भक्त पुंडलिक

भक्त पुंडलिक साठी देव विटेवर उभा

पुंडलिकाचे व्दारी, उभा विटेवरी …!
धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीये..!!

संत तुकारामाच्या या अभंगामध्ये भक्त पुंडलिकाचे महात्म्य सांगितलेले आहे. ‘निधान’ म्हणजेच प्रत्यक्ष पांडुरंग पंढरीत आला तोच मुळी आपल्या लाडक्या भक्तास-पुंडलिकास भेटण्यासाठी. ‘युगे अठ्ठावीस विटेवर उभा’ असं जरी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत म्हणत असलो तरी तो भाग श्रध्देचा आहे. कारण पांडुरंगाला अठ्ठावीस युगे विटेवर उभे केले . त्या पुंडलिकालाही तितकेच प्राचीन मानायचे का ? मुळीच नाही. पांडुरंगाला पंढरपूरात पुंडलिकाने आणले याबाबत दुमत नाही. त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती तिच्या उपासनेचा काळ तोच पुंडलिकाचा काळ ठरतो.

इसवीसन बाराव्या शतकाच्या सुरवातीस महाराष्ट्रातील पंढरपूरास तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त होवून पांडुरंगाचे भक्त पंढरीची वारी करु लागले आणि याच दरम्यान पुंडलिकाचेही महात्म्य विशेष वाढले होते.वारकरी पंथातील भक्तांची अशी श्रध्दा आहे की प्रल्हादा साठी जसा नरसिंहाचा अवतार झाला तसा भक्त पुंडलिकाकरिता पांडुरंगाचा अवतार झाला. याचाच अर्थ इ.स.बाराव्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्रातील पांडुरंगाच्या उपासनेचा जो काळ तोच पुंडलिकाच्याही मानावा लागतो. अठ्ठावीस युगे ही फक्त ‘श्रध्दा’ आहे’इतिहास’ नव्हे !

भक्त पुंडलिकाचे पूर्वायुष्य

लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचा एक विव्दान ब्राह्मण रहात होता. अत्यंत सज्जन व सदाचारी. ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात जेवढा धार्मिक तेवढाच सात्विक.’शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।’असं जरी संतवचन असलं तरी हा पुंडलिक त्याला अपवाद होता.

अक्षरशः हि-याच्या खाणीत कोळसा निघावा तसा हा दिवटा कुलदीपक ! आईवडिलांना दुरुत्तरे करणे , थोरामोठयांना उपमर्द करणे , मन मानेल तसं वागणे, वाईट मुलांच्या संगतीत रमणे असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते. अशा वायात मुलाला वठणीवर आणण्यासाठी आईवडिलांनी त्याचे लग्न करुन दिले. बायकोमुळे तो सुधारेल ,व्यवस्थित वागेल. अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. पण झाले उलटेच.’आधीच मर्कट,त्यातही मद्य प्याला’….अशी त्याची अवस्था झाली. पुंडलिक चक्क स्त्रीलंपट बनला! हा करंटा काय आपल्या वार्धक्याची काठी बनणार? स्वतःचे जन्मदाते मातापिताच त्याला अडचीणचे वाटू लागले. पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच अन् कशाचीच पर्वा वाटत नव्हती. ‘आगीतून उठले अन् फुफाटयात पडले’ त्याचे आईवडिल पुंडलिकाला वाटत असे. मरत का नाहीत बरे हे लवकर एकदाचे ? आपल्या मागची ब्याद तरी टळेल !

हे पण वाचा : पंढरी हे संतांचे माहेर

भक्त पुंडलिकाचे चे ह्रदय परिवर्तन

एकदा आपल्या अंधःकारमय जीवनाचा विचार करत असतानाच जानुदेवाला घराबाहेर काहीतरी गडबड -गोंधळ चाललेला ऐकू आला. उत्सुकतावश पतीपत्नी बाहेर जावून पहातात तो काशी तीर्थक्षेत्री निघालेल्या भक्तांचा मुक्काम लोहदंड गावी पडलेला. त्यात म्हातारे होते अन् तरुणही होते. तरुण पोरे आपापल्या वृध्द मातापित्याची सेवा करत होते. ते दृश्य पाहून भक्त पुंडलिकाच्या आईवडिलांना त्या वृध्दांचा केवढा हेवा वाटला असेल नाही ? आपल्या भाग्यात असे सुख कुठले ? पण का कोण जाणे भक्त पुंडलिकही त्या समुदायात सामील झाला आणि त्यालाही काशीला जावेसे वाटू लागले. मग तसे घरात बोलून दाखविताच त्याची बायकोही तयार झाली. त्याचे आईवडिलही त्याच्यामागे लागले. तेंव्हा धुर्त अन लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचे ठरविले. सर्वजण काशीला निघाले. त्याकाळी प्रवासाच्या अन्य सुविधा गरिबांसाठी नव्हत्या.

पायीच प्रवास करावा लागे. वृध्द मातापिता चालू तरी किती शकणार ? त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली. तेंव्हा पुंडलिकाने काय करावे ? आपल्या तरुण बायकोला घेतले स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळयात बांधल्या दो-या अन् लागला त्यांना ओढत न्यायला ! सकल तीर्थे ज्यांच्या पायासी येवून मिळतात त्या आईवडिलांच्या गळयात दोरीचे फास अडकवून पुंडलिक पुण्यक्षेत्र काशीला निघाला ‘पुण्य’ मिळविण्यासाठी.

भक्त पुंडलिकाची वाट चुकली

पण पुढे मात्र बरोबरच्या लोकांनी अन् त्याची चुकामुक झाली. पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. पोहोचला कुठला ? नियतीनेचत्याला तेथे खेचून आणले ! कुक्कुर स्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते. हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटते. पुंडलिकाने बायकोला खांद्यावर घेतलेले अन् वृध्द मातापित्यांच्या गळयात दोर बांधलेले स्वामींनी पाहीले होते.

ते पुंढलिकाला म्हणाले, ” मी माझ्या आई-वडिलांमध्येच शिव-पार्वती पाहतो. आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र ! ” पुंडलिकाच्या वर्मी द्याव बसल्या सारखे झाले. तो खजिल झाला. अंतर्मुख झाला. बायकोला खांद्यावरुन खाली उतरवलं. थंड पाणी प्यायला दिलं. रात्री पुंडलिकाने शुध्द अंतःकरणाने आपल्या आईवडीलांची क्षमा मागितली. मुळातच सात्विक स्वभाव असलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं. तिघांच्याही डोळयातून अश्रू वाहू लागले ! ‘अश्रू’ कसले. त्या तर होत्या पवित्रमच गंगा-यमुना ! बदलला, पुंडलिक पूर्णतः बदलला. अंतबार्ह्य बदलला अखेर त्याच्यातील ‘देवत्वा’ने राक्षसत्वावर मात केली ! स्त्रीलंपट पुंडलिक, भोगललोलूप पंडलिक निस्सीम निमित्त मातृपितृ भक्त बनला ! वाल्याचा जणू वाल्मिकी बनला !!

हे पण वाचा : सर्व संत साहित्य

भगवंत प्रसन्न झाला

पुढे पुंडलिकाने आपल्या वृध्द मातापित्यांना काशी तर घडवलीच पण पंढरपूरासही आणले.’अन्य क्षेत्रं कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति ‘ या उक्तीनुसार पुंडलिकाच्या पश्चातापामुळे त्याची पूर्वीची सर्व पापे काशी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट झाली. वाल्याचा जसा वाल्मिकी बनला होता तसा भोगी पुंडलिक आता योगी बनला होता !

एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृभक्तीही श्रीकृष्णाला पहायची होती. आजमायची होती. भगवंत पंढरीत आले. पंडुलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आत पहातात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता.’देव भावाचा भुकेला । सोडूनी आला वैकुंठाला ॥”आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जागचा हाललाही नाही. आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा ? त्याने बसल्या जागेवरुनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले.

सेवेचं व्रतही मोडता येईना अन् भगवंताच्या स्वागताचा गृहस्थधर्म ही पाळता येईना. पुंडलिकापुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याने जवळचं पडलेली एक विट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईतोपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं रहायला सांगितले. आणि आश्चर्य असे की तो सावळा विठूराया कर कटावर ठेवून चक्क त्या विटेवरउभा राहिला. ख-या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात ! कबिराचे शेले विणू लागतात ! दामाजीसाठी तर झाला महार पंढरीनाथ ! भक्त पुंडलिकाची असीम मातृपितृभक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला ‘वर’ माग म्हणाले. तर त्याने काय मागावे ? पैसा ,धनदौलत ? शेती वाडी ? भक्त पुंडलिकाने विचार केला.

लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असं काही तरी मागावं तो म्हणाला,’ देवा ! मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको ! मला फक्त तू हवा आहेस ! आत्ता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथचं सतत उभा रहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे !” देव म्हणाले ‘तथास्तु’ ! आणि तेव्हापासून हे विटेवरलं परब्रह्म कमरेवर हात ठेवून ‘अठ्ठावीस युगे’ म्हणा की सातशे वर्षे म्हणा- भक्तांचं कोड पुरवित आहे. भक्त पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे ! त्याचे पाय ‘समचरण’ आहेत. सर्वांकडे तो समत्वदृष्टीने पहातो. त्याच्या पायी जो लागतो तोही समत्वदृष्टीप्राप्त करुन घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती!

www.krushikranti.com

ref:Maybolilekh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *