पंचरथी महादेव मंदिर देवळी कराड

पंचरथी महादेव मंदिर देवळी कराड – pancharathi mahadev mandir devali karad

पंचरथी महादेव मंदिर देवळी कराड

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात कळवण पासून ३० कि.मी. अंतरावर अणारे देवळी कराड हे पश्चिम पट्ट्यातील शेवटचे गाव. निसर्गानि भरभरून वरदान दिलेला हा परिसर, पश्चिमेला अजिंठा-सातमाळा डोंगररांग व शेजारून वाहणारी गिरणा नदी, या नदीच्या काठावर वसलेले हे गाव आणि गावातील पुरातन पंचरथी महादेवाचे मंदिर आपल्याला एक विलक्षण अनुभव देऊन जाते.

गावात प्रवेश करताच डाव्या हाताला एका टेकडीच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर लगेच आपले लक्ष वेधून घेते. स्थाप्रमाणे आकार असलेले हे नागर शैलीचे मंदिर सिन्नर मधील गोंदेश्वर मंदिराची आपल्याला आठवण करून देते. या मंदिराच्या समोर पिंपळाचे भले मोठे झाड पाहायला मिळते. नुकताच या मंदिराचा परिसर सुशोभीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर आणखी आकर्षक वाटते. मंदिर पूर्वाभिमुख असून उंच जोत्यावर उभारण्यात आले आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आपल्याला दिसून येते. सध्या मंदिरा समोर पत्रे टाकून नवीन सभामंडप उभारण्यात आला आहे.

पायरी चढून गेल्यानंतर प्रथम आपल्याला मंदिराचा कक्षासनयुक्त मुखमंडप लागतो. त्यापुढे सभामंडप असून येथे नंदी विराजमान आहे. सभामंडपाचे वितान संवरणा पद्धतीचे आहे. सभामंडपात डाव्या हाताला असणाऱ्या देवकोष्टकात श्री गणेशाची आकर्षक अशी मूर्ती आहे. गणेशाचे दर्शन घेऊन आपण गर्भगृहात प्रवेश करतो. येथे प्राचीन असे शिवलिंग आपल्या नजरेस पडते. तर समोर भगवान उमा-महेश्वर आलिंगन मूर्ती दिसून येते.

मंदिराच्या बाह्य अंगावर कीर्तीमुख, भौमितिक नक्षी, वेलबुट्टी इत्यादींचे शिल्पांकन आहे. मुखमंडपातील कक्षासनाच्या बाह्य भागावर युगल शिल्पे, मिथुन शिल्पे, मैथुन शिल्पे यांचे शिल्पांकन दिसून येते. गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी ज्या वारी मागनि बाहेर पडते तिथे मकर मुखाची योजना करण्यात आली आहे. समोर पिंपळाच्या वृक्षाखाली व परिसरात वीरगळ व काही भग्नावशेष दिसून येतात. मंदिर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केलेले असून मंदिराची चांगल्या प्रकारे निगा ठेवण्यात आलेली आहे. मंदिर स्थापत्यातील नागर शैलीचा सुंदर आविष्कार अनुभवण्यासाठी एदा देवळी कराडला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *