संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाई माहिती

संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती. (sant muktabai information in marathi)

मुंगी उडाली आकाशीं |
तिणें गिळीलें सूर्याशीं |

महाराष्ट्रात अनेक संत महात्म्ये होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे. ज्यांनी मायमराठी च्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न केले, ज्यांना असामान्य बुद्धिमता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहिण म्हणजेच संत मुक्ताबाई.


संत मुक्ताबाई माहिती

नाव

मुक्ताबाई

जन्म

 अंदाजे सुमारे ई.स. 1279

गाव

 महाराष्ट्रातील आपेगाव

आई

 रुक्मिणीबाई

वडील

विठ्ठलपंत

मृत्यू

सुमारे12 मे 1297 (जळगाव जिल्ह्यातील कोथळी)


संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. १२७९ साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई “मुक्ताई” या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी ! पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून मत पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडाना संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहिण भावंडानी ब्राम्हविध्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुल सुखी रहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. मातापित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहीणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माउलीच झाली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, सोशिक समंजस बनली.


तात आणि माता गेलीसे येथून| तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा
निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न | सांभाळी सोपान मजलागी
तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ…

मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता. पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वरदर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ उलगडून दाखविला. मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवाना आत्मरुपाची प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे १४०० वर्षाचे आयुष्य धन्य झाले. “आठ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली.” कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, “मुक्ताई करे लेइले अंजन”.


ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताई ने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले.
मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.


संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.
तिने ज्ञानेश्वरांना, आदिनाथांपासून गहीणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्निला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग.

योगी पावन मनाचा | साहे अपराध जनांचा
विश्व रागे झाले वन्ही | संती सुखे व्हावे पाणी
शब्दशस्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश
विश्वपट ब्रम्हदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

समजवताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन कराव्या लागतात,

हात आपुला आपणा लागे | त्याचा करू नये खेद
जीभ दातांनी चाविली | कोणे बत्तीशी पाडिली
चणे खावे लोखंडाचे | मग ब्रह्मपदी नाचे

समजवण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते,

लडिवाळ मुक्ताबाई | जीव मुद्द्ल ठायीचे ठायी
तुम्ही तरुण विश्व तारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची धेयस्वप्नांची जाणीव होती.
समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेत.

“अखंड जायला देवाचा शेजार
कारे अहंकार नाही गेला |
मान अपमान वाढविसी हेवा
दिवस असता दिवा हाती घेसी ||”

मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ‘ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे. ह्या ग्रंथामध्ये संत निवृतिनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे.

संत मुक्ताबाईंचा मृत्यू

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या (१२ मे १२९७). मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येते आहे.


संत मुक्ताबाई माहिती समाप्त 

खालील फोटो वर क्लिक करून संत मुक्ताबाई यांचे अँप लगेच डाउनलोड करा .

google play logo | Google play gift card, Play store app, Itunes gift cards

2 thoughts on “संत मुक्ताबाई माहिती”

  1. Pingback: संत तुकाराम महाराज माहिती मराठी Sant Tukaram Information In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *