सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा १० (प)

संत तुकाराम गाथा १० अनुक्रमणिका नुसार

प पं

८३०
पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥
तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥
जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभासी ॥२॥
इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥


२४६३
पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें॥१॥
आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां ही ॥ध्रु.॥
कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥
कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरीली ॥३॥
किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥
तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥


१०२५
पट्टे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥
निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥
बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥


२२६६
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥
मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥
तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥


१६४३
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥
अवघें सम ब्रम्ह पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥
रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥
तुका म्हणे तोचि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥


१३२
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरीकथेविण ॥५॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळिचे अवघें मूळ तेथें ॥७॥


३३५२
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥१॥
शास्त्रही पुराणें गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥ध्रु.॥ कर्मअभिमानें वर्ण अभिमानें । नाडले ब्राम्हण कलियुगी ॥२॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भावं त्याचा पायीं विठोबाचे ॥३॥
अमृताची वाणी वरुशला शुध्द । करी त्या अशुद्ध ऐसा कोण ॥४॥
चहुं वेदांचे हें केले विवरण । अर्थहि गहन करूनियां ॥५॥
उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे । करुनी निराळे ठेविले ते ॥६॥
भक्ति ज्ञान आणि वैराग्य आगळा । ऐसा नाही डोळां देखियेला ॥७॥
जपतप यज्ञ लाजविली दाने । हरीनाम कीर्तनें करूनियां ॥८॥
मागें कवीश्वर झाले थोरथोर । नेले कलेवर कोणें सांगा ॥९॥
म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी । गेला तो विमानी बैसोनियां ॥१०॥


१६४२
पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥
काय करावें घोकिलें । वेदपाठ वांयां गेलें ॥ध्रु.॥
वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥
हा तेथींचा अनुभव । तुका देखे जीवीं शिव ॥३॥


२७७५
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥
चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥ध्रु.॥
लावूनियां दृष्टि घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥
तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥


२८४०
पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥
जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥
सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥
करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हणु लागती ॥३॥


३७७९
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।
मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं ।
कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥
मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग ।
पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥२॥
शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।
केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥


२६५२
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥
मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥ध्रु.॥
देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥२॥
तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥३॥


५२०
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥
होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥
इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥२॥
तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥३॥


१८५७
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥
न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥
सहज ते स्थिति । उपदेश परयुक्ती ॥२॥
तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥


३१७९
पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥
मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥
शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥
तुका म्हणे नाहीं वर्णा अभिमान । अवघेचि जीवन्मुक्त लोक ॥३॥


४०८५
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी ।
उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुम्हां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥
नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचे गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर ।
मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥
हरीनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी ।
जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥
आषाढी कार्तीकी हो गरुडटकयांचे भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर ।
पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥४॥
हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आम्हांलागिं हें सोपें ।
म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥५॥


८८
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥
आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥


१०४१
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥१॥
जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥
तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥


२२४१
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखीं नाम ॥२॥
नाम विठोबाचें घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ॥३॥


३१४२
पंढरीचें भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
भू खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥ध्रु.॥
तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥२॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥३॥


१०९४
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥
मूढ पापी जैसे तैसे। उतरी कासे लावूनि ॥२॥
तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥


१६५२
पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी ॥१॥
धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥२॥
अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥३॥


१०६९
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥
उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाई नारदासी गौरवीन ॥२॥
गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥
मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥
नागोजन मित्रा नरहरी सोनारा । रोहिदास कबिरा सोइऩिरया ॥६॥
परसो भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळांसी ॥७॥
चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥
जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबाई ॥९॥
आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥
आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥
तुका म्हणे माझा बिळया बापमाय । हर्षे नांदों सये घराचारी ॥१२॥


२१२१
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥
दुराचार्या मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ती पांडुरंग ॥ध्रु.॥
कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता॥३॥
माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥
केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥
तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥


२१६९
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥
अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥
ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां॥२॥
कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये॥३॥
मृगजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥
तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची॥५॥


७९०
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥
पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
उदिमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥
तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥


४९९
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥
तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥


१०९६
पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥
मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तोचित्तीं निवडेना ॥३॥


३०८४
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥


२४३
पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥
पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥
जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥
दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥
सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥
म्हणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥


२७७०
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥
या चि साठी दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥
कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥
तुका म्हणे आतां निश्चळि चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥


२०९
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥
विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥
सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥३॥


३९७३
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥२॥
अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों ॥३॥


१०५६
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥
तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥
ब्रम्हांडनायका । भक्तीजनाच्या पाळका ॥२॥
जीवांचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥३॥


१२८९
पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥
तारियेले भक्ती न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥
द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥
सुदामा ब्राम्हण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निदाऩळावें पांडुरंगा ॥५॥


३०६३
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं मन संभ्रम तो ॥२॥
तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥


१९६६
पतित मिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥
आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥
पावणांचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥२॥
वाव तुका म्हणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥


१६४१
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥
तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥२॥
तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥


१७७२
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥
सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥
शूरा उल्हास अंगीं । गांढया मरण ते प्रसंगीं ॥३॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥
तुका म्हणे तोचि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥


३२३२
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥
आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥
अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥
तुका म्हणे आम्ही काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥


५७६
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥३॥


५२५
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥
रुंधवूनि ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ध्रु.॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देही संतोष ॥२॥
तुका म्हणे क्षरभागीं । झालों जगीं व्यापक ॥३॥


३३६८
पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥
ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥
जोडोनियां करकमळ । नेत्री जळ भरोनि ॥२॥
तुका उभें दान पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥३॥


२०५०
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥
स्वहित कारण मानवेल जन । हरीकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥
तुका म्हणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥


२२०१
परउपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया॥१॥
याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडी॥ध्रु.॥
परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥
तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥३॥


११९५
परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥
न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥
पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केले ते निराळे द्विज देवा ॥३॥


२५४२
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥
ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥
सकळ आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥
तुका म्हणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥


११६९
परद्रव्य परनारी । अभिलासूनि नाक धरी ॥१॥
जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥
सोवळ्याची स्फीती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥२॥
तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥


१६५९
परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥
घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥
तुका म्हणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥


१५८०
परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥
दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥
अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥२॥
तुका म्हणे माझी एकविध सेवा । विन्मूख ते देवा वाळी चित्तें ॥३॥


३४४०
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥
संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥


१९७५
परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥
सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टी केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥
सकळ इंद्रियें जालीं ब्रम्हरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥
तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥


४०८४
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरी मेघश्यामा ।
अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥
जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥
गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना ।
मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥२॥
विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा ।
सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ती मनोहरा ॥३॥
गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी।
नंदा नंदनवंदना त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥४॥
सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता।
उत्पत्तिपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥५॥


१०३७
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥
तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥


२९१
परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥१॥
हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥
सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥
पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥४॥
योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥५॥
मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥६॥
तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥


१६३७
परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥
काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥
धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥
जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥
बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥


२८०२
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥
उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥
आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुम्हां ॥२॥
तुका म्हणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥


३६
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठी । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥


२४०
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥
जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥
न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे झाले ॥३॥


३२१९
परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥
चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥
तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां ॥३॥


३५७७
परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥
बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥
सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥२॥
बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥३॥
तुका म्हणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥४॥


३९
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥


१९८७
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं धवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मिविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥
एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥
एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥


१८१५
परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥
काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥
चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥
काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका म्हणे ॥४॥


२२२९
परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥
अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥
पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग॥२॥
तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें॥३॥


३२३१
परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥
आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥
ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥
माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥
वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥
उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥
भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥
सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ॥८॥
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥
सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥
सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥११॥
आतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं ॥ १२॥
मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥
तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥


१६७५
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥
जीतां भुक्ती मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥
तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥


३५६९
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥
जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥
नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥
तुका म्हणे नाहीं । काय शक्ती तुझे पायीं ॥३॥


१९४०
प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥
बीज तें चि फळ येईल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥
दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥
काउळें ढोंपरा कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥३॥
तुका म्हणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥४॥


१६०५
पवित्र तें अन्न । हरीचिंतनीं भोजन ॥१॥
येर वेठएा पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥
जेऊनि तो धाला । हरीचिंतनीं केला काला ॥२॥
तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें॥३॥


३२६७
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
वर्णअभिमानें कोण झाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥
अंत्यजादि योनि तरल्या हरीभजनें । तयाचीं पुराणें भाट झालीं ॥३॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥


काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरीचे पायीं ॥६॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥


१०४९
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥
तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥


४००६
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जेजेकार हरी हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥
या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।
ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥
अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें ।
म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥२॥
बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं ।
मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल काहाणी ॥३॥
ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार ॥४॥
जयासाटीं ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं जाले मासे ।
अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥५॥


४३
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥


१६६८
पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥
आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
गाईन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्याया ॥२॥
तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥


३६०५
पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥
जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥
तुका म्हणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींच ठावें आहे ॥३॥


९३२
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं विषयांचे ॥१॥
ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥
केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥२॥
तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥


२३२०
पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥
आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥
बैसायाची इच्छा कडे। चाली खडे रुपताती ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥


३१११
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥
प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥
सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर झाले तरी ॥३॥


३७९९
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥
बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥
जीवी आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥
झालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥


३२८०
पहिली माझी ओवी ओवीन जगन्न । गाईंन पवित्र पांडुरंग ॥१॥
दुसरी माझी ओवी दुजें नाही कोठें । जनी वनी भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥
तिसरी माझी ओवी तिला नाहीं ठाव । अवघाची देव जनीं वनीं ॥२॥
चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईन निधान पांडुरंग ॥३॥
पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईन निरंतरा पांडुरंग ॥४॥
साहावी माझी ओवीं साहाही आटली । गरुमूर्ती भेटली पांडुरंग ॥५॥
सातवी माझी ओवी आठवी वेळोवेळां । बैसलो डोळां पांडुरंग ॥६॥
आठवी माझी ओवी आठ्ठावीस युगें। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥
नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥८॥
दाहावी माझी ओवी दाहा अवतार । न यावें संसारा तुका म्हणे ॥९॥


३६९०
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें झाला नाड ॥१॥
धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥
आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥
तुका लागे घ्यारे पयां । कैं पावाल या ठाया ॥३॥


पा पां
३६३१
पाईक तो जाणे पाईकींचा भाव । लागबग ठाव चोरवाट ॥१॥
आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥२॥
ऐसें जन केलें पाईकें पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बिळया तो नाईक त्रैलोकींचा ॥४॥


३६३३
पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईक पाईकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाईका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥२॥
विश्वासावांचूनि पाईकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाईका जतन करी त्यासी ॥४॥


३६२९
पाईकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥
पाइकीवांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥
तरि व्हावें पाईक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥३॥
तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥४॥


३६३५
पाईकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥१॥
पाईक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥
एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईक तो पणें निवडला ॥२॥
करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाईका त्या नांव खरेपण ॥३॥
तुका म्हणे ठाव पाईकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥४॥


३६३२
पाईकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥
पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥
आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥२॥
सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥३॥
तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥४॥


३६३०
पाईकीचें सुख पाईकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटी ॥१॥
येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टि वरी ॥ध्रु.॥
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥
पाईकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥
तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥


४३८
पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥१॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥
न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥२॥
तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥३॥
तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥४॥


३९१९
पांगुळ झालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥
दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥
हिंडतां गव्हानें गा । शिणलों येरझारी । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।
कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥
या पोटाकारणें गा । झालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।
पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥
काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।
मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥
दुरोनि आलों मी गा । दुःख झालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं झालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥


२३१४
पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥
बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥
जाणे कळवळा । भावसिद्धींचा सोहळा ॥२॥
तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥३॥


२७५२
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकीं॥१॥
म्हणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥
कृपेच्या कटाक्षें निभें कळिकाळा । येतां येत बळाशक्तीपुढें ॥२॥
तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । होईल ते सोपें नाम तुझें ॥३॥


३७२
पाटीं पोटीं देव । कैचा हरीदासां भेव ॥१॥
करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥
एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥
तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥३॥


२६७७
पाठीलागे काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥
आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार देखिले तों ॥२॥
तुका म्हणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥३॥


२४२६
पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥
येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा ॥ध्रु.॥
पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥
तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥


२८९९
पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥
संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥
मोटचौफळ । अंतीं उच्छिष्टाचें बळ ॥२॥
न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग ॥३॥
आपुलिया सत्ता । चालविले नाहीं चिंता ॥४॥
कळवळिला तुका । जनाचार येथें नका ॥५॥


२२९७
पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥
आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥
नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥


२५३३
पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥
नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥
लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥
तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥


३९०९
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥
त्याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरीनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण झाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें झाली काया ॥५॥
या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥
तांतडी ते काय हरीगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणतयांनीं सांगितलें करा । अहंतेसी वारा आडूनियां ॥१२॥
यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरीकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥
नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हाचि माझा नेम हाचि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयजाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करीं दृढ चिता धरीं । तारील श्रीहरी मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची सदा आवडे जयासी । तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥
यावें विष्णुदासीं तरीच गर्भवासीं । उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥
वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तयां झाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥
विसरलीं तयां थोर झाली हाणी । पचविल्या खाणी चौऱ्यांशीसी ॥३८॥
शिकविता तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नाशिवंत ॥४०॥
तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकिराज्य ॥४२॥
जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तहान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥
नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥
कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥
विनवितां दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग देवा तयांसी नाहीं ॥४९॥
नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥
त्याची च उच्छिष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥
व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भक्त माता पिता ॥५३॥
तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्ति उत्तरें ऋषीचिया ॥५४॥
यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥
तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥
जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥
धांवे सवेतान्ही धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥
पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामराम ॥६०॥
रामराम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥
मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥
कोठें नका पाहों करा हरीकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥
सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥
नाहीं भक्ती भली केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥
तोचि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥
खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥
ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठके ॥७३॥
ठकला नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेले पोट अर्थ दंभासाठी । म्हणउनि तुटी देवासवें ॥७५॥
सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचें दर्शन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मा ॥७८॥
षडकर्मा हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥
देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्याच्या ॥८३॥
त्याच्या पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रम्हादिकां ॥८४॥
काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
मायबापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥
तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्वकाळीं ॥८८॥
सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥
सत्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तोचि एक ॥९४॥
एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥९५॥
आम्हांसी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करूं ॥९६॥
करूं हरीकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नासे ॥९७॥
नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥
राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आंता ॥१००॥


२०९२
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥
जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥
वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥
करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥
तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले । तुझे चि अंकिले पांडुरंगा ॥४॥


२६४८
पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥
बहुतां दिधला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥
याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥
तुका म्हणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥३॥


१८०२
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥१॥
कनवाळू कृपाळू भक्तंलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥ध्रु.॥
भक्तंच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥
उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥
कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माऊली ॥५॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखदेठ घेऊनि ॥६॥
कृपाळू माउली भुक्तीमुक्तीभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥


२३४९
पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥
पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥
अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥
तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना॥३॥


३२१४
पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥
आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥
कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्ही पातकी ही ॥२॥
याचें पावनपण सोडवा चि तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ॥३॥
आम्ही तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥
तुका म्हणे आम्ही मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥५॥


३२७२
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धीभेद ॥१॥
जीवशिवा शेज रचली आनंदें । आउटाविए पदीं आरोहण ॥२॥
निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥३॥


१०३४
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥
आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥२॥
पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षीं ॥३॥


२५८८
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥
शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥
अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥
तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥


३११४
पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ते ॥१॥
तमाखू ओढूनि काढिला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥
कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येईल जन्मा ॥२॥
जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥
जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥४॥


१०५०
पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरीदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥
तुका म्हणे मना जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥


१९३१
पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥
एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥
राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥२॥
तुका म्हणे आह्मी खेळतोयांमधीं । नाहीं केली बुद्धी स्थिर पाहों ॥३॥


९७४
पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें धाव घेती ॥१॥
कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥
स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥
तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥


३२२०
पापाचिया मुळें । झालें सत्याचें वाटोळें ॥१॥
दोष झाले बळिवंत । नाहीं ऐसी झाली नीत ॥ध्रु.॥
मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥२॥
तुका म्हणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं ॥३॥


११८६
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥
करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥
जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥
तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥


३०४७
पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥
ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥
वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥


१०४६
पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥
ऐशा विचाराने घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥
एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥
तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥


२००३
पायरवे अन्न । मग करी खेदक्षीण ॥१॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥
तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥


१८७०
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥
मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ती ॥ध्रु.॥
नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥
तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥३॥


११४६
पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥
तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥
काय उणें तुम्हां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥३॥


२६८३
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥
असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥
केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना ॥३॥


५९७
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥
न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरड्या ॥२॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥३॥


२६६५
पावतों ताडन । तरी हें मोकलिते जन ॥१॥
मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥
होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥२॥
तुका म्हणे मान । होतां उत्तम खंडन ॥३॥


४००३
पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥
तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष हारावया पीडा ॥२॥
तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥३॥



पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥
जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥


३०४१
पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥
पावलों पंढरी क्षेमआळींगनीं । संत या सज्जनीं निवविलो ॥२॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥
पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥


३४४९
पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥
बरवें संचित होतें तैसें झालें रें । आतां काय बोलों रे ॥२॥
सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥


३२०८
पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी समाधान ॥१॥
मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥
सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥२॥
तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥


३१३६
पावलों हा देह कागटाळी न्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥
आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥
अंधळ्याचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥२॥
तुका म्हणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥३॥


४३३
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥
तुका म्हणे तई । सिद्धी वोळगती पायीं ॥३॥


७००
पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥
भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥
न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥
तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥


३५२०
पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥१॥
करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥
द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥
तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥


२९७
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥
अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥
आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥
तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥


२१८४
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥
सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले॥ध्रु.॥
उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥
तुका म्हणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें॥३॥


३१४४
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥
सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥
ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥
पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥
चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥४॥
तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥५॥


३०२०
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥
अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येईल कळों ॥२॥
तुका म्हणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥


३८४६
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥
काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥
जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥
निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥
वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरीसवें ॥७॥
सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥
सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥
तिरीं माना घालूनियां उभ्या गाईं । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥
यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥


३७२६
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥
आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥


२३५२
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥
नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥
त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥
तुका म्हणे धीरें- । विण कैसें होतें बरें॥३॥


२१९६
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥
ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥
जाणिवेचें नेदी अंग । दिसे रंग निवडेना ॥२॥
तुका म्हणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥


५६८
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥
महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥


१४३६
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥
नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरी मना । केला तो उगाणा घडल्या महादोषांचा ॥३॥


१२९३
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥
तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥
दिसतो हा नोहे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाठी । होतां भेटी परतेना ॥२॥
म्हणोनि उभी ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका। जो या लोकां दाखवितो ॥३॥


२७४९
पाहातां हें बरवें झालें । कळों आलें यावरी ॥१॥
मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥ध्रु.॥
विसांवलें अंग दिसे । सरिसे सरिसे अनुभव ॥२॥
तुका म्हणे बरें झालें । देवें नेलें गवसूनि ॥३॥


३६९२
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥
म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥
त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥
सवें तुक्या मेला । त्याणें अगुणा आणिला ॥३॥


७४७
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥
वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥
बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥
तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥


२०७२
पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर ॥१॥
काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्हीं जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥
तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥


३७५३
पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथें लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥
जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥
न रिघतां ठाव आम्हा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपाल ॥२॥
तुका म्हणे हातां चडे जीवाचिये साठी । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥३॥


८९०
पाहा रे हें दैवत कैसें । भक्तीपिसें भाविक ॥१॥
पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥
शुष्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरी न धरी ॥२॥
तुका म्हणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं हा ॥३॥


३६६६
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥
ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।
केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥
थोर या युगाचें आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ ।
नाहीं ऐसी झाली नीत । हा हा भूत पातलें ॥३॥
शांति क्षमा दया । भावभक्ती सित्क्रया ।
ठाव नाहीं सांगावया । सत्त्वधैर्य भंगिलें ॥४॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।
म्हणवितां रामराम । महा श्रम मानिती॥५॥
थेर भोरप्याचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं ।
कथा पुराण म्हणतां सिसी । तिडीक उठी नक त्याची ॥६॥
विषयलोभासाठी । सवार्थेसीं प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठी । मागतां उठती सुनींसीं॥७॥
धनाढ्य देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्त्विक संपन्न ॥८॥
पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनांचिया दासी । सासा झाल्या आंदण्या ॥९॥
खोटें झालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी ।
भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥
नमस्कारावया हरीदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छाया॥११॥
बहुत पाप झलें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ।
अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासीचीं चुंबिती ।
सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥
मद्यपानाची शिराणी । नवनीता न पुसे कोणी ।
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
केवढी दोषाची सबळता। झाली पाहा हो भगवंता ।
पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥१६॥
भेणें मंद झाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि ।
देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
अपीक धान्यें दिवसें दिवसें। गाई ह्मैसी चेवल्या रसें ।
नगरें दिसती उदासें । पिकले बहुवसें पाखांडें ॥१८॥
होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें ।
जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥
अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराई विप्र ।
सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२०॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।
अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकांद्या करिती तयांची ।
आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥
मुख्य सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें ।
कुडीं कापटें महा मोहनें । मिरविताती दुर्जन ॥२३॥
कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं ।
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥
जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी ।
कामक्रोधें व्यापिले भारी। इच्छाकरीं न सुटती ॥२५॥
कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥२६॥
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन ।
याती अठरा चाऱ्ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥
पूर्वी होतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ झालें ।
ऐकत होतों ते देखिलें ।प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥
आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें ।
देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥
अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका ।
धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥


२५७२
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥
एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥
पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥
तुका म्हणे जे जे जाती । त्याची स्थिति तैशी ते ॥३॥


२७७४
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥ध्रु.॥
ठेवीयली खून करोनी संकेत । तया पाशी चित्त लागलेसे ॥२॥
जाणसी गे मते लेकरांचा लाड । नये पडो आड निष्ठुरता॥३॥
तुका म्हणे आम्हीं करावे वचन । तुम्हांसी जतन करणें तें ॥४॥


३६२१
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥
काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥ध्रु.॥
दरदरीट पाण्या। माजी रांधयेल्या कण्या ॥२॥
घरीं मोडकिया बाजा । वरी वाकळांच्या शेजा ॥३॥
मुखशुद्धि तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥४॥


३३९४
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥
नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥
पढोनियां वेद हरीगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥
तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरीच्या नामीं ॥३॥
यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥
तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥


२२३०
पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे॥१॥
मनिचें साच होईल कई । प्रमे देई भेटोनि ॥ध्रु॥
सर्वापरि पांगुळ असे । न कळे कैसे ते तुम्हा ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । तूं तो दाता दीनाचा ॥३॥


४०१०
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥
शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥
जालों एकसवा । तुम्हां आडुनियां देवा ॥२॥
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥३॥


१०४३
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥
करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥
सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥
तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥


१२९२
पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥
होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥
एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ती वाढे ॥२॥
तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥


२७०४
पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥
करितो पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥
जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥


३२४३
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥
बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥
सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥
तुका म्हणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥३॥


१९३४
पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा ह कळला साच भाव ॥१॥
नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठवितां सुख वाटे ॥ध्रु.॥ धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवास ॥२॥
तुका म्हणे लाभ झाला एक सरे आणिक दुसरे नाही आतां ॥३॥


२०९१
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥
आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥
नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥
तुका म्हणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥


२४२८
पाळोनियां मोठे केले । त्यासी बोले ओळखी ॥१॥
जवळोनि नवजे दुरी ।लाड करी कवतुक ॥ध्रु.॥ खून उभा विटेवर । काटींकर ठेउनियां ॥२॥
तुका म्हणे घातली वरी । झुली थोरी मोलाची ॥३॥


पि पिं
३२९०
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥ध्रु.॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥


२४५७
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥
पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥
खोलीं पडे ओली बीज। तरीं च हाता लागे निज ॥२॥
तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥


१४६०
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मपण सेवटींच्या ॥ध्रु.॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥
पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥३॥
आहे तैसी पूजा पावले सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥
तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार शेवटींचा ॥५॥


१६७७
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥
माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥
केलें कर्मांतर । बोंब मारिली हरीहर ॥२॥
तुका म्हणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥


३१४९
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥
नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र झाला ॥ध्रु.॥
पोहों नये कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥२॥
सिणलें तें गेलें सिणलियापासीं । झाली त्या दोघांसी एक गति ॥३॥
तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥४॥


२६०
पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥
शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥
कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥
तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥४॥


पु पुं
३३०३
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥
आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥
उभा कटीं ठेवुनि कर। न म्हणे पर बैससें ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥३॥


२५०९
पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥
पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥
एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती ॥२॥
पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि- ।- निषेधाची वसति ॥३॥
पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । न बुडे हे कल्पांतीं ॥४॥
अनुपम्य इची थोरी । महाक्षेत्र हें पंढरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥


५६२
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी। परवडी न लभों ॥२॥
तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥


१४२३
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥
केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥
आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥
तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥३॥


२०८८
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥
हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥
खेळतां विसरे भूक तहान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥
तुका म्हणे पाळी तोंदिचीया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥


८०५
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥
सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥
तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥



पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ध्रु.॥
अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥२॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥३॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥४॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥


१५९८
पुढें जाणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥
येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥
होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥२॥
तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥


३५६२
पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥
मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥
कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥२॥
तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आतां ॥३॥


३९१५
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥
एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥
मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥२॥
तुका म्हणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥३॥


१५३३
पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥
पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥
संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥


२२८३
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥
गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥
तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥


३१९६
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥
जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥
अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥२॥
जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥३॥
तुका म्हणें देह वाहिला विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥४॥


३२०४
पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥
आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदटलें पुढें । परब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥
आळिंगने संतांचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हे पाया । वरी त्यांच्या ठेवितो ॥२॥
तुका म्हणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥३॥


१८४
पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥
नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥
तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥३॥


७३१
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥
नागवला अल्प लोभाचिये साठी । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥
तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तोचि श्रोत्रीं ठेवी केली ॥३॥


२५०६
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥
आतां काशासाठी जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥
आइते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥
मानिली निंश्चिती । नरका जावया उभयतीं ॥३॥
झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥
तुका म्हणे बेटया । भांडवल न लगे खटया ॥५॥


३४५२
पत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥
तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरीगुण ॥ध्रु.॥
नादें लुब्ध झाला मृग । देह विसरला अंग ॥२॥
तुका म्हणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥३॥


६७२
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥


२०३७
पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥
अवघी निवारावी भूक। अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥
तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तनां ईश्वरें ॥३॥


३९७२
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥


२२७१
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥
मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥
जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥


३२७७
पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती ॥१॥
अगस्तीचे मुत्र मळ । लावूनी म्हणती कृष्णावळ ॥ध्रु.॥ श्रेष्ठ वर्ण ब्राम्हणाचा । संग न सुटे शुद्रीचा ॥२॥
बदराईच्या पदी दाढा । लगे तुकयाचा हुंदडा ॥३॥


८८८
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
भावें घ्या रे भावें घ्या रे । एकदा जा रे पंढरिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥
तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥


२१३३
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥
पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥
जळो ऐसी ब्रिदावळी। भाटबोळीपणाची ॥२॥
तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये हे॥३॥


२१९४
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥
अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥
इच्छेऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥
तुका करी नारायण । या या सेवन नामाचें॥३॥


३६७१
पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥ध्रु.॥
सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें जीवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥२॥
तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥३॥


२३२३
पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥
येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥
फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥
तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥


८३१
पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥
देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥
अवघियांचा विसर जाला। हा राहिला उद्योग ॥२॥
तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें॥३॥


पू पृ पे
३८६
पूजा पुज्यमान । कथे उभे हरीजन ॥१॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥
देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥
गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥
शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥४॥
तुका म्हणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥५॥


१९३
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥
हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥
तुका म्हणे माथा । पायीं माझा तुम्हां संतां ॥३॥


१५१
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥
सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥
संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥२॥
तुका म्हणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ तें ॥३॥


३३९
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥
हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥२॥
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥३॥


२०३२
पूर्वजांसी नरका । जाणें तें आइका ॥१॥
निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥
मात्रागमना ऐसी।जोडी पातकांची रासी ॥२॥
तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट॥३॥


३०३४
पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥
जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥
मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें प्रेम ऐसें ॥२॥
तुका म्हणे आम्हांसाठी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥


७३०
पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥
अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥
क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥
तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥


३२८६
पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥
तैसी माझ्या मना परी झाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥
कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥
तुका म्हणे झालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥


पै पो
३६४६
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥
अवघें लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥
तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेई आतां संबंधेसी तुटी ॥३॥


३७२७
पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥१॥
धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ध्रु.॥
अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥२॥
सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥३॥


३६१७
पैल आले हरी । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥
मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभिस्त ॥२॥
मेघश्यामवर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥३॥
चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥
तुका झालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥


१७२५
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥१॥
हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटयां वाय ॥ध्रु.॥
सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥
चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥३॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥
तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥


३६१९
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥
आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ॥ध्रु.॥
सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥२॥
उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥३॥
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥४॥


३३७९
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बीलीं साजिरीं मोरवीसें ।
हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥२॥
असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती तेहतीस कोटि तीन्ही ।
महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥३॥
कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवांची ।
जया चिंतितां अग्नी हा शांति नीवे। धरावा मानसीं आपल्या दृढभावे ॥४॥
मुनी देखतां मूख हें चित्त माये । देह मांडला भाव हा बापमाय ।
तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥५॥


१४१५
पोट आलें आतां जीवन आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥
काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवाचि ॥ध्रु.॥
वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वेचे ॥२॥
दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥
नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥
तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंदु एकसरें ॥५॥


२६३६
पोट धालें मग न लगे पंगती । झालिया निंश्चिती खेळ गोड ॥१॥
आपुलिया हातें देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥
घराचा विसर होईल आनंद । नाचेन मी छंदें प्रेमाचिया ॥२॥
तुका म्हणे तों चि वरी करकर । मग हें उत्तर खंडईल ॥३॥


२६५
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥
अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥
देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥
तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥३॥


८५४
पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥
कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥
प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका म्हणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥


३२९
पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥१॥
रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥२॥
तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥३॥


२१०५
पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥
तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥
ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥
तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥


प्र प्रा प्री प्रे
२५८९
प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥
अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥
देखोवेखीं वदे वाणी । पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥
तुका म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥


३६३८
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठी एकें जैसे तैसे ॥१॥
आगळें पाऊल आणिकांसी तारी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥
पाठीवरी घाय म्हणती फटमर । नीधडा अंग शूर मान पावे ॥२॥
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥
तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिद्धी पावे ॥४॥


२५३६
प्रथमभेटी आळिंगण । मन चरण वंदावे ॥१॥
ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥
न संगतां सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥
तुका म्हणे कृपावंतें । द्यावें भातें न मागतां ॥३॥


३१७०
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥
दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥
तुका म्हणे तया दोहींकडे धक्का । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥


१२७९
प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥
ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥
पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥
लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा ॥३॥


२०४२
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला॥१॥
न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥
अवघा त्याचा होय । जीव भावाही सहित ॥२॥
वदे उपचारे वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥
उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवे मागें॥४॥


३२७६
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥
ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोज । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥
ब्रम्हीं ब्रम्हरस सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥
स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥
अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥


१३५४
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥
तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥
बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥
हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥
जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥
कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥
तुका म्हणे दुसऱ्या भावें । छाया नावें न देखवे ॥६॥


३१८३
प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥
उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राम्हणीं वंदूं नये ॥ध्रु.॥
कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र म्हणोन घेऊं नये ॥२॥
यातिहीन झाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥३॥
भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥४॥


१५७०
प्राण समर्पीला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥१॥
माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥
जाला कंठस्फोट । जवळी पातलों निकट ॥२॥
तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥


३९५१
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हणे कां मुरारि ॥१॥
हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥
उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥
फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटीयज्ञांपरिस तुका म्हणे हें सार ॥३॥


२१३६
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥
धरितील ते तरतील मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥
निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥
तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥


३३३३
प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥१॥
अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
सत्वरजतमबाधा । नव्हे हरीभक्तांसि कदा ॥२॥
देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥३॥


९०८
प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावसे ॥१॥
करितां घायाळांचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥
आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥२॥
तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥


११६४
प्रारब्धेंचि जोडे धन । प्रारब्धेंचि वाडे मान ॥१॥
कासोस करिसी वांयां । भजे मना पंढरीराया ॥ध्रु.॥
प्रारब्धेंचि होय सुख । प्रारब्धेंचि पावे दुःख ॥२॥
प्रारब्धेंचि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥


२३९६
प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥
काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥
पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥२॥
बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥३॥


२२९०
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥
राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥
बत्तर खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥


५९१
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुह्मीं ॥१॥
न म्हणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥
न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥
तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खवळिलें ॥३॥


२८६४
प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥
बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥
वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥
जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥


२१६५
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥
काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सकळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥
सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें॥२॥
तुका म्हणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम।॥ ॥४॥


११७४
प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥१॥
तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥
वेडे वांकडे ते बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥
तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥


२८५९
प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ठुरता ॥१॥
जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥
काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥
तुका म्हणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥


१८९०
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥
प्रेमे यावें तया गांवा । चोजवी तया वैष्णवां ॥ध्रु.॥
प्रेमें पाठी लागे बळें। भक्त देखोनियां भोळे ॥२॥
प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥
तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां॥४॥


११५६
प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥
मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥ध्रु.॥
जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥२॥
हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥३॥


२७२९
प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥
कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥
पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥
बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥३॥
तुका म्हणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥४॥


४३२
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥
मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥
सत्ता सकळ तया हातीं। माझी कींव काकुलती ॥२॥
तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *