राम

श्रीराम आरती मराठी अर्थासहित

श्रीराम आरती विडिओ सहित

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।

– संत माधवदास

आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ

अ. ‘जय देव जय देव निजबोधा रामा’ या ध्रुपदातील ‘निजबोधा रामा’ म्हणजे ‘आत्मबोधरूप आत्मारामा’.

आ. ‘मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला’ यामधील ‘भुवनी त्राहाटिला’ म्हणजे हनुमानाने आकाशात भ्रमण करून स्वतःच केलेला शत्रूचा विध्वंस पाहिला.

इ. ‘अनाहतध्वनि गर्जती अपार ।’ याचा भावार्थ आहे, श्रीरामाच्या विजयाप्रीत्यर्थ मेघनाद, तसेच घंटा, शंख, भेरी इत्यादी वाद्यांचा अपार नाद होऊ लागला. मेघनादासारखा नाद स्वर्गस्थ देवतांकडून होत असल्याने त्याला ‘अनाहतध्वनी’ असे म्हटले आहे.

ई. ‘अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।’ यातील ‘अठरा पद्मे’ म्हणजे १८० लक्ष कोटी.

उ. ‘सहजांची आरती वाद्यांचा गजर ।’ याचा अर्थ सहजावस्थेत असणार्‍या वसिष्ठादी मुनींनी प्रभु श्रीरामचंद्रांची आरती केली आणि मंगलवाद्यांचा गजर केला, असा आहे.

ऊ. ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.


श्रीराम आरती समाप्त


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

श्रीरामाची आरती

1 thought on “श्रीराम आरती मराठी अर्थासहित”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *