सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा ५ (ख, ग, घ, च)

संत तुकाराम गाथा ५  अनुक्रमणिका नुसार


१९१९
खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडितां ॥१॥
तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसे काय सांगा । चालविले जागा । मी हे माझे यासाठी ॥ध्रु॥
पायी हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं । मुसे आल्यावरी । काय निवडे वेगळे ॥२॥
निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं । तुका म्हणे दोन्ही । निवारिलीं जागतां ॥३॥


२९३१
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥
आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥
खाणार ताकाचें आसातें मांजर । आपणें चि अधीर कळों येतें ॥२॥
तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥


५१७
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥
कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ती । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥
तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते किरणी प्रकाशाची ॥३॥


९३४
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥
ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥
परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥
तुका म्हणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥३॥


५२४
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥
संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥
घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा घाव तैसा ॥२॥
फडा आलिया तो न वजे निरास । जरि कांहीं त्यास न कळतां ॥३॥
तुका म्हणे आतां झालीसे निश्चिंती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥४॥


१४०६
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥
करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥
दया संतां भांडवल । वेची बोल उपकार ॥२॥
तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥३॥


खा
४०७७
खाणोरीयांची पुसो घरें । जीहीं बरे पळती॥१॥
सांगती त्या जावें वाटे । धरोनी पोटामध्यें गोष्ठी ॥धृ॥
आली गेली होती ठाया । सत्य छाया कळली ॥२॥
तुका म्हणे आपुले बळ । युक्ती काळ कारण ॥३॥


२७९२
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥
वीट नाहीं पांडुरंगीं । वाटे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥
ह्रदयांची हांव पुरे । परि हें उरे चिंतन ॥२॥
तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥३॥


१९०६
खावे ल्यावे द्यावे । जमा खर्च तुझ्या नावे ॥१॥
आतां चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभात ॥ध्रु.॥
आहे नाही त्याचे । आम्हां काम सांगायचे ॥२॥
तुका म्हणे चिंता । भार वाहे तुझ्या माथा ॥३॥


खि
३०४२
खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगीं ॥१॥
वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥
मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरी थुंका पडतसे ॥२॥
आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥३॥
तुका म्हणे देह झालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥


खुं
१५९१
खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥
आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥
बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सारे करा याची ॥२॥
तुका म्हणे माझी निंश्चितीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥३॥


खे खो
३९१७
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥
आतां करी का रे हाकारा । सहस्रनामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥
सीते झाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥
लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥
वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥
पांडवें बापुडीं । वांज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥
नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥
कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥


३७९४
खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या ।
मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी नेदी साउलां रे ॥ध्रु.॥
साड्या साउलीं पातळें गोंडे कसणिया चोळ्या । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे।
खांदी धरूनियां करीं दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥२॥
आनंदें कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळा । एकी एकीहूनि म्हैस वेल सुर काडी ।
एकी उगविती कोडीं । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥३॥
एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । म्हणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां ।
केला सकळी हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां म्हणतील घरां जावें कैशा परी ॥४॥
तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात ।
लाज राखावी गोपाळा आम्हांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥५॥
जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं ।
भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥६॥
एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे । म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं ।
जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥७॥


२४९३
खेळतां निजभावें समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥
तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥
अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे माझें ऐसें आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पीली ॥३॥


२४९९
खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंत ॥१॥
माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥
प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥
तुका म्हणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥


३८६०
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥
नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥
गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥
वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥
नोळखतां दुःखें वाहाती शिरी । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥


३७०७
खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे । कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां रे । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥
वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती रे । निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥५॥


३८४०
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥
मातेपाशीं एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥६॥
तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥७॥
हळुहळु त्यांचें पुण्य झालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥८॥
तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥१०॥


२८३६
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥
पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीसी ॥ध्रु.॥
एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥
पाणी ऐसी बुद्धी नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा झालों पायीं ॥३॥
आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥
तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥


३६५६
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेई गोपाळा देई झाडा ॥ध्रु.॥
मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥२॥
तुका म्हणे बुद्धी काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥३॥


३१४७
खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥
खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥
पालथे घागरी रिचवितां जळ । तुका म्हणे खळ तैसे कथे ॥३॥


२१२०
खोटयाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥
काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥
तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे॥३॥ ॥२॥


२६५७
खोल ओली पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥
लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥
कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥
तुका म्हणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥३॥

ग गं

१५४४
गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥१॥
तेथें करीन अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥
पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥२॥
तुका म्हणे धन्य जालों । संतसागरी न्हालों ॥३॥


३३५८
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥
तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥
जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥२॥
तुका म्हणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन ॥३॥


१८१४
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥
रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥२॥
परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥३॥
तुका म्हणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥४॥


७३९
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥
अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥
तुका म्हणे अगीविण । बीज वेगळे तों भिन्न ॥३॥


५१८
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥२॥
बाळाचे सोईतें घांस घाली माता । आटाहास चित्ता नाहीं तया ॥३॥
गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥४॥
तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥


२३५०
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥
त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥
धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥२॥
तुका म्हणे ब्रीद बांधलें यासाठीं । भक्तंसी संकटीं रक्षावया ॥३॥


११३३
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥
सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥
कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥
तुका म्हणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईकोनी विश्वासलों ॥३॥


३६९५
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥
आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥
न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥
तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥३॥


७८९
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥
जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥
मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥२॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥३॥


३२५६
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि करावें मूळक्षेत्र ॥१॥
खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥
वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥२॥
मृगजळी पोहे घालुनि सज्ञाना । तापलिया जना तोषवावें ॥३॥
तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रम्हार्पण ब्रम्ह होय बापा ॥४॥


२१६०
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥
चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥
न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥२॥
तुका म्हणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥३॥


३६११
गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धारीं ॥ध्रु.॥
पाय लक्ष्मीच्या हातीं । म्हणोन येतो काकुलती ॥२॥
तुका म्हणे शेषा । जागें करा हृषीकेशा ॥३॥


१८
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥५॥


३३६७
गर्जत जावी नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥
येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळ ॥ध्रु.॥
लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥२॥
तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥


२०८
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥
व्याली कुर्हा डीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥


१९८९
गर्भीं असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥
सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥
गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥
पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥
तुका म्हणे निश्चळ राहें । होईल तें सहज पाहें ॥५॥


३९७५
गळित झाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥
आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥
वाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥२॥
तुका म्हणे गोड झालें । नारायणीं पोट धालें ॥३॥


१८३
गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥
वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥
कमाईच्या सार । जाति दाविती प्रकार ॥२॥
तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥


गा गां
३७९६
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ ते देखाव्य हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥ध्रु.॥
चिरें चोळीया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्ण मूर्ती । कोणां नाठवे हा कोण कुळ याती । झाल्या तटस्थ सकळां नेत्रा पातीं वो ॥२॥
दंत धावनाचा मुख माजी हात । वाद्यें वाजती नाईके जनमात । करी श्रवण श्रीकृष्णवेणूगीत । स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो ॥३॥


३९१०
गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगलें हें चित्त माझें तया पायीं । म्हणउनि घेई हाचि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हाचि संवसारीं । राम कृष्ण हरी नारायण ॥३॥
नारायण नाम चालितां तुकासी । न येती या रासी तपतीर्थे ॥४॥
तीर्थे माथां रज वंदिती संतांचे । जे गाती हरीचे गुणवाद ॥५॥
गुणवाद ज्याचे गातां पूज्य झाले । बडिवार बोले कोण त्याचा ॥६॥
त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥७॥
विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥
कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिव करी धंदा ॥९॥
करुनि कवतुक खेळे हीच लीळा । व्यापूनि वेगळा पाहातसे ॥१०॥
सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥
लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग-तया कोण भोगवितो ॥१२॥
विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभे ॥१३॥
लोभें गिळी फांसा आमिषाच्या आशा । सांपडोनि मासा तळमळी ॥१४॥
तळमळ याची तरीच शमेल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥
आठवे तरी देव संतांच्या सांगातें । किंवा हें संचित जन्मांतरें ॥१६॥
जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥
पुढें जाणोनियां करावें संचित । पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥
जन्म तुटे ऐसें नव्हे तुम्हां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥
करा जप तप अनुष्ठान याग । संतीं जे मारग स्थापियेलें ॥२०॥
लावियेलीं कर्मी शुद्ध आचरणी । कोणा एका जन्मी केले पावे ॥२१॥
पावले सत्वर निष्काम उद्धार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥
वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलोसें कोणी न म्हणावें ॥२३॥
न म्हणावें झालो पंडित वाचक । करूंनि मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥
चालविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥
सुख तरीच घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥
राम हा उच्चार तरीच बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥२७॥
पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥
यागयज्ञ तप संसार दायकें । न सुटे एक नामेंविण ॥२९॥
नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥
जाणती हे भक्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥
अमृताचें सार निजतत्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥
नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसिद्ध हे ॥३३॥
हें चि सुख आम्ही घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा ॥३४॥
कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धी दुष्ट नासे ॥३५॥
नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥
विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्ती न लगे कांहीं ॥३७॥
कांहीं कोणी नका सांगों हे उपाव । माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥
जाणोनियां आम्ही दिला जीवभाव । दृढ याचे पाव धरियेले ॥३९॥
धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला हा सेवेशीं निरधार ॥४०॥
निरधारे आंम्ही राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करूनियां ॥४१॥
येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥४२॥
आपुली पाखर घालुनियां वरी । आम्हांसी तो करी यत्न देव ॥४३॥
देव राखे तया आणिकांचें काय । करितां उपाय चाले तेथें ॥४४॥
तेथें नाहीं रिघ कळिकाळासी येतां । दास म्हणवितां विठोबाचे ॥४५॥
विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥
धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुम्ही ॥४७॥
तुम्ही निदसुरे नका राहूं कोणी । चुकवा जाचणी गर्भवास ॥४८॥
गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥
तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥
जाच करिती हे म्हणसी कोणाठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥
बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥
धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरी नये ॥५३॥
न ये वरी कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥५४॥
त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥
नारायण जे विसरती संवसारीं । तयासी अघोरीं वास सत्य ॥५६॥
सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥५७॥
तुम्ही मानूं नका कोणी हा विश्वास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥
धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फांसे यमदूतीं ॥५९॥
दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥
नेदी शुद्धबुद्धी आतळों चित्तीसी । नाना कर्मे त्यासी दुरावती ॥६१॥
दुराविलीं एकें जाणतींच फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥
वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥
रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥
सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥
वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥
धरूनियां देव राहतील चित्ती । आधींलिया गती आठवाया ॥६७॥
आठवावा देव मरणाचे काळीं । म्हणउनि बळी जीव दिले ॥६८॥
दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥
मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाठी गेला अधोगती ॥७०॥
गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥
विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥७२॥
तरती दुबळीं विठोबाच्या नांवें । संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥
शुद्ध तरायाचे काय तें नवल । म्हणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥
वेळाकाळ नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥
भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥७६॥
करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥
मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥
पशु पापपुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥
ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥
भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥
ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥८२॥
संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवास ॥८३॥
वासनेची मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥
सायास केलियावांचुनि तें नाही । भविष्यावरी काहीं घालूं नये ॥८५॥
न ये बळें धड घालूं कांट्यावरी । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥
हातीं आहे हित करील तयासी । म्हणउनि ॠषीं सांगितलें ॥८७॥
सांगीतले या लोकां फजित करूनि । आपण जे कोणी तरले ते ॥८८॥
तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥
गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥
चिंतनें जयाच्या तरती पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥
लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥
संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥९३॥
मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी कंठीं राहे ॥९४॥
राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥
नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥
तहान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चिंत हे घेतां नाम होती ॥९७॥
होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥
चेवले जे कोणी देह अभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥
कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आम्हीं त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥
लावियेले आसे येणें पांडुरंगें । तुका म्हणे संगें संतांचिया ॥१०१॥


३७६९
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥
चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥
मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥२॥
मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥३॥
निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥४॥
तुका म्हणे सरसी असों येणें बोधे । जाणोनि संबंधें सर्वकाळ ॥५॥


१२६६
गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी ॥१॥
माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥
मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥२॥
तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥३॥
तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥४॥


११६७
गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥
ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥
वेश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥२॥
चरणींच्या रजें अहिल्या तारिली । रूपवंत केली कुबजा दासी ॥३॥
पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥४॥


३९८९
गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥
बळियाचा बळी वो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥
मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥२॥
म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥३॥


४०९०
गाऊं नाचू विठो तुज तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥
न करीं तपसाधन रे मुक्तीचे सायास । हाचि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥
तुका म्हणे आम्हां प्रेमा उणें तें काई । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥३॥


११६८
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥
अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥
तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥


६९५
गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥
नाठेळाची भक्ती कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥
सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥
तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंदधिंद सिंदळीचे ॥३॥


३०९१
गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥
त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काय ॥ध्रु.॥
श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥२॥
तुका म्हणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥३॥


६६२
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥१॥
सहज गुण जयाचीये देहीं । पालट तो कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी थुंकोनि टाकी ॥२॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुलें मत ॥३॥


४१६
गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥
सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥२॥
तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥३॥


६२२
गाढवाचें तानें । पालटते क्षणक्षणें ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥
उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥
तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥


१७४८
गातां ऐकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥
विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥
तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥


३९०१
गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरी ॥१॥
ॠद्धिसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपत्ति सर्वां घरीं ॥२॥
घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥४॥
गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका म्हणे ॥५॥


३९२६
गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥
राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥
अल्प आयुष्य मानवी देह । शत गणिलें ते अर्ध रात्र खाय । मध्ये बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥
क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥
कांहीं थोडा बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥
विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां । दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥


३०७
गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥
परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥
मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥२॥
तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥


१११५
गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥
नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥२॥
कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हासी संगती न लगे त्यांची ॥३॥
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥


३३१
गायनाचे रंगीं । शक्ती अद्भुत हे अंगीं ॥१॥
हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥
अंगीं प्रेमाचें भरतें । नेघे उतार चढतें ॥२॥
तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची खाणी ॥३॥


१०१८
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥
काय जाणों तरले किती । नाव आयती या बैसा ॥ध्रु.॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥


५२९
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥
हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥


९४४
गासी तरि एक विठ्ठल चि गाई । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥१॥
अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा सीण करिसी वांयां ॥२॥
तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाहीं चित्ती निलाजिरा ॥३॥


गु
३२२६
गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥
डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥
निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥
तुका म्हणे समध्यान । हे ते चरण सुकुमार ॥३॥


२८७७
गुणांचा चि सांठां । करूं न वजों आणिका वाटा ॥१॥
करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥
नेमली पंगती । आम्हां संतांची संगती ॥२॥
तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥३॥


३२८३
गुणांची आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरू सर्वरसां ॥१॥
आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवानीं जीवन मिळोनी गेलें ॥धृ॥
रामकृष्ण नाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥
तुका म्हणे तनु झालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रम्हानंदे ॥३॥


३५१३
गुरुकृपे मज बोलविलें देवें । होइऩल हें घ्यावें हित कांहीं ॥१॥
सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥
होइऩ बळकट घालूनियां कास । हाचि उपदेश तुज आतां ॥२॥
सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राम्हणाचें॥३॥
वैष्णवांची दासी होइप सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥४॥
पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला॥५॥
तुका म्हणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥६॥


३४५८
गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । म्हणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥१॥
पवित्राला म्हणती नको हा कंटक । मानिती आत्मिक अनामिका ॥ध्रु.॥
डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥२॥
कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥३॥
नसता करुनी होम खाती एके ठायीं । म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥४॥
इंद्रियांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥५॥
नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥६॥
तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण । विठोबाची आण नरका जाती ॥७॥


१५८५
गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण ॥१॥
भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥
न कळतां दोरी साप। राहूं नेंदावा तो कांप ॥२॥
तुका म्हणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥३॥


३१७७
गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥
अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥
ऐसिया दांभिकां कैची हरीसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥२॥
तुका म्हणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥३॥


गे
३९०७
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥
आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥
कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें झालें ॥३॥
जातों येतों आम्ही देवाचे सांगांतें । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥


१४९०
गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥
उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥
तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥


७०
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥
भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥२॥
तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥३॥


३९७४
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥
हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥
जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥
देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त। जालें एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥
आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥
आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥


३९२७
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझुन । जागे होऊनी करा कांहीं दान । नका ऐको झाकोंनी लोचन गा ॥१॥
हरी राम कृष्णा । वासुदेव जाणवितसे जना । चिपळया टाळ हातीं वीणा । मुखीं घोष नारायणा गा ॥ध्रु.॥
जे ठाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोयी । द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढे विन्मुख होतां बरे नाहीं गा ॥२॥ देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त। झाले एक चित्त तरी बहुत । येवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥
आलों येथवरी बहु सायास । करितां दान हेचि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥
आतां मागुतां येईल फेरा । हे तों न घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु राम धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥


१६०१
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥
सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥
कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥
हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥३॥
तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥
तुका म्हणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥५॥


गो
३८८०
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥
आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥३॥
रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥४॥
न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥५॥
माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥६॥
पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका म्हणे ॥७॥


११५४
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥
गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥
तुका म्हणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥


६९२
गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥
सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु.॥
चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥२॥
हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तें चि अरूप ॥३॥


९७७
गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥
तैसें जाणा ब्रम्हज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु.॥
रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥२॥
अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचें चि नाम ॥३॥
तुका म्हणे तारा । नाव तंबुऱ्याच्या सारा ॥४॥


३७९८
गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥
वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥
परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥२॥
तुकयाच्या स्वामीसवें झाली भेटी । तेव्हां झाली तुटी मागिलाची ॥३॥


२९०
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥


१३३३
गोदेकांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें॥१॥
देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥
राखोनियां होतो ठाव । अल्प जीव लावूनि ॥२॥
तुका म्हणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥३॥


३७३३
गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों ।
एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥
जाणोनि नेणता हरी रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे ।
एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसें । पोटीचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ध्रु.॥
एक म्हणति बहु रे आम्ही पीडिलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया ।
तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥२॥
एक म्हणति तुमचें अरे पोट तें किती । मागों गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति ।
हाती देव गडी कान्होबा आमुचा आम्हां काय विपत्ती। कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥३॥
एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान ।
लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण । हातीं काठ्या डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥४॥
एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर ।
राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥५॥
घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसें आम्हासि ठावें ।
चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें । लपोनि सहज खेळतां भलें गडियासवें ॥६॥
एक म्हणती गडी ते भले मळिती मत्ता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ।
नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥७॥
एक म्हणती खेळतां उगीं राहतीं पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें ।
अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकीं च खरें ॥८॥
एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हें वाउगें तुझे बोल चि खोटे ।
ठायीं राहा उगे ठायीं च कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझी भरयेली मोटे ॥९॥
तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ।
जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥१०॥


३८४५
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥
झालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥
देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥
आजि दिसे हरी फांकला यांपाशीं । म्हणउनि ऐशी परि झाली ॥४॥
जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शाहाणे तयांसि कळों आले ॥५॥
कळों आलें तीहीं स्फुंद शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥
सांगे आतां हरी तुम्हां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥९॥
परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका म्हणे माता लोकपाळ ॥१०॥


३२४७
गोपीचंदन मुद्रा धारणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥
मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥
विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥२॥
तुका म्हणे शूर झालों । बाहेर आलों संसारा ॥३॥


२६५८
गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । वाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥
जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥
खऱ्याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥२॥
तुका म्हणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥३॥


३७८९
गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें ।
झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥
सर जाऊं दे रे सर जाऊं दे रे सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥
आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।
आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥२॥
आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें ।
बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥३॥
वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं ।
जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥४॥
तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या । कृष्णमळिणीं मिळाल्या त्याही न फिरती ।
तुका म्हणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥५॥


३३९२
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥
आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥३॥


३८२५
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥
एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥
जावें यावें तिहीं घरचिया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥
विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥
लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥
व्याही भाईं हरी सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥
एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाईं ॥९॥
लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥
विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळती त्या ॥१३॥
यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥
खेळतों ते आम्हीं नव्हों नारीनर । म्हणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥
तया ठावें आहे आम्ही अवघीं एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥
तयां ठावें नाहीं हरीचिया गुणें । आम्ही कोणकोणें काय खेळों ॥१७॥
काय खातों आम्ही कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी ॥१८॥
मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥
धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥
नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरी चित्ती मनीं बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरी जयांचिये चित्ती । तयां नावडती मायबापें ॥२२॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरी वसे ॥२३॥
वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥
गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥
न बोलती निजलिया हरीविण । जागृति सपन एक झालें ॥२६॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं जैसा ॥२७॥
जैसा ज्याचा भाव घेतला त्यांपरी । तुका म्हणे हरी बाळलीला ॥२८॥


३८८२
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥
भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥
वरी हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या ॥३॥
सकळ ही वरी बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा म्हणे घरा ॥४॥
राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥
त्यांच्या तुका म्हणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥७॥


२१४२
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥
मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥
अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । म्हणतां शाहाणा येईल कैसा ॥२॥
तुका म्हणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥३॥


११२९
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥
कैचें पुण्य तिये गांठी । व्रतें वेची लोभासाठी ॥ध्रु.॥
वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥
मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥
तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमल ॥४॥


गौ
२९५
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥
कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥
पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥२॥
तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥


३८०८
गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूंनी । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥
नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥
जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे । त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥२॥
उतरोनि सिंकें । पाहे चाखोनियां निकें । गोड तें चि एका एकें । हातीं लांबवितो । जाणे राखती तयांसि । तेथें अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥३॥
जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरांत धरीयेला । कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥४॥
दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें । तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । दसवंती कवतुक। करुनी रंजविल्या ॥५॥


३७४६
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥
धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥
तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥२॥


७५
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥
काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥


ग्रं

१५४०
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥
नाहीं भेद म्हणून भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥
तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥

१०३०
घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥
भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥
देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥२॥
तुका म्हणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥३॥


३९९६
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥
पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥२॥
तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥३॥


१०१
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥
नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥


७२२
घरोघरीं अवघें लें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥
निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥
निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारियला ॥४॥
तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥५॥


९९१
घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥
लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥
काढावें आइतें । तें चि जोडावें स्वहितें ॥२॥
तुका म्हणे कळे । अहाच झांकतील डोळे ॥३॥


घा
१७६५
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥
आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥
उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥
तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥


१४२७
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥
मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥२॥
तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥३॥


२४५९
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥
तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥
रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥
बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥
झाडिताती कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥
तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥


३७८२
घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥
बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये वो सीता ।
लाजिन्नली रूप न ये पालटितां । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥
सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालितां वो न ये कनक रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥
मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।
दिली वाट यमुने मायें खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥४॥
जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आळिंगून । तुका म्हणे येथें भाव चि कारण वो ॥५॥


१६५३
घालीं भार देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥
देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥
व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥२॥
तुका म्हणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥


२३७१
घालुनियां मापीं । देवभक्ती बैसले जपीं ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥
अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥
देव आतां जाला । उगवे संकोच वहिला॥३॥
अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥
आडकिला झोंपा । रिता कलेवरचा खोंपा ॥५॥
गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड॥६॥
तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥


३२१५
घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥
ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥
रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥२॥
जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥३॥
तुका म्हणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥४॥


३५९६
घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥१॥
बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥
आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्त ॥२॥
तुका म्हणे पेणी । येतां जातां दिवस गणीं॥३॥


३४५५
घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥
लावूनियां हात कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥
कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥२॥
खुंटले सायास अणिक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥


२३७१
घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुर्कुंडी ॥ध्रु.॥
अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥२॥
देव आतां जाला । उगवे संकोच वहिलाऊ ॥३॥
अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥४॥
आडकिला झोंपा । रिता कलेवरचा खोंपा ॥५॥
गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड ॥६॥
तुका म्हणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥७॥


२८२६
घालूनी लोळणी पडलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी ॥१॥
वोल्हावेल तनु होईंल शीतळ । झाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥
पावेन या ठाया कई झालें होतें । आलों अवचितें उष्ट्यावरी ॥२॥
तुका म्हणे कोणी जाणवा राउळी । येईल जवळी पांडुरंग ॥३॥


घे
१८१०
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥
हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥२॥
आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥
मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका म्हणे ॥४॥


३९५
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥३॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥


३२५३
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिलाषी ॥१॥
तो ही येथें कामा नये । नरका जाय म्हणोनि ॥ध्रु.॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥२॥
तुका म्हणे दांभिक तो । नरका जातो स्वइच्छा ॥३॥


९०
घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करी तो ॥१॥
भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥
अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥


३१०८
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥
आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥
सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥
तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥


८५५
घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥
सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥
करिसील तो करीं संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥२॥
बैससील तरी बैस संतांमधीं । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥
जासी तरि जाई संतांचिया गांवां । होईल विसावा तेथें मना ॥४॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेई ॥५॥


३६५५
घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥१॥
कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥
तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥२॥
तुका म्हणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥३॥


३६५७
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥२॥
तुका म्हणे लाहाण मोठा । सांडा ताठा हा देवा ॥३॥


३६६१
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥१॥
हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥
नोळखवे म्यां धरिला हातीं । देह्यादिप माय लाविली वाती ॥२॥
न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥३॥


३६६४
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥
पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥
घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जंव भरला हाट ॥३॥


३६०९
घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तं आत्मिस्थती सांडवीन ॥१॥
ब्रम्हीभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥
तीर्थ भ्रामकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥
सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तीभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥
धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां । भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥५॥


३२८२
घ्यां रे भाई घ्यां रे भाई । कोणी कांहीं थोडे बहु ॥१॥
येच हाटीं येच हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥
वेच आहे बेच आहे । सरले पाहे मग खोटे ॥२॥
उघडें दुकान उघडें दुकान । रात्री झाली कोण सोडी मग ॥३॥
तुका म्हणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनीं ॥४॥


३७३१
घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥१॥
येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥
माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥२॥
तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥३॥


२९७९
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । झाली वेरझारी हाणी ॥१॥
घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥
अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥२॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं झालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥३॥
आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती ॥४॥
जें दुर्लभ ब्रम्हादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे म्हणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥


१३९२
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥
ऐसीं कैंचीं आम्ही पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥
व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥२॥
तुका म्हणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥३॥

च चं
२७५०
चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥१॥
फुटोनियां गेला कुंभ । झालों निष्काम स्वयंभ ॥ध्रु.॥
धरित चि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥२॥
तुका म्हणे कोडें । आगी काय जाणे मढें ॥३॥


१६१६
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥
रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥
तुका म्हणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥


६३५
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता स्फुंद अंगीं ॥१॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धी ॥२॥
तुका म्हणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥


१४५४
चंदन तो चंदनपणें । सहज गुणेसंपन्न ॥१॥
वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥
परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥२॥
तुका म्हणे कैंची खंती । सुजाती ते टाकणी ॥३॥


१७७५
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥
तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥


३३२९
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥


५५४
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥
साकरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्या बाळां धाकुटियां ॥२॥
तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥३॥


१६०६
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥
अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥
काय नाहीं सत्ता। हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥३॥


३६२०
चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥१॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजी ॥ध्रु.॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥२॥
आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥३॥


१७२४
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥
तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥
जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥


३७३५
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ध्रु.॥
हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥२॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥३॥
पुष्पाचा वरुषाव झाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥४॥
यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनियां मना ॥५॥


३७१७
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥
बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥
खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥
तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥


१३८
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥
काय एक उणें आमुचिये घरीं । वोळंगती द्वारीं रिध्दिसिध्दी ॥ध्रु.॥
असुर जयाने घातले तोडरीं । आम्हांसी तो जोडी कर दोन्ही ॥२॥
रूप नाहीं रेखा जयासी आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥
तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥५॥


१०८३
चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥
उत्पित्तसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥
असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥३॥
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥४॥


३६९
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥
तपें इंद्रियां आघात । क्षणें एका वाताहात ॥२॥
मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥३॥
व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥४॥
धर्म धर्मा सत्त्व चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥५॥
भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥५॥
तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥॥


२१५१
चळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥
उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥
गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काई ॥२॥
तुका म्हणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥


चा चां
२१५३
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥१॥
धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥
उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥२॥
सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥३॥


४०६४
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळाभुलवणा ॥२॥
गांढएा तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रीत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥
खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा। लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥४॥
उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका म्हणे बोलिलों साच। नाहीं अहाच पूजा केली ॥५॥


४०५७
चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥१॥
शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥
सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥२॥
म्हणोनि रुसलों संसारा । सर्प हा विखार पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥३॥
येणें मज भोगविल्या खाणी। नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥४॥
पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड। आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥


३८१५
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं म्हुण ॥२॥
नसांपडे इंद्रचंद्रब्रम्हादिकां । अभिमानें एका तळिमात्रें ॥३॥
तळिमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिलेंजे ॥७॥
जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्ती सांगितलें ॥११॥
सांगितलें संतीं तुम्हां उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥
दंडूं आम्हीं रागें म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥


२१२२
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥
हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥
जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥
तुका म्हणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥


२३५१
चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥
न करीं आणीक साधन । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥
अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥२॥
गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली ॥३॥
तुका म्हणे सार धरीं । वाचे हरीनाम उच्चारीं ॥४॥


३८१४
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । म्हणउनि चोरी नसांपडे ॥५॥
नसांपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविका तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती नसांपडे ॥१०॥
नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणें भावें चाड एका ॥११॥


११०
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥
तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥
केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥
करीं तुजसी करवती । आणिक नामें घेऊं किती ॥४॥
तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥५॥


२६०८
चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरी माथा ॥१॥
वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥
प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त स्थिर करीं पांडुरंगा ॥२॥
आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥३॥
करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण वारी ॥४॥
तुका म्हणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥५॥


५३३
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥


१७७३
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥१॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥
बुडतां हाका मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥
तुका म्हणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥


१४१२
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥
बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥
नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥
तुका म्हणे भक्ती । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥


३३१२
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥
काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥
कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥२॥
चालिले अगळे । हळू च कान केश डोळे ॥३॥


वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥४॥
एकली तळमळ । जिव्हा भलतेचि चावळे ॥५॥
तुका म्हणे यांणीं । तुझी मांडिली घालणी ॥६॥


२७३५
चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥
बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥
तुका म्हणे आहे ठायींचा चि मान । आतां अनुमान कायसा तो ॥३॥


३०६६
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ॥ध्रु.॥
मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता म्हणों नये ॥२॥
वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥
तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणें काय आहे चराचरीं ॥४॥


२२३१
चाळवणें काय । ऐसें अगे माझे माय ॥१॥
धांव पाव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥
पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥२॥
देसील विसांवा । तुका म्हणे ऐशा हांवा॥३॥


१९१७
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता ॥१॥
पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥
जेणों त्याच्या बाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥२॥
तुका म्हणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥३॥


चि चिं
२८८४
चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी ॥१॥
तुम्ही वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥
जेथें जेथें जाय मन । आड घाला सुदर्शन ॥२॥
तुका म्हणे भोजें । मग मी नाचेंन निर्ल्लज ॥३॥


९५२
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥
सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥
पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥२॥
ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥३॥


५८८
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहो दिला नाहीं ॥२॥
तुका म्हणे मोह परते चि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥


९५०
चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥
संसारसिंधु नाहीं हरीदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥
जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥३॥


३८११
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥
आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया भक्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥
घरोघरीं झाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥
लोकां गोकुळींच्या झालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥
जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥
केलीं नारायणें आपुलीं अंकित । तोचि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥
नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥१३॥


२२५८
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥
नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥
सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा॥२॥
तुका म्हणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला॥३॥


११९६
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राम्हण बैसलेती ॥२॥
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥


३८९८
चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥
चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥४॥
चुकवुनि जन्म देईंल आपणा । भजा नारायण तुका म्हणे ॥५॥


५०३
चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥
नवसियाचे पूर्वी पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥
तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥३॥


५८५
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥
मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥
भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥
तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥


२१७६
चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥
तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥
रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ॥२॥
तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥३॥


१८१९
चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराई ॥१॥
परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥
आम्ही सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥२॥
इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥
न पडे विसर । तुझा आम्हां निरंतर ॥४॥
प्रेम एकासाठी । तुका म्हणे न वेचे गांठी ॥५॥


११६
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥
हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥
रवीचिये अंगीं प्रकाशक सकळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥
तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं । सौख्य काय रंगीं निवडावें ॥३॥


१७६९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥


३८
चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥


१३१७
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥
आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥
मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥
तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥


२५१९
चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥
नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥
चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥
तुका म्हणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥


२४६९
चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥
अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥
ब्रम्हांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥
तुका म्हणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न तुटता ॥३॥


३१७३
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥१॥
ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥
हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥२॥
तुका म्हणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥३॥


३२०१
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥
खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । कळो यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥
तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार ॥३॥


२२८५
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥
कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥
पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥२॥
करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥३॥
तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥४॥


२०२४
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्तांचिये घरीं । काम न सांगता करी ॥ध्रु.॥
अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥
तुका म्हणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥


१११
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥
तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥


२३९२
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥
न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥
हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥२॥
तुका म्हणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥३॥


३६१४
चिन्हें उमटती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥
आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥
उत्कंठित झालें मन । ते चि खुण तेथींचि ॥२॥
तुका म्हणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥३॥


११२१
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग हवार बोभाट जनामध्यें ॥१॥
लटके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥
तुका म्हणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥


चु चू चो चौ
१८७५
चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥
चाळविलीं एकें रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥
कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाठी ॥२॥
केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥३॥
तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥४॥


१५४६
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥१॥
तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥
विक्षेपिलें धन । तेथें गुंतलेसे मन ॥२॥
नाशिवंतासाठी । तुका म्हणे करिसी आटी ॥३॥


२९१८
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥
म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरीचे दास ॥ध्रु.॥
संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥२॥
तुका म्हणे दृष्टी । उघडितों नव्हे कष्टी ॥३॥


२७०६
चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥१॥
पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥
माझें तुझें भिन्नभावें । गळां दावें मोहाचें ॥२॥
तुका म्हणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥३॥


१२२
चुंबळीशीं करी चुंबळीचा संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥
बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥
माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥२॥
तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥


३४९०
चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥१॥
काहे बडाई दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा ते राखो भाई ॥ध्रु.॥
और बात सुन उखलसुं गला । बांधलिया आपना तूं गोपाला ॥२॥
फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥३॥


६६०
चोरटें काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥
बुद्धीहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी ते कर्म वोढवलें ॥३॥


६५६
चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥१॥
ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥
नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥२॥
तुका म्हणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥३॥


१५००
चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लांछन ॥१॥
यासी आह्मीं करणें काय । वर्षो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥
ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥२॥
तुका म्हणे त्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥३॥


३१८६
चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥
दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥
तुका म्हणे जरि पूर्वपुण्यें सिद्धि । तरि च राहे बुद्धी संतसंगीं ॥३॥


९५
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥


३९११
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥
मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥
डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *