त्यामुळे तुला माझ्या विनंतीचा विचार करावा लागेल व माझ्या विनंती पुढे तुझे काहीही चालणार नाही.


अभंग क्र.९२१
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥
येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥
पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥
तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीनें बरवें ॥३॥

अर्थ
जो संसाराला जिंकतो तोच खरा शूर असतो व त्याचेच नाव शूरत्व आहे.बाकीचे माणसे हि मूर्ख आहेत कि बाकीच्यांच्या देहरूपी घोड्यावर अहंकार स्वार असतो.प्रतिज्ञा अशी करावी की,आपण देवाला दृढ हृदयात धरावे.तुकाराम महाराज म्हणतात जगणे असे असावे की,आपली कीर्ती कायम उरावी.


अभंग क्र.९२२
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥१॥
कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥
केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥२॥
तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥३॥

अर्थ
हे पांडुरंगा तुम्ही आमच्या मागे प्रपंच रुपी दुख लावले आहे व तुम्हीच आमचे दुख मिटवू शकता.तुम्ही जर तसे करीत नसला तर तुमच्या भानगडीत कोण पडेल?तुम्हीच संसारचा गुंता केला व तुम्हीच या संसाराचा गुंता सोडवा.तुम्ही जे मला धर्म पालनाचे कर्म सांगितले आहे ते मी केले आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या कर्तव्याची जबाबदारी तुमच्याच माथ्यावर आहे.


अभंग क्र.९२३
समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥
पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥
धार अखंडित । ओघ चालियेला नित्य ॥२॥
पूर्णाहुति जीव । तुका घेऊनि ठेला भाव ॥३॥

अर्थ
मी माझी वाणी पांडुरंगालाच अर्पण केली आहे व ती वाणी या माझ्या धन्याचेच नाव घेत आहे हे हरी माझ्या मगल ओवियांनी तुझे मंगल गीत गातो तीच तुला वाहिलेली मुक्ताफळे व पूजा आहे.नामचिंतनाच्या चाललेल्या अखंडित धरा ने मी पांडुरंगाला स्नान घालत आहे व तो नामचिंतनाच ओघ नित्य चालू आहे.तुकाराम महाराज म्हणतात नामचिंतनाचा ओघ नित्य चालू असतांना हा यज्ञ पूर्ण झाल्यावर मी जीवाचे म्हणजे माझ्या आत्मस्वरुपाची आहुती त्यात देणार आहे व प्रसाद ग्रहण करणार आहे.


अभंग क्र.९२४
अवघाचि आकार ग्रासियेला काळें । एकचि निराळें हरीचें नाम ॥१॥
धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांठविलें ॥ध्रु.॥
शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरें नव्हे ॥२॥
तुका म्हणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥३॥

अर्थ
या विश्वातील जे काही आकार दिसतात ते काळाने ग्रासले आहे फक्त एक हरीचे नामच काळाच्याही पलीकडचे आहे.अविनाश नाम हे हरीचे आहे म्हणून मी ते नाम कंठी धरण केले आहे व माझ्या हृदयात जीवनात देखील हे नाम साठविले आहे.आहो हि शरीर संपत्ती मृगजळाप्रमाणे आहे तिचा नाश होणार आहे तिचे रूपही खरे नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा,या उपाधीचा म्हणजे प्रपंचाचा मला वीट आला आहे.


अभंग क्र.९२५
बोलणेंचि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥
एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥
पाहेन ते पाय । जोंवरी हे दृष्टि धाय ॥२॥
तुका म्हणे मनें । हेचि संकल्प वाहाणें ॥३॥

अर्थ
या हरी शिवाय आता दुसरे बोलणे व्यर्थ आहे त्यामुळे दुसरे काहीच बोलायचे नाही.असा आम्हीं दृढ नेम केला आहे.काम आणि क्रोध हे देवालाच अर्पण करायचे माझ्या दृष्टीचे समाधान होई पर्यंत या हरीचे चरण कमल मी पाहणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात हा दृढ संकल्प माझ्या मनात नित्य असतो.


अभंग क्र.९२६
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥
उंच देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥
आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥
तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥३॥

अर्थ
आता पासून जे सृष्टीचे मूळ भाव असतात ते हरी पासुन उत्पन्न झालेले असून ते फक्त साक्षपणे पाहायचे आहे.हरीचे चरण हे उच्च स्थान असून ते माझे अधिष्टान आहे.हे हरीचरण म्हणजे विविध प्रकारच्या आघातापासून वेगळे असे निर्मळ स्थान आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चरणाचे स्थळ हृदयात धरून मी आढळ राहिलो आहे.


अभंग क्र.९२७
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥
भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥
दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥२॥
तुका म्हणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविती ॥३॥

अभंग क्र.९२८
आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥
काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥
शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥२॥
चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥
इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥४॥
तुका म्हणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुळती म्हणऊनि ॥५॥

अर्थ
हे नारायणा माझ्या भाग्यास जो व्यवसाय आला आहे तो मी करीन पण तुझ्या चरणी माझा दृढ भाव राहू दे.हे दातारा,तुम्ही आम्हांला कर्माच्या जोडीला बांधल्यामुळे आमचे काय चालणार आहे?पण या कर्माचा भार आम्ही आमच्या माथ्यावर घेऊन चालत असतो.हे देवा शरीर काय करणार शरीराचे जे काही कर्म आहे ते चालू दे तुझे चिंतनाचे जे वर्म आहे मर्म आहे ते चुकू देऊ नकोस.या देहाचे विकार मला अनेक ठिकाणी फिरवतात परंतु देवा तुझ्या चिंतनात मला आळस येऊ देऊ नको.माझ्या इंद्रियांचे व्यापार चालू दे पण तुझ्या पायाशी मला थारा दे.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला या काळाच्या हाती देऊ नकोस म्हणून मी तुला काकुळती येऊन विनंती करत आहे.


अभंग क्र.९२९
आम्हां अवघें भांडवल । एक विठ्ठल एकला ॥१॥
कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
परतें कांहीं नेणें दुजें । तत्त्वबीजें पाउलें ॥२॥
तुका म्हणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥३॥

अर्थ
एक विठ्ठलच येथे आम्हांला भांडवल आहे.काय वाचा मन भावाने आम्ही आमचा जीव या हरीच्या चरणी अर्पण केला आहे.हे विठ्ठला तुमचे चरण हे सर्व तत्त्वाचे बीज आहे या वाचून आम्ही दुसरे काहीच जाणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात संत संगतीने मी हरीच्या रंगात रंगू गेलो आहे.


अभंग क्र.९३०
साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार खऱ्या मोलें ॥१॥
भोगाचे सांभाळीं द्यावें कलेवर । संचिताचे थार मोडूनियां ॥ध्रु.॥
महत्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥२॥
तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तेचि व्हावें ॥३॥

अर्थ
ज्या प्रमाणे हिरा घनाचे टोले सहन करून त्याची सिद्धता सिद्ध करतो त्याप्रमाणे ज्याचे अंतःकारण सर्व सोसतो त्याला देवा सहाय्य करतो.देह प्रारब्धाच्या स्वाधीन करून जो सर्व प्रकारची सुख दुखे भोगतो त्याचे सर्व संचित जाळून जाते.जे आपल्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे त्या ठिकाणी आपण आपली अप्रतिष्ठा करून घ्यावी कारण हा पंच महा भुताचा देह नष्ठ होणार आहे याची निंदा करून घ्यावी कारण हा देह नश्वर आहे.तुकाराम महाराज म्हणतात असे केल्यावर संसार कसा राहील मग तुम्हाला ज्याच्या विषयी तुम्हांला आदर आहे त्या हरीशी तुमचे एक्य होईल.


अभंग क्र.९३१
निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥
नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥
त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्‍या कारणां पुरता विधि ॥२॥
तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥३॥

अर्थ
सर्वांशी निर्वैर होणे हे सर्व साधनांचे मूळ आहे बाकी इतर खटपट त्यामानाने कमी प्रतीचे आहेत.परमार्थात कुठलेही ढोंग चालत नाही शेवटी शुध्द व अशुध्ह काय याचा निवडा होत असतो.सर्व प्रकारच्या वासना नाहीश्या होणे याला त्याग म्हणतात विधी पूर्वक कार्य करणा पुरते विषयाचे सेवन याला त्याग म्हणतात.तुकाराम महाराज म्हणतात ज्याला एका हरी चिंतनाची आवड निर्माण होते तोच खरा होय आणि त्याचेच नाते सत्याशी जोडले जाते हाच त्याचा लाभ होय.


अभंग क्र.९३२
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं विषयांचे ॥१॥
ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥
केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥२॥
तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥

अर्थ
आहो,ज्ञानी माणसाने विषयाचे जर श्रवण केले तर त्यांची हि वर्तणूक प्राण्यांना सारखी होते विषयांचा जर लोभ निर्माण झाला तर चित्तात क्षोभ निर्माण हिते आत्मज्ञांच्या जाणिवेत कमतरता येत.मूर्ख लोक चांगला स्वयंपाक तयार करून दुसऱ्याला वाढतात आणि आपण तक पिऊन भूक भागवितात.तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांचा घात होऊन त्यांच्या देहाची वाताहत होते.


अभंग क्र.९३३
कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥
कोणां सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥
आवडीनें नाचें । आहे तरी पुढें साचें ॥२॥
तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥३॥

अर्थ
आहो देवा,तुम्ही निष्काम आहात नामरहित आहात तर मग तुम्ही नाम का धरण केले?तुम्ही नामरहित आहत हे ज्ञान तुम्ही कोणाला सांगता?हे सर्व फसवण्याचे लक्षण आहे.आमच्या पुढे तुमचे खरे रूप आहे व त्याच्याच पुढे आम्ही नाचत आहोत.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या या कोरड्या ब्रम्हज्ञान च्या सांगण्याने वर्णनाने आमचा तुमच्या सगुण रुप विषयीचे प्रेम कधी भंगणार नाही.


अभंग क्र.९३४
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥
ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥
परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥
तुका म्हणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥३॥

अर्थ
मनुष्याने नुसते आयुष्यभर खरे बोलण्याचे व्रत जरी धरण केले तरी या हरीचे फुकट प्राप्ती होते.असे फुकटचे उपाय असून लोक आपले आयुष्य वाया घालवितात.एका सत्य वचनामुळे अनेक पर उपकार होतात.तुकाराम महाराज म्हणतात मनाने जर आंतरिक मळ म्हणजे दुष्ट वासनेचा मळ काढून टाकला तरी मन हेशीतल राहते.


अभंग क्र.९३५
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥
पावे धांवोनियां घरा । राहो धरोनियां थारा ॥ध्रु.॥
कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥
तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥

अर्थ
जेथे दया क्षमा शांती असते तेथे देवाची वसती असते.जो कीर्तन करतो त्याच्यासाठी जसा दुष्काळात मनुष्य अन्नासाठी धावतो तसा देवा त्याच्याकडे धावत येतो.तुकाराम महाराज म्हणतात देवाचे नुसते नाव जरी घेतले तरी तो आपल्याला प्रत्येक्ष भेटावयास येतो.


अभंग क्र.९३६
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥
त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥
त्याचें खरें ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावीं ॥२॥
तुका म्हणे सत्य सांगें । येवोत रागें येतील ते ॥३॥

अर्थ
शिष्याकडून जो सेवा करून न घेता त्याला देवासारखे मानतो,त्या गुरूचा उपदेश शिष्याला फळ प्राप्त करून देतो व इतर जे गुरु शिष्यांकडू सेवा करून घेतात त्यांना मात्र दोष लागतो.जो स्वतःच्या देहभावा विषयी उदासीन झालेला असतो त्याला खरे ब्रम्हज्ञान झाले आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्याचा कोणाला राग जरी आला तर येऊ द्या.


अभंग क्र.९३७
माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥
विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥
तुज देखताचि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥
आम्हां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥३॥
तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥४॥
तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखता लागलीं औघीं ॥५॥

अर्थ
हे देवा आज पर्यंत माझे अनेक नातेवाईक मेली आहेत परंतु हे हरी तू जसा आहेस तसा च आहेस.हे विठोबा तू कसा वाचलास आज मला ते सांग?अरे पांडुरंगा तुझ्या देखतच माझर वडील आजोबा पणजोबा हे सर्व मरून गेली.आमच्या मागे हि बालत्व आणि तारुण्याची अवस्था लागल्या आहे.देवा तुझ्या बरोबर मागे कोणीही वाद घालयला नव्हते त्यामुळे तुझे चांगले फावले आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा अरे तू प्रत्येक्ष असतांना माझी माझ्या आधीच्यांची हीच अवस्था आहे यातील रहस्य काय हे आता तू मला सांग.


अभंग क्र.९३८
आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥
विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥
समाधानासाठी बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥२॥
जिवाहूनि मज तेचि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे माझें तोचि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥४॥

अर्थ
ज्याच्या मुळे माझ्या हरी रूप चित्ताचा भंग होईल आश्या कोणाचाही मी संग करणार नाही.एका विठ्ठला वाचून मी दुसरे काहीही ऐकणार नाही म्हणजे मी फक्त विठ्ठलाचे माझ्या वाणीने नाम घेईन व कानाने त्याचेच नाव ऐकेन.व्यवहारा मध्ये मी जे काही बोलतो ते फक्त इतरांच्या समाधानासाठीच पण माझे चित्त इतर कशातही गुंतलेले नाही.ज्याच्या चित्ताला एक पांडुरंगा शिवाय दुसरे काहीच आवडत नाही ते माणसे मला माझ्या जीवा पेक्षाही ज्यादा आवडतात.एक विठ्ठल व संत यांच्या शिवाय माझे हित कोण जाणतात त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देतो व त्यांच्या बोलण्याशिवाय इतरांच्या बोलण्याकडे मी लक्ष सुद्धा देत नाही.


अभंग क्र.९३९
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥१॥
नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥
आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हांचि निघावें सर्वांतूनि ॥२॥
तुका म्हणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥३॥

अर्थ
चित्तातील विषय समूळ काढून त्याचा त्याग करावा तेंव्हाच त्याने गोसावी व्हावे नाहीतर संसारात सुखी राहावे वैराग्याचे ढोंग करून स्वतःची फजिती करून घेऊ नये.चित्ताती आशा मारून विजयी व्हावे मग सर्व बंधनातून बाहेर पडावे.तुकाराम महाराज म्हणतात जर तुला योग सध्या करून घ्यायचा असेल तर तू आधी तुझ्या मनातील आशेचा नाश कर.


अभंग क्र.९४०
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥

अर्थ
या विठ्ठलच्या ठिकाणी निष्ठावंत भक्ती भाव असणे हाच भक्तांचा स्वधर्म आहे हे वर्म भक्तांनी कधीही चुकवू देवू नये.विठ्ठलच्या ठिकाणी निष्काम व निश्चल विश्वास ठेवावा व इतरांचा वास व वाटकधीच पाहू नये.तुकाराम महाराज म्हणतात असा कोणता भक्त आहे की,देवाने त्याची उपेक्षा केली आहे?असे मी कधी ऐकले देखील नाही.


अभंग क्र.९४१
नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आह्मीं ॥ध्रु.॥
गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥२॥
तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥

अर्थ
तुम्ही जेथे असाल तेथे नामचिंतनाचा उघड उघड प्रसार करा.मग तुम्हांला बंधनातून माझा स्वामी म्हणजे हा परमात्मा निश्चित सोडवील हे आम्ही त्याचे दास प्रतिज्ञा करून सांगतो.कोणीही कीर्तन म्हणजे हरी चिंतन करणारा असो तो कुठल्याही प्रकरचे गुण व दोष पाहत नाही त्याला प्रेमाने आळविले म्हणजे तो आपला अंकित होतो.तुकाराम महाराज म्हणतात या हरी कीर्तना मध्ये इतके प्रेम आहे कि हा प्रपंच कडू वाटू लागतो व कीर्तन ऐकल्यावर अंगावर रोमांच उठतात त्यामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होऊन कंठ दाटून येतो.


अभंग क्र.९४२
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥१॥
लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥
उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवेचि तें ॥२॥
तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥

अर्थ
या काळाचा किती वळसा सोसावा?कोठेही जा तरी हा काळसारखा पाठीमागे असतो.आहो या पांडुरंगाला शरण जाऊन तुम्ही आम्ही या चौऱ्यांशी लक्ष योनी तून आपली सोडवणूक करू घ्या.जन्म झाला कि मृत्यू होतो आणि मृत्यू झाला कि पुन्हा जन्म होतो.तुकाराम महाराज म्हणतात गाडग्याची माळ जशी असते एक खाली आला कि दुसरा भरतो आणि एखादे गाडगे फुटले कि ते मुक्त होते त्याप्रमाणे आपल्यातून द्वैताचा नाश झाला कि आपण हि मुक्त होऊ.


अभंग क्र.९४३
नाम म्हणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करितील कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥१॥
जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥
नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥२॥
काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥३॥
आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥४॥
जगीं प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥५॥
जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाच्या चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥६॥
काय सांगों ऐशीं कीर्ती । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥७॥

अर्थ
नाम घेतल्यावर मोक्ष मिळत नाही असे जर कोणी सांगत असेल तर आपण बधीर व्हावे म्हणजे आपण आपल्या कानात बोटे घालावीत व त्या दुष्टाचे बोलणे ऐकू नये.या नामाने मानतील इच्छा पूर्ण होतात जे ज्याला हवे ते मिळते व जे नाम घेत नाही असे मूर्ख बडबडून मृत्यू पावतात.आहो नवविधी भक्तीचा जे निषेध करतात व उगाच त्याविषयी वाद घालतात असे जन्मला जरी आले तरी ते निंद्य आहेत त्याचे जीवन सुकरच्या जातीचे असते.अश्या या माणसांना किती वेळा सांगावे या चांडाळाना किती वेळा समजून सांगावे?यांना आठवत का नाही कि या नामामुळेच श्रीहरीने उपमन्यु बाळाला दुधाच्या सागरात कोंडले होते.आपल्या नामासाठी या हरीने शंखसुरा मागे लागून त्याचे पोट फाडून चार वेद परत मिळवले होते.या नामचा महिमा जग प्रसिद्ध आहे सगळीकडे नामाचा बोलबाला आहे नाम चिंतना मुळे गणिकेचा उद्धार झाला आहे व अनेक कित्तेक असे आहेत कि या नामामुळे त्यांचा उधार झाला आहे नामामुळे अनेक पातकी व महादोषी हे नामामुळे तरले.पुराणात अनेक वर्णन आहे प्रल्हादाने नुसते नारायण नाम धरण केले तर हरीने त्याचे अग्नी पाण्यापासून त्याचे रक्षण केले विष पासून रक्षण केले.तुकाराम महाराज म्हणतात आहो या नामाची कीर्ती किती सांगावी जे नामाचा निषेध करतात ते नरकात जातात.


अभंग क्र.९४४
गासी तरि एक विठ्ठलचि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥
अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा सीण करिसी वांयां ॥२॥
तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाहीं चित्ती निलाजिरा ॥३॥

अर्थ
गायचे जर असेल तर एक विठ्ठल नाम गा नाहीतर एकाजागी स्वस्त बसून राहा.अद्वैत असणाऱ्या हरी बद्दल काही बोलता येत नाही मग जर त्याचे मूळ स्वरूप जाण्याचे म्हंटले तर मग व्यर्थ सीन होतो.तुकाराम महाराज म्हणतात या माणसांची किती फजिती करावी या लोकांना लाज नाहीत.


अभंग क्र.९४५
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥
शत्रु तो म्यां केला न म्हणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥
जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥

अर्थ
ज्याच्या वाणीत विठ्ठलाचे नाम येत नाही त्याचे शब्दही मला आवडत नाही त्याचे मी शत्रुत्व मी पत्करून त्याला मी आपले मानत नाही जोविठ्ठलाला विरोधों आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्याला विठोबाचे नाम हि आवडत नाही तो अधम समजावा.


अभंग क्र.९४६
आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥
घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु.॥
अबद्ध वांकुडें जैशातैशा परी । वाचे हरी हरी उच्चारावें ॥२॥
तुका म्हणे आम्हां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥३॥

अर्थ
आमचे काम हे विठोबाशी आहे विठोबाच्या नामाशी आहे बाकीच्यांशी आमचे काही प्रमाण नाही.कंबर कसून मी विठ्ठलचा भक्त आहे असे घोषित करतो बाकी मग मी कळीकाळाला सुद्धा माझ्या माझ्या समोर फिरकू देणार नाही.हरी नाम जसे येईल मग ते वाकडे तिकडे का होईना घ्यावे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हांला विठोबारायाचे हे पुराणातील बीज सापडले आहे.


अभंग क्र.९४७
जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥
पिंडाच्या पोषके नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥
मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाहीं पुन्हा ॥२॥
तुका म्हणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारीती ॥३॥

अर्थ
पाखंडी माणसांची वृत्ती म्हणजे जीव म्हणजे मी देव भोजन म्हणजे भक्ती आणि मरण म्हणजे मुक्ती अशी असते.या पिंडाला म्हणजे देहाला सांभाळणाऱ्या लोकांनी लोकांची फसवणूक करू वेद व पुराणांना खोटे ठरविले.असे पाखंडी मनाला येईल ते विचार करतात व म्हन्रतात संसार पुन्हा पुन्हा नाही म्हणजे जन्म मरण पुन्हा पुन्हा नाही.असे लंड(महाराजांनी धिक्कारार्थी उच्चारलेला शब्द)माणसे यांच्या पाठीवर यम दंड उठणार आहे कि जी पाप पुण्य याचा विचार देखील करतनाही.


अभंग क्र.९४८
भक्तांचा महिमा भक्तचिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥
जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । न बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥
अभेदूनि भेदू राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥
टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥
तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । तीहीं एक्या भावें जाणीतला ॥४॥

अर्थ
भक्तांचा महिमा भक्तच जाणतात पण दुसऱ्याना हे समाजाने कठीण आहे.सर्व जाणून हि ते जाणत नाही असे दाखवितात व न बोलताही मुखाने बोलतात.देव जाणूनही ते आपल्या ठिकाणी सेवकत्व बाळगतात कारण जगामध्ये भक्ती प्रेमाचा सुकाळ वाढवा असे त्यांना वाटते.हे असे ज्ञानी लोक टाळघोष करून कथा करून प्रेमाचा सुकाळ करतात कारण मूर्ख या या भवसागरातून तरावा.तुकाराम महाराज म्हणतात ज्याने हा ऐक्यभाव जाणला असेल त्यालाच भक्तीची स्थिती ठाऊक असते.


अभंग क्र.९४९
आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥
अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥
तुका म्हणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥३॥

अर्थ
आशा तृष्णा माया हे अपमानाचे बीज आहेत यांना जर नष्ट केले तर मनुष्य पूज्य होतो.त्यांचा त्याग केला नाही तर कोठेही मान मिळत नाही व ज्याने यांचा त्याग केला तो धीर समजून त्याचे दर्शन दुर्लभ आहे असे समजावे.तुकाराम महाराज म्हणतात जो बुद्धिवान आहे त्याना उपदेश लगेच समजतो व जे अज्ञानी लोक आहे त्यांच्या ठिकाणी बोलणे व्यर्थच होयअर्थातच त्यांची बुद्धीच अल्प असते.

अभंग क्र.९५०
चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥
संसारसिंधु नाहीं हरीदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥
जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥३॥

अर्थ
हरीचिंतनात घातलेला वेळ हा धन्य धन्य आहे सर्व मंगलाचेहि तो मंगळ काळ आहे.हरिदासांना संसार सिंधूचे अस्तित्व नसते मग ते गर्भवास जन्म मरण हे कसे जाणतात?त्यांच्या दृष्टीने संसार हा हरी रूपच हरीचा कृपा सारच आहे म्हणून पांडुरंगहि त्यांचा आभारी आहे.तुकाराम महाराज म्हणतात देव हा भक्तांच्या बंधनात बंध झालेला आहे या हरीने त्याचे मायाने देव आणि भक्त असे वेगळे आहेत असे दाखविले आहे.


अभंग क्र.९५१
मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥
ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुखे ॥२॥
तुका म्हणे सुखें देई संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥३॥

अर्थ
मोक्षाची प्राप्ती आमच्या साठी आवघड नाही मोक्ष तर आमच्या पदरीच आहे.आम्हांस जे आवडते ते म्हणजे भक्तीचे सोहळे आहे व ते तुम्ही देवा पुरविता हे नवल आहे.ज्याचे आहे ते त्यालाच दिले तर त्यात काय विशेष आहे?म्हणजे मोक्ष तर आमचेच स्वरूप आहे पण तू जर ते आम्हाला देत असलाच तर त्याचा आम्ही आंनदाने स्वीकार करू.तुकाराम महाराज म्हणतात आम्हांला तुझ्या भक्ती प्रेमाची गोडी आहे संसारात आम्हांला हेच सुख दे व माझ्या या आवडीला तू थारा द्यावा म्हणजे आश्रय द्यावा.


अभंग क्र.९५२
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥
सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥
पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥२॥
ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥३॥

अर्थ
आहो चिंतन करण्यासाठी काहीवेळ काळ लागत नाही ते केव्हाही सर्व काळ करावे.ज्याच्या वाचेतनेहमी नारायणाचे नाम आहे ते वदन हे मंगल स्थान आहे असे समजावे.त्याच्या ठिकाणी हरीचा सर्वोत्तम भाव आहे इतर पसारा हा व्यर्थ आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व लोकांना नाम उपदेश करीत आहे.


अभंग क्र.९५३
अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥१॥
बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥
अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥२॥
तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥३॥

अर्थ
गोविंदा शिवाय जो काही व्यवहार होतो तो म्हणजे बधिक होतो.म्हणून देवा मी बसल्याजागी तुझे चरण कमल आठवीन आणि तुझ्या स्वरुपाची जाणीव करून घेईन.या हरीचे अखंड स्वरूप हे संसारिक विकल्पामुळे खंडल्या सारखे होते व ज्या प्रमाणे अंधारात दोरी हि सर्प प्रमाणे भासते त्या प्रमाणे आपल्याला या देवाच्या अखंड स्वरूपातील आनंदाचा संसारामुळे खंड पडतो व हे एक प्रकारचे पाप आहे.तुकाराम महाराज म्हणतात या विश्वात सगळीकडे हा विश्वंभर वसलेला आहे असे जाणून आम्हीं सुखरूप राहू.


अभंग क्र.९५४
एकाचिया घाटया टोके । एका फिके उपचार ॥१॥
ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥ध्रु.॥
एकाची ते उष्टे खाय । एका जाय ठकूणि ॥२॥
तुका म्हणे बहु सोपें । बहु रूपें अनंता ॥३॥

अर्थ
भक्तांच्या कन्याही हा देव आवडीने खातो पण अहंकारी माणसाने केलेल्या पक्कांन्नही तो त्या कन्या पुढे फिके मानतो.अशी सवय या गोवाळ्यास म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यास आहे त्याला भक्तांचा भक्ती भाव हा प्रिय आहे.एकाचे तो उष्टे खातो व अहंकारी माणसाला फसवून निघू जातो.तुकाराम महाराज म्हणतात हा अनंत वेष धरी आहे परंतु हा भक्तांना हा सोपा व सुलभ आहे.


अभंग क्र.९५५
कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥१॥
ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥
मृत्युचिये अंगीं छाये । उपायेचि खुंटतां ॥२॥
तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥३॥

अर्थ
परमार्थिक अधिकार ज्याच्या ठिकाणी नाही असे लोक वयाला जातात.अहो लोकांनो म्हणून मी तुम्हांला एक सोपे वर्म सांगतो ते म्हणजे फक्त देवाच्या चिंतनाने तुम्हांला आनंद प्राप्त होतो याला कुठल्याही प्रकारचे श्रम लागत नाही.मृत्युच्या छाया खाली आल्या नंतर सर्व उपाय थांबतात.तुकाराम महाराज म्हणतात म्हणून हे जनहो सर्वांनी हरिनामात मन गुंतवून ठेवा.


अभंग क्र.९५६
ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥१॥
सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥
अवघें साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥२॥
तुका म्हणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥३॥

अर्थ
जो भक्त ज्या स्वरूपाचे ध्यान करील ते स्वरूप हा हरी धारण करतो.या हरीचे चरण हे सम आहेत ते विटेवर आहे जणू काही ते सगुण निर्गुणाचे प्रतिक आहे.जसे साखर हि सर्व बाजूने गोड असते त्या मध्ये कोठेही काहीही कमी पणा निवडून काढता येत नाही.तसेच या चरण कमलाचेही तसेच आहे या मध्येही कोठेही सगुण निर्गुण निवडून काढता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात आपण जे जे काही सेवन करू ते ते हा श्रीहरीच भोगत असतो.


अभंग क्र.९५७
आचरती कर्में । तेथें कळें धर्माधर्म ॥१॥
खेळे गोवळियांसवें । करिती त्यांचें साहावें ॥ध्रु.॥
यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥२॥
तुका म्हणे चोरी । योगियांही सवें करी ॥३॥

अर्थ
विधी पूर्वक कर्मे आचरणे मुहूर्त पाहून केलेल्या कर्माकडे पांडुरंग पाहत नाही पण शुध्द भाव असणाऱ्या भोळ्या गोपाळां बरोबर हा खेळतो त्यांचे काहीही तो सहन करत असतो.यज्ञ करतांना अनेक मंत्र उच्चार करतात पण त्यांच्या ठिकाणी प्रेम नसल्या मुळे हा हरी त्यांच्या पासून उदास असतो.तुकाराम महाराज म्हणतात हा हरी मोठ्या योगींनाही फसवितो कारण त्यांच्या मध्ये प्रेम नसल्यामुळे त्यांच्या हृदयात तो कधीही प्रकट होत नाही.


अभंग क्र.९५८
नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तोचि ठेला ॥१॥
आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ध्रु.॥
आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रम्हकर्मा नाम एक तुझें ॥२॥
तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥३॥
परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारितां ॥४॥
कोळियाची कीर्ती वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥५॥
सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नामी ॥६॥

अर्थ
नामाचे वर्णन त्याची कीर्ती पुराणात आहे जो क्कोनी मनोभावे हरी कीर्तन करतो तो हरी रूप होतो भगवान आदिनाथ याच्या कंठात हा मंत्र कायम असतो व ते मंत्र हा आदिनाथ शंकर कायम आवडीने घोकत असतो.हे देवा तुझे नाम हे सर्व सर्व साराचे सार आहे उत्तमातील उत्तम आहे वेदात सांगितलेली कर्मे तुझ्या नामामुळे सार्थ होतात.नारद मुनी हाती वीणां मुखी नाम घेत त्रैलोक्यात संचार करत असतात.परीक्षित राजाला सात दिवसत मृत्यू येणार परंतु तुझ्या नाम उच्चारामुळे तो मुक्त झाला.अरे भगवंता तुझ्या नामचे इतके मोठे गहन महत्व आहे की,केवळ वाह्ल्या कोळ्याने अखंड तुझे नाम स्मरण केले म्हणून त्याने त्या नामाच्या जोरावर राम आवतारच्या आधी रामायण लिहिले.तुकाराम महाराज म्हणतात तुला वेद सगुण निर्गुण असे म्हणतात पण तुझ्या नामात तसा भेद नाही.


अभंग क्र.९५९
भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥
शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥
सरितां वोहोळ गंगा सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥
आणीक अमुप होती तारांगणें । रविसी समान लेखूं नये ॥४॥
तुका म्हणे नाहीं नम्रता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥

अर्थ
मनुष्य व प्राणी या मध्ये ज्याच्या त्याच्या योग्यतेने दया दाखवावी परंतु संतांना सर्वभावे नमस्कार करावा.जर तू शिकल्याचा ताठा(अभिमान)धरशील तर तुला यम मार्गाने जावा लागेल.हिरा परीस मोहरा यांची तुलना दगडाशी होऊ शकत नाही त्याप्रमाणे संतांनची तुलना सामान्य माणसाशी करू नये.नद्या ओढे यांना जर गंगे प्रमाणे किंवा सागराप्रमाणे मानले तर त्याच्या इतका दुष्ट कोणी नाही.आकाश गंगेत अनेक तारांगणे आहेत पण त्यांची तुलना सूर्‍याशी करू नये माणू नये.तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या अंगी नम्रता नाही ते कठीण लोखंड प्रमाणे आहेत असे समजावे.


अभंग क्र.९६०
आणीक मज कांहीं नावडती मात । एका पंढरिनाथावांचुनिया ॥१॥
त्याचीच कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥२॥
तुका म्हणे संत म्हणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥३॥

अर्थ
एक पंढरीनाथ म्हणजे विठोबा या वाचून मला काहीच आवडत नाही कोणतीही गोष्ट आवडत नाही.या विठोबाचे कीर्तन आणि कथा हे मला आवडते आणि तेच श्रवण करायला मला गोड वाटते.तुकाराम महाराज म्हणतात संत दुसरे काहीही म्हणोत पण मी या विठ्ठला वाचून मी बाकी काही मानत नाही.


अभंग क्र.९६१
ठेवा जाणीव गुंडून । येथें भावचि प्रमाण ॥१॥
एका अनुसरल्या काज । अवघें जाणे पंढरिराज ॥ध्रु.॥
तर्कवितर्कासी । ठाव नलगे सायासीं ॥२॥
तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥

अर्थ
हे अहंकारी ज्ञान्यानो आहो तुमचे शहाणपण गुधाळून ठेवा कारण देवाच्या प्राप्ती साठी येथे फक्त भक्तिभावाच प्रमाण आहे.त्या पंढरीनाथाला सर्व भावे शरण जा मग तुमचे सर्व मनोरथ तो पूर्ण करील.तुम्ही तर्क वितर्क करून काहीच उपयोग नाही उगाच तुमचे कष्ट वाया जातील.तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही भक्तीभाव न ठेवता इतर काही गोष्टी कराल तर तो सारा शिन ठरतो.


अभंग क्र.९६२
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रितें कलेवर ॥ध्रु.॥
षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥

अभंग क्र.९६३
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥
सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥
तुका म्हणे लागे थोडाच विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥

अर्थ
ज्याच्या चित्तात कुठल्याही प्रकारची शंका नाही तो मुक्त आहे व ज्याच्या चित्तात मोह लज्जा चिंता आहे तो बद्ध होय.एकांत धरून राहिलात तर सुख प्राप्त होते परंतु लोकांमध्ये राहून दम केला तर मात्र दुखः प्राप्त होते.तुकाराम महाराज म्हणतात सुखाच्या प्राप्ती साठी थोडा विचार करावा लागतो परंतु अनेकहे लोक प्रकार करून फसवितात.


अभंग क्र.९६४
कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥
पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानी एक आपुलाल्या मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥२॥
तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥३॥

अर्थ
जो मनुष्य बहुत सांगणाऱ्या माणसाचे ऐकतो त्याच्या सारखा मूर्ख दुसरा कोणीही नाही.ज्या प्रमाणे ओढाळ जनावर कायम त्याच्या पाठीवर अनेक मार बसतात त्या प्रमाणे अज्ञानी माणसांच्या पाठीवर यम दंड बसतात.असे अनेक लोक आहेत कि ते वेदांत त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात.तुकाराम महाराज म्हणतात पण जर एका हरी विषयी मनात भाव धरला नाही तर त्याच्या तोंडात शेवटी माती पडते.


अभंग क्र.९६५
देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हेचि सुख आगळें ॥१॥
या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धीसिद्धी द्वारीं । कर जोडूनि तिष्ठती ॥ध्रु.॥
नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥२॥
तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघशामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठी ॥३॥

अर्थ
हे देवा माझी एक विनंती ऐक मला मुक्ती नको रे सद्गातीची इच्छा देखील मला नाही मला फक्त भक्तिप्रेमसुख हवे आहे.अरे हे भक्ती प्रेम सुख या वैष्णवांच्या घरी आहे ज्याची मी इच्छा करत आहे.या वैष्णवांच्या द्वारी रिद्धी सिद्धी तिष्टत हात जोडून उभ्या आहेत.हे देवा मला वैकुंठाचा वास नको कारण ते सुख नाशिवंत आहे पण हरिकीर्तन करताना जो आंनदरस आहे तो अद्भुत आहे तो रस मला दे.तुकाराम महाराज म्हणतात हे मेघश्याम तुझ्या नामाचा महिमा तुला माहित नाही तुला कळतही नाही अरे या नामासाठी आम्ही जन्म घेणे गोड समजतो.


अभंग क्र.९६६
न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं त्या केशवाविण दुजें ॥१॥
काय उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु.॥
आणिकाची कीर्ती नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥२॥
न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें कोठें ॥३॥
न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥४॥
तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥५॥

अर्थ
मी या केशवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा व सेवा करणार नाही व माझ्या मनात कोणताही पांडुरंगा शिवाय दुसरा देव नाही.या केशवाच्या ठिकाणी मला काय कमी पडले म्हणून मी ते इतर देवाशी मागावे.मी या विठ्ठलावाचून इतर कोणत्याही देवाची कीर्ती ऐकणार नाहि व गाणार नाही.या विठ्ठलावाचून मला दुसरी कोणतीही चाड(इच्छा)नाही.माझ्या या डोळ्यांनी मी या श्रीमुखावाचून दुसरे काहीच पाहणार नाही व पंढरी सोडून मी दुसर्‍या कोणत्याची तीर्थी जाणार नाही.मी कुठल्याही प्रकारची इच्छा व मुक्ती साठी प्रयत्न करणार नाही व या संसारास मी कधी हि भिणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या जीवाला या केशावाशिवाय दुसरे काही प्राप्त व्हावे असे मला वाटत नाही.


अभंग क्र.९६७
नव्हे खळवादी मताचि पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥
साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रम्हांडापुरता घेईल त्यासी ॥२॥
तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥३॥

अर्थ
नास्तिक लोक हे उपदेश करता परंतु त्याला सत्याचा आधार नसतो पण माझे शब्द म्हणजे सत्यावर आधारित असते .माझे व नास्तिकाची मते हे मनाला साक्ष ठेऊन पहा म्हणजे खारे कोणते व खोटे कोणते?हे सहज तुमच्या लक्षात येईल.आहो माझे शब्द हे एकांगी नसू संपूर्ण ब्रम्हांडाला गवसणी घातलेले शब्द आहेत.तुकाराम महाराज म्हणतात माझी तुम्हां सर्व जाणतिया लोकांना विनंतीती आहे कि तुम्ही बहुमत असणऱ्या नास्तिक लोकांचे शब्द ऐकून उगाच तुमचे श्रम वाढवू नका.


अभंग क्र.९६८
कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥३॥

अर्थ
हरी कथा करून जे द्रव्य घेतात व जे द्रव्य देतात त्या दोघांची अधोगती होऊन त्या दोघांना नर्क प्राप्ती होते.रौरोव व कुंभपाकाच्या नर्क यातना ते भोगतात व त्याची करून नारायणला देखिला येत नाही.तलवारीच्या धारी प्रमाणे असलेले गावात हे त्यांचे शरीर छेदतात व त्यांना तप्त भूमी वर लोळवतात.तुकाराम महाराज म्हणतात या अश्या लोकांच्या नर्क यातना कधीही चुकत नाही ते प्रत्येक्ष यमाच्या हातीच सापडलेले असतात.


अभंग क्र.९६९
नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥
वाखाणी अद्वैत भक्तीभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता ॥ध्रु.॥
अहं ब्रम्ह म्हणोनि पाळितसे पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥२॥
वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥३॥
तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरीष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥

अर्थ
हरीचे वर्णन जो भक्तीभावावीणवीण घेते व सांगतो ब्र्म्हज्ञानाच्या नुसत्या कोरड्या गोष्ठी करतो त्याचे शब्द कानाने एकू देखील नाही.आपल्या वाणी द्वारे अद्वैताचे वर्णन व त्याचे ज्ञान भक्तिभावा विन जो कोणी सांगतो तो स्वतः दुखी होतो व श्रोत्यांनाही शीण करतो.तो स्वतःला अहं ब्र्म्हस्मी म्हणवू घेतो व शरीराची जोपासन अतिषय लाडाने करतो अश्या भांड खोरव्यक्तीशी बोलू देखील नाही.वेदबाह्य बोल हा नास्तिक सांगत असतो पण तो संतां मध्ये काळ्या तोंडाचा म्हणून ओळखला जातो.तुकाराम महाराज म्हणतात जो देव आणि भक्त याच्या मध्ये खंडन आणतो त्याच्या पेक्षा वरिष्ठ हे देवाचा धावा करणारी जनवरी आहेत.


अभंग क्र.९७०
वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥
चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥२॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नी एक ॥३॥
तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरी हे सोय विधि पाळीं ॥४॥

अर्थ
वेदाने जे कर्मे सांगितले आहेत त्यांचे वर्म मी आज संतां पुढे तुम्हाला सांगत आहे.एका देवा पासून चार वेद निर्माण झाले व ते आपापल्या पापपुण्य या गुणाने विभागले गेले.जगाची उत्पत्ती हि हरी मुळे झाली आहे व हरीच्या ठिकाणी आदी मध्य अंत असा कोणताही भेद नाही.आंबे बोरी वड बाभूळ चंदन हे जरी वृक्ष भिन्न असले त्यांचे गुण जरी वेगवेगळे असले जरीपण त्यांचा संबंध अग्नीशी आला कि ते सर्व एकच होतात.तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत मन उन्मन अवस्थेत जात नाही तो पर्यंत मानाने फक्त वेदाने सांगितलेल्या विधी मार्गाचा अवलंब करावा.


अभंग क्र.९७१
तीर्थांचे जे मूळ व्रतांचें जे फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥
तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥
जीवांचें जीवन सुखाचें शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥२॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपार दुष्टां काळ ॥३॥
सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥४॥
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीती गातां ॥५॥

अर्थ
सर्व तीर्थांचे व व्रतांचे जे मूळ आहे ते ब्रम्ह हे पंढरपूरला आहे.व ते ब्रम्ह आम्हीं आमच्या डोळ्यांनी पहिले व आमच्या डोळ्यांची पारणे फिटले गेले.सर्व जीवांचे जीवन हे आमच्या शेजारी कटी कर ठेऊन विटेवर उभे आहे.आहो तो विश्वाचा निर्माता आहे कृपेचा सागर आहे दिनाचा दयाळ आहे पण दुष्टांचा कर्दनकाळ आहे.त्याचे सर्व देव चिंतन करतात सर्व मुनी त्याचे ध्यान करतात असा तो निर्गुण निराकार आहे.तुकाराम महाराज म्हणतात जे श्रुतीलाही समजले नाही ते आम्हाला त्याचे गीत गायल्याने साफाडले आहे.


अभंग क्र.९७२
माझे मनोरथ पावले जैं सिद्धी । तई पायीं बुद्धी स्थिरावली ॥१॥
समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥
त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥
महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥
जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं मावळलें ॥४॥
तुका म्हणे माप भरु आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥

अर्थ
माझे मनोरथ तेंव्हाच सिद्धीला जाईल जेंव्हा माझी बुद्धी हरी चरणी स्थिर होईल.या हरीच्या स्मरणाने माझा जीव समाधान पावला असून निश्चल झाला असून माझी सर्व हळहळ संपली.हरीच्या प्रेम सुखाने माझे मन सुखावले असून त्रिविध तापाचे दहन झाले आहे.पांडुरंग रुपी महालाभ मला झाला व नामरूपाने तो माझ्या जिभेवर वसला व सर्वांगामध्ये तोच अखंडित पणे व्यापून राहिला आहे.माझ्या जीवनाच्या अंतरंगात ओलावा निर्माण होऊन या विश्वाचा विश्वंभर माझ्या अंतरंगात राहिला आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्या प्रमाणे माप भरल्यावर जसे सिग लागते जसे गंगेला अनेक प्रवाह मिळून पूर येतो त्याप्रमाणे माझ्या हरी प्रेमाला पूर आला आहे.


अभंग क्र.९७३
कृपेचें उत्तरे देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥
बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहो ॥ध्रु.॥
अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारें । माप भरा बरें सिगेवरी ॥३॥

अर्थ
हरी कृपेने हरीविषयी बोलण्याचा प्रसाद मिळून आंनद वाढावा.अनेकांच्या भाग्याने विठ्ठल रुपी जहाज येथे लागले आहे त्यामुळे आपले काम पटकन साधून घ्यावे.अलभ्य म्हणजे दुर्मिळ वस्तू आपल्या दारावर फुकट आली आहे आता त्या वस्तूचा लाभ चुकवू देवू नका.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीव्हाने व श्रवणाने हृदय भांडारात शीग लागे पर्यंत हरिरूप माल भरून घ्या.


अभंग क्र.९७४
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें धाव घेती ॥१॥
कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥
स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥
तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥

अभंग क्र.९७५
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥
केला असता अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥
संसाराचा नाहीं पांग । देवे सांग सकळ ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥३॥

अर्थ
पापी लोक दिलेल्या वाचनाला जगात नाही पण आमचा नारायण तसा नाही.त्या नारायणाने माझा अंगीकार केलेला आहे त्यामुळे त्याला माझा भार वाटत नाही.देवाने मला कहीही कमी केलेलं नाही व संसाराचा उपद्रवही मला वाटत नाही.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या नारायणाची कीर्ती मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता करत राहू.


अभंग क्र.९७६
कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥
ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा । अखंड स्मरा रामनाम ॥ध्रु.॥
मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥२॥
तुका म्हणे करीं ब्रम्हांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥३॥

अर्थ
हरी कथा करून जो द्रव्य घेतो व देतो ते दोघेही नरका मध्ये जातात.राम नाम घेऊन पूर्ण ब्रम्हचा अनुभव घ्या.आचरण सत्याचे पाहिजे नाहीतर नुसते गोड बोलण्याच्या भारी पडू नका नाही तर तुम्हाला यमपुरी जावे लागेल.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भक्तीने ब्रम्हांड ठेंगणे करा जो पोट भरण्यासाठी हात पसरवितो त्याचे जिने हे धिक्कार कारक आहे.


अभंग क्र.९७७
गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥
तैसें जाणा ब्रम्हज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु.॥
रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥२॥
अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचेचि नाम ॥३॥
तुका म्हणे तारा । नाव तंबुऱ्याच्या सारा ॥४॥

अर्थ
खीर गोड असते कारण त्यात साखर असते.त्याचा प्रमाणे नुसते ब्रम्हज्ञान असून उपयोग नाही तर भक्तीही लागते.अन्नात जर मीठच नसेल तर ते अन्न रुचत नाही.आंधळ्याला जर शिकवले तर आपल्याला फक्त शब्दाचेच काय श्रम होतील ते होतील.तुकाराम महाराज म्हणतात तंबोऱ्याला सर्व तारा सर्व एका सुरात जुळलेले पाहिजे त्याप्रमाणे भक्तीतही प्रेमाची साथ पाहिजे.


अभंग क्र.९७८
नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥
हेचि शूरत्वाचे अंग । हारी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥
अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥
तुका म्हणे पाणी । पाताळपणे तळा आणि ॥३॥

अर्थ
नम्रता हा गुण ज्याने आपल्या हृदयात धरण केला त्याने या हरीला जो अंनत स्वरूप आहे आपल्या हृदयात त्याला कोंडून ठेवले.हरीला प्रेमाने जिंकणे हेच खरे शूरत्वाचे अंग आहे.ज्या प्रमाणे सर्व रुचकर भोजनाला मीठ हे कारण असते त्या प्रमाणे आपल्या हृदयातील नम्रतेमुळे हरी आपल्यला आधीन होतो.तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणेपाणी पातळ असल्यामुळे खोल तळला जाते तसेच नम्रता या गुण मुळे सखोल अश्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होत असते.


अभंग क्र.९७९
आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥१॥
तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥
गांवामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥
तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥३॥

अर्थ
परिसा या धातू मध्ये अशी काही नैसर्गिक शक्ती आहे कि ते लोखंडालाही सोने बनविते.त्याप्रमाणे हे पंढरीनाथा तू माझे गुण दोष, जाणता मला आपलेसे करून घ्यावे.माझे जीवन अमृत मय करावे.आहो देवा गावातील नदी ओढ्या नाले हे जेंव्हा गंगेला जाऊन मिळतात तेंव्हा गंगा त्यांना अमंगल मानीत नसते.तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा कस्तुरीचा सहवास केल्या मुळे मातीलाही सुगंध येतो.


अभंग क्र.९८०
तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण ॥१॥
ऐशीं ज्ञानाचे डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥
उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥२॥
रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्फीत ॥३॥

अभंग क्र.९८१
ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥
वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥
बोले वर्म जो चाले या विरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥
तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥

अर्थ
ब्रम्हचारी माणसाने वेदाचे अध्ययन करावे.व गृहस्ताश्रम स्वीकारल्यावर यजन, याजन, अध्यन, अध्यापन, दान आणि प्रतिगृह हि सहा कर्मे करावी.वानप्रस्थाश्रमा मध्ये माणसाने स्त्री पुरुष एकत्र जरी असले तरी त्यांनी वियोग धरून वागावे व जो संन्यास आश्रम मध्ये आहे त्याने सर्व संकल्पाचा त्याग करावा.परम हंस स्थितीत तो मनुष्य मुक्त असून त्याने धर्म कुल जात असे माणू नये.या वेदाच्या वर्मा नुसार चालावे व या विरहीत जो चालतो तो पापी समजावा असे श्रुती सांगते.तुकाराम महाराज म्हणतात वेदाने सांगितले तसेच वागावे व जो तसे वागत नाही त्याला कष्ट व दुखः होतात.


अभंग क्र.९८२
आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥१॥
आलें अयाचित अंगा । सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निंश्चिती ॥ध्रु.॥
दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंदी बंदाचि कौपीन । बहिरवास औटडें ॥२॥
काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ । धरूनि असों एकांत ॥३॥
कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें केली । स्वरूपीच वोळखी ॥४॥
नव्हे वेषधारी । तुका आहाच वरीवरी । आहे तैसीं बरीं । खंडें निवडि वेदांची ॥५॥

अर्थ
देह क्षेत्र जर मानले तर आम्ही त्यामधील संन्यासी आहोत व या देहात म्हणजे क्षेत्रात हृषिकेष भरलेला आहे व आम्ही आमच्या मनातून आशा व वासना बाहेर काढून टाकल्या आहे.आहो देणारा दाता हा पांडुरंग आहे असे आम्ही दृढ निश्चयाने सांगतो व त्यामुळे आम्ही आयाचित पणे राहत आहे.आम्ही या हृशिकेषाचा दंड धरण केला असून अज्ञानाचे मुळासहित मुंडण केले.व त्रीबंधाचे कौपिन घालून देह वृत्ती नाहीशी केली.आम्ही आमचे मूळ स्वरूप जाणून त्या ठिकाणी निश्चळ झालो आहे लौकिकाचा विटाळ धरून आम्ही एकांतात आलो आहोत.कार्‍यापुरते आम्ही कार्य करतो व आमची वाणी या हरीशी एकरूप झाली म्हणून आम्ही एकत्वाच्या नियमाने या हरीचे स्वरूप ओळखले.तुकाराम महाराज म्हणतात मी ढोंगी साधू प्रमाणे वेश धरण करणारा नाही तर वेदातील जे उपयोगी खंडे सूत्रे आहेत तेच निवडू मी तुम्हाला सांगत आहे.


अभंग क्र.९८३
निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥
कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांठवावा ॥ध्रु.॥
नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियदमी ॥२॥
तुका म्हणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥३॥

अर्थ
उदार निर्वाहापुर्तेच अन्न वस्त्र असावे व राहण्या साठी म्हणजे आश्रमाचे स्थान हे झोपडीत अथवा गुंफात असावी.चित्तात कसलेही बंधन नसावे हृदयात हा नारायण साठवावा.फार बोलू नये व फार लोकांन मध्ये नसावे.बुद्धी सावधान करून इंद्रियांचे दमन करावे.तुकाराम महाराज म्हणतात क्षणक्षणाणे हरी स्मरण करून त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन हरी प्राप्ती करून घ्यावी.


अभंग क्र.९८४
याचि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥१॥
मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥
बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥२॥
तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हे हित ॥३॥

अर्थ
अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवणे हा दोष होय.मनात जर शुभ संकल्प तयार केले तर पुण्य व अशुभ संकल्प निर्माण केले तर पाप होते या करिता मनात शुभ संकल्प मानत ठेवावे.जसे बीज असते त्याप्रमाणे चांगले वाईट फळ येते.तुकाराम महाराज म्हणतात आपले हृदय शुद्ध करावे यातच आपले हित आहे.


अभंग क्र.९८५
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥
धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥
न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥२॥
जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु जो भूतीं दयावंत ॥३॥
तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥४॥

अर्थ
फक्त कुशल वक्ता किंवा श्रोता तुम्ही होऊ नका तर चित्तात हरी विषयी दृढ भाव धरा.ज्याच्या अंगी कायम स्वरूपी ब्रम्ह स्वरूप ब्रम्हच असतो तो जगात धन्य आहे धन्य आहे.तू एक वेळेस तोंड धुऊ नको किंवा अंघोळी हि करू नकोस पण सदा सर्वकाळ रामनाम जप करीत जा.जो या भूतलावर प्राणी मात्रांवर दया दाखवितो त्याला जप तप ध्यान योग याची माहिती नसली तरी चालते.तुकाराम महाराज म्हणतात सर्व जाणून जो न जाणता असतो तो भक्तच देवाला स्वतःच्या प्राणा पेक्षा जास्त प्रिय असतो.


अभंग क्र.९८६
म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥
खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥
बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥
सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥३॥
तुका म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥

अर्थ
म्हातारपणी माणसाला सर्दी, पडसे, खोकला असे विविध प्रकारचे रोग जडतात व याच विचाराने तो मनुष्य म्हातारपणी आपल्या कपाळाला हात लावून विचार करत बसतो. त्याचे तोंड खोबर्‍याच्या वाटीप्रमाणे झालेले असते आणि नाकातून नेहमीच शेंबडाचा पूरच गळत असतो. त्याच्या मुखाद्वारे व्यवस्थित शब्दही बाहेर पडत नाही कारण त्याच्या कंठामध्ये खूप कफ साठलेला असतो आणि तो सारखा गडगड वाजत असतो. आणि त्याचे असे रूप बघून शेजारचे म्हणतात हा मेला मरेना का म्हणुन याने आम्हाला कंटाळा आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता त्यामुळेच तुम्ही सर्व काम बाजूला सारा आणि मुखाने क्षणाक्षणाला राम राम असे स्मरण करा.


अभंग क्र.९८७
बाळपणी ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥
विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडीं । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाळी धोंडी अंगबळें ॥३॥
तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥

अर्थ
बालपणी खेळता खेळता अनेक मित्रांना बरोबर वर्षे निघून जातात.विटी दांडू चेंडू लगोऱ्या चंपे कुरघोडी पेंडघडी ऐकी बेकी हमामा हुंबरी हुगल्याचीवारे मोठे भोवरे शिवाशिव सेल डेरा निसर भोवंडी हे सर्व खेळ तसेच मोठे धोंडी बळाने उचलणे अश्या प्रकारची अनेक प्रकरची खेळ तो खेळत असतो.तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक प्रकारचे खेळ खेळून बाळ पण जाते व मग सर्व गर्वाचे मूळ असलेले तारुण्य पण त्याला येत.


अभंग क्र.९८८
तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥
अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्‍हैसा जनामधीं ॥ध्रु.॥
हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥
श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥
तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥

अर्थ
तारुण्य लागले कि त्या तारुण्याच्या मदात मनुष्य कोणालाही मानत नाही सोडलेल्या वळू प्रमाणे आपल्या मस्तीत तो मुसमुसत असतो म्हणजे अहंकाराच्या मस्तीत तो मुसमुसत असतो.चापून चोपून डोक्याला पागोटे बांधून रेड्या प्रमाणे तो लोकांना मध्ये भरकटत असतो.हातात दीड पान घेतो आणि अभिमानेने वर तोंड करून चालतो मोठ्या माणसांस सन्मान देत नाही.असी माणसे कुत्र्या प्रमाणे दारोदार हिंडतात परनारी कडे पाप दृस्ठीने पाहतात.तुकाराम महाराज म्हणतात या अश्या माणसांची मोठी हानी होते कारण त्याचा जन्म इतरांची टवाळी करण्यात गेला.


अभंग क्र.९८९
काय माझें नेती वाईट म्हणोन । करूं समाधान काशासाठी ॥१॥
काय मज लोक नेतील परलोका । जातां कोणा एक निवारील ॥ध्रु.॥
न म्हणें कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥२॥
सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥३॥
तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥४॥

अर्थ
मी जर लोकांना वाईट म्हणू लागलो तर लोक माझे काय नेतील?म्हणून मी या लोकांचे समाधान कशा साठी करू.आणि समजा मी त्यांचे समाधान करू लागलो तर हे लोक मला परलोकी नेतील काय किंवा मी परलोकी चाललो तर मला थांबवतील काय?मी कोमालाही उत्तम किंवा वाईट म्हणणार नाही मग माझ्या मागे माझी कोणीही खुशाल निंदा करोत.माझा सर्व भार पांडुरंगावर आहे या जगाशी माझे काय काम?तुकाराम महाराज म्हणतात एक विठोबाचे नामसंकीर्तन हे च माझे सर्व साधन आहे.


अभंग क्र.९९०
काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥
सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥
याकारणें माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥२॥
तुका म्हणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तेंचि खरें ॥३॥

अर्थ
आपण ज्या वेळेस पांडुरंगाचे स्मरण करतो त्या वेळे पर्यंत काळाची सत्ता आपल्यावर चालत नाही.काळ हा सतत आयुष्याची गणना करत असतो जेवढा वेळ कथेत जातो त्या वेळेची गणना करण्याची त्याला आज्ञा नसते.म्हणूनच माझ्या या विठोबाची कीर्ती आकाश पृथ्वी पाताळ या ठिकाणी श्रेठ आहे.तुकाराम महाराज म्हणतात जन्माला आल्याचे फळ म्हणजे सदा सर्व काळ या हरीचे स्मरण करा.


अभंग क्र.९९१
घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥
लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥
काढावें आइतें । तेंचि जोडावें स्वहितें ॥२॥
तुका म्हणे कळे । अहाच झांकतील डोळे ॥३॥

अभंग क्र.९९२
नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥
म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥
नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥२॥
तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥

अर्थ
जो नालायक प्रत्येक्ष मात्रा गमान्य म्हणजे आईशी संबंध ठेवणारा असतो त्याच्याशी संबंध ठेऊ नये तसेच गुरूची निंदा करणाऱ्या शिष्याचे हरी भक्ताची निंदा करणाऱ्याचे तोंड पाहू नये.म्हणून एकांत धरणे केंव्हाही चांगले त्यामुळे आपल्याला भजनास व्यत्येय येत नाही.कधीही निंदकाची भेट होऊ नये कारण त्या चांडाळाच्या पोटी कपट असते.तुकाराम महाराज म्हणतात ज्याला पाहिल्यावर पाप वाढते अश्या माणसाशी कधी बोलू नये.


अभंग क्र.९९३
जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥१॥
आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥
शुद्ध नाहीं चित्त । परी म्हणवितों भक्त ॥२॥
मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझे तुका ॥३॥

अर्थ
हे हरी आम्ही जसे आहोत तसे तुम्हाला शरण आलो आहोत.हे हरी आता तुम्हीं पतितांना पावन करता हे ब्रीद तुमचे आहे ते खोटे होऊ देऊ नका.माझे चित्त जरी शुध्द नसले तरी मी मला तुमचा भक्त म्हणवितो.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या सारख्या गरिबाला कोण विचारीन म्हणून मी लोकांना मी तुझा भक्त आहे असे सांगतो.


अभंग क्र.९९४
नाशीवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥
नामेंचि तारिले कोटयान हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥
नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्ही मनीं आठवाना ॥२॥
तुका म्हणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाठी ॥३॥

अर्थ
हे लोकांनो आहो हा देह नाशिवंत आहे हे ओळखून तुम्हीं मुखाने हरीनाम का घेत नाही?नामामुळे आज पर्यंत अनेक कोट्यावधी लोक तरले गेले आहे या नामामुळे कित्येक लोकांना वैकुंठ प्राप्त झाले आहे.या त्रिभुवनात नामासारखे सार काश्यातही नाही हे तुम्हीं मनात का आठवत नाही?तुकाराम महाराज म्हणतात नाम हे वेद पेक्षा आगळे आहे ते या गोपालाने आपल्याला फुकट दिले आहे.


अभंग क्र.९९५
आळविती बाळें । मातेतें सुख आगळें ॥१॥
द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥
लेवूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥
आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥३॥
नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥४॥
तुका म्हणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥५॥

अर्थ
मुलांनी आई प्रेमाने आळविले कि त्या आईचे सुख हे वेगळे च असते.त्ती मुलांना आवडीने खाऊ घालते मग ते कवतुक पाहून समाधनी होते.मुलांना आवडीने अलंकार घालून मग दृष्टीनी मुलांना पाहून समाधाणी होते.आपल्या जागी बसून त्या विनंती करते बस रे बाबा मी तुला विनंती करते.मुलाला कुठल्याही प्रकारची दृष्ट लागू नये म्हणून त्या ला उचलून मिठी मारते.तुकाराम महाराज म्हणतात हे पद्मनाभा जशी ती आई सर्व लाड पुरवते कौतुक करते त्याप्रमाणे तू तसे आमच्याशी वागावे.


अभंग क्र.९९६
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये ॥१॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥२॥
व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाठी पाहे लाभ घात ॥३॥
तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥

अर्थ
जर कोणी तप तीर्थ व्रत दान आचरण करीत असेल तर त्याला त्या पासून परावृत्त करू नये.कारण हे सर्व साधन करणाऱ्याचे अनेक पूर्वज त्यांचा उद्धार व्हावा म्हणून वाट पाहत असतात व जे हे कोणी करत असेल त्याला कोणी परावृत्त करत असेल तर त्याला ब्रम्ह हत्येचे पाप लागते.आपल्याला आपल्या पापांपासून सुटका करून घेता येत नाही मग हे असले पाप केंव्हा दूर होणार म्हणून असे कर्म करणार्यांना साह्य करावे त्यांना कुठलेही भय घालू नये कारण असे केल्याने तुमचाही लाभ होईल व असे न केल्यास तुम्हाला फुकट त्रास होईल.तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही तुम्हाला सांगत आहे यातच तुमचे हित समजा व कोणतेही चांगले कर्म करणाऱ्यांना परावृत्त केले तर तुम्हांला दुख होईल हे मात्र नक्की.


अभंग क्र.९९७
देवासाठी जाणा तयासीच आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥
निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥
कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥
यागीं ऋण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घालावें एकावरी ॥४॥

अर्थ
ज्याच्या जवळ पुण्याची राशी असेल तोच हरी कर्मासाठी खटपट करतो.एखाद्या गरिबाला जर कोणी मदत करून वाराणसी काशीस पाठविले तर त्या यात्रेकारुचे पाठविनार्‍यास अर्धे पुण्य मिळते मग तो यात्रेकारुचे तेथे मेला तरी त्याचे पुण्या पाठविनार्‍यास अर्ध्ये पुण्य मिळते.कथेवेळी जर झोपानार्‍याची झोप मोडली तरी त्याचे पाप लागत नाही पण सुख अपर लागते.यज्ञासाठी जर कर्ज जर घेतले आणि ते बुडाले तर दुख मानून नये कारण त्या दोघानाही दोष लागेलच असे नाही.तुकाराम महाराज म्हणतात मी जे हे तुम्हाला दोष सांगितले आहे पाप पुण्याचे त्या प्रेमाने वागावे पापाचा नियम पुण्यावर व पुण्याचा नियम पापावर लादु नये.


अभंग क्र.९९८
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पावे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥
बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघेंचि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥
पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥
हस्ती परदळ जो भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयाच्या ॥३॥
पिटितां घणें वरी सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥
लीन दीन हेचि सार । भव उतरावया पार। बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥

अर्थ
अग्नीत जर सोने किंवा धातू पडले तर ते त्यात लीन होतात.म्हणून ते अंती तसेच राहुण शुध्द होतात पण त्याच ठिकाणी वस्त्र किंवा धागा अग्नीत पडला तर त्यांचा नाश होतो.त्या प्रमाणे बाह्य रंग हि खोटी असतात मिथ्या असतात गर्व व अज्ञान हे मिथ्या असते पण जीव गेला तरी अज्ञान त्याच्या बरोबर असते.पूर जर आला तर लव्हाळे नम्र होऊन तसेच राहतात पण वृक्ष उन्मळून पडतात.आहो हत्ती शत्रूंना मारतो पण त्याच्या पाया खाली एक छोटी मुंगीही मरत नाही म्हणून हत्तीच्या मागोमाग त्याच्याशी लढण्यासाठी कोण जाणार?हिरा घाना खाली फुटत नाही तो त्याच्या पोटात घुसतो मग गाराही तश्याच असतात पण त्या घानाच्या खाली टिकतात काय?तुकाराम महाराज म्हणतात लीन दिन होऊन राहावे तरच आपण भवसागर तरू शकतो पण जो ऐटीत राहतो तो या भवसागारातच वाहतो.


अभंग क्र.९९९
आम्ही वीर झुंझार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥
जाला हाहाकार । आले हांकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरुडटके पताका ॥२॥
तुका म्हणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हां आमुचा ॥३॥

अर्थ
आम्ही या हरीचे वीर शूर योद्धे आहोत या यमावर आम्ही वार करून त्याचे दात पाडू अनेक दोषांवर आम्ही हल्ला करून त्यांचा पराभव केलेला आहे.त्यामुळे हाहाकार झाला आहे व सर्व योद्धे एका ठिकाणी आले आहेत त्यांनी गळ्यात तुळशीचे हार आणि शख चक्र आदी मुद्रा धारण केले आहेत.त्या झुंजार शूर विराणी हातात राम नामांकित बाण धरला आहे कपाळाला गोपी चंदन लावला आहे व गरुड चिन्ह असलेले पताका त्यांच्या हातात झळकत आहे.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे आम्ही काळाला जिंकून आम्ही निश्चिंत झालो आहोत व आम्हाला आमचे संपूर्ण ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे.


अभंग क्र.१०००
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोला ॥ध्रु.॥
जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥
तुका म्हणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥

अर्थ
जो आशेने बांधलेला आहे तो जगाचाचा दास आहे व जो उदास असतो तो सर्व लोकांना पूज्य असतो.आहो या गोष्टी आपल्या हातील आहेत दुसऱ्यांनादोष देण्यात काय अर्थ ?ज्याच्या मध्ये ज्ञानी पणाचा अहंकार असतो त्याच्या मागे उपाधी लागतात आणि जो नेणता असतो त्याला केंव्हाही जेवायला बस म्हंटले तो केंव्हाही भोजनास तयार असतो.तुकाराम महाराज म्हणतात जो आशाने बद्ध व अहंकाराने मोठा असतो त्याच्या मागे काम क्रोध आदी चोर लागलेले असतात म्हणून त्याच्या पदरी मोठे भय असते.


सार्थ तुकाराम गाथा ९०१ ते १००० समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *