maruti stotra

मारुती स्तोत्र मराठी अर्थ

मारुती स्तोत्र (maruti stotra) मराठी अर्थ आरंभ


भीमरूपी महारुद्रा वजहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।। १ ।।

अर्थ :- हे हनुमंता, आपण भीमरूप, महारुद्र, वजहनुमान, मारुती, वनाचे शत्रु, माता अंजनीचे पुत्र प्रभू रामचंद्रांचे दूत आणि प्रभंजन आहात.

विवरण:- भीम म्हणजे भव्य अथवा विशाल. हनुमंत भव्य आणि विशाल आहेत म्हणून त्यांना ‘भीमरूपी’ म्हटले आहे. भगवान शंकराने रामाच्या सेवेसाठी अनेक अवतार घेतले. त्या प्रत्येक अवताराला रुद्र म्हणतात. त्यांतील हनुमंताचा अवतार सर्वांत महत्त्वाचा म्हणून ‘महारुद्र’ होय. बालपणी हनुमंताने सूर्य गिळला तेव्हा इंद्राने आपल्या वज्राने त्याच्या हनुवटीला आघात करून सूर्यबिंबाची सुटका केली म्हणून हनुमंताला वजहनुमान’ म्हणतात. मरुत् हे वायूचे एक नाव आहे. हनुमंत वायुपुत्र असल्यामुळे त्यांना मारुती म्हणतात.

लंकेत हनुमंताने रावणाच्या वनांचा विध्वंस केला म्हणून त्याला ‘वनारी’ म्हणतात. अंजनीदेवीचे पुत्र असल्यामुळे अंजनीसुत म्हणतात. सीतेचा शोध घेणे, रावणवधाची बातमी सीतेला सांगणे, राम अयोध्येत येत असल्याचा निरोप भरताला सांगणे अशा सर्व महत्त्वाच्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी दूत म्हणून हनुमंताला पाठविले म्हणून ते ‘रामदूत’ आहेत. प्रभंजन हे वायुदेवांचेच एक नाव आहे. म्हणून हनुमंताला हाक मारताना ‘प्रभंजना’ असे संबोधिले. ही आठही विशेषणे हनुमंताची असून या विविध नावांनी समर्थ हनुमंताला साकडे घालीत आहेत.


महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळे । सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥ २ ॥

अर्थ :- हे हनुमंता, आपण महाबळी आणि प्राणदाता असून झोपलेल्यांना जबरदस्तीने उठवता. आपण लोकांना सुख देणारे असून लोकांच्या दुःखाचे हरण करणारे आहात. आपण धूर्त, विष्णुस्वरूप आणि उत्तम गाणारे आहात.

विवरण :- आपल्या बळाची कुणाशीच तुलना करता येत नाही, म्हणून आपण ‘महाबळी’ आहात. रामरावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला असता हनुमंताने संजीवनी वनस्पती आणून त्याचे प्राण वाचविले, म्हणून ‘प्राणदाता’ असे हनुमंताला संबोधिले. सकाळी युद्धसमयी हनुमंत सगळ्या वानरांना जबरदस्तीने उठवितो आणि युद्धाची प्रेरणा देतो.

हनुमंताच्या कृपेने माणसाचा संसार सुखाचा होतो आणि त्याची संसारदुःखे नष्ट होतात. हनुमंताजवळ व्यवहारचातुर्य असल्यामुळे त्याला कुणीही फसवू शकणार नाही, म्हणून त्याला ‘धूर्त’ असे म्हटले. वैष्णव शब्दाचा विष्णुस्वरूप असा एक अर्थ होतो तर विष्णुभक्त असा दुसरा अर्थ होतो. रामचंद्र हे विष्णूचा अवतार असून हनुमान त्यांचे परमभक्त आहेत. म्हणून त्यांना ‘वैष्णव’ म्हटले आहे. ते निरंतर रामचरित्राचे गायन करतात म्हणून त्यांना ‘गायका’ अशी हाक मारली. विविध विशेषणांचा वापर करून समर्थ हनुमंताला आळवीत आहेत.


दिनानाथा हरीरूपा सुन्दरा जगदन्तरा । पाताल देवताहन्ता भव्यसेन्दूर लेपना ॥३॥

अर्थ :- हे हनुमंता आपण दिनानाथ, हरीरूप, अतिशय सुंदर असून सर्व जगताच्या अंतर्यामी आहात. अहीरावण आणि महीरावण या पाताळातील देवतांना आपण ठार केलेत. आपल्या सर्वांगाला शेंदूर लावल्यावर आपण भव्य दिसता.

विवरण :- जे गरीब आहेत, शरणागत आहेत त्यांना हनुमंत आधार देतात. म्हणून त्यांना ‘दिनानाथ’ म्हटले. हनुमंत दिसायला अतिशय सुंदर आहेत. त्यांचे सौंदर्य चित्ताचे हरण करते म्हणून त्यांना ‘हरीरूप’ असे संबोधिले. हनुमंत श्वासोच्छ्वासाच्या रूपाने सगळ्या जगताच्या अंतर्यामी वास करून आहेत.

अहीरावण आणि महीरावण हे दोन्ही राक्षस रावणाचे मित्र होते. त्यांचा वध करून हनुमंताने रामचंद्रांच्या विजयाचा मार्ग निष्कंटक बनवला. हनुमंताला शेंदूर वहाण्याची पद्धत आजही आहे. शेंदरी रंग भगव्या रंगाला जवळचा असून त्यागाचे प्रतीक आहे आणि हनुमंताचे जीवन म्हणजे मूर्तिमंत त्याग आहे.


लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवन्ता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

अर्थ :- हे हनुमंता, आपण लोकनाथ आहात, जगन्नाथ आहात आणि प्राणनाथही आहात. आपण अत्यंत पुरातन आहात. आपण पुण्यवन्त, पुण्यशील आणि पवित्र असून भक्तांना तृप्त करता.

विवरण :- भू, भुवः स्वः, महः, जनः, तपः आणि सत्यम् हे सातही लोक वायूच्या सत्तेवर जगतात. म्हणून हनुमंताला ‘लोकनाथ’ म्हटले आहे. ज्या जगात आपण रहात आहोत त्या जगातील साऱ्या जीवांना वायुतत्त्वाचाच आधार आहे म्हणून हनुमान ‘जगन्नाथ’ आहेत. आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे ती हनुमंताचीच असल्यामुळे हनुमंत आपल्या प्राणाचे नाथ आहेत. महावीर हनुमान हे चिरंतन ब्रह्मतत्त्व असल्यामुळे त्यांना ‘पुरातन’ या शब्दाने संबोधिले आहे. पावित्र्य तीन प्रकारचे असते.

१) कायिक, २) वाचिक, ३) मानसिक, हनुमंत पुण्यवन्त आहेत, म्हणजे शरीराने पवित्र आहेत. ते पुण्यशील आहेत याचा अर्थ त्यांची वाणी पवित्र आहे. हनुमंत मनाने देखील पवित्र आहेत म्हणून त्यांना पावन म्हटले आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण करून ते त्यांना संतोष देतात म्हणून त्यांना ‘परितोषका’ अशी हाक समर्थ मारतात.


ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटला पुढे । काळाग्नि काळरुद्राग्नी देखतां कापती भये ।।५।।

अर्थ :- रामचंद्रांचा विजयी ध्वज आपल्या हातात धरून आपण मोठ्या आवेशात सर्व सैन्याच्या पुढे निघालात. आपले हे रौद्र रूप पाहून काळाग्नि आणि काळरुद्राग्नि देखील आपण मरणार या भीतीने थरथर कापू लागतात.

विवरण :- युद्धामध्ये ध्वजाची तुकडी महत्त्वाची समजली जाते. ध्वज खाली पडता कामा नये म्हणून ध्वजाची जबाबदारी अत्यंत पराक्रमी माणसाकडे सोपविली जाते. रामचंद्रांच्या सैन्यात ही धुरा हनुमंताने सांभाळली. प्रभूंच्या शत्रूचे निर्दालन करायचे म्हटले की, हनुमंतांना आवेश चढतो.

हनुमंताचा हा आवेश एवढा महाभयंकर प्रलयंकारी असतो की, अशा वेळी कोणालाही ‘आता आपले काही खरे नाही, आता आपण जगत नाही अशी भीती निर्माण होते. माणसांना ग्रासणारे काळाग्नि आणि काळरुद्राग्नि हे यमाचे दूतही हनुमंताला घाबरतात.


ब्रह्मांडें माईली नेणों आवळें दंतपंगती ।नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भृकुटी त्राहिटिल्या बळे ॥६॥

अर्थ :- हे हनुमंता, युद्धप्रसंगी रागाच्या भरात आपण जेव्हा दात-ओठ खाता तेव्हा सगळे ब्रह्मांड आपल्या मुखात मावेल असे वाटू लागते. क्रोधाने आपण आपल्या भिवया ताणून धरता तेव्हा आपल्या संतप्त नेत्रांतून जणू तांबड्या ज्वाळा बाहेर पडत असतात..

विवरण:- रामचंद्रांचे विरोधक पाहिले की मारुतराय संतापतात. त्यांच्या क्रोधाचे भयानक वर्णन समर्थ करतात. विश्वरूप दर्शनप्रसंगी सगळे ब्रह्मांड भगवान श्रीकृष्णांच्या कराल दाढेखाली भरईले जाताना अर्जुनाने पाहिले. युद्धावर निघालेल्या हनुमंताचे ध्यान पाहून समर्थाना हनुमंतामध्ये श्रीकृष्णासारखे अक्राळ-विक्राळ स्वरूप दिसले.

हनुमंताचे डोळे क्रोधाने लाल झाले असल्यामुळे त्याला रावणाच्या उद्यानातील पांढऱ्या जास्वंदाची फुले तांबडी दिसली होती, असा स्पष्ट उल्लेख समर्थ चरित्रात येऊन जातो. भक्तासाठी मात्र हनुमान सौम्य आणि सोज्वळ रूप घेतात, त्याचे वर्णन पुढील श्लोकात आढळते.


पुच्छ ते मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरी । सुवर्णकटिकांसोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।

अर्थ :- आपण आपली शेपटी व्यवस्थित वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली आहे. या शेपटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मस्तकावरील मुकुट आणि कानांतील कुंडले शोभून दिसतात. आपल्या कमरेला सोन्याची कौपिन झळकते आहे, तर चरणांमध्ये असलेल्या नूपुरांमधील घंटा चालताना किणकिण वाजत असतात.

विवरण :- हनुमंताचे सारे बल त्याच्या शेपटीमध्ये आहे. एखाद्या विजयी ध्वजाप्रमाणे सर्वांना दिसण्यासाठी शेपूट मुद्दाम मस्तकाच्या वर आणून ठेवले आहे. कर्णाच्या छातीवर ज्याप्रमाणे जन्मतःच सोन्याचे कवच आणि कानात सोन्याची कुंडले होती त्याप्रमाणे हनुमंताची सोन्याची कौपिन जन्मतःच स्वयंभू आहे. चरणातील नूपुरांचा घंटानाद पावलोगणिक भक्तांना रक्षणाचे आश्वासन देत रहातो.


ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

अर्थ :- हे हनुमंता, आपण मुळात सडपातळ असून आपले शरीरसौष्ठव प्रमाणबध्द आहे. मात्र युद्धसमयी आपण जेव्हा विराट रूप धारण करता तेव्हा एखादा पर्वतच समोर उभा ठाकला आहे असे वाटू लागते. एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे आपले शरीर चपळ आहे.

विवरण:- महावीर हनुमंतांना अष्टसिध्दी प्राप्त आहेत. त्यामुळे ते केव्हाही अत्यंत लघुरूप किंवा प्रचंड विशाल रूप धारण करू शकतात. सर्वप्रथम लंकेत प्रवेश करताना हनुमंताने माशीएवढे लघुरूप धारण केले होते तर सुरसी नामक राक्षसिणीने हनुमंताला गिळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पर्वतासारखे मोठे झाले.

शारीरिक चापल्य हा युद्धकलेतील अपरिहार्य गुण आहे. लड्डू माणूस चपळ नसतो. हनुमंत नेटके सडपातळ असल्यामुळे डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच एखादी क्रिया करतात. विजेचा अंदाज करता येत नाही, त्याप्रमाणे शत्रूला हनुमंताच्या हालचालीचा अंदाज करता येत नाही.


कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे । मन्द्राद्रीसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे ॥९॥

अर्थ :- आपल्या लीलाचरित्रात आपल्या उड्डाणाचे असंख्य प्रसंग आहेत आणि नाना प्रकार आहेत. विशेषतः लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर आपण उत्तरेकडे झेपावलात तेव्हा रागाच्या भरात मंदराचलासारखा द्रोणागिरी पर्वत आपण मुळासकट उपटून काढला तो प्रसंग मोठा विलक्षण म्ह लागेल.

विवरण :- हनुमत् चरित्रात त्याचे पुच्छ हा जसा समर्थांच्या कौतुकाचा विषय आहे तसेच त्याचे उड्डाण देखील अद्भुत आहे. हनुमंताला तरुणपणी ऋषींच्या शापामुळे स्वसामर्थ्याचे विस्मरण झाले होते, तेव्हा जांबुवंताने त्याची अस्मिता जागी केली. त्या वेळेस त्याने लंकेत केलेले उड्डाण मोठे अविस्मरणीय ठरले. गरुडापेक्षाही हनुमंताची गती जास्त असून युद्धकांडात समर्थ हनुमंताच्या उड्डाणाचे वारंवार वर्णन करीत रहातात.


आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती । मानसी टाकिले मागे, गतीसी तूळणा नसे ।।१०।।

अर्थ :- आपले आश्चर्य हे की, आपण लंकेत आणलेला द्रोणागिरी पर्वत परत उत्तरेकडे जागेवर नेऊन ठेवला. दोन वेळा आपण उत्तरेचा प्रवास मनाच्या चपळाईने केला. वस्तुतः ज्यांनी आपली गती पाहिली त्यांच्या ध्यानात येईल की, आपल्या उड्डाणाची गती मनाला मागे टाकणारी आहे. त्यामुळे आपल्या गतीशी तुलना करता येईल अशी एकही वस्तू जगात नाही.

विवरण :- हनुमंत देहाने जसे नेटके आहेत तसे त्यांचे वागणे देखील नेटके आहे. काम झाल्यावर वस्तू जेथून घेतली त्याच जागेवर तशीच ठेवून देण्याचा त्यांचा कटाक्ष दिसतो. म्हणून द्रोणागिरी पर्वत परत त्यांनी जागेवर नेऊन ठेवला. ब्रह्मांडात असा बराच भाग आहे की, जिथे मन पोहोचू शकत नाही.

मात्र जिथे मन पोहोचत नाही तिथे हनुमंत जाऊ शकतात. परब्रह्माला ज्याप्रमाणे आकाशाची उपमा सर्वात सूक्ष्म म्हणून दिली जाते त्याप्रमाणे हनुमंताच्या गतीला मनाची उपमा त्यातल्या त्यात चपळ म्हणून दिली जाते. याचा अर्थ ती उपमा परिपूर्ण आहे असा नव्हे.


अणूपासूनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटे ।।११।।

अर्थ :- हे हनुमंता, आपण अणूपासून ब्रह्मांडाएवढे मोठे होत जाता. आपल्या या विशाल रूपाला तुलनाच नाही. विशालतेबद्दल प्रसिद्ध असलेले मेरू आणि मंदार हे पर्वत आपल्यापुढे चिमुकले वाटू लागतात.

विवरण :- विष्णुपुराणात मेरु आणि मंदार या पर्वतांच्या विशालतेचे वर्णन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात हनुमंताच्या विशालतेची तुलना मेरु आणि मंदार यांच्याशी केली. पण समर्थांच्या मते हनुमंताच्या तुलनेने मेरु आणि मंदार हे दोन्ही पर्वत लहान आहेत. उपनिषदामध्ये आत्म्याचे वर्णन करताना अणूहून लहान आणि महानाहून महान असे केले आहे. मारुतीराय आत्मस्वरूप असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापी होऊ शकतात…


ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें घालू शके । तयासी तूळणा कैची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

अर्थ :- हे हनुमंता, आपले वज्रपुच्छ एवढे लांब होऊ शकते की, त्या द्वारे अवघ्या ब्रह्मांडाला गुंडाळता येईल. अशा परिस्थितीत संपूर्ण ब्रह्मांडात असा एकही शोधून सापडणार नाही, की ज्याच्याशी आपल्या वज्रपुच्छाची तुलना करता येईल.

विवरण :- हनुमंत वज्रकाय असल्यामुळे त्यांच्या शेपटीत विलक्षण सामर्थ्य आहे. ते आपल्या पुच्छाने वाटेल तो पराक्रम करू शकतात. याचे प्रत्यंतर राम-रावण युद्ध प्रसंगी आले. गदेने एका वेळी एकाच माणसाला मारता येते.

परंतु हनुमंतांची शेपटी ब्रह्मांडव्यापी असल्यामुळे ते हजारो राक्षसांना एकाच वेळी धरून आपटतात आणि मुक्ती देतात. वज्रपुच्छ ब्रह्मांडव्यापी आहे याचा सूक्ष्म अर्थ असा की, हनुमंत परब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांनी आपल्या सूक्ष्म शक्तीने सारे ब्रह्मांड व्यापले आहे. ज्या प्रमाणे कोशातील किडा आपल्या तंतूने स्वतःला वेढून घेतो त्याप्रमाणे हनुमंत आपल्या पुच्छा ब्रह्मांड वेढून टाकतात.


आरक्त देखिलें डोळा, गिळिले सूर्यमण्डळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमण्डळा ।।१३।।

अर्थ :- हे भगवंता, आपणास पाळण्यात ठेवून अंजनीमाता बाहेर गेली असता आपण आरक्तवर्ण सूर्यबिंब पाहिले. फळ समजून आपण ते गिळले. सूर्यबिंब गिळण्यासाठी आपल्याला खूप मोठे व्हावे लागले. मोठे होत असताना आपण वाढत वाढत सूर्यमंडळ ग्रासून टाकले.

विवरण :- हनुमंताच्या बालपणीची ही कथा सर्वश्रुत आहे. अंजनीमातेच्या दुधाचा प्रभावच एवढा विलक्षण होता की, त्यामुळे सूर्यमंडळ ग्रासण्याची ताकद आपल्यामध्ये बालपणीच आली. शून्यमंडळ भेदले याचा आध्यात्मिक अर्थ असा की, बालपणीच हनुमंत ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांनी शून्यवादाचा निरास केला. अनेक साधक ब्रह्मचिंतन करताना शून्यवादात अडकण्याची शक्यता असते. मात्र हनुमंतांनी रामचंद्रांच्या सगुण भक्तीची कास धरल्यामुळे ते शून्यवादात अडकले नाहीत.


भूतप्रेतसमन्धादि रोग व्याधि समस्तही । नासती तुटती चिन्ता, आनन्दे भीमदर्शने ।। १४ ।।

अर्थ :- हे हनुमंता, आपल्या भव्य दर्शनाचा लाभ असा विलक्षण आहे की, त्या द्वारे सर्व शारीरिक आणि मानसिक आजार, सर्व प्रकारची काळजी एवढेच नव्हे तर भूत, प्रेत, समंध यांच्याद्वारे होणारा त्रास कायमचा नाहीसा होऊन भक्ताला आनंदाची प्राप्ती होते.

विवरण:- रावण हा अघोरी विद्येचा स्वामी असल्यामुळे सीतेला भूत, पिशाच्च, समंध, ग्रह-नक्षत्र, जारण-मारण अशा भीषण प्रयोगाद्वारे घाबरवून टाकीत होता. अनेकदा सीतामातेच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. हनुमंताच्या दर्शनानंतर सीतेचा अघोरी विद्येपासून होणारा सर्व त्रास थांबला. तसेच ‘राम-लक्ष्मण’ सध्या कुठे आहेत? कसे आहेत? ही चिंता नाहीशी झाली. म्हणून रोज सकाळी हनुमंताच्या मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घ्यावे असा शास्त्राचा संकेत आहे. लहान मुलांना •बाहेरची बाधा होऊ नये म्हणून रोज भीमरूपी स्तोत्र म्हणायला सांगितले जाते.


हे धरा पन्धराश्लोकी लाभली शोभली वरी । दृढदेहो निसन्देहो संख्या चंद्रकला गुणे ।।१५।।

अर्थ :- हे हनुमंता, हे पंधरा श्लोक म्हणजे चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा पंधरा कला आहेत. पंधरा श्लोकांद्वारे आपले केलेले हे स्तवन आम्हाला चांगले लाभदायी ठरले. त्यामुळे आमचे शरीर सुदृढ झाले आणि मन निःशंक झाले.

विवरण :- वस्तुतः चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा अशा सोळा कला आहेत. हनुमंत ब्रह्मरूप असल्याने या सोळा कलांच्या अतीत अशी सतरावी जीवनकला आहेत. लौकिकदृष्ट्या त्यांचा जन्म पौर्णिमेला झाला असल्यामुळे पंधरा कलांचा हा पुष्पहार समर्थ हनुमंताला वहातात. आपण जर नियमितत्रणे या स्तोत्राचे पठण केले तर आपणासही हनुमंताच्या कृपेने उत्तम प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होईल.


रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ।।१६।।

अर्थ :- हे हनुमंता, समस्त रामभक्तांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपल्यामुळे वानरकुळाला प्रतिष्ठा मिळाली. आपण रामस्वरूप असून सर्वांच्या अंतर्यामी आहात. आपल्या दर्शनाने समस्त दोषांचा परिहार होतो.

विवरण :- रामायणात रामभक्तांची मोठी यादी करता येईल. महाराज दशरथ, कौसल्यामाता, सीता, लक्ष्मण, भरत, गुह, सुग्रीव, बिभीषण आणि हनुमान. पण या सर्व रामभक्तांमध्ये हनुमंताचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. हनुमंताची जेवढी मंदिरे आढळतात तेवढी अन्य कुणाही रामभक्ताची नाहीत. प्रवासात, विशेषतः शनिवारी एखादे वानर दिसले की आपण मारुतीरायाचे दर्शन झाले असे म्हणतो.

हनुमंतामुळे वानर जातीचे महत्त्व वाढले. माणूस नराचा नारायण तर होऊ शकतोच पण वानरही नारायणस्वरूप होऊ शकते हे हनुमंताने सिद्ध केले. सतत रामचिंतनाने हनुमंत रामस्वरूप झाले, तर प्राणस्पंदनांच्या रूपाने आपणा सर्वांचा ते अंतरात्मा ठरले. रोज अशा प्रकारच्या दिव्य हनुमंताचे दर्शन घेतल्यास आपले सारे दोष नाहीसे होतात.


इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम्

अर्थ: :- अशा प्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुतिस्तोत्र येथे संपूर्ण झाले.


हे पण वाचा: हनुमानाची आरती मराठी अर्थासहितशेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: samarthramdas400

श्री मारुती स्तोत्र – मारुती स्तोत्र संपूर्ण – मारुती स्तोत्र मराठी मध्ये – maruti stotra – maruti stotra marathi – maruti stotra lyrics in marathi – maruti stotra meaning marathi

3 thoughts on “मारुती स्तोत्र मराठी अर्थ”

  1. बिपीन वाघमळे

    ।।राम राम माऊली।।आपल्या सर्व अध्यात्मिक whatsapp समूहावरील सर्व देव देवता,संत महात्मे यांच्या सेवा माहिती साठी आणि तसेच आजच्या श्री मारुती स्तोत्र अर्थासाहित प्रस्तुती साठी कोटी कोटी प्रणाम,साष्टांग दंडवत।।श्री स्वामी समर्थ।।श्री बिपीन राजाराम वाघमळे(कदम)9503139085

  2. गजानन कृष्णाजी दामले.

    मारुती स्तोत्र रोज सकाळी म्हणतो त्याचा अर्थ समजल्यामुळे सोने पे सुहागा.फारच उत्तम .काय उत्तमोत्तमच म्हणावे लागेल.अर्थासह
    विश्लेषण ही फारच उत्तम, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *