येळेश्वर मंदिर येळी 

येळेश्वर मंदिर  येळी – Yeleshwar Mandir Yeli

येळेश्वर मंदिर  येळी 

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या तालुक्याच्या ठिकाणापासून नगर-बीड महामार्गावर २० किमी अंतरावर साधारणत ५००० लोकवस्ती असलेल येळी हे छोटस गाव. प्रत्येक गावचे एक वैशिष्ट्य असते, त्याच प्रमाणे येळी गावचे असेच एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे “शिक्षकांचे गाव’ म्हणून या गावाची महाराष्ट्रात ओळख आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य शिक्षक आहे. या गावातील शिक्षक नगर जिल्ह्या बरोबरच राज्यातील अन्य जिल्ह्यात अध्यापनाचे पवित्र कार्य करत आहे. अशा या गावात ग्रामदेवतळेराचे प्राचीन असे शिवमंदिर असून गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे.

येळी गावचे ग्रामस्थ श्री. बाळासाहेब फुंदे या मंदिरा विषयी माहिती देताना सांगतात की, कित्येक वर्षांपूर्वी तपस्वी ऋषींनी येळूच्या बेटात या शिवलिंगाची स्थापना केली व त्यालाच पुढे येळेश्वर असे नाव पडलं. आणि पुढे येळेश्वरा वरूनच येळी असे या गावाचे नाव प्रचलित झाले. वेळेवर संस्थान व ग्रामस्थ यांनी अलीकडच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केला असून जीर्णोद्धार करताना मंदिराच्या मूळ वास्तूला कुठेही धक्का न लावता केलेले काम कोतुकास्पद आहे.

मंदिर यादवकालीन असून साधारणतः १४ व्या शतकाच्या अखेरीस मंदिराचे निर्माण झाले. असावे. मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना दिसून येते. मंदिरासमोरील नंदी नव्याने स्थापन करण्यात आला असून काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती अतिशय सुबक अशी आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवरील देवकोष्ठकात अनुक्रमे चामुंडा, नटराज शिव व भैरव यांची शिल्पांकने आहेत

मंदिराचा सभामंडप चार स्तंभावर तोललेला दिसून येतो. सभामंडपातील दोन स्तंभाच्या शीर्ष भागावर भारवाहक पक्ष वाद्य वाजवताना दाखवलेले आहेत व इतर दोन स्तंभावर उलटा नाग शिल्पांकित केल्याचे दिसून येते. तसेच स्तंभाच्या खालील भागावर महिषासुर मर्दिनी व मातृकांची शिल्पांकने दिसतात. गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी सजवलेली आहे. द्वारशाखेवर व्याल शाखा, स्तंभ शाखा, नर शाखा यांचे शिल्पांकन असून गंगा यमुना, द्वारपाल व द्वास्पातिकचे शिल्पांकन आहे. ललाट बिवावर गणेश प्रतिमा दिसून येते. द्वारशाखेच्या उत्तरंगावर नऊ मुखवटे कोरलेले असून हे नवग्रहाचे प्रतीक असावे असे वाटते गर्भगृह चौरस आकाराचे असून मधोमध शिवलिंग स्थापित आहे.

मंदिर आवारात एक सुबक अशी विष्णुमूर्ती उभी असून मूर्तीच्या हातातील आवरून ही विष्णूच्या चोवीस व्यूह प्रकारातील ‘केशव’ रूपातील मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या आवारात एका बाजूला विष्णू, गणेश, श्री संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ यांच्या मूर्ती दिसून येतात. मंदिर परिसरात काही इतर भग्नावशेष आपल्याला विखुरलेले दिसतात. गावाच्या ईशान्य बाजुला एका टेकडीवर श्री रेणूका मातेचे मंदिर असून ही देवी येळी गावचे कुलदेवत आहे. देवी मंदीरा समोर एक दीपमाळ आपल्या नजरेस पडते. मंदिराच्या गर्भगृहात देवीचा स्वयंभू रूपातील तांदळा आहे. हनुमान जयंती नंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येळेश्वराचा व शारदीय नवरात्रोत्सवात श्री रेणुका मातेचा यात्रोत्सव असतो. येळीकर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा करतात, ही दोन्ही मंदिरे गावचा ऐतिहासिक ठेवा असून गावऱ्यांनी तो मनोभावे जपला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *