विशाल गणपती मंदिर - vishal ganapati mandir

विशाल गणपती मंदिर – vishal ganapati mandir

  नवसाला पावणाऱ्या ‘विशाल गणपती’चा थाटच न्यारा – विशाल गणपती मंदिर

 


 

 

             नगर : अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती नवसाला पावणारा गणराय अशी ख्याती आहे. गणेशाेत्सव मिरवणुकीत याच गणपतीला पहिला मान अताे. संपूर्ण राज्यभरातून भक्त दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे निवडणुकीत सत्ताधारी असाे की विराेधक प्रचाराचा नारळ याच मंदिरात फुटताे. लग्न कार्यासाठी याच बाप्पाला अगाेदर पत्रिका वाहिली जाते. नवस बाेलणाऱ्याची आणि ताे पूर्ण झाल्यानंतर फेडणाऱ्यांची मंदिरात दरराेज रिघ लागलेली असते.

विशाल गणेशाची मूर्तीची उंची साडेअकरा फूट आहे. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणेशाची बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे. बाप्पाच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे. डोक्‍यावर पेशवेकालीन पगडी परिधान केली आहे. ही मूर्ती विशिष्ट अशा मिश्रणातून तयार झाली आहे. शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत पहिला मान असतो. उत्सव काळात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम ट्रस्टतर्फे आयोजित केले जातात. यंदा पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांच्या हस्ते उत्थापन पूजा केली जाणार आहे.

विशाल गणेशाचा इतिहास साडेपाचशे वर्षांहून अधिक जुना आहे. गणेशाचे पुजारी हे नाथपंथीय आहेत. हे मंदिर एका नाथपंथीय सत्पुरूषाने स्थापन केले आहे. त्या नाथपंथीयाची आई ही गणेश भक्त होती म्हणून त्याने हे मंदिर स्थापन केले. त्यांची संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याच्या पाठीमागे आहे. तेथे एक महादेवाची पिंडी आहे. मंदिरात पूजेपासून सर्वच धार्मिक विधी हे नाथपंथीयांप्रमाणेच होतात. येथे नगाऱ्यासह केली जाणारी आरती पुलकीत करून टाकते. गेंडानाथ महाराज यांचे शिष्य संगमनाथ महाराज सध्या पुजारी आहेत. या मंदिरात नाथपंथीय साधू आसरा घेतात. कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी ते विशाल गणेशाचे दर्शन घेतात.

गणेश मंदिरातील विशाल आकाराची मूर्ती स्वयंभू समजली जाते. ती दररोज तीळाएवढी वाढते, असे म्हटले जाते. विशाल गणपती येथे संध्याकाळी ७ः३० ते रात्री ८ः३० आरती केली जाते. येत्या मंगळवारी (ता. ६) सामूहिक अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती कार्यक्रम पार पडणार असल्याचे विश्वस्त अशाे कानडे यांनी सांगितले.


vishal ganapati mandir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *