सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा ४ (क)

संत तुकाराम गाथा ४ अनुक्रमणिका नुसार

२९१९
कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥
आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळवेळ तुटी झाल्या तरे ॥ध्रु.॥
सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झालें ॥२॥
पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥३॥
म्हणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अट्टाहासें ॥४॥
दुःखा च्या उत्तरी आळविले पाय । पाहणे ते काय अजून अंत ॥५॥
तुका म्हणे होईल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला॥६ ॥


२५६१
कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥
काय ऐसा पात्र होईन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईल ॥२॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन तें नित्य प्रेमसुख ॥३॥


६९०
कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥
केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥
म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हे चि मज आहे थोरी आशा ॥२॥
माझिया मनाचा हाचि पै विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥३॥
तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलों मी ऐसा साच भावे ॥४॥


४०७२
कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ती सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥
ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥
ऐसा कई येईन दैवास । दृष्ठि दृश्य हे नासोनि जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥
कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहातील पूर आनंदाचे ॥३॥


३१०३
कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥१॥
तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥
वरी कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥२॥
मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥३॥
ऊंस बाहेरी दिसे काळा । आंत रसाचा आगळा ॥४॥
तुका म्हणे मोल गोडी ।काय चाड वरील्या खोडी ॥५॥


७२
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥
हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥
नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥
वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥
तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अकळा ॥४॥


३७२५
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥
काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥
वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥
तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥३॥


१२२९
कंठी नामसिक्का । आतां कळिकाळासी धक्का ॥१॥
रोखा माना कीं सिक्का माना । रोखा सिक्का तत्समाना ॥ध्रु.॥
रोखा न मना सिक्का न मना । जतन करा नाककाना ॥२॥
सिक्का न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥३॥
सिक्का मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥४॥
तुका म्हणे नाम सिक्का । पटीं बैसलों निजसुखा ॥५॥


१०९२
कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥१॥
ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥
संतांचिये पायीं । ठेवींतो वेळोवेळां डोई ॥२॥
तुका म्हणे तरें । भवसिंधु एक सरें॥३॥


१३०४
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥
लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥
संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥
तुका म्हणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥३॥


३४८३
कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥१॥
काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥
सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥
तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भणभण ॥३॥


२२४२
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥
मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥
पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥
मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥
मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥
आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥


९६८
कथा करोनिया द्रव्य देती घेती । तयां अधोगति नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥२॥
तुका म्हणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥३॥


४३७
कथा करुनियां दावी प्रेमकाळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥
तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिका धरी बोंडी नासिकाची ॥धृ॥ टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥२॥
गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ॥३॥
कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमेवीण डोळे गळताती ॥४॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥५॥


९७६
कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥१॥
ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा । अखंड स्मरा रामनाम ॥ध्रु.॥
मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगाविया ॥२॥
तुका म्हणे करीं ब्रम्हांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥३॥


२२४४
कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥
टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥
नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥
तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥३॥
कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥४॥
आपण बैसे बाजेवरी सामान्य हरीच्या दासां धरी । तरि तो मूळावरी वाहिजे निश्चयेसीं ॥५॥
येतां न करी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥६॥
तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥७॥


२२४६
कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥
जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा ॥ध्रु.॥
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥२॥
अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णु या सुखा ॥३॥


२२४५
कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥
ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥
मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥
भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं म्हणे तुका ॥३॥


१९८१
कथा पुराण ऐकतां । झोंपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥
ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जे चित्ती । कांहीं नेघे आपुल्या ॥ध्रु.॥
उदक लावितां न धरे । चिंता करी केंव्हा सरे । जाऊं नका धीरे । म्हणे करितां ढवाळ्या ॥२॥
जवळी गोचीड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका म्हणे दूर । देश त्याग तयासी ॥३॥


२०९४
कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥
कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥
कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरीकथा ॥२॥
कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप कळीकाळासी ॥३॥
तुका म्हणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥४॥


१८५६
कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचे ते अन्न ॥१॥
करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥
देऊळ नव्हे घर । प्रपचं परउपकार ॥२॥
विधी र्सेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥३॥
हत्या क्षात्रधर्म । नव्हे निष्काम ते कर्म ॥४॥
तुका म्हणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥५॥


२०५१
कथा हें भूषण जनामध्ये सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥
नीचिये कुळींचा उंच वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥
देव त्याची माथां वंदी पायधुर्ळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥
तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम घ्यावें ॥४॥


१९८३
कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथे तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥
तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥


१०२६
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥
कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥
तुका म्हणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥


३९७४
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥
नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥३॥


२६२७
कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥
पुण्य घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेई सेवटीं ॥ध्रु.॥
कथा विरस पाडी आळस । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें । विटाळसी नावेसी ॥२॥
सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहे म्हणे हरी । विनंती करी तुका हे ॥३॥


४०८९
कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥
वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळितां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृष्टि समान तुकया लागली पायीं ॥५॥


९८
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥
आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥


१४३
कन्या सासुर्‍यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥


१४९
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥८॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥९॥
नाहीं हालवीत माळ । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥
आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥
नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥


३४९३
कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥
जग डरे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदसाहि पैठा ॥ध्रु.॥
भला पाऊं जनम इन्हे बेर । बस मायाके असंग फेर ॥२॥
कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलि पसारा ॥३॥


१७
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥


१५७
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥
अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥
हें चि एक वर्म । काय बोलिलो तो धर्म ॥२॥
तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥


३१२२
करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां ॥१॥
जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥
शरणागतां देव राखे । येरां वाखे विघ्नाचे ॥२॥
तुका म्हणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥३॥


१७१
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥
आपुलें देऊनी आपुला चि घात । शन करावा थीत जाणोनियां ॥२॥
देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडूं नये ॥४॥


३४११
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥
कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥


३३७०
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥
दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥
होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातेवाहेटाळीं । जव मोकळी आहेती ॥२॥
कां रे घेतलासी सोस । तुज वाटताहे कैसें। तुका म्हणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥३॥


३१२
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥
वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥
पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥
तुका म्हणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥


१३९७
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥१॥
बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥
आतां कोठें काळ । मध्ये रिघेल ओंगळा ॥२॥
तुका म्हणे पंढरीराया । थापटितों ठोक बाह्या ॥३॥


२५७९
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥१॥
सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥
ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा ते उरे मागुताले ॥२॥
तुका म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥


२१९८
करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥
पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥
दुश्चितासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आम्ही भाव जाणतसों ॥२॥
तुका म्हणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥३॥


२२९१
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥
निरसनें माझा होईल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥
राहिलों डीकोनी कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥
तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥


१६९३
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥
जाणतसां तुह्मीं लाघव रूपाचें । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥
काय म्हणऊनि आलेती आकारा । आम्हां उजगरा करावया ॥२॥
तुका म्हणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥३॥


३६६८
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥
स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥
खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥
गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥
घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥
नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥५॥
चरणीं ठेवा चित्त । म्हणवा देवाचे अंकित ॥६॥
छंदे नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥
जगाचा जनिता । भुक्तीमुक्तींचा ही दाता ॥८॥
झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥
यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥
टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥
ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥
डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥
ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं॥१४॥
नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥
तरणा भाग्यवंत । नटे हरीकीर्तनांत ॥१६॥
थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥
दया तिचें नांव । अहंकार जाय जीवे ॥१८॥
धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥
नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥
परउपकारा । वेचा शक्ती निंदा वारा ॥२१॥
फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२॥
बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥
भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥
माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥
यश कीर्ती मान । तरी जोडे नारायण ॥२६॥
रवि लोपे तेजें । जरी हारप हें दुजें ॥२७॥
लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥
वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥
सारतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥
खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥
सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥
हातीं हित आहे । परि न करिसी पाहें॥३३॥
अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥
ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३५॥


२८९२
करावा वर्षाव । तृषाक्रांत झाला जीव ॥१॥
पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगदिश ॥ध्रु.॥
संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥
तुका म्हणे फळें । चरणांबुजें ते सकळ ॥३॥


३००२
करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥
देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥
रुसावें फुगावें आपुलियावरी । उरला तो हरी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे संतपण याची नांव । जरी होय जीव सकळांचा ॥३॥


४६
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु.॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥


३१८९
करावें कीर्तन । मुखीं गावे हरीचे गुण ॥१॥
मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥
शांतिखड्ग हातीं । काळासी ते नागविती ॥२॥
तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥


१४२
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥१॥
आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥
वियोग तो तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥२॥
तुका म्हणे पायें । डोळा सुखावे त्या न्यायें ॥३॥


३५८
करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥१॥
बरवा अंगीं राहे भाव । तंग तोचि जाणा देव ॥ध्रु.॥
दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥२॥
तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥३॥


३६२६
करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥
अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥
दुजयाची सत्ता । न चलेसी झाली आतां ॥२॥
आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥३॥


२२५९
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एक एकां॥१॥
गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥
प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥
तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होईल हा सीण निवारोनि ॥३॥


२०१८
करितां कोणाचे ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥
बरे करावे हे काम । धरिले नाम दीनबंधु ॥ध्रु.॥
करुनि अराणूक पाहे । भलत्या साहय व्हावया ॥२॥
बोले तैसीं करणी करी । तुका म्हणे एक हरी ॥३॥


२५२०
करितां ताडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥
करित्याचा आग्रह उरे । एक एकासाठी झुरे ॥ध्रु.॥
भुके इच्छी अन्न । तें ही त्यासाठी निर्माण ॥२॥
तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥


३०३
करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥


१९९३
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
माथां पडती संतपाय । सुख कैवल्य ते काय ॥ध्रु.॥
ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥
तुका म्हणे गोड । तेथे पुरे माझे कोड ॥३॥


१४१३
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थे ॥१॥
शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥
पाठीवरी मोळी तोचि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥२॥
आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका म्हणे ओढी पायां सोई मनाची ॥३॥


१३६१
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥
मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साठी जीवें भावें नारायणा ॥ध्रु.॥
उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥२॥
तुका म्हणे माझें खरें देणें घेणें । तुम्ही साक्षी जाणें अंतरींचें ॥३॥


१९६७
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तों झोंडाईचे चाळे । काय पोटीं ते न कळे ॥ध्रु.॥
आरोगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका म्हणे किती । बुडविलीं आळवितीं॥३॥


२१९२
करितां होय होय चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥
मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥
साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥२॥
तुका म्हणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥३॥


६४१
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥२॥
निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥३॥
तुका म्हणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥४॥


२४१२
करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥
देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥
बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । म्हणोनियां जीवा भय वाटे ॥२॥
होईल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हाचि मज ॥३॥
तुका म्हणे मी कमाईचे हीण। म्हणऊनि सीण करीं देवा ॥४॥


२६२
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥
जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥
तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥


२४५८
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥
केला अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥
इत्थंभुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥
तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥


२९६४
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥
तैसें झालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥
घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव । बुडवी तारूं तरतीया ॥२॥
चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका म्हणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥


२८९३
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥
मग तो माझा मायबाप । घेईल ताप हिरूनी ॥ध्रु.॥
बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥२॥
तुका म्हणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥३॥


६४९
करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥१॥
प्रेम झोंबे कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥
राहो लोकाचार । पडे अवघा विसर ॥२॥
तुका म्हणे ध्यावें । तुज व्यभिचारभावें ॥३॥


११३८
करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥
रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥
नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचि ते वाणी गुण वदे ॥२॥
मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥३॥
उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥४॥
तुका म्हणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुम्हां भिन्न नाहीं माझा ॥५॥


२१०२
करीन कोल्हाळ । आतां हाचि सर्वकाळ ॥१॥
आतां ये वो माझे आई । देई भातुकें विठाई ॥ध्रु.॥
उपायासी नाम। दिलें याचें पुढें क्षेम ॥२॥
बीज आणि फळ । तुका म्हणे हें चि मूळ॥३॥


३५७२
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥
जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥
घरीं लागे कळ। नाहीं जात तो शीतळ ॥२॥
तुका म्हणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥३॥


१६७१
करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥१॥
मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥२॥
तुका म्हणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥३॥


४३०
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥१॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥
मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥२॥
तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥३॥


१०५७
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥१॥
लागो हाचि छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥


३५१६
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥
नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥
वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥
तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ॥३॥


२३०९
करूं जातां सन्निधान । क्षण जन पालटे ॥१॥
आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥
हरी दासांचा समागम । अंगी प्रेम विसावा ॥२॥
तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥३॥


१३३८
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिहीं केला मूर्तीमंत । ऐसा संतप्रसाद ॥ध्रु.॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥२॥
तुका म्हणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥३॥


३९८८
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥
आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥
चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥२॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें देवा ॥३॥


२७६९
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥
होतें तें चि झालें । नाम ठायींचें पडीलें ॥ध्रु.॥
उतरलें डाई । उत्तम सुलाख ते ताई ॥२॥
हिंडवितां देशोदेश । तुका म्हणे नाहीं नाश ॥३॥


१५४७
करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥१॥
ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥
प्रिया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥२॥
तुका म्हणे एका । हरीविण नाहीं सखा ॥३॥


२४४३
करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥
तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥
तेथे सरे शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥२॥
तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥३॥


२३२७
करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥१॥
जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥
पुरे पुरे आतां तुमचें ब्रम्हज्ञान । आह्मासी चरण न सोडणें ॥२॥
विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥३॥
सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥४॥
तुका म्हणे नाहीं मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥


२७२८
करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥१॥
होतें तें चि असों द्यावें । रूप सौम्य चि बरवें ॥ध्रु.॥
भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या कोपें कोठें जावें ॥२॥
तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥३॥


३९४७
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥
असो नमो भाव आलों तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहें मज पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥


३८०१
करूनी आइती सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी वो रे ॥१॥
सर गा परता तुझा कळला भाव । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥
मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा झाली काय रे । मागुती रुद्रासि भेटी दिली तई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥२॥
भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसल्या रे ॥३॥


४००७
करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥ध्रु.॥
पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥
तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥


३५६०
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥
जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥
येथें न करी काम। मुखें नेघें तुझें नाम ॥२॥
तुका म्हणे कुळ । तुझें बुडवीन समूळ॥३॥


२२२८
करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥
येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥
सुखदुःखें तुज देऊनी सकळ । नाहीं ऐसा काळ केला आम्ही ॥२॥
तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाहीं आतां पर आप दोन्ही ॥३॥


१९७०
करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥
म्हणवूं हरीचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥
तुका म्हणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥


२१८
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥
आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥
पावोत आत्मिस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद । आम्हां हरीच्या दासां निंद्य ॥३॥


२०२५
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥
नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥
तुका म्हणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कुऱ्हाडी ॥३॥


८८९
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥
भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥
प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥
तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥


७९५
कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥
तप व्रत करितां लागती सायास । पाळितां पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥३॥
तुका म्हणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥


४३९
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु.॥
डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥२॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥४॥


१५१८
कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥
धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥
बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥
तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥


२०१२
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥
तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥
द्यावें तें उत्तर । येतो प्रतीतीचा तो फेर ॥२॥
तुका म्हणे मनीं । आपुल्या च लाभहानि॥३॥


६२४
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥१॥
उदंड त्या गाई ह्मैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥


२५८४
कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥
आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥
गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरी ॥२॥
तुका म्हणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥३॥


१८०३
कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक । कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥१॥
कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥ध्रु.॥
जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें । पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समर्पीली ॥२॥
पितरस्वरूपी तूं चि जनार्दन। सव्य तें कवण अपसव्य । तुका म्हणे जीत पिंड तुझे हातीं । देऊनि निंश्चिती मानियेली ॥३॥


१९००
कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥
धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥
आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥२॥
तुका म्हणे एके गांवींची वसती । म्हणऊनि खंती वाटे देवा ॥३॥


२८११
कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥
दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥
सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग ॥२॥
धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥३॥
तुका म्हणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥४॥


१८३६
कवतुकवाणें । बोलों बोबड्या वचनें ॥१॥
हें तों नसावें अंतरीं । आम्हां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥
स्तुति तैसी निंदा । माना सम चि गोविंदा ॥२॥
तुका म्हणे बोलें । मज तुह्मी शिकविलें ॥३॥


३६९८
कवळाचिया सुखें । परब्रम्ह झालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥
कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥
घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरी छंदें नाचतसे ॥२॥
काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवें तया । आम्ही ही सोंकलों ॥३॥


८९७
कवेश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होईल तोंड ॥ध्रु.॥
सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतंत ते गुण जैसेतैसे ॥२॥
सेव्य सेवकता न पडतां ठावी । तुका म्हणे गोवी पावती हीं ॥३॥


३५२२
काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥
काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥
नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥२॥
तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥


४०८३
कंसरायें गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्ती ॥१॥
जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥
स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें । दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥२॥
अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार । पांगलीं साई अठरा करितां वेव्हार । तो वळितसे गौळियांचें खिल्लार ॥३॥
तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट । गिळिलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उच्छिष्ट ॥४॥
महिमा वर्णु तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावेंविण कांहीं न चले चि युक्ती । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥५॥


२१२७
कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखूं ॥१॥
तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ती सरों द्याव्या ॥ध्रु.॥
इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें ओहोळ तों चि ॥२॥
तुका म्हणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥३॥


१८०६
कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥
लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥ध्रु.॥
तुका म्हणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥२॥


१२९०
कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥
आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥
काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥
फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥३॥
तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥४॥


२४४९
कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥
तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता झालें जिणें ॥ध्रु.॥
पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥
आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठुर झालासी तूं ॥३॥
तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥


४०१३
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥
पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥
शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥२॥
तुका म्हणे पोट । भरलें वारले बोभाट ॥३॥


२५४४
कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥
तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥
पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥२॥
तुका म्हणे मोल । न लगें द्यावें वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥


५३०
कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥
सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥
अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥२॥
इंद्रियांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥
तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥४॥
तुका म्हणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥५॥


२०६०
कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥
करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥
होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥२॥
काय करूं कळा युक्ती या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥३॥
तुका म्हणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥४॥


२९८२
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आटकेली ॥१॥
जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे शेवटीं हातीं कांहीं ॥ध्रु.॥
देव जोडे म्हणोन सांगतसे लोका । माझा मीच देखा दुःख पावे ॥२॥
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥


१४८४
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुम्हांसी ॥१॥
तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥
आड ऐसें येतें पाप । वाढे ताप आगळा ॥२॥
तुका म्हणे गुण झाला । हा विठ्ठल हीनशक्ती ॥३॥


२६२८
कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसणें ॥१॥
वाट पाहासी आमुची । सत्ता सतत कईची ॥ध्रु.॥
बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणीं चि लपा ॥२॥
तुका म्हणे तूं परदेशी । येथें आम्हां अंगे जिसी ॥३॥


२६६१
कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥१॥
धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ध्रु.॥
होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तोचि मी हा न्याहाळीं धरुनी दृष्टी ॥२॥
तुका म्हणे तुज रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥३॥


६३८
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥
जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥
आंविसासाठी फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठे बळीवंत ॥३॥


२९२०
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥
तुम्हां शिरीं होता भार । आम्हां कैचा संसार ॥ध्रु.॥
होतें अभयदान । तरी स्थिर होतें मन ॥२॥
तुका म्हणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥


का कां

३८७९
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥
भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥
वत्सें गाईं पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥
चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥
तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥


३७६०
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥
तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥
आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥


१२७
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥
अवघा झाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरीदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥
दोहीं ठायीं फजीत झालें । पारणें केलें अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जेणे ॥५॥


१८२१
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥
तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥
गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥२॥
वधुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥३॥
पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले॥४॥
तुका म्हणे हा भक्तंचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥५॥


३४७३
कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥
लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥
तुका म्हणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥


३१५२
कां गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥
तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥
तुका म्हणे माझी होईल माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥३॥


७०४
कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥
उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥
नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥
तुका म्हणे इच्छा । तैसा करीन सरसा ॥३॥


२७८५
कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥
कां जी आम्हांवरी आणिकांची सत्ता । तुम्हांसी असता जवळिकें ॥२॥
तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥३॥


२८५६
कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायीच्या ठायीं ॥१॥
कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥
दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥२॥
तुका म्हणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण म्हणऊनि ॥३॥


९३३
कां जी धरिलें नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥
कोणां सांगतसां ज्ञान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥
आवडीनें नाचें। आहे तरी पुढें साचें ॥२॥
तुका म्हणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥३॥


२३१५
कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥१॥
येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥
देहआत्म वादी । केला घात कुबुद्धी ॥२॥
तुका म्हणे मन । कळवटी वाटे सीण ॥३॥


२११३
कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥१॥
आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥
लावूनियां सवे। पळतां दिसाल बरवे ॥२॥
तुका म्हणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥३॥


६३७
कांडील्या कुटल्या होतो मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥
तरटापुढें बरें नाचे। सुते काचें मुसळ ॥२॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥


३४६७
कांद्यासाठी झालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥
ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥
पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥२॥
तुका म्हणे कैंचें ब्रम्ह । अवघा भ्रम विषयांचा ॥३॥


६३
कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण झाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥


३०७३
कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥
घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥
पोट भरावया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नरक लोका ॥३॥


११५९
कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥
म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥
कथे कांहीं अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्तं चित्त । समरसीं खंडणा ॥२॥
कां वैष्णव पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥३॥
ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥
घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥


९६४
कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥
पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानी एक आपुल्याला मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥२॥
तुका म्हणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥३॥


२२५०
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ॥१॥
काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥
येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥
तुका म्हणें पाहिलें मागें । एवढया वेगें अंतरला ॥३॥


३८०४
कान्हो एकली रे तुजसवें चुकलें रे । भय वाटे जनीं मज अबळा धाकली रे ॥१॥
निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥२॥
पिकल्या बोरी झालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥३॥
आड खुंट झालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥४॥
तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥५॥


३६९९
कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेंदूं ॥१॥
वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदूं ॥ध्रु.॥
ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥२॥
तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥३॥


३७१५
कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां वोखटे ॥१॥
परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ध्रु.॥
तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥२॥
जरी तुझी आई । आम्ही घालूं सर्वा ठायीं । तुका म्हणे तें ही । तुज वाटे भूषण ॥३॥


३५३५
कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥
चुकी झाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या॥ध्रु.॥
नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥२॥
गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका म्हणे जाणावें ॥३॥


१६५०
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥
आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रम्हांडाचा ॥३॥


६६५
काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥
कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध झालें ॥२॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥


२६०३
कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं झालों देवा ॥१॥
आवरीतां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥
तुझिया विनोदें आम्हां प्राणसाटी । भयाभीत पोटीं सदा दुःखी ॥२॥
तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥३॥


३३६१
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥
ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥
बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाठी तळमळीं ॥२॥
तुका म्हणे नारायणा । भले लोकीं हें दीसेना ॥३॥


९०४
काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥१॥
फावल्या त्या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥
नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें विव्हळतसे ॥२॥
एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥३॥


१६१
काम बांदवडी । काळ घातला देशधडी ॥१॥
तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥
शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥
रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥


३६७७
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । झाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या ॥१॥
देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरी मेळीं ॥ध्रु.॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरी मेळवी त्यांत तें ॥२॥
भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥
मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥
एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥


३२३८
कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥
माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥
त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥३॥
वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥४॥
ताईंत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥६॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥७॥
तुका म्हणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥८॥


३५४१
कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥
कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥
नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥२॥
तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥३॥


३५५२
कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥
पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥
कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥२॥
कां या इंद्रियांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥३॥
तुका म्हणे कइप जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥४॥


४७४
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥
तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥


१८४५
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥
नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥
लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोई चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥३॥


३११५
कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥
कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥
जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥
केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे वर्मे । जाणोनियां तरती ॥३॥


३४७५
कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥
कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥
प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥
येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥३॥


३७०६
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥
तुझ्या राहिलों आधारें । झालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥
तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥२॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥


३८४१
काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥
माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥
क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥३॥
करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥४॥
तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥


३८३८
काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥
लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥
झालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥
आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥
भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका म्हणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥


६११
काय आह्मीं आतां पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥
काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥
तुका म्हणे काय गुंफोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥


३२२५
काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥
हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥
गजा नाड्या सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥२॥
तुका म्हणे गणिका नष्ट । माझे कष्ट त्याहूनि ॥३॥


४०६५
काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥
कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥
काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥
काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥४॥
तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका म्हणे ॥५॥


२००
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥
ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥


३७८०
काय उणें कां करीतोसी चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी ।
परेपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त ॥ध्रु.॥
बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी ।
करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥२॥
तुज म्हणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता ।
न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥


५५८
काय उणें झालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥
तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥


३१६०
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥
कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥
स्वर्गसुखें आम्हीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥२॥
तुका म्हणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥


२८६२
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥
अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥
माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुम्हां जगीं सोयरिका ॥२॥
तुका म्हणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचा ठायीं ॥३॥


१००३
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥
देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥
काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥४॥
कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ॥५॥
काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥६॥
काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ॥७॥


१६६९
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥
कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होईल दया ॥२॥
तुका म्हणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥३॥


२०९५
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥
तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥
करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥
तुका म्हणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥


१६१८
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥
आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥
पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥
तुका म्हणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी॥३॥


३५९०
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥
काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥
काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं विवंचना ॥२॥
आणीक ही त्यासी बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥३॥
तुका म्हणे आम्हां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥४॥


१५५१
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥
नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥
होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥२॥
तुका म्हणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥३॥


३३०५
काय करतील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥
तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥
विष्णुमूर्तीपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥२॥
तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥३॥


५५९
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥
सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
अनेक दीपीका प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥
तुका म्हणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥३॥


३१४३
काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना ।
प्रार्थितांही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥१॥
आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी ।
न दिसे कोणी आवरी । आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥
न राहे एके ठायीं एकी घडी । चित्त तडतडा तोडी ।
भरले विषय भोवडी । घालूं पाहे उडी भवडोहीं ॥२॥
आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं ।
तुका म्हणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी ॥३॥


३२३६
काय करूं आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ॥१॥
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥ध्रु.॥ आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । धीट नीट जावे होऊनियां ॥२॥
तुका म्हणे मना समर्थासी गाठी । घालावी हे मांडी थापटूनी ॥३॥


५६०
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥
होसी नामा च सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥
तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हां ओझें ॥३॥


२१५५
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥
जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥
घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥२॥
आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥३॥


१३९३
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥
पडिलें हें दिसे ब्रम्हांड चि वोस । दाटोनि उछ्ववास राहातसे ॥२॥
तुका म्हणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥३॥


३३४६
काय करूं न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥
ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥ध्रु.॥
कुटुंबाचा तुम्हां भार । मज व्यवहार निमित्त ॥२॥
तुका म्हणे करितां काम । हृदयीं नाम धरीन ॥३॥


२८७३
काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची ॥१॥
सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ध्रु.॥
काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित ॥२॥
आमचे कुळीं नव्हतें ऐसें । हें च पिसें निवडलें ॥३॥
लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥
तुका म्हणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टांचीं ॥५॥


२७३८
काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥१॥
हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥
द्वैताचिया कैसा सांपडलों हातीं । बहुत करती ओढाओढी ॥२॥
तुका म्हणे आतां आपुलिया सवें । न्यावें मज देवें सोडवूनि ॥३॥


१८५५
काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥१॥
अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी ॥ध्रु.॥
भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥२॥
बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ॥३॥
किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥४॥
मज राखें आतां । तुका म्हणे पंढरिनाथा ॥५॥


२५६६
काय करूं सांगतांही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥१॥
मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥
अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥
तुका म्हणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥३॥


१६८
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥
आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥
देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥
तुका म्हणे भावें । माझे मज समजावें ॥३॥


४०७५
काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । नेऊं पतना आदरिलें ॥१॥
भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कटपट । घात बळकट मांडियेला ॥२॥
न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥३॥
चेतवूनि इंद्रियें सकळ। आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥४॥
आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥५॥


११२
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥
अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥
काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥
तुका म्हणे प्रेमें विण । अवघा शीण बोले भुंके ॥३॥


७९९
काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होईल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ती गोड देवा ॥४॥


६०७
काय कृपेविण घालावें सांकडें । निंश्चिती निवाडें कोण्या एका ॥१॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥
धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुर ॥३॥


१७३९
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥
तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥


३१६
काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥
कोपला पाटील गांविचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥
आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥
भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥


३५३६
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥
उताविळ झालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥
तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥


२०७५
काय जाणों वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥
एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥
कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥२॥
तुका म्हणे दीना । नुपेक्षावें नारायणा॥३॥


३५४७
काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥१॥
बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥
नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठूर पाहिजे ॥२॥
पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥
तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥४॥


१७३३
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥
तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥


११२३
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥
झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥
हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥
तुका म्हणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥


२८९४
काय तुज कैसें जाणवेगा देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥१॥
सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझे ॥ध्रु.॥
कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥
तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥३॥


२७३१
काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥१॥
डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥
न कळे उचित न संगतां स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥
तुका म्हणे माझा घात तुम्हां ठावा । तरि कां आधीं देवा वारूं नये ॥३॥


४०८२
काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥
मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एकाभावेंसी। नित्यमुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥
न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । अखंड तुझा वास तयांच्या चित्तीं । धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्थे मिळन वास तयांचा वाहाती ॥४॥
देव भक्ती तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ती हे जनीं । जड जीवां उद्धार होया लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥५॥


१८४०
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥१॥
जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां ॥ध्रु.॥
घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥२॥
नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥३॥
तुका म्हणे याच्या उपकारासाठी । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥४॥


१६४६
काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥१॥
काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥
काय तुझें आम्हां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥२॥
तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥३॥


२६८१
काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥१॥
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥
कोण तुम्हां सुख असे या कौतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मी ॥२॥
तुका म्हणे काय झालासी निर्गुण । आम्हां येथें कोण सोडवील ॥३॥


३४००
काय तुम्ही जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची ग्वाही । निवडिली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥
कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥
आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥
आणीक कोणी भीती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥४॥
तुका म्हणे बीज पोटीं । फळ तैसें चि शेवटीं ॥५॥


५०५
काय ते विरक्ती न कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदें या ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया ते मी काय जाणें । विठ्ठलकीर्तनें वांचूनियां ॥२॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंदे या जनामाजी असे ॥३॥
कासया उदास होऊ देहावरी । अमृतसागरीं बुडोनिया ॥४॥
तुका म्हणे मज असे हा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥


१८९५
काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शक्तीहीण ॥१॥
माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरीष्ठ तें ॥ध्रु.॥
काय गमाविली सुदर्शन गदा । त्या भेणे गोविंदा लाजतसां ॥२॥
तुका म्हणे काय ब्रिदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥३॥


२४७४
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥
निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥
तुका म्हणे भावभक्ती हे कारण । नागवी भूषण दंभ तोचि ॥३॥


३४७
काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥१॥
तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥
रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्धी ते ठायीं ॥२॥
काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥३॥
वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥
तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥५॥


७९
काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥
कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥
आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥
तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥


३४२०
काय दिला ठेवा । आम्हां विठ्ठल चि व्हावा ॥१॥
तुह्मी कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥
काय जीव देता तरी । वचना नये येका सरी ॥२॥
गोमांसासमान । तुका म्हणे आम्हां धन ॥३॥


२६२३
काय दिवस गेले अवघे चि वराडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥
क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईल पुढें ॥ध्रु.॥
कथेचे विसर दोषामूळे होय । तरणोपाय कैचा मग ॥२॥
काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥३॥
ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शुद्ध रत्नें ॥४॥
तुका म्हणे हें चि बोलावया चाड । नाम घेता गोड हित असे ॥५॥


२०२२
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥
करी अक्षरांची आटी । एके कवडी चे साटीं ॥ध्रु.॥
निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥
तुका म्हणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥


१२०२
काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥
म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥
काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥२॥
कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । म्हणतां हरी हरी तुका म्हणे॥३॥


४९२
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥
काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥
काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥३॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥४॥


२४०८
काय धर्म नीत । तुम्हां शिकवावें हित ॥१॥
अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥ध्रु.॥
नाम महादेव । येथें निवडला भाव ॥२॥
तुका म्हणे वेळे । माझें तुम्हां कां न कळे ॥३॥


२१८२
काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥
पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥
कामक्रोधा वेगळा ऐसा होई कां सोंवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥


२१८६
काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥१॥
उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥
घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥२॥
लावूनि बैसे टाळी । मन इंद्रियें मोकळीं ॥३॥
हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां॥४॥
तुका म्हणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥५॥


३८४
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥१॥
मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥
त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥३॥


४११
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥
सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥
योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥
तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥३॥


२११२
काय नेहेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥१॥
मुंग्या कैंचे मुंगळे । नट नाट्य तुझे चाळे ॥ध्रु.॥
जाली तरी मर्यादा। किंवा त्रासावें गोविंदा ॥२॥
तुका म्हणे साचा । कोठें जासी हृदयींचा॥३॥


११४९
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥
काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥
अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥
लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची ॥४॥


२५६३
काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥
चित्तासी प्रसाद होईल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥
सर्व शिक्त जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत आपुलें तें ॥२॥
तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥३॥


५३४
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांवें ॥ध्रु.॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥


३२१८
काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हांपें ॥१॥
आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥
कैसी तुम्हां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥२॥
आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंच्या ॥३॥


३५९९
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥
आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥
फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥२॥
तुका म्हणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा॥३॥


१२५६
काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥
काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥
काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥२॥
कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥४॥


१०१६
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥१॥
तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥
काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥२॥
तुका म्हणे नेणें । काय केलें नारायणें ॥३॥


३५५३
काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥
करूं कलागती। तुज भांडणें भोंवतीं ॥२॥
तुका म्हणे टांचें । घरीं झालेंसे वरोचें ॥३॥


१३८०
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥
कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥
वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥२॥
भक्तीभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा ॥३॥
कोरड्या उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥४॥
करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥


२५६९
काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया ॥१॥
उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥
चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥२॥
तुका म्हणे शेवट झाल । देव या बोला भोगिता ॥३॥


३२९७
काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥१॥
जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें॥ध्रु.॥
जरी मागों ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥
स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥३॥
मागो जरी पद वैकुंठ । ते तव येकदेशी करंटे ॥४॥
आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥५॥
तुका म्हणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥६॥


१३४७
काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥
खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥
आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥
तुका म्हणे मज येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनींच ॥३॥


१७०८
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥१॥
कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥
बोबडा उत्तरीं म्हणें हरीहरी । आणीक भीकारी नेणें दुजें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास । करितों मी आस उच्छिष्टाची ॥३॥


९८९
काय माझें नेती वाईट म्हणोन । करूं समाधान कशासाठी ॥१॥
काय मज लोक नेतील परलोका । जातां कोणा एका निवारील ॥ध्रु.॥
न म्हणें कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥२॥
सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥३॥
तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥४॥


३३४२
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥१॥
आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥
लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥२॥
भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥३॥
माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥४॥
तुका म्हणे नारायणा । तुम्ही जाणां बुझावूं ॥५॥


१४७३
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥
माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोणी सांगा ॥ध्रु.॥
धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥२॥
वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुम्हां एक सांगतों मी ॥३॥
तुका म्हणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावे ॥४॥


४०२३
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥
काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥
काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाइल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥२॥
काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥३॥
काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥
ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥५॥


३३८६
काय मी जाणता । तुम्हांहुनि जी अनंता ॥१॥
जो हा करूं अतिशय । कां तुम्हां दया नये ॥ध्रु.॥
काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हांहुनि ॥३॥


२७५
काय म्यां मानावें हरीकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥
पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥
तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥


१२३६
काय लवणकणिकेविण । एके क्षीण सागर ॥१॥
मा हे येवढी अडचण । नारायणी मजविण ॥ध्रु.॥
कुबेर अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥२॥
तुका म्हणे काचमणी । कोण गणी भांडारी ॥३॥


१०१४
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्रवतसे ॥४॥


२७१९
काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥
आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥
बहुत करुणा केलेंसे भाषन । एक ही वचन नाहीं आलें ॥२॥
माझी कांहीं सेवा होईल पावली । निंश्चिती मानिली होती ऐसी ॥३॥
तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखें चि ॥४॥


२५९९
काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥
तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥
न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥
तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥


९१७
काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥
देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥
सातांपांचांचें गोठलें । प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोग सांभाळीं ॥२॥
फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका म्हणे मधीं । कोठें नेघें विसावा ॥३॥


१९७१
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ध्रु.॥
काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥
तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥


२८१४
काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥
काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥
सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥
तुका म्हणे वत्स धेनुवेचે चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥३॥


२५०
काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥
बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥
तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥


२१६४
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥
रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥
चौघांचिया मतें। आधीं खरें केलें होते ॥२॥
तुका म्हणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥३॥


३०५५
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥
सर्वकाळ वाचे उच्चारितां हरी । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥
तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥


७४२
काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥
केलें हरीकथेनें वाज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥
काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥
तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥


३३८७
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥
ऐकोनियां लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥
तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥
तुका म्हणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥


६४६
कायावाचा मन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥१॥
अवघें आलें आंत पोटा पडिलें थीत । सारूनि निंश्चित जालों देवा ॥ध्रु.॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥२॥
तुझ्या रिणें गेले बहुत बांधोनी । जाले मजहूनी थोरथोर ॥३॥
तुका म्हणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेई देवा ॥४॥


१५४१
कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥१॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥२॥
तुका म्हणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥३॥


१४२२
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारांसी ॥१॥
काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥
केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पलटेना ॥२॥
तुका म्हणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥३॥


३२९१
कारणा कारण वारीयेलें जेथें । जातों तेणें पंथे संतसंगे ॥१॥
संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । पांडुरगं भेटे भरंवसेनी ॥३॥


२८७४
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥
शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोषे ॥ध्रु.॥
पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणे ॥२॥
तुका म्हणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥३॥


३७२४
कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें झालें काई । एका तें का नेणसी ॥१॥
केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥
वोला खोडा खळि गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥२॥
चाले चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥३॥


२५३८
कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें ॥१॥
भक्तीप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥
पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रह्मानंदें ॥२॥
तुका म्हणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळाअसे वरी ॥३॥


२६३२
कां रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥१॥
काय गणिकेच्या याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥ध्रु.॥
ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी त्यांच्या पातकां नाहीं थार ॥२॥
पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचें पुण्य ॥३॥


८१०
कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥
आणीक ही भोग आणिकां इंद्रियांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥२॥
रूप दृष्टि धाय पाहातां पाहातां । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥
तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठी । देवासवें तुटी करितोसी ॥४॥


१६०३
कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा॥१॥
अंगीं असोनियां बळ । होसी खटयाळ नाट्ट्याळ ॥ध्रु.॥
आम्हां नरकासी जातां । काय येईल तुझ्या हातां ॥२॥
तुका म्हणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥३॥


२७१७
कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥
होईल यमपुरी । यमदंड यातना थोरी ॥ध्रु.॥
कोण झाली लगबग । काय करिसि तेथें मग ॥२॥
कां रे भरला ताठा । करिती वोज नेतां वाटा ॥३॥
तोंडा पडिली खिळणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥४॥
कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥५॥
लाज धरीं म्हणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥६॥


२२२६
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥
तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥४॥


२९९५
कां रे पुंड्या मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥१॥
ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥
युगें झालीं अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥
भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥३॥
तुका म्हणे पुंडलिका । तूं चि भक्त बळिया निका ॥४॥


२६८
कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥
कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति खुंटे चि ना ॥२॥
तुका म्हणे कां हो धरियला कोप । सरलें नेणों पाप पांडुरंगा ॥३॥


११३९
कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥
कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥ध्रु.॥
कां रे माझें माझें म्हणसील गोत । नो सोडविती दूत यमा हातीं ॥२॥
कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥


तुका म्हणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥४॥


१८९
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥
पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥
चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥
मळिालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुल्लती । शूर उठावती । एक एका आगळे ॥३॥
नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥
आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥
मरण मुक्ती वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥६॥
तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥


२५५७
कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥
काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥
रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥२॥
तुका म्हणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥


३४८२
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥
ऐशी अभाग्याची बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥
नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार लेणें ॥२॥
तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥


३७३२
काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥
लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥
उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे । जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥२॥
तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥३॥


२२९८
कावळिया नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळते ॥१॥
तैसें कुजनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥
कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥
तुका म्हणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥


२९८६
कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥
बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥२॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥३॥


२५२८
काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥
कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥
समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥
तुका म्हणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाठी ॥३॥


२३५
कास घालोनी बळकट । झालों कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥
या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥
कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥
एकंदर शिक्का । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥


२३६४
कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥
कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥
कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥२॥
कासया करावे मुक्तीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥३॥
तुका म्हणे करीं कीर्तन पसारा । लाभ येईल घरा पाहिजे तो ॥४॥


११६३
कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥
कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥
नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मीयेलो ॥२॥
तुका म्हणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥३॥


१९७६
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥
काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥
नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥
तुका म्हणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥


११४५
कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥
विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥
काय वानरांची अंगींची ते शक्ती । उदका तरती वरी शिळा ॥२॥
तुका म्हणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥३॥


११४२
कासया पाषाण पूजितसा पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥
भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥
काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥२॥
काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥
काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥४॥
तुका म्हणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥५॥


१३४६
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥१॥
चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिर नेणे ॥ध्रु.॥
सांवळें रूपडें चतुर्भुज मूर्ती । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥२॥
तुका म्हणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥३॥


१६२९
कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥
ग्वाही बहुतांची घालूनियां वरी । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥
तुम्हां वेगळ्या आपुल्या ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥२॥
भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥३॥
ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज देवा ॥४॥
तुका म्हणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥५॥


२६०६
कासया वांचूनि झालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥
जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥
काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥
तुका म्हणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥३॥


३१६८
कासया व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडुनियां थीत प्रेमसुख ॥१॥
वैष्णवांचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥ध्रु.॥
काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥२॥
सुख आम्हांसाठी केलें हें निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥३॥
तुका म्हणे मज न लगे सायुज्यता । राहेन या संतां समागमें ॥४॥


२७२३
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥१॥
मग तळमळ न करितें मन । झालें तें कारण कळों येतें ॥२॥
तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वैद्यासी ते भीड मरण रोग्या ॥३॥


१७४७
कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥
फळदाता तूंच तांबूल अक्षता । तेथे काय आतां वाहों तुज ॥३॥
वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रम्ह तें चि अन्न दुजें काई ॥४॥
गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥
तुका म्हणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप राम कृष्ण हरी ॥६॥


२८२२
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥
म्हणविल्यासाठी कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥
वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्हीं ॥२॥
नाहीं मनोगत तोंवरी देवा । तुका म्हणे सेवा नेघेजेतों ॥३॥


३५३१
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥
अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढें ॥ध्रु.॥
बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥
तुका म्हणे कांहीं न करावेंसें झालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥


२७३
कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥
नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥
नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥
नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥
तुका म्हणे नांमरूप नाहीं आम्हां । वेगळा या कर्मा अकर्मासी ॥४॥


३९०२
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥
द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म पाळी ॥२॥
पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ॥३॥
अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाहीं तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥५॥


३५५४
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥
तरी हा पडिला विसर । माझा तुम्हां झाला भार ॥ध्रु.॥
आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां गांठी ॥२॥
तुका म्हणे घरीं । बहु बैसले रिणकरी॥३॥


२०८०
कांहीं जडभारी । पडतां ते अवसरी ॥१॥
तुझे आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥
तहान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥२॥
तुका म्हणे देहयोगे । वारंवार पीडिती भोगे ॥३॥


७७७
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥
भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥
अळंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरीकथा ॥२॥
तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडी घडी लाहो ॥३॥


२०४३
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥
होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥
तुका म्हणे भक्तीभाव । तोचि देवाचा ही देव ॥३॥


१५८१
कांहीं न मागे कोणांसी । तोचि आवडे देवासी ॥१॥
देव तयासी म्हणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥२॥
नाहीं नाहीं त्यासमान । तुका म्हणे मी जमान ॥३॥


९७
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार । जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं । पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला । पाठीं लागे आल्या । अतिताचे द्वारेशीं ॥३॥
कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥


१९२०
कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुम्हांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥१॥
काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥
घडे अवज्ञ सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें । आहे ठावें तुह्मासी ॥२॥
तुका म्हणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पाळिला पाळावा । लळा पुढती आगळा ॥३॥


३५२४
कांहीं मागणें हें आम्हां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥१॥
देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुद्धि राहिलीसे ॥ध्रु.॥
शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥२॥
तुका म्हणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥३॥


३५४२
कांही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे ॥१॥
नाही तरी येथे न घडे अनुचित । नाही ऐसी रीत तया घरी ॥ध्रु.॥
कळावे ते मना आपुलिया सवे । ठायीचेहे घ्यावे विचारूनी ॥२॥
तुका म्हणे मज अव्हीरीले देवे । माझीया कर्तव्ये बुद्धीचिया ॥३॥


३५०२
काहे भुला धनसंपत्तीघोरे । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥१॥
राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥ध्रु.॥
माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥२॥
राना रंग डोंगरकी राई । कहे तुका कर इलाहि ॥३॥


३५०३
कहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥१॥
केते मालुम नहिं पडे । नव्हे बडे गये सो ॥ध्रु.॥
बाप भाई लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥२॥
काले बाल सोपत भये । खबर पकडो तुका कहे ॥३॥


२६६९
काहे लकडा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥१॥
देवलवासी तरवरछाया । घरघर माई खपरि सब माया ॥ध्रु.॥
कां छांडियें भार फेरे सीर भागें । मायाको दुःख मिटलिये अंगें ॥२॥
कहे तुका तुम सुनो हो सिद्ध । रामबिन और झुटा कछु धंदा ॥३॥


१५१०
कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥१॥
उफराटी तुम्हां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥
साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥२॥
तुका म्हणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥३॥


४९१
कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥१॥
कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥
कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥
काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥४॥
तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥५॥


३४५०
कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥१॥
मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥
होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां खंती रे ॥२॥
तुका म्हणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥३॥


१७९२
कां हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥
आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥२॥
तुका म्हणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥३॥


२४५
कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥
कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥
लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥


२९८५
कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥
तुझा म्हणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥
काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥२॥
नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥३॥
तुका म्हणे चाले आणिकांची सत्ता । तुज आठवितां नवल हें ॥४॥


४०५९
कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥
पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥
काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥


आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥
नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥५॥


२८१८
कां हो वाढवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोड्याचें ॥१॥
ठेविन पायांवरी डोईं । यासी तुमचें वेचे काईं । झालों उतराईं । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥
निवाड आपणियांपाशीं । असोनकांव्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥
तुका म्हणे गोड । होतें झालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥३॥


१९७७
काळ जवळचि उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥
कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥
काळ जवळिच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥
काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥
काळ भोंवताला भोंवे । राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥
तुका म्हणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥५॥


२०६४
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥
मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥२॥
तुका म्हणे थीत । नागवला नव्हे हित॥३॥


३८५०
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उघवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥
पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसरली ॥४॥
विसरु हा तीस कैसा याचा झाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥
दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥६॥
पाहिलें पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडें झालें आतां ॥७॥
आतां हा उठोनि खाईंल या बाळा । देईंल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वांचे म्हणे नारी । मोहिली अंतरीं हरीरूपें ॥९॥
रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥


६२०
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥
देह समर्पीजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा। तुका म्हणे आनंद ॥३॥


२६७४
काळा च सारिखीं वाहाती नक्षत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥१॥
ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें ॥ध्रु.॥
शीतउष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषतां वाव होय शीण ॥२॥
तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणें तया ॥३॥


९९०
काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥१॥
सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाहीं ॥ध्रु.॥
याकारणें माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥२॥
तुका म्हणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तें चि खरें ॥३॥


१७६२
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥
ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥
तुका म्हणे बाण । हातीं हरीनाम तीक्षण ॥३॥


२२००
काळावरी घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥
आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥
देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥
तुका म्हणे होईल दर्शने निश्चिंती । गाईन तें गीतीं ध्यान मग ॥३॥


२८८७
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
तो मी हीना हूनि सांडें । देवे दुऱ्हे काळतोंडें ॥ध्रु.॥
मानूनी भरवसा । होतों दासा मी ऐसा ॥२॥
तुका म्हणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥३॥


३७६४
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥
दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥
रूपा भिन्न पालट झाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥
आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥


२५७
काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्तीसंहारघडमोडी ॥१॥
बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥
तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥


कि की

१८६०
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥
कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां । अल्पसुखासाठी पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥
नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥२॥
तुका म्हणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें ॥३॥


३५७१
किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख ॥१॥
आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥
पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥२॥
तुका म्हणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥


२६४७
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥
असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥
आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥२॥
तुका म्हणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥३॥


२०८६
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥१॥
आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥
राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥
तुका म्हणे तैसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥


९४२
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥१॥
लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥
उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवें चि तें ॥२॥
तुका म्हणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥


२५९७
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥
माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥
कांहीं न मागतां भलें । होईल तें चि काम केलें । नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पें ॥२॥
तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥


१३२०
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥
कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥
इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥
तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥३॥


१७२६
किती वेळी खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥
लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥
सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥२॥
तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥


१६१९
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥
प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥
तुका म्हणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥


३२८९
किती सांगों तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥
नका नका करूं रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥ध्रु.॥
तुका म्हणे जरी देवे नाही चाड । हाणोनि थोबाड फोडी काळ ॥२॥


२९३४
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥
रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवा विषय माजिरा ॥ध्रु.॥
कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥
तुका म्हणे जन । ऐसें नांवबुद्धीहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक न मिळे ॥३॥


२१७३
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥
उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥
उतावीळ बाह्या भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥२॥
तुका म्हणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंद्रियांची ॥३॥


९०६
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप ॥१॥
प्रेमेछंदें नाचे डोले । हारपले देहभाव ॥ध्रु.॥
एकदेशीं जीवकळा। हा सकळां सोयरा ॥२॥
तुका म्हणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥३॥


६४५
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥ध्रु.॥
वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥२॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥


३०५६
कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥
भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥
त्रैलोक्य भ्रमण करित नारद । त्यासंवे गोविंद फिरतसे ॥२॥
नारद मंजुळ सुस्वरें गीत गात । मार्गा चालताहे संगें हरी ॥३॥
तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥


३२५२
कीविलवाणा झाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥
अभिलाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥
विश्वासिया करीता घात । न धरी चित्त कांटाळा ॥२॥
तुका म्हणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥


कु

३१३१
कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥
दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥
दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥२॥
तुका म्हणे झोंडगीं हो । फुंदा कां हो कोरडी ॥३॥


७३६
कुचराचे श्रवण । गुणदोषांवरी मन ॥१॥
असोनियां नसे कथे । मूर्ख अभागी तें तेथें ॥ध्रु.॥
निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥२॥
पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥३॥
हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥४॥
फजीत करूनि सोडीं । तुका करी बोडाबोडी ॥५॥


१२८
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥
भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥


२१४३
कुतऱ्या ऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे॥१॥
जाय तिकडे हाडहाडी । गोऱ्ह्ववाडी च सोइरीं ॥ध्रु.॥
अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥२॥
तुका म्हणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥३॥


३३२६
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडावा ॥१॥
ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥
हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीला पाणी ॥२॥
तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥३॥


३८२८
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥
कळला हा देव तयासीच खरा । गाईं वत्सें घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
ब्रम्हादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका म्हणे व्हावे संचित हें ॥५॥


२४९
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥


३१०६
कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥
बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥
परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥
तुका म्हणे विसावलों । येथें धालों धणीवरी ॥३॥


५५२
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥
तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥३॥


९८५
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥
धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥
न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥२॥
जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु जो भूतीं दयावंत ॥३॥
तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥४॥


२२८२
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे ॥१॥
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥२॥
कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥३॥
तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव । यथाविध भाव जरीं होय ॥४॥


१३६३
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥
बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥
आणिला ही रूपा बळें । करूनि खळें हरीदासीं ॥२॥
तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥


१७७४
कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
पंढरीस कोणी जाती वारेकरी । होईन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥३॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥
तुका म्हणे हाचि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥


कृ

१८०
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥
तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥
पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझा करावा कुढावा ॥३॥


३९२
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥
भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥२॥
तुका म्हणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥३॥


१८७६
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥
आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥
अनंत अरुपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा ॥२॥
चांगली हि नामे घेतली ठेऊन । जालासी लहान भक्तीकाजा ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा । मस्तक गोविंदा असो मज ॥४॥
२०९०
कृपावंता दुजें नाहीं तुम्हां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥१॥
घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रम्हरस ॥ध्रु.॥
आपुलिये पांखे घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥२॥
तुका म्हणे आम्हांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥३॥


३८६९
कृपावंतें हाक दिली सकळिकां । माजिया रे नका राहों कोणी ॥१॥
निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥
लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे फुंदे रडे कोणी धाकें ॥३॥
धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥४॥
तयाखालीं गाईं वत्सें आलीं लोक । पक्षी सकळिक जीवजाति ॥५॥
जिहीं म्हणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी नरी ॥६॥
जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥


६८८
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥
आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥
नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥
कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥
तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल भूक या डोळियांची ॥४॥


३९९१
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥
उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥
भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥२॥
तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥३॥


२१७०
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरी उपेक्षीना ॥३॥


१६९१
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥१॥
मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाई काचें ॥ध्रु.॥
जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥२॥
तुका म्हणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥३॥


९७३
कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥
बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहो ॥ध्रु.॥
अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारें । माप भरा वरें सिगेवरी ॥३॥


३१९२
कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥१॥
बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ध्रु.॥
तेणें सुखें मन स्थिर झालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥२॥
नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥३॥
तुका म्हणे झालों आनंदेनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥४॥


३७२२
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥
होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥
सदा नाम वाचें । गाती प्रेमेआनंदें नाचती ॥२॥
तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥


१८५३
कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां गीतीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥
आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥
ओविया दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥२॥
नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥३॥
तुका म्हणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥४॥


२३३
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥


३८२३
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥
वांयांविण तुम्हीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥
याचें सुख तुम्हां कळलियावरी । मग दारोदारीं न फिराल ॥५॥
लटिकें हें तुम्हां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥
अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें कृष्णध्यान ॥८॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥
आणिका ही तुम्हा येती काकुलती । जवळी इच्छिती क्षण बैसों ॥१०॥
बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्ती बाळा ॥१२॥
बाळा येती घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका म्हणे ॥१३॥


३८७५
कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तहान । सदा समाधान सकळांचें ॥१॥
कळलें चि नाहीं झाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥२॥
विसरु कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥३॥


४७५
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥१॥
निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥
भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होईजेतें ॥२॥
तुका म्हणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥३॥


३९९२
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥
घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥
लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आम्हांसी ॥२॥
म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥३॥


१३५९
केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥
काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥
अबाळीनें जावें निश्चिंतीच्या ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥
तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥३॥


के

२५९२
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥
होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेंदावी ॥ध्रु.॥
आम्ही तरी जड जीव । कैंचा भाव सपुरता ॥२॥
अनन्यभावें घ्यावी सेवा । आम्हां देवा घडेसी ॥३॥
तुह्मीं आम्ही शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥४॥
तुका म्हणे भाकुं कींव । असों जीव जड आम्ही ॥५॥


१९६४
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥
आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥
आपला निवाड । आपणें चि करितां गोड ॥२॥
तुह्मीं आह्मीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥
आसे धुरे उणें । मागें सरे तुका म्हणे ॥४॥


३८३२
केला पुढें हरी अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥
सोयी लागलिया देवाची आवर्ती । बोलवितां येती मागें तया ॥३॥
तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥४॥
सुख नाहीं कोणा हरीच्या वियोगें । तुका म्हणे जुगें घडी जाय ॥५॥


१३९
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥
केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥


३६४८
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥
लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥
औदार्याची सीमा । काय वर्णु रघुरामा ॥२॥
तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥३॥


२३९८
केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥१॥
माझी बुद्धी स्थिर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥
भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥२॥
तुका म्हणे जोडी । आदीं अंतीं राहो गोडी॥३॥


४०११
केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥१॥
बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥
उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥२॥
तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥३॥


११०८
केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥
तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥
ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥
घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥


१५५२
केली सलगी तोंडपिटी । आम्ही लडिवाळें धाकुटीं ॥१॥
न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥
अवघ्यांमध्यें एक वेडें । तोचि खेळविती कोडें ॥२॥
तुका म्हणे मायबापा । मजवरी कोपों नका ॥३॥


१६०
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥
जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥२॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥
जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥
तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥


१०८५
केली हर्णाळां अंघोळी । येऊनी बैसलों राउळीं ॥१॥
आजिचें जाले भोजन । रामकृष्ण नारायण ॥धृ॥
तुकयाबंधू म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥२॥


२८८१
केलें तरी आता साचची करावे । विचारिले द्यावे कृपादान ॥१॥
संकल्पासी नाही बोलिला विकल्प । तुम्हा पाप पुण्य कळे देवा ॥ध्रु॥
उदार विख्यात तुम्ही भूमंडळी । ऐसी ब्रीदावळी गर्जतसे ॥२॥
तुका म्हणे अहो रखुमाईच्या वरा । उपरोध धरा माझा आता ॥३॥


१७११
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥
देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥
त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥
तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥३॥


६८३
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥१॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥
देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥२॥
तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥३॥


२५१७
केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥
होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥
पडिलें पालवीं । त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥
तुका म्हणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥


३५१९
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥१॥
सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥
दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥२॥
जातीं उखळें चाटूं । तुका म्हणे राज्य घाटूं ॥३॥


२८४३
केवढा तो अहंकार । माझा तुम्हां नव्हे दूर ॥१॥
आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥
कां जी कृपेनें कृपण । वेचतसे ऐसें धन ॥२॥
तुका म्हणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥३॥


कै

३५६३
कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी स्थिर ॥१॥
जें या मनासी आवरूं । आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥
कैंची शुद्ध मति । भांडवल ऐसें हातीं ॥२॥
तुका म्हणे अंगा । कोण दशा आली सांगा ॥३॥


२६८५
कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवळ्यानें भाव दावीतसें ॥१॥
आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥
संतांचें उच्छिष्ट मागितले पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥२॥
तुका म्हणे आलों दावूनि विश्वास । संचित तें नास पावे ऐसें ॥३॥


५६३
कैवल्याच्या तुम्हां घरीं । राशी हरी उदंड ॥१॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥


११३४
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥
कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥
कैं बसावें वहनीं । कैं पायीं अनवाणी ॥३॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसनें तीं जीर्णे ॥४॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥
कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥
तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥


१८७४
कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥
काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हरी घेसी कोण आड ॥ध्रु.॥
पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥
आतां तुम्हां आम्हां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥
तुका म्हणे मज साह्य झाले संत । म्हणऊनि मात फावली हे ॥४॥


१३४५
कैसा तू देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंता डोळीं नारायणा ॥१॥
तेणें लोभें जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभों ॥ध्रु.॥
असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥२॥
तुका म्हणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणक्षणां होते ॥३॥


२०७
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥
कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥
तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥


२३८९
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥
ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥
दावी वैकुंठींच्या वाटा । पाहातां मोठा संपन्न। अभिमान तो नाहीं अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥
आलें द्यावें भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ।तुका म्हणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । ॥३॥


३०६९
कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥
आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं म्हणती एक ॥२॥
बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥३॥
न करावी कथा म्हणती एकादशी । भजनाची नासी मांडियेली ॥४॥
न जावें देउळा म्हणती देवघरीं । बुडविली या परी तुका म्हणे ॥५॥


२७८२
कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरी ॥१॥
नाहीं सोंग अळंकार । दास झाला संवसार ॥ध्रु.॥
दुःख आम्हां नाहीं चिंता । हरीचे दास म्हणवितां ॥२॥
तुका म्हणे देवा । ऐसीं झालो करितां सेवा ॥३॥


३४३
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥
कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिती मती दावीं मज ॥३॥
तुका म्हणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥


२७६६
कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उशीर तो काय तुम्हांपाशीं ॥१॥
आहे तें मागतों दिसतें जवळी । केल्यामध्यें कळि कोण साध्य ॥ध्रु.॥
नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥२॥
तुका म्हणे हात आवरीला गुंती । माझे तंव चित्तीं नाहीं दुजें ॥३॥


को कौ

२७६०
कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥
न करावी सांडी आतां टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥ध्रु.॥
घरोघरीं झाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडवी ॥२॥
तुका म्हणे आम्हां भाकितां करुणा। भलता चि शाहाणा शोध काढी ॥३॥


१६३५
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥
दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥२॥
तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥


१६३६
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥
कोठें गुंतलासी भक्तीप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥
काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चलवे ॥२॥
काय माझे तुज गुण दोष दिसती । म्हणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥
काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका म्हणे ॥४॥


६३४
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥
न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥
तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥


२७७३
कोठें देवा बोलों । तुम्हां भीड घालूं गेलों ॥१॥
करावाया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥
दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥
तुका म्हणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥३॥


९५५
कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥१॥
ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥
मृत्याचिये अंगीं छाये । उपाये चि खुंटतां ॥२॥
तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥३॥


७१०
कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥
आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥
उद्वेग ते वांयांविण। कैंचा सीण चिंतनें ॥२॥
तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ॥३॥


३७९७
कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥
रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥२॥
तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलीं च अबोला करूनियां ॥३॥


३११७
कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥
तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासातजी व्याली ॥ध्रु.॥
वत्साचिये आसे । धेनु धांवेना वोरसें ॥२॥
तुका म्हणे घरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥


३३६४
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥
त्यासि आता रिझे कोण । जवळी जातां चीळसवाणी ॥ध्रु.॥
प्रेतदेह गौरविलें । तैसें विटंबवाणें झालेलें ॥२॥
तुका म्हणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धीचेष्टा ॥३॥


३७२०
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥
हा गे हा गे हरी । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥
तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें॥२॥
संशयाचें बिरडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥३॥
तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आम्ही भार वाहिका ॥४॥


१४१८
कोण आतां कळिकाळा । येऊं बळा देईल ॥१॥
सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥
लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥
तुका म्हणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥


३१३३
कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥१॥
गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥
आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥२॥
तुका म्हणे इंद्रियांसी । ये चि रसीं रंगवूं ॥३॥


२२८९
कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥
कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥
कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥३॥
कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥४॥
तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥५॥


२७७
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥
आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च म्या ॥ध्रु.॥
कुशळ चतुर येथें नपवती । करितील रिते तर्क मतें ॥२॥
तुका म्हणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥


३२५
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥
नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥
नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या ह्मैसी गाई व्हाव्या ॥२॥
हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥३॥
तुका म्हणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥


३३५
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥
अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥
फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥
तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥


१५३९
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥
तुम्हांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥
तुका म्हणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥


२४४
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥
पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥
न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥
काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥
काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥
तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥


१३१८
कोण पुण्य कोण गांठी । ज्यासी ऐसीयांची भेटी ॥१॥
जीही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥ध्रु.॥
कोण हा भाग्याचा । ऐसियाची बोले वाचा ॥२॥
तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसाराची तुटी ॥३॥


८८०
कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥
ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥


१०८४
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥
भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला । दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥
केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे किल्ल्या । संताचे हातीं दिल्या । आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥


२९२७
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥
तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥
नांवासाठी नेघें भार । न लगे फार वित्पत्ति ॥२॥
तुका म्हणे न लगे जावें । कोठें देवें सुचेना ॥३॥


३५१०
कोण येतें घरा आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥
देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥
मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥२॥
तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान लागे पाठीं ॥३॥


१२४९
कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥
आतां हें चि माप करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥
नेंदाविया वृत्ति । आतां उठों चि बहुती ॥२॥
उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥३॥


३३३
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥१॥
जालें वार्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
कोणाची हे सत्ता। जाली वाचा वदविता ॥२॥
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥३॥


४०३३
कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥
प्रथम केला गर्भीवास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥
बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा। वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥
क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौ†याशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥
आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी। तुका म्हणे करीं कृपा आतां ॥५॥


१४०३
कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥
केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥
सहजें चि घडे आतां मोळ्याविण । येथें काय सीण आणि लाभ ॥२॥
तुका म्हणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥३॥


१२१५
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥
कैंचा राम अमागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥
स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥
तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥


२५७३
कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥१॥
बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥
घटापटा ढवळी मन । होय सीण न करूं तें ॥२॥
तुका म्हणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥३॥


२८५५
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥
पाहातसें वाट येई गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥
बहुतांचे सत्ते झालों कासावीस । जाय रात्रंदिवस वैरियांचा ॥२॥
तुका म्हणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥३॥


५५७
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा ॥१॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥
कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥
तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥


१४५०
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥
कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥
माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥
भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥
तुका म्हणे देतों देवाचें गाऱ्हाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥४॥


१३७५
कोणापाशीं द्यावें माप । आपे आप राहिलें ॥१॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥
एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसून ॥२॥
तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥३॥


१५६६
कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें ॥१॥
ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभाळिलें दीना ॥ध्रु.॥
कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभ गा विठ्ठला ॥३॥


३५४०
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥
मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥
निरांजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे ॥२॥
तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥३॥


२५२४
कोणाशीं विचार करावा शेंवटीं । एवढया लाभें तुटी झाल्यातरे ॥१॥
सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥
घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाय कार्या येतो ॥३॥


२९६७
कोणी एकाचिया पोरें केली आळी । ठावे नाही पोळी मागे देखी ॥१॥
बुझाविले हाती देऊनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥
तैसे नको करू मज कृपावंता । काय नाही सत्ता तुझे हाती ॥२॥
तुका म्हणे मायबापाचे उचित । करावे स्वहित बाळकाचे ॥३॥
३८००
कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥
देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥२॥
तुका म्हणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥३॥


२२५६
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥
तुका म्हणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥


१०८७
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥
लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥
गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥
सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥
तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥


३३३५
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वां थोर मानियेली ॥१॥
कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥
तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥
कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिवसेदिवस बळ क्षीण होतें ॥३॥
तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥


२९१६
कोणे साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥
ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ध्रु.॥
कोणें नाहीं केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥
कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥३॥
कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा ॥४॥
तुका म्हणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥५॥


१३९१
कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥
माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥
लागलीये तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥
मुखाची च पाहें वास । मागें दास सांभाळीं ॥३॥
इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥
लाहो काया मनें वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥५॥
कंटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासांचा ॥६॥
तुका म्हणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥७॥


२६७२
कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥
खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥
लौकिकाचा आड येईल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥
तुका म्हणे डांक लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटेविण ॥३॥


९१४
कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥
कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥
घरोघरीं सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥२॥
तुका म्हणे आपुल्या मति । काय रितीं पोकळ ॥३॥


३०७४
कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥
पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥३॥


८६४
कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥१॥
मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥
जाणणियासाटठी। भय सामावलें पोटीं ॥२॥
तुका म्हणे चेता । होणें तें तूं च आयता ॥३॥


१४११
कौलें भरियेली पोट । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥
ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥
कामवितां लोहो कसे। तांतडीनें काम नासे ॥२॥
तुका म्हणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥३॥


३४९२
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥
क्या जीवनेकी पकरी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥
किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥२॥
कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥३॥


३४८७
क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥१॥
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥
कहांसे लाऊ मधुरा बानी । रीझे ऐसी लोक विराणी ॥२॥
गिरिधर लाल तो भाव का भुका । राग कला नहिं जानत तुका ॥३॥


क्या

३५०४
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥
तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥
कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥२॥
कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोरत हि हात ॥३॥


३८०५
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥
बहु दिसीं झाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥
कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥२॥
आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥३॥
तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥४॥
तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥५॥


क्रि

४०३
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥
देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥
नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥
अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घालीं पोटीं ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *