सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा ९ (ध, न)

संत तुकाराम गाथा ९ अनुक्रमणिका नुसार


३९६
धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥
सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥


२९९२
धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥
पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंड ॥ध्रु.॥
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवऱ्या सांगाती ॥२॥
तुका म्हणे राम । एक विसरतां श्रम ॥३॥


२४७१
धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥
प्रारब्धाचि गति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे॥ध्रु.॥
आणीक रोगांचीं नांवें सांगो किती । अखंड असती जडोनियां ॥२॥
तुका म्हणे नष्ट संचिताचे दान खाता पावे सुख नेंदी ॥३॥


१५८८
धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥१॥
होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥
रानीं वनीं द्वीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥२॥
तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥३॥


१२२७
धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥
जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥


३३७८
धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्ती नाहीं ॥१॥
पाहातां न दिसे शुद्ध निजमती । पुढें पडिलों इंद्रियां थोर घातीं । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥२॥
असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥३॥
निज देखतां निज हे दूरि जाये । नीज आळस दंभ या भीत आहे । तयां वस्ती देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥
करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ती दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥


२१०३
धनासीं च धन । करी आपणा जतन ॥१॥
तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥
जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥
तुका म्हणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥


३६३४
धनी ज्या पाईका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥
जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥ध्रु.॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥२॥
कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥३॥
तुका म्हणे तरि पाईकी च भली । थोडीबहु केली स्वामिसेवा ॥४॥


२४३२
धन वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥
ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥
अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त॥३॥


६२८
धन्य आजि दिन । झालें संताचें दर्शन ॥१॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥२॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥३॥


५१५
धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥
संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥
तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥३॥


१७५३
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥
धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥
तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥


३७४५
धन्य तें गोधने कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥
धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य झाल्या ॥ध्रु.॥
धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य झालें ॥२॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य झालें ॥३॥
धन्य म्हणे तुका जन्मा तींचि आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें ॥४॥


६३६
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥
लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥
मधुरा वाणी ओटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥३॥


२९०२
धन्य तो ग्राम जेथें हरीचेदास । धन्य तोचि वंश भक्तीभाग्य ॥१॥
ब्रम्हज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥
नाहीं पापा रिघ काळाचें खंडन । हरीनामकीर्त्तन घरोघरीं ॥२॥
तुका म्हणे तिहीं तारिलें सकळां । आपुल्या कोटिकुळासहित पै ॥३॥


४०९१
धन्य दिवस आजि दर्शन संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥
धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्ती दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥
धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥२॥
तुका म्हणे धन्य आम्हां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥


३०१३
धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥
धन्य झालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥
धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥२॥
धन्य आजि पंथें चालती पाउलें । टाळिया शोभले कर दोन्ही ॥३॥
धन्य तुका म्हणे आम्हांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥४॥


३०२४
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥
बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥ध्रु.॥
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥२॥
अवघा विठ्ठल तेथें दुजे नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥
तुका म्हणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥


१७५२
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥ध्रु.॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥२॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥३॥
विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥४॥
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नाश अहंकाराचा ॥५॥


२२५२
धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥
चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥
दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥
तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥


४३४
धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥१॥
पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथें भाव ॥ध्रु.॥
विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥२॥
तुका म्हणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥३॥


७८४
धन्ये शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥
ऐकिलें तोचि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥
कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥
तुका म्हणे भाव । ज्याचा तोचि जाणां देव ॥३॥


१७१७
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥
धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥
ब्रम्हरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥३॥


२६१५
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥
निजलिया जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥
एक वेवसाव । त्यांचा संग त्याचा जीव ॥२॥
हितें केळे हित । ग्वाही एक एकां चित्त ॥३॥
विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥४॥
तुका म्हणे बरीं । घरा येतील त्या परी ॥५॥


२६६६
धरावें ते भय । जाती अंतरोनि पाय ॥१॥
झाल्या तुटी देववास । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥
कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥२॥
तुका म्हणे असो । अथवा हें आतां नासो ॥३॥


२१२५
धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळा उदासा ॥१॥
म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥
आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥
तुका म्हणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥


८८३
धरितां पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥
वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥
नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥२॥
तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥


३५५१
धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥
तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥
प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥२॥
जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥३॥
तुका म्हणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥४॥


१६३१
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥१॥
तें हें ब्रम्ह विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर व्यापी बाहे । धांडोळितां कोठें नोहे ॥२॥
योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥३॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥
अवघी लीळा पाहे । तुका म्हणे दासां साहे ॥५॥


३९०३
धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरलें ॥१॥
उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥
दिनानाथब्रिदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥
ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥
बहु कासावीस झाला भक्तांसाटीं । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥


३७९५
धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें ।
एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें या अवघड रानें रे ॥१॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं ।
सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥
सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी ।
होतें अंतर तई सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥२॥
कैसी भागली हे करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां ।
स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥


२५०४
धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तेचि दिसती ॥१॥
आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥
घेईन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥
तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥


३८९३
धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोघे एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबाप ॥३॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥
कोण जाणे याचे अंतरींचा भाव । तुका म्हणे माव कळों नेदी ॥५॥


१६९४
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥
काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥
अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥
रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥
सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥
तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥


१४४०
धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥
पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥
नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईन ॥२॥
तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥३॥


३०२२
धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी नेई ॥१॥
उत्कंठा हे आजी झाली माझे पोटीं । मागीलया गोठी टाळाटाळि ॥ध्रु.॥
माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥२॥
तुका म्हणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं माझा ॥३॥


१४१०
धरूनियां सोई परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥१॥
येई पांडुरंगे नेई सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥
बुद्धि जाली साह्य परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥
न चलती पाय गिळत जाली काया । म्हणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥
दिशेच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वाट पाहें ॥४॥
तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥


२८२७
धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥
संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥
पायांवरी ठेविन भाळ । येणें समुळ पावलो ॥२॥
तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥


१५७४
धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥
जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥
भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥
वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरीहरा ॥३॥
कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥
तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥


२१५६
धर्म तो न कळे । काय झांकिलये डोळे ॥१॥
जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥
विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥२॥
तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥


३०३७
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥
अंबॠषीसाठी जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥
धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥
तुका म्हणे तुज वर्णिती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥


१३७
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥
वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥
न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥२॥
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥


१३
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥
मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥
जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥


२०७६
धर्माचे पाळण । करणें पाखांड खंडण ॥१॥
हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥
तिक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥
नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर॥३॥


३३०८
धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥१॥
लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पाही पसारा ॥ध्रु.॥
खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥२॥
तुका म्हणे जिवें साठी ॥ पडिली मिठी धुरेसी ॥३॥


धा धां
११८
धाकुटयाच्या मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥
ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥
दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥


३६९१
धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥
ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥
खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥
तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥


१७८९
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥१॥
क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरीसवें ॥ध्रु.॥
अवघे खेळों अवघ्यामधीं । डाई न पडों ऐसी बुद्धि ॥२॥
तुका म्हणे वांचवीत । आम्हां सत्ता समर्थ ॥३॥


३७६६
धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण ही काई ॥१॥
आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ध्रु.॥
मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥२॥
तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥३॥


४८६
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥
धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥
करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥
तुका म्हणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥३॥


२३४८
धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा॥१॥
बहु जालों कासावीस । म्हणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥
पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥२॥
असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥
न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर॥४॥
तुका म्हणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥५॥


३३२३
धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥१॥
वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकुरा ॥ध्रु.॥
उशीर तो आतां । न करावा हेचि चिंता ॥२॥
तुका म्हणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥३॥


१४८६
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥
न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥


७१५
धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥
घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥
धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥
तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥


धि धी धे धों
१८६८
धांवे माते सोई । बाळ न विचारितां कांहीं ॥१॥
मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥
नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥२॥
तीविने तें नेणें । आणीक कांहीं तुका म्हणे ॥३॥


४९४
धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥१॥
ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥
देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥२॥
तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥


१६४
धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥
धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥


८०४
धीर तो कारण साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥१॥
सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन आपण चि कळिकाळा ॥ध्रु.॥
जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥२॥
हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥३॥


१९४१
धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥१॥
चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥
सूर्यविकासीनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥२॥
धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥३॥
तुका म्हणे नेम प्राणांसवेंसाटी । तरीच या गोष्टी विठोबाची ॥४॥


१४४८
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥
याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥
तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥


१०६०
धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥१॥
तैसें करीं वो माझे आई । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥
न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥
तुका म्हणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥


२६१७
धोंड्यासवें आदिळतां फुटे डोकें । तों तों त्याच्या दुःखें घामेजेना ॥१॥
इंगळासी सन्निधान अतित्याई । क्षेम देतां काई सुख वाटे ॥ध्रु.॥
सप्रेमे कुरवाळी महाफणी व्याळ । आपुले तो ढाळ सांडी केवी ॥२॥
तुका म्हणे आम्हांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥३॥


ध्या
२२६
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम जिव्हामुखें ॥१॥
पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं मनीं ॥ध्रु.॥
तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥
करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥
तुका म्हणे जीव ठेविन मी पायीं । आणीक ते काई देऊं कवणा ॥४॥


५५१
ध्याई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥
अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥
साधनाची सिद्धी । मौन करा स्थिर बुद्धी ॥४॥
तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रम्हवृंदें ॥५॥


३१५७
ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥
तेथें बोला कैची उरी । माझें मीपण झाला हरी ॥ध्रु.॥
चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरीरूप अवघी सृष्टि ॥२॥
तुका म्हणे सांगों काय । एकाएकीं हरीवृत्तिमय ॥३॥


२१२
ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥१॥
तहान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥
कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥२॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥३॥


१२२४
न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥१॥
जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥
आठही प्रहर । बारा मास निरंतर ॥३॥
तुका म्हणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥४॥


५२२
न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥
दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥
येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥२॥
खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥३॥
शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥४॥
तुका म्हणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥


२६११
न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥१॥
दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥
न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥२॥
न धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥३॥


६५८
न करावी स्तुति माझी संतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥१॥
भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥


२४६१
न करि त्याचें गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥१॥
भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥
याचे सोई पाउल वेचे । मग कैचे अडथळे ॥२॥
तुका म्हणे खरें खोटें । न म्हणे मोटें लहान ॥३॥


१४६९
न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥
मायबाप बंधुजन। तूं चि सोयरा सज्जन ॥२॥
तुका म्हणे तुजविरहित । माझें कोण करील हित ॥३॥


८०९
न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥
अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ध्रु.॥
आणिकिया जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥
आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥३॥
तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥


१५०२
न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।
बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥
आणीक काय तुम्हां काम । आम्हां नेदा तरी प्रेम ।
कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥
आह्मीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें ।
संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥
एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी ।
जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥
रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता ।
होईन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥
ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा ।
तुका म्हणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥


३३०२
न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥
सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥
न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईन तेथें दाटी वैष्णवांची ॥२॥
अनु नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥३॥
उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण म्हणें नारायण ॥४॥
आणिकांची सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका म्हणे आणु दुजें काहीं ॥५॥


२७३७
न करीं रे मना कांहीं च कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥१॥
येथें सुखाचिया अमुपची रासी । पुढें कल्पनेसी ठाव नाहीं ॥ध्रु.॥
सुखाचें ओचिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें होईल विसांवा । तुटतील धावां पुढिलिया ॥३॥


८७
न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥
या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥


५०२
न कळ तो काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कई कासयाने ॥ध्रु.॥
साच भावें तुझें चिंतन मानसी । राहे हें करिसी कैं गा देवा ॥२॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥३॥
तुका म्हणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥


२०६७
न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥
जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥
आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥
काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥
तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥


२९८७
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥
न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥
तुका म्हणे तुझा नाहीं अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥


२८२९
न कळे जी भक्ती काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥
जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ध्रु.॥
दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥२॥
तुका म्हणे झालों आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥


२४१७
न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥१॥
आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥
कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥२॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥३॥
मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥४॥
तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥५॥


१०९७
न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥


३०३२
न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥
द्रव्यइच्छेसाठी करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥
पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥३॥
तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥४॥


३९४५
न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥१॥
कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक हरी सकळ वो ॥ध्रु.॥
हनुमंता भेटी गर्व हरीला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥
द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥३॥
अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥४॥
भावभक्ती सत्त्वगुण झाला दुर्जना । तुका म्हणे सकळां छंदें खेळे आपण ॥५॥


३७७८
नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहावे बहु होतो उबारा । मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा ॥१॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥ध्रु.॥
नये कळों नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत । एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होईल नेणों भाग्य उदित वो ॥२॥
स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन । अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आलें जीवन वो ॥३॥


८१६
नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥


२४६०
नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथें पाहिजे साचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ध्रु.॥
वर कोणी मानी रसाळ बोलणें । नाही झाली मने ओळखितो ॥२॥
निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥३॥
तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम॥४॥


२०७९
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥
येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥ध्रु.॥
नाहीं केली निंदा । आह्मीं दुसिलेंसे भेदा ॥२॥
तुका म्हणे मज । येणें विण काय काज॥३॥


३३१३
नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥१॥
आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥
येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥
मागे आजिवरी । झालें माप नेलें चोरी॥३॥
सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकने ॥४॥
पडों नेदी तुका । आड गुंफूं कांहीं चुका ॥५॥


४५४
नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥२॥
तुका म्हणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥३॥


२३००
नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥
जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥
वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥


३७५८
नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥
न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥२॥
तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणों ॥३॥


१६८९
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥
राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥
जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥४॥
तुका म्हणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥५॥


३३८९
नको कांहीं पडों ग्रंथाचिये भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥ध्रु.॥
साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरी ॥४॥
तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥


२८६०
नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥१॥
जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥
उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥
तुका म्हणे पाहों । होईल तें निवांत साहों ॥३॥


२०४७
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥
तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें॥३॥
तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥
काय करूं एका। मुखें सांग म्हणे तुका ॥५॥


११७७
नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥
नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥
तुका म्हणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरी येईल वाचे ॥३॥


१५९७
नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥
सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥


१७३६
नको बोलों भांडा । खीळ घालून बैस तोंडा ॥१॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥
प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥
तुका म्हणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥


२२७८
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥१॥
दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥
पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥२॥
पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥
तुका म्हणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥४॥


२६०७
नको मज ताठा नको अभिमान । तुजवीण क्षीण होतो जीवा ॥१॥
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥२॥
तुका म्हणे तुझें झालिया दर्षण । मग निवारण होईल सर्व ॥३॥


१३४९
नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥
कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥
काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥
लांचावल्यासाठी वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥
वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥
तुका म्हणे माझी येथें चि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥


८७०
नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥
मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥
नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥
तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥


४५५
नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथें होते अनिवार । जिव्हाळ्यां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥
उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥
तुका म्हणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥३॥


२१०९
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि न बोलवें ॥१॥
रुचिविण काय शब्द वाऱ्या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥
आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें॥२॥
तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥


३१८८
न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥१॥
कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥
वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥२॥
तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥३॥


३९५२
न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥
न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुम्ही सकळहि म्हणा ॥ध्रु.॥
राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौऱ्यांशी ॥२॥
मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥३॥


३९३५
नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥
काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥
दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥२॥
नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये ॥३॥
कहे तुका उस असाके संग फिरफिर गोते खाये ॥४॥


२८०
नटनाट्य अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूपा । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥


८७६
नटनाटय तुम्ही केलें याच साठी । कवतुकें दृष्टी निववावी ॥१॥
नाहीं तरि काय कळलें चि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥
अभेद चि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥
तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥३॥


२७४
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥
काय तुम्ही येथें नसालसें झालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥
परचक्र कोठें हरीदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें झालें ॥३॥


३६२८
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥१॥
कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥
वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनीं ॥२॥
तुका म्हणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥३॥


३४२७
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरी चित्तीं ॥१॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥


१२५
न देखोनि कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥१॥
झालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥
न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥२॥
खादलें न खातां । रसना रस झाली घेतां ॥३॥
न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥४॥
नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥५॥


२६२५
न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । म्हणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥
सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥
कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥
तुका म्हणे हित तों म्हणा विठ्ठल । न म्हणेल तो भोगील कळेल तें ॥३॥


२९५३
न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥१॥
करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाच्या ॥ध्रु.॥
आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन झालों ॥२॥
तुका म्हणे लावूं मुळी । जीवकुळी थारेसी ॥३॥


२९२५
न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥१॥
आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥
बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥२॥
तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतों ॥३॥


४०३५
न पवे सन्निध वाटते चिंता । वरी या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बिळवंता सांपडलों ॥१॥
बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघड्या नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥
तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥२॥
अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥३॥
होईल संचिताची सत्ता। अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां। बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥
ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥


१९१२
न पालटे एक । भक्त भोळाचि भाविक ॥१॥
येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥
नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ॥२॥
तुका म्हणे खरें । नाम विठोबाचे बरें ॥३॥


२५१३
न पालटे जाती जीवाचिये साठी । वाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥
अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥
घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥
तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥


१३३४
न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥
सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥
सावधान चित्त होईल आधारें । खेळतां ही बरें वाटईल ॥२॥
तुका म्हणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥३॥


९६६
न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं या केशवाविण दुजें ॥१॥
काय उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु.॥
आणिकाची कीर्ती नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥२॥
न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें कोठें ॥३॥
न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥४॥
तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥५॥


३५५८
न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥
ऐसे जाले बहुत दिस । जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥
नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥
तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥३॥


३४४६
न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज साडियेली ॥१॥
आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥


४०२९
न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा। तुज मी घालीत नाहीं गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥
दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ती टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥
म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥
तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं म्हणे तुका म्हणे ॥५॥


२३८६
न बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥१॥
कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥
संसारा हातीं सोडवूनि गळा । कां हे अवकळा येती पुढें ॥२॥
तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥३॥


१८७२
न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥
लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥
निलाजिरीं आह्मी करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥
कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥३॥
तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥


९०७
न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥
एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥
संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सवेचि ॥२॥
तुका म्हणे नारायणीं । पावो वाणी विसावां ॥३॥


१३७६
नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥
कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपणा ॥२॥
तुका म्हणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥३॥


८२२
न मनावे तैसे गुरूचे वचन । जेणें नारायण अंतरे ते ।
आड आला म्हणूनि फोडियेला डोळा । बळिनें आंधळा शुक्र केला ॥१॥
करी देव तरी काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥
उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या ।
अवघे चि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥
पितयासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला ।
बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥३॥
गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती ।
तया दिले ते कोणासी नाही । अवघा अंतर्बाही तोचि जाला ॥४॥
देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें ।
तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिलें॥५॥


१७८५
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥१॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥ध्रु.॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाई ॥२॥
तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥


११४१
न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥ध्रु.॥
न मनीं ते योगी न मनी ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥


१०८२
नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥१॥
परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥
द्वैतांद्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥२॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥३॥
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥


३७८
न मानावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥
ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥
माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥
सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥


११४८
नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥१॥
कृपेचा वोरस न समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥
तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥
परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥
तुका म्हणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥४॥


३४८६
नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥
गुणअवगुण निवाडा । ह्मैस ह्मैस रेडा रेडा ॥ध्रु.॥
जनीं जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥
तुका म्हणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥


॥८॥ ३२४५
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईंल न कळे काय ॥ध्रु.॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥
भल्या बुऱ्या मारी । होतां कणी न विचारी ॥४॥
अविचाऱ्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥
तुका म्हणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥


२५९
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥
विटंबो शरीर होत कां विपत्ती । परि राहो चित्तीं नारायण ॥२॥
तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥३॥


३०७०
नमोनमो तुज माझें हें कारणे । काय झालें उणें करितां स्नान ॥१॥
संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥
न करिसी तरि हेंचि कोडें मज । भक्ती गोड काज आणीक नाहीं ॥२॥
करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥
महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥
तुका म्हणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥


७९६
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥
तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥३॥
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥


९७८
नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥
हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥
अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥
तुका म्हणे पाणी । पाताळपणे तळा आणि ॥३॥


१८९७
न म्हणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥
सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥
न म्हणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥२॥
तुका म्हणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥३॥


८२६
नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥
देहाच्या निग्रही त्याचा तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ध्रु.॥
आपुलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥
तुका म्हणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥३॥


२७३२
नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥१॥
अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥
धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥२॥
तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुम्ही ॥३॥


३६१
नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥१॥
म्हणविल्या दास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥
समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥२॥
तुका म्हणे सत्ता । वरी असते बहुतां ॥३॥



नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥
तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥


५७
न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥
तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥
न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥


९९२
नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥
म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥
नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥२॥
तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥


१७९४
नये पुसों आज्ञा केली एकसरें । आम्हांसी दुसरें आतां नाहीं ॥१॥
ज्याचें तो बळिवंत सर्व निवारिता । आम्हां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥
बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥२॥
तुका म्हणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥३॥


३००६
नये माझा तुम्हां होऊं शब्दस्पर्श । विप्रवृंदा तुम्हां ब्राम्हणांसी ॥१॥
म्हणोनियां तुम्हां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥
वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥


११८०
नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥१॥
पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावी दिवसराती ॥ध्रु.॥
नये काकुळती । कोणा यावें हरीभक्ती ॥२॥
तुका म्हणे साई । करील कृपेची विठाई॥३॥


१३९०
नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥
नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥
पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥२॥
तुका म्हणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥३॥


२१२३
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि॥१॥
ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥
कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥
तुका म्हणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥


३१८१
नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥१॥
न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥
असावें म्यां सदा विषयीं विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥२॥
करोनियां साह्य पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका म्हणे ॥३॥


१४२८
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥१॥
ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥
पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥२॥
भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥३॥
देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥४॥
तुका म्हणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥५॥


३४४५
न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥
मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥
तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती झाली आतां ॥३॥


१९१४
न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी । जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥१॥
भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥
जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी । म्हणतां वाचे हरी । राम कृष्ण गोविंदा ॥२॥
चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं । करूनियां साटी । चित्त प्रेम दोहींची ॥३॥
जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥४॥
ऐसा भक्तांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं । नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥५॥


३०८०
न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां ॥१॥
म्हणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥
काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे तुज भेटल्यावांचूनि । न राहे त्याहून होइन वेडा ॥३॥


३३२८
न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हूण ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥


३२०७
न लगे देवा तुझें आम्हांसी वैकुंठ । सायुज्याचा पट्ट न लगे मज ॥१॥
देई तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥
नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥
सद्धि मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें ॥३॥
तुका म्हणे हरी देई तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥४॥


९१८
न लगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥
येतो बैसलिया ठाया । आसणें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरें चि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥२॥
घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव। तुका म्हणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥३॥


१२३४
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥
तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥


२०६२
न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥
नाहीं वेळ काळ पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥
पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥
आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही आनंदेंचि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥


४१८
न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥१॥
माझ्या उपकारासाटीं । वागविला म्हणु कंठीं ॥ध्रु.॥
घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥
तुका म्हणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥३॥


८४७
न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥
मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे माथा ॥ध्रु.॥
गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥
खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥
त्याच्या दुःखेंपणें आपणा खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥
तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥


२४८
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥
जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥२॥
तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥३॥


३३१६
न लाहिजे जपें न लाहिजे तपें । आम्हांसी हें सोपें गीतीं गातां ॥१॥
न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरी ॥ध्रु.॥
जयासी नाहीं रूप आणि आकार । तोचि कटी कर उभा विटे ॥२॥
अनंत ब्रम्हांडें जयाचिया पोटीं । तो आम्हां संपुष्टीं भक्तीभावें ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥४॥


२०७३
न वजातां घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥
कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥
नाहीं आम्ही खात। कांहीं कोणाचें लागत ॥२॥
कळे तैसी सेवा । तुका म्हणे करूं देवा ॥३॥


१५१७
न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥
म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥
मोकळें हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥
तुका म्हणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥३॥


२२८४
न वजे वांयां कांहीं ऐकतां हरीकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥
न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥
न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥२॥
न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥३॥
तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥४॥


४०५
नवां नवसांचीं । जालों तुह्मासी वाणीचीं ॥१॥
कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥
कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥३॥


१२२८
न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥
केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥
करावें लाताळें। ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥
न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥३॥


३६२
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥१॥
म्हणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥
नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥२॥
तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥३॥


२१४०
न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥
आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥
संनिधा चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥
आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे॥३॥


२९६
न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥१॥
भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥
पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥२॥
तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥


२३७०
नसतां अधिकार उपदेशासी बलात्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥
धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥
नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचारअनुभव॥२॥
उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥


१५०८
नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥
जालों तेव्हां कळलें जागा । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥
गंवसिलों पुढें मागें । लागलागे पावला ॥२॥
तुका म्हणे केली आयणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥


१३०१
नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥
हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥
वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥३॥


३०११
न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
सद्धि महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥
पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥
तुका म्हणे येथें होतों मी दुबळा । आलें या कपाळा थोडें बहु ॥३॥


१५३७
न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥१॥
भरीत्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥
कारणा पुरता । लाहो आपुलाल्या हिता ॥२॥
तुका म्हणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥३॥


३४७७
न संगतां तुम्हां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरीतां आवडी । अवसान ते घडी पुरों एकी देत नाहीं ॥ध्रु.॥
काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईपासूनिया समर्थे ॥२॥
तुका म्हणे अवघी आवरीली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥


८७२
न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥
उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥
शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥२॥
तुका म्हणे सीण । होईल अनुभवाविण ॥३॥


१३५५
न संडावा आतां ऐसा वाटे ठाव । भयासी उपाव रक्षणाचा ॥१॥
म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियाकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥
नाना वी उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥२॥
तुका म्हणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥३॥


१७६८
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥
होवा वाटे जना । तुका म्हणे साटीं गुणां ॥३॥


३६०
नसे तरी मनी नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥
दंभिस्फोट भलत्या भावें । मज हरीजन म्हणावें ॥२॥
तुका म्हणे काळांतरी । मज सांभाळील हरी ॥३॥


३४४७
न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥
भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥
शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥
तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥


२३३६
नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥
सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥
चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांच पडे ॥२॥
विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥३॥
आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥
तुका म्हणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥५॥


३९६७
नहो नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥१॥
चाल रघुरामा ने आपल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥
बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥३॥


१५१२
नहोय निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥१॥
तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान भिन्न असों द्यावा ॥ध्रु.॥
नाहीं विटाळिलें काया वाचा मन । संकल्पाणे भिन्न आशेचि या ॥२॥
तुका म्हणे भवसागरीं उतार । करावया आधार इच्छीतसें ॥३॥


१९९०
न म्हणे कवणां सिद्ध साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥
ऐसें माझे बुद्धी काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥
गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥
देई चरणसेवा भूतांचें भजन । वर्ण अभिमान सांडवूनि ॥३॥
आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥
तुका म्हणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देई प्रेम देवा ॥५॥


२४९५
नव्हता भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥
अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥
चिंतनांचें मूळ चित्त । नेलें वित्त हरूनि ॥२॥
तुका म्हणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥


९१५
नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥१॥
देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें ॥ध्रु.॥
लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥२॥
तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥३॥


३५३७
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुम्हां आकांत ॥१॥
वांटलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥
जीव घेती मायबापें थोड्या अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥२॥
तुका म्हणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता। काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥३॥


२२२१
नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथें नाहीं वेश सरत आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥
नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रवार्णाशी ॥२॥
नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥
नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥
तुका म्हणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥


१४७४
नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥१॥
निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥
निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥२॥
आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥३॥
तुका म्हणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥४॥


५८६
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥
कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥
ज्याचें तोचि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥


२३३७
नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥१॥
शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥
अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥२॥
तुका म्हणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥३॥


२८७५
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥
पाहिजे तें आलें रुची । काचाकुची काशाची ॥२॥
तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥


२६९७
नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥१॥
तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥
आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥२॥
तुका म्हणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥३॥


१९८
नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥
पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥
लटिक्याचे पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥
तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥३॥


२६८०
नव्हावा तो बरा मुळीं च संबंध । विश्वासिकां वध बोलिलासे ॥१॥
आतां माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥ नाहीं भाव परी म्हणवितों दास । नको देऊं यास उणेंयेऊं ॥२॥
तुका म्हणे कां हो उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा ॥३॥


२१३
न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥१॥
बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥
कोठवरी जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥२॥
बुडले तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥३॥
पुढें उल्लंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥४॥
तुका म्हणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥५॥


१९६५
न व्हावें तें जालें । तुम्हां आम्हांसी लागलें ॥१॥
आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥
पाटोळ्यासंवसाटी । दिली रगटयाची गांठी ॥२॥
तुका म्हणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥


४७
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥


६३३
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥
पंढरीसि जावें उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥
तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाठी ॥३॥


१८२४
नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥
म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥
शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥
तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥


९६७
नव्हे खळवादी मताचि पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥
साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥
नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रम्हांडापुरता घेईल त्यासी ॥२॥
तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥३॥


८२५
नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥
म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥
कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥
न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे। विठ्ठलनामें आटलें ॥३॥


२२६५
नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥१॥
बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥
रंडी चंडी शक्ती । मद्यमांस भिक्षती ॥२॥
बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥
गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥
मुंज्या ह्मैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥
वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥
तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती॥७॥


३५४३
नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥
कोपोनियां तरी देईल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥ध्रु.॥
नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥२॥
तुका म्हणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥


२३९३
नव्हे परी म्हणवी दास । कांही निमित्तास मूळ केलें ॥१॥
तुमचा तो धर्मं कोण । हा आपण विचार ॥ध्रु.॥
नाही शुद्ध आचरण । परी चरण चिंतितो ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे कां गा नेणा हे ॥३॥


८६९
नव्हे ब्रम्हचर्य बाइलेंच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडारे तें धीरें आचावाचे ॥ध्रु.॥
कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥३॥


१८१३
नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥१॥
काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥
मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥
तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह तें केवळ सदोदित ॥४॥


१५४९
नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥
जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥
चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥
तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां रोकडी गरज ॥३॥


१४२६
नव्हे मतोळ्याचा बाण । नित्य नवा नारायण ॥१॥
सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥
लाभ हाहोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥२॥
तुका म्हणे नेणों किती । पुरानि उरलें पुढती ॥३॥


२७५४
नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें हें टोंकविलें नारायणा ॥१॥
अंतर तों तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार उचितें चाळवीजे ॥ध्रु.॥
मनें कल्पीलें आवरीतां पाप । संकल्पीं विकल्प याचि नांवें ॥२॥
तुका म्हणे आम्हां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥


२७७१
नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥
तुम्हां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥


१२९१
नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥१॥
तुम्हां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥
शक्तीहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥२॥
तुका म्हणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥३॥


३३०
नव्हे शब्द एक देशी । सांडी दीवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
मोकलिलें जावें बाणें। भाता जेणे वाहिलें ॥२॥
आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥


२६९३
नव्हेसी तूं लांसी । मायां आणिकां त्या ऐसी ॥१॥
जे हे वांयां जाती बोल । होती निर्फळ चि फोल ॥ध्रु.॥
नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥२॥
तुका म्हणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥३॥


१०२९
नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥


८६६
नव्हों आम्ही आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥
तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥


१७०१
नव्हों गांढे आळसी । जो तूं आम्हांपुढें जासी ॥१॥
दिलें आम्हां हातीं । वर्म विवादाचें संतीं ॥ध्रु.॥
धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥२॥
तुका म्हणे देवा । वादे करीन खरी सेवा ॥३॥


२४३५
नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥
कुपथ्य करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥२॥
तुका म्हणे लांसू फांसू देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥३॥


२८१९
नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥
आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईंल करुणा । ते चि पहा तुम्हांसी ॥ध्रु.॥
ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां वेळ कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥
आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका म्हणे सांभाळा ॥३॥


ना
९६९
नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥
वाखाणी अद्वैत भक्तीभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता ॥ध्रु.॥
अहं ब्रम्ह म्हणोनि पाळितसे पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥२॥
वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥३॥
तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरीष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥


२२६८
नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥
गाईगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥
तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥
नेणपणे उगें चि उभें । भक्तीलोभें राहिलें ॥३॥
नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥
सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥
मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥
रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥
भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर॥८॥
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥
तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तंपासीं राहिला ॥१०॥


३१४८
नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥१॥
अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥ध्रु.॥
आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मगे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥
एकासी धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥३॥
एका देखोनि लपवी भाकरी । एकासी आड पडोनि होंकरी ॥४॥
तुका म्हणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु ॥५॥


३८८१
नाचतां देखिलीं गाईं वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥
येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥
विचारितां उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥
आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥
त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥
सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥
समागमें गाईं वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥
संग जाला मायबापां लोकपाळां । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥
करिते हे जाले स्तुती सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥
करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥
पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥
नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥
तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥
दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥
भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥


२४९८
नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥
चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥
नामरूपें रंगा आलीं । ते चि चाली स्वभावें ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगें कवळिलें॥३॥


४०००
नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥
तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाईन लोण ॥ध्रु.॥
एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥२॥
तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥३॥


४३६
नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरीजन ॥ध्रु.॥
न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥२॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥३॥


३२७३
नाना मतांतरें शब्दाची वित्पत्ति । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥
माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥
यज्ञयाग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥
तुका म्हणे होय उपरति चित्ति । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥३॥


४५२
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाई ॥३॥


१५८२
नाम उच्चारितां कंठी । पुढें उभा जगजेठी ॥१॥
ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥
ब्रह्मादिकां ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥
तुका म्हणे सार घ्यावें । मनें हरीरूप पाहावें ॥३॥


१७८८
नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥
रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥
आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥२॥
तुका म्हणे आहार जाला। हा विठ्ठला आम्हांसी ॥३॥


१५६९
नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥
ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥
नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥
हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३॥


२१७४
नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवती ॥१॥
गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें ॥ध्रु.॥
प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध नसती ताप क्षणे ॥२॥
तुका म्हणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥३॥


२२७२
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥
दोंचि अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥
नाहीं वर्णाधमयाती। नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥
तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम॥३॥


८८४
नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि स्रवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥
जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें। अंगा येती उद्गार ॥२॥
सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥


२२७३
नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आइकिला ॥१॥
सांगा विनवितों तुम्हांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥ध्रु.॥
नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥


२२६३
नामदुषीं त्याचे नको दरुषण । विष ते वचनवाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाईकावी कानी । निंदेची पोहणी उठे तेंथे ॥ध्रु.॥
काय साच लभ्य त्याचिये वचनी । कोण त्या पुराणी दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावू त्याचिया तोंडासी । आतां या जिभेंसी काय करू ॥३॥
तुकाम्हणे संत न मानिती त्यास । घेउं पाही ग्रास यमदूत ॥४॥


७५३
नामदेवें केलें स्वप्नमाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥


१२८८
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा॥१॥
हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभक्तची ॥ध्रु.॥
ठावा नाहीं पांडुरंग । जाणा जातीचा तो मांग ॥२॥ ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥३॥
नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥३॥
तुका म्हणे त्याचे दिवशीं। रांड गेली महारापाशीं ॥४॥


३५३
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥१॥
तरी आम्ही जालों उदास निर्गुणा । भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । जाय ठाया ठाव पुसोनियां ॥२॥
तुका म्हणे आतां अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥३॥


३३६०
नाम वाचे श्रवणीं कीर्ती । पाउलें चित्तीं समान ॥१॥
काळ सार्थक केला त्यांनी । धरिला मनी विठ्ठल ॥ध्रु.॥
कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥
निळा म्हणे स्वरूपसिद्धी । नित्य समाधी हरिनामीं ॥३॥


२३५३
नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें॥१॥
न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥
रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ॥३॥
याविन आणीक असता साधन । वाहातसें आण विठोबाची ॥४॥
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥५॥


३०६
नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥
उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥
नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥
तुका म्हणे वर्णु काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥


९४३
नाम म्हणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥१॥
जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥
नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥२॥
काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥३॥
आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥४॥
जगीं प्रसिद्ध हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥५॥
जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥६॥
काय सांगों ऐशीं किती । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥७॥


२९३६
नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगी कांहीं रस न ये चि तो ॥१॥
कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥
लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥२॥
तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरी माझ्या ॥३॥


८२०
नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह कांहीं मनीं ॥१॥
ऐसें मी हें नाहीं बोलत नेणता । आणोनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥
नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलो नये ॥२॥
तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥


९४१
नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आह्मीं ॥ध्रु.॥
गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥२॥
तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥


९५८
नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तोचि ठेला ॥१॥
आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ध्रु.॥
आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रम्हकर्मा नाम एक तुझें ॥२॥
तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥३॥
परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारितां ॥४॥
कोळियाची कीर्ती वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥५॥
सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नांमी ॥६॥


१२०७
नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥१॥
फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥२॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥
बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥
तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥


१९५३
नामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥
आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण॥ध्रु.॥
रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥
तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥


३८५८
नारायण आले निजमंदिरासि । झाले या लोकांसि बहुडविते ॥१॥
बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥
मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥
सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥
लोक गेले कामा गाईंपें गोपाळ । वारली सकळ लोभासाठी ॥५॥
लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥
आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥


३८३६
नारायण भूतीं न कळे जयांसि । तया गर्भवासीं येणें जाणें ॥१॥
येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥ध्रु.॥
देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ देहबुद्धी ॥२॥
बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरी जळीं स्थळीं तया चित्ती ॥३॥
चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥४॥
तयामाजी हरी जाणिजे त्या भावें । आपुलें परावें सारिखें चि ॥५॥
चिंतनें जयाच्या तरती आणीक । जो हें सकळिक देव देखे ॥६॥
देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥७॥
काया वाचा मनें पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनियां ॥८॥
यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥९॥
गोपाळांचे डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥१०॥
पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥११॥
संधि सारूनियां पाहिलें अनंता । म्हणती ते आतां कळलांसी ॥१२॥
कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१३॥
तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१४॥
शीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१५॥


२७११
नारायणा ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥१॥
जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥
न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥२॥
कैवल्य तें जोडे । कृपा लवकरी घडे ॥३॥
जन्ममरणदुःख आटे । जाळें अवघेंचि तुटे ॥४॥
तुका म्हणे झाला । याचा गुण बहुतांला ॥५॥


३८९२
नारायणें कंस चाणूर मर्दिले । राज्यीं स्थापियेले उग्रसेना ॥१॥
उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचाम ॥२॥
अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥
सकळ ही केला आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥
मथुरेसि आला वैकुंठनायक । झालें सकळिक एक राज्य ॥५॥
राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥
सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका म्हणे करें शस्त्र धरी ॥७॥


२२०३
नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आग्रह दावी ॥१॥
आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग छी थू करी ॥ध्रु.॥
नेमून ठेविला करत्यानें काळ । न लाहेसें बळ करूं पुढें॥२॥
तुका म्हणे देव साह्य जाल्यावरी । असंगाचे करी सर्व संग ॥३॥


२२०७
नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होई ॥१॥
सोडवूनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे॥ध्रु.॥
नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥


३४१४
नावडे जें चित्ता । तें चि होसी पुरविता ॥१॥
कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाठी ॥ध्रु.॥
न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥२॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥
जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥४॥
तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥५॥


१९८४
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥
तुका म्हणे तया करावें तें काई । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥


४७०
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥
नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥
तुका म्हणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तोचि निंदा मायझवा ॥३॥


९९४
नाशीवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥
नामें चि तारिले कोटयान हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥
नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्ही मनीं आठवाना ॥२॥
तुका म्हणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाठी ॥३॥


३५१७
नाहीं आइकत तुम्ही माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥१॥
येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥
करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥२॥
तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥३॥


१९८८
नाहीं आम्हां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥
पाहें तेथें पांडुरंग रखुमाई । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥
लज्जा भय कांही आम्हां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥
तुका म्हणे आह्मी सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥


३३४१
नाहीं आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥
कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥
असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुल्या ॥२॥
तुका म्हणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥


६०८
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥१॥
आशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान निंश्चितीचें ॥ध्रु.॥
दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥२॥
तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥३॥


२४१५
नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥
जन वन आम्हां समान चि झालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥२॥
म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥३॥
म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥


३४२५
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी झालें ॥२॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं । झालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥


१९०२
नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥१॥
प्रेम प्रीतीचे बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥
पदरीं घालीं पिळा । बाप निर्बळ साटी बाळा ॥२॥
तुका म्हणे भावें । भेणें देवे आकारावें ॥३॥


१६७०
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥१॥
एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥
कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥
तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं ठाई होईल ते ॥३॥


२८३३
नाहीं खंड झाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥
कैसें कैसें हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥
मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥२॥
तुका म्हणे मज । न लगे बोलणें सहज ॥३॥


२९२३
नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥
निकटवासिया आळवितों धांवा । येथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥
उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥
तुका म्हणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥


३४७९
नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥
क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥
आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥
तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥


३००३
नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥१॥
निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें माझे ॥ध्रु.॥
नाहीं आणूनियां समर्पीलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥
तुका म्हणे आम्हीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें मायबापे ॥३॥


१८७३
नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥१॥
आह्मी तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥
बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरी जाऊं नेदीं ॥२॥
नव्हती जों भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि दुःखी बहु जालें ॥३॥
तुका म्हणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥४॥


३५१५
नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥१॥
जाणिवलें आतां करीं ये उद्देश । जोडो किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥
ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥२॥
तुका म्हणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥३॥


१५०६
नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणे ॥१॥
जेथें देखो तेथें लांचाचे पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥
आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥
तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्याने देवा पायांपाशीं ॥३॥


१२४०
नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्तीं असों द्यावी ॥१॥
सरलिया भोग येईन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥
आतां मजसाठी याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥२॥
तुका म्हणे मुखीं असो तुझें नाम । देईल तो श्रम देवो काळ ॥३॥


३६५८
नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥२॥
तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥


२५२९
नाहीं तुम्हां कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥१॥
एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥
पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी झाली आतां ॥२॥
तुका म्हणे तुम्हां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥


१८९२
नाहीं तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥
सोंगें न पावीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥
प्रेम नाही अंगीं । भले म्हणविलें जगीं ॥२॥
तुका म्हणे देवा । मज वांयां कां चाळवा॥३॥


३८३९
नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतियां सवें येऊं नेदी हरी । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥
जीहीं हरीसंग केला संवसारीं । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥


१७१९
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥१॥
धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥
शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥२॥
तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥


१६८२
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥
म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥
वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥


३१५
नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥
भोगी भोगविता। बाळासवें तोचि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥


१९६८
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥
आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥
पांचांमधीं जावें । थोड्यासाठी फजित व्हावें ॥२॥
तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आह्मी कांहीं ॥३॥
टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥
तुका म्हणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥


२७३९
नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥
त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥ध्रु.॥
घोकुनी अक्षरें । वाद छळणा करीत फिरे ॥२॥
म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥३॥


३३९
नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनियां मन । निविऩषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥
उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥
आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥


३८७७
नाहीं नाश हरी आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥
सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥
सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाईं वत्स पशु जीवां ॥४॥
वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका म्हणे देवावांचूनियां ॥५॥


४०४
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥१॥
तैसी चित्तशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ध्रु.॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥२॥
वांज न होती लेकुरें । काय करावें भ्रातारें ॥३॥


नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥४॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥५॥
तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥६॥


२०५६
नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥
मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥
तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥


३१५४
नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥
नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥
तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥२॥
तुका म्हणे किती ठकलीं बापुडीं । गव्ही आहे गोडी मांडे पुऱ्या ॥३॥


३२६४
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥
तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥
काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥२॥
तुका म्हणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥३॥


२६६४
नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुम्हां आळवाया जविळकें ॥१॥
सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥
नवनीतासाठी खादला हा जीव । थोड्यासाठी कीव कोण करी ॥२॥
तुका म्हणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥३॥


२८०५
नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥१॥
चतुराचे सभे पंडित कुशल । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥२॥
तुका म्हणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥


२८५३
नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडांत ॥१॥
कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥
विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥२॥
तुका म्हणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥३॥


८४३
नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥
नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥
तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवाणांत ॥३॥


१३१४
नाहीं माथां भार । तुम्ही घेत हा विचार ॥१॥
जाणोनियां केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥
आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥


१६१५
नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥
विटेवरी भावे ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥


७७४
नाहीं येथें वाणी । सकळां वर्णी घ्यावी धणी ॥१॥
जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥
एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥
तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥


१२४५
नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥१॥
जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥
नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥
नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी॥३॥
तुका म्हणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥४॥


४१९
नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥१॥
आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥
निवारिलें भय । नाहीं दुस†याची सोय ॥२॥
तुका म्हणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं॥३॥


१३८५
नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥
न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥
सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥
तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥३॥


२५६२
नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥
आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥
आळीकर आम्ही एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥
तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥


३४१६
नाहीं विचारीत । मेघ हगंनदारी सेत ॥१॥
नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥
वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥
तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ॥३॥


३२७४
नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥
हर्षामर्षा अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥
न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ता ॥२॥
तुका म्हणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥


८१९
नाहीं संतपण मिळत ते हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥
नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साठी । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥३॥


१४९५
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥
काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥
तुका म्हणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥


२९३२
नाहीं सरों येत कोरड्या उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साह्य असो ॥ध्रु.॥
निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥
तुका म्हणे नेम न टळतां बरें । खऱ्यासी चि खरें ऐसें नांव ॥३॥


३५५
नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥
असें तुमचा रजरेण । संतां पायीं वाहाण ॥ध्रु.॥
नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तीभाव करीं देखीं ॥२॥
नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥
नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ॥४॥
कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥५॥


२७१
नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥
देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥
नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥
तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥
तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥


१०२३
नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥
वाऱ्या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ती मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥


३५८५
नाहीं हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥१॥
पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज ॥ध्रु.॥
आणीक या मना नावडे सोहळा । करितें कटळा माहेरींचा ॥२॥
बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥३॥
तुका म्हणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥४॥


१३६७
नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥
ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥
उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥२॥
तुका म्हणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देऊ ॥३॥


नि नी नु
३४४
निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥
पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥२॥
तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥


१४०८
निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥
पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥
धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥
अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥


२५२१
निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥
आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥
गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥
तुका म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥


३८५२
निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥
लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुधुकारें निवारिलीं ॥२॥
निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाते चि वधी माथा पाय ॥३॥
एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥
यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव म्हणे हरी पुरे आतां ॥५॥
आतां करूं काम आलों जयासाठी । हरी घाली मिठी काळीयासि ॥६॥
यासि नाथूनियां नाकीं दिली दारी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥
विसरु न पडे संवगड्या गाईं । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥
त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरी ॥१०॥
हरीचें चिंतन करितां आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥


१६४९
निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥१॥
उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे हा गोविंद नाना छंदें ॥ध्रु.॥
मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥२॥
तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाठी ॥३॥


३०३३
नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥
चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥
पक्षी वनचरें आहेत भूमीवरी । तयांलागीं हरी उपेक्षीना ॥३॥
तुका म्हणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥


२०८३
नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी॥१॥
आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥
सांपडला गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥
तुका म्हणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥


२७८६
निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥
होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥
दुसऱ्याच्या मता । मिळेनासें झालें चित्ता ॥२॥
तुका झाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥


९११
निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥
जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥
शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥२॥
तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥३॥


२३
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥
देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥२॥
अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥३॥


१९४९
निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥१॥
तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥
परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥२॥
तुका म्हणे वेळू चंदना संगतीं । काय ते असती जविळकें ॥३॥


३२७१
निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलोंसे ॥१॥
निराभासीं पूर्ण झालों समरस । खंड ऐक्यास पावलों आम्ही ॥२॥
तुका म्हणे आतां नाहीं अहंकार । झालों तदाकार नित्य शुद्ध ॥३॥


२४९४
निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥
पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥
लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥
तुका म्हणे नव्हतें ठावें । झालें भावें वाटोळें ॥३॥


२९०८
निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥
राहातेति तुम्ही भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषयची ॥ध्रु.॥
कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥
तुका म्हणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायाशीं हे चि करीं ॥३॥


१७२८
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥
असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥
तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥


३५५५
निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥
परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥
सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥२॥
न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥३॥


५८९
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥१॥
तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे अंगा आली कठिणता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥३॥


१३००
निर्दयासी तुम्ही करितां दंडण । तुमचें गाऱ्हाणें कोठें द्यावें ॥१॥
भाकितों करुणा ऐकती कान । उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें॥२॥
तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥


६१४
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तई नाचेन ॥ध्रु.॥
स्वामी कळे सामाधान। तरि मन उल्हासे ॥२॥
तुका म्हणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥


९८३
निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥
कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांठवावा ॥ध्रु.॥
नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें दमी ॥२॥
तुका म्हणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥३॥


९३१
निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥
नाहीं चालों येती सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥
त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्या कारणां पुरता विधि ॥२॥
तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥३॥


२२९४
निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक॥१॥
तरीच अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥
सोइरें पिशुन समान चि घडे । चित्त पर ओढे उपकारी ॥२॥
तुका म्हणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥


२०७७
निवडावें खडे । तरी दळणा वोजें घडे ॥१॥
नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥
निवडावें तन। सेतीं करावें राखण ॥२॥
तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित॥३॥


५२६
निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीते ॥१॥
आतां पुढें भाव सार । जीवना थोर पाहावया ॥ध्रु.॥
पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥२॥
तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥


२३१
निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥
संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा व्यंग पडियाली ॥२॥
तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धी अवकळा ॥३॥


७६१
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरी ते ॥१॥
जयाचा विभाग तयासी च फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥
शूर तो ओळखे घायडायहात । येरां होईल मात सांगायासी ॥२॥
तुका म्हणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जाणवसा ॥३॥

निश्चितीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥१॥
अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥
कोण तुम्हांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥२॥
तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥३॥


९४०
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥


१३२५
निष्ठुर तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी॥१॥
केला च करावा केला कइवाड । होईल तें गोड न परते ॥ध्रु.॥
मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥२॥
तुका म्हणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्ते ॥३॥


१३७०
निष्ठ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥१॥
सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥
सांपडूनि संदी केली जीवेंसाठी । घ्यावयासि तुटी कारण हें ॥२॥
तुका म्हणे तुज काय म्हणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥३॥


२६८२
निष्ठुर यासाठी करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥१॥
ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥
बैसलासी केणें करुनिया धीर । नाहीं येथें उरी दुसऱ्याची ॥२॥
तुका म्हणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥


१६९५
निष्ठुर उत्तरीं न धरावा रांग । आहे लागभाग ठायींचा चि ॥१॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥
मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥
तुका म्हणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥


७१७
निंचपण बरवें देवा । न चले कोणाचा ही दावा ॥१॥
महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥२॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥


३६७२
नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥
आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥
कमाईस मोल येथें नका रीस मानू । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥२॥
तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥३॥


ने नो न्या
१८२५
नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥१॥
वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥
आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२॥
तुका म्हणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥३॥


३८२२
नेणतियांसाठी नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥
तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि ॥४॥
उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥
यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥
करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥
कृष्णासी सकळ गाईं घोडे म्हैसी । समर्पिले दासी जीवें भावे ॥९॥
जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरी । देह काम करी चित्त त्यापें ॥१२॥
त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयीरा भेटों कृष्ण ॥१४॥
कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥
कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥
कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥


३७२९
नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥१॥
चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ध्रु.॥
कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥३॥


३९३
नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥१॥
रूप आवडे आम्हांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥
आह्मीं भावें बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥२॥
तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥३॥


२८०३
नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥१॥
आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देई ॥ध्रु.॥
समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥
तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥३॥


१८०८
नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥
मज मूढा शक्ती कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबड्या उत्तरीं हें चि ध्यान ॥३॥
तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥


१६६२
नेणे गति काय कवण अधोगति । मानिली निंश्चिती तुझ्या पायीं ॥१॥
कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥
नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । म्हणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥
वेडा मी अविचारी न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥४॥


३९८६
नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥१॥
करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदें करावीं खरीं ॥ध्रु.॥
नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥
म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाय । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥३॥


५३
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥
नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥


१४८३
नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥१॥
रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥
मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥
तुका म्हणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥३॥


१५६३
नेणें फुंको कान । नाहीं एकांतींचें ज्ञान ॥१॥
तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥
नाहीं देखिला तो डोळां। देव दाखवूं सकळां ॥२॥
चिंतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखें ॥३॥


३८५७
नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आळिंगिलीं ॥१॥
हरी लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥
पारणें तयांचें झालें एक वेळे । देखिलें सावळें परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥
दारीं वृंदावनें तुळसीचीं बनें । रामकृष्णगाणें नारायण ॥६॥
नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥
यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥
हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥
सेवाॠणें तुका म्हणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥


६६३
नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥
शिकविलें कांहीं न चलती तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥
वंदूं निंदूं काय अभक्त दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥


१२४३
नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥
धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥
क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां अधीन ॥२॥
तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी॥३॥


२१३०
नेणों काय नाड । आला उचित काळ आड ॥१॥
नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥
सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥
चुकी जाली आतां काय। तुका काय म्हणे उरली हाय ॥३॥


३७१८
नेणों वेळ काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥१॥
नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ध्रु.॥
तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥२॥
तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥३॥


११०९
नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेम भाव ॥१॥
उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥
यंत्र मंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥


४२४
नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥
करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥
भेटावें पंढरिराया। हें चि इिच्छताती बाह्या ॥२॥
जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥३॥
चित्त म्हणे पायीं तुझे राहीन निश्चयीं ॥४॥
म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥५॥


२८९०
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥
सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥
तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥


३८४४
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतलें गडे सांभाळावें ॥२॥
सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरें ॥३॥
बरें विचारुनी करावें कारण । म्हणे नारायण बऱ्या बरें ॥४॥
बरें म्हणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥
तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥
पुसती ते मात तया गोपाळांसी । हरीदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरी बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥
मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥


३८६८
नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥
आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥
पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥
आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥
निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥
दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥
सांगणें हे लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥


२६४५
नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥१॥
साह्य झालीं घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥
मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥२॥
तुका म्हणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥३॥


१२३२
नेसणें आलें होतें गळ्या । लोक रळ्या करिती॥१॥
आपणियां सावरीलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥
संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥
भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥
सावरीलें नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥४॥
बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥५॥
तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥


३५१८
नव्हे तुम्हां सरी । येवढें कारण मुरारी ॥१॥
मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥
स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥२॥
शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची॥३॥


३३८४
नव्हें दास खरा । परि झाला से डांगोरा ॥१॥
यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥
नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥
तुका म्हणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥


४०७६
नोहे आजीकालीचे ऐसे । अनारिसें पालटे ॥१॥
आता लागवेग करा । ज्याचें धरा ठाके ते ॥ध्रु.॥
नका सांगों वाउग्या गोष्टी । चाहूल खोटी ये ठायीं॥२॥
तुका म्हणे मोडा माग । आपुला लाग करुनी ॥३॥


१९३३
न्यावयासी मूळ पाठवील कधी । मज कृपानिधी पांडुरंग ॥१॥
प्राण फुठे माझा त्याचिये वियोगे । घडी जाय युगे येकी येकी ॥ध्रु.॥
त्याचिये गांवीची आवड ती जीवा । जीव हा सांडावा वोवाळूनी ॥२॥
दिनो दिन चिंता वाढते बहुत । नावडे संचित करावेसे ॥३॥
तुका म्हणे आतां आहे तोची सरो । कोण करी भरोवरी मग ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *