संत तुकाराम अभंग

हातीं होन दावितींवेणा – संत तुकाराम अभंग – 144

हातीं होन दावितींवेणा – संत तुकाराम अभंग – 144


हातीं होन दावितींवेणा ।
करिती लेंकीची धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कली ।
पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार ।
द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं ।
लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां ।
अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें ।
तेल तुप साबण केणें ॥५॥
नीचाचे चाकर ।
चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी ।
क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक ।
हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग ।
आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा ।
काय निद्रा केली धांवा ॥१०॥

अर्थ
काहीलोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात मग मुलीचे लग्न लावतात अशाप्रकारे ते मुलीची विक्रीच करतात. अशाप्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे धर्म नाश पावत चाललेला आहे पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे. अहो या कलियुगामध्ये ब्राम्‍हणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत व इतरांची चाहाडी ते लावतात. अहो ते कपाळाला टिळा देखील लावत नाही पंचांग पाहण्याच सोडून देत आहेत आणि योवनांप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालू लागले आहेत. अहो न्याय देणारा न्यायाधीशाच्या आसनावर बसणारा अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पीडा देत आहेत. तेल-तूप साबण हे आपल्याला किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत. अहो ब्राम्‍हण आता नीच माणसाच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसांच्या हातचा मार देखील ते आता खातात. राजा प्रजेला पीडा देत आहे अगोदरच दुखी असलेला शेतकरी त्याने जर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेत आहे. वैश्यशुद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत त्यांच्याहातून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहे? अंतर रंगांमध्ये लोक वाईट वृत्तीने व काळेबेरे पणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही खूपच स्वच्छ आहोत असे ते लोकांना दाखवतात व स्वज्वळ पणाचे सोंग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा अहो एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही अजून काही का करत नाही तुम्ही निजला आहात की काय, उठा तुमचे ब्रीद आहे तुम्ही धर्माचे रक्षण करता मग आता धर्मरक्षणासाठी लवकर धावा. (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये यौवनी राजसत्तेने किती बिकट परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदास यांनी देखील त्यांच्या काव्य रचनांमधून असेच वर्णन केलेले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


हातीं होन दावितींवेणा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

1 thought on “हातीं होन दावितींवेणा – संत तुकाराम अभंग – 144”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *