सार्थ तुकाराम गाथा १२०१  ते १३००

सार्थ तुकाराम गाथा 1201  ते 1300

सार्थ तुकाराम गाथा १२०१  ते १३००


अभंग क्र.१२०१
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥
संगती पंगती देवासवें घडे । नित्य नित्य तेंचि साच ॥ध्रु.॥
समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कथा कासयाची ॥२॥
तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥

अर्थ

नामसंकीर्तनाच्या सुखकारक व्यवहाराने इतक्या सुखाचा लाभ झाला आहे की मागे पुढे सर्व आनंदच दाटला आहे. आता आम्हाला देवा संगे आणि देवाच्या संगतीत त्याच्या पंक्तीत बसण्याचा योग घडतो आहे आणि हा लाभ मर्‍यादित काळा पुरता नसून नित्य नित्य म्हणजे रोज रोज लाभत आहे. देव सर्वसमर्थ आहे आणि त्याच्या घरी सर्व संपदा आहे त्यामुळे आम्हाला कशाचीही कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात समर्थांच्या घरी देवाच्या घरी कोट्यावधी लाभ होतात आणि समर्थांच्या पोटी मोठा वाव(जागा) आहे.


अभंग क्र.१२०२
काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥
म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥
काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥२॥
कोण लोकीं सांग घातला बाहेरी । म्हणतां हरी हरी तुका म्हणे॥३॥

अर्थ

अरे तू हरीचे नाम घेत आहे म्हणून, देवाने तु काही खात आहे किंवा खात असताना तुझ्या हातून काही ओढून घेतले आहे काय ?नाही ना मग देवाचे नाम घेण्यासाठी घाबरण्याचे काय कारण ?रामनामाचा जप तु एकदम गर्जून म्हणजे मोठ्या भक्तिभाव पूर्ण श्रद्धेने घेतले तर सर्व पापे नामाच्या भयाने जळून जातात .हरीचे नाम घेत असताना तुझे हात पाय बंद पडतात काय किंवा तुझ्या सौंदर्‍यामध्ये काही बिघाड होतो काय ?तुकाराम महाराज म्हणतात तु हरी म्हणत असताना कोणीही तुला धर्माच्या बाहेर काढले काय? ते तरी सांग.


अभंग क्र.१२०३
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥
नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥
उमटती ठसे । ब्रम्हप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥
भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥३॥

अर्थ

जे देवाला शरण जातात त्यांच्या जाती उत्तम आहेत म्हणजे जे हरी भक्त आहेत ते उत्तम जातीचे आहेत याचा अर्थ असा होतो की हरिभक्त उत्तम जातीचे आहेत मग ते कोणत्याही वर्णात जन्माला आलेले असेल तरी काही हरकत नाही. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही उत्तम ,मध्यम आणि कनिष्ठ असा भेदभाव नसतो .जे हरिभक्त हरीला अनन्यगतीने शरण जातात त्यांच्या अंगी वेगवेगळे तेज उमटलेले असते .आणि त्यावरून त्यांना ब्रम्‍ह प्राप्ती झाली अशी लक्षणे त्यांच्या अंगी उमटलेले दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात जे असे भाविक आहेत म्हणजे निष्ठावंत हरिभक्त आहेत त्यांना मी नमन करतो आहे.


अभंग क्र.१२०४
भय हरीजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥
चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥
तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥

अर्थ

हरी भक्तांनी हरी भजन करण्याविषयी कोणत्याही प्रकारचे मनामध्ये भय धरू नये, कारण नारायणा सारखा बलाढ्य सखा सोबत असताना जगाला भिण्याचे कारण काय येते ?त्याकरिता आपले चित्त वित्त देवाला समर्पण करून रहा. तुकाराम महाराज म्हणतात आणि आपले मन समाधानी सुखी असू द्यावे.


अभंग क्र.१२०५
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारीं संसाराचा ॥१॥
नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥
कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥
राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥
तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥

अर्थ

तुझे आयुष्य मोजण्यासाठी काळ मापारी म्हणून बसलेला आहे. आणि तू अजूनही संसाराच्या व्यवहारांमध्ये गुंतलेला आहे .अरे तो काळ तुला किंवा ओढून येईल ते तुला कळणार देखील नाही त्यामुळे तु हरिभजन करण्याविषयी उदास राहू नकोस. आणि पुढे तुला यम अनेक दुःखाचा जाच करीन ,मग त्या प्रसंगी तुला त्यातून कोण सोडिन बरे? तुझे सज्जन सोयरे सर्व तुझ्यापासून दूर राहतील त्याकरता श्रीहरीची आठवण लवकर कर त्याचे नामस्मरण कर. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू परमार्थ करण्याविषयी किती चुकारपणा करशील पण पुढे जाऊन तुझी फजिती होईल.


अभंग क्र.१२०६
होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥
हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥
आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥
तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥

अर्थ

अरे मानवा तू कोणतेही कर्म चांगलेच कर ,वाईट कर्मा विषयी तू मनाच्या आधीन होऊ नकोस .आणि त्याचे कोणत्याही प्रकारचे काहीही बोलणे ऐकू नको. मनाने कोणत्याही वाईट कर्माचा अट्टाहास धरला तर तो मोडून टाक. आणि पांडुरंगाशी तू संबंध जोड, तू तुझ्या मनाला आपला अधीन करून ठेवीन नाहीतर हे तुझ्या जीवासाठी घातक होईल. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक मनाच्या आधीन झाले आहेत त्यांना यम आपल्या बंधनाने बांधून टाकतो.


अभंग क्र.१२०७
नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥१॥
फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें मातलासे ॥२॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥
बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥
तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥

अर्थ

अरे तू हरिनाम घे हरिनामा वाचुन व्यर्थ चावट गोष्टी वटवट करणे हे व्यर्थ आहे .अरे तू फुकट लोकांच्या गप्पा गोष्टी करत बसतो आणि जगात श्रेष्ठ राम आहे त्याचे नाव मात्र तुझ्या तोंडात येत नाही .चावट माणसे मिळून तू मद्यपान करतो आणि विषयांच्या गुणाने तू माजतोस. अरे तू चाव्हाट्या वर बसून दुसऱ्यांच्या टवळ्या करत असतो परंतु गोविंदाची आठवण तुला कधीही होत नाही. अशा अविचारी दुराचारी मनुष्यावर यम दात खात असतो .आणि केंव्हा त्या मनुष्याची आयुष्याची दोरी भरेल आणि केव्हा मी त्याला घेऊन जाईल याची वाट यम पाहत असतो .तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये नारायणाचे चिंतन तू जर केले नाहीस तर तुला यमाच्या हातून कोण सोडवेल?


अभंग क्र.१२०८
संत गाती हरीकीर्त्तनी । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥
हेचि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥
काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥
संत महंत माझी पूजा । आन भाव नाहीं दुजा ॥३॥
तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥

अर्थ

जे संत हरिकीर्तन करतात हरि गुण गातात त्यांचे चरण क्षालन करून ते तीर्थ मी प्राशन करणे. हेच माझे तप आणि हेच माझे तीर्थ आहे. या वाचून मी दुसरे काही जाणणार नाही. मी संत महंत यांना माझ्या शरीराची कुरवंडी करून ओवाळीन. मी संत महंताची पूजा करतो या वाचून माझ्या मनात दुसरा भक्तिभावच नाही .तुकाराम महाराज म्हणतात मी संत आणि महंत सोडून दुसरे काही जाणत नाही कारण संतांच्या चरणी सर्वकाही आहे.


अभंग क्र.१२०९
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥
आतां वाणी काशासाठी । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥
आपुल्या संकोचें । म्हणऊनि तेथें टांचे ॥२॥
घेतों खऱ्या मापें । तुका देखोनियां सोपें ॥३॥

अर्थ

आमचे भांडवल म्हणजे विठ्ठल आहे आणि विठ्ठल नामाचे पीक सर्वत्र पिकले आहे .त्यामुळे विठ्ठलनामाचे भांडवल आमच्याकडे भरपूर झाले आहे. आता विठ्ठल नाम घेण्याविषयी कमतरता का करावी? अंतकरणात धीर धरला पाहिजे फलप्राप्ती पर्यंत विठ्ठलाचे नाम घेण्यात आपली वृत्ती संकुचित असते त्यामुळे विठ्ठलाचे नाम घेण्यात तोटा आहे असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठल नाम सोपे आहे म्हणूनच ते मी माझ्या खऱ्या प्रेमाच्या मापाने घेत आहे.


अभंग क्र.१२१०
शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥
रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥
कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥
सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥३॥

अर्थ

शुद्ध ब्रम्‍हज्ञान कसे असते ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही मन सावध करू ऐका .सूर्य पृथ्वीवरील सर्व चांगल्या व वाईट रसांचे शोषण करतो पण तो त्यांच्या गुणदोषांनी लिप्त होत नाही. सूर्य कोणाचाही भेदभाव न करता सर्वांसाठी सारखाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध ब्रम्‍ह ज्ञानाचे सत्य म्हणजे अगदी सूर्‍याप्रमाणे असते, नाही तर खोट्या ब्रम्‍हज्ञानाला पाहुन तुम्ही फसला म्हणून मी तुम्हाला उपदेश करत आहे.


अभंग क्र.१२११
अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाउनियां ॥१॥
उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥
काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥
तुकयास्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥

अर्थ

अग्नी मुद्दामून कोणाला जवळ बोलावत नाही पण ज्याला थंडी वाजली असेल तोच व्यक्ती अग्नीजवळ जातो. पाणी कधी म्हणते काय या आणि मला प्या तर नाही ज्याला तहान लागली असेल तोच पाणी पिण्यासाठी पाण्याकडे धावत जातो . वस्त्र कधी म्हणते काय कि या आणि मला परिधान करा तर नाही सारे जग उलट स्वतः इच्छेने वस्त्राला परिधान करते .तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे माझा स्वामी कोणाला म्हणतो का की माझे स्मरण करा तर नाही ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ असते तोच माझ्या स्वामी पांडुरंगाचे स्मरण करतो.


अभंग क्र.१२१२
भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा ॥१॥
येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥
देव भक्तची कृपाळु माता । भक्ती देवाचा जनिता ॥२॥
तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥

अर्थ

भक्त देवाच्या घरचा पाळलेला कुत्रा आहे आणि हाच भक्त देवाचे भजन पूजन करतो आणि त्याद्वारेच देवाचे पालन-पोषण करतो .जीव आणि शरीर यांचा जसा तादात्म्य संबंध असतो अगदी त्याप्रमाणे देव आणि भक्तांचा संबंध असतो. देव भक्ताची कृपाळू माता आहे आणि भक्ताने देवाला (निर्गुण-निराकार देवाला) सगुण-साकार बनविले त्यामुळे भक्त हा देवाचा जनिता म्हणजे जन्मदाता आहे. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि भक्त हे दोन्ही एकमेकांचे संबंधित झालेले असतात त्यामुळे ते नेहमी एकमेकांसोबत राहतात.


अभंग क्र.१२१३
बखयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥
ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥
सकळ तीर्था अधिष्ठान । करी लक्ष्मी संवाहन ॥२॥
तुका म्हणे अंती । ठाव मागितला संती ॥३॥

अर्थ

हरीचे चरण विटेवर समान आहेत आणि ते सौंदर्‍याला ही सौंदर्य देणारे आहेत .आणि ते चरण मी माझ्या हृदयात धारण केले आहे आणि हरिचरण त्रिविध तापांचे क्षालन करणारे आहेत .सर्व तीर्थांचे अधिष्ठान हरिचे चरण आहेत त्यांची सेवा लक्ष्मी करत असते. “तुकाराम महाराज म्हणतात संतांनी शेवटी विठोबाच्या समचरणाच्या ठिकाणी ठाव मागितला आहे.


अभंग क्र.१२१४
मासं चर्म हाड । देवा अवघीच गोड ॥१॥
जे जे हरीरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥
वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलेवर ॥२॥
तुका म्हणे ऐसा । बराडी या भक्तीरसा॥३॥

अर्थ

खरे हरिभक्तांचे मासं ,काकडे ,हाड हे काहीच वाया जात नाही .देवाला ते सर्व चांगले वाटतात जे जे हरिभक्त हरीच्या रंगात रंगून गेले आहेत, त्या त्या हरी भक्तांचे काहीही शरीराचे इंद्रिय वाया जात नाहीत .शंखासुराने वेद गिळून टाकले तर देवाने त्याचा नाश करून त्याच्या कलेवर जो शंख होता तो आज पर्यंत हातात वागविला आहे .तुकाराम महाराज म्हणतात असा हा देव आहे भक्तांच्या भक्ती रसा करिता भिकारी झालेला आहे.


अभंग क्र.१२१५
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥
कैंचा राम अमागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥
स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥
तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥

अर्थ

काही गरिबांना परमार्थ करण्या विषय संसाराची चिंता आड येते, तर काही श्रीमंतांना संसाराची चिंता नसली तरी लोकलज्जा परमार्थ करण्यासाठी नडते. अशा अभागी माणसाच्या तोंडाला रामाचे नाम कधी येणार? मात्र हे संसारीक वटवट करत असतात .एखाद्याने जर उपदेश केला की तु हरीचे स्मरण कर तर त्याला राग येतो कारण त्यांच्या शरीर क्रोधाने वीटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा जड दगडा पुढे बोलण्यात काय अर्थ आहे त्यामुळे अशा मूर्ख माणसांपुढे गप्प राहणे योग्य आहे.


अभंग क्र.१२१६
आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥१॥
तुम्हां असों जागवीत । आपुलिया हित ॥ध्रु.॥
तुम्ही देहशून्य । आम्हां कळे पाप पुण्य ॥२॥
सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥३॥

अर्थ

हे देवा आम्ही आमच्या उद्धाराच्या कामाकरिता लाज सोडून देत आहोत. देवा आम्ही तुला जागवीत आहोत कारण आमचे हित तुझ्या हातात आहे. देवा तुम्ही देह शून्य आहात ,तुम्हाला देहच नाही ,तुम्ही विदेही आहात त्यामुळे तुम्हाला पाप-पुण्य नाही पण मात्र आम्हाला पापपुण्य आहे आणि ते आमच्या अनुभवावरूनच आम्हाला समजते आणि कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात मी ही तुमच्या प्रमाणे देह शून्य आहे विदेही आहे परंतु भुतला वरील अज्ञानी लोकांना उपदेश करण्यासाठी मी वेगळा होऊन राहतोय.


अभंग क्र.१२१७
सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥
ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥
देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥
तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥३॥

अर्थ

सत्यरूप जो माला आहे तो म्हणजे हरीचे नाम. आणि तेच हरीचे नाम आमच्या मनात आहे. गबाळ मालाचे आम्ही धनी मुळीच नाही. हे लोक हो तुम्ही हरिनाम रूपी खरा माल जाणून घ्या आणि तोच हरिनाम रुपी शुद्ध माल मनात भरून घ्या. आमच्याविषयी मनातील राग द्वेष काढून टाका तुमचे चांगले व्हावे यासाठी मी तुमच्याशी कठीण शब्दात बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे जर तुम्ही वागलात (मी सांगितल्याप्रमाणे) तर देशोदेशी तुमचे चांगलेच कौतुक होईल .


अभंग क्र.१२१८
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥
त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥
तुमचिया तोंडें । धर्माधर्माचीच खंडे ॥२॥
मजसाठी देवा । काही लपविला हेवा ॥३॥
जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥
तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥

अर्थ

देवा तुम्ही माझ्या हिताचा उपदेश करून चांगल्या मार्गाला मला लावावे हीच नीती आहे. त्यामुळे तुम्ही आमची उपेक्षा करणे हे चांगले नाही हे तुम्हीच जाणून घ्यावे आणि त्याविषयी तुम्ही नीट विचार करावा .धर्माधर्माचा निवड तुमच्याच तोंडून भगवद्गीतेत व वेदात झालेला आहे मग देवा माझ्या हितासाठी तुम्ही काही लपून का ठेवत आहात? झोपेतून उठले की त्या बाळाला जेवू घालने आईचे कर्तव्य आहे .तुकाराम महाराज म्हणतात बाप नेहमी मुलाच्या हिताचाच विचार करत असतो त्याप्रमाणे तुम्हीही आम्हाला असा उपदेश करा की ज्यामध्ये आमचे हित होईल.


अभंग क्र.१२१९
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥
रविरश्मिकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥
दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । माझें पायीं अखंडित॥३॥

अर्थ

परमात्मा आणि सुखरूप जीव हे दोन्ही सुखी आहेत सुखाचेच ते रूप आहेत आणि एकमेकांना ते भेटले की त्यांना कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते‌ तुटत नाहीत. सूर्‍याची किरणे सूर्य पासून वेगळी करून त्यांना आपल्या डोळ्यांमध्ये घालता येत नाही. एखादा मनुष्य आपल्यापासून दूर जरी असला तरी तो स्नेहाने आपल्या जवळच येतो. त्याप्रमाणे प्रेमाने आकाशाला देखील कवळी घालता येते .तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त अखंडितपणे देवाच्या चरणी मी राखणार.


अभंग क्र.१२२०
तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥
फुकासाठी जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥
कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें ॥२॥
तुका म्हणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही माझ्या मनाचे समाधान केले तर तुमचे काही खर्च होणार आहे नाही. परंतु माझ्या मनातील संकोच नक्की जाईल जर तुम्ही माझे समाधान केले तर. देवा माझे समाधान केल्याने तुम्हाला फुकट ची कीर्ती प्राप्त होईल आणि जर तुम्हाला कीर्ती मिळत असेल तर तुम्ही आळस का करता‌ ?देवा मी तुमच्या कृपेचा भुकेला आहे. आणि तुम्ही जर असे केले तर तुम्ही मला जीवदान दिल्यासारखेच होईल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला शिकविले पाहिजे ,ही एवढी विनंती तुमच्या जवळ मी करत आहे ती तुम्ही ऐकावी.


अभंग क्र.१२२१
लोक म्हणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥
आतां कळेल तें करीं । सीर तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥
अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥
मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥

अर्थ

अरे देवा हे लोक मला देव म्हणतात आणि माझी पूजा करतात आणि पूजा करून घेणे म्हणजे हा तर अपराध आहे. देवा तुला आता काय करायचे ते कर मी माझे शिर कापण्यासाठी सूरी तुझ्या हातात दिली आहे .तु काप अथवा कापू नकोस माझा अधिकार नसतानाही लोक माझी पूजा करतात .तुकाराम महाराज म्हणतात मुलाच्या आईलाच मुलाचे वडील कोण आहेत हे माहीत असते त्याप्रमाणे माझे मन मी किती पुण्यवान आहे आणि किती पापी आहे मला हे चांगलेच माहीत आहे.


अभंग क्र.१२२२
एका म्हणता भलें । आणिका सहजचि निंदिलें ॥१॥
कांहीं न करितां सायास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥
बरें वाइटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥२॥
तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं ॥३॥

अर्थ

एखाद्या व्यक्तीला बऱ्याच माणसांमध्ये चांगले म्हटले तर बाकीच्यांची निंदा सहजच घडते .या कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता दोष घडला जातो .कोणालाही बरे वाईट म्हणणे माझ्या ठिकाणी राहिलेच नाही त्यामुळे माझ्याकडून पापच घडत नाही .तुकाराम महाराज म्हणतात वाणीने कोणाचीही निंदा न करण्यासाठी मनावर नियंत्रण घालून सतत नामाचे चिंतन करत रहावे.


अभंग क्र.१२२३
आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥
मज आपुलेंसें म्हणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥
वेचियेली वाणी । युक्ती अवघी चरणीं ॥२॥
तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥३॥

अर्थ

देवा मी सेवेचा शेवट केला आहे त्यामुळे मला फलप्राप्ती करिता कोणताही फाटा तुम्ही येऊ देऊ नका. हे नारायणा तुम्ही मला हा तुकाराम माझा आहे असे म्हणून माझा अंगिकार करावा हेच फळ द्यावे. देवा मी माझी बुद्धी आणि वाणी दोन्ही तुमच्या चरणी समर्पित केली आहे .तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझ्या अन्यायाची अपराधाची तुमच्याकडून क्षमा करून घेऊन तुमचे पाय घट्ट धरले आहे.


अभंग क्र.१२२४
न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥१॥
जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥
आठही प्रहर । बारा मास निरंतर ॥३॥
तुका म्हणे वाणी । वर्जेना हे घेतां धणी ॥४॥

अर्थ

हरीनाम घेण्याबाबत, हरिभक्ती करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मनात अडचण किंवा संकोच होऊ देऊ नका .सर्वत्र माझा बाप विठ्ठलच पिकला आहे तरी तुम्ही तुमच्या जिभेच्या मापाने माझ्या विठ्ठलाला भरपूर मोजून घ्या. आठ ही प्रहर आणि बाराही महिने तुम्ही निरंतर माझ्या विठ्ठलाचे मोजमाप करत रहा म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण तुम्ही सतत करा. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे नाम इतके गोड आहे की ते कितीही घेतले तरी आता पुरे झाले असे वाणी म्हणतच नाही.


अभंग क्र.१२२५
तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥
आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥
काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥
संतसमागममेळ । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥

अर्थ

हे विठ्ठला आम्हाला तुझ्या नामाची इतकी आवड लागली आहे की तुझ्या नामात आम्ही वेडे झालेलो आहोत. त्यामुळे हे विठ्ठला आता आम्ही कोणीही कोठेही जाणार नाही .तुझ्या पायाला आम्ही लागणार आहोत .देवा तुझ्या प्रेम सुखापुढे हे बिचारे वैकुंठ तरी काय आहे. संतांच्या संगती मध्ये, प्रेमामध्ये प्रेम सुखाचा काळ असतो .तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या चरणांच्या ठिकाणी जन्म मरणाला काहीच ठाव नाही.


अभंग क्र.१२२६
साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥
तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥
फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥
रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥
देवा देवपाट । देव्हार्‍यावरी बैसे स्पष्ट ॥४॥
ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता जनलोकां ॥५॥

अर्थ

मिठाईचे वर लावलेला कागदाला म्हणजे वखराला राजा कशासाठी घेईल पण मिठाईच्या कारणामुळे तो कागद राजा बघत असतो. अगदी तसेच आम्ही रामाचे नाव घेतो त्यामुळे आम्हाला मोठेपणा आलेला आहे .तलवारीच्या कारणामुळे ज्या लाकडामध्ये तलवार आहे त्या लाकडाला राजा हातात धरतो. रत्न सोने हे ज्या लाखेत ओवलेले असतात त्या लाखेला किंमत नसते परंतु रत्न सोने गळ्यात घालण्याकरता श्रीमंत लोक त्या लाखेला गळ्यात घालतात. देवासाठी केलेला पाट हा देव घरामध्ये देवाच्या आधी उघडपणे जाऊन बसतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ब्रम्हानंदाचा अनुभव माझ्या अंगी आहे त्या योगाने लोक मला किंमत देतात मला मानतात, नाहीतर मला कोणी विचारले नसते.


अभंग क्र.१२२७
धनवंतालागीं । सर्वमान्यता हे जगीं ॥१॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥
जव चाले मोठा धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥
सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥
तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥

अर्थ

धनवंत लोकांना सर्व जगात मान्यता आहे .माता पिता बंधू सर्व लोक त्याचेच ऐकतात. जोपर्यंत धंदा मोठ्या प्रमाणात चालतो तोपर्यंत बहीण भावाला दादा दादा म्हणते. बायकोला जर शृंगार भूषणे दिले तर ती नवऱ्याच्या पुढे आदराने लवते त्याला बहुमान देते. तुकाराम महाराज म्हणतात धन आणि धनामुळे प्राप्त झालेले भाग्य हे दोन्ही न टिकणारे आहे.


अभंग क्र.१२२८
न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥
केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥
करावें लाताळें । ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥
न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥३॥

अर्थ

कोणताही विचार न करता वेळ प्रसंग न जाणता जो कोठेही नुसता बडबड करतो तो म्हणजे एक प्रकारचा कर्कश ओरडणारा गाढवच होय. असा मनुष्य अविचारी लंड म्हणजे अधम आहे तो जसे कर्म करतो तसेच त्याला शिक्षाही होत असते .गाढवाला जसे कोठे ही लाथ मारण्याची सवय असते कोठे लाथ मारावी हे देखील त्याला समजत नाही त्याप्रमाणे मूर्ख माणसांचे वर्तन असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा मुर्खांना उचित काय आहे ते कळत नाही ,धर्म नीती काय आहे ते कळत नाही, आपले हित कशात आहे हे देखिल कळत नाही.


अभंग क्र.१२२९
कंठी नामसिक्का । आतां कळिकाळासी धक्का ॥१॥
रोखा माना कीं सिक्का माना । रोखा सिक्का तत्समाना ॥ध्रु.॥
रोखा न माना कां सिक्का न माना । जतन करा नाक काना ॥२॥
सिक्का न मानी रावण । त्याचें केलें निसंतान ॥३॥
सिक्का मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥४॥
तुका म्हणे नाम सिक्का । पटीं बैसविले निजसुखा ॥५॥

अर्थ

माझ्या कंठामध्ये आता हरिनामाचा शिक्का आहे त्यामुळे मी कळीकाळाला ही धक्का देण्याचे सामर्थ्य बाळगतो. हे लोकांनो तुम्ही वेद रुपी रोखा माना किंवा हरिनाम रुपी शिक्का माना हे दोन्ही सारखेच आहे आणि नाम हे दोन्ही सारख्याच पात्रतेची आहेत. जर तुम्ही दोघांना मानले नाही तर तुमचे यमदूत नाक कापून नेईल त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी वेद रुपी रोखा आणि नामरूपी शिक्का हे दोन्ही माना .रावणाने रामरुपी शिक्का मानला नाही तर देवाने त्याला निर्वंश केले. भगवान शंकराने देखिला हा नाम रुपी शिक्का त्याच्या कंठात धारण केला आहे त्यामुळे हलाहल विष पिऊन देखील त्यांचे सर्वांग शितल झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी हि नामरूपी शिक्का माझ्या कंठात धारण केलेला आहे त्यामुळे मी नीज सुखाच्या राज्यावर बसलोय.


अभंग क्र.१२३०
भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥
जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥
दयेसाठी केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥
तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥३॥

अर्थ

सर्वत्र देव आहे असे समजूनच मी सर्वांना आलिंगन देतो स्त्री पुरुष ही भावनाच माझ्या मध्ये नाही .माझ्या अंतरंगातील सर्वकाही पांडुरंग जाणतो आहे त्यामुळे यासंबंधी अधिक काही बोलण्याची मला गरज वाटत नाही .जड जीवांना तारण्याकरता हरिकथा ही योग्य नौका आहे आणि मला जड जीवांची दया येते त्यामुळे मी हरिकथा करतो व त्यासाठीच मी हरी कथा करण्याची उपाधी आणि पसारा घातलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात घरी खाण्यास मला अन्न नाही की काय म्हणून मी उपवास करतो, मला काहीतरी मिळेना या आशेने हरिकथा करत सगळीकडे‌ मी फिरत आहे असे तुम्हाला वाटते काय ,तर तसे नाही जड जीवांचा उद्धार व्हावा याकरिता मी फिरतोय.


अभंग क्र.१२३१
हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयांचं ॥१॥
पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥
होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥
तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥

अर्थ

एखादी वस्तू जर हरवली तर त्याविषयी खंत मानु नका. एखादी वस्तू जर हरवली तर देवाला अर्पण केले असे म्हणा त्यामुळे तुम्हाला देवाची सहजच सेवा घडते. जसे भाग्यात, नशिबात आहे ते घडतेच पण जर एखादी वस्तू हरवली आणि तुम्ही देवाला समर्पण केल्याचा संकल्प केला तर त्या योगाने तुम्हाला मोठा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी आपले मन मोकळे असते त्या वेळी आपल्या कडून आपोआप पूण्य कर्म घडत असते.


अभंग क्र.१२३२
नेसणें आलें होतें गळ्या । लोक रळ्या करिती ॥१॥
आपणियां सावरीलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥
संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥
भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥
सावरीलें नीट वोजा । दृष्टिलाजा पुढिलांच्या ॥४॥
बरे उघडिले डोळे । हळहळे पासूनि ॥५॥
तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥

अर्थ

नेसलेले धोतर फिटत असेल म्हणून हळूहळू वर घेत घेत गळ्यापर्यंत आले तर ते वेगळेच काहीतरी हास्यास्पद दिसते. त्यामुळे लोक आपली चेष्टा करतात. जर तेच धोतर वेळेत आपण व्यवस्थित सावरले तर मग कोणीही आपली चेष्टा करणार नाही मग जगही भले आणि आपणही भले .आपण जर नेहमी सावध राहिलो तर चेष्टेचा विषय तुटतो. आपल्या अंगी जर भलतेच सवयी असतील तर आपण चेष्टेचा भाग होतो. आपण जर व्यवस्थित वस्र ,धोतर सावरले तर पुढच्या लोकांची लाज आपल्याला वाटणार नाही .लोक देखील माझी अशीच चेष्टा करत होते बरे झाले आता माझे डोळे उघडले मी आता गबाळ्या माणसांप्रमाणे संसारात राहून चेष्टेचा भाग झालो होतो परंतु मी आता परमार्था लागलो आहे, मी लवकरच माझी सावरासावर केली आहे त्यामुळे लोकांच्या चेष्टे पासून मी मोकळा झालो आहे .तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा बरे झाले आता माझी विटंबना चुकली कारण मी परमार्थाला लागलो त्यामुळे लोक आणि माझा देहभाव याचा मला विसर पडला आहे.


अभंग क्र.१२३३
जिव्हा जाणे फिकें मधुर की क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥
देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥
परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥
एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥३॥
तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥

अर्थ

एखाद्या पदार्थाची चव फिकी, गोड आहे की खारट हे फक्त जिभेलाच कळते जिभेला मांस आहे तसेच इतर अवयवांना ही मांस आहे ,पण जर हाताला विचारले तर हातांनाच पदार्थांची चव सांगता येणार नाही .जसे नेत्राला दिसते, मुखाला बोलता येते आणि चित्तालाच सुखदुःख समजते ,नाकाने वास घेता येतो आणि कानाने ऐकता येते याप्रमाणे एका इंद्रियाने होणारे ज्ञान दुसऱ्या इंद्रियाला होत नाही. देवाने एका देहाच्या ठिकाणी भिन्न भिन्न धर्म ठेवले आहेत आणि सर्वांची सूत्र हातात धरून या देहाला नाचवीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढी ज्याची सत्ता आहे त्या अनंताला तुम्ही का विसरता?


अभंग क्र.१२३४
न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥
तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥

अर्थ

मुद्दाम जीव देण्याची गरज नाही तो एक दिवस जाणारच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जो देवाजवळ मरण मागतो तो गाढवाचा बाळ आहे, एवढेच नाही तर तो शुद्ध चांडाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जो देवाला मरण मागतो त्याला हे कसे कळत नाही की देहरूपी अमूल्य ठेवा जर तो राहिलाच नाही तर मेल्यानंतर काहीही आपले हित होणार नाही उलट जिवंत राहून संत सेवा घडेल हरिभक्ती होईल.


अभंग क्र.१२३५
मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥
नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हणून ॥२॥
कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे कां नाभी म्हणसी ना ॥४॥

अर्थ

देवा व्यवहारांमध्ये पैसे देऊनच चाकर म्हणजे नोकर ठेवण्यात येतो पण मी तर बळेच तुझा बिनपगारी चाकर झालो आहे. तरीही तू मला तुझा चाकर करून घेत नाही हे आश्चर्यच आहे ना. देवा तू आममच्याजवळ जरी नसलास तरी आम्ही तुझ्या पायाच्या ठिकाणी आमचा भक्तिभाव ठेवू आणि आमचे पुष्कळ हीत करून घेऊ. हे दातारा आम्ही कोणत्याही प्रकारचे भोग भोगणार नाही कारण तुम्हाला सर्व भोगता यावे म्हणूनच .अरे पांडुरंगा आम्ही खूप कष्ट करून तुझी कीर्ती वाढवू पण तू आमच्याविषयी असा उदास का आहेस हे काही कळत नाही .तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही तुला असे काय मागत आहोत कि, तू तुझ्या मुखाने फक्त फुकटचे दोन शब्द “भिऊ नकोस” एवढेही उच्चार करत नाहीस.


अभंग क्र.१२३६
काय लवणकणिकेविण । एके क्षीण सागर ॥१॥
मा हे येवढी अडचण । नारायणी मजविण ॥ध्रु.॥
कुबेर अट्टाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥२॥
तुका म्हणे काचमणी । कोण गणी भांडारी ॥३॥

अर्थ

जर समुद्रात मिठाचा एक खडा कमी पडला तर समुद्राला काही कमीपणा येणार आहे काय? तसेच नारायणाच्या व्यापक स्वरूपाला माझ्यावाचून काही अडचण येणार आहे काय ?कुबेर अट्टाहासाने धन जोडतो पण त्यातील एका कवडिला काहीच किंमत नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात रत्नांचा भांडारामध्ये काचेच्या मण्याला काय किंमत आहे त्याप्रमाणे देवाच्या जवळ माझी काय किंत आहे, तो परिपूर्ण आहे मी त्याच्यावाचून अपूर्ण आहे.


अभंग क्र.१२३७
तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥
तूं माझा आकार । मी तों तूंचि निर्धार ॥ध्रु.॥
मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥
मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ॥३॥
तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥
तुका म्हणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥

अर्थ

देवा तसे पाहिले तर तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही परंतु तुझ्याशी कल्पित भेद ठेवून मी भक्तीचा विनोद केला आहे .माझा आकार म्हणजे स्वरूप, तूच आहेस आणि मी ज्याला “मी” म्हणतो ते ही तूच आहेस. देवा मी आणि तू एकच आहेस तरीही तुझी सेवा माझ्याकडून तू करून घेत आहेस. मी तुझ्या स्वरूपाशी अचल आहे आणि माझ्या ठिकाणी जे बळ आहे ते तुझेच आहे .माझ्या मुखाने तूच बोलत आहे आणि मी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सुखाने स्थित आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आणि मी नाम रूपाने ,नाम आणि रूपाने वेगळे आहोत पण स्वरूपात: तू आणि मी एकच आहोत.


अभंग क्र.१२३८
वैराग्याचें भाग्य । संतसंग हाचि लाग ॥१॥
संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥
तोचि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥
तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाय ॥३॥

अर्थ

संतांच्या संगतीत लाभ होणे हेच खरे वैराग्याचे भाग्य आहे. संत म्हणजे कृपेचे दिप आहेत .ते साधकांना निष्पाप करतात .ज्यांच्या हृदयात भेदाभेद नाही तोच खरा देव भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रेमाने नसतो हरीचे गुण गातो आणि गाता गाता त्यातच विरूनही जातो.


अभंग क्र.१२३९
जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठल कीर्त्तनामाजी उभा ॥१॥
राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥२॥
तुका म्हणे मुक्ती हरीदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠद्धीसिद्धि ॥३॥

अर्थ

विठ्ठलाची प्राप्ती करण्याकरिता कोणत्याही प्रकारची जप,तप ,ध्यान,धारणा करण्याची गरज नाही. कारण विठ्ठलाची प्राप्ती हरिकीर्तनाने होते, हरी कीर्तनात तो नेहमी उभा असतो. माझ्या मनामध्ये असा दृढ विश्वास आहे की विठ्ठल कीर्तनात उभा राहतो .त्यामुळे विठ्ठलाच्या प्राप्तीकरता हरिकीर्तन शिवाय इतर कोणतेही साधन करू नये व मनातदेखील आणू नये. कीर्तनामध्ये समाधी ,ध्यान ,मुद्रा ही साधने आश्रय धरून असतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्तांच्या घरी चारही मुक्ती व रिद्धी सिद्धी चाकरी करत असतात.


अभंग क्र.१२४०
नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्ती असो द्यावी ॥१॥
सरलिया भोग येईन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥
आतां मजसाठी याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥२॥
तुका म्हणे मुखीं असो तुझें नाम । देईल तो श्रम देवो काळ ॥३॥

अर्थ

देवा मी तुला काही संपत्ती वगैरे मागत नाही केवळ माझ्या चित्तामध्ये तुझी आठवण राहू द्यावी हे एवढेच मला पाहिजे. देवा माझे भोग संपले की मग तुझ्या पायाच्या भेटीच्या अनुसंगाने तुझ्या स्वरूपाला मी प्राप्त होईल. देवा तुम्ही माझ्या भेटीसाठी सगुण साकार रूप धारण करावे मग माझी रोखीची भाषा माझ्या ठिकाणी राहणार नाही .तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या मुखा मध्ये सतत तुझे नाम असू द्यावा हीच माझी इच्छा आहे मग हा कळिकाळ मला काय त्रास देईल ते देऊ.


अभंग क्र.१२४१
हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥
नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥
केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ॥२॥
तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥

अर्थ

काही मनुष्य स्वतःच्या स्वहिताचा विचार करून आमच्याकडे येतात मग आम्ही त्यांना उपदेश करतो .मी लोकांचे मनोरंजन करण्याकरिता विनोदाने काहीही बोलत नाही .मी जो काही अक्षरांचा म्हणजे पाठांतराचा खटाटोप केला आहे तो देवासाठी केला आहे .तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला जो काही उपदेश करत आहे तो तुम्ही ग्रहण करावा कठोर शब्दात काही बोलत असेल तर त्याचा राग मानून घेऊ नका आणि त्याकडे दुर्लक्षही करू नका.


अभंग क्र.१२४२
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥१॥
नाहीं आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥
द्वैताद्वैतभावें । अवघें व्यापियेलें देवें ॥२॥
तुका म्हणे हरी । आम्हांमाजी क्रीडा करी ॥३॥

अर्थ

माझे सर्व प्रारब्ध, संचित, क्रियामाण नारायण स्वरूप झाले आहेत .आता आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. जरा, जन्म, मरण हेही आम्हाला बाधू शकत नाही. देवानेच द्वैत व अद्वैत हे व्यापून टाकले आहे .तुकाराम महाराज म्हणतात हा हरी आमच्यामध्ये नित्य सर्व काळ क्रीडा करतो म्हणजे व्यवहार करतो.


अभंग क्र.१२४३
नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥
धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥
क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां अधीन ॥२॥
तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी ॥३॥

अर्थ

हे कृपाळू पांडुरंगा तुझी सेवा कशी करावी हे हि मी जाणत नाही. त्यामुळे हे पांडुरंगा तू माझ्याकडे लवकर धाव घे आणि मी या भवसागरात बुडत आहे तू तुझ्या सत्तेने मला यातून ओढून काढ. देवा मी क्रिया कर्महीन झालो आहे कारण मी इंद्रियांच्या अधीन झालो आहे .तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझे पाय धरून तुला वेळोवेळी विनंती करत आहे की तू माझा या भवसागरातून उद्धार कर.


अभंग क्र.१२४४
जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥१॥
तो एक पंढरीचा राणा । नये अनुमाना श्रुतीसी ॥ध्रु.॥
विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥२॥
तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक॥३॥

अर्थ

ज्याच्यापासून हे महीमंडळ, पृथ्वी मंडळ निर्माण झाले तोच हा पंढरीनाथ आहे की ज्याच्या स्वरूपाचे अनुमान श्रुती म्हणजे वेदाला देखील कळत नाही .सहाही शास्त्रे ज्याच्या स्वरूपाविषयी वाद-विवाद करतात ,तो हा विठ्ठल आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा पंढरीनाथ कोणालाही न कळणारा आहे तो कोणालाही कळणार नाही परंतु तो सर्वत्र व्यापक आहे.


अभंग क्र.१२४५
नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥१॥
जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥
नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥
नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी॥३॥
तुका म्हणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥४॥

अर्थ

या विठ्ठलाला रूप नाही नावं नाही. आणि त्याला धरायला शरीरही नाही जेथे जावे तेथे विठ्ठलच माय बहिण आहे .विठ्ठलाला कसलाही आकार नाही विकार नाही हा विठ्ठल सर्व चराचरामध्ये व्यापलेला आहे .विठ्ठल निर्गुणही नाही सगुणही नाही. कोण त्याच्या मूळ स्वरूपाला जाणू शकेल?तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध भक्तिभावा वाचुन याचे मन कोठेही वळेनासे झाले आहे.


अभंग क्र.१२४६
आहे सकळा वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥१॥
खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥
आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥२॥
जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥३॥
तुका म्हणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥४॥

अर्थ

हा देव सर्व उपाधी पासून वेगळा आहे तरीही तो या जगामध्ये कोणालाही न कळू देता क्रिडा करत आहे .कळसूत्री बाहुलीप्रमाणे हा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची दोरी हलवीत असतो. तो सर्व उपाधी पासून वेगळा आहे तरीही तो सर्वांना कसा नाचवीत होते पहा . जेव्हा प्रारब्ध संपते ते हा देव आयुष्याची दोरी असडतो आणि देहरूपी बाहुली गतप्राण होते. तुकाराम महाराज म्हणतात असा हा परमात्मा याला जाणून घेऊन त्याला आपला सखा करावा.


अभंग क्र.१२४७
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥
येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥
भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥२॥
तुका म्हणे रंगे । रंगी रंगलो श्रीपांडुरंगे ॥३॥

अर्थ

हे नारायणा आता माझ्या मनाने पंच विषयांकडे कडे धाव घेणे थांबविले आहे. कारण ते तुझ्या पायाच्या ठिकाणी कसे शांत गुंतून राहिले आहे ते पहा. हे मन सर्वत्र फिरून आले आणि आता ते तुझ्या पाया जवळ आले आणि तृप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी या श्रीपांडुरंगाच्या रंगात रंगलो आहे.


अभंग क्र.१२४८
आळस पाडी विषय कामी । शक्ती देई तुझ्या नामी ॥१॥
आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणीं ॥ध्रु.॥
हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥२॥
तुका म्हणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥३॥

अर्थ

देवा मला विषय सेवनाविषयी आळस पडो दे आणि तुझे नाम घेण्याविषयी मला शक्ती दे. देवा इतर कोणत्याही विषयी बोलण्याकरिता माझी वाणी मुकी राहू द्या पण तुझे गुणगान करण्याविषयी माझी वाणी गर्जु द्या. देवा हीच विनवणी मी तुम्हाला केली आहे आणि ही विनवणी तुम्ही मनात आणा. तुकाराम महाराज म्हणतात मला तुझे पाय माझ्या डोळ्यांनी पाहता येईल असे कर एरवी ते आंधळे झाले तरी चालेल.


अभंग क्र.१२४९
कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥१॥
आतां हेचि माप करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥
नेंदाविया वृत्ति । आतां उठों चि बहुती ॥२॥
उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥३॥

अर्थ

आता शुल्लक कारणासाठी वाणी कोण खर्च करतोय? आता एवढेच काम करूया विठ्ठलाला आपल्या हृदयात धरून ठेवुया. माझ्या चित्तामध्ये आता यापुढे अनेक विषयां विषयी वृत्ती उठू नये .तुकाराम महाराज म्हणतात मी हरिभक्ती विषयी उपदेश करून मी ही त्यामध्ये वेडा होत आहे.


अभंग क्र.१२५०
मागेन तें एक तुज । देई विचारोनि मज ॥१॥
नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥
जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥
रंक होईन दीनांचा । घायें देहपात साचा ॥३॥
तुका म्हणे हें चि आतां । देई देई तूं सर्वथा ॥४॥

अर्थ

देवा मी तुला आता एक मागणे मागणार आहे पण तू मला ते विचार करून द्यावे. माझी मागणी अशी की तू मला दुर्जनाची संगती नको देऊस. यांच्या संगतीने माझे क्षणाक्षणाला चित्त भंग पावते .देवा मी पुष्कळ जन्म घेईन आणि अनेक यातना सोसून मी एखाद्या गरीबाचा रंक म्हणजे भिकारी होईल मग त्याने मला मारले तरी चालेल .तुकाराम महाराज म्हणतात पण देवा तू मला आता सर्वथा हेच दान दे की मला दुर्जनाची संगती होऊ देऊ नकोस.


अभंग क्र.१२५१
जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥
तरि म्यां बोलावें तें काई । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥
पालटती क्षण । संचित प्रारब्ध क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे सत्ता । होसी सकळ करिता ॥३॥

अर्थ

हे पांडुरंगा तू धर्म आणि नीती उत्तम प्रकारचा जाणतोस. त्यामुळे मी तुझ्या पायाशी असे बोलावे की जेणेकरून ते तू मान्य करशील. देवा तू जर मनात आणले तर माझे संचित, प्रारब्ध, क्रियमाणकर्म एका क्षणात पळून जाऊ शकतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू तुझ्या सत्तेने काहीही करु शकतोस.


अभंग क्र.१२५२
तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥१॥
जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥
केली जिवा साठी । आतां सुखें लागो पाठी ॥२॥
तुका म्हणे ठाव । न सोडणें हाचि भाव ॥३॥

अर्थ

हे हरी तुम्ही आम्हाला किती जरी कंटाळलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. देवा तुम्हाला सोडून आम्ही कोठे जावे ते तुम्ही सांगा, ही मी विनंती तुमच्या पाया पाशी करतोय? देवा आम्ही आमचा जीव तुम्हाला अर्पण केला आहे त्यामुळे आता खुशाल तुमच्या पाठीशी लागावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुमच्या ठिकाणी जो आश्रय घेतला आहे तो सोडून न देणे हाच भक्तिभाव आमच्या ठिकाणी असला पाहिजे.


अभंग क्र.१२५३
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥
नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥
काम क्रोध लोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥
तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥

अर्थ

या संसारात जन्माला येऊन मी फक्त एक हरीलाच जाणतो आहे. मी इतर कोणालाही जाणत नाही मी फक्त गोविंदाचे ध्यान नित्य करत आहे. माझा काम, क्रोध, लोभ हा सर्व पंढरीनाथच आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा विठ्ठल माझा धनी आहे आणि मी त्याचा सेवक आहे.


अभंग क्र.१२५४
सर्वपक्षीं हरी साहयसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥
सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥


अभंग क्र.१२५५
आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥
वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥
वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥
चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥
तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥

अर्थ

आमच्या घरी एक दुखती गाय आहे तिला इतका पान्हा आहे की त्रिभुवना मध्येही तिचा पान्हा समावत नाही. ती गाय रंगाने सावळी आहे आणि तिचे नाव श्रिधरा आहे. ती गाय चौवदा भुवनामध्ये चरत असते. परंतु त्या गाईला कोणतेही वासरू नाही तिला जे कोणी भक्तीच्या वात्सल्याने कुरवाळीतो त्याला ती गाय तीच्या बरोबर घेऊन जाते .आणि त्याचे अंतकरण भरून त्याला दूध पाजते. ती गाय आपल्या चारही स्तनातून दूध स्त्रवत असते आणि ते दूध पिऊन सनकादिक मुनी तृप्त झाले आहेत .तुकाराम महाराज म्हणतात आपल्या दुधाने संपूर्ण जगाला ती गाय पोसते तर मग माझी भूक त्या सर्वांच्या भूकेच्या पुढे किती आहे?


अभंग क्र.१२५६
काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥
काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥
काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥२॥
कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥३॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥४॥

अर्थ

हे पांडुरंगा माझ्याकडे असे कोणते पुण्य आहे की ज्या कारणामुळे तू माझ्या कडे धावते येशील? देवा असा मी कोणता भक्त वाया जाणार आहे की ज्यामुळे तू तातडीने माझ्या पुढे येशील? देवा तू माझे असे कोणते कष्ट पाहिले किंवा चाकरी पाहिली की ज्यामुळे तू मला तुझ्याकडे बोलशील? हे नारायणा असा मी कोणता मोठा लागून गेला आहे ,मी तर करंटा आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला माझे संचित माहित नाही परंतु माझ्या या जन्मात मी कोणतेच स्वहिताचे काम केले नाही.


अभंग क्र.१२५७
आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥
समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥
चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥२॥
तुका म्हणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥३॥

अर्थ

देवा आमच्या भक्ती भावामुळे तुला देवपणा आले आहे. हे देवा तू विसरून गेला आहेस की काय? श्रीमंत लोकांना केलेल्या उपकाराची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्यांना आठवण करून देण्यात येत नाही. आम्ही तुझे सेवक आहोत आणि आमच्या भक्तिभावानेच निर्गुणाच्या ठिकाणी तुला अवतार घेण्याच्या चलन-वलनात्मकक्रिया होतात, त्यामुळे तुझे सगुण रूप सांभाळले जाते .तुकाराम महाराज म्हणतात हे हरी मी आता अट्टाहासावर आलेलो आहे त्यामुळे तुझे प्रेम देऊन तु माझी समजूत काढावी.


अभंग क्र.१२५८
आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥
बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥
पाप पुण्य ज्याचें तोचि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥४॥

अर्थ

ज्यावेळी आम्ही देवाला देह अर्पण केला त्यावेळी आम्ही मेलो आहोत .त्यामुळे मी आता कोणत्या साधनाद्वारे देवाची सेवा, पूजा करू .प्रारब्धाची सूत्रे देवाच्या हातात आहे आणि तो या देहरूपी पुतळ्याला जसा हलवीत आहे तसा हा देह हलतो. तो देव जसे मला बोलावीत आहेत तसे मी बोलत आहे. त्यामुळे हा देव सर्व क्रिया करतो यात कोणतीही शंका मला राहिली नाही. आम्ही हा देह देवाला अर्पण केला त्यामुळे या देहाकडून जे पाप-पुण्य घडते ते देवालाच माहित आमचा त्याच्याशी काहीच संबंध राहतोच कुठे? तुकाराम महाराज म्हणतात लोकांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते म्हणजे आम्ही या देहापासून अलिप्त आहोत अतीत म्हणजे वेगळे आहोत.


अभंग क्र.१२५९
लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥
परनारी मज रखुमाईसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥
तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥

अर्थ

देवा मी दुराचारी पणाने वागणार नाही जेणेकरून तुझी अपकीर्ती होईल. माझा प्राण जरी गेला तरी हरकत नाही पण भलतेसलते मी वागणार नाही. देवा परस्त्री मला रखुमाई समान आहे तर परधन ओकलेल्या अन्ना पक्षही घाण आहे .तुकाराम महाराज म्हणतात भक्तांची लाज कोण राहतो तर हा दीनदयाळ सहकारी पांडुरंगच.


अभंग क्र.१२६०
हेचि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥
सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥
दुरील जवळी आपणचि होतें । कवळिलें चित्तें जीवनासी ॥२॥
तुका म्हणे नाम घेता वेळोवेळां । होतील शीतळा सकळा नाडी ॥३॥

अर्थ

हरीच्या स्वरूपाची आठवण करणे हीच त्याची खरी भेट आहे. आणि त्या विषयी आवड धरली की जीवाला विश्रांती प्राप्त होते .देवाच्या स्वरूपाची आठवण केल्यानंतर जे सुख मिळते केस खाऊ, जतन करून त्याचेच सेवन करावा मग त्याने तहान भूक नाहीशी होते. आपल्या चित्ताने जीवनरूपी विठ्ठलाला कवटाळले तर दूर वाटणारा विठ्ठल आपोआप आपल्या जवळ येतो. तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाचे नाम वेळोवेळा घेतले असता शरीराच्या सर्व नाड्या शांत होतात.


अभंग क्र.१२६१
आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥३॥

अर्थ

मी माझ्या सत्तेने बोलत नाही तर कृपावंत सखा असा हा पांडुरंग तोच माझ्या वाणीने बोलत आहे. साळुंकी मंजुळ शब्दात बोलते पण तिला शिकविणारा धनी वेगळाच असतो. मी पामर आहे मी काय कोणाला उपदेश करणार परंतु विश्वंभर माझ्या मुखातून उपदेश करून घेत आहे इतरांना उपदेश तोच करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे कौशल्य कोणाला कळले आहे काय तो तर पांगळ्या माणसालाही पाया विण चालवू शकतो.


अभंग क्र.१२६२
हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥
बळें हे वारावे आडरान करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥
द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥
तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणी । नाही माझी वाणी पदरीची ॥३॥

अर्थ

जो आपल्या हिताचा उपदेश करतो त्याने आपल्याला जीवदान दिले आहे असेच समजावे. आणि तू तुझ्या मनासारखा कसाही वाग असे सांगणारा जो असतो तो घातकी आहे असे समजावे. एखादा जर अधर्माच्या मार्गाने चालत असेल तर त्याला बळच सन्मार्गाला लावावे जर आड मार्गाने कोणी चालत असेल तर त्याला चांगल्या मार्गाने आणून सोडावे. आपल्याकडे पैसे असतील त्यास मदत करून तीर्थयात्रेस पाठवावे परंतु चोराला सहाय्य करून पाप करून घेऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पदरच्या वाणीने मी काहीही सांगत नाही तर हे सर्व पुराणात वर्णन केले आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे.


अभंग क्र.१२६३
ऐसा घेई कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नाश ॥१॥
मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ध्रु.॥
तोडीं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥२॥
तुका म्हणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥३॥

अर्थ

अरे तू असा संन्यासी हो की तुझ्या अहंतेचा सर्व संकल्पाचा नाश होईल, मग तू कुठेही रहा अगदी जनात, वनात, खाटेवर, जमिनीवर कुठेही रहा काही हरकत नाही. “मला सर्व समजते” हे बंधन तु तोडून टाक .अगदी मी ब्रम्‍ह आहे या वृत्ती होऊनही तू वेगळा होय. तुकाराम महाराज म्हणतात तु सर्वांच्या पेक्षा वेगळा म्हणजे आकाशापेक्षाही मोठा आणि अनु रेणु पेक्षाही लहान म्हणजे अनु रेणु चा गाभा होय.


अभंग क्र.१२६४
सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापै ॥१॥
ऐसे तुम्हां ठायाठाव । म्हणे देव संपादे ॥ध्रु.॥
कैची चिरामध्यें चिरे । मना बरें आलें तैं ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । अंगसंगा भिन्न करा ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही सोळा सहस्त्र बायका करता एवढे रूप धारण करता मग आमच्या साठी वेगवेगळे रूप का धारण करत नाही? देवा तुम्हाला कोणतेही रूप धारण करता येते, आणि त्यांची संपादणीही करता येते. देवा द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला वस्त्र देऊन तिचे लज्जारक्षण तुम्ही केले वस्त्रात वस्त्र केले त्यावेळी तुमच्या मनात असे करावे हे कसे बरे आले? तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुम्ही आम्हाला तुमच्यापासून दूर करता हे बरे नाही.


अभंग क्र.१२६५
इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा अन्न भिक्षा ॥१॥
निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥
छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाची तें ॥२॥
तुका म्हणे एक सेवटीं राहणें । वर्तता या जना विरहित ॥३॥

अर्थ

इहलोकांमध्ये आम्हाला भूषण म्हणजे काय तर पाणी पिण्यास भोपळा, अंगावर पांघरण्यास गोधडी आणि खाण्यास भिक्षेचे अन्न, आमचे भूषण हेच आहे. कारण ही संपदा भय विरहित आहे हिला कसल्याही प्रकारचे भय नाही. आणि या संपदेमुळे चित्ताला सर्वकाळ समाधान राहते. आमचे घर म्हणजे अनेक प्रकारचे छिद्रांचे त्यामध्ये अनेक प्रकारचे उंदीर आहेत आणि हरी नाम घेणे हेच आमचे धन आहे. तुकाराम महाराज म्हणतात शेवटी आम्हाला या घरात एकटे राहावे लागणार आहे कारण आम्ही सर्व जन, लोकांपेक्षा वेगळे वर्तन करतो व वेगळ्या वर्तनाने वागतो आहोत.


अभंग क्र.१२६६
गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी ॥१॥
माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥
मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥२॥
तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥३॥
तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥४॥

अर्थ

देवा उत्तम प्रकारे कसे गावे हे मला कळत नाही परंतु तुझ्यापुढे मी दोन्ही कान धरून मी नाचत आहे .हे विठ्ठला माझ्या बोबड्या शब्दांकडे तू तुझे चित्त द्यावे, लक्ष द्यावे. माझे बोबडे शब्द ऐकून मला लोक हसतील पण मी कोणतीही शंका किंवा संकोच न करता तुझ्यापुढे तुझे गुणगान गाईन. देवा तुझे नाम घेण्यासाठी मी निर्लज्ज झालो आहे मग आता मला या लोकांशी काय काम? तुकाराम महाराज म्हणतात हे कमलापती तुम्ही माझी विनंती एवढी ऐका.


अभंग क्र.१२६७
विष पोटीं सर्पा । जन भीतें तया दर्पा ॥१॥
पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥
चंदन प्रिय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥
तुका म्हणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥३॥

अर्थ

सापाच्या पोटी विष असते म्हणून लोक त्याला भितात. सर्वांचे देह पंचमहाभूतांपासूनच बनवलेले आहेत. ते भिन्न नाही परंतु ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गुणामुळे सुख दुःख प्राप्त होते. चंदनाच्या वासामुळे चंदन आवडते त्याप्रमाणे ज्याच्या-त्याच्या गुणांनुसार लोकांना जो तो आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात अन्न जर शिजले तर त्यामध्ये सर्व अन्न शिजते पण एखादा कुच्चर दाणा असतोच की तो शिजत नाही आणि तो अन्नात मिसळतही नाही तो कडकच असतो त्याप्रमाणे यावरून असे सिद्ध होते की सर्वत्र पंचभुताची व्याप्ती आहे परंतु प्रत्येकाचा गुणधर्म भिन्नभिन्न आहे.


अभंग क्र.१२६८
देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥
तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥
सर्वांग कुरवाळी । उपटी एक रोमावळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥३॥

अर्थ

काही लोक सर्वत्र देव आहे असे सांगतात आणि सर्वांना वंदन ही करतात. पण एखाद्याची पुष्कळ निंदाही ते करत असतात. हे असे केल्याने त्याचे सर्व कर्म वाया जातात .जसे एकाच ताटात मिष्टांन्न आणि वीष असावे त्याप्रमाणे काही लोकांच्या ठिकाणी ब्रम्‍हज्ञान आणि वाईट प्रकृती असतात. हे मनुष्य असे वागतात की एखाद्याच्या अंगावरून प्रेमाने कुरवाळायचे आणि दुसरीकडे त्याच्या अंगावरील एक केस हळूच उपटायचा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त त्याच्या स्वाधीन नाही त्याचे वागणे आणि बोलणे वेगवेगळे असते त्यामुळे त्याचे सर्व केलेले कर्म वाया जाते.


अभंग क्र.१२६९
मज माझा उपदेश । आणिकां नये याची रीस ॥१॥
तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥
तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥
तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥

अर्थ

मी केलेला उपदेश हा माझ्या कल्याणाकरिताच आहे त्यामुळे त्याचा कोणीही ताप मानुन घेऊ नये. तुम्ही सर्व पांडुरंगा समान आहात तुम्ही सगळे चांगले आहात मात्र तेवढा मीच दुष्ट आहे मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तेव्हा तुम्ही माझे काहीतरी हित करा. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचे पाय धरले आहेत त्यामुळे आता तुम्ही “मी आणि माझा” हा भ्रम दूर करा.


अभंग क्र.१२७०
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥
मैथुनाचें सुख सांगितल्या खूण । अनुभवाविण कळो नये ॥२॥
तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥

अर्थ

जाणत्याचे वर्म आणि अज्ञानी माणसाची कर्म हे घडल्या वाचून त्यांचा अनुभव येत नाही .आणि विधीयुक्त कर्म केल्यावाचून कर्म धर्मरूप होत नाही. मैथुनाचे सुख सांगितल्यावर कळत नाही तर ते प्रत्यक्ष अनुभवानेच कळून येईल .तुकाराम महाराज म्हणतात जो म्हणतो की मी ब्रम्‍ह जाणले आहे त्या शब्दज्ञान्याला आग लागो आणि ज्याने विठोबाला साधले आहे तो सर्वांपेक्षा निराळाच आहे.


अभंग क्र.१२७१
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥
अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥
कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥
तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥

अर्थ

आपला अभिमान जर साक्षात पांडुरंग धरीत आहे तर मग आपल्याला अडचणच कशाची आहे? त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार न करता पांडुरंगाला लवकर शरण जावे .जर केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला तर पाप राहीलच कोठे ?तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही खर्‍या भक्तिभावाने पांडुरंगाला शरण गेलात तर तुम्हाला तो त्याच घटकेला उभ्या संसारातून पैलतीराला पोहोचवेल.


अभंग क्र.१२७२
तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥
मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांडवीन पोटीं ॥ध्रु.॥
नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥
तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या प्राप्तीचे वर्म संतांनी माझ्या हाती दिली आहे ते वर्म असे आहे की, मी माझ्या मुखाने तुझे नाम घ्यावे आणि ते कंठात धारण करावे आणि मी तुला माझ्या हृदयात साठवून ठेवावे. देवा तू तर माझ्या भक्तिप्रेमात आधीच गुंतलेला आहे. आता मी तुला नवविधाभक्ति ने वेढून टाकील. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही इतके बलवान झालो आहोत की कळीकाळ देखील आमच्या पाया पडतो.


अभंग क्र.१२७३
माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥१॥
आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥
तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥
तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥

अर्थ

या विठ्ठलाला माझ्या डोळ्याने पहावे असा छंद माझ्या डोळ्याला लागो. मला यावाचून दुसरी कोणतीच इच्छा नाही मला हा संसार देखील गोड वाटत नाही. जर मी पांडुरंगाच्या मान्यतेला प्राप्त झालो तर मनुष्य जन्माला आल्याचे फळ झाले असे मी समजेन. तुकाराम महाराज म्हणतात याकरिता देवा मला तुमच्या चरणांची सेवा घडावी.


अभंग क्र.१२७४
अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥
अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥२॥
तुका म्हणे जवळी आलें । उभे ठालें समचरणीं ॥३॥

अर्थ

सर्व पाप ज्याच्या दर्शनाने नष्ट होतात असे ते ब्रम्‍ह पंढरीत आहे. त्यामुळे गात – गात पंढरीला जा आणि त्या विठ्ठलाला प्रेम मागा. जी सर्व सुखाची राशी आहे अशी सुखाची राशी पुंडलिका साठी विटेवर उभी राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्रम्ह आपल्या जवळ आले आहे आणि विटेवर त्याचे समचरण ठेवून उभे राहिले आहे.


अभंग क्र.१२७५
देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई ॥१॥
आतां माझ्या जीवां । करणें ते करी देवा ॥ध्रु.॥
बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥
तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥

अर्थ

देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझा देह ठेवून तुझ्या उपकारा तून उतराई झालो आहे. देवा माझ्या जीवाचे आता तुला जे काही करायचे असेल ते कर. देवा मी फार मतिमंद आहे अपराधीच आहे आणि हिन बुद्धीचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तिभावाची लक्षणे कोणती आहेत ती मला माहित नाही.


अभंग क्र.१२७६
जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥
जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥
बाइल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥२॥
तुका म्हणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

अर्थ

सर्व लोक सुखाचे सोबती आहेत आणि यांच्याशी देणे-घेणे केले तरच ते उपयोगी पडतात आणि यांच्याशी देणे-घेणे केले नाही तर यांना आपला काहीच उपयोग होत नाही. अंतकाळी कोणीही कोणाचे नाही. अरे तुझी शक्ति हीन झाली, तू म्हातारा झाला की तुझे नाक आणि डोळे गळायला लागतील त्या वेळी बायको आणि पोरे तुला सोडून पडतील. तुझी बायको ज्यावेळी तू घरात थुंकशील त्यावेळी म्हणेल खरेतर हा म्हातारा मेलेला बरा याने जागोजागी थुंकून माझे घर खराब केले. तुकाराम महाराज म्हणतात हे चक्रपाणी तुझ्या वाचून माझे कोणीच नाही.


अभंग क्र.१२७७
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥
मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥
ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥
देखोनि न देखें प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥
तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो सीण वाटतसे ॥४॥

अर्थ

देवा मला तुझे स्वरूप आत्म रूपाने समजल्या वरही, तुझे माझ्या मनाला सर्व ज्ञान असूनही मला अज्ञानी ठेव. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्या पेक्षा वेगळे राहते त्याप्रमाणे व्यवहारांमध्ये मी राहूनही व्यवहारात न राहिल्या प्रमाणे वर्तन करेल असे मला कर. मी व्यवहारांमध्ये कोणाची निंदा व स्तूती ऐकणार नाही. जसा समाधिस्त योगी बाह्य व्यवहार जाणत नाही अगदी त्याप्रमाणे. जसे स्वप्नात भासलेली सृष्टीच्या जागृत अवस्थेत आल्यानंतर मिथ्या ठरते अगदी त्याप्रमाणे, मी प्रपंचात राहूनही प्रपंच माझ्या दृष्टीने पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशी स्थिती झाल्यावाचून मी जे काही करत आहे ते मला शिणच वाटत आहे.


अभंग क्र.१२७८
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥
कारे कृपाळू न होसी । काय जाले मज विशी ॥ध्रु.॥
जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥
तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥

अर्थ

देवा, विठ्ठला विठ्ठला म्हणता म्हणता माझा कंठ फुटला आहे. मी हाक मारून देखील तू माझ्या विषयी कृपाळू का होत नाही. तुला माझ्याविषयी काय झाले आहे? देवा तुझ्यासाठी मी पुष्कळ येरझार्‍या घातल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अरे नाष्टा तू केलेल्या चेष्टा सांगण्यासारख्या नाहीत.


अभंग क्र.१२७९
प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥
ऐसें करी गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥
पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥
लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा ॥३॥

अर्थ

देवा माझे चित्त प्रपंचातून ओसरो आणि ते चित्त तुझ्या पायी लागो. हे पांडूरंगा तू असेच काहीतरी कर माझे चित्त तुझ्या शुध्द स्वरुपाच्या रंगात रंगून टाकावे. देवा आता पुरे झाले माझ्यावर दुसऱ्या कोणाचेही आता सत्ता नको आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा सर्व खोटयाचे तुम्ही निवारण करा म्हणजे माझ्या जन्ममरणाची पीडा जाईल.”


अभंग क्र.१२८०
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥
माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥
व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें ॥२॥
दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥३॥
विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥
तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥५॥

अर्थ

मी हरीकथा फक्त व बोलण्यापुरते हरीकथेचे महत्व सांगतोय असे नाही तर मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आहे. माझी हरीकथा माऊली कोणच्याही पारतंत्र्याखाली नाही ती भक्तांचा उध्दार करण्याकरता पूर्णपणे स्वतंत्र आहे. या हरीकथा माऊलीनेच माझ्या आध्यात्मिक वृत्तीला जन्म दिला त्या वृत्तीला वाढविले आणि या हरीकथा माऊलीनेच मला आत्मसुखाच्या निजपदी निजविले आहे. ही हरीकथा माऊली त्रिभुवनामध्ये ब्रम्हरसाच्या दुधाने भरलेली आहे. श्रीविष्णू या हरीकथा माऊलीचे दूध पिणाऱ्या खऱ्या वैष्णवाला हात जोडतात आणि श्रीभगवान त्या निष्ठावंत वैष्णवांच्या चरणरजाला मस्तकाने वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “याचे एवढे बळ आहे की हा कळीकाळाच्या देखील पायात बेडी घालतो.”


अभंग क्र.१२८१
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥
आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥
परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिला ॥२॥
तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥

अर्थ

शेवटी माझ्या सेवेचा परिणाम चांगला झाला मी रुक्मीणी चा पती माझा पांडुरंग याच्या भेटीला पंढरपूर म्हणजे माझ्या माहेरा ला आलो आहे. माझ्या मागच्या सर्व दुःखांचा नाश झाला. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या वाणीने हरीचे नाम तृप्ती होईपर्यंत घेण्याचे मी ठरविले आहे.


अभंग क्र.१२८२
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥१॥
तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥
तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥
नाम घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥३॥

अर्थ

देवा आम्ही आता तुझे नाम घेऊन तुझ्या नामाच्या रंगात थयथय नाचेन. तुझ्या नावावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कसा गर्भवास होईल? तुझ्या नामाचा जर विसर पडला तर आमच्या हातून कोटी ब्रम्हहत्या घडल्याचे पातक होईल. तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे नाव कोणीतरी फुकट घ्या मी तुम्हाला अगदी भक्ती भावपूर्वक सांगत आहे.


अभंग क्र.१२८३
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥१॥
घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥
आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥
तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥

अर्थ

बायको अशी असावी जी नवऱ्याला बळेच नरकात ढकलेल ती कधीही तीर्थयात्रा करू न देणारी पाहिजे. जी आपल्या नवर्‍याला नेहमी पाळीव कुत्र्या प्रमाणे आपल्या अधीन करून ठेवील अशीच बायको असावी. आपली त्याच्याकडून सेवा करून घेईल आणि देवासारखी पूजा करून घेईल अशी च बायको हवी. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा पती म्हणजे एक प्रकारचा गाढव पशु आहे आणि त्याने आपल्या आयुष्याचा नाश केला आहे.


अभंग क्र.१२८४
बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥
कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडयांच्या ॥ध्रु.॥
बाइलेच्या मना येईल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥२॥
तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुतऱ्याचें खाणें लगबगा ॥३॥

अर्थ

जो बायकोच्या आधीन राहून जीवन जगतो त्याचे तोंड जरी पाहिले तरी संकटे आपोआप येऊन पडतात. असे माणसे संसारात का जगतात कोणाला माहित, की जे गारुड्याच्या खेळातील वानराप्रमाणे बायको जशी नाचवेल तसे नचतात. बायको म्हणेल तेच खरे आहे असे नवरे म्हणतात ते अभागी आहेत असे जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांची जिने म्हणजे मेंग्या गाढवाप्रमाणे आहे आणि वचवच करून खाणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आहे.


अभंग क्र.१२८५
जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥१॥
करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥
तोंवरी हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥२॥
तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥३॥

अर्थ

मला या जगात सर्वत्र मान्यता प्राप्त करून देणे हाच काय तो तूझ्यासाठी माझ्या सेवेचा मोबदला आहे का, का ह्यापुढे तुझा काही विचार आहे. एकाला दुसरे अक्षरे जोडून माझ्याकडून कवित्व करवून घेतोस, माझा थोरपणा वाढवतोस परंतु ह्यावर माझे पूर्ण समाधान होईल असे तुला वाटते का. जोपर्यंत माझ्यासाठीचे पुढचे विचार तू मला तुझ्या मुखावाटे सांगत नाहीस तोपर्यंत तरी माझी ही कटकट काही संपणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा तुला आता पुंडलिकाची शपथ आहे जर तू माझा अव्हेर केला आणि मला असे अर्ध्यावरच टाकलेस तर.


अभंग क्र.१२८६
झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥
काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥
तुका म्हणे जालों गगनाधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥

अर्थ

मी बळेच झडप घालून संतांच्या पंक्तीत जेवणास बसलो आहे .आणि तुमच्यासारख्या थोर अन्नदात्याने मला त्या पंक्तीतून उठवले तर लोक तुम्हाला नाव ठेवतील. अहो पांडुरंगा माझ्या बाबतीत काय उचित आहे हे तुम्हाला कळत नाही काय, तुम्ही असे उगाच डोळे झाकून का बसलात? देवा संतांच्या पंगतीमध्ये मला जे काही हवे आहे ते मी तुम्हाला नक्की मागणार आहे आणि तुम्ही नाही म्हणण्याची ही योग्य वेळच नाही हे देखील मला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या पंगतीत बसलो त्यामुळे मी गगनाधीकारी झालो आहे, मोठा मानाधिकारीपणा मला मिळाला आहे आणि लोक मला काय म्हणतील याची तर मला मुळीच परवा नाही.


अभंग क्र.१२८७
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवटा आम्हालागी ॥ध्रु.॥
वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलितां लाज कोणां ॥२॥

अर्थ

पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा करणे ही माझ्या वडिलांची वतनदारी आहे. उपवास करून, पारणे करून माझ्या पूर्वजांनी तुझ्या द्वाराचे रक्षण केले आहे. आणि आम्हाला सुखोपभोग घेण्यासाठी ही वतनदारी ची तरतूद करून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझा अंकित दास आहे आणि तुम्ही जर माझी उपेक्षा केली तर याची लाज कोणाला आहे, अर्थात तुमच्याशिवाय कोणाला असणार?


अभंग क्र.१२८८
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा ॥१॥
हेचि ओळख तयाची । खूण जाणा अभक्तची ॥ध्रु.॥
ठावा नाहीं पांडुरंग । जाणा जातीचा तो मांग ॥२॥
ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥३॥
नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥३॥
तुका म्हणे त्याचें दिवशीं। रांड गेली महारापाशीं ॥४॥

अर्थ

ज्याची वाणी हरीचे नाम घेत नाही तो दोन बापाचा आहे हीच त्याची ओळख आहे आणि अभक्ताची खून देखील हीच आहे. जो पांडुरंगाला मानत नाही तो जातीचा मांग आहे. ज्याला विठ्ठलच माहित नाही त्याचा संग करु नये. जो आपल्या तोंडाने हरीचे नाम घेत नाही त्याचे ते तोंड नसून चांभाराचे कातडे भिजवण्याचे कुंड आहे असे म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाचा गर्भ ज्यादिवशी राहिला असेल त्यादिवशी त्याचि रांड आई महारा जवळ निजण्यासाठी गेली होती.


अभंग क्र.१२८९
पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥
तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥
द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥
सुदामा ब्राम्हण दारिद्रे पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निर्दाळावें पांडुरंगा ॥५॥

अर्थ

पांडुरंगा मी तुझ्या सेवेचा वतनदारी जरी असलो तरी मी पतित आहे पापी आहे. त्यामुळे मी तुला शरण आलो आहे तरी, देवा तु माझी लाज राख, पांडुरंगा तु आजपर्यंत तुझ्या अनेक भक्तांचा उद्धार केलेला आहे तुझा अंतपार कोणालाही लागत नाही. मी एक मोठा थोर पापी आहे त्यामुळे हे देवा तू माझा उद्धार कर. हे देवा तुमची बहीण द्रोपदी राजसूय यज्ञात भोजन वाढत होती त्यावेळी तिच्या चोळीची गाठ सुटली त्यावेळी दुर्योधनाने तिची विटंबना केली परंतु तु तीच्या चोळीची गाठ बांधण्यासाठी तिला तुझ्यासारखे चतुर्भुज केले. पांडुरंगा प्रल्हादासाठी तू स्तंभातून अवतार घेतलास मग माझाच विसर तुला का पडला? देवा तुमचा मित्र सुदामा ब्राम्‍हण दरिद्रीने पिडला होता परंतु तुम्ही त्याला तुमच्यासारखे केले सोन्याची नगरी निर्माण करून तुम्ही त्याला तुमच्यासारखे श्रीमंत केले. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला नीज भावे शरण आलेलो आहे त्यामुळे तुम्ही माझे पाप नाहीसे करा.


अभंग क्र.१२९०
कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥
आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥
काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥२॥
फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥३॥
तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ॥४॥

अर्थ

कस्तुरी चे रूप आती हिन असते परंतु तिच्या आत सारभूत सुगंध असतो त्यामुळे त्याला मोठे मोल मिळते. त्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला ही काही सुंदर रूप नसते परंतु त्याच्या आतील सुगंधाने त्याला मोठी किंमत प्राप्त होते. परीसाला काही चांगले रूप असते का, परंतु लोखंडालाही सोने करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असते त्यामुळे त्यालाही मोठे मोल असते. एखादी चांगली तलवार आळवली आणि ती विकली तर त्याचे बारा पैसे तरी येतील का तर नाही पण ती चांगली तलवार तशीच विकली तर तिचे हजार रुपयांवर पैसे येतील. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये जातीचे काहीच काम नाही परंतु ज्याच्या मुखामध्ये देवाचे नाम आहे तोच धन्य आहे.


अभंग क्र.१२९१
नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥१॥
तुम्हां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥
शक्तीहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥२॥
तुका म्हणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥३॥

अर्थ

देवा मी केवळ एक पाईक आहे, माझ्या सत्तेने मी या भवसागरातील सुख-दुःखे निवारण करू शकत नाही. त्यामुळे देवा मी तुम्हाला पावलोपावली आळवीत आहे. आता तुम्ही माझ्यावर भक्तीची छाया करा. देवा मी शक्तीहीन झालो आहे त्यामुळे मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही शक्तिमान आहात हा वृत्तांत मी पुराणात ऐकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला शरण आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी जन्म मरणाच्या भीतीने तुमचे पाय धरले आहे व या वाचून दुसरा कोणताही उपाय मला माहित नाही.


अभंग क्र.१२९२
पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥
होईल तें हो या विठोबाच्या नांवें । अर्जिले भावे जीवीं धरूं ॥ध्रु.॥
एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ती वाढे ॥२॥
तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥

अर्थ

खूप ग्रंथ वाचावे परंतु इतके आयुष्य हाती नाही. समजा जरी ग्रंथ वाचण्यास मिळाले तरी तेवढी बुद्धी माझी नाही. आता विठोबाचेच नाम घेऊ आणि काय होईल ते होवो. जे साधन मिळविले आहे ते आता विश्वासाने आपल्या भक्तिभावाने जीवात साठवून ठेवू. मी जर ग्रंथाचा अभ्यास केला तर माझ्या अंगी अभिमाना सारखे प्रकार येतील आणि त्याचा फार विचार केला तर तर्ककुतर्क वाढतील. तुकाराम महाराज म्हणतात मुलाने चांगल्या गोष्टीसाठी हट्ट धरला तर त्याची आई बापाला दया येते त्याप्रमाणे हरीचे नाम आपल्या मुखाने घेतले तर या हरीला आपली दया येते व तो आपला उद्धार करतो.


अभंग क्र.१२९३
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥
तो हा नंदनंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥
दिसतो हा नोहे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खेळासाठी । होतां भेटी परतेना ॥२॥
म्हणोनि उभी ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका । जो या लोकां दाखवितो ॥३॥

अर्थ

हरी चे रूप डोळ्याने पाहताच ते डोळ्यात भरते आणि अंतरंग हरी वाचून वेगळे राहत नाही. हरी आपल्या इच्छेनुसार जगामध्ये खेळ मांडत असतो आणि माया रूपाने अनेक रूपे धारण करत असतो. बाई हाच तो नंदाचा कृष्ण याची सेवा कशी करावी? तो जसा दिसतो तसा लहान नाही तर तो सर्व दिशा व्यापक आहे. देव मोठ्या चातुर्‍याने या संसारात खेळ खेळत असतो आणि याची भेट झाली तर मनुष्य पुन्हा संसाराकडे वळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीची एकदा भेट झाली की मनुष्य पुन्हा भवसागराच्या वाटेला येत नाही, मी मुक्तीला प्राप्त न होता संसाराच्या वाटेला परतलो आहे, गवळण म्हणते मी तुकारामाला आड करून विरहिणी गवळणीच्या स्थितीतील अनुवाद करून तुम्हाला दाखवत आहे.


अभंग क्र.१२९४
इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥
म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥
नाहीं अंगी बळ । त्याग करीजेसा सकळ ॥२॥
तुका म्हणे मोटें । प्रारब्ध हे होते खोटे ॥३॥

अर्थ

हे नारायणा तू आम्हाला इंद्रियांच्या आधीन करून दिन केले आहे. देवा माझे दुःख मी कोणापाशी सांगावे? देवा सर्वसंगपरित्याग करण्याचे बळ माझ्या अंगी नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझे प्रारब्धच खोटे आहे मग त्यात नारायणाला दोष तरी का द्यायचा?


अभंग क्र.१२९५
हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥
ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥
देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥
तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥

अर्थ

एखादी वस्तू हाताने धरायला जावे आणि ती मागे सरकावी, इतके दुःख माझ्या वाट्याला आलेले अाहे, इतका मी भाग्यहीन करंट झालो आहे काय? माझ्या नशिबी देवही नाही आणि संसार ही नाही त्यामुळे मला दोन्ही ठिकाणी आधार राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःच्या शेतीत पीकही येऊ नये आणि गावात भीकही मागू नये अशी माझी स्थिती झाली आहे.


अभंग क्र.१२९६
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥
काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥

अर्थ

एकदा ला पैसे देऊन फक्त रडवयास सांगितले तर तशी कृती करताना त्याच्या डोळ्यात अश्रू नसतात आणि माया ही नसते कारण त्याला पैसे देऊन राडावण्यास सांगितले असते. तसे अंतकरणात हरी विषयी काहीच प्रेम नाही आणि हरिभक्ती ही नाही आणि हरिकथा करण्यास तो बसलेला आहे त्याचे असे असणे म्हणजे जसे बेडग्याच्या रंगाप्रमाणे फक्त वरती वरती सुंदर असणे असेच असल्याप्रमाणे आहे. एखाद्या मनुष्याला बळेच काम करण्यास सांगावे आणि ते काम झाल्यावर त्याने लगेच मागे पळून जावे, त्याप्रमाणे ढोंगी हरिभक्त असतात. तुकाराम महाराज म्हणतात काजव्याच्या ज्योतीने दिवा पेटत नाही, त्याप्रमाणे खोटी हरिभक्ती केल्याने ज्ञान प्राप्त होत नाही.


अभंग क्र.१२९७
तरि च जन्मा यावें । दास विठोबाचें व्हावें ॥१॥
नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥
जन्मल्याचे तें फळ। अंगीं लागों नेदी मळ ॥२॥
तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥

अर्थ

विठोबाचे दास व्हायचे असेल तरच जन्माला यावे. नाहीतर श्वान म्हणजे कुत्रे आणि सुकरे हे जन्माला थोडे आहेत की काय? अंगाला त्रिविध गुणांचे मळ लागू न देणे हेच खरे मनुष्य जन्माचे फळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्यजन्मात असे संत सज्जन चांगले आहेत की ज्यांचे नाव घेतले तर आपल्यालाही मोठे पणा प्राप्त होतो.


अभंग क्र.१२९८
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥
किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥
करवितां कलह जिवाचिये साठी । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥२॥
तुका म्हणे धीर कारण आपुला । तुह्मीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥

अर्थ

देवा मला माझा परमार्थाचा वाटा नीटविचार करून द्यावा. माझी काहीच तरी समजूत काढल्याने मी तुमचा पाठलाग सोडणार नाही. देवा आमची किती कट तुम्ही सहन करता हे काही कळत नाही. पण त्यामुळे आम्हीच एक वाईट ठरतो. आमचा जीव जाईपर्यंत तुम्ही आम्हाला भांडायला लावता ही तुमची सवय फार वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो विठ्ठला तुम्ही माये पलीकडे आहात त्यामुळे आम्हाला आमचा वाटा घेईपर्यंत धीर धरणे आमचे कर्तव्यच आहे.


अभंग क्र.१२९९
आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥
काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥
एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥
तुका म्हणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥

अर्थ

देवा आमचा गर्भवासाचे दुःख तुला माहित आहे. पूर्व कर्माचे दोष आणि भोग हे दोन्ही बलवान असल्याने आम्हाला भोगावे लागणार आहेत. तेही तुमच्या सक्तीने, देवा तुम्ही नवल परी गोष्टी निर्माण करतात आणि संभवित पणाने लोकांना भुलविता हे कसे सांगावे? देवा तुम्ही एकाला पळ म्हणता आणि दुसर्‍याच्या पाठीशी लागता आणि हे कौतुक तुम्हीच पाहता. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने हा प्रकार चेतवून दिला आहे तोच हा प्रकार बंद का नाही पडत?


अभंग क्र.१३००
निर्दयासी तुम्ही करितां दंडण । तुमचें गाऱ्हाणें कोठें द्यावें ॥१॥
भाकितों करुणा ऐकती कान । उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें ॥२॥
तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही निर्दय माणसांना दंड करता पण आता तुम्हीच निर्दय झाला आहात. मग तुमचे गाह्राने कोठे द्यावे? देवा मी तुम्हाला करुणा भाकत आहे तुम्ही तुमच्या कानाने ऐकतही आहात परंतु तुम्ही उगाचच मौन धरून का धरता? तुमच्या पायाला मिठी मारून मी तुमच्याकडे दिन पणाने पाहत आहे. करून वचन आणि मी तुम्हाला विनंती करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा विठ्ठला माझ्या मनाची गाठ उकला नुसतेच माझ्याकडे काय पाहत उभे आहात?


सार्थ तुकाराम गाथा १२०१  ते १३००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *