संत निळोबाराय अभंग

मग पाय ठेऊनि – संत निळोबाराय अभंग – १२२

मग पाय ठेऊनि – संत निळोबाराय अभंग – १२२


मग पाय ठेऊनि खांदियेवरी ।
चेंडा झेपावला हरी ।
ऐसें देखोनियां इतरीं ।
केला कल्लोळ खालुता ॥१॥
म्हणती रे नको नको हरी ।
जाऊं तिये खांदीयेवरी ।
आम्हां तुझी आई घरीं ।
गांजिल ऐसें करुं नकों ॥२॥
तयांप्रति म्हणोनि बरें ।
खांदि मोडियली भारें ।
ते आपण येकचि सरें ।
पाडियला डोहांत ॥३॥
देखानियां ते अवघे गडी ।
शंख करिती थडोथडीं ।
अंगे घालोनियां गडबडी ।
लोळती भुई आक्रंदत ॥४॥
म्हणति गेला रे महादाश्रय ।
तयाविण आम्हीं पोरटी काय ।
नाहीं दवावया ठाय ।
तोंड आतां कोणीकडें ॥५॥
काय म्हणेल ते दसवंती ।
लोकहि आम्हां फजीत करिति ।
म्हणती कां जाऊं दिला श्रीपती ।
तुम्हीं तया झाडावरी ॥६॥
हाणेनि घेती उरावरी ।
मस्तका ताडिती निजकरीं ।
गाई हांबरडे हाणीती वरी ।
दु:ख भारी न सोसवे ॥७॥
गांवांमाजी गेली वार्ता ।
लोकहि धांवले ऐकतां ।
नंदयशोदे प्राणांत अवस्था ।
हो सरली तेचि क्षणी ॥८॥
घरोघरीं हाहाकार ।
शोक करिती नारीनर ।
ठाकूनि आलीं तीर ।
तंव तो कहार गोवळांचा ॥९॥
यशोदा म्हणे दावा हरी ।
केउता गेलारे गे मुरारी ।
नंदही दीर्घ रुदन करी ।
म्हणे हरपला गोविंद ॥१०॥
दारिद्रीया हातीं रत्न ।
लागलें न धरे करितां यत्न ।
तैसि परी झाली म्हणोन ।
नंद लोळे गडबडा ॥११॥
असो तो दु:खार्णव सांगता ।
पाषाण फुटती तत्त्वतां ।
मग समोखुनीया उभयता ।
लोक घेऊनि घरा आले ॥१२॥
एका कृष्णविणं नगर ।
वोस दिसे भयंकर ।
दु:खार्णवीं नारीनर ।
पडले तैसेंचि मातापिता ॥१३॥
निळा म्हणे इकडे हरि ।
रिगोनियां सर्पविवरीं ।
विखार काडिला बाहेरी ।
काळया तो नाथुनि ॥१४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग पाय ठेऊनि – संत निळोबाराय अभंग – १२२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *