बडोद्याचे तारकेश्र्वर स्थान

बडोद्याचे तारकेश्र्वर स्थान

बडोद्याचे तारकेश्र्वर स्थान

स्थान: बडोदा (गुजरात राज्य)
त्पुरूष: फत्तेसिंह गायकवाड यांनी संगमरवरी दगडातील दत्तमूर्ती १-१२-१९६० मध्ये श्रीरंगावधूत स्वामींच्या हस्ते मूर्ती व पादुकांचा जीर्णोद्धार
विशेष: जमनाबाई महाराणी साहेब यांनी कन्या ताराराजें यांच्या नावाने शिवालय बांधले

अक्कलकोट राजेसाहेब यांचे मानकरी विश्र्वासराव ऊर्फ आप्पासाहेब हे रहिमतपूर, जिल्हा साताऱ्याचे रहाणारे असून नोकरीनिमित्त अक्कलकोटास राहात होते. त्यांची कन्या जमनाबाई अप्रतिम लावण्यवती होती. आपले योग्यतेप्रमाणे व मुलीचे रूपाप्रमाणे तिला वर कसा मिळतो, याची आप्पासाहेबांचे मनास काळजी लागली होती. एके दिवशी श्रीस्वामीसमर्थांकडे जाऊन, चरणी मस्तक ठेवून, आप्पासाहेबांनी महाराजांस विनंती केली, “मुलीस चांगले स्थळ मिळण्याची महाराजांनी कृपा करावी.” यावर महाराज म्हणाले, “काळजी का करतोस? आम्ही तिला बडोद्याचा खंडेराव नेमला आहे.” आप्पासाहेब यांस आज्ञेचा अर्थ कळेना. पण महाराजांवर विश्र्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. थोड्याच दिवसात बडोदे संस्थानचे एक प्रतिनिधीमंडळ कन्या पाहण्यासाठी अक्कलकोटास आले व त्यांनी बडोद्याचे महाराज श्रीमंत खंडेराव गायकवाड यांचेसाठी कन्या पसंत केली. आप्पासाहेब माने साधारण मानकरी असून बडोद्याचे खंडेराव महाराजांचे बरोबर कन्येचे मोठ्या थाटात लग्न झाले. जमनाबाई बडोद्याच्या महाराणी झाल्या. समर्थांच्या आशीर्वादाने आपली कन्या महाराणी झाली म्हणून त्यांना परमानंद झाला. तेव्हापासून अप्पासाहेब व श्रीमंत जमनाबाई महाराणीसाहेब महाराजांचे निस्सीम भक्त बनले.

श्रीमंत जमनाबाई महाराणीसाहेब यांनी आपल्या ताराराजे या कन्येचे नावाने बडोद्यास ‘तारकेश्र्वर’ या नावाचे एक शिवालय बांधलेले आहे. त्या शिवालयाच्या प्रवेशद्वाराचे मंदिरावर दर्शनी अशा दोन्ही बाजूंस श्रीस्वामी समर्थांच्या संगमरवरी दोन मूर्ती ठेविलेल्या होत्या. त्या शिवालयात एक गृहस्थ दर्शनास जात असता त्यांनी या मूर्तीतून ‘मी येथे आहे’ असा दोन वेळा आवाज ऐकला होता. त्या गृहस्थाने या मूर्तीबद्दल माहिती श्री. कडुस्कर यांना दिली.

बडोद्याचे महाराज श्रीमंत फत्तेसिंहराव गायकवाड यांच्या ताब्यात हे ‘तारकेश्र्वर’, मंदिर असल्याने मंदिरासाठी मूर्ती देण्याबद्दल श्रीमंतांना विनंती करण्यात आली. श्रीमंतांनी कृपावंत होऊन सन १९६० साली ती मूर्ती दिली. ही मूर्ती संगमरवरी दगडाची लहान असून फारच सुंदर आहे.
नंतर ब्रह्मनिष्ठ प. पू. श्रीरंग अवधूत महाराज नारेश्र्वर यांच्या शुभहस्ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी (सह पौर्णिमा) गुरुवार श्रीदत्तजयंतीच्या दिवशी तारीख १।१२।१९६० रोजी या मूर्तीची स्थापना व पादुकांचा जीर्णोद्धार करण्यात आला.

सन १९६५ साली बडोद्यातील म्युनिसिपालिटीने एक सभामंडप बांधून दिला असून आजूबाजूची विशाल जागा मंदिरासाठी दिली आहे.
ब्रह्मनिष्ठ प. पू. श्रीरंग अवधूत महाराज यांचे सूचनेबरहुकूम मंदिराचे विश्र्वस्त (ट्रस्ट) करण्यात आले आहे व मंदिराचा सर्व व्यवहार विश्र्वस्तामार्फत चालत आहे.

ज्या भक्तास अभिषेकयुक्त महापूजा करावयाची असेल त्याने संस्थानात एकरक्कमी अभिषेक देणगी भरून एक तिथी निश्र्चित करून घ्यावी. त्याप्रमाणे संस्थानकडून दरवर्षी त्या तिथीस भक्ताच्या नावाने संकल्प सोडून अभिषेकयुक्त महापूजा करण्यात येते. संस्थानने हा खर्च त्या रकमेच्या व्याजातून करावयाचा आहे. याप्रमाणे अभिनव योजना सन १९६५ पासून दाखल करण्यात आली आहे. सध्या या योजनेत १३६ भक्तांनी लाभ घेतलेला आहे.

श्रींची त्रिकाळपूजा होत असते व दर गुरुवारी रात्रौ ८-३० ते १० पावेतो आरतीचा कार्यक्रम होत असतो. श्री स्वामी महाराजांची ‘पुण्यतिथी’ व ‘श्रीदत्तजयंती’ असे वार्षिक दोन कार्यक्रम संस्थानमार्फत होत असतात. या उपरान्त ‘गुरुद्वादशी’, ‘गुरुप्रतिपदा’, ‘श्रीरंगजयंती’ इत्यादी दिवशी भजन वगैरेचा कार्यक्रम होत असतो.

सन १९६१ सालात श्रीदत्तजयंतीच्या उत्सव सुरू असता एकादशीचे दिवशी सकाळी ६-३० वाजता श्रींची आरती होत असता श्रींचे मूर्तीने आपले मस्तक डोलवून आशीर्वाद दिलेला आहे. तेव्हापासून संस्थानचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत आहे.

ब्रह्मनिष्ठ प. पू. श्रीरंग अवधूत महाराज यांनी आपल्या पादुका सन १९६५ सालात गुरुद्वादशीचे दिवशी दिल्या आहेत व त्या श्रींचे मूर्तीसंन्निध ठेवण्यात आल्या आहेत. पूज्य श्रींनी खर्चाचा आकडा नक्की करून दिला आहे व त्याप्रमाणे सर्व व्यवस्था पंचांमार्फत होत असते. पूज्यश्री ब्रह्मभूत होण्यापूर्वी म्हणजे तारीख २८ माहे ऑगस्ट १९६८ रोजी शेवटी संस्थानात येऊन त्यांनी संस्थानची उत्तरोत्तर भरभराट होईल असा आशीर्वाद दिलेला आहे.

श्रीसद्गुरू बाळाप्पा महाराज यांच्या गादीवर विद्यमान असलेले प. पू. श्री गजानन महाराज यांचे दोन वेळा संस्थानमध्ये आगमन झाले आहे व ‘आम्ही येथे आहोत’ असे सांगितले आहे. श्रीसद्गुरू शंकराचार्य, श्रीकरपात्रीजी वगैरे सारख्या थोर विभूतींनी पण या संस्थानचा महिमा गाईला आहे. स्वामीकृपेने संस्थानची दिवसेंदिवस भरभराट व उत्कर्ष होत आहे. संस्थानचे कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळला असून दररोज व दर गुरुवारी असंख्य भक्तमंडळी श्रीस्वामीसमर्थांच्या दर्शनास येऊन आपली मन:कामना पूर्ण करून घेत आहेत. तसेच बाहेरगावाहूनही अनेक भक्तमंडळी खास दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात.

श्रीस्वामीसमर्थांची लीला अगाध आहे व त्यांच्या कृपाप्रसादानेच आज या संस्थानाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

।। श्रीदत्त जयदत्त ।।


बडोद्याचे तारकेश्र्वर स्थान माहिती समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *