सार्थ तुकाराम गाथा 501 ते 600

सार्थ तुकाराम गाथा 501 ते 600

सार्थ तुकाराम गाथा 501 ते 600


अभंग क्र.501
म्हणवितों दा ते नाहीं रणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥
गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥
पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालो या डोई दंभाचिया ॥२॥
भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥३॥
तुका म्हणे वांयां गेलों ऐसा दिसें । होईल या हांसें लौकिकाचें ॥४॥

अर्थ

मी स्वतःला हरिदास म्हणून घेत आहे पण माझ्या बोलण्यात माझ्या वागण्यात व माझ्या अंतरंगात फरक आहे मी बोलतोय एक आणि वागतो एक. मी हरीचे गुणगान गातो व त्या छंदांमध्ये नसतो परंतु ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खरेतर हे नारायणा माझ्या अंगामध्ये तुझ्याविषयी प्रेमच नाही. जे खरे वर्म आहे ते वर्म व त्याचे ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे परंतु ते काही कळत तर नाहीच परंतु तुम्ही दंभाच्या डोहामध्ये मी बुडालो आहे. माझ्या हातामध्ये जे आयुष्य रुपी भांडवल होते ते काळाने हातोहात नेले व माझ्या आयुष्याला आता माप लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तर वाया गेलो आहे असेच मला दिसत आहे परंतु जगामध्ये मी हरीचा मोठा दास आहे असा जो माझा लौकिक झाला आहे त्याचे हसू होईल जर मी वायाला गेलो तर.


अभंग क्र.502
न कळे तो काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कई कासयाने ॥ध्रु.॥
साच भावें तुझें चिंतन मानसी । राहे हें करिसी कैं गा देवा ॥२॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥३॥
तुका म्हणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥

अर्थ

देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझा भक्तिभाव स्थिर रहावा असा उपाय कोणता करावा तेच मला काही कळेना. देवा तु माझ्या हृदयामध्ये येऊन वास्तव्य करशील असे केव्हा कधी आणि कोणत्या उपायाने घडेल? देवा खऱ्या भक्तिभावाने माझ्या मनामध्ये तुझेच चिंतन राहील अशी माझी स्थिती तू केव्हा करशील? देवा या संसारातील सर्व खोट्या गोष्टी माझ्यापासून तू दूर कर व माझ्या अंतरंगात येऊन राहा. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या सत्तेने माझ्यासारख्या पतीताचा सांभाळ करावा.


अभंग क्र.503
चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥
नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥
तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥३॥

अर्थ

आपण मनामध्ये जी काही गोष्टीचे चिंतन करतो ते सर्व देव जाणतो व आपल्या अंतरंगातील सर्व खुणा तो ओळखून पूर्ण करतो. असे हे पांडुरंग नावाचे दैवत आहे त्याला रात्र ही कळत नाही आणि दिवसही कळत नाही ते माझ्या अंगामध्ये सारखे खेळतच असते. परमार्थामध्ये जो कोणी परमार्थासाठी उपयुक्त असणारा नवस बोलतो त्याचे नवस हे दैवत पूर्ण करते व त्या भक्तांचे सर्व सुख दुखादी भोग हे दैवत स्वतः भोगते व त्यांच्यापासून भिन्न राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे देणे हे सारख्या प्रमाणात आहे अगदी तो जसा विटेवर त्याचे समचरण ठेवून उभा आहे अगदी तसेच.


अभंग क्र.504
उद्धाराचा संदेह नाहीं । याच्या कांहीं सेवकां ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥
बुडतां जळीं जळतां आगी । ते प्रसंगीं राखावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांसाठी । कृपा पोटीं वागवी ॥३॥

अर्थ

देव आपला उद्धार करील की,नाही याची सेवकाच्या मनात कधी शंका येत नाही.आपल्या भाक्तांबद्द्ल पांडुरंगाला अभिमान असतो.संकट काळी तो भक्ताला जीव दान देतो.पाण्यात बुडण्याच्या वेळी,अग्नीत जाळन्याच्या प्रसंगी हा भक्तांचे नेहमीच संरक्षण करत असतो.भक्त प्रल्हादाचे त्याने संरक्षण केले.तुकाराम महाराज म्हणतात हा देव,आमच्यावर देखील कृपेचा वर्षाव करत असतो.


अभंग क्र.505
काय ते विरक्ती न कळेचि आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदें या ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया ते मी काय जाणें । विठ्ठलकीर्तनें वांचूनियां ॥२॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंदे या जनामाजी असो ॥३॥
कासया उदास होऊ देहावरी । अमृतसागरीं बुडोनिया ॥४॥
तुका म्हणे मज असे हा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥

अर्थ

विरक्तीचे स्वरूप कसे असते ते आम्ही जाणत नाहि,फक्त विठोबाचे एकमात्र नाम आम्ही जाणतो.वैष्णवांच्या मेळाव्यात मी सुखाने नाचत असतो.टाळाच्या गजरात गळ्यात विणा घालून आम्ही आनंदाने रंगून जात असतो.दया,क्षमा,शांतीचे स्वरूप मुद्दाम जाणण्याचा प्रयत्न करत नाही.पांडुरंगाच्या,गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते.म्हणून त्याच्या नामसंकीर्तनावाचून आम्ही दुसरे काही जाणत नाही.वनात जाऊन मुद्दाम एकाकांतात राहण्याची गरज नाही,जना मध्ये राहून आनंदामध्ये विठ्ठलाचे नाम गात राहू.आनंदाच्या सागरात मी तरंगत आहे.तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा आमच्या बरोबर चालत असतो,असा आमचा दृढ विश्वास आहे,म्हणून आम्हाला कसलीही भीती राहिली नाही.


अभंग क्र.506
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥२॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें रानें ॥५॥

अर्थ

जेथे वैष्णवांचा वास असतो,ती भूमी व तो देश पुण्यवान आहे.त्या ठिकाणी थोडे सुद्धा दोष नाहीत,असे यमाचे दूत यमास सांगत आहे.गरुडाचे चिन्ह असलेल्या पताकांच्या भाराने आणि प्रभूनामाच्या जयजयकाराने हि भूमी दुमदुमून जात असते.तेथील लोकांना गोविंदाच्या नामस्मरणाचा सहजच छंद लागलेला असतो.खरोखरी तुळशी वृन्दावने रांगोळ्या हा सुखसोहळा म्हणजे एक सर्वप्रकारे वैकुंठाचा सोहळाच आहे.तुकाराम महाराज म्हणतात भीतीने काळ देखील याबजूस फिरकत नाही.


अभंग क्र.507
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥१॥
पडियें देहभावे पुरवी वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥

अर्थ

माझ्या विठोबाचा प्रेम भाव कसा आहे म्हणून सागू?तो देव रूपाने कृपा करतो व गुरुच देव आहे.भक्तांसाठी देह धरण करून त्यांची इच्छा पुरवतो आणि शेवटी आपणा जवळ घेऊन जातो.तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो भक्तांच्या संकटाचे निवारण करतो.भक्तांचे संकट जाणून त्यांचे योग क्षेम निवारण करतो आणि भक्तांच्या हाताला धरून भक्ती मार्गाची वाट हि दाखवितो.तुकाराम महाराज म्हणतात या वाचनावर ज्यांचा विश्वास नाही,त्यांनी पुराणातील अनेक उदाहरणे पहावीत.


अभंग क्र.508
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक ते वर्म नेणें कांहीं ॥१॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥

अर्थ

विठोबाचे नाम घेतले की,यामध्ये सर्व धर्म घडतात.देवाच्या निस्वार्थ प्रेम शिवाय मी दुसरे कोणतेही गूढ वर्म जाणत नाही.देवाने मला संतांच्या स्वाधीन केलेले दिसते,कारण तेही माझ्या वर कृपा करतात.तुकाराम महाराज म्हणतात माझा कोणता अधिकर आहे की,संतांनी त्यांचे प्रेम मला देऊन मला त्यांनी मला भक्तीचा मार्ग समजून सांगावा.


अभंग क्र.509
उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवेचि अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥
तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥

अर्थ

नाना प्रकारचे तर्क करणारे बुद्धिवंत,शहाणे लोक अनेक आहेत,परंतु विठ्ठलच्या स्वरूपाचा त्यांना अंत लागत नाही.परमार्थातील अक्षरे घोकून पाठ कारणारे आणि अभ्यासाचा त्रास घेणारे लोक अनेक आहेत,त्यांनाही विठ्ठलाची खरी थोरवी समजत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानाचे माप किती थोर असले,तरी रितेच असते.यासाठी निस्वार्थ अशी भोळी भाबडी भक्ती करून परमार्थ साधावा.


अभंग क्र.510
आधारावांचुनी । काय सांगसील काहाणी ॥१॥
ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघेंचि वाव ॥ध्रु.॥
मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रम्हज्ञान ॥२॥
तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥

अर्थ

आधाराशिवाय म्हणजे अनुभूती शिवाय कोणत्याही गप्पागोष्टी कश्या काय सागतो?जो पर्यंत पंढरीरायाचे खरे स्वरूप समजले नाही,तोपर्यंत नुसते ज्ञान संपादन करून काय उपयोग?भक्ती शिवाय कोरडे ज्ञान काय उपयोगाचे?ते कोण बरे ऐकणार?तुकाराम महाराज म्हणतात तुम्हांला विठ्ठलाचे विशाल स्वरूप जाणून घ्यायचे असेल.तर ज्ञानाचा अहंकार दूर ठेवा.


अभंग क्र.511
अनाथांची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥१॥
ऐसी ऐकोनियां कीर्ती । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥
अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥२॥
तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥३॥

अर्थ

पंढरीराया,जे भक्त अनाथ असतात,त्यांची दया तुम्हांला येत असते.अशी तुमची कीर्ती ऐकून मी फार समाधानी झालो.जे अनाथ तुमच्या नावाचा धावा करतात,त्यांच्यासाठी तुम्ही धावत जाता.त्यांचे रक्षण करता.तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला,आमचे चित्त तुमच्या चरणावर स्थिर करू त्यातच आमचे हित सामावलेले आहे.


अभंग क्र.512
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥
वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तेचि माझें थीता त्याग ॥२॥
तुका म्हणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥३॥

अर्थ

देवाने घेतलेले मत्स्य कुर्मादी अवतार राहिले नाही,तर मग इतर विषया भोगणाऱ्या जीवाची काय कथा आहे?तुम्ही विषयांमध्ये फार आसक्त होऊ नका.तुम्ही जर विषयांच्या चक्रामध्ये सापडलात,तर त्याचा शेवट काय होईल,हे काहीच सांगता येत नाही?या भवसागराचा भार तुम्ही वाहून जो त्रास करून घेता,तो विनाकारणच होईल हे.त्यामुळे तुमच्या स्वताच्या हिताचा तुमच्या हातून भंग होईल.तुकाराम महाराज म्हणतात संतानी ईश्वरची प्राप्ती करून घेतली आहे.पण तुम्हाला याचे काहीच का बरे वाटत नाही?


अभंग क्र.513
हींच त्याची पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥
हाच काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥२॥
तुका म्हणे दिवसरातीं । हेचि खाती अन्न ते ॥३॥

अर्थ

ईश्वराविषयीचे प्रेम हेच या भक्तांचे जीवनदायी अन्न आणि पंचमहाभूतात्मक शरीर असते.संतानी हरी विषयीचा कळवळ चित्तामध्ये धारण केला आहे आणि तसाच निर्धार करून त्याचा स्वीकार केला आहे.नेहमी समाधान रुपी संपत्ती जवळ बाळगणे हा त्यांचा वर्तमान काळ असतो.त्यांच्या हृदयात अखंड समाधान नांदत असते.त्यामुळे त्यांना सर्व काळ सारखाच वाटत असतो.तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्त हे रात्रंदिवस प्रभूप्रेमच्या ब्रम्ह रसाचे भोजन करत असतात.


अभंग क्र.514
दीप न देखे अंधारा । आतां जतन हेचि करा ॥१॥
नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥
चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही न येल ॥२॥
तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामग्री ॥३॥

अर्थ

दिवा जसा अंधारला कधी पाहू शकत नाही,त्या प्रमाणे नारायणरुपी प्रेमाचादिवा हाती घेतला तर संसारातील दुःख दिसू शकणार नाहि.यासाठी भक्ती प्रेमाचे धन जतन करून ठेवा.नारायणरुपी नामाचे अनमोल धन आपल्या गाठींशी बांधून ठेवा.चिंतामणी आपल्या जवळ असेल,तर कोणत्याही चिंता शिल्लक राहत नाही.तुकाराम महाराज म्हणतात उभय लोकांत हरीचे प्रेम हीच एक सर्व श्रेष्ठ सामग्री आहे.


अभंग क्र.515
धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥
संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥
तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि ॥३॥

अर्थ

संतांच्या चरणांशी मिठी पडते तो काळ फारच धन्य होय.त्यांच्या भेटीमुळे संशयाच्या सर्व गाठी सुटून जातात.त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते.संतांच्या कृपाप्रसादाने भवनदीच नाव(नौका) बनते आणि पैलीतीरी किनाऱ्यावर उतरविते.तुकाराम महाराज म्हणतात संतांच्याही पेक्षा अधिक मंगलकारक असा कोण बरे दाता आहे?


अभंग क्र.516
दिन रजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा ते ठायीं ॥ध्रु.॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥२॥
कीर्ती मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥

अर्थ

दिवस रात्र आम्ही एकच काम करतो,ते म्हणजे भगवंताच्या लीला विलासाचे गुणगान करणे.आम्ही हा देह देवाला समर्पण केला असून आमचे सर्व संकल्प देवाविषयीचे आहेत.सर्व इंद्रियांच्या वृत्ती देवाकडे वळविल्या असून या शिवाय दुसरी भावना क्षण भर देखील निर्माण होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवाची कीर्ती आम्ही गर्जना करून सांगत आहोत आणि सर्व लोकांना सावध करीत आहोत.


अभंग क्र.517
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥
कुल्लाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ती । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥
तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभाते किरणी प्रकाशाची ॥३॥

अर्थ

समर्थ संतांच्या घरी विठ्ठलरूपी जुनाट नाणे जमिनीमध्ये पुरून ठेवले होते.ते मी आधी बाहेर काढले.धान्य मालकाचेच असते,मजुराच्या हाताने त्याचे माप होत असते.त्या प्रमाणे विठ्ठलरूपी ठेवा उघड करणारा मी मजूर आहे व खरी सत्ता त्याचीच आहे.कुंभार स्वतःच्या हाताने घटाची निर्मिती करतो पण योग्यते नुसार पाकशाळेत दुसराच कोणीतरी पाठवीत असतो.त्या प्रमाणे ज्ञान ठेवा उघड करून सांगण्यासाठी संतानी मला आज्ञा केली.त्या आज्ञे प्रमाणे मी कार्य करीत आहे.तुकाराम महाराज म्हणतात सूर्यकिरणातच प्रकाश असतो,तसेच आमचे जीवन नारायणाने व्यापले आहे.


अभंग क्र.518
गंगेचिया अंतेविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी येर कोण ॥२॥
बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥३॥
गाऊं नाचू करूं आनंदसोहळा । भावचि वेगळा नाहीं आतां ॥४॥
तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥

अर्थ

ज्याला तहान लागलेली आहे त्याने शांत चित्ताने गंगेचे पाणी प्यावे गंगेचे पाणी किती खोल असेल अश्या निरर्थक चौकशी करत बसू नये.त्या प्रमाणे बाह्य गोष्टींचा फार विचार न करता विठ्ठलाची साजिरी गोजिरी मनमोहक मूर्ती हृदय मंदिरात स्थिर करावी.लोणी हे सार असे नवनीत असते त्याच्याशी आपला संबंध.इतर गबाळ्या गोष्टींचा विचार करू नये.बाळाच्या सोई साठी आई त्याला घास भरवित असते बाळाला मात्र कसली चिंता किंवा खटाटोप करण्याची जरुरी नसते.त्या प्रमाणे आम्ही या विठ्ठलाच्या प्रेमात नाचु गाऊ व आंनदाने सुखाचा सोहळा संपन्न करू.या खेरीज आमच्या मनात दुसरा कोणताही भाव नसतो.तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे सारे जीवनच ईश्वर मय झाल्यामुळे आम्हाला आता परलोकाची अपेक्षा राहिली नाही.


अभंग क्र.519
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥
आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥
येउनियां आड ठाके लोकलाज । तों हें दिसे काज अंतरलें ॥२॥
तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥३॥

अर्थ

स्त्री व पुत्र यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे आणि विषयाच्या अतिशय मी भरीस पडलो आहे. हे नारायणा आता मला सोडवण्यासाठी तुम्ही धाव घ्या वासना मला आता अनावर झाले आहे. जर लोकलज्जा आडवे येऊ लागेल तर परमार्थ कार्य माझ्यापासून अंतरेल असेच मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही जिथे जिथे बंधनात गुंतण्याची शक्यता आहे तेथे तुम्ही आमचे रक्षण करा आम्हाला तुम्ही सांभाळा.


अभंग क्र.520
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥
होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥
इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥२॥
तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥३॥

अर्थ

मी संसार रुपी कठीण कोपऱ्यात सापडलो होतो त्यामुळे मला फार चिंता लागली होती.माझा मार्ग चुकला होता मी संसाराला खरे मानत होतो.आता मात्र परमार्थाचा त्वरित लाभ करून घेतला आहे.इंद्रियाच्या पेचात सापडलो होतो.मी चांगलाच बंदिवासात फसत होतो. तुकाराम महाराज म्हणतात पण बरे झाले माझ्या मुखातून प्रेम स्वरूप विठ्ठलाचे नाव प्रगट होऊ लागले त्यामुळे सर्व प्रकारची चिंता नाहीशी झाली.


अभंग क्र.521
बरें झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†न्हेरा ओढाळांचा ॥१॥
बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥
त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग घ्यावा लागे ॥२॥
नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥३॥
वेगळाल्या खोडी केली तडातोडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥४॥
निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥५॥

अर्थ

देवा फार बरे झाले आपल्या स्थाना वरून बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना तू आत मध्ये आपल्या स्थानावर स्थिर केले.त्यामुळे ओढाळ इंद्रिये माझ्या ताब्यात आली इंद्रियांना आपल्या ताब्यात घेतांना मला फार दुख झाले परंतु आतामात्र त्या बद्दल असणाऱ्या लाभाचे अथवा लोभाचे तोंड काळे झाले.इंद्रियांनी काही अन्याय केला तर त्याची फळे माझ्या शरीराला भोगावी लागत होती.इंद्रिये सारखी बाहेर धावत असल्या मुळे मला क्षण भर देखील स्थिर राहू दिले नाही.इंद्रियाच्या नादाने आज पर्यंत मला फारच शीण झाला.या इंद्रियांच्या बेताल वागण्या मुळे माझी व ईश्वराची ताटातूट झाली.सांगण्या सारखे सुख त्यांनी मला एक क्षणभर देखील दिले नाही.मी हि इंद्रिय रुपी ओढाळ गुरे देवाला अर्पण केली आहे.आणि सांभाळावयास सांगितली आहे.त्यामुळे मी सर्व दुखातून पार झालो आहे.तुकाराम महाराज म्हणतात मंगलमय परमार्थाच्या वाटेवरुन चाललो आहे.


अभंग क्र.522
न करावी आतां पोटासाठी चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥
दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥
येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥२॥
खंडणेंचि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥३॥
शेवटा पाववी नावेचें बैसणे । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥४॥
तुका म्हणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥

अर्थ

आता पोटा पाण्याची चिंता करणे जरुरी नाही.संचिता मध्ये जे अन्न असेल ते सुखाने खाऊ.आपली दृष्टी परमार्थात रममाण करावि.सामान्य गोष्टीचा उपायांचा त्रास का बरे करून घ्यावा?प्रपंचातील कोणतीही गोष्ट शेवटी घेऊन जाता येत नाही.खोट्या भ्रममय गोष्टींच्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती का बरे खर्च करावी आपण कितीही चिंता केली,तरी जन्म मृत्यू चक्र थांबणार नाही.आम्ही संसारातील अश्या शाश्वत,नाशवंत गोष्टीत गुरफडून दिन झालो आहोत.नावे मध्ये बसलो तर सहज पलीकडे जातो.तर मग हाताने पोहून जाण्याचे कष्ट का करायचे?तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या नौकेत बसून भवसागर पार करावा सर्व साधनाचे सार जे नाम,त्याचे देणे घेणे करावे.


अभंग क्र.523
आमुच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥
धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥
आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥
तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥

अर्थ

सर्व विश्वाचे जे जीवन,विठ्ठल तो आमुच्या वाट्याला आला आहे.याच्या ठिकाणी बळकट भावाने मी सर्व वृत्ती स्थिर केल्या आहे.या निर्गुणरूप देवाच्या सगुण रुपास जाणले आहे.तुकाराम महाराज म्हणतात निस्वार्थ प्रेमाने त्यांना आधीन केले आणि भक्ती प्रेमात रंगण्या साठी तो पृथ्वीवर पंढरपुरात आला आहे.


अभंग क्र.524
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥
संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांठविलें ॥ध्रु.॥
घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदैवां दुर्बळा भाव तैसा ॥२॥
फडा आलिया तो न वजे निरास । जरि कांहीं त्यास न कळतां ॥३॥
तुका म्हणे आतां झालीसे निश्चिंती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥४॥

अर्थ

पांडुरंगाच्या रूपाने खरे भांडवल आमच्या हाती आले.त्यामुळे जीवन रुपी व्यापारात आता कोणत्याही प्रकारची तुट होणार नाही.हरी नाम रुपी अतिशय स्वस्त असा माल आम्हाला सापडला आहे आणि आम्ही तो वैखरी वाणीत भरून ठेवला आहे.या हरीनाम रुप मालाच्या देण्या घेण्याच्या व्यवहारात सर्वांना निश्चित लाभ होतो.तो सुदैवी असो वा दुर्बल असो त्यांना त्यांच्या भावनाप्रमाणे हा लाभ प्राप्त होत असतो.एकदा कि मनुष्य वैष्णवांच्या संन्निधात,फडात आला, म्हणजे तो कधीही निराश होत नाही.मग तो अज्ञानी असो वा ज्ञानी असो. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही निःश्चिंत झालो आहे.या विठ्ठलरूपी शाश्वत भांडवलाखेरीज आमच्या चित्तात दुसरा विषय नाही.


अभंग क्र.525
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥
रुंधवूनि ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ध्रु.॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देही संतोष ॥२॥
तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥३॥
 अर्थ 

माझे जीवन हरीला पदोपदी दिल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे.जेवढी म्हणून रिकामी जागा होती,म्हणजे पृथ्वी,आकाश,पाताळ ती सर्व व्यापून मी राहिलो आहे.मनाचे सर्व व्यवहार आनंदाने होत आहेत.संतोषामुळे, देह पुष्ट बनत आहे.तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या क्षर व अक्षर याउपाणी पैकी मी क्षर रुप जगाच्या आत,बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे.


अभंग क्र.526
निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीते ॥१॥
आतां पुढें भाव सार । जीवना थोर पाहावया ॥ध्रु.॥
पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥२॥
तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥

अर्थ

आता आम्ही हरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे.ज्याचा त्यांनी आपल्या संचीताप्रमाने समाधानाने लाभ घ्यावा.आता या पुढे जीवनाला काही भक्कम आधर शोधायचा असेल,तर हरीनामावर विश्वास ठेवणे,हाच ऐक मार्ग आहे.जे कोणी पारीख करणारे डोळस लोक असतील,त्यांच्या हाती हरिनामाचे नवनीत पडेल आणि जे देहाला सर्वस्व मानणारे आंधळे लोक असतील,ते उगाच चाचपडत राहतील.तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी त्याचे अंतःकरण पूर्वक सेवन करील,त्यांना हा लाभ निश्चित होईल.


अभंग क्र.527

उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥
आपण जाऊन न्यावे नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥
अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाठीं ॥२॥
तुका म्हणे आम्हीं तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥

अर्थ

जे इंद्रियाच्या ओढीमुळे त्याच्या पूर्ण पणे आहारी गेलेले असतात,त्यांना योग्य काय व अयोग्य काय,हे कळत नाही.आपल्या गुरूजवळ जे शिकलेले असतात,त्याची ते व्यर्थ बडबड करत असतात.तो स्वतःतर नरकाला जातोच,पण त्याच्या बरोबर पूर्वजांची बेचाळीस कुळे नरकात नेतो.ते डोळे झाकून बसतात,पण त्यात दांभिकपणा त्यांच्या अंगी भरलेला असतो.ब्रम्ह कळले असा आव आणून विषया विषयी ते शाब्दिक बडबड करत असतात .तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याची उत्तम तऱ्हेने पारख करतो.जो दुसर्‍याचे पाहू ढोंगाने नाचतो,त्याचे खरे स्वरूप काय आहे,हे आम्हास चांगलेच समजते.


अभंग क्र.528
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येईल कैसें ॥१॥
म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥
आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरीच कारण साध्य होय ॥२॥
तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥३॥

अर्थ

तुझे मन विविध व्यवहाराकडे कसे बरे वाटून घेता येईल?तू आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन कर.तू आपल्या मनात पांडूरंगाचे दृढ चिंतन कर.याशिवाय इतर कोणत्याही संकल्पामध्ये तू आपल्या मनाला गुंतवून ठेऊ नकोस.असे केलेस तर जीवनाचे ध्येय जे परमार्थ, ते तुला साध्य होईल.तुकाराम महाराज म्हणतात असे उचित जे आहे,ते तू जाणावे.त्यामुळे आत्मस्थिती कशी असते,हे आपोआप समजून येते.


अभंग क्र.529
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥
हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥

अर्थ

आपण हरीचे गुणगान गातो,ते स्वरूप चित्तात धरून ठेवावे.त्याच्या अर्थाकडे लक्ष द्यावे.पण हेच काम फार कठीण आहे.नुसते अन्न पाहून माणसाची भूक कधी भागेल काय?हरीची कथा श्रवण केल्यावर ती हृदयपटलावर तशीच कोरून ठेवायची आहे,हे लक्षात घ्यावे.तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक्ष भोजन केल्या शिवाय तृप्ती होत नाहि,त्याप्रमाणे अंतःकरणापासून हरीचे नाम घेतल्याशिवाय खरे समाधान लागत नाही.


अभंग क्र.530
कळेल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥
सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥
अणुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥२॥
इंद्रियांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥
तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥४॥
तुका म्हणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥५॥

अर्थ

ज्यावेळेला नारायण आपल्यावर कृपा करेल,त्यावेळी जीवनाचे खरे मर्म कळू शकेल.संतांच्या चरणकमलाजवळ खरे सत्य असते.आणि ते इतर लोक भय बाळगून असतात.या भगवंताचे स्वरूप अणु एवढे असून त्यात सर्वत्र दिव्य प्रकाश भरू राहिला आहे.जो इंद्रियांवरती ताबा ठेवतो त्याला जीवनाचे हे वर्म योग्य प्रकारे कळते.जे अनेक प्रकारचे तर्क,वितर्क करतात आणि घटपटादिकांची व्यर्थ चर्चा करतात.त्यांना खऱ्या परमार्थाची ओळख होत नाही त्याची हानी होते.तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये विवेकाचे अंजन योग्य प्रकारे घालावे.म्हणजे सर्वत्र सम प्रमाणात भरलेल्या भगवंताचे दर्शन होते.


अभंग क्र.531
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा जालासे बेशरम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥
पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥२॥
बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥
नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥
अझुन तरि मुका । कां रे जालासि म्हणे तुका ॥५॥

अर्थ

एकदा कि माणसाचा जीव गेला की,तो परत येत नाही.तरी देखील मृत्युच्या मार्गाला लागलेला करंटा मनुष्य आपल्या मालमत्येची सोय कशी करावी,इकडे लक्ष देत असतो.आपल्या पश्चात संपत्तीची व्यवस्था कशी करावि, हे पत्नी,मुलांना समजू सांगत असतो.त्या मृत्यु पंथाला लागलेला मनुष्य निर्लज्ज पणामुळे शेवटी देखील राम नामाचा उच्चार कर नाही.हा आपल्या शत्रूंकडे डोळे वटारून पाहतो आणि प्रेमी जणाकडे पाहून आश्रू ढळत असतो.सर्व नातेवाईकांनी त्याला यमाच्या हाती दिले, तरी त्याला काही खेद नसतो.जो अंत काळी देखील प्रेमाने प्रभूचे नामस्मरण करत नाही तो अधम आहे असे जाणावे.तुकाराम महाराज म्हणतात मृत्यूजवळ आला तरी देखील आजून का बरे मुका राहिला आहेस?प्रभूचे अमृतमधुर नाम का बरे घेत नाहीस?


अभंग क्र.531
वांटा घेई लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥१॥
ऐसीं भांबावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥
नाहीं सरलें तोंवरी । धांव घेई वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥२॥
फट लंडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥

अर्थ

परमार्थाचा मार्ग तू निट समजून घे.त्या मार्ग वरून चालत राहा,नाही तर देवाला अंतरशील.सारी खटपट तू करणार आणि त्याचे श्रेय दुसरे घेवून जाणार .असे होऊ देऊ नकोस.अशा प्रपंच्याच्या भ्रमात किती जन भांबावले,हे काही कळत नाही.प्रपंचाचा भार डोक्यावर घेवून जगत असतात.जीवनाचा सदउपयोग करीत नाही.जो पर्यंत आयुष्य संपलेले नाही,तोपर्यंत त्वरेने धाव घेउन आपणास जे काही संतान कडून प्राप्त होईल ते पदरात घे आणि त्यातच खरे हित आहे.तुकाराम महाराज म्हणतात अरे अज्ञानी मानवा तुला विवेक वैराग्याचा एक धक्का सहन होत नाही तर मग,हरी प्रेमातून मिळणारे शाश्वत प्रेम सुख तुला कसे बरे प्राप्त होईल?


अभंग क्र.533
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसें पायां । भावचि तें जाया वाट नव्हे ॥ध्रु.॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥

अर्थ

अशा मार्गाने जावा की,तो मार्ग आपणास जेथे पोहचावयाचे आहे,तेथे बरोबर घेवून जातो.एकदा कि आपण तेथे पोहचलो,कि मग पूर्वीच्या ऐकलेल्या वाट व्यर्थ होतात.मी पाया पडून तुम्हाला सांगत आहे,ते एकाग्रतेने श्रवण करा.परमेश्वरा जवळ जाण्यासाठी अंतःकरणात शुद्ध,निस्वार्थ प्रेम हेच महत्वाचे आहे.प्रसुतीच्या वेदना बाळंतबाईस माहित असतात.त्या कुमारीकेस सांगता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ईश्वराचा अनुभव येण्यासाठी हृदय शुद्ध झाले पाहिजे सूर्‍या समोर ढग आले कि सूर्य दिसत नाही,त्या प्रमाणे अंतरंगात संकल्प विकल्प निर्माण झाले,तर आत्म सूर्य दिसत नाही.सर्व प्प्रकाचा शंका नाहीसाया झाल्या कि,स्वच्छ स्वरुपात आत्म सूर्य पूर्ण प्रकाशाने दिसू लागतो.


अभंग क्र.534
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांव ॥ध्रु.॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥

अर्थ

वारा आल्या नंतर झाड लवत नाही का? नास्तिक लोकांचे नम्र होणे हे एक प्रकारचे सोंगच आहे व तोच मनुष्य जर म्हणला की मी समाधी अवस्थेम देहाला विसरतो तर ते मला न पटण्या सरखेच आहे, वेडा मनुष्य देहभाव विसरत नाही काय.ज्या कोणाला परमार्थाचा उपदेश रूचत नाही,त्या व्यक्तीला अविचारी,अज्ञानी असे म्हणतात.दगड बोलत नाही कारण तो जड असतो.तुकाराम महाराज म्हणतात टणक दान शिजत नाही, अज्ञानी माणूस परमार्थाच्या बाबतीती तो अज्ञानी तसाच असतो.


अभंग क्र.535
देखीचा दिमाख शिंकोनियां दावी । हि†ऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥
मर्‍यादा ते जाणे अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥ध्रु.॥
काय पडिलासें लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥
तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥३॥

अर्थ

दुसर्‍याचे पाहून शिकुन आपण मोठे पणा दाखविला,तर तो काही खरा नव्हे.गारगोट्या हिऱ्यासारख्याकशा होतील?महाराज म्हणतात हे अभागी माणसा,आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे समजणे योग्य नाहि,कारण सर्वां मध्ये एकच चैतन्य मूर्ती आहे हे तू जाणून घे.खोट्या मोठ्यापाण च्या भरीला काय पडलास?हा मोठे पाणाचा गर्व तू दूर कर .तुकाराम महाराज म्हणतात पुढे तुझा घात होणार आहे हे मनला माहित आहे,म्हणून मी तुझी निंदा करून मी तुला परमार्थाचा मार्ग दाखवीत आहे.


अभंग क्र.536
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥
भिक्षा आणि वेवसाव । काला करितो गाढव ॥२॥
करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥३॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥४॥
तुका म्हणे होई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥

अर्थ

कोणताही मनुष्य असो तो असेपर्यंतच संसाराचा भार आपल्या माथ्यावर घेत आसतो तो बाजूला ठेवत नाही.आणि भक्तीची जाती तर अशी आहे की तिच्यासाठी सर्वकाही मुकावे लागते.भिक्षा आणि व्यवसाय हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि जो कोणी या दोघांचा काला करेल तो गाढवच आहे असे समजावे.स्वतःच्या फायद्याकरता भर बाजारात वस्ती करुन राहतो आणि मग मी निस्पृह आहे असा टेंभा का मिरवतोस?एखाद्या प्रासादिक कवीच्या कवितेतील शब्द चोरून आपल्या कवितेमध्ये टाकतो आणि नंतर मी कवित्व केले असे सांगतो खरे तर तो कवी तूप आणि पाणी एकत्र करावेत असे करतो.तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच तर तू एकदा शूर शिपाई तरी हो किंवा एखादा कष्टाळू मजूर तरी हो.


अभंग क्र.537
तेज्या इशारती । तट्टा फोकावरी घेती ॥१॥
काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥
नव्हे भांडखोर । धरूं ओढूनि पदर ॥२॥
तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥३॥

अर्थ

जे जातीवंत घोडे असतात त्यांना मालकाने नुसता इशारा जरी केला तरी ते धावत सुटतात.पण जे तट्टू असतात त्यांना कितीही मारले तरी ते जागचा हलतही नाहीत.पण तुम्हाला काय सांगू तुम्ही तर त्या तट्टू तो पेक्षा हि अगदी खालच्या पातळीचे आहात अहो मी तुम्हाला जे काही सांगत आहे तुमच्या हिताकरिता च सांगत आहे मी जे काही सांगेन ते तुम्ही तुमच्या मनी धरा.अरे मी काही बंडखोर नाही की तुमचा पदर धरवा आणि तुमच्याशी भांडत राहावे.तुकाराम महाराज म्हणतात आणि तुम्हाला जर माझे ऐकायचे नसेलच तर मग तोंड खाली करुन इथून चालते व्हा तुमचे तोंड काळे करा.


अभंग क्र.538
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कली । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥
तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥४॥

अर्थ

मागे संतानी जे जे काही सांगितले आहे,ते आता प्रत्येक्ष अनुभवला येऊ लागले.कलियुगात लोक सदाचारी न बनता दुराचारी बनतील.पुण्य कमी होऊन पाप वाढत जाईल.चांगल्या वाईटाचा कोणी विचार करणार नाही.सर्वजण एकत्र येऊन दुराचारी बनतील.एका ठिकाणी मिळून सर्व गोंधळ घालतील.वेद पठण करणारे मद्य पदार्थांचे सेवन करतील.चांगला वाईट विचार न करता भांडतील.तुकाराम महाराज म्हणतात त्यांची किती जरी फजिती केली,तरी त्यांचे दुराचारी छंद नित्याने वाढत जातील.


अभंग क्र.539
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरवुनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पिक खरें आलें तई ॥२॥
तुका म्हणे हा गे देव । पुढें भाव सारावा ॥३॥

अर्थ

मी वेद अक्षरांचे पाठांतर करून श्रम केले,म्हणून मला आता त्याचे चांगले फळ मिळत आहे.”मी” म्हणजे शरीराचा भवाच उरला नाही.सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अत्यंत विनम्र झालो आहे.वृक्षाला ज्यादा फळे आली,की तो खाली वाकतो म्हणजे नम्र होतो.त्यावरून त्याला पुष्कळ फळे आली आहेत,असे समजावे.तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या पुढेही आपण असाच नम्र भाव अर्पण करावा.


अभंग क्र.540
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥
न घालावी धांव मनाचिये ओढी । वचनी आवडी संताचिये ॥२॥
अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥

अर्थ

आपण आपले चित्त शुध्द करावे.बुद्धी परमेश्वराच्या चरणकामालांशी स्थिर करावी.हे धर्माचे वर्म योग्य प्रकारे जाणून घ्यावे.केवळ मनाच्या ओढीने धावत सुटू नये.संतांच्या वाचनाचा आवडीने अभ्यास करावा.तुकाराम महाराज म्हणतात संताचा विश्वास हृदयात स्थिर झाला,की मग त्याला वेगळा उपदेश करावा लागणार नाही.


अभंग क्र.541
जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥
बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघेचि तेणें विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणें आपुलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥

अर्थ

एखादा मनुष्य,परमज्ञानी बनला,तरी देखील त्याने दुर्जनाची संगती कधी करू नये.अन्न पुष्कळ असले,तरी मोहरी एवढ्या विषाने सुद्धा त्या सर्व अन्नात विष पसरले जाते.तुकाराम महाराज म्हणतात ज्या मध्ये आपले खरे हित आहे,अशा नीतीने वागावे.


अभंग क्र.542
द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनियां हेचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥
तुका म्हणे हेचि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥

अर्थ

आम्ही द्रव्याचा(पैसे,धन)याचा विटाळ मानलेला आहे.कारण या द्रव्याच्या मागे काळ लागलेला असतो.आता द्रव्या पेक्षा नारायण रुपी धनाचा विचार केलेला आहे.नारायणाचे नाम हेच माझे जीवन झाले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि आम्ही नारायण रुपी धन हे हृदयात जतन करून ठेवले आहे.आणि हेच धन आम्ही याचकाला देत आहोत.


अभंग क्र.543
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥
आजिच्या प्रसंगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥
प्रारब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥
तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥

अर्थ

धनाच्या मागे काळ लागलेला असतो.धनाचि संगत हि खरोखर खोटी आहे. धन कितीही मिळविले तरी समाधान नाही.धनाचा अति लोभ हे नरकाचे मुळ आहे.त्याच त्याग करून मी आता अक्षयरूप हरी कथा सांगत आहे.आज या भगवंताच्या लीलाविलासाच्या कथेचा लाभ घ्या आणि प्रपंचाचा भार भगवंताच्या चरणावर अर्पण करा.तो तुमचा योगक्षेम सांभाळील.आपल्या प्रारब्धात असेल ते काही बदलत नाही.त्यामुळे धनाची एकसारखी लालसा व्यर्थ आहे.तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचे नाम श्रवण करून तेच धन जतन करा व तेच धन आपल्या जवळ राहणार आहे.


अभंग क्र.544
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपत्तीसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥

अर्थ

अलंकार चांगले असेल आणि परीधन करणारा मनुष्य निस्तेज असेल,तर तो चांगला दिसत नाही कारण तो मनुष्य अलंकार परिधान करण्यास सुशोभित नाही म्हणून.हे कृपेच्या सागरा पांडुरंगा ,जगा मध्ये एकवाचून एक शोभत नाही म्हणजे उत्कृष्ट दिसण्यासाठी दोन्ही गोष्टी योग्यतेच्या लागतात. ज्याला स्वयंपाकच जमत नाही त्यांच्या पुढे स्वयंपाक बनवण्याची सामग्री ठेऊन वाया जाईल.तुकाराम महाराज म्हणतात शेळीच्या गळ्यात चिंतामणी बांधला तर तिला त्याचा काय उपयोग.


अभंग क्र.545
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोगें कळों येती मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥
तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥

अर्थ

दुःख डोगरा एवढे आहे हे माहित असून हि लोक आपल्या हिताचा विचार का करत बरे करत नाही देवाच्या नामाचा घोष का करत नाही?या जन्मात आपल्याला जे सुःख दुःख भोगावे लागते त्यावरून मागील जन्म उत्तम,मध्यम,कनिष्ट कोणता होता हे समजून येते.तुकाराम महाराज म्हणतात वर्तमान काळात जर आपण चांगले वागण्या बद्दल डोळे झाक केली,तर आपणास त्याचे प्रायश्चित्त हे भोगावे लागेल आणि त्यावेळी आपल्या वागण्याची चूक कळून येईल.


अभंग क्र.546
सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखावया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळ ॥२॥
घरा आंगी लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥३॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥

अर्थ

तुमचे भाग्य आहे की,तुम्हाला सदैव भागवंताचे भजन करण्यासाठी टाळ्या वाजविण्यासाठी हात दिले आहे,स्न्मार्गावरून चालण्यासाठी पाय दिले आहे.भगवंताचे नाम घेण्यासाठी मुखी वाणी दिली,कीर्ती ऐकण्यासाठी कान दिले,विश्वात भरलेल्या भगवंताला पाहण्यासाठी डोळे दिले.परंतु किती तरी लोक आंधळे,बाहीर,मुके,पांगळे आहेत कि, यांना भगवंताची सेवा करता येत नाही म्हणून भवसागरात फसले गेले आहे.स्वतःच्या घराला आग लावून तो जर स्वतःच घरात बसला तर तो कसा बरे वाचू शकेल?तुकाराम महाराज म्हणतात आता तरी जागे व्हा आपले खरे हित कशात आहे ते जाणून घ्या.


अभंग क्र.547
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥

अर्थ

अनमोल असा उत्तम नर देह लाभलेला आहे.पुढे तोच जन्म लाभेल याची काहीच शाश्वती नाही.म्हणून नर देहाचे सार्थक करण्यासाठी थोडाही वेळ रिकामा न घालता हरीचे आवडीने नाम घ्यावे.संचित आणि प्रारब्ध हे फारच गाढे(बलवान) असते.आणि आपल्या क्रियमाण कर्माची गती सदैव पुढे वाटचाल करीत असते.तुकाराम महाराज म्हणतात आत्ताच सावध व्हा आणि प्रेमाने हरी भजन करा.नाही तर पुढे जन्म घुबडाचे किंवा डुकराचे मिळेल.


अभंग क्र.548
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडू एक ॥१॥
संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥

अर्थ

लौकीक व संसारिक गोष्टी विषयी माझा जीव त्रासून गेला आहे.त्रास होईल अश्या भवसंसारातील कोणत्याही प्रकारची गोष्ट मला सहन होत नाही.कोणी मला आपले म्हणले तरी मला सहन होत नाही देहाला सुखी करण्या संबंधी कोणी काही बोलले,तर मला ते आवडत नाही.इंद्रिय सुख हे तर मला विषा प्रमाणे वाटते त्याचे मोठे दडपण माझ्या मनावर आहे.कोणी माझा गौरव केला उपाधी दिली,माझी प्रतिष्ठा वर्णन केली तरी त्या स्तुतीने माझा जीव कासावीस होतो.तुकाराम महाराज म्हणतात मला आता नाशवंत प्रपंचातील खोटे पणाच्या गोष्टी आवडत नाही,सहन होत नाही वैष्णावांचे चरण वंदावेत,एवढेच आवडते.


अभंग क्र.549
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥
भिन्न भेद हे भावना स्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥
तरि भलें आतां न करावा संग । दुःखाचे प्रसंग तोडावया ॥३॥
तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हेचि धणी ॥४॥

अर्थ

भगवंताच्या प्रेम भक्ती शिवाय आता माझ्या कडे दुसरे काहीच बोलावायास नाहि.भिन्न भिन्न भेद भावने प्रमाणे स्वभाव वेगवेगळे असले,तरी देव हा सर्व विविधतेमध्ये एक्तात्वाने भरलेला आहे.गुण व दोषांची निवड कोणत्या धर्मा वरून करावी?कर्म व अकर्म यांची देखील निवड कशी करावी?यांना कशा तऱ्हेने जाणावे?आता कोणाचीच संगती धरू नये.यातच आपले भले आहे.त्यामुळे दुखाचे प्रसंग तुटले जातात.तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी या देवाचेच गुणगाण गात राहील यातच माझे समाधान आहे.


अभंग क्र.550
आपुला विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लागे ॥३॥
तुका म्हणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥४॥

अर्थ

मी माझ्या जीवाला विचारून परमार्थाचा विचार करीन.लोकांना विचारून त्याचा काय उपयोग.आपल्या हिताच विचार प्रत्येक मनुष्य जाणतो.त्यांना त्यांच्या कर्मा पासून परावृत्त केले तर त्यांना दुख होते.कोणी माझी कथा प्रेमाने ऐकोत अथवा नाईको किंवा घरी सुखाने झोपी जावोत, परमार्थाचे मी तरी अगदी शेवटचे टोक कुठे गाठले आहे.की,ते पाहून माणसे परमार्थाच्या मार्गाला लागतील.तुकाराम महाराज म्हणतात मी आपली देवाची करूणा भाकेल जशी ज्याची वासना आहे तशी त्याला तो फळ देईल.


अभंग क्र. 551
ध्याई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥
अपुलाल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥
साधनाची सिद्धी । मौन करा स्थिर बुद्धी ॥४॥
तुका म्हणे वादें । वांयां गेली ब्रम्हवृंदें ॥५॥

अर्थ

हृदयातील(अंतरातील)हरीचे ध्यान करा.मुखाने व्यर्थ बडबड करण्यात काय अर्थ आहे.हरीचे सतचिदआनंदाची जो पर्यंत अनुभूती येत नाही,तो पर्यंत विधिनिषेधांच्या चक्रात फिरून डोक्याला फार त्रास होत असतो.अंतरंगात हरी प्रेमाची बासरी वाजवीत आहे ती जो पर्यंत ऐकू येत नाहि,तो पर्यंत हृदयाची तळमळ वाढत असते.मनुष्य आपल्याचं विचाराने भारलेला असतो,त्याच प्रमाणे वागतो.त्यामुळे त्याची प्रगती होत नाही.तो आहे त्या स्थितीत राहतो.तुम्ही मौन धारणा करा हरीचे चिंतन करा.बुद्धी स्थिर करा.यातच सर्व साधनाची सिद्धी आहे.तुकाराम महाराज म्हणतात विविध तऱ्हेचे व्यर्थ वाद करून काही ब्रम्‍हवृंद वाया गेले आहेत .


अभंग क्र.552
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥
तुका म्हणे लागे हातां । काय मंथिलें घुसिळतां ॥३॥

अर्थ

शब्दशः अर्थ करण्यात मीमांसक गुंतले आहे,ते विधीनिषेधाच्या फेरात सापडतात.सांख्यवादी आहेत ते नेहमी खंडन मंडनाच्या वादात गुंतलेले असतात.दंभाच्या संकटामध्ये बापुडे फसलेले असतात.धान्य पाखडताना धान्य टाकून दिले आणि भुसा तर वाऱ्यावर उडून गेला तर मग दोन्हीचे नुसकान.तुकाराम महाराज म्हणतात लोणी कढल्या नंतर ताक घुसळण्यात काय अर्थ आहे?


अभंग क्र.553
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥

अर्थ

मी माझ्या अभंगातून जे काही बोललो,ते पूर्वी झालेल्या महान संतानी सांगितले आहे मी जे काही बोलतोय ते संतांचे उच्छिष्ट बोल आहे.नाहीतर माझ्या सारख्या गावंढळ माणसाने काय बरे सांगावे.विठ्ठलाचे नाम मला निट घेता येत नाही.अशा स्तीतीत मला आत्मज्ञान कसे होणार?मी कौतुकाने,प्रेमाने बोलत आहे.हे माझे बोबडे बोल आहेत.तरी माझ्यावर कोणी रागावू नका.मो कोण आहे हे तुम्हाला माहित आहे ना मग या विषयी मी अधिक बोलणे योग्य नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून देवच बोलत आहे त्याचा गूढ अर्थ तोच जाणत आहे.


अभंग क्र.554
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥
साकरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्या बाळां धाकुटियां ॥२॥
तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदित जन मज ॥३॥

अर्थ

चंदनाचा सुगंध आला तर कोणी नाक धरून बसेल काय?कनक(सोने)कोणाला आवडणार नाही,असे होईल काय?साखरेची गोडी लहान अथवा मध्यम किंवा थोर वयाच्या लोकांना सारखीच असते.तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त जर शुध्द असते तर लोकांनी माझी निंदा कधीच केली नसती.


अभंग क्र.555
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥
शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥
भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्ताच्या परी नावडती ॥३॥
नवजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥

अर्थ

हे प्रभू तुझ्या सारखा उदार दाता या जगात कोण बरे आहे?तू दातृव्ताची एक मूर्ती आहेस.तू आपल्याला स्वतःचे स्थान आपल्या दासांना देत असतोस.तू आपल्या भक्तांचे कुळ शुध्द आहे की,अशुद्ध आहे,हे काही न पाहता त्याच्या निर्मळ देहात वास करत असतो.त्यांच्या घरातले साधे सुधे अन्न तू मोठ्या प्रेमाने खातोस परंतु जे अभक्त आहेत त्यांच्या घरचे मिष्टांन्न देखील तू खात नाहीस.ते तुला आवडत नाहि.प्रेमळ वैष्णवांच्या घरातून तू काही केले तरी जात नाहीस.पण अहंकाराने योग साधना करणाऱ्या साधकांकडे काही केले तरी तू येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात हरी तू भक्तावर कृपा करणारा आहेस.अशीजी ब्रीदे आहेत ती खरी आहेत.त्याचे वर्णन चारी वेद स्वमुखाने सांगतात.


अभंग क्र.556
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥
वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खाती वास रानांतरी केला ॥३॥
लावुनियां नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले मौन्यरुप ॥४॥
तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥

अर्थ

प्रपंचाच्या भोवऱ्यात रमणाऱ्या लोकां पासून पूर्वीचे ऋषी मुनी दूर राहिले, का बरे त्यांना समजत नव्हते की काय?अष्टमाहा सिद्धी ज्यांच्या चरणांजवळ होत्या ते ऋषी मुनी लोकांच्या प्रमाणे अजिबात वागत नव्हते.ते ऋषी मुनी कंद मुळे पाला खाऊन त्यांनी राना वनात निवास केला.डोळे झाकून बंद करून एका जागेवर स्थिर बसले.काहीच न बोलता त्यांनी मौन व्रत धारण केले.तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता माझ्या चित्ताला तू अगदी तसेच करावे प्रभू या लोकांपासून मला दूर ठेवावे.


अभंग क्र.557
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा ॥१॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥
कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥
तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥

अर्थ

मी आता कोणाच्या आधारे परमार्थाचा विचार करू?कोण बरे माझ्या आता जीवाला धीर देईल?मी कुठला शाश्रज्ञ पंडित नाही अथवा मोठा वाचक नाही.मी याती हीन असून मला दुसरीकडे कोणाचा आधार नाही.या कलियुगात लोक अतिशय चतुर आहेत शुध्द भावनेने तुझे भजना द्वारे तुझे गुणगान करीत असलो,तरी ते मला छळत आहेत.लोकांच्या या छळन्या मुळे मी आता भजन करू का नको,असा संभ्रम(संदेह)मला निर्माण झाला आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता या लोकांचा संग करू की,मी मरून जाऊ?


अभंग क्र.558
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥
तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥

अर्थ

हे देवा तू सर्व समर्थ,त्रिभुवनाचा स्वामी आहेस.माझ्या अंगी तरी कोणता मोठा दोष आहे?तू जर माझा स्वीकार केला नाहिस,तर संतांमध्ये मी हे स्पष्ट पणे सांगेन.देवा अरे तुझ्या शिवाय मी इतर दैवताच्या ठिकाणी रममाण झालो आहे,अशी साक्ष कोणी तुला देते का पहा.तुकाराम महाराज म्हणतात आता उगाच काय गुमान बसला आहेस?मला सर्व गोष्टी तूच समजून सांग.


अभंग क्र.559
काय करूं आन दैवतें । एकाविण पंढरीनाथें ॥१॥
सरितां मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
अनेक दीपिका प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥
तुका म्हणे नेणें दुजें । एकाविण पंढरीराजें ॥३॥

अर्थ

एका पंढरीनाथा शिवाय मला तरी इतर देवतांचा काय उपयोग?नदी सागराला मिळाली,की ती त्याच्याशी एकरूप होते.मग ती वेगळ्या नावाने कशी उरेल?सूर्योदय झाला की,अनेक दिव्याचा नाश पावतो.तुकाराम महाराज म्हणतात या विश्वात पंढरीराजाशिवाय आणिक दुसरे दैवत मी कधीच जाणत नाही.


अभंग क्र.560
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥
होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥
तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हां ओझें ॥३॥

अर्थ

कर्माकर्म करून तरी काय करू?मला विठ्ठल नामाचे वर्म सापडले आहे.देवा तूतुझ्या नावाप्रमाणेच कृती करतोस.तू अगदी प्रेमळ आहेस.तू अनेक भक्तांचे उद्धार केले आहेस याचे तुला देखील मोजमाप करता येणार नाही?तू आंनदरूप आहेस,कमी होत नाही,ज्यादाही होत नाहीस,तू आहे तसा आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझा अंगीकार केला तर तुला ओझे होईल का?


अभंग क्र.561
एकी केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥
आम्ही देवा शिक्तहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥
पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥
तुका म्हणे वीर्‍यावीर । संतधीर समुद्र ॥३॥

अर्थ

प्रेमाने बलवान असणाऱ्या संताने टाळी वाजवून ईश्वराची प्राप्ती करून घेतली,पण देवा मी शक्ती हीन आहे.म्हणून आम्ही तुमची करूणा भाकत आहोत.ज्यांच्या अंगामध्ये वैराग्याचे बळ होते,त्यांनी काळाला जिंकले.तुकाराम महाराज म्हणतात संत म्हणजे शुरांपेक्षाही शूर आहेत धैर्‍याचे महासागर आहेत.


अभंग क्र.562
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी। परवडी न लभों ॥२॥
तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥

अर्थ

साधुं संतांनी जे काही आनंदरुपी फळ प्राप्त केले त्या आनंदाची मी इच्छा करत आहे.पण माझ्या अंगी अजून बळ नाही.संत ज्या सर्वश्रेष्ठ स्थानाला जाऊन पोहचले,हे देवराया तेथे तुम्हीच मला नेऊन पोहचवा. संतांना जे काही प्राप्त झाले ते मला कबरे प्राप्त होऊ नये.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमचे कोड करा व आमचे लाड पूरवा.


अभंग क्र.563
कैवल्याच्या तुम्हां घरीं । राशी हरी उदंडा ॥१॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणी सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥

अर्थ

हरी,तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी आहेत.मग माझ्या साठी त्या गोष्टींची उणीव का बरे आहे?मला आनंदाचा वर का बरे मिळत नाहि?तू सर्वगुण संपन्न पिता असून माझ्या बाबतीत अशी उणीव का?तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या समोर माझे हृदय प्रकट केले आहे आता मला सर्व काही सांगा.


अभंग क्र.564
आपुलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
अब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥
तुका म्हणे बहु मुख या वचना । सत्याविण जाणा चाली नाहीं ॥३॥

अर्थ

आपले रूप कसे आहे,हे तुम्ही समजून घ्या.आरश्यावर रागवून काय उपयोग आहे?मी तर “देह” असा विचार केलातर सोंदर्य प्राप्त होत नाही तर,देवाने नारायणाने कृपा केली तर सोंदर्य प्राप्त होईल.एखाद्याने दुष्ट वचने बोलली त्याचे तर दुसऱ्याला दुख होते हे त्याला कळत नाही,बाण सोडणाऱ्याला ज्याला बाण लागला तो किती दुःखी झाला,हे कळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात खरे बोलण्यात सुख सामावलेले आहे.परमार्थ हा सत्यावर आधारित आहे.हे जाणावे.


अभंग क्र.565
न मनावी चिंता तुम्ही संतजनी । हिरा स्फटिकमणि केवि होय ||१||
पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांही ॥२॥
बहूतांसी भय एकाचिया दंडे । बहुत या तोंडे वचनासी ।॥३॥
तुका म्हणे नाही वैखरी बासर । करावया चार वेडे वेडे।|४॥

अर्थ

हे संतजन हो तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका कारण स्फटिक मनी कधीही हिऱ्या याप्रमाणे होत नाही तोच स्फटिकच राहतो आणि हिरा हिराच राहतो. मी प्रसंग स्थळी परकेपणाचा भाव पाहिला त्यामुळे बोलत आहे. एका दुष्टला जर खडसावले दंड केला तर त्याचे भय सर्व दुष्टांना होते आणि एकमेकांशी चर्चा करून दंड केला दंड केला असे सर्वत्र बोल ते दुष्ट लोक करून दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या तोंडून कधीही वाईट विचार बाहेर येत नाहीत वेडेचारपणा तर संतांकडून कधीही घडत नाही.( एका ठिकाणी संतांच्या वचनाला प्रतिउत्तर केले त्यामुळे तुकाराम महाराजांनी त्या दुष्ट व्यक्तीला चांगलेच खडसावले आणि संतांनी सांगितले बोल हे बरोबर आहे की संत हे कधीही चुकीचा उपदेश करत नाहीत असे अभंगातून महाराजांनी सांगितले आहे.)


अभंग क्र.566
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरी हे नाहीं ॥१॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥
मंगळ तें तुम्ही जाणां । नारायणा काय तें ॥२॥
तुका म्हणे समर्पीला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥


अभंग क्र.567
भवसिंधूचें हेंचि तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥२॥
तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥

अर्थ

देवा तुमचे चरण म्हणजे याभवसिंधु मधून तारून नेणारी नौकाच आहेत.त्यामुळे मी तुमचे चरण माझ्या हृदयात साठवून ठेवले आहे कारण सुख म्हणजे काय आहे ते सर्व काही या तुमच्या चरणामध्ये आहे.या परमार्थाच्या खुणा माझ्याजवळ आहेत आणि माझे मन तर आता हरी रसात अगदी बुडून गेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुझे चरण म्हणजे सुखाचे साधन आहे आणि आता हे वर्म माझ्या हाती लागले आहे ते बरे झाले.


अभंग क्र.568
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥
महामळें मन होतें जें गादलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥

अर्थ

या श्रीहरीचे मुख इतके सुंदर आहे इतके सुंदर आहे कि ते सुखालाही सुख देणारे आहे मी श्रीहरीचे मुख कितीही वेळा पाहिले तरीही माझ्याडोळ्यांची भूक भागत नाही.माझ्या जिभेला विठ्ठल या तीन अक्षरांचा रस फार गोड वाटतो व त्या रसा पुढे मला अमृतही पिके वाटते.मी माझ्याच श्रवणाच्या मार्गाने म्हणजे ऐकण्याच्या मार्गाने ऐकण्याची शक्ती ज्या मार्गाने असते तो मार्ग चोखाळून म्हणजे शुद्ध करून घेतलेला आहे व त्याच मार्गाने मी श्रीहरीचे गुणगान संतांच्या मुखाने ऐकत असतो व त्यामुळे माझ्या मनातील भेद व अभेद हे सर्व नष्ट झालेले आहेत.माझे मन हे महा मळाने म्हणजे अशुद्ध विचाराने मळाले होते व ते आता स्फटिकाप्रमाणे शुद्ध झालेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाचे जीवन म्हणजे तो विठ्ठल आहे व तो विठ्ठलरूपी ठेवा आता मला सापडला आहे.


अभंग क्र.569
हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां गाठी ठायीं द्वैत तुटे ॥१॥
बोलायासि मात मन निवे हर्ष चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥
तुका म्हणे तो हा विठ्ठलचि व्हावा । आणिक या जीवा चाड नाहीं ॥४॥

अर्थ

माझ्या परमानंदाय हरीला मी माझ्या दोन्ही बाहु ने मी आलिंगन देईन त्यामुळे माझ्या ठिकाणच्या द्वैताचा निरास होईल.माझ्या हरी विषयी कोणी बोलू लागले तर,माझ्या मनाला शांती मिळते.विठ्ठला विषयी माझे प्रेम द्विगुणीत होते लौकिक जीवनही धान्य होते.कारण ते विठ्ठलाच्या चिंतनेनेच भरलेले असते.लोकांनी मला भक्त म्हणून ओळखावे अशी माझी इच्छा नाही तरी कौतुक होतेच.शिवाय वैकुंठाचाहि लाभ होतो.स्वहिताचा मार्ग या भक्ती प्रमाणे आहे.या विठ्ठलच्या भक्ती मुळे मायेचा लौकिक व्यवहार असा जो संसार त्याचे रूपच पालटले.तुकाराम महाराज म्हणतात तेथे विठ्ठलाच विराजमान झाला कि अजून दुसरे मला काहीच नको आहे.


अभंग क्र.570
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणांगता ॥१॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
भूक तहान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हां करीं खेळावया ॥३॥
तुका म्हणे लावीं संताचा सांगात । तेथें न पवे हात कळीकाळाचा ॥४॥

अर्थ

तू आमुची कृपाळू आई आहेस.संसाररूपी त्रासातून त्रस्त होऊन भक्त तुला शरण येतात.त्यांच्यावर प्रेमाची साउली तू घालते.तूझ्या दोन्ही स्तना मध्ये सदासर्वदा प्रेमरूपी दुधाचा पान्हा असतो.तुझ्या दृष्टीतून स्वच्छ अमृत वाहते.तू आपल्या मुलाचे अंतःकरण जाणते.त्यांना तहान भूक, दुख होऊच देत नाही.आमच्या मनातील आशा,तृष्णा,माया,चिंता सर्व काही घालव.व मग आम्हाला तुझ्या स्वरुपात खेळावयास ठाव(जागा) दे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संतांची संगती दे.संतांच्या संगतीत काळाचे हात पोहचत नाही.


अभंग क्र.571
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥
तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥

अर्थ

जिथे जिथे आपण जाऊ तिथे प्रारब्ध आपल्याबरोबरच येत असते परंतु संतांच्या संगतीने आपल्याला एक प्रकारचा विशेष लाभ होतो. आपले जर पूर्वपुण्य अनुकूल असेल तरच आपल्याला संत संगतीचे लाभ घडतो संतांचे संगतीत खंड कधीही घडत.संतांचा वियोग करणारे बीजच उत्पन्न होणार नाही.लोकांना वाटेते की पत्नी,पुत्र,द्रव्य यांचा लाभ म्हणजे मोठे भाग्य.पण खरे भाग्य म्हणजे संतांच्या पाया पाशीच राहावे आणि त्यांची सेवा करावी.तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या पाया पाशी वतनदारी असून त्यांच्या पायापाशी जीव हि अर्पण करीन अशी भक्ती दे.


अभंग क्र.572
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हेचि दृढ ॥१॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपण इहलोका आले ॥३॥

अर्थ

आता मी कोणताही सोस हव्यास करणार नाही.फक्त विठ्ठलाचे चरण दृढ धरीन.म्हणजे संसार सागरतून पलीकडे उतरता येईल.व दुस्तर असा गर्भवास टळेल.अविनाशी परमार्थाचे धन म्हणजेच देवाचे पाय त्यास हात जोडीन.तुकाराम महाराज म्हणतात जो दूर्लभ असा मनुष्य देह आहे या मनुष्यलोकात मी आलो हा मोठाच फायदा मला प्राप्त झाला आहे.


अभंग क्र.573
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥
वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांठवूं ॥३॥

अर्थ

विठ्ठल नाम हे अतिशय दुर्लभ आहे ते मी व्यवस्तीत जतन करून ठेवीन.विठ्ठल हे धन देहाच्या अंतः काळी सुद्धा उपयोगी पडणारे धन आहे माझे परम जीवन आहे.संचित कर्म ची बाकी सर्व वर्ग बाजूला सारून विठ्ठलनामाचा उत्तम प्रकारचा व्यवहार करू.तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल रुपी धन आम्ही आमच्या छोट्याशा हृदय पेटीमध्ये साठवून ठेवू.


अभंग क्र.574
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥
होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥
एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥२॥
आला नांवा रूपा । तुका म्हणे झाला सोपा ॥३॥

अर्थ

हरी हा फार प्रचंड आहे.तरीही तो भक्तांच्या लहान अश्या हृदयात वास करतो.त्याची भक्ती आपण कशाप्रकारे करू अशाप्रकारे तो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो.संपूर्ण विश्वाचे दान देणारा एवढा महान देव भक्तांना केवळ तुळशीचे पत्र आणि पाणी मागतो.तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या भक्ती करताच देव निर्गुण अवस्थेतून सगुण रूपात आला आहे नाम व रूप त्याने धारण केले आहे.


अभंग क्र.575
भाग्यें ऐसी झाली जोडी । आतां घडी न विसंबे ॥१॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हाचि करूं कैवाड ॥२॥
तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापपुण्याच्या ॥३॥

अर्थ

माझे भाग्य आहे की मला पांडुरंगाच्या चरणाची जोड लाभली आहे.या लाभ झालेल्या क्षणाला विसंरणार नाही.विटेवर असलेले विठ्ठलाचे समचरणच ध्यानी धरावे.अशी खुण मला संतानी सांगितली आहे.आता मी सर्व इतर कामे आणि साधना बाजूला ठेवीन आणि विठोबाच्या चरणाचे चिंतन करण्याचा विचारच सतत बाळगीन.तुकाराम महाराज म्हणतात पाप आणि पुण्याच्या येरझाऱ्या आपल्याला सोसावे लागतील जन्म-मृत्यूचा त्रासही आपल्याला सोसावा लागेल तोच आता आपण नाहीसा करू.


अभंग क्र.576
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध जालें मन । विठ्ठलावांचून नेणें दुजे ॥३॥

अर्थ

पतिव्रता स्त्रीला तिचा नवराच सर्व प्रमाण असतो त्याप्रमाणेच आम्हाला नारायणा विषयी भक्तिभाव आहे.लोभी माणसाला सर्वतोपरी धनाची जवळ असते अगदी त्याप्रमाणे आम्हाला नारायणाची आवड आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझे मन आत एकविध म्हणजे एक निष्ठ झाले आहे.ते विठ्ठला वाचून दुसरे काही जाणत नाही.


अभंग क्र.577
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी । लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥

अर्थ

विठ्ठल हेच गाणे गावे,ध्यान करायचे असेल तर विठ्ठ्लाचेच करावे.तो विटेवर उभा असलेला विठ्ठल डोळ्याने पाहावा.हा विठ्ठल अनाथाचा बंधू आहे,कृपेचा सागर आहे.संसाराचे बंधन तोडतो.आणि यम पाश तोडतो.तो शरण आलेला कोणीही असो त्याला मुक्ती देतो.हा विठ्ठल संताच्या संगतीत राहतो.विठ्ठल हा सर्व सद्गुणांचा ठेवा आहे.आणि सर्व सिद्धी म्हणजे हा विठ्ठल आहे.विठ्ठलाच्या नामाने माझी समाधी लागली.तुकाराम महाराज म्हणतात मला सुख झाले आणि त्या नामाने माझ्या मुखाला देखिल गोडी लागली.


अभंग क्र.578
विठो सांपडला हातीं । ठावी झाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥
लागे आपणचि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें । उभा ठाके हाकेसी ॥२॥
बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥

अर्थ

माझ्या हाती आता विठ्ठल सापडला आहे त्याला कसे प्राप्त करून घ्यावयाचा मार्ग मला सापडला आहे.आता मी त्याचे भय धरणार नाही आणि माझ्या भक्ती बाळाचे पुढे त्याचे बळ तरी किती आहे.ते विठ्ठलाला आपण करू नका गावी मग तो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो.मग त्याच्या आवडीस येईल तसे तो आपल्या भक्तांचे काम करतो.जर आपण एकट्यानेच भक्ती केली तर खूप काळानंतर त्याची प्राप्ती आपल्याला होते.पण वैष्णवांच्या समुदाय मध्ये त्याला हाक मारल्या बरोबर लगेच येऊन उभा रहातो.तुकाराम महाराज म्हणतातहे भाविकांना प्रेमरूपी दोरीने देवाला माझ्या जीवाशी बांधून टाका.मी त्याला कधीच सोडणार नाही.विठ्ठलाची प्राप्ती होण्यासाठी मी सर्वस्व उधार करेन.


अभंग क्र.579
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥
धन्यधन्य हरीचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थवास भेटीची ॥ध्रु.॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रंदिवस । वाट कर जोडोनि ॥२॥
रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरीभक्तां । मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दर्शने ॥५॥

अर्थ

भू लोकातील भक्तजन वैकुंठामध्ये केव्हा येतील अशीच वैकुंठातील लोक वाट पाहत असतात.परंतु भक्तांच्या मनामध्ये जन्ममरणाची खंत नसते आणि वैकुंठाची किंवा परलोकाची चिंताही नसते.खरोखर हरीचे दास अतिशय धन्य आहेत कारण त्यांना जन्म-मरणाचा गर्भवास देखील सुलभ वाटतो कारण जन्माला येऊन त्यांना हरीचे नाम घेण्यास मिळते.ब्रह्मादिक देव सुद्धा वैष्णवांची देवाच्या भक्तांची असं करतात इच्छा करतात तीर्थ-क्षेत्र देखील त्यांच्या भेटीसाठी इच्छा मनात धरतात.त्यांच्या मुखाने हरी कथा श्रवण करायला मिळावी म्हणून यम धर्म देखील मोठी इच्छा धरून असतो.आणि भक्तांची रात्रंदिवस हात जोडून तो वाट पाहत असतो.हरी भक्तांना धुंडाळीत धुंडाळीत रिद्धी सिद्धी देखील न बोलताच हरिभक्तां जवळ जाते.सायुज्य मुक्तीही भक्तांची वाट पाहत असते.हरी भक्त जेथे कोठे असतात,तेथे ते हरीच्या प्रेमसुखाने नेहमी सुखी असतात.आणि आपल्या संगतीने इतर दोषी महादोषी चांडाळानाही उद्धरून नेतात.तुकाराम महाराज म्हणतात सर्वजण त्यांना भेटण्याची आशा धरतात.पण हरिदास सर्व बाबतीत उदास असतात त्यांचे दर्शन ज्या कोणालाही होते ते खरोखर धन्य आहे.


अभंग क्र.580
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे ॥१॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तोचि भिन्न भिन्न काढी ॥२॥
तुका म्हणे थीता आपणची खोटा । अपमान मोठा पावईल ॥३॥

अर्थ

तांब्याच्या एखाद्या वस्तूला वरती सोन्याचा मुलामा दिला,तर खरा सोनार त्या दोन्हीतील फरक ओळखतो.आणि दोन्हीही ते वेगवेगळे करतो.पाणी आणि दुध हे एकत्र असले तरी दोन्हीचाही स्वाद मात्र वेगवेगळा आहे आणि एखादा जाणकार मनुष्य दूध आणि पाणी हे दोन्ही एकत्र आहे हे लगेच ओळखतो.तुकाराम महाराज म्हणतात या वरून आपण असे समजावे की,जो खोटा आहे त्याचा मोठा अपमान होईल.


अभंग क्र.581
फोडूनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥
आपला घात आपणचि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥
भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपलाचि घात करूं पाहे ॥२॥
तुका म्हणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥

अर्थ

चांगल्या मार्गाने प्रगती करणाऱ्या लोकांना उपद्रव करून त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांची कशी अवस्था होते ते महाराज सांगत आहेत,पाण्यात तरण्यासाठी भोपळ्याची सांगड घेतली आणि ती जर फोडली आणि पोटावर बांधली तर नदीच्या पलीकडे कसे जाता येईल?तसे जो करील तो स्वतःचा घात स्वतःच करणारा असतो.आणि दुसऱ्याने सांगितले तरी ऐकत नाहि.भूक भागविण्या साठी एखादा जर विषाच खाऊ लागला तर तो कसा जगेल?म्हणजे तो स्वतःचाच घात करू पाहतो आहे.तुकाराम महाराज म्हणतात जे लोक सन्मार्गाने पुढे चालत असतात परमार्थात चांगली वाटत धारण करतात मोक्षाची वाटचाल करत असतात त्यांच्यामध्ये आडकाठी करणारे उपद्रव आणणारे अनेक लोक आहेत परंतु त्यामध्ये ते स्वतःच फसले जातात.


अभंग क्र.582
उपकारासाठीं केले हे उपाय । येणेंविण काय चाड आम्हां ॥१॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥

अर्थ

आम्ही जे उपाय सांगितले ते केवळ दुसऱ्यावर उपकार घडावा म्हणून आमचे त्या वाचून काय नडले होते?लोक भवसागरात बुडत आहेत ते मला देखवत नाही म्हणून त्यांचा कळवळा येतो.तुकाराम महाराज म्हणतात पण माझ्या डोळ्याने मी या भवसागरात गुंतलेले लोक भोग भोगतानी पाहणार आहे करणात भोग भोगतानाच त्यांना आम्ही केलेल्या उद्देशाची आठवण येईल मग त्यांना चांगल्याप्रकारे कळेल.


अभंग क्र.583
आठवे देव तो करावा उपाव । येर त्यजीं वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥

अर्थ

ज्या उपायाने देवाची आठवण येते तोच उपाय कर.बाकीच्या खटपटी तू टाकून दे.जागा हो रे बाबा,जागा हो रे बाबा,व्यर्थ कशाला शिन करतोस.तू ज्ञानाच्या ओझ्याने भवरूपी डोहात बुडालास तर वर निघू शकणार नाहीस.तुकाराम महाराज म्हणतात तुला जर वाटत असेल देवाची प्राप्ती व्हावी तर देवाविषयी दृढ भक्तिभाव ठेव ज्ञानी पणाच्या अहंकाराने तुला काहीही प्राप्त होणार नाही.


अभंग क्र.584
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें हे संतान द्रव्य कोणां ॥१॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तेचि साधे ॥ध्रु.॥
नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥
तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥

अर्थ

माझ्या मुखावाटे कोणाला संतती किंवा धन मिळावे हे वाचन कधीच निघू नये.कारण संपत्ती आणि संतती या गोष्टींमुळे तो मनुष्य विनाकारण पतन होऊन दुखाचा भागीदार होईल.माझ्या मनाने कधीही कोणाची निंदा किंवा स्तुती अगदी तत्परतेने कधीही ऐकू नये.तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्राप्ती होणे असाध्य होते कारण मनुष्य आशा मोह यांच्या जाळ्यात गुंतलेला असतो.


अभंग क्र.585
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचे काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥
मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥
भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥
तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥

अर्थ

देवाची भक्ती करणे विषय आपले चित्त जर आपल्याला साक्षी असेल तर इतरांच्या साक्षी काय गरज आहे आपल्या सहित आपल्याजवळच आहे.आत बाहेर सर्व ठिकाणी देव व्यापून आहे असा विचार मनात सतत असणे हाच खरा भाव.आपल्या ठिकाणचा शुध्द भाव दुसऱ्याला सांगण्याचे कारणच नाही.तो अपोपच लोकांना समजून येत असतो.जो परमानंद रस भोगत आहे आपल्या अंतरंगात रममाण आहे त्याला बाहेरील रंगाची चाडच नसते.तुकाराम महाराज म्हणतात ज्यामध्ये शुध्द भाव आहे त्याचा स्तुती करणारा भाटच नारायण होईल.


अभंग क्र.586
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥
कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ध्रु.॥
खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥
ज्याचें तोचि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥

अर्थ

मी तुम्हाल जे काही सांगत आहे ते मी स्वतःच बोलत नसून विठ्ठलच तुम्हाला उपदेश करत आहे.या बद्दल तुम्ही काहीच खंती धरू नका,मी जे सांगतो तसे वागा यातच तुमचे हित आहे.एखाद्याने जर चांगली वाट सांगितली तर ती वाट टाकून जाणारा माणसाच्या अंगी अहंभाव आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे हित तोच जाणतो माझ्या मुखा वाटे विठ्ठल बोलतो आहे त्याचे सत्यत्व तो विठ्ठल जाणतो.मी केवळ मापाडी आहे.


अभंग क्र.587
वासनेच्या मुखीं आदळूनि भीतें । निर्वाहा पुरतें कारण तें ॥१॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सर्वकाळ हाचि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥
तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंगे तों तों कळे सन्निधता ॥३॥

अर्थ

वासनेच्या मुखामध्ये भत्ता टाकावा व आपल्या निर्वाहा पुरतेच मनुष्याने कार्य करावे.चित्तात कायम समाधान असणे हिच खरी नारायण आपल्या अंतरात असल्याचि खरी खुण आहे.आणि सर्व काळ हाची विचार करावे.आत्मत्वाचा विचार करण्यासाठी आपली विवेकबुद्धी नेहमी तत्पर असावी. तुकाराम महाराज म्हणतात जसे जसे आपण हरिच्या भजना कडे वळू तसे तसे आपल्याला देवाची सान्निध्यता झाली की नाही ते कळते.


अभंग क्र.588
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तेचि किती काळ वाढवावें ॥१॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
करूं आला तों तों केला लवलाहो । उरोचि संदेहो दिला नाहीं ॥२॥
तुका म्हणे मोह परतेचि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥

अर्थ

हरीच्या चिंतनेने मी अश्या ठिकाणी स्थिर झालो आहे की,आता चिंतन किती वेळ वाढवावे हेच कळत नाही.याबद्दल अबोलना धरण्याची वेळ आली आहे.माझ्या कडून जितका परमार्थ करवा तितका मी केला आहे मना मध्ये आता कोणताही संशयच राहिला नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या आतला जो मोह आहे तो आता गेला आहे,तो परत माघारी येतच नाही.म्हणून मला आता त्यागाचाही त्याग झाला आहे.


अभंग क्र.589
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एका एकीं भिन्न भेद घडे ॥१॥
तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेचि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥
आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥२॥
तुका म्हणे अंगा आली कठिणता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥३॥

अर्थ

निर्गुण असे तुझे रूप आहे.असे असता मी जेव्हा तुझे दर्शन घेऊ पाहतो तेव्हा त्यावेळी अद्वैत नाहीसे होते आणि व्दैत उत्पन्न होते.देवा आता यापुढे तुझ्या आणि माझे काही पटणार नाही कारण मला तू जसा आहेस तसाच आवडतोस.आपल्या पासून आम्ही वेगळे नसावे म्हणून आत्ता पर्यंत मी तुमची पुष्कळ विनवणी केली.तुकाराम महाराज म्हणतात पण तुम्ही मन कठोर केले आम्हाला वेगळे ठेवले मीही तुमच्या सारखे मन कठोर करतो.


अभंग क्र.590
तुजचि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥
पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ध्रु.॥
ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन राहिलेसें ॥२॥
तुका म्हणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुह्मा ऐसा ॥३॥

अर्थ

तुझ्याच पासून आम्हां सर्वांची उत्पत्ती झाली.तुम्हाला सोडून आम्ही वेगळे कसे राहू?तुम्हीच याचा विचार आपल्या मनाशी करून पाहवा.माझ्यात आणि तुमच्यात काही कमी असे नाहीच.तुम्ही मला जशी आज्ञा केली आहे त्याप्रमाणे तुम्ही ठेवले आहे त्या ठिकाणी मी राहिलो आहे व तुमच्या आज्ञेचे पालन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता एकदम स्पष्ट बोलतो आम्ही देखील तुमच्या सारखेच क्रियानष्ट झालो आहोत.


अभंग क्र.591
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुह्मीं ॥१॥
न म्हणऊनि कांहीं न ठेवीचि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥
न देखोचि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥
तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खवळिलें ॥३॥

अर्थ

अहो पांडुरंगा तुम्ही माझ्या भक्तिरसाचा प्रीतीचा भंग केला आहे की नाही ते तुम्ही सांगा?म्हणूनच मी तुमच्या मोठे पणाचा पर्वा ठेवणार नाही.म्हणूनच आम्ही एकेकी वर्मावर आलो आहे.आता तुमची निंदा करताना मी मागे पुढे पाहणार नाही,कारण आता तुमचे व आमचे काहीच नाते उरले नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता अंतरासी अंतर म्हणजे तुमच्यात व आमच्यात अंतर पडले आहे त्यामुळे मी आता तोंड खवळीले आहे.


अभंग क्र.592
लटिका देव म्हणतां ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥
तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही लटिके(खोटा) आहात इतके म्हणण्या विषयी संदेह माझ्या मनात आला आहे.तुमची सेवा करणाच असे माझ्या अनुभवास आले आहे.देवा तुम्ही शून्य स्थित रहता हे खरे आहे पण मी त्याला भेंडाळा म्हणजे एक प्रकारची दुष्कीर्तीच मानतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या कोणत्याही क्रियेत कसलेही प्रकारचा ताळमेळ नसतो तुम्ही फार चपळ आहात एका ठिकाणी तुम्ही अजिबात स्थिर नाहीच.


अभंग क्र.593
जैशासाठीं तैसें व्हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥
उदास तूं नारायणा । मीही म्हणा तुम्हीच ॥ध्रु.॥
ठका महाठका जोडा । हे धडफुडा लागासी ॥२॥
एकांगीच भांडे तुका । नाही धोका जीवित्वे ॥३॥

अर्थ

जशास तसे वागावे हे आम्हाला कळले आहे.हे नारायणा,तुम्ही सर्व गोष्टीं पासून उदास आहे.तसा मी हि उदास आहे.तुमच्या बाबतीत हि मी उदास आहे.तुम्ही ठक आहत तर आम्ही महाठक आहोत.हा तुमचा आणि आमचा योग आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाशी एकांगीच भांडत आहे,मला जिवाचीही भीती नाही.


अभंग क्र.594
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धराच ॥१॥
आतां काशासाठी देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥
तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥
तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥३॥

अर्थ

देवा मी अनेक प्रकारे तुम्हाला काकुळतीला आलो परंतु तुम्ही माझ्याविषयी काही चित्तात विचारत धारण करत नाहीत.मी आता उगाच खोटी हाव कशाला वाढवू?तुमच्या आमच्या मध्ये ताटातूट झाली आता केवळ तुम्हाला चिंतनाने भेटावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची सगुण दर्शन घडावे अशी इच्छा जर मनात धरावी तर ते जगणे म्हणजे लाजिरवाणे आणि अधीर पणाचे आहे.


अभंग क्र.595
आश्चर्य तें एक झालें । मना आलें माझिया ॥१॥
मढयापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥
न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥
तुका म्हणे कैंचा बोला । शोधा विठ्ठला माझिया ॥३॥

अर्थ

देवा माझ्या मनात एक गोष्ट आली आणि त्याचे मला आश्चर्य वाटत आहे एखादा मानव प्रेता जवळ रडत बसतो व त्याला करुणा भाकतो परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही अगदी त्याप्रमाणे आम्ही तुला प्रार्थना करतो ती हि व्यर्थ आहे. एखाद्याचे खोटे कृत्य पाहिल्यावर राग का येऊ नये तुम्ही खोटे पणाने वागला म्हणून मला तुमचा राग येतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे विठ्ठला आता काय शोधत बसला आहात.


अभंग क्र.596
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचुं ॥१॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
हिशोबें तें आलें घ्यावें । ते तों ठावें सकळांसी ॥२॥
तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥

अर्थ

अहो मला जर देवाला काही मागायचे नाही तर मग मी देवाजवळ संकोच धरण्याचे काय कारण आहे? कोणत्याही प्रकारची इच्छा मनात धरून मी खोट्याची स्तुती करणार नाही.जे काही हिशोबाने मिळते ते घेणे हे सर्वांना समजते.तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही दर्शनच देणार नसाल तर तुमची भक्ती का करायची?


अभंग क्र.597
पावटणी पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां हे ॥ध्रु.॥
न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥२॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षी ते ॥३॥

अर्थ

देवा अरे आम्ही तुझ्या पायरीच्या देखील पाया पडतो तेही अगदी भक्तिभावाने परंतु तरीदेखील तुझ्या मनात आमच्या विषयी काही प्रेम उत्पन्न होत नसेल तर तुमचा उद्धार करशील कसा?साक्षात भेटीत जे घडेल तेच खरे आणि सर्वानांच बरे दिसते.जर एखाद्या गोष्टीची प्रत्यक्ष भेट झाली नाही तर त्याविषयी नुसतेच फोर्ट गप्पा मारून काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी न बोलता अबोल्याने राहतो,माझे अंतकरण साक्षीला ठेवतो.


अभंग क्र.598
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥

अर्थ

अभया चे स्थळ व जेथे काही भिण्याचे कारण नाही असे आणि अचल केवळ हरीचे चरण आहे.त्यामुळेच मी हरिचरणावर विश्वास धरला आहे आणि त्यांचा दास होऊन राहिलो आहे.त्यामुळे माझे सर्व आवड पूर्ण झाली व याच कारणामुळे हरीच्या पायाची मला आवड लागली. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कंठामध्ये केवळ हरीचे नाम आहे आणि त्यामुळेच माझ्या संपू


अभंग क्र.599
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥
आतां नको मज खोटयानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥
तुका म्हणे कशी निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळी पायी ॥३॥

अर्थ

संदेहच जर राहिला नाही तर खरी गोडी राहील.जे बेचव आहे ते कोणाला आवडत नाही,देवा आता मला खोट्या गोष्टीने तुम्ही विनाकारण फसवू नका मी वेळा कोठे येजा करत असून?तुमच्या वाचून मी पुढे मी काय करू,म्हणून माझा जीव गेला तरी त्याचे काही मला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा तुमच्या लेकराने, पोराने तुमच्या चरणाच्या दर्शनाची इच्छा केली आहे तर मग ही इच्छा बरोबर आहे कि नाही याची परीक्षा तरी तुम्ही घ्यावे.


अभंग क्र.600
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥
आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंकितसे ॥ध्रु.॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥
तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभय करें ॥३॥

अर्थ

या त्रैलोकांमध्ये लोक जसे बोलतात तसे वागत नाही परंतु बोलण्यासारखे कर्तुत्व हे अनुभवाला येणे दुर्लभच आहे लोक दुसऱ्या पाहून वागत आहेत असेच मला दिसते आहे.पणदेवा आम्ही स्तब्ध राहून निश्चल राहून कसे चालेल कारण काळ आम्हाला आमचा पाठलाग करून आम्हाला जिंकीत आहे.दांभिक परमार्थाचा पोट भरण्यासाठी वाढविलेला पसारा मुळे मुद्दलात तोटा मात्र नक्की होईलच. तुकाराम महाराज म्हणतात देवा काळ माझा पाठलाग करत आहे आणि माझे मन स्थिर राहत नाही त्यामुळे तुम्ही जर माझ्या मस्तकावर तुमचा अभ्यस्त ठेवून माझ्या मनाला शांत केले तर बरे होईल


सार्थ तुकाराम गाथा 501 ते 600 समाप्त 

1 thought on “सार्थ तुकाराम गाथा 501 ते 600”

  1. दामोधर मुकींदराव गरड

    दामोधर मुकींदराव गरड वाकद येथे, रहिवासी असून ता रिसोड जिल्हा वाशिम, ८००७०७००५१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *