पिंडदान पिंडें ठेविलें करून- संत तुकाराम अभंग –1460
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रम्हपण सेवटींच्या ॥ध्रु.॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥
पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥३॥
आहे तैसी पूजा पावले सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥
तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार शेवटींचा ॥५॥
अर्थ
विष्णू पदी मी माझा देह अर्पण करून पिंडदान केले आहे. आणि अहंकार, महतत्व, अज्ञान या तीन मूळत्रयांना तिलांजली दिली आहे आणि शेवटी ब्रह्मार्पणमस्तू या एका वाक्याने सर्व संकल्प नाहीसे केले. सर्व जग विष्णुमय आहे हे रहस्य समजले व माझे सर्व सव्य अपसव्य कर्म करण्याचे संपले. अभेद तत्त्वामुळे सर्व जनार्धनच आहे हे समजून आले. व त्यामुळे पिता-पुत्र हे नाते संपले नाहीसे झाले. शास्त्रात सांगितलेल्या प्रमाणे पिंड पूजा झाली आणि त्यामुळे मला श्रद्धाचा पर्व काळ सहज साध्य झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी पिंडदान केल्यामुळे माझ्या सर्व कुळांचा उद्धार मी केला आता त्या जनार्दनाला माझा शेवटचा नमस्कार आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पिंडदान पिंडें ठेविलें करून- संत तुकाराम अभंग –1460
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.