सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा ८ (ट, ठ, ड, ढ, थ, द)

संत तुकाराम गाथा ८ अनुक्रमणिका नुसार


३४५७
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥
म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥
दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥
पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥४॥
नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥५॥
झाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥५॥
पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥६॥
कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥७॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥८॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥९॥
योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥१०॥
वैराग्याचा लोप हरीभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१२॥
तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥१३॥


३९६२
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥
कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥
याजसाठीं डौर म्या धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥


२०५२
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥
आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥


६५०
टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥१॥
जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥
तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥


११७०
टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥
अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥
मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥२॥
तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥३॥

३६५४
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥
पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥२॥
तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥


१००८
ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥१॥
मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥
याचकाचा भार । घेऊं नये येरझार ॥२॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥३॥


१८१
ठायींची ओळखी । येईल टाकुं टाका सुखीं ॥१॥
तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥
ठेविला तो ठेवा । अभिलाष बुडवावा ॥२॥
मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥


३२४२
ठाव तुम्हांपाशीं । झाला आतां हृषीकेशी ॥१॥
न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥
चोरट्यासी थारा । येथें कैंचा जी दातारा ॥२॥
तुका म्हणे मनें । आम्हां झालें समाधान ॥३॥


१८३०
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥
भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥
जागा ना निजेला । होसी धाला ना भुकेला ॥२॥
न पुसतां भलें । तुका म्हणे बुझें बोलें ॥३॥


९६१
ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥१॥
एका अनुसरल्या काज । अवघें जाण पंढरिराज ॥ध्रु.॥
तर्कवितर्कासी । ठाव नलगे सायासीं ॥२॥
तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥


७७५
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥
जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥
निवडिलें वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥२॥
तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥


२६४९
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥
आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥
करूनि सांभाळीं राहिलो निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥
तुका म्हणे योग्यायोग्य हे विनीत । देवा नाहीं येथें चित्त देणें ॥३॥


३३८८
ठेवूनियां डोई । पायीं झालों उतराई ॥१॥
कारण तें तुह्मीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥
प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥
तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार ॥३॥

२७६१
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥
धीर तूं गंभीर जीवन जगाचें । जळो विभागाचें आआहाचते ॥ध्रु.॥
भेईल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥२॥
तुका म्हणे आवश्यक हें वचन । पाळावें चि दान समयो आहे ॥३॥


३७५४
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥
खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥
मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्याया ॥२॥
तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥३॥


४१५
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥
तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥
मेळवूनि नरनारी। शकुन सांगती नानापरी ॥२॥
तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥


१३९८
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प ॥१॥
अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥
जिव्हा केली माप । रासीं हरीनाम अमुप ॥२॥
भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥


१८५४
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥
बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥
बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥
पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥
तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥
काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥
एक वेळ माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥


२२१०
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥
तैसें शुद्ध करा हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥
आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरी न ये ॥२॥
तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥


२५८०
डौरलों भक्तीसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥
संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥
ब्रह्मादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥
नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥
मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें तुटी॥४॥
तुका म्हणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥

३३४५
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥
पोटी पडदळ सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥
असोनि उपाय म्हणे हे आपण। म्हणे हायहाय काय करूं ॥३॥
तुका म्हणे हा तों स्वयें परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥


१९५२
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥
ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥
डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥
विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौऱ्यांशीचा ॥४॥


२३४७
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥
होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥
बोरामध्यें वसे अळी। अठोळीच भोंवती ॥२॥
पोटासाटीं वेंची चणे । राजा म्हणे तोंडें मी ॥३॥
बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥
तुका म्हणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥


४५
ढेंकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥
हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥
गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥
तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥

३९५३
थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥
न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥
सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥
तुकाम्हणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥


७४१
थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥
जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥
अर्थ अनर्था सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥
उपाधि वेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥


८५
थोडें आहे थोडें आहे । चित्त साह्य जालिया ॥१॥
हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥
तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥


२६८६
थोडे तुम्ही मागें होते उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥
आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥
तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥२॥
तुका म्हणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥


२८७
थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥
घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥
चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥२॥
आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥


३५३३
थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥१॥
भोगविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥
अवघें घालूनियां कोडें तहानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥
उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥


११२४
थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥
व्यर्थ भरावरी केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥
घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥

द दं

२५३१
दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥
नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥
पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥
तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥


१५९६
दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥
अग्नी काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥
तुका म्हणे सुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥


२७२७
दगडाच्या देवा बगाडी नवस । बाईल कथेस जाऊं नेदी ॥१॥
वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥
चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्वीजा हातीं नेदी रुका ॥२॥
करी पाहुणेर व्याह्याजावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥
तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण धरातळी ॥४॥


४९३
दंभें कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥
पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥२॥
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥
तुका म्हणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥४॥


१४१
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥३॥


१४४
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें । तेलतुप साबण केणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥


९३५
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥
पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥
कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥
तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥


४६९
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥
ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥
अंधळ्यास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥२॥
तुका म्हणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥३॥


२९५९
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥
गुण ज्याचे जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥
चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥२॥
तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥


४८९
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥
जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥२॥
जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥३॥


२३१६
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥
आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥
येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥
तुका म्हणे जाणवलें । आम्हां भलें एवढेंच॥३॥


३०५९
दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥
आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥ध्रु.॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥
तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेवू पांयीं संतांचिये ॥३॥


२४०७
दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥
आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥
पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥
तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥


दा दी दि

२३१९
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥
तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥ध्रु.॥
तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥
तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे॥३॥


३०७५
दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥
उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥
चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यास यमदंडी ॥३॥


१६११
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥
यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥


१७९
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥
आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥
तुका म्हणे नाद । झाला अवघा गोविंद ॥३॥


३१०५
दाता लक्ष्मीचा पती । माझे मागणे ते किती ॥१॥
जाणे तान्हेल्याची तहान । पीता गंगा नव्हे न्यून ॥ध्रु॥
कल्पतरु झाला देता । तेथेपोटाचा मागता ॥२॥
तुका म्हणे संता ध्याता । परब्रह्मची आले हातां ॥३॥


५९
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥
न वजती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥
तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥


१९९८
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥
तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥
नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२॥
तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥


१८२९
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥
थोटा झोंडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥
सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥
तुका म्हणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥


१६९०
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥
तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥
उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥
दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥
तुका म्हणे पायांसाठी । करीं आटी कळों द्या ॥५॥


२५१२
दावूनियां मांड । पुरे न करीती भांड ॥१॥
जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥
घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥
तुका म्हणे धीरें । देव नुपेक्षिलें खरें ॥३॥


७८८
दास जालों हरीदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा ॥१॥
तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ । नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥
ऐकतां हरीकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ॥२॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥
हें सुख ब्रह्मादिकां । नाहीं नाहीं म्हणे तुका ॥४॥


१७३१
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥
जेथें वसती हरीचेदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥
फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥
तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥३॥


३२५७
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्क द्वारीं ॥१॥
ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥
बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥
तुका म्हणे रांडलेंका । अंतीं जासी यमलोका ॥३॥


३४९४
दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥
प्रेमरसडी बांधी गले । खैंच चले तब मोही उधर ॥ध्रु.॥
आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आगे बाट बतावे ॥२॥
तुका प्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥३॥


४०५३
दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥२॥
सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥३॥
राखे दारवंटा बळीचा। रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥
भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥


१३२१
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥
तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥
संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥
तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥३॥


१७८६
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥
कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरला मरण । त्याची नाहीं आठवण ॥२॥
देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥३॥


५१६
दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥२॥
कीर्ती मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥


२६३८
दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥
आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥
माझीया मरणें । तुम्ही बैसविलें ठाणें ॥२॥
तुका म्हणे कांहीं । मी हें माझें येथें नाहीं॥३॥


२२९५
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥
रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥
मानदंभांसाटीं। पडे देवासवें तुटी ॥२॥
तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या निर्दैवा ॥३॥


२५१४
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥
समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥
काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे यश कीर्ती आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥


२३२
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेगाळले गुणें धांव घेती ॥१॥
काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥
इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणे घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥
माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥
तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥


३४१३
दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यांत न पडे ॥१॥
आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥
मान दंभ चेष्टा । हे तों शूकराची विष्ठा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धांवा ॥३॥


१४६
दिवट्या वाद्य लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥
करूं द्यावें व्हावें बरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥
वर्‍हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटि का तेलीं ॥४॥
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥


२७९७
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा ॥१॥
तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकारी ॥ध्रु.॥
चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥
तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनी ॥३॥


३८९४
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणों यासि ॥२॥
यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥
धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥
गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥
न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥
वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥


२६९
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥
पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥
आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥
चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥
तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतारा ॥४॥


२७९
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥
विष्णुदास आम्ही न भीओ कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥
उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥
तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥३॥


५१४
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥१॥
नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥
चिंतामणीशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥२॥
तुका म्हणे उभयलोकीं । हे चि निकी सामग्री ॥३॥


दु दू

२४७०
दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥
कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥
आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥
तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा॥३॥


४४७
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥
येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥
काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ती । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥२॥
तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥३॥


२०५८
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥
उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥१॥
जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळीगिया आवडी करूनियां ॥२॥
शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥
तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥


१४८९
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥
अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥
क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावे चि वाव ॥२॥
तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥


५४५
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोगें कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥
तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येईल कळों ॥३॥


३८६२
दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥
आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥
सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥
रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥
क्रोध देवावरी धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥


३४२८
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरी या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही झालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । झालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥


२०
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरी ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥
इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥
देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥२॥
तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥


११८७
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥
लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥


१६७३
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥
तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥
काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥
तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैसी संसर्गे ॥३॥


११००
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥


१९५०
दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥१॥
आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥
मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥
गांढें देखुनि शूर । उगें करि बुरबुर ॥३॥
आणिकांचा हेवा । न करीं शरण जाई देवा ॥४॥
तुका म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥५॥


२०७८
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥
लाता हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥
बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥
तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥


९२
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्याचा ॥४॥
तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥


१४६८
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥
त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥
पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥
उंच निंच नाहीं । तुका म्हणे खळा कांहीं ॥३॥


२१५७
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥
पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥
न म्हणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥
तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा॥३॥


२१३७
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नार्काचा कोथळ सांटवला ॥१॥
खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥
सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥
तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखटयाची ॥३॥


४१
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥
शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥
येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥
तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥३॥


२९८
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥
सांडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥
सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥
तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥


२००९
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥१॥
कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥
काम क्रोध माझ्या देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां॥२॥
हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥३॥


२०८४
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥
तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥
खातां लेतां नये मिरवितां वरी । राजा दंड करी जनराग ॥२॥
तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥


१९८६
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥
काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥
तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगिळया घरा येती ॥३॥


१११८
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आतां ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥
उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥२॥
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥


१४६३
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥
आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥
व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिज तो काळ नव्हे कांहीं ॥२॥
तुका म्हणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुम्हां हातीं ॥३॥


१९७८
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥
मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥
तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥


१७४६
दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला ।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥
जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा ।
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो ।
कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥
तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।
म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥


८०६
दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरी हें धन हातीं लागे ॥३॥


२६६०
दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळ भेद ॥१॥
आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥
मिथ्या मोहो मज लाविला उशीर । तरी हे अंतर झालें होतें ॥२॥
तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाई ॥३॥


दे

३५४९
देइ डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥
तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्नीशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥
फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥२॥
आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥३॥
तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥


१३५७
देईल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥
पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥
गुणां ऐसा भरणा भरी । जो जें चारी तें लाभे ॥२॥
तुका म्हणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥


४२७
देऊंनियां कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥
काय होईल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥
करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥२॥
तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥


४८८
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥
पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥
आरुष हे वाणी। गोड वरूनि घेतां कानीं ॥२॥
आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥३॥


७५७
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥
जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥
पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदंतर तेवी ॥२॥
तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥


३५०५
देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥१॥
मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥ध्रु.॥
कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥२॥
कहे तुका वो संन्यास। छोडे आस तनकी हि ॥३॥


३९२०
देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी झालों देवा । काय जाल्याचें फळ ॥१॥
आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥
होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना । मागें तोही सांडिला आधार । हा ना तोसा ठाव झाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥
जोंवरी चळण गा । तोंवरी म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ॥३॥
गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध। स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥
लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । झालों निराळा कैसा । पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥


३७४७
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥
जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥
मोठें भावार्थाचें बळ । देव झाला त्याचें बाळ ॥२॥
तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोपाटीं ॥३॥


२७९०
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥
भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥
बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥
तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसील ॥३॥


५३५
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†ऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥
मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥ध्रु.॥
काय पडिलासें लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥
तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥३॥


३१८०
देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥
इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥
युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥२॥
नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥
तुका म्हणे बुद्धी आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥४॥


९१
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥
आवरीतां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥
दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥


२५१
देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥
तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥
मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥
तुका म्हणे केले तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥३॥


५२
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें । निष्ठुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषिद्ध तो ॥३॥


२०५३
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु॥१॥
वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥
शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥
तुका म्हणे सार । भक्ती नेणती गव्हार ॥३॥


१०४
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥
धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥
अवघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥
सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरी होती ॥३॥
घराकडे पाहूं नयेसेंचि जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥
आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥


१२६८
देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥
तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥
सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥३॥


२१०
देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥
जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ ॥२॥
अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥
१८८८
देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥१॥
देव आहे देव आहे । जवळीं आम्हां अंतरबाहे ॥ध्रु.॥
देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥२॥
देव आम्हां राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥३॥
देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥४॥


१५९०
देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भीक्ष ॥१॥
नेणती हा करूं सांटा । भरले फाटा आडरानें ॥ध्रु.॥
वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥
तुका म्हणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥३॥


२४७५
देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥
मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥
गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥
तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥


३१९८
देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥
आळवित्या न लगे घर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥
नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥
आतां परदेशी तुका । झाला लोकांवेगळा ॥३॥


६४३
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥
देव न लगे देव न लगे । सांठवणाचे रुधले जागे ॥ध्रु.॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥
दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥४॥


१६२३
देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥
देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥ध्रु.॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥


२४६४
देव झाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥
बरवें जालें बरवें जालें । चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥
दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥
तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वोहोळासी ॥३॥


३०५०
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥
पर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि झाले ॥२॥
तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येईल कळों ॥३॥


३१५८
देव तिला आला । गोडगोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥३॥


२५६५
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥
तया बरें फावे देवा चुकवितां । संचिलाची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥
शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥
तुका म्हणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥


३९४४
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥
निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥
तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥


३८६५
देव त्यां फावला भाविका गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥
नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफार ॥२॥
फार चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥
विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥
जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरी देतो घेतो ॥५॥


१८८२
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥
देव उदार देव उदार । थोड्यासाठी फार देऊं जाणे ॥२॥
देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥


१८८४
देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी ॥१॥
देव अकुळी देव अकुळी । भलते स्थळी सोयरीक ॥२॥
देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥३॥


३५११
देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥
दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥
नको चिंता करुं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी । परी तो जवळी आहे आम्हां ॥४॥


१८८७
देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥
देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥
देवासी कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥
देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥
देव कातर कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥


१८८५
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाठी उडी ॥१॥
देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥
देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥
देव होया देव होया । जैसा ह्मणे तैसा तया ॥३॥
देव लाहान लाहान । तुका ह्मणे अनुरेण ॥४॥


१८८३
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥
देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥
देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥
देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥
देव न व्हावा देव न व्हावा। तुका म्हणे गोवा करी कामीं ॥४॥


११०१
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥
स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागीं कर्कशा करुनी ठेवी॥२॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥


१८८६
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥
देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥
देव बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥
देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥
देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥


१८८१
देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥
देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥
देव वर काई देव तर काई । तुका म्हणे राई तरी मोठी ॥३॥


१६३४
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥
न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥
न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥२॥
तुका म्हणे नारायण । येतां गोळ्या वारी बाण ॥३॥


२३६६
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥
हरीजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥
तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥


१४१७
देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥१॥
भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥
पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥
अविनाश जोडी आम्हां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥
पायांवरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥
तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणवितां देवा तुमचींसीं ॥५॥


२१९
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥
देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥
तुका म्हणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥३॥


१८५
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥
दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥
दाखविले परी नाहीं वरीजितां । आला तो तोचित्ता भाग वरी ॥२॥
तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥३॥


७९४
देव होसी जरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥
दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥
तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥


१९२३
देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥
तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥
ठाव देई चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥
असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥
मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई ॥४॥
तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध ॥५॥


३८०९
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥
कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देई आम्हां ॥३॥
आम्हां शरणागतां तुझा चि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥
संसार तें काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करीं ब्रिदें साचे आपले आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥
चित्ती जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होसी मनोरथा ॥१२॥


९६५
देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥१॥
या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धीसिद्धी द्वारीं । कर जोडूनि तिष्ठती ॥ध्रु.॥
नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥२॥
तुझ्या नामाचा महिमा । तुज नकळे मेघशामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठी ॥३॥


१८०५
देवाचा भक्ती तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥
निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न म्हणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥
प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी । कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जालें ॥२॥
गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आई बाप भाऊ । घरी बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥
जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो । तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणें चि ठाकिला सिद्धपंथ ॥४॥


३५४६
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥
पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥
सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धी सिद्धी ठायीं मुक्तिचारी ॥२॥
इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥३॥
तुका म्हणे जड जीव शक्तीहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥४॥


१११२
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥
गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥
लेकराची गांड स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्वीज पाय ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥


१४०५
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥
नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥
तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥३॥


देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥
न घेई माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥
मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥
तुका म्हणे घेई विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥


२९६८
देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंद्रियांचे ॥१॥
सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥
जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥
सांगणे तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥
तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥


७२८
देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥
करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥
तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥


२६०९
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ॥१॥
देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥
देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥
देवाची ते खून करावे तोंडाळ । आणिक सकळ जग हरी ॥३॥
देवाची ते खून झाला ज्यासी संग । त्याचा झाला भंग मनुष्यपणा ॥४॥
देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥५॥
देवाची ते खूण तोडी मायाजाळ। आणि हें सकळ जग हरी ॥६॥
पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ। तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥७॥


३२८५
देवाचि भंडारी । आदा विनियोग करी ॥१॥
आतां न माखे हातपाय । नेणों होतें कैसे काय ॥ध्रु.॥
देवें नेली चिंता । झाला सकळ करिता ॥२॥
तुका म्हणे धनी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥


१८५८
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥
धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥
सवें चि होता चोर घरिचिया घरीं । अवघें वाटोळें फावलियावरी केलें ॥२॥
तुका म्हणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥३॥


२९१३
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥
हातावरी हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥


२५६४
देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥
वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥
होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती सांठवण ॥२॥
तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥


२९७३
देवाचे भजन कां रे न करीसी तैसे । अखडं हव्यासे पीडतोसी ॥१॥
देवासी शरण कां रे नवजासी तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागी ॥ध्रु॥ देवाचा विश्वास कां रे नाही तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥२॥
कां रे नाही तैसी देवाची ते गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥
कां रे नाही तैसे देवाचे उपकार । माया मथ्या भार पितृपूजना ॥४॥
कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरुनीयां एक नारायण ॥५॥
तुका म्हणे कां रे घातले हे वायां । अवघे आयुष्य जाया भक्तिविण ॥६॥


१२०
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥
आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥
त्यजुनी संसार अभिमान सांडा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥२॥
तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जातो ॥३॥


१३०३
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥
लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥
शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥
तुका म्हणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥


२६३१
देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥
मोडिलें रांडेणे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥
परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥२॥
तुका म्हणे आणा राऊळा धरून । फजित करून सोडूं मग ॥३॥


१०
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥
इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघें चि आर्त पुरवितो ॥३॥
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥५॥


४६०
देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥
आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥
आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥२॥
तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥३॥


१८११
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥
तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥
आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥२॥
न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥
दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥
तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥


४०३६
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥
आम्हां भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥३॥
न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्नुं कीर्ती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥५॥


४०३२
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥
भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥२॥
नेणें भाव परि म्हणवीं तुझा । नेणें भक्ती परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥३॥
तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥४॥


४०७४
देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥
जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥२॥
भक्ती दया अथवा कथा। कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥३॥
काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥४॥
निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥५॥
पाळिलें नाहीं पितृवचन। सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥६॥
काया मने वाव्ह्या इन्द्रियासी ।सकल पापंसिच राशी। तुकया बधू एसी यासी ।आलो ह्रुशिकेअशि तुज शरण ॥७॥


७४०
देवावरील भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥
तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥
देखावी निंश्चिती । तोचि अंतर श्रीपती ॥२॥
वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥


११०६
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥
देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥
विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥
तुका म्हणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥


९९७
देवासाठी जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥
निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥
कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥
यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥४॥


२४१९
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥
देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥
एका अंगीं दोन्ही झालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥
तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥४॥


१३६५
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥
कांहीं नेघें शिरीं निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥२॥
तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥३॥


१८०९
देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥
देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥
देवासी उत्पत्ती लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥
तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥


१६६३
देवा हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥
याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥
देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥२॥
तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥


३९१८
देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥
हरीनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥
शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥


२८९७
देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे ॥१॥
ऐका नवलायाची ठेव । नेणताही भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बसैला ॥२॥
पंखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाय देव ॥४॥
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हा कोवळा ॥५॥


३०५
देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥
ते चि यताती ढेंकर । आनंदाचे हरीहर ॥ध्रु.॥
वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥
तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥


२८७२
देवें दिला देह भजना गोमटा । तों या झाला भांटा बाधिकेच्या ॥१॥
ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नदी ॥ध्रु.॥
दास म्हणावया न वळे रसना । सइर वचना बा सगळे ॥२॥
तुका म्हणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥


१६०९
देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥
नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणापें पाहीं ॥ध्रु.॥
पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥
वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥
तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥


३९२४
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ झालों ॥१॥
आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥
चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय झालें। कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥२॥
भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा । लक्ष चौऱ्यांशी गांव । धरूनि राहिलों गा । हाचि वसता ठाव ॥३॥
भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च झाली कीर्ति । तया मज बहुतां । म्हणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥४॥
संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी । निष्काम झालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥५॥


७२७
देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥
येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥
गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदाझाडां ॥२॥
तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥


२४४७
देह जाईल जाईल । यासी काळ बा खाईल ॥१॥
कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥
लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥
शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥
अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढें दगा॥४॥


१४२०
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥
अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें नसे ॥२॥
तुका म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥


३००४
देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥
सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥
लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥
तुका म्हणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥


१२७५
देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई ॥१॥
आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥
बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥
तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥


७२९
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥
पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥
तुका म्हणे जीवासाठी । देव पोटीं पडेल ॥३॥


२११९
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥
येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥
काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त ओढे ॥२॥
विष्णुदास तुका । पूर्व धनी जाणे चुका॥३॥


२७०७
देह प्रारब्धा शिरीं । असोनि करी उद्वेग ॥१॥
धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥
ऐसी चुकोनियां वर्में । पीडा भ्रमें पावलों ॥२॥
तुका म्हणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा ॥३॥


१९४२
देहबुद्धी वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥
थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥
गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥२॥
पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥३॥
तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥४॥


२५६
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥
तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥


८३६
देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥
म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥
जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥
तुका म्हणे जालों जयाचा अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥४॥


२५१०
देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥
काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥
नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥
तुका म्हणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥


४४३
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥
ब्रम्ह जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥
यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥३॥


दै दो द्या द्र द्व

४०८१
दैत्यभारें पीडिली पृथवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । भक्तीप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥
जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥
गुण रूप नाम नाहीं जयासी। चिंतितांची तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी। असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥
सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा। जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥३॥
संतां महंतां घरीं म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥
भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पत्ती प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥


२०६३
दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥
सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥
आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥
आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥
तुका म्हणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हां ॥४॥


३७१०
दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एक एका छंदें रे ॥१॥
कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥
संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे । हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरी मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥
विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥
प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे । नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥
रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे । तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥


६९१
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठी । भक्तीकाजें विठ्ठला ॥१॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥
होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियांचे अवतार ॥२॥
केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साठी हातीं सांपडसी ॥३॥


३०३१
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात ॥१॥
अष्टोत्तरदशें व्याधि ज्या वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥
नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥
गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥
तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥


३१३
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥
हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥
तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजावया चिंता ॥२॥
तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी देवा ॥३॥


२४८८
दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥
बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥
एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥
तुका म्हणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥
३५८३
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥
करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥
लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥२॥
अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥३॥
व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका म्हणे मना मन साक्ष ॥४॥


३९९८
द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥
टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥
येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥
प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥३॥


१२९८
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥
किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥
करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥२॥
तुका म्हणे धीर कारण आपुला । तुह्मीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥


२७६४
द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥
म्हणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥
मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥
तुका म्हणे कळे । काय लाभ कोणे वेळे ॥३॥


७५४
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥


४००८
द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥
आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥
मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥३॥


३०८
द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥
माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥
कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥
भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥
तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥


३१६४
द्रव्य घेऊनियां कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥
माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा । तरी नारायण जिव्हा झडो ॥ध्रु.॥
साह्य तूं झालासी काय उणें तुपे । आणीक भूतांपे काय मागो ॥२॥
तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥


५४२
द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥
तुका म्हणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥


१४४९
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥
अंती बोळवणेसाठी । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥
लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥
तुका म्हणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥३॥


५४३
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥
आजिच्या प्रसंगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥
प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥
तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥


७९१
द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥
गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥
वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥
लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांठविलें ॥३॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥


२४८७
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥
आपुलिया शरणागता । वाहों चिंता नद्यावी ॥ध्रु.॥
वचना या चित्त द्यावें । असो ठावें तुम्हासी ॥२॥
तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥


३८८८
द्वेषाचिया ध्यानें हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्म अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणें लागे ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *