रेणुकामाता मंदिर केडगाव

रेणुकामाता मंदिर केडगाव – renukamata mandir kedagaon

रेणुकामाता मंदिर केडगाव

नगर रेल्वे स्टेशनपासुन सुमारे एक मैल अंतरावर केडगाव श्री रेणुकामातेचे जागृत स्थान आहे. शहरालगत असलेल्या या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे. पेशवेकालीन राजवाडे रदारांनी देवीचे मंदिर उभारले. भरगच्च निवंडुगाचे झाडांनी वेढलेल्या या परिसरात विविध घनदाट वृक्षांमुळे जंगलाचेच स्वरुप प्राप्त झाले. वाघ या जंगलात मुक्तपणे वावरत असत. आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवी दर्शनास वाघोबांची स्वारी डरकाळ्या फोडत येई. त्यामुळे सायंकाळ्च्या आरतीनंतर सर्वजण घरी परतत.

या मंदिराबाबतची आख्यायिका सर्व प्रचीती अशीच आहे. पुर्वी गुरव कुटुंबात श्री रेणुकामातेच्या कृपाप्रसादाने पुत्ररत्न जन्मले. बाळाचे नाव आवडीने भवानी असे ठेवण्यात आले. या भवानीने रेणुकामातेची अखंड मनोभावे सेवा केली. श्री क्षेत्र माहूरगड हे त्यांचे मुख्य श्रध्दास्थान साडेतीन शक्तीपीठांतील हे एक पूर्ण पीठ होय. या माहुरगड हे निवासिनी रेणुकामातेच्या नामस्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे.

त्यांच्या या निस्सीम भक्तीवर देवी प्रसन्न झाली. मी आता तुझ्यासोबत येते असे देवीने सांगताच आनंदाने भवानी गुरव परतीच्या प्रवासाला लागले. केडगावाच्या परिसरात येताच त्यांनी मागे वळून पाहिले. देवीचे दर्शन झाले, मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली. हल्ली त्याच जागेवर स्वयंभू श्री रेणुका देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती अगदी हुबेहुब माहूरगडाप्रमाणेच आहे. देवीच्या समोरच ज्या ठिकाणी भवानी गुरवाने वळून पाहिले तेथे पादुका आहेत.

रेणुकादेवीच्या मूर्तीशेजारीस तुळजाभवानीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवाचे मंदिर असून शिवभक्तीच्या दर्शनाचा लाभ येथे मिळतो. छोटे विठ्ठल रुक्णिणी मंदिर व भैरवनाथ मंदिरही या परिसरात आहे. याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळणीच्या स्वरुपात दर्शन दिले.

मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असला तरीही बारवेमध्ये पाणी असतेच.

नवरात्रात येथे स्त्रिया घटी म्हणून राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी ओवर्‍या आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. मंंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा यात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसर्‍याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढविले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्यांची श्री रेणुकामातेच्या दर्शनाने होेऊन उत्सवाची सांगता होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *