सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा ७ (झ, त, त्र )

संत तुकाराम गाथा ७ अनुक्रमणिका नुसार

झ झा झे

१२८६
झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥
काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥
तुका म्हणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥


१९६१
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥
जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥
जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥
तुका म्हणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥


३१२७
झंविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥
करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥
बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥२॥
तुका म्हणे ठावें । ऐसें झालें अनुभवें ॥३॥


३००
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥
तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥
परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥
गाऱ्हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥३॥


३०२९
झाडे वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥१॥
वल्कलें नेसुनि ढुंगा गुंडाळुन । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥
लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाठी ॥२॥
सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥३॥
ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका म्हणे त्याचा पांग फिटे ॥४॥


३८५९
झाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥
येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥
इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥३॥
हिरोनि घेतल्या कावडी सकळा । म्हणती गोपाळा बरें नव्हे ॥४॥
नव्हे तें चि करी न भे कळिकाळा । तुका म्हणे लीळा खेळे देव ॥५॥


३०९८
झाला जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥
करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥
जों जों धरिली भीड । तों तों बहु केली चीड ॥२॥
तुका म्हणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥३॥


२६४६
झाला हा डांगोरा । मुखीं लहानही थोरा ॥१॥
नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥
संचिताचा ठेवा । आतां आला तैसा घ्यावा ॥२॥
तुका म्हणे देवें । केलें आतां हें बरवें ॥३॥


३२८७
झालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक कांही देवा न लगे दुजें ॥१॥
प्रारब्धा अधीन अन्न अच्छादन । स्थिर करोनी मन ठेवी पायीं ॥ध्रु.॥
येगा येगा येगा कृपाळूवा हरी । निववी अभ्यंतरी देऊनि भेटी ॥२॥
आसावले मन जीवनाचे ओढी । नामी रूपीं गोडी लावियेली ॥३॥
काय तुम्हांपाशी नाही भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥
काय लोखंडाचे पाहे गणु दोष । सीवोनि परीस सोने करी ॥५॥
तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुले करावे ब्रीद साच ॥६॥


३९९४
झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी पाई ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥
अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥२॥
सावरीली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥३॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥४॥


२८३७
झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥
मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥
नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥
तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥


३१५५
झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥
वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेई रे तूं आतां धणीवरी ॥ध्रु.॥
प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विठ्ठली तीं ॥२॥
तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । म्हणउनि पुढती आणियेलें ॥३॥


३९४८
झाली होती काया । बहु मळीन देवराया ॥१॥
तुझ्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥ध्रु.॥
अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥२॥
तुका म्हणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराई ॥३॥


२८६८
झाले आतां साठे । कासयाचें लहान मोठे ॥१॥
एक एका पडिलो हाती । झाली तेव्हांची निश्चितीं ॥ध्रु.॥
नाही फिरों येत मागे । झाले साक्षीचिया अंगे ॥२॥
तुका म्हणे देवा । आतां येथें नाही हेवा ॥३॥


३६५१
झालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या ह्मैसी ॥१॥
राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥
स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें कळीकाळा ॥२॥
तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥३॥


१३१२
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥
सुरवाडिकपणें । जेथें सांपडलें केणें ॥२॥
तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥३॥


३७३९
झालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥
सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥
सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥२॥
तुका म्हणे झालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥३॥


३८९०
झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोंवरी हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तोचि देव ॥३॥
देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥
भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥


३६६९
झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥
त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरीलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥
आगळा होऊनि धरी वरीचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥२॥
हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥३॥
डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥४॥
तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥५॥

त तं

९८०
तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण ॥१॥
ऐशीं ज्ञानाचे डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥
उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥२॥
रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्पित ॥३॥


१०७६
तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥
परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥


१७६७
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥
दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥
मागें पुढें ॠण । तुका म्हणे फिटे हीण ॥३॥


३०८५
तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥
अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥
तुका म्हणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥


९९६
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये ॥१॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥२॥
व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाठी पाहे लाभ घात ॥३॥
तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥


१५८४
तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥
म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥
पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥


३९३९
तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥१॥
ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुम्हें नहीं ॥ध्रु.॥
दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सच्चा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥२॥
किसे कहे मेरा किन्हे सात लिया बास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥३॥ सुनो भाई कैसा तो ही । होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ॥४॥ भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख । कहे तुका सो ही संका । हाक आल्ला एक ॥५॥


२२७०
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम॥१॥
कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥
फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । तोचि होइजे स्वभावें॥३॥


३८३१
तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥१॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥
नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥
द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥
वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥
द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुके ॥६॥
तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥
राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥
तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥
गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥
त्यांचिये मुखींचे हिरोनियां घांस । झोंबती हातांस खाय बळें ॥११॥
बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥
पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥
मांदीं मेळवुनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाईं ॥१४॥


३९८१
तया साठी वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥
क्षेम माझे हरीजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥
परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥२॥
तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सखी तीं ॥३॥


२०६१
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥
उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥
कोळी भिल्ल पशु श्वापदें अपार । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥
काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥
तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥


१८९९
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥
उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥
मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे नांमासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥


३१०२
तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥
वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥
ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥
तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥


५५६
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥
वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खाती वास राणां तरी केला ॥३॥
लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥४॥
तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥


१२९७
तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥
नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥
जन्मल्याचे तें फळ। अंगीं लागों नेदी मळ ॥२॥
तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥


१३१९
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥१॥
एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥
फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥२॥
तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारिला ॥३॥


३३००
तरि च शोभे वेडी । नग्न होय धड फाडी ॥१॥
काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥
मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥२॥
न पाहे आणिकांचीवास । शूर बोलिजे तयास ॥३॥
तुका म्हणे या लक्षणे । संत अळंकार लेणें ॥४॥


४०४९
तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥
आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥
माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रम्हरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥२॥
माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढा आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥३॥
आळवीन करुणावचनीं। आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥४॥
आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥५॥


१६९२
तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥
आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥
पालवितों तुज उभरोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥
तुका म्हणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥


२१८८
तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिक्तहीन ॥१॥
कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥
तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुणे ॥२॥
चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥
तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥४॥
तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥५॥


२५४५
तरी कां वोळंगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥
अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥
कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥
तुका म्हणे ढाळे । बाहेर मुदे तें निराळें ॥३॥


२७०९
तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥
येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥
आवरील्या वृत्ति । मन घेउनियां हातीं ॥२॥
तुका म्हणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥३॥


२९६३
तरीच हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं ॥१॥
एक एका शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥
तुका म्हणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥३॥


२८२५
तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥
उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥
सांभाळावें तें म्या काईं । अवो आईं विठ्ठले । भोग जया जाईंन स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥
आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका म्हणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥


२२०४
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥
अवघाच एक ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥
निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥
तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥


१५३८
तरी हांव केली अमुप व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥
जालों हरीदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥
जनावेगळें हें असे अभिनव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिवसीं स्वामी ॠणी ॥३॥


१११९
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥
तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥
उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥
तुका म्हणे बिंबछाया । ठायीं पावली विलया॥३॥


३८०३
तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥
सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी वो ॥ध्रु.॥
भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग । तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें वो तुझे रंग ॥२॥
काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें वो ॥३॥
काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी ऐसा निष्ठुर निर्गुण । आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण वो ॥४॥
इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना । आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा वो ॥५॥


३८०२
तंव तो हरी म्हणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥
पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुद्धि वो ॥ध्रु.॥
कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । स्त्रियांनीं भ्रतारा दानां दिलें वो । कैसा भला मी नव्हे तें सोसिलें वो । रुससी तूं उफराटें नवल झालें वो ॥२॥
काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वें आणविलें हनुमंतासि वो । कष्टी केलें मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु म्हणे खरें खोटें नव्हे यासि वो ॥३॥


२११७
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥
वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥
वेठीऐसा करीं भक्तीवेवसाय । न पवे चि जीव समाधान ॥२॥
तुका म्हणे कई देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥


ता तां
२७५५
ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरी कळे ॥१॥
काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माझे आलें कोडें आजिवरी ॥ध्रु.॥
सेवेंविण आम्ही न लिंपों त्या कार्या । झाला देवराया निर्धार हा ॥२॥
तुका म्हणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें गर्जतसे ॥३॥


२९७७
तातडीची धांव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चितांचा ॥१॥
म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥
कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥
तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली । सांठवण्या खोली कासयांची ॥३॥


१३८४
तांतडीनें आम्हां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥
नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥
वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं धंदा ॥२॥
तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥


२२९६
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥
मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥
कलेवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥
तुका म्हणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरी ॥३॥


४०७०
ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥
रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥२॥
गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण । व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥३॥
ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥४॥
जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥५॥


३१७२
तांबगी हें नाणें न चले खऱ्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥
करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥
हिरियासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥२॥
देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥३॥
तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥४॥


३४०२
तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले से ॥१॥
राज्यपदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥
इंद्रियें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥
तुका म्हणे हरीभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥


१२९
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥
भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥
तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥३॥


२०६९
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥१॥
नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठी ॥ध्रु.॥
जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साठी ॥२॥
असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥
तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक- वेव्हार तयासाटीं ॥४॥


३६४२
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥
तो हा न करी तें काई । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥
सीळा मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥
वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥३॥


९८८
तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥
अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥
हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥
श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥
तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥


१०५३
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥
लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
जाला हरीनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥


१०३३
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥
जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥
शेष उरला तुका । जीवीं जीवा जाला चुका ॥३॥


१५५
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥
तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥२॥
कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होईं साहे ॥३॥


ति ती
३४१९
तिन्ही त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥
हातां आले घाव डाव । आमुचा मायबाप देव ॥ध्रु.॥
काय त्रिभुवनीं बळ। अंगीं आमुच्या सकळ ॥२॥
तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥३॥


२०५७
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥
पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥
आषाढी कार्तीकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥
मुक्ती कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥
तुका म्हणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥


३१३९
तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥
म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । अवघे साव चित्त तों ॥ध्रु.॥
तीर्थे न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे काशी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥३॥
येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथें ॥३॥


३८४७
तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥
मागें सरे माय पाउला पाउलीं । आपलाच घाली धाकें अंग ॥३॥
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥
जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥


१४२५
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥
वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥
अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥२॥
तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥


२५२२
तीर्थाचिये आसे । पंथ तो निदैव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥
म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥
संकल्पारूढ तें पराधीन जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥
तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥


९७१
तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥
तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥
जीवांचें जीवन सुखाचें शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥२॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥३॥
सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥४॥
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीती गातां ॥५॥


१०२४
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥
तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥
अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥
तुका म्हणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥


२३१२
तीर्थाची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥
बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥
करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥
तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोई माझी ॥३॥


८९
तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥


३२४
तीर्थें केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥
योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलपायीं। अनंत तीर्थे घडिलीं पाहीं ॥३॥


६५
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥
कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥
मानदंभपोटासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥
तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥
वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥
तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥


तु
३५०९
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय।
भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज ।
बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥
लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम ।
माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥१॥
तुका पंखिबहिरन मानुं । वोहि जनावर बाग ।
असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥१॥
तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर ।
तनकी करूं नावरी । उतारूं पैल तीर ॥१॥
संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार ।
चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥१॥
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दास । बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥१॥
राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड ।
हरीबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥१॥
राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख ।
आव न जानूं मते बेरों । जब काल लगावे सीख ॥१॥
कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार ।
मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥१॥
तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।
क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥१॥
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख ।
पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥१॥
कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय ।
हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥१॥
तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ।
चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥१॥
तुका सुरा बहुत कहावे । लडत बिरला कोये ।
एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥१॥
तुका मा†या पेटका । और न जाने कोये ।
जपता कछु रामनाम । हरीभगतनकी सोय ॥१॥
काफर सोही आपण बुझे । अल्ला दुनियां भर ।
कहे तुका तुम्हें सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका कठोर ॥१॥
भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये ।
निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥१॥
फल पाया तो सुख भया । किन्होसुं न करे बेवाद ।
बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥१॥
तुका दास रामका । मनमे एक हि भाव ।
तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥१॥
तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात ।
धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥१॥
चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये ।
तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥१॥
चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग ।
पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥१॥
तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये ।
दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥१॥
तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय ।
उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराई ॥१॥
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर मुंदाय ।
जबथे इच्छा नहिं मुई । तब तूं किया काय ॥१॥
तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक ।
मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥१॥
ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास ।
सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥१॥
कहे तुका भला भया । हम हुवा संतनका दास ।
क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥१॥
तुका और मिठाई क्या करूं रे । पाले विकारपिंड ।
राम कहावे सो भली रुखी । माखन खीर खांड ॥१॥


११८३
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥
नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरी गोविंद ॥ध्रु.॥
धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥
गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥
बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥४॥
संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥५॥
कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥
केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥
अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥


३८२४
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥
दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥
तटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥
कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्हीं कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥
खेळती भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित त्यांचें चित्त ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्याणीं केला हरी सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥१४॥


३८३०
तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥
करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥
दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥
नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥
मधीं जयां हरी तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥
तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥
निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका म्हणे संगीं क्रीडे तयां ॥७॥


१८३९
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥
शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥
धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥
दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाठी हरी आपुलिया ॥३॥
तुका म्हणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥


५५५
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥
शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥
भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्तांची परी नावडती ॥३॥
नवजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥


२४५६
तुज करितां होत ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥
परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥
उल्लंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥
पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥
अवघें हेळामात्रें हरी । मुक्त करी ब्रम्हांड॥४॥
तुका म्हणे खेळे लीळा । पाही वेगळा व्यापूनि ॥५॥


१८६३
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥
कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥
चुकलासी म्हणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥
तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुह्मी ॥३॥


२३८१
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥१॥
अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
सोळा सहस्त्र नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥
पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥
दशरथा पातकें ब्रम्हहत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥
मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥
तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥


३१९१
तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥
काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥
नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥
जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥
नामासाठी प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥४॥
तुका म्हणे आम्ही गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥


११८५
तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥
तुज नाचऊनि दाखवूं कौतुक । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥
तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥
तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तुत्वासी ॥३॥
तुका म्हणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥


५९०
तुज चि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥
पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥
ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥२॥
तुका म्हणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुह्मा ऐसा ॥३॥


१६२६
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥
तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥
अंक तो पडिला हरीचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां लागीं ॥३॥


३०८९
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥
ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥
बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥
दंड लाहें केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥


१७७८
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥
वर्म नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥३॥
वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥
तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥५॥


१९२४
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥
घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥
उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥२॥
कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥३॥
पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥५॥


११०४
तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥
माझा बळीया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥
शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥
कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥
वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥
हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥
वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य॥६॥
छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥
शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥
मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥
पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥
गजेंद्र स्मरे राम राम। त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥
तुका म्हणे हरीरूप जाले । पुन्हा नाहीं जन्मा आले ॥१२॥


१६९८
तुज नाहीं शक्ती । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥
ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥
लपोनियां आड । आम्हां तुझा कैवाड ॥२॥
तुका म्हणे तुजसाठी । आम्हां संवसारें तुटी ॥३॥


२९९६
तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥
नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥२॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥३॥


१४६२
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा ठाव नाहीं ॥१॥
करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें उत्तम दंडीलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥२॥
तुका म्हणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुम्ही साह्य न व्हा देवा ॥३॥


१२३७
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥
तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥
मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥
मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ॥३॥
तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥
तुका म्हणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥


४००
तुज मागणें तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥१॥
आन नेघों देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ॥ध्रु.॥
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥
तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥३॥


१०८६
तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥
सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ध्रु.॥
आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥
प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥
तुका म्हणे आतां कोणता उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥


३२७
तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे त्याचें ॥१॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥
अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥२॥
तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥३॥


३३८
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥
सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥२॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥४॥


३३७६
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं व्यापक विश्व जाणा ।
जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका ।
मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नासे काम ॥२॥
हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी ।
करूं मुखवाणी कसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥
भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वर्णितां शीणला शेषफणी ।
असो जीव भाव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥४॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ।
तुका राहिला पायिं तो राख देव । असें मागतों तुझी पादसेवा ॥५॥


३१४६
तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥१॥
कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥
मोकलिली आस । सर्वभावें झालों दास ॥२॥
तुका म्हणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥


२३६२
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥
ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥
तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥


१८२२
तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥
तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाठी । करिल वळवळ करंटी ॥२॥
तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर॥३॥


२४२
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥
लागलीसे आस पाहासे वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥
काम गोड मज न लगे हो धंदा । तुका म्हणे सदा हें चि ध्यान ॥३॥


२८१
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥२॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥
तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥


३३८५
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥
ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥
तुम्ही दिला धीर। तेणें मन झालें स्थिर ॥२॥
तुका म्हणे आड । केलों मी हें तुझें कोड॥३॥


८३९
तुजशीं संबंध खोटा । परता परता रे तू थोंटा ॥१॥
देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥
जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥


३४७८
तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥
सासुरवासा भीतों जीव ओढे तुजिपाशीं । आतां दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥ध्रु.॥
न कळतां संग झाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरी ॥२॥
तुका म्हणे असतां जसै तसै बरवे । वचन या भावे वेचूनियां विनटलों ॥३॥


३७५७
तुजसवे येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिल्या गिरी । चंग तई वांचलो ॥१॥
मोडा आतां खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फाकल्या ओढाळ । नाहीं तेच आवरा ॥ध्रु.॥
चांग दैवे यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही । नाहीं भय धाक या अनंता ॥२॥
खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल। आम्हां वाटते हे चित्ती ॥३॥
तुका म्हणे उरी नाही तुजसवे । शाहाणिया दुरी छंदभोळीया भावें ॥४॥


१०४४
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥
आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥३॥
तुका म्हणे माझें कोण हरील दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥


२२७६
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥
माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥२॥
नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥३॥
तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥४॥


४२०
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥
होउनी निर्भर राहिलों निंश्चितें । पावनपतित नाम तुझें ॥२॥
करितां तुज होय डोंगराची राई । न लागतां कांहीं पात्या पातें ॥३॥
तुका म्हणे तुज काय ते अशक्य । तारितां मशका मज दीना ॥४॥


३२२८
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥
भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥
नाम आदित्याचें झाड । त्याचा न पडे उजेड ॥२॥
सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥३॥
नाम सारखी करणी । कोठे नाही त्रिभुवनी ॥४॥
तुका म्हणे देवा । ब्रिद सोडोनियां ठेवा ॥५॥


१७०२
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥
तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥


४०१
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥
आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥
हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥
तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥


२२८०
तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझे हित पांडुरंगा ॥१॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥
अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥२॥
न करावी निरास न धरावे उदास । देईं याचकास कृपादान ॥३॥
तुका म्हणे मी तों पातकांची रासी । देईं पायापासीं ठाव देवा ॥४॥


२१७७
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥
आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥
रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥
तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥


१६६४
तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥
हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥
देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥२॥
अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥
तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥४॥


१७८२
तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥
तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥
तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥३॥


३०८१
तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥
अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु॥ तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥
तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगां जगदीशा पांडुरंगा ॥३॥


२९८०
तुझिया दासांचा हीन झालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥
तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥
आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥
सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों निश्चिंत तुझे पायीं ॥३॥
तुका म्हणे तुज असे माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥४॥


४०५८
तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥
न लवीं आणीक कांहीं पिसें। माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥२॥
तुज समर्पीली काया । जीवें भावें पंढरीराया। सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥३॥
चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव। आरुष भाव परि माझा ॥४॥
होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥५॥


२६७६
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥
आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥
वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥२॥
तुका म्हणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥३॥


३७०५
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिति ॥१॥
नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥
घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥
तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥


३०८८
तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥
येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥
ठावा थारा मारा । घरचीया संव चोरा ॥२॥
तुका म्हणे भेदा भेद । करुनि करितसे वाद ॥३॥


३७९
तुझे थोर थोर । भक्ती करिती विचार ॥१॥
जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥
तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं ॥३॥


२७४८
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥
धरणें घेतलें द्वारांत । नको धरूनी उठवूं हात ॥ध्रु.॥
घातली मुरकुंडी । झालों शिरोमणी लंडी ॥२॥
तुका म्हणे जगजीवना । ब्रिद पाहें नारायणा ॥३॥


३९७१
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोराच्या दैवें ॥ध्रु.॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥


१२८२
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥१॥
तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥
तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥
नाम घ्या रे कोणी फुका। भावें सांगतसे तुका ॥३॥


१८००
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥
हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
बहिरे कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जावोत डोळे ॥३॥
मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥
हातपाय तेणें पंथे न चलतां । जावोत अनंता गळोनियां ॥४॥
तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझें ॥५॥


२४९१
तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥
काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥
भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥
तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥


१९२७
तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥
आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चालवितां ॥ध्रु.॥
मन स्थिर ठेलें इंद्रियें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥२॥
पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥३॥
तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥४॥


१९९७
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥
करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥
तुका म्हणे आई । हातीं धरूनि संग देई ॥३॥


३३७३
तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तहान ॥१॥
जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काई ॥ध्रु.॥
माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥२॥
तुका म्हणे साचें । तेथें मागील कईचें ॥३॥


४४४
तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥
मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥
रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥२॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यांसी ॥३॥
तुका म्हणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काई ॥४॥


१८२
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥


१२७२
तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥
मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांडवीन पोटीं ॥ध्रु.॥
नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥
तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥३॥


१७४९
तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥
मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥
तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥


१६९९
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥
झडलें उरलें किती । आम्ही धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥
कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥
तुका म्हणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥


१२२५
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥
आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥
काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥
संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥


१४३८
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे ॥१॥
सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥
वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥
जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पहिला नांवें तुका म्हणे खंडलें ॥३॥


३६६
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥१॥
ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥
वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥२॥
तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥३॥


६१७
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥
कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥
तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥


६५९
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें। उत्तरेन खरें भवनदी ॥३॥


७०५
तुमची ती भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥
आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥
तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥
तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥३॥


२३२८
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
भक्तीभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥
कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥
संतांचे सेवटीं उिच्छष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥
करीं इच्छा मज म्हणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥
तुका म्हणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥


२८५२
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥
लागेल पालट फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥
तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला से लाग जगनिंदेचा ॥२॥
तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥


३६८२
तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥
सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥१॥
चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥
अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥३॥
रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥४॥
जाणो तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥५॥
याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥६॥


३६५९
तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥
माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥२॥
तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥३॥


१३४८
तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥
उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥
नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥
तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥


१८८०
तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥
वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥
सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥
जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥
तुका म्हणे आम्हां हाचि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥


२६८४
तुम्हां आम्हां सरी । येथें कईच्याचा परी ॥१॥
स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥
खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥
तुका म्हणे कोडें । आम्ही नाचों तुज पुढें ॥३॥


१३७३
तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥
किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥
बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥२॥
तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥


२८२८
तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥
आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥
बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥
लाविता आभार । तुका विसरलेती फार ॥३॥


४८७
तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥
होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥
नसतें सांभाळिलें। जरि तुह्मीं आश्वासिलें ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥३॥


१२२०
तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥
फुकासाठी जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥
कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें ॥२॥
तुका म्हणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥३॥


२१९७
तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥
विचारा जी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥
आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ती खुंटलिया ॥२॥
तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥३॥


२८६६
तुम्हांसी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवूं मी ॥१॥
आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥
कृपा झाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥
तुका म्हणे मागें बोलिलों तें वाव । आतां हाचि भाव दृढ झाला ॥३॥


२६४४
तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥
कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठुर पणें टाळितसां ॥ध्रु.॥
आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । काय असां निजले ॥३॥


६०४
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन ते ॥२॥
तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥


१३१६
तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची ॥१॥
आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥
सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥
तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥


१२५२
तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥१॥
जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥
केली जिवा साठी । आतां सुखें लागा पाठी ॥२॥
तुका म्हणे ठाव । न सोडणें हाचि भाव ॥३॥


४००९
तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥
चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥
तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥


३९६९
तुम्ही ये तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥
टोंकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥
प्रेम देउनि बहुडा झाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥


१९९५
तुम्हीं तरी हो श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥
दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥
माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥


२७६५
तुम्ही तों सदैव । अधीरपणें माझी हांव ॥१॥
जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥
येथूनि सोडवा । आतां अनुभवें देवा ॥२॥
तुका म्हणे झालें । एक मग हें निमालें ॥३॥


१७६१
तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥१॥
आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥
भय नाहीं मनीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥
तुका म्हणे भये । आतां स्वप्नीं तेही नये ॥३॥


१०१०
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले ॥१॥
नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥
आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥२॥
तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥


२८०६
तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥
आतां दोहीं पक्षीं लागलें लांछन । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥
एकांतीं एकलें न राहे निश्चळि । न बैसे चपळ मन ठायीं ॥२॥
पायीं महत्वाची पडिली शृखळा । बांधविला गळा स्नेह हातीं ॥३॥
शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा रुचेचीना ॥४॥
तुका म्हणे झला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥


३४१२
तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥
देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायीं । झालों उतराई ठावें असो ॥३॥


१६७६
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥
तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥


३५६७
तुह्मी संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥
काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥
भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती ॥२॥
न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥३॥


२४२५
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥
वाढविलें सुख भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥३॥


३६१२
तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥
भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥२॥
तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥


६०३
तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥
सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥


४०६०
तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥१॥
भुक्तीमुक्ती जयाच्या कामारी । रिद्धीसिद्धी वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥
जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥
सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पिक्षश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तीकाजा लवलाहीं ॥५॥


तू तूं तृ
३०४३
तू आम्हां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥
तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥
गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥
तुका म्हणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥


३५३४
तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥
माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥
कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥२॥
तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आई । आतां पुढें काई तुज घालूं सांकडें ॥३॥


३९८७
तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥
आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥
तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥
म्हणे तुकयाबंधु करिता कर्ता करयिता देवा । तूं च भाव भक्ति पूजा पुरस्कार आघवा ॥३॥


४०२५
तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥१॥
संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥
मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥३॥
आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपित्तराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥४॥
जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥५॥


८४४
तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥
म्हणोनि तुझ्या दारा । न येती ठकती दातारा ॥ध्रु.॥
तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लौकीक ॥२॥
तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥३॥


४०७३
तूं बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी म्हणउनी । आतां करीन मी असेल तें ॥१॥
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥२॥
उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥३॥
तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धन । मी तों पामर काय तेथें ॥४॥
किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु म्हणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥५॥


३५३८
तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥
देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥
तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां त्तवांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥
कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥


२९५८
तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥
कूट खाती मागें पुढें । जाती निरयगांवा पुढें ॥ध्रु.॥
मज म्हणती कवी । निषेधुनि पापी जेवीं ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥


२३३१
तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥
तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार। तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥
सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातसें ॥३॥
तुका म्हणे तुज विकला जीवभाव। कळे तो उपाव करीं आतां ॥४॥


१३९६
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥
तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥


७३५
तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥
ऐसियाचा बरवा संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥
मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥
तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥


ते,तो,तों
१४४४
तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥
आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥
आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥
तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥


२९८१
ते चि करीं मात । जेणें होईल तुझें हित ॥१॥
काय बडबड निमित्य । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥
जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥
आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥
क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया कुष्ठतां ॥४॥
वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें बोले ॥५॥
तुका म्हणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥


५३७
तेज्या इशारती । तटा फोकावरी घेती ॥१॥
काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥
नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥२॥
तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥३॥


१९८०
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्पपणे । नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥
आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन । दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥
आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप । मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप । ज्योति ना अंधार अवघा एकंकार। तेथें काय पुण्यपाप । विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया । सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया । मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां । तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥


२२४
तेणें सुखें माझें निवविलें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥
कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥
मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची सर्व गेली ॥२॥
तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा । रंगलो केशवा तुझ्या रंगे ॥३॥


१५५४
तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरीनामें ॥१॥
दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥
विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥
पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥३॥


१४०
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥
येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥
सर्वभावें झालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥
तुका म्हणे जैसे मानती हरीदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥


२४१०
तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झालें तुज ॥ध्रु.॥
तुजवरी आतां प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥


३१
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥
नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥


३४८
तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥१॥
तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥
त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥२॥
तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥३॥
तुका म्हणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥४॥


२१८९
तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काई ॥१॥
धांवा केला आतां येईल धांवोन । येथे काही करणे न लगे संदेह ॥ध्रु.॥
गायनाचा आतां कोठें उरला काळ। आनंदें सकळ भरी आलें ॥२॥
देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥३॥
तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात। प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥४॥
तुका म्हणे आह्मीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥५॥


१३५८
तेव्हां होतों भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥
आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥
सन्मुख जालों स्वामीकडे । भव आंगडे निराळे ॥२॥
चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥
सहज स्थिती आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥
तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥
तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥


२४७९
तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥
स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला किळकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥
अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥
तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥


७४९
तोंचि हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥
रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥२॥
तुका म्हणे देहसंबंध संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥३॥


११५७
तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥
ऐशियाच्या उपदेशें । भवबंध कैसें नासे । बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥
आणिक नाहीं जोडा । देव म्हणवितां तया मूढा ॥२॥
आणिकांचे न मनी साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥३॥


१८१६
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काई ॥ध्रु.॥
धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काऱ्हाळे जिरें बीज ॥२॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥


१६४०
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥
एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥
कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥२॥
खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥
निजतां आला मोहो । वीतां म्हणे मेला गोहो ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥५॥


१९११
तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥
हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥
जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥२॥
तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हार संपादणी ॥३॥


३८९५
तो बोले कोमळ निष्ठुर साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥
करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥
दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥
त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥
शरणागतां राखे सर्व भावें हरी । अवतार धरी तयांसाठी ॥५॥
तयांसाठी वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥
तळमळ नाहीं तुका म्हणे चित्ता । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥


३८६६
तो या साच भाव न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा ॥१॥
घाली मेघ धारा कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥
देखती पाऊस वोवळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥
विचारी पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥
लागलेंसे गोड न कळे त्या काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥
आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥
यांचिया विचारें होणार ते काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥७॥


त्या त्यां
३५८६
तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥
कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥
दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव॥२॥
आपुलिया भोगें होइऩल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥३॥
तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥४॥


३३९१
त्याजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥
नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥
तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥


१५६४
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥
मग जैसा तैसा राहें । कव्य पाहें उरलें तें ॥ध्रु.॥
अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥२॥
तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥


४५६
त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥१॥
भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥
देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥२॥
तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥३॥


२५११
त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥
आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥
सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥
तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥


२६१६
त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग ॥१॥
तेथे माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलोसे ॥ध्रु.॥ चरणींचे रज लावीन कपाळा । जी पदे राउळा सोई जाती ॥२॥
आणिक ती भाग्ये येथे कुरवंडी । करुनियां सांडी इंद्राऐसी ॥३॥
वैष्णवांचे घरी देवाचे वसति । विश्वास हाचित्ती सर्वभावे ॥४॥
तुका म्हणे सखे हरीचे जे दास । आतां पुढे आस दुजी नाही ॥५॥


३४४४
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥
मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥
तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥


३८१२
त्यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥
दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥


जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥
ज्यांचें कृष्णीं तन मन झालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तयां झालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्फटिकशिळा ॥९॥


३७३०
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तोचि देईल तें खावें ॥१॥
न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥ध्रु.॥
कान्होबा तू जेवीं घासोघासीं आळविती। आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥
तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥३॥


३१२९
त्या हरीदासांची भेटी घेतां । नरका उभयतांसी जाणे ॥१॥
माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥
देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥
तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥३॥


त्र
३०५३
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥
ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरी मिठी ॥ध्रु.॥
कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥
नाहीं पूर्व पुण्य मज पामरासी । म्हणोनि पायांसी अंतरलों ॥३॥
अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥


२९९०
त्राहे त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥
एक चि मागणें देई तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥
तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥
बापा विठ्ठलराया हें चि देई दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥
आवडीसारखें मागितलें जरी । तुका म्हणे करीं समाधान ॥४॥


७५६
त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥
मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरी वाहे ॥ध्रु.॥
पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती। तेथें सत्तानायेका ॥२॥
तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥३॥


२३०६
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले॥१॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥
हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥
तुका म्हणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥


३११
त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥
पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *