ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी:- ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या पालखीने परिवर्तनाची पहाट दाखवली. आज ज्ञानदेवांच्या विचारांची पालखी वेगळया मानवता धर्माची आस डोळयांत घेऊन समाजाकडे पाहत आहे. कोरोनाच्या महामारीने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची करुण अवस्था झाली आहे. त्यांना आर्थिक व मानसिक आधाराची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे मन आज करुणाघनाकडे वेगळे पसायदान मागत असेल की, या मानवजातीला निराशेतून बाहेर काढून जगण्याच्या आशेचा किरण दाखव.


हे पण वाचा: संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती


संत ज्ञानेश्वर यांनी चातुर्वर्णाच्या चौकटीला सशास्त्र आव्हान देऊन सर्वसामान्यांची सामाजिक कुचंबणा दृष्टिपथात आणली. पूर्वापार चालत आलेल्या भक्तिसंप्रदायाला सामाजिक व सांस्कृतिकदृष्टय़ा वेगळे वळण देऊन भागवत धर्माचा पाया रचला. समतेच्या विचाराने भारलेली ही पालखी समाजपुरुषाच्या खांद्यावर दिली व ती पालखी विमुक्त मनाने पंढरीच्या दिशेने चालू लागली. सनातन वैदिक पंडितांच्या विषमतेतून उपेक्षित राहिलेला बहुजन समाज डोळय़ांपुढे ठेवून ज्ञानदेवांनी समतेची उदात्त तत्त्वे त्या पालखीत ठेवून तिला नवसंजीवनी दिली.

संत ज्ञानेश्वर म्हणजे कुसुमकोमल माऊलीच्या मनाचा कळवळा घेऊन आलेला एक स्वयंभू प्रज्ञापुरुष. या युगपुरुषाचा मराठी मनावर अखंड प्रभाव पडलेला आहे. या संतशिरोमणीने अपार जिज्ञासेच्या अलौकिक प्रतिभेतून संस्कृतातील विविध ज्ञानग्रंथांचा अभ्यास करून समन्वयात्मक भूमिकेने भागवत धर्माला एक वेगळी बैठक दिली. त्यांनी भगवद्गीतेच्या सातशे श्लोकांवर नऊ हजार ओव्यांचे अनुपम भाष्य लिहिले. अभिजात रसिकतेने तत्त्वज्ञानाचा वेध घेताना ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी स्वतंत्र काव्यानुभूतीचा आविष्कार घडवला आहे. संस्कृत भाषेच्या अभेद्य किल्ल्यात असलेले भगवान श्रीकृष्णांचे ज्ञानामृत या शब्दप्रभूने सर्वसामान्यांसाठी मराठी भाषेच्या माध्यमातून मुक्त केले. आशय आणि अभिव्यक्तीतला आत्मविश्वास व्यक्त करताना ज्ञानदेव सांगतात,

तेणे कारणे मी बोलेन ।
बोली अरूपाचें रूप दावीन ।
अतींद्रिय परी भोगवीन
इंद्रियांकरवीं।।

‘अतींद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरवी’ असे प्रतिज्ञापूर्वक सांगून देववाणीत असलेले तत्त्वज्ञान लोकवाणीत दृग्गोचर केले. ज्ञानदेवांचे वडीलबंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे सद्गुरू होते. निवृत्तीनाथांची गुरुपरंपरा नाथपंथी होती. नाथपंथाने ज्ञानप्रसारार्थ बोलीभाषेचा अंगीकार सामान्यजनांसाठी केला होता. तोच वारसा ज्ञानदेवांनी पुढे चालवला. त्याकाळी पढिक पंडितांच्या दुराग्रहामुळे जनसामान्यांवर घोर अन्याय घडत होता. इतकेच काय, ज्ञानदेवांचे कुटुंबही त्यात होरपळून निघाले होते. त्या चिवट व्यवस्थेला आव्हान देऊन ज्ञानेश्वरांनी खरा मानवता धर्म उजेडात आणला. हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ज्ञानदेवांना भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळाला. श्रीकृष्णाने गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे की,

मां हि पार्थ न्यपाश्रित्य ये।
पि स्युः पापयोनमः स्त्रियोवैश्यास्तथाशूद्रास्ते।
पियान्ति परांगतिम् ।।

अर्जुना, माझ्या भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. स्त्रिया, वैश्य तसेच शुद्र इत्यादी सर्वांना एकदा तो सर्वार्थाने मला शरण आला तर तो परमगतीला प्राप्त होतो. माझ्या ठिकाणी कसलाही भेदभाव नाही. भगवंतांनी पुढे असेही सांगितले आहे की, जो सख्यभक्तीने मला भजतो त्याला मी माझ्या हृदयात, मनात, मस्तकावर धारण करतो. त्याचे सदैव रक्षण करून त्याचा योगक्षेम चालवतो. ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोगात भक्तियोग सहज सुलभ असून त्यायोगाने माझा ज्ञानी भक्त माझ्या स्वरूपाचे दर्शन घेऊन स्वतः स्वरूपाकार होतो. आपपर भाव निमालेला हा माझा भक्त दिवा जसा घरच्यांना आणि बाहेरच्यांना सारखाच उजेड देतो तसा तो समत्वभावाने जगाकडे पाहतो.

सामान्यांसाठी असलेले हे भगवंताचे तत्त्वज्ञान मराठी भाषेत आणून मराठी भाषा तत्त्वज्ञान पेलण्यासाठी सक्षम व सर्वार्थाने परिपूर्ण तसेच अमृतापेक्षाही रसपूर्ण आहे हे ज्ञानदेवांनी उपमा दृष्टांताच्या सहाय्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले. शाश्वत चिरंतन, अपरंपार आनंदाचा अविनाशी ठेवा गवसताच अशाश्वतातील कष्ट, उपेक्षा आणि अवहेलनेच्या ते पलीकडे गेले. आत्माविष्काराच्या आनंद लहरीतून त्यांची अभंगसृष्टी बहराला आली. पंढरपूरच्या वाळवंटात सारी भक्त मंडळी भेदाभेद विसरून एक झाली. हृदयातील पांडुरंगाला आलिंगन देऊन ते एकमेकांना हृदयी धरू लागले. साऱया वारकरयांच्या भावविश्वात विठ्ठल एकरूप होऊन मुक्तपणे नाचू-गाऊ लागला. या आनंदाच्या डोहात स्त्रा भक्तांना आपले स्वत्व गवसले. स्त्री संत गरिबी श्रीमंतीच्या पलीकडे जाऊन कोटीचंद्र प्रकाशात तळपणाऱया विठ्ठलाच्या मनोहर रूपात स्वतचे रूप न्याहाळू लागल्या. भक्तीच्या अधिकाराचा प्राणस्पर्श होताच ईश्वराच्या सगुण निर्गुण अलौकिक सृष्टीचे अपरंपार आभाळ दृष्टिपथात आले. दळण, कांडण, धुणीभांडी करणारी, शेणकुटे थापणारी कष्टाळू दासी जनी हिचा विश्वात्मक अनुभूती देणारा पुढील अभंग पाहा.

जोडी जोडिली शिवाची । भ्रांती फिटली मनाची ।।
आनंदासी आनंद झाला । बोधे बोधचि भेटला ।।
ऐसी विश्रांती लाधली । आनंदकळा संचारली ।।
त्या एकी एक होता । दासी जनी कैची आता ।।

जनाबाईने रोजचे कर्तव्य करीतच जाणिवेच्या सहाय्याने नेणीवेचा तळ गाठत अंतरीची अद्भुत विश्रांती अनुभवली. जिवात्म्याला शिवात्म्याचा परतत्त्वस्पर्श होताच जो साक्षात्काराचा क्षण तिने अनुभवला त्याचा उत्स्फूर्त आविष्कार या अभंगातून व्यक्त केला आहे. या अनन्यसाधारण निर्गुण निराकाराला अर्थघन शब्दप्रतिमांतून जनीने सगुण साकार केले आहे. ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर असा घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या पालखीने परिवर्तनाची पहाट दाखवली. आज ज्ञानदेवांच्या विचारांची पालखी वेगळय़ा मानवता धर्माची आस डोळयांत घेऊन समाजाकडे पाहत आहे. कोरोनाच्या महामारीने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची करुण अवस्था झाली आहे. त्यांना आर्थिक व मानसिक आधाराची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे मन आज करुणाघनाकडे वेगळे पसायदान मागत असेल की, या मानवजातीला निराशेतून बाहेर काढून जगण्याच्या आशेचा किरण दाखव.

सुमारे सातशे वर्षांपूर्वी ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे’ हे दान ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे मागितले होते,

तेच दान देवाने ज्ञानेश्वरांच्या पालखीत भरभरून टाकले होते.

आज अनेक अनाथ निराधार कुटुंबांना सनाथ करण्यासाठी ‘मैत्र जिवांचे’ लाभावे, ही अपेक्षा आहे.

या संकटकाळात अनेकांनी योगदान दिले तरीही अजून मदतीच्या हातांची गरज आहे.

कवी विंदा करंदीकर दात्याची सुंदर कल्पना व्यक्त करीत पुढील भावना व्यक्त करतात.

देणाऱयाने देत जावे । घेणाऱयाने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस । देणाऱयाचे हात घ्यावे ।।

निराधाराला दिलेला आधार ही आज ईश्वराची पूजा आहे आणि त्यानेच जनताजनार्दन प्रसन्न होणार आहे.

कोरोनामुक्त महापूजेचा संकल्प घेतलेली ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाकडे घेऊन जायची आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: saamana

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी

। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी

1 thought on “ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *