पंढरी हे संतांचे माहेर

पंढरी हे संतांचे माहेर

पंढरी हे संतांचे माहेर आहे. विठ्ठल-रखुमाई हे सर्व जीवांचे माय-बाप आहेत. त्या माता-पित्यांच्या भेटीसाठी सारे पंढरपूरला जातात. प्रपंचातील नाती-गोती, दुःख, वेदना, अहंकार, ऐश्वर्यभोग दूर सारून सर्वजण विठू माऊलीच्या भेटीसाठी, दर्शनासाठी पंढरपूरला जातात. श्रीविठाईचे लाडके भक्त संत नामदेव म्हणतात-प्रत्येक वर्षातील आषाढी व कार्तिकी एकादशीला मला भेटण्यास पंढरीस या. त्या दिवशी मला विसरू नका. असे हा देव आपल्या सर्व भक्तांना प्रेमळपणाने सांगत आहे.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
सांगतसे गुज पांडुरंग ।।
पतित पावन मी तो आहे खरा ।
तुमचेनि बरा दिसतसे ।।
तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा ।
भेटाल केधवा मजलागी ।।
धावोनिया देव गळा घाली मिठी ।
स्फुंदस्फुंदुन गोष्टी बोलतसे ।।
तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी ।
म्हणे चक्रपाणि नामयासी ।।

संत एकनाथ महाराज म्हणतात- पंढरी हे माझे माहेर आहे.

भीवरा नदीच्या तीरावर असलेले पंढरपूर माझे माहेर आहे. तेथील विठ्ठल व रुक्माई हे माझे आई-वडील आहेत. पुंडलिक हा बंधू, तर चंद्रभागा ही बहीण आहे. या माहेराची सतत आठवण करावी.

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं ।।
बाप आणि आई । माझी विठ्ठल – रखुमाई ।।
पुंडलिक आहे बंधु । त्याची ख्याती काय सांगु ।
माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पाप भंगा ।।
एका जनार्दनी शरण । करी माहेरीची आठवण ।।

संतांना पंढरीच्या विठुरायाचे आकर्षण आहे. कारण हा देव श्रीमंत आणि उदार आहे. स्वतंत्र आणि दाता आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानदेव आपल्या एका अभंगात सांगतात –

सगळ्या जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी व त्रैलोक्यात केवळ आनंदच भरून राहावा यासाठी जिवाने प्रथम पंढरपुरास जावे. पांडुरंगाच्या प्रेमात मन रंगल्यावर सर्वत्र आनंद निर्माण होतो.

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्हीं लोक ।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।
बापुरखुमादेवीवरू विठ्ठलेंसी भेटी ।
आपुले संवसाटी करुनि ठेला ।।

संत तुकोबा पंढरी या आपल्या माहेराचे सविस्तर वर्णन करताना म्हणतात- हे भक्तिरूप साजणी, पंढरी हे माझे माहेर आहे. माझ्या माहेराचे मी गुण गातो. राही, रखुमाई व सत्यभामा या माझ्या माता असून पांडुरंग माझा पिता आहे. गरुड आणि भक्त पुंडलिक हे माझे दोन भाऊ आहेत. उद्धव, अक्रुर, व्यास, अंबरीष-ऋषी, नारद या सर्व बांधवांचे मी गुणगान करतो. माझे माहेरचे खूप मोठे गणगोत आहे. संत-महंत माझे नातेवाईक आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताईसह नामदेव तर माझा जिवलग सखा आहे. नरहरी सोनार, रोहिदास, सावता, कबीर हे माझे सोयरे आहेत.

संत भानुदास एका अभंगात म्हणतात- दांभिक लोकांचे देव धातूंचे व प्रतिमारूप असतात. अज्ञानामुळे त्यांची त्या मूर्तींवर श्रद्धा व निष्ठा असते. योगाभ्यास करणाऱ्या साधकांचा देव निर्गुण-निराकार असतो. त्याला रूप, आकार नसतो. मात्र भोळ्या भाविकांचा देव सगुण साकार असतो. असा हा देव पंढरीस विटेवर उभा असून त्याने कटीवर हात ठेवले आहे. तो समरूपतेचा पुतळा आहे. तो न्यायी, दयाळू आणि पालनकर्ता आहे. ते म्हणतात-

देखोनिया पंढरपूर । जीवा आनंद अपार ।।
भाविकासाठी उभा । विठु कैवल्याचा गाभा ।।
धन्य धन्य पंढरपूर । सर्व जीवांचे माहेर ।।
अद्वयानंद तो हा परमानंद । शोभे सच्चिदानंद विटेवरी ।।

संत एकनाथ महाराज म्हणतात- पंढरीच्या वारीहून परत आलेल्या वारकऱ्यांना पाहून मला खूप आनंद होतो. माझ्या माहेराची खुशाली मला त्याच्याकडून कळते. पंढरपुराहून दर्शन घेऊन आलेले वारकरी थोर भाग्यवान आहेत. पांडुरंगांच्या दर्शनाचा दिवस दिवाळीप्रमाणे आनंदी असतो. ते म्हणतात-

आजी दिवाळी दसरा । आलो विठ्ठलाचे द्वारा ।।
पाहुनिया देव तीर्थ । आनंदे आनंद लोटत ।।
नाठवे काही अन्य दुजे । विठ्ठलावाचुनी मनी माझे ।।
आशा केली ते पावलो । एका जनार्दनी धन्य झालो ।।

पंढरीस जाऊन श्रीविठ्ठलाच्या चरणांचे दर्शन होताच जिवास परमानंद होतो. दुःख, दैन्य, तृष्णा, क्लेष नष्ट होतात. मदमत्सर, अहंकार, आशा, कामक्रोधादि वासना नष्ट होतात. मन स्थिर, शुद्ध व शांत होते. ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवू लागते. त्यामुळे सर्वत्र आनंद प्रकट होतो.

सुखाचेही सुख असे श्रीहरीचे मुख आहे. ते पाहताच तहानभूक नाहीशी होते. जीव सुखरूप होतो. संत ज्ञानदेव म्हणतात-

 

हे पण वाचा :संकष्टी गणेश चतुर्थीला कसे व्रत करावे, जाणून घ्या …

 

सर्व सुखाचे आगर । बापरुखमादेवी वर ।।

संत नामदेव म्हणतात 

येतियां पुसे जातियां धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।।
येईवो येईवो येईवो विठाबाई माऊली ये ।
निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहे ।।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला ।।
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ।।

संत तुकोबा एका अभंगात म्हणतात- पंढरपूर हे माझे माहेर आहे. माझ्या माहेरी असलेल्या माता-पित्याच्या भेटीसाठी माझा जीव तळमळत आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीची मला ओढ लागली आहे. रात्रंदिवस मी माऊलीची वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्र जसा चकोर पक्ष्याला जीवन असतो. चकोर जसा चंद्राची वाट पाहत असतो. तसा मी पंढरीनाथाच्या भेटीची वाट पाहतो. दिवाळीला माहेरी जाण्यासाठी जशा लेकी आमंत्रणाची, मुळाची वाट पाहतात तशी मी वाट पाहतो.

संत नामदेव म्हणतात- हे देवा, संसारात आपणापासून दूर असलेल्या लेकीला आपण विसरला आहात काय? सासुसासरे, दीर जावा यांच्या जाचामुळे मला आपल्या भेटीची ओढ आहे.

पंढरी माहेर विठ्ठल माऊलिये ।
जावोनि हे बोली सांगिजो जी ।।
संसार गावी लेकी आहे तुमची ।
चिंता का तियेची सांडियेली ।।
सासुरवासिणी पाहातुसे वाट ।
सांगिजो का कष्ट माऊलिये ।।

प्रपंचात कोणी क्षणभर विश्रांती घेऊ देत नाही. निष्ठtर भ्रतार, काम-क्रोध हे दोन दीर, आशा ही सासू, तृष्णा ही नणंद ह्या सर्वांच्या जाचातून फक्त माय-बापच सोडवतील.

https://www.krushikranti.com/

ref :Dailyhunt

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *