सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200

सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200

सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200

अभंग क्र.101
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥
नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नव्हो ॥३॥

अर्थ:-

समाज्यात काही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशी असतात; पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात .कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोंड चुकवितात .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही.


अभंग क्र.102
जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥
मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥
फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥
आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥
तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा देती ॥४॥

अर्थ:-

मायबापहो, जोहार करतो.मी आपणास जोहार करतो. मी वेसकर तुमच्याकडील कर्म-आकर्मचा सारा मागण्यांसाठी आलो आहे .तुम्हाला नम्र विनंती अशी की, मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियमाण कर्माचा प्रमेश्वरासमोर झाडा करावा.सारे भगवंतार्पण करावे.स्वत:जवळ काहीही ठेवण्याचा मोह धरु नये; नाहीतर आमचे धनि तुम्हाला जन्ममृत्युच्या खोड्यात अडकवतील जी, मायबाप! .तुम्ही धन्यासमोर हजर न होता इतरत्र पळु नका.हा कर (सारा) भरला नाही तर धनि शिक्षा करतील.आमच्या धन्याचा हात धरु शेकेल असा जगात कोण आहे का सांगा ! .तरी मायबापहो, आज तुम्ही संचितकर्माचे किडूकमिडूक मोडून तडजोड करावी; कारण उद्या आजचि वेळ राहणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात अखेरीस जर भगवंताला शरण झले नाही तर सारा भरण्याचे राहून जाईल आणि खोडा घातल्या जाण्याचे चुकणार नाही; म्हणून लगेच सारा भरुन टाका .


अभंग क्र.103
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥
जों यावें तों हातचि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥
तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा । जे हे दारोदारां भोंवतीं फिरा ॥३॥

अर्थ

यमाचा एक प्रेषित वेसकराच्या रूपाने, कधीही दानधर्म न करणाऱ्या, हरिनाम न घेणाऱ्या, सदैव संसारात आसक्त असणाऱ्या मांणसास उपदेश करतो.’अहो, मायबापहो, वेसकरासाठी कही पक्कन्नाचा, हरिनामाचा, दानधर्मचा घास आपल्या घरातून बाहेर येऊ द्या .मी जेव्हा-जेव्हा येथे येतो, तेव्हा-तेव्हा (तुम्ही काहीतरी कामात व्यस्त असतात); तुमचा हात रिकामा नसतोच, कधीतरी काहीतरी द्यावे, घ्यावे हे चांगले असते .तुकाराम महाराज म्हणतात, मी देवा कडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करिन.मग तुम्ही पशु-पक्षाच्या देहाच्या दारा सभोवति फिरत राहल (जन्ममृत्युच्या फेऱ्यात फिरत राहल ) मायबापा ! .


अभंग क्र.104
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥
धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥
अवघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥
सोंगें संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरी होती ॥३॥
घराकडे पाहूं नयेसेंचि जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥
आतां तुका कोणा न लगेचि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥

अर्थ:-

जी देती-घेती बुध्दी होती, ती घर खाली करून देहरुपी घर टाकुन निघुन गेली .अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली.आता माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही .त्याने सर्वच सर्वकाही नेले, काहीही मागे ठेवले नाही .स्वस्वरुपावर पडदा टाकणार्‍या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता , तो गेला . आता पुन्हा वळून देह रुपी घराकडे वळुन पाहू नये, असे झाले आहे आतासर्व उपाध्धीची अनामत रक्कम दिवाणात(हरी) जमा झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही त्याविषयी मी निच्छित झालो आहे.या अवस्थेचे वर्णनहि करता येत नाही .


अभंग क्र.105
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥
उठा उठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा झाली गरुडा टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥
तुका म्हणे करी बहुत तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

अर्थ

शुक-सनकादिक ऋषींनी आपले दोन्ही ही बाहु उभारुन सांगितले कि, पण परिक्षिति त्याच्या साधनेमुळे मात्र सात दिवसांत कृतांत झाला .तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा, मग तुमच्या भेटिसाठी हरी धीर धरणार नाही .द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण गरुडाची चाल देखिल मंद आहे, हे जानवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले .तुकाराम महाराज म्हणतात , आपल्यावर नीतांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे .


अभंग क्र.106
बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरी आंत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजी ॥३॥

अर्थ

मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगतांना अधिक-उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा .जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसु नये; नाहीतर आपलेच नुकसान होते.वैद्याने पोटशूळावर कडूनिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता पोटा वर चोळला तर रोग बरा होणार नाही .तुकाराम महाराज म्हणतात , डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मुर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात .


अभंग क्र.107
माकडें मुठींसी धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥

अर्थ

एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले, माकडाने त्यात हात घालून फुटाण्याची मुठ भरली, त्यामुळे मुठ बाहेर निघेणा .मुठ सोडून हात बाहेर काढवा, हे त्या माकडाला सुचले नाही मग या मधे त्या माकडाचा काही अपराध आहे काय त्याला आपले हित समजले नाही .पारादयाने लावलेल्या नळितील खाद्य खान्यासाठी पोपट नळिवर बसतो, नळि उलटी फिरते, पोपटही उलटा होतो, आपण पडू, या भीतीने तो तसाच नळीला घटट धरुन बसून राहतो . तुकाराम महाराज म्हणतात जे लोक पशुपक्षांप्रमाने असतात, त्यांच्यापुढे काही उपाय नसतो.


अभंग क्र.108
हरी तूं निष्ठुर निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥
घेऊनि हरीश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥
नळा दमयंतीचा वियोग । विघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥३॥
कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥
तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं रे पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥७॥

अर्थ

हे हरी, तू फार कठोर आहेस तू निर्गुण, निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस, कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस .सत्यवचनि राजा हरीश्चंद्राला त्याच्या पत्नी व् पुत्रा पासून दूर केलेस, त्याचे राज्य वैभव हिरावुन घेतलेस, त्याला डोंबाघरी पाठविलेस .पुराणात संगीतल्या प्रमाणे नल-दमयंतीच्या प्रेमसंमंधात विघ्न आणून नल-दमयंतीचा वियोग घडून आणलास .कृपाळू, दयाळु शिबिराजाला स्वतःच्या मंडीचे मास कापायला लाउन त्याची परीक्षा घेतलीस .दानशुर कर्ण समरांगणात बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दांत मागितलेस .ज्या बलिराज्याने तुला पृथ्वीचे, आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिल , त्याला कपटिने पाताळात गाडलेस .श्रीयाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मांस मागीतलेस .तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस .


अभंग क्र.109
बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध परिखा ॥१॥
जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥
साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥
तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥

अर्थ

लहान मूल अज्ञानामुळे बपाला काका म्हणते, म्हणून बापाचे त्याच्यावरील प्रेम कमी होत नाही .भक्तही असाच प्रेमाने नामस्मरण करतो, नाम त्याने वेडेवाकडे जरी घेतले तरी ते भगवंताला आवडते .खडीसाखर दगड म्हणून जरी तोंडात घातली तरी गोडच लागणार नाही काय? त्याप्रमाणे देव कोणत्याही भक्ताची इच्छापूर्ती करतो .तुकाराम महाराज म्हणतात , भक्तिपूर्वक वेडयावाकडया शब्दात केलेले नामस्मरण कधीच वाया जात नाही .


अभंग क्र.110
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥
तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥
केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥
करीं तुजसी करवतीं । आणिक नामें घेऊं किती ॥४॥
तुका म्हणे काळा । रीघ नाहीं निघती ज्वाळा ॥५॥

अर्थ

अरे तू आता हरिभक्ती करण्यास सज्ज झाला आहेस तर चल तुला आता सर्व गोष्टींपासून म्हणजे मायिक पदार्थांपासून मोकळे केले आहे, त्यामुळे वेळोवेळा कायमस्वरूपी विठ्ठल असे बोलत जावेस. असे एकही पाप नाही की जे विठ्ठलाचे नाम घेतल्यावर तुझ्याजवळ राहील. पंचक पतकांच्या सारख्या, कोट्यावधी पथकांच्या राशी असतील तरी विठ्ठल नामाने ते जळून जाण्यास एक घटका देखील लागणार नाही. अरे तू मागे कितीही पाप केले असशील तरी त्या विषयी विचार करू नकोस विठ्ठल नामाने तुझे कल्याण होईल याविषयी आम्ही जामीनदार आहोत. अरे तुला यापुढे देखील जेवढी काही पातके करायचे असतील तेवढी कर अनेक पातके आहेत त्यांचे नाव तरी तुला किती सांगू तेवढे देखील पातके कर परंतु वेळोवेळा विठ्ठलाचे नामस्मरण कर तुला ती पातके बाधा करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात अरे हरीच्या नामाग्नी मध्ये इतकी ताकत आहे की तेथे काळाला देखील जागा नाही व पातके तर ते भस्म करून टाकते. (या अभंगाचा तात्पर्य अर्थ पाप करावे असे नाही तर हरीच्या नामाचा महिमा सांगण्याचा खरा तात्पर्य आहे.


अभंग क्र.111
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥
तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥

अर्थ

जे मनातच नाही, ते जवळ असूनही उपयोग नाही, गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही अगदी त्या न्यायाने .अंतर्‍यामि जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ती एकमेकंपासून दूर असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते .तुकाराम महाराज म्हणतात , की अन्न जसे मिठावाचुन बेचव असते, तसे चित्तामधे भक्तीभाव नसेल तर परमार्थ होने कठिण असते .


अभंग क्र.112
काय काशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥
अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥
काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥
तुका म्हणे प्रेमें विण । अवघा शीण बोले भुंके ॥३॥

अर्थ

ज्याचे अंत:करण शुद्ध नाही त्याने काशिक्षेत्र, गंगाजल केले तरी त्याचा काय उपयोग ? एखादा कुचर दाणा पाकात टाकला तरी तो शिजत नाही .ज्याच्या मनामधे भक्तिभाव नाही, त्याने कपाळि गंधटिळा, गळ्यात तुळशिचि माळ घातली तरी त्याचा काय उपयोग ? .तुकाराम महाराज म्हणतात, की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही, त्याचे बोलने कुत्र्याच्या भुकण्यासारखे व्यर्थ आहे .


अभंग क्र.113
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥
तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥२॥

अर्थ

वाइट कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा स्वत:च्या पत्नीवरहि विश्वास नसतो, तिच्या भावावरहि नसतो, म्हणून तो तिला तिच्या भावाबरोबर माहरी पाठवित नाही .चोरी करणाऱ्याला इतर व्यक्ती चोरच वाटतात .तुकाराम महाराज म्हणतात , ज्याच्या मनात जसा भाव असेल तसेच त्याला जग दिसते .


अभंग क्र.114
अनुसरे तो अमर झाला । अंतरला संसारा ॥१॥
न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥
विसंभेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥२॥
त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तो रक्षीता जालिया ॥३॥

अर्थ

जो हरी चरणाशी अनुसरून राहतो तो अमर होऊन त्याचे संसारबंधन तुटते.विष्णू दासांना कधी पुनर्जन्म म्हणजे गर्भवास नसते.ज्या प्रमणे माता बाळाला विसंबत नाही त्याप्रमाणे देव भक्तांचे लाड पुरवतो.तुकाराम महाराज म्हणतात ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे असा भगवंत त्याच्या भक्तांचे रक्षण करतो.


अभंग क्र.115
आतां केशीराजा हेचि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥
काळाचें खंडण घडावें चिंतन । तनमनधन विन्मुखता ॥२॥
कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥
सावध तों माझीं इंद्रियें सकळ । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥
तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी ॥५॥

अर्थ

हे केशीराजा तुझ्या चरणी मस्तक ठेऊन मी अशी विनंती करीत आहे की,माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्त फक्त तुझ्या चरणी असू द्यावे.तन मन धन या बाबतीत माझे मन विन्मुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा.कफ वात व पित्त हे माझ्या देहात असून अंतःकाळी तुम्ही ते निवारण करावे.जो पर्यंत माझी इंद्रिये सावध आहे तो पर्यंतच एक वेळा तुम्ही मला हाक मारा.तुकाराम महाराज म्हणतात देवा सकळांचा जनिता निर्माता तुच आहे आणि सगळे तुझ्यातच ऐक्य पावणार आहे.


अभंग क्र.116
चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥
हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥
रवीचिये अंगीं प्रकाशक सकळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥
तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं । सौख्य काय रंगीं निवडावें ॥३॥

अर्थ

इंद्रियांचे जेणे हाव वाढते ते म्हणजे कल्पना करून चिंतन करते तेच चित्त आहे.हात पाय शरीर हे चालताना दिसते देवाण घेवाण करताना दिसते पण जीवाची त्या ठिकाणी सत्ता असते.सूर्‍या पासून सर्वांना प्रकाश मिळतो पण सूर्य आणि किरण असे उच्चार होते.तुकाराम महाराज म्हणतात कि, शब्द निर्माण होते व अस्तित्वाला काल्पनिक मर्‍यादा व माप पडते पण जर मौन धरले तर त्या मधील भेद कसे निवडणार.


अभंग क्र.117
बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥
हेचि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥
विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥
तुका म्हणे पायापाशीं । येईन ऐसी वासना ॥३॥

अर्थ

देवा मी तुम्हांला काय बोलून दाखवू?तुम्हींच सर्व जगाचे जीवन आहात.तुमची सेवा म्हणजे तुमचे चिंतन आहे देवा.महाराज म्हणतात विरक्त देहाला देह तुच्छ वाटतो त्याला देहाची आसक्ती नसते.तुकाराम महाराज म्हणतात माझी अशी वासना आहे कि मी तुमच्या पाया पाशी येईन.


अभंग क्र.118
धाकुटयाच्या मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥
ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥
दोन्ही उभयतां आपणचि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥

अर्थ

आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरवते, तर मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते .मुलाचे जाणतेपण वाढु लागले की त्याची समज पाहुन आई त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करते .दोन्ही मुलांना तिनेच जन्म दिलेला असतो; पण दोन्ही मुलांच्या प्रेमात मात्र फरक पडतो .तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई राडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते .


अभंग क्र.119
उपदेश तो भलत्या हातीं । झाला चित्तीं धरावा ॥१॥
नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥

अर्थ

उपदेश करणारी व्यक्ति ही कोण आहे ते न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवा .जसे नाराळाच्या कारवंटीच्या आंतिल मधुर चविचे पाणी व खोबरे खाऊन करवंटि टाकून देतो, त्याप्रमाणेच पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्ती मार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा .तुकाराम महाराज म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंधिमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ती सामान्य जरी असली तरी श्रेष्ट मानावा .


अभंग क्र.120
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥
आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥
त्यजुनी संसार अभिमान सांडा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥२॥
तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जातो ॥३॥

अर्थ

देवाच्या भक्तीचे ढोंग करणार्‍या मानसांण बद्दल मला आचार्य वाटते .अशा ढोंगी भक्तांची अवस्ता तर प्रापंचिक मनुष्याला परमार्थासाठी सवडच मिळत नाही .परमार्थासाठी संसाराचा त्याग करुन, त्यांच्या मनात अहंकार जातच नाही उलट वाढताच होतो .तुकाराम महाराज म्हणतात, की जगात असे काही लोक आहेत, की प्रमार्थही व्यवस्तीत करत नाहीत, ते फक्त आळसात वेळ वाया घालवतात असे मणुष्य आळसामुळे बळेच कसे वाया जातात ते पहा .


अभंग क्र.121
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥

अर्थ

संतसज्जनांचे बाह्यात्कारि वर्तन पाहुन एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याई नष्ट होते .जसे एखादा मनुष्य फुलाचा सुगंध हुंगन्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि केळयांचा घड पाहण्यासाठी केळीचे झाड मोडतो .तुकाराम महाराज म्हणतात, गंगा आणि अग्नी यांना जो विटाळ मानतो, तो चंडाळ समजावा .


अभंग क्र.122
चुंबळीशीं करी चुंबळीचा संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥
बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥
माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना विधी धुंडी ॥२॥
तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥

अर्थ

हीन वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तिला हीन लोकांची संगती आवडते .जसे बीज तसे फळ मिळते, त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असेलत्याचा सुगंध त्रिलोकात पसरतो .जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किम्मत नसते तसेच सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येचे घर शोधतो.तुकाराम महाराज म्हणतात अश्या मनुष्याला जन्म देणारी माता गाढवी आहे,त्याची पुढे फजीती होण्यासाठीच तिने त्याला जन्माला घातले आहे .


अभंग क्र.123
सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदीं ॥१॥
ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥
दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥
तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥

अर्थ

एखादा सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो . त्या वेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही . एखादी दानशूर व्यक्ती सुद्धा वेळ आल्यावर भीक मागु लागते .तुकाराम महाराज म्हणतात, ही काळाची गति त्या नारायणाला काय सांगावे ? त्यानेच ती निर्माण केली आहे .


अभंग क्र.124
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥
अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥
तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥

अर्थ

पूर्वजांणी पुरावुन ठेवलेले गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या हाती आल्यावर त्यामध्ये त्याला सर्प, विंचु, कोळसे दिसतात .जसे काविळ झालेल्या मनुष्याला सर्व वास्तु या पिवळ्याच दिसतात .आपल्याच शरीरा भोवती गोल-गोल फिरल्यास भोवतालचि झाडे, दागडधोंडेही गोल फिरताना आढळतात व् घेरी येते .तुकाराम महाराज म्हणतात , पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या आडवे येते .


अभंग क्र.125
न देखोनि कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥१॥
झालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥
न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥२॥
खादलें न खातां । रसना रस झाली घेतां ॥३॥
न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥४॥
नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥५॥

अर्थ

काही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे .कारण मी माझा देहभान, देहबुध्दी विसरलो आणि विश्वतत्त्वाशी एकरूप झालो आहे .म्हणून मी विश्वातील सर्व वास्तु पाहू शकलो व् स्थुल देहाच्या हात व पायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरुपात मिळाले आहे .काही न खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे .कुणाशी न बोलता सर्वांशि बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, कानांनी जे एकता नाही आले ते सर्व आइकले आहे.ही आत्मस्वरूपाची ओळख आहे .


अभंग क्र.126
शरणागत झालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥
आतां दिल्याचीच वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥
नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥
तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥

अर्थ

हे देवा आहो मी तुम्हला पूर्ण पणे सर्व भावे शरणागत झालो आहे त्यामुळे मी माझ्या मीपणाला मुकलो आहे.आता तुम्ही मला जे काही दिले आहे त्याची वाट पाहणे व दुसरी कोणतीही खटपट न करणे.माझ्या संचिता प्रमाणे काय होईल ते होईल यात उचीत काय ते पाहण्याची जरुरी नाही.तुकाराम महाराज म्हणतात जशी तुला मान्य होईल तशीच सेवा मी आता करेल.


अभंग क्र.127
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥
अवघा झाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरीदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥
दोहीं ठायीं फजीत झालें । पारणें केलें अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जेणे ॥५॥

अर्थ

एक कर्मठ ब्रम्हच्याऱ्याच्या बगलेत हरणाचे कातडे होते.वाटेत अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला .तो ब्रम्हचारी, अश्या फजितखोरांना मुळात लाज लज्याच नाही वा त्याची तूम्ही काही तरी दाद करा त्याची चांगली फजीती करा . तो ब्रम्हचारी म्हणु लागला की,देहु मध्ये सर्व जण मुखाव्दारे रामराम असेच म्हणतात कुणीही कर्माचरण आचरित नाही .तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात, त्यांना नागवावे .दोन्ही ठिकाणी(संसार व परमार्थ) फजीती झाल्यामुळे त्यांना अवकाळा प्राप्त झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या ब्रम्हचारी लोकांनी ब्रम्हचारी वेषाची वीटंबना केली आहे आणि स्वत:चा नाश करून घेतला आहे .


अभंग क्र.128
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥
भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥

अर्थ

जोवर मनातून विषयकसक्ती दूर झाली नाही, तो पर्यंत स्त्री-पुत्र यांचा प्रपंच्याचा त्याग केला तरी काही अर्थ नाही .दुराचारी माणसाने केलेले भजन पाप युक्त असल्यामुळे वाईटच होय .त्यामुळे तो नरकवासच भोगणार, ते चुकणार नाही .अंत:करणात जर संतांची निंदा करण्याचा कितीही खटाटोप केली तरी ते व्यर्थ आहे .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या माणसांची प्रगति होणार नाही.त्याचे पाय नाराकात ओढले जातील .


अभंग क्र.129
तारतिम वरी तोंडाच पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥
भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥
तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदराचे पुढें सोंग दावी ॥३॥

अर्थ

कपटी माणूस तोंडावर तारतंम्याने गोड बोलतो.त्याच्या अतःकरणातील भाव मला समजत आहे . लोकांमध्ये तुझो वागणे खरे आहे असे दिसून येते पण अशी फसवेगिरि बरी दिसती काय ?भोजनात विष कालवावे तसे तुझे गोड-गोड बोलने आहे.मनात मात्र मारण्याचा मोह आहे .तुकाराम महाराज म्हणतात, कपटी माणसाच्या अतःकरणातील कपट दिसून येत नाही वरवर आदराचे सोंग दाखवित असतो .


अभंग क्र.130
ब्रम्हनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥१॥
तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥
सांगितलें कानीं । रूप आपुलें वाखाणी ॥२॥
भूतांच्या मत्सरें । ब्रम्हज्ञान नेलें चोरें ॥३॥
शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥४॥
निंदास्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेंची वाणी ॥५॥

अर्थ

स्वताला जो ब्रम्‍हनिष्ठ म्हणवून घेतो त्याने प्राणिमात्रांच्या नावे हिरव्या गवताची काडी जरी मोडली तरी त्याला गुरु हत्येचे पातक लागते .गुरुने केलेला उपदेश खोटा ठरतो .गुरुने त्याच्या कानात ज्या ब्रम्‍हज्ञानाचा उपदेश केलेला असतो, त्या ब्रम्‍हरूपाची तो लोकांजवळ वाच्यता करतो .स्वतःला ब्रम्‍हज्ञानी महानवुन घेतो आणि भुत मात्रांचा द्वेष करतो.अश्या माणसांचे ब्रम्‍हज्ञान चोर पळवून नेतात .शिकलेल्या गोष्टी तो लोकांना सांगतो, पण भेदामुळे, क्रोध त्याच्या मनात वाहत असतो .तुकाराम महाराज म्हणतात, त्याची वाणी नेहमी लोकनिंदा, स्तुति-स्तवने यातच आपला वेळ व शक्ती तो खर्च करतो .


अभंग क्र.131
इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥

अर्थ

पृथ्वीतलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवहि उत्सुक आहेत .आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तिने धन्य झालो आणि कारण आम्ही विठोबाचे दास झालो .या नरदेहच्या प्राप्तिने भक्ती करावी व भक्तिमार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली .तुकाराम महाराज म्हणतात, या नरदेहप्राप्तीने जीवनाचे सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळवू .


अभंग क्र.132
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरीकथेविण ॥५॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तेंचि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळिचे अवघें मूळ तेथें ॥७॥

अर्थ

तू जगात पंडित अथवा प्रवचन कार झाला असलास तरी कृष्णकथा भक्तीभावाने ऐक . दूध, तूप आणि साखर यांच्या मिश्रण गोड होते प्रमाणे पंडित आणि श्रीकृष्ण कथा असेल तर कथा अधिक मधुर आहे .तुझ्या विद्वत्तेत कृष्णकथा मिसळून ती अधिक मधुर बनेल .तुला जर आपले हित साधायचे असेल तर जाणिवेच्या अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करुण टाक .देहाच्या शृंगारासाठी सुगंधियुक्त चंदनऊटी उपयुक्त आहे .पण पोट भरले नसेल तर देहशृंगाराचा काही उपयोग नाही, तसे हरिकथेवाचुन विद्वत्ता काहीच कामाची नाही .ज्या प्रमाणे वेद, श्रुती, पुराणे यामध्ये विठ्ठलरूपाची संपत्ती समावली आहे.त्यामुळे त्यांना महत्त्व आहे .तुकाराम महाराज म्हणतात , तसे हरिकथेवाचून पांडित्य म्हणजे फक्त दगडांचे पेव आहे, ते उपसने म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ आहे .


अभंग क्र.133
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुर पार नाहीं ॥१॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥

अर्थ

जगात काही लोक आपल्या फायदयासाठी इतर लोकांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरणाला सीमा नसते .त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीचि उसनवारि करतात .दगडाच्या देवाला शेंदुर फासुन त्याला नवस-सायास करतात .तुकाराम महाराज म्हणतात, दुसर्‍याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून रडतात, त्याच प्रमाणे स्वता:च्या फायद्यासाठी इतरांना दुःखी करणारे लोक शेवटी दुःखच भोगतात .


अभंग क्र.134
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वोहोळ गंगा ओघ ॥ध्रु.॥
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥२॥
शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥३॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहा पां विचार पिंगळेचा ॥४॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥६॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥

अर्थ

अहो ज्या कुमारिकेचा पाच वर्षानंतर एक वर्ष गंधर्व, एक वर्ष अग्नी आणि एक वर्ष सोम या देवतांनी भोग घेतला त्यानंतर त्या कुमारिकेला व्याभिचारी म्हणून कुणी तिचा त्याग केला आहे का, चराचरामध्ये तिचा कोणीही त्याग केलेला दिसतो काय? अहो गाय आपल्या मुखाद्वारे विष्टा घाणेरडे काहीही खाते आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे, नाले या घाणेरड्या असतात परंतु गंगेला मिळाल्यानंतर त्या पवित्र होतात. अहो वड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळ्याच्या विष्टेतून होतो आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर तेथेदेखील दोष दिसून येतात कारण पांडवांचा जन्म पाच देवतांनी पासून झालेला असून पाचही पांडवांची एकच पत्नी होती. शकुंतला, सूत, कर्ण, शृंग व व्यास यांचा जर जन्माचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील परंतु यांचे नाम मुखाद्वारे घेतले असता पातकांचा नाश होतो. अहो गणिका, अजामेळ, कुब्जा, दासीपुत्र विदुर आणि पिंगळा वैश्या यांच्या जन्माचा तसेच कुळाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणेच दोष दिसून येतात. तसेच वाल्हा कोळी, विश्वामित्र, वशिष्ठ नारद यांचे पूर्व कुळ हे शुद्ध आहे काय? अहो अनेक नरनारीं कडून न व्हावी अशी कर्मे चुकून घडून गेली परंतु पश्चातापाने त्यांनी हरी नामाचे स्मरण केले व ते शुद्ध मुक्त होऊन शुद्ध झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी पश्चातापाने हरी नामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषांचा विचार करत नाही व जो कोणी यांच्या पूर्व कुळा विषयी किंवा पूर्वकर्मा विषयी उच्चार आपल्या मुखाद्वारे करील तो नरकाला जाईल.


अभंग क्र.135
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वानालागीं ॥१॥
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥
तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥

अर्थ

कुत्र्याला सोन्याच्या ताटात खीर खायला दिली .मौल्यवान मोत्यांचा हार गाढवाच्या गळ्यात घातला किंव्हा डुकराला कस्तूरिचा सुवास दिला .एखाद्या बहिर्‍याला ब्रम्‍हज्ञान सांगितले तर त्याला ते समजणार आहे का ? .तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे, त्यालाच त्याचे महत्त्व कळणार, भक्ताची योग्यता संतांनाच समजणार .


अभंग क्र.136
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा करिताती ॥४॥
बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥
भेटिसि नवजातां म्हणती हा निष्ठुर । येतां जातां घर बुडविलें ॥६॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥
लोक जैसा लोक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥

अर्थ

पतितपावना देवराया संतपदाचा लौकिक सदासर्वकाळ सांभाळने शक्य होत नाही . एखादा मनुष्य प्रपंच करताना “हा स्वार्थी दोषी आहे” आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे “तर हा अळशी आहे”, असे लोक म्हणतात .धर्मा प्रमाणे आचारण केले तर दांभिक म्हणतात, नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात .संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात, नाही केला तर हा अभागी आहे, याला संत सहवास, शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात .दरिद्री माणसाला कमनाशिबि म्हणतात, तर श्रीमंताला अहंकार फार आहे, असे म्हणतात .बोललो तर बडबड करणारा आणि नाही बोललो तर गर्विष्ट म्हणतात .नातेवाइकाना भेटण्यास नाही गेलो तर निष्टुर आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो एशे म्हणतात .लग्न करू पाहता मस्तिला आला म्हणतात आणि लग्न न करता राहीला तर ‘नपुंसक’ म्हणतात .निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवडा वाढला म्हणतात .लोक हे असे दोन्हीकडून बोलतात, जाशी ओकारी थांबवता येत नाही तसे लोकांचे बोलनेही थांबवता येत नाही .म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की लोकांच्या बोलाण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा.


अभंग क्र.137
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥
वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥
न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥२॥
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥

अर्थ

या जगात आम्ही धर्मरक्षण करण्यासाठी श्रम करतो .आम्ही संतांप्रमाणे आचरण करून मुखाने वेदनीति बोलतो .परमार्थामध्ये ब्रम्‍हसस्थीतीला पोहचाण्यापूर्वीच कर्माचा त्याग केल्याचे जो ढोंग करतो, तो ढोंगी आहे .तुकाराम महाराज म्हणतात, जो हरिभक्तीला दुषणे देतो, तो अधम समजावा .


अभंग क्र.138
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥
काय एक उणें आमुचिये घरीं । वोळंगती द्वारीं रिध्दिसिध्दी ॥ध्रु.॥
असुर जयाने घातले तोडरीं । आम्हांसी तो जोडी कर दोन्ही ॥२॥
रूप नाहीं रेखा जयासी आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥
तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥५॥

अर्थ

चौदा भुवनांचा जो जन्मदाता आहे, तो आमच्या कंठामध्ये नांदत आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, प्रत्यक्ष रिद्धि-सिद्धि आमच्या घरी नांदत आहे त्यामुळे आमच्या घरी काय कमतरता आहे .असुरांना बंदीवासात टाकणारा भगवंत आमच्यापुढे (भक्तापुढे) हात जोडून नम्रतेने उभा आहे .जो रंगरूपावाचुन निर्गुण निराकार आहे, त्याला आम्ही सगुन साकार बनविले आहे .जो अनेक ब्रह्मांडाचा जन्मदाता आहे, तो आमच्या साठी सूक्ष्मरूप धारण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही (भक्त) देवाहुन भाग्यशाली आहोत; कारण आम्ही आशारहित भक्ती करत आहेत .


अभंग क्र.139
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥
केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणेंचि घेणें । आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥

अर्थ

मातीचे शिवलिंग करून त्याची पूज्या केली ती शंकराला पावते त्यामध्यो मातीचे काय महत्व कारण, शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते .त्याच क्षणि तीच महत्त्व संपते, तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात, ती संतहृदयातील पुजा भगवंतास पावते, आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदविचा मोह आम्हाला नाही .दगडी विष्णुमूर्तिचि पूजा केलि असता पाषाण विष्णु होत नाही पुजा विष्णुला पावते, दगड दगडरुपच राहतो .काशाचि जगदंबेचि मूर्ति केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते, कासे हा धातु धातुच राहतो .तुकाराम महाराज म्हणतात, आशा प्रकारचे आपण ज्याची पुजा करु त्याची पुजा त्याला अर्पण होते संतांचा भक्तिभाव हा पुजेप्रमाने एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ति करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो .


अभंग क्र.140
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥
येरा मान विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥
सर्वभावें झालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥
तुका म्हणे जैसे आवडती हरीदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥

अर्थ

जे विठ्ठल चरणांची सतत सेवा करतात ते माझे सोयरे, सोबती नातेवाइक आहेत .विश्वातील सर्व चरा चरांना मी वंदन करतो; कारण त्यांच्या मध्ये विठ्ठलाचा अंश आहे .जे-जे वैष्णव आहेत त्यांचा मी जीवाभावाने दास झालो आहे, त्यांच्या उच्छिष्टाची अपेक्षा मी करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जे हरिचे दास आहे तेच मला आवडतात, इतरांची मला पर्वा नाही .


अभंग क्र.141
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवासही आटी जन्म घेणें ॥३॥

अर्थ

सर्व जीवांचे पालन करणारी आणि दृष्टांचे निर्दालण करणारी जी आहे, तिचे नाव दया आहे .धर्मनितीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खूण पटली आहे ते निवडले आहे .अनितीने आचरण, उन्मातपना म्हणजेच पाप आहे .तुकाराम महाराज म्हणतात, अधर्माचरणी लोकांमुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो .


अभंग क्र.142
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥१॥
आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥
वियोग तो तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥२॥
तुका म्हणे पायें । डोळा सुखावे त्या न्यायें ॥३॥

अर्थ

आपल्या बालाचे कल्याण व्हावे, अशी मातेची इच्छा असते .तिला आपले बाळ स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असते .बाळाचा विरह झाले असता त्यावर केलेला सौख्यदायक उपचार तिला विषासमान वाटतात .तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी जसे तळपायाला लोणी लावतात, तसे आई-मुलाचे नाते आहे .


अभंग क्र.143
कन्या सासुर्‍यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥

अर्थ

सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते .माझ्याही मनाची अवस्था अशीच झाली आहे.हे विठ्ठला, केशवा, मला केव्हा भेटशील? आई पासुन चुकलेले बाळ हुरूहुरून पहात असते .तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यावाचुन मासा जसा तडफडतो, तसा मी विठ्ठला वाचून तळमळत आहे .


अभंग क्र.144
हातीं होन दावितींवेणा । करिती लेंकीची धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कली । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें । तेल तुप साबण केणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥

अर्थ

काहीलोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात मग मुलीचे लग्न लावतात अशाप्रकारे ते मुलीची विक्रीच करतात. अशाप्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे धर्म नाश पावत चाललेला आहे पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे. अहो या कलियुगामध्ये ब्राम्‍हणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत व इतरांची चाहाडी ते लावतात. अहो ते कपाळाला टिळा देखील लावत नाही पंचांग पाहण्याच सोडून देत आहेत आणि योवनांप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालू लागले आहेत. अहो न्याय देणारा न्यायाधीशाच्या आसनावर बसणारा अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पीडा देत आहेत. तेल-तूप साबण हे आपल्याला किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत. अहो ब्राम्‍हण आता नीच माणसाच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसांच्या हातचा मार देखील ते आता खातात. राजा प्रजेला पीडा देत आहे अगोदरच दुखी असलेला शेतकरी त्याने जर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेत आहे. वैश्यशुद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत त्यांच्याहातून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहे? अंतर रंगांमध्ये लोक वाईट वृत्तीने व काळेबेरे पणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही खूपच स्वच्छ आहोत असे ते लोकांना दाखवतात व स्वज्वळ पणाचे सोंग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा अहो एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही अजून काही का करत नाही तुम्ही निजला आहात की काय, उठा तुमचे ब्रीद आहे तुम्ही धर्माचे रक्षण करता मग आता धर्मरक्षणासाठी लवकर धावा. (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये यौवनी राजसत्तेने किती बिकट परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदास यांनी देखील त्यांच्या काव्य रचनांमधून असेच वर्णन केलेले आहे.


अभंग क्र.145
साळंकृत कन्यादान । पृथ्वी दानाच्या समान ॥१॥
परि तें न कळे या मूढा । येईल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥
आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥
अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोसे । दुःख आतां पुढें नासे ॥५॥

अर्थ

मुलीचे सळंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाइतके महत्वाचे पूण्य आहे .या मुर्खाला”मुलीच्या बापाला” कन्येचा हुंडा घेउन होणारे पाप आज कळत नसले तरी पण पुढे ते पाप भोगताना कळते .धर्माचारणामुळे पोटहि भरते आणि धर्महि घडतो .सत्याने वागणाऱ्या मनुष्यास देवहि सहाय्य करतो याचा अनुभव तुम्ही घ्यावा .अन्न, धन, मानसन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नाशिबाप्रमाने मिळतो .तुकाराम महाराज म्हणतात, कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे, त्याचा शेवटहि दुःखकारकच आहे .


अभंग क्र.146
दिवट्या वाद्य लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥
करूं द्यावें व्हावें बरें । ठायीचें कां रे न कळेचि ॥३॥
वर्‍हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटि का तेलीं ॥४॥
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥

अर्थ

दिवट्यांचि आरास करुण, वाद्ये लावून, सुग्रास भोजन देवुन सुंदर मुलगी (वस्त्रालंकाराने नटलेली) वराला अर्पण करतात .आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात .व्याही, विहिणीचा मानसन्मान करतात, काही कमी पडू देत नाहीत .वराकडिल मंडळी काशीही वागली तरी वाइट वाटून घेवू नये .विहीण मानसन्मानासाठी रागाऊन वर्‍हाडापाठीमागे धावते .तुकाराम माहाराज म्हणतात, लोकांचे असे आचरण म्हणजे नरकात जाण्याची व्यवस्था आहे .


अभंग क्र.147
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥
ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
नरमांस खादली भाडी । हाका हाडी म्हणोनि ॥२॥
अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिलाषिलें ॥३॥
उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥४॥
तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागेना कां ॥५॥

अर्थ

जेणे आपली कन्येचा नवर्‍याला देउन तीचा सौदा केला त्याला ब्रम्‍हहत्या, गोहत्या यांसारखी पापे लागली कन्येचा नवर्‍याला देउन तीचा सौदा केला.त्याने नरमांस भक्षण केल्याप्रमाणे पाप त्याने केले आहे .सोन्याची अश्या धरली .आशा प्रकारच्या पापी लोकांचा उच्चार करतांना माझी जीभ कापते .तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भिक मागून पोट भरावे .


अभंग क्र.148
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥
तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपानाचे समान ॥३॥

अर्थ

कन्येचि विक्रि करणार्‍या पापी मनुष्याची बाजू घेणारा पापीच आहे .असा मनुष्य पापी माणसांची बाजु जर कोणी घेत असेल तर तो फुकट दुख विकत घेतो व पितरांना नरकवास भोगायला लावतो .अश्या पापी मनुष्याला जर राज्याने देखील शिक्षा केली नाही तर तो राजाहि पापी ठरतो .तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये; कारण ते मद्यपानासमान आहे .


अभंग क्र.149
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥८॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥९॥
नाहीं हालवीत माळ । भोंवतें मेळवुनि गबाळ ॥१०॥
आगमीचें नेणें कुडें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥
नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥

अर्थ

लोकांना भुलाविण्यासाठी मी कोणतेही कपटकृत्य करीत नाही .देवा मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो .लोकांना भूल पाडण्यासाठी मी जडीबूटीचा चमत्कार दाखवित नाही .माझी याचना न करणारी वृत्ती पसरवीणारी माझे कोणी शिष्यमंडळी नाहीत .मी मठपति नाही, मला जमिनींची देणगी मिळालेली नाही .दूकान मांडावे तसे देवाची पूजा अर्चा करण्याचे असे उघड प्रदर्शनहि मी मंडलेले नाही .भुत-वेताळाला वष करुण लोकांचे भविष्य जाणणारा मी नाही .लोकांना सांगणारा एक आणि करणारा, असा मी एक दांभिक आणि पुराणिकही नाही .मी अंबाबाईचा उदो म्हणून कोणत्याही माणसाच्या डोक्यावर खापर जाळत नाही.उदो, उदो म्हणत नाचणारा भावाविन कोरडया भक्तीचा वेदांत सांगणारा करंटा पंडितही नाही .हातातील जपमाळ हलवुन, भोवती पाखंडयांचा मेळा जमावणारा मी नाही .आपले महत्त्व वाढविण्यासाठी स्तंभन, मोहन, उच्चाटनासारखे खोटे उपचारही मी करीत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलभक्तिवाचून मी कोणतेही उपचार जानत नाही .


अभंग क्र.150
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥
देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥
तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥

अर्थ

रडून, भुंकुन जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला, तर त्याला महत्त्व नाही .देवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधानी वृत्तीने राहतो .शेतातील धन्याचे दान आणि भिक मागून आणलेल्या धन्याचे दान यामध्ये फरक आहे . तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात धीर, संयम धरल्यास हिर्‍याप्रमाने मोल प्राप्त होते.


अभंग क्र.151
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥

अर्थ

जे आपल्या आनंदात निमग्न असतात, इश्वरचिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते, त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अश्या साधुंच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भव बंध तुटतात.त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्तिभाव ठेव कारण,त्यांच्या ठिकाणी स्थीरबुद्धि , नास्तिक्यभेद करणारी बुद्धि आहे. भूतदया धर मनातील द्वेषाचा कांदा फोडून टाक, शत्रु, मित्र, पुत्र या सर्वां प्रती समभाव धरअरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर अरे तू मी तू पणा चा लहान मोठेपणा चा त्याग कर .शरीर, वाणी, मन आणि बृद्धि शुद्ध असावी.सर्वत्र विठ्ठालाचे स्वरुप पहावे , विनम्रता असावी, अहंकार नसावा .ज्याच्या मनी धन, कामवासना नाही, मान सन्मानाचा मोह नाही , जो समाधानी वृत्तीचा आहे, त्याला संतसज्जन आनंदाने भेटतात .तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा, आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंच्याला विटला आहे, ज्याने आवड निवड टाकून दिली आहे, त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधू दर्शन नित्य घडते .


अभंग क्र.152
सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥

अर्थ

मी परमार्थामधुन निघणारा रस सेवन करतो आणि आणि तो मधुर रस इतरांनाही पण वाटतो, प्रपंच्याच्या रानावानात भटकू नका, माझ्याप्रमाणे हा ब्रम्‍हरस प्या आणि आनंदित व्हा .जो विटेवर समचरण ठेवून उभा आहे, तोच एक जगामध्ये शूर दाता आहे, त्यानेच हा रस मला दिला आहे .याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून रहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील .तुकाराम महाराज म्हणतात , मी त्याचा निरोप्या आहे, तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे .


अभंग क्र.153
जेणें मुखें स्तवी । तेंचि निंदे पाठीं लावी ॥१॥
ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥
गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥
विंचु लाभेविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥

अर्थ

तोंडावर एखादा स्तुती व पाठीमागे निंदा करतो अशी हिण मनोवृत्ती असणारा केवळ दुर्जनच आहे .तो स्वतःजवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खाणाकरा आहे . सुग्रास भोजन गुद्द्वारातुन नरक बनूनच बाहर पडते .तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाला विषाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नांगित विष सांभाळतो .


अभंग क्र.154
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघींच पापें घडतील ॥३॥

अर्थ

आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती व स्तुती केली तर आम्हांला ब्रम्‍हहत्येचे पातक लागेल .आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, म्हणून अन्य देवतांना आम्ही मानत नाही .या वचनामध्ये मी जर खोट बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील .तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील .


अभंग क्र.155
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥
तूं तों उदाराचा राणा । माझी अल्पचि वासना ॥२॥
कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होईं साहे ॥३॥

अर्थ

तहानलेल्याने गंगेचे पाणी पिल्याने गंगाजल कमी होत नाही .हे कृपानीधी, माझे मनोरथ सिद्ध पावु देत .तू उदार राजा आहेस आणि माझे मागने अगदी थोडे आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, तू फक्त माझ्याकडे कृपादृष्टिने पहा आणि मला मदत कर .


अभंग क्र.156
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥
येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवा शिरीं ॥ध्रु.॥
अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥
तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥

अर्थ

संतांचा अनादर करुण जो देवाची पूजा करतो तो अधर्माचरण करतो .देवावर मंत्रपठण करुण टाकलेली फुले दगडा प्रमाणे आहे .दारात आलेल्या भुकेल्या अतिथिला अन्न न देता देवाच्या नैवेद्याल पुरणपोळी करतो .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारची देवाची सेवा करणे म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारचि शिक्षाच् आहे .


अभंग क्र.157
करणें तें देवा । हेचि एक पावे सेवा ॥१॥
अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥
हेंचि एक वर्म । काय बोलिलो तो धर्म ॥२॥
तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥

अर्थ

देवाला संतांची भक्ती, सेवा करणे आवडते त्या प्रकारची भक्ती, सेवा मनुष्याने करावी .कारण संत हे त्या परमेश्वराचा अंग आहे .देवाला आपल्याप्रमाने संतांची पूजा केलेली आवडते , हेच धर्माचे रहष्य व खरे वर्म आहे तेच मी सांगत आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हेच खरे सत्य मी त्रिवार सांगत आहे .


अभंग क्र.158
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥
परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥
उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥

अर्थ

मागे अजाणतेपणाने तुमच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर आता पश्चातापाने प्रायश्चित्त घेऊन भक्तीमार्ग धरल्यास आम्ही तुमच्या सर्व चुका माफ करतो .पुन्हा जर अशी परस्त्री अभिलाषा धरल्याचे पाप केले तर मातेशी संग केल्याचे पाप लागेल .चांगला उपदेश केल्यानंतरहि जो सुधारणा करत नाही, त्याचे तोंडहि पाहण्याची आमची इच्छा नाही .तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही केलेले उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या .


अभंग क्र.159
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥३॥

अर्थ

दुसर्‍याचा घात झालेला पाहुन ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहे असेच समजावे .शीघ्रकोपि मनुष्य अंती नरकाला जातात .ज्याला परनिंदा, वाइट बोलने ऐकायला, बोलायला आवडते, तोहि पापी आहे .तुकाराम महाराज म्हणतात , भांडखोर व ज्यच्य तोंडाला धैर्य नसलेला मनुष्यही असाच पापी असतो .


अभंग क्र.160
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥
जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥२॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥
जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥
तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥

अर्थ

मूळ रामायाणाच्या प्रारंभी मारुती रायाने सितेचा शोध केला, ही कीर्ति वर्णीलि आहे .असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे .पातळात् जावून त्याने राक्षसांच्या देवीची फजीती केली .अहिरावण-महिरावण या राक्षसांनी राम लक्ष्मणाला चोरून नेले होते; त्या दृष्टांचा वध करुन मारुतीरायाने राम-लक्ष्मण यांना सोडवून आणले .तो हनुमंत रामा समोर हात जोडून उभा आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या वायुसुताचा जप केला तर पाप नाहीशी होतात .


अभंग क्र.161
काम बांदवडी । काळ घातला तोडरी ॥१॥
तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥
शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥
रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥

अर्थ

देवा, ज्या मारुतिरायाने कामाला जिंकून बंदीवासात ठेवले, कळाला बेडया ठोकल्या .त्या कपिकुळातील हनुमंताला माझा दंडवत असो .ज्याचे शारीर वज्रा सारखे आहे, आपल्या शेपटीने जो ब्रम्हांडाला वेढा घालू शकतो .तुकाराम महाराज म्हणतात अश्या रामरायाच्या सेवका, तुला मी शरण आलो आहे.


अभंग क्र.162
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें शोधन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥

अर्थ

महाबलवंत, महापराक्रमी अशा हनुमंताने रावनाची दाढी जाळली होती .त्यांना मी वारंवार, निरंतर नमस्कार करतो .महान अश्या समुद्रावर उड्डाण करुण लंकेचे निरिक्षण केले .तुकाराम महाराज म्हणतात, रावणाची लंका ज्याने जाळली, त्या मारुतिरायाचा पराक्रम धन्य होय .


अभंग क्र.163
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥

अर्थ

हनुमंता, तुम्ही प्रभु राम चंद्रांचे सेवक आहात.म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे .हे श्रेष्ट वीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या आम्हाला दाखवा .तुम्ही शुर वीर धैर्यवान आहात.पुरुषार्थ करने तुम्हीच जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता .तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनिमातेचे सुपुत्र आहात .


अभंग क्र.164
धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडेचि ना ॥ध्रु.॥
धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥

अर्थ

जो गृहस्थ पत्नीच्या आहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात, त्याला इहलोक व परलोकि मान मिळत नाही .जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करत असतो, त्याचा हातून अतिथी- पूजा घडत नहीं, त्या मनुष्याचाहि धीक्कार असो .ज्याला आळस,निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषयाचाहि धिक्कार असो .जो मनुष्य विवेक आणि वैराग्याविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाहि धीक्कार असो .तुकाराम महाराज म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालनाराहि अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो .


अभंग क्र.165
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचें हरीचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥
विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥
अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥
तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥

अर्थ

हा नरदेह वाया जावा असे तुला वाटेत असेल तर तू खुशाल सारिपाट द्यूत खेळत रहा .मग हरिचे नाम तुझ्या मुखी येणार नाही, तू अज्ञानाच्या निद्रित असल्यामुळे राम तुला भेटणार नाही, त्यामुळे तुला जन्मों जन्मीचे दुःख भोगावे लागेल .प्रपंच्यातील विषयसुखाची लंपटता, परस्त्री आसक्ति या सर्व अधोगतिला जाणाऱ्या वाटा आहेत .नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखी एक मार्ग आहे .तुकाराम महाराज म्हणतात, नारादेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लाउन घे, नाहीतर नारजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील .


अभंग क्र.166
अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥
नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाखांडिया ॥ध्रु.॥
जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥
तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥

अर्थ

सर्व चराचर सृष्टिमध्ये ब्रम्ह भरून राहिले आहे, म्हणजे तो पाषाणाच्या धातुच्या मूर्तिमध्ये कसा नसणार? पाखंडी किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग ? संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती ‘शब्दपंडीतांच्या मनी नसल्यामुळे त्याना अनुभवाचे महत्त्व कळणार नाही .तुकाराम महाराज म्हणतात, संत सगुणभक्तीचा अनुभव खळांना नसल्यामुळे ते सगुण भक्तीचा निषेध करतात .


अभंग क्र.167
एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥
दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥
एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥
एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥
एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥
वर्म पोटीं एका । फळें दोन सांगे तुका ॥५॥

अर्थ

एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करतांना तटस्त बसली आहे, तर दूसरी व्यक्ती आळसामुळे तटस्त बसली आहे .अश्या दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतिल फरक जाणकारालाच कळेल .एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटुन ध्यानस्थ बसतो आणि दूसरा बसून झोप घेतो .एक सर्वस्वाचा त्याग करुण साधू होतो, तर दूसरा पोट भरण्यासाठी साधू होतो .एकजण देवाची भेट होण्यासाठी भक्ती करतो, तर दूसरा पोटासाठी भक्ती करतो .तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात .


अभंग क्र.168
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥
आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥
देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥
तुका म्हणे भावें । माझे मज समजावें ॥३॥

अर्थ

लहान मुलाला आपला बाप श्रीमंत आहे की गरीब आहे हे कळत नसते .आपल्याला एखादी वास्तु देणे शक्य होईल की नाही हे त्याला समजत नसते .एखादि वस्तु पाहिली की हट्ट करुण ती घेणे एवढेच त्याला कळते .तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनातहि विठ्ठलाविषयी प्रती असाच भाव आहे.तो त्याने समजून घेऊन, मला जाणावे .


अभंग क्र.169
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥
नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवी आस ॥२॥
हें ना तैसे जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥

अर्थ

देवाचे भजन-पूजन हे माझ्या नाशिबि नाही, असे म्हणत, संसाराची आसक्ती धरणारे लोक असतात .अश्या साधुच्या साधुत्वाचा तुकाराम महाराज धिग(धिक्कार) करतात, त्याचे मन विटाळले आहे, असे म्हणतात .अश्या साधुच्या ठिकाणी वैराग्याचा लवलेशही नाही; त्याच्या ठिकाणी उलट धनाची अपेक्षा असते .तुकाराम महाराज म्हणतात, साधुच्या या आसक्तीमुळे त्याचा जन्म वाया जातो .


अभंग क्र.170
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरीकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥
अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग । करी कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महामेरु ॥४॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥

अर्थ

एकादशीला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे . एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत .एकादशीला जो पाणाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल.त्याला काळ खाऊन टाकिल .या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जडतील .या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरु पर्वतही लहान वाटतो .तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो .


अभंग क्र.171
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥
आपुलें देऊनी आपुलाचि घात । शन करावा थीत जाणोनियां ॥२॥
देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मार्ग मोडूं नये ॥४॥

अर्थ

एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो अर्ध्या पुण्याचा वाटेकरि होतो, पण व्रत मोडवले गेले की ते दोघेही नरकात जातात .सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केली की मानसंन्नमान मिळतो, चोरांची संगती केली तर शिक्षा मिळते .आपल्या जवाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये , आपले हित ओळखावे .सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वाराणसीला जाण्यास मदत करावी-पण चोराला ज्योतिषाने चंद्रबळ (चोरीची वेळ) सांगू नये .तुकाराम महाराज म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्ञयाग हे भक्तीमार्ग आहेत.हे कधी सोडु नये .


अभंग क्र.172
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥
अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥
अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥
तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥३॥

अर्थ

पंढरी क्षेत्र ही भक्तांच्या इनामाची पेठ आहे,तेथील सर्व मार्ग भक्तांनि भरून वाहत आहेत .मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारि पुरुषार्थ स्वरुप या पेठेत विकावयास आले आहेत, त्याचा लाभ होण्याचे शुभ शकुन होत आहेत .या पेठेतील व्यापार्‍याच्या सर्व समस्या दूर झाल्याने देणे-घेणे सहजसोपे झाले आहे .तुकाराम महाराज म्हणतात कि, या पेठेत् येणाऱ्या भक्तानां आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो .


अभंग क्र.173
वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥
विठोबाचें नाम सुलभ सोपेरें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥३॥

अर्थ

वेदपठण करणाऱ्या सर्व पंडिताना वेदाचा सार कळतोच असे नाही, इतरांना वेद पाठणाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार काळण्याचा संबंधच येत नाही .विठ्ठलाचे नाम हे सुलभ-सोपे आहे, भवसागर पार करणारे आहे, ते घेण्याचा अधिकार सर्वांना आहे .मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड परिपुर्णरीत्या साध्य होत नाही, तर इतराना कसे समजणार ? .तुकाराम महाराज म्हणतात, वेदांमधील विधिनिषेध लोप पावल्यामुळे या मार्गाचा उच्छेद झाला आहे, त्यामुळे कलियुगात नामभक्तीवीणा दूसरा पर्‍याय नाही .


अभंग क्र.174
विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसानी अंतीं ॥ध्रु.॥
बहु अतिशय खोटा । तर्के होती बहु वाटा ॥२॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥

अर्थ

ज्या प्रमाणे शास्त्राने म्हणजे विधीने सांगीतलेल्या नियमाने विषयाचे सेवन केले तर तो त्यागाच असतो.सर्वात मुख्य धर्म म्हणजे चित्ता मध्ये भगवंत असणे होय.व तो हि आदी अंती असावा.तर्क आणि कुतर्क यांना अनेक वाटा आहे पण त्या अतिशय खोट्या आहे.तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणी पूर्ण पणे भाव असेल तर तो नक्की कृपा करणार.


अभंग क्र.175
येथीचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥१॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥३॥

अर्थ

पृथ्वीतलावरील क्षणभंगुर अलंकाराणे केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे .खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो त्यामुळे आम्ही सर्व लोकांना त्याच मार्गाकडे वाळवु , तेथे शास्वत सुखाचा भांडार मिळतो .इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी त्याविषयी अधीक काही सांगुन तुम्हाला त्याच्या मोहात पाडत नाही .तुकाराम महाराज म्हणतात , वैकुंठाचा मार्ग चालविणारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत .


अभंग क्र.176
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोलें बोल । धनी विठ्ठल सन्निध ॥ध्रु.॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गाबाळ ॥३॥

अर्थ

मी प्रपंच्याकडून परमर्थाकडे जाणारी वाट उजळविण्यासाठी व सत्य-असत्य सांगण्यासाठी आलो आहे .माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे.तो जसे बोलवितो, तसे मी बोलतो .त्यामुळे माझ्या विठोबाच्या सल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नका .तुकाराम महाराज म्हणतात, की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी गबाळ साधने आम्हाला चालणार नाही .


अभंग क्र.177
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥

अर्थ

बोलताना डोळसणाने, धर्मसंकेतानुसार बोलावे . नाही तर बोलू नये ते आणि जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील .आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ? .तुकाराम महाराज म्हणतात , शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढाया मारतो .


अभंग क्र.178
बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥
विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥
सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥
गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥
तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥

अर्थ

बरे झाले देवा, तू मला कुणबी मध्ये जन्माला घातलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या गर्वाने मेलो असतो .थोर केले नाहीस हे बारे झाले, आता मी तुझ्या पायाशी नाचू शकतो .माझ्याजवळ कोणतीही विद्या असती तर मला अहंकार झाला असता .त्या अहंकारामुळे माझ्या हातून संतासेवा घडली नसती आणि हा नरदेह वाया गेला असता .त्या विदयेच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व, ताठा आला असता; त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालु लागलो असतो .तुकाराम महाराज म्हणतात, थोरापणामुळे अभिमान, अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य अंती नरकात जातो .


अभंग क्र.179
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥
आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥
तुका म्हणे नाद । झाला अवघा गोविंद ॥३॥

अर्थ

मनुष्याला सर्व सुख देणारा नारायण आहे आणि उपभोगणाराहि तोच आहे .त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागच् राहिली नाही .आपले डोळ्यांना दिसणारे रूप हे सर्व काही तोच आहे .तुकाराम महाराज म्हणतात, मुखातून निघणारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान, शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे .


अभंग क्र.180
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥
तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥
पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझा करावा कुढावा ॥३॥

अर्थ

हे देवा माझ्यावर कृपा करुन जे खरे आहे ते मला दाखवा . असे जर केले नाही तर तुम्ही दयावंत कसले पण तुम्ही दयावंत आहात हि तुमची कीर्ती तर सर्व जगामध्ये आहे .देवा आम्हा भक्तांना जर तुम्ही तुमच्या डोळया देखत काळाच्या हाती आम्हाला देत असाल तर तुमची कीर्ती ति कसली? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे रक्षणखरोखर तुम्ही करा.


अभंग क्र.181
ठायींची ओळखी । येईल टाकुं टाका सुखीं ॥१॥
तुमचे जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥
ठेविला तो ठेवा । अभिलाष बुडवावा ॥२॥
मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥

अर्थ

हे देवा तुमची व माझी हि मुळची ओळख आहे.ही गोष्ट तूम्ही विसरत असाल तर विसरा.पण त्यामुळे तुमचे इनाम जाईल आणि माझ्या कपाळी पतन येईल.म्हणजे हे असे होईल एखाद्या जवळ आपला ठेवा ठेवला आणि त्याने तो ठेवा अभिलाषे पोटी बुडवावा.तुकाराम महाराज म्हणतात आहो दातारा या गोष्टीचा विचार तुम्ही मनात का करत नाही?


अभंग क्र.182
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा । चिंतन हे तुझी सेवा ॥३॥

अर्थ

माझ्या भक्तीभावामुळे तुझे रूप, रहस्य मला सापडले आहे .कासव जैसे आपले अवयव पोटाशी आवळून घेतो, तसे तुझे रूप मी ह्रदयाशी धरले आहे .या आपल्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होणार नाही.तुझ्या दृष्टिशी माझी दृष्टी एकरूप होईल .तुकाराम महाराज म्हणतात, आता यापुढे तुझे चिंतन आणि सेवा हेच माझे जीवन, हेच सत्य आहे .


अभंग क्र.183
गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥
वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥
कमाईच्या सार । जाति दाविती प्रकार ॥२॥
तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥

अर्थ

गव्हाचे अनेक खाद्य प्रकार तयार करता येतात .स्वयंपाक करणारी जर सुगरण नसेल तर ती गव्हाचा नास करेल .म्हणून पदार्थाचे गुणधर्म व त्याच वर्म ओळखून कुशलतेने त्याचा उपयोग करून घ्यावा . अनेक प्रकारच्या जातीचे धान्य असतात व त्याचे विविध प्रकारचे खादय पदार्थ तयार करणे यात खरी कुशलता आहे.तुकाराम महाराज म्हणतात, की प्रत्येकातील गुणाला महत्त्व दिल पाहिजे, तेथे नुसती बडबड उपयोगाची नाही .


अभंग क्र.184
पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥
नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥
तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥३॥

अर्थ

संतसज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो .त्यामुळे माझी वाणी पुण्यसंचय करुण घेणार आहे, हा फुकटचा लाभ दवडण्यास ती तयार नाही .संतचरणाजवळ खरा भक्तीभाव ठेवला असता जीवाला विसावा मिळतो .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या प्रकारचे संतांच्या नामस्मरामुळे पाप नाहीसे होते .


अभंग क्र.185
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥
दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥
दाखविले परी नाहीं वरीजितां । आला तोचि चित्ता भाग वरी ॥२॥
तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळ बीजमात्र ॥३॥

अर्थ

देवाच्या, संतांच्या संगतिने जीव देवस्वरूप होतो; पण प्रपंचिकाच्या संगतीने मात्र अध:पतन घडते .प्रपंच्य व परमार्थ या सदगति व अधोगतिच्या दोन वाटा आहेत, या मार्गाने जे जिव जातील ते आपल्या मार्गाप्रमाणे पाप-पुण्याचा संचय करीत जातील .आम्ही दोन्ही मार्ग लोकांना दाखवितो, ज्याला जो मार्ग योग्य वाटला, त्या मार्गाने तो गेला .तुकाराम माहाराज म्हणतात, ज्या जीवाला परमार्थाची आवड आहे, त्यालाच पारमार्थिक उपदेश केला तर तो सफल होतो .


अभंग क्र.186
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥
ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तट ॥ध्रु.॥
लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥
तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥

अर्थ

परमेश्वर आपल्या भक्तांच्या अज्ञानाचे मूळ शोधून त्यांना ज्ञानप्राप्ती करुण देतो; त्यामुळे त्याचे वाटोळे होते .असा तुझ्या नावलौकिकाचा बोभाटा संतानी करून ठेवला आहे .जो प्रपंच्याला सोडून परमार्थ मार्गाला आला, तो सामाजीकदृष्टया लौकिकाबाहेर गेला .तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरी गुण ज्या जीवाला लागला त्याला शून्य ब्रह्मावस्था निर्माण झाली .


अभंग क्र.187
वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥
काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥
अंगी दैवत संचरे । मग तेणे काय उरे ॥२॥
नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥३॥
जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥४॥

अर्थ

वैद्यानेच जर माणसाचा जीव वाचवला असता तर देवाचे ध्यान कोणी केले असते.मनुष्य देह जरी कार्यशील असला तरी सारे काही प्रारब्धावर असते.जर अंगात दैवताचा संचार होतो तर तेथे काही उरत नाही.नवसाने जर मूल बाळ होत असेल तर नवरा करायची काय गरज.तुकाराम महाराज म्हणतात जो सर्वांचा दातार आहे हा विठ्ठलच हे सर्व विचार जाणत आहे.


अभंग क्र.188
मार्गी बहुत । याचि गेले साधुसंत ॥१॥
नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥
झळकती पताका । गरुडटके म्हणे तुका ॥३॥

अर्थ

या पूर्वी या भक्तीमार्गाने अनेक साधुसंत गेले आहेत .प्रपंचातील आडवाटीने तुम्ही जावु नका , असे पुराणे गर्जना करून सांगतात .पुढे गेलेल्या संतानी या वाटा स्वच्छ केल्या आहेत, त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपटमार्गावरून जाता येते .तुकाराम महाराज म्हणतात , या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांच्या खांद्यावर गरुड चिन्हांकित पताका झळकतात.


अभंग क्र.189
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥
पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥
चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥
मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुल्लती । शूर उठावती । एक एका आगळे ॥३॥
नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥
आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥
मरण मुक्ती वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥६॥
तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥

अर्थ

साधकाहो, आपल्या डोळ्यांनी आपण कार्तिकिचा सोहळा पाहू चला.पंढरीच्या जवळ साक्षात वैकुंठच् आहे .तेथे हरिनामाचे अपार पिक पिकले आहे.प्रेम गगनात मावेनासे झाले आहे.सारी पंढरी त्यात मस्त झाली आहे.घरोघरी सुकाळ झाला आहे .भक्तगण स्थिरपणे चालले आहेत.गरुडध्वजांचे भार त्यांच्याजवळ आहेत.टाळ,मृदुंगाच्या नादात गंभीरपने नामघोष करीत आहेत .हत्तीचा कळप जसा डोलत असावा , त्याप्रमाणे एकाहुन एक श्रेष्ठ असे विष्णुभक्त आनंदाने डोलत आहेत .श्रीहरिच्या नामामृताच्या घोषत भक्तसमुदाय कोंडाटूंन गेला आहे आणि अश्या प्रकारे हे विष्णुदासांचे सैन्य आलेले पाहुन कळिकाळालाही कंप सुटला आहे .पंढरीतील वाळवंटामधील हे सुख पाहुन ब्रह्मादिकदेवहि त्याची इच्छ करीत आहेत, हा मृत्युलोक धन्य आहे, येथील लोक भाग्यवंत आहेत, असे ते म्हणतात .काशीत मरण आलेतर मुक्ती मिळते, गया वर्जन केल्याने पितृऋनातून मुक्तता मिळते, पंढरीत विठ्ठालाच्या चरणापाशी मात्र अशा प्रकारची उधारी नसते तिथे सर्वकाही रोखण्याचा मिळते .तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला चिंता करण्याचे कारण काय? सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही अपेक्षा करणार नाही .


अभंग क्र.190
जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥
सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥२॥
नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥३॥
उपजोनि संसारीं । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥
ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥५॥
तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥
तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । तो अधम जन्मांतरिचा । जया पंढरी नावडे ॥७॥

अर्थ

काही पातके अशी आहेत, की शास्रे काढून पाहिले तरी त्यां पातकांचा परिहार होण्यासाठी प्रायचित्त मिळत नाही.परंतु पंढरीचे दर्शन घेतले की , घोर अशी पातके नाहीशी होतात .धन्य ते भिमातिर ! धन्य ते चंद्रभागा तीर्थ ! पद्मतीर्थाच्या ठिकाणी विठ्ठलवीर राहत असून ते वेणुनादाचि क्रीडा करतात.ती सर्व स्थान धन्य होत .पंढरी हे सर्व तीर्थाचे माहेर आहे.भूतलावरि वैकुंठ आहे.तेथे सतत नामगजर चालु असतो.तो एकूण असुर, काळही भीतीने कापतात .त्याला उपमा देण्यास दूसरे स्थळ नाही.ज्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले ते धन्य होतात .जगात जन्माला येऊन एकदातारि पंढरी पाहावि.देवभक्ताचे (पुंडलीकाचे) दर्शन घेतल्यानंतर महापातकांना जागा कशी उरेल ? अशी ही विष्णुची नगरी आहे.येथील नर-नारी चतुर्भुज आहेत.सूदर्शनाचे फेरे त्यांच्या भोवती सुरु असतात.त्यामुळे कळीकाळाला तेथे प्रवेश नाही .तेथील सुखाचे वर्णन करण्यास माझी बुद्धि असमर्थ आहे.जे पंढरपुरला जातात, त्यांना प्रत्यक्ष वैकुंठच् पावते .तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दांवर ज्याचा विश्वास नाही,ज्याला पंढरी आवडत नाही, तो जन्म जन्मांतरिचा अधम होय .


अभंग क्र.191
एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥
बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥
दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥
तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥

अर्थ

एखादा मनुष्य अडानिपणामुळे स्वतःची फजीती करून घेतो, तर दूसरा ज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडून जातो .एक वेडा आती बडबड करतो, तर दुसरा मुका आहे; त्यामुळे दोघांचाहि उपयोग नाही .एक विद्या-अविध्येच्या द्वंद्वात सापडल्यामुळे त्याला ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी परिस्तिति प्राप्त होते .तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पापकर्म तुला परमार्थाचे सत्य ज्ञान कळू देत नाही .


अभंग क्र.192
म्हणवितों दास । मज एवढीच आस ॥१॥
परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥
बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥
तुका म्हणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला, मला तुझा दास म्हणवुन घेण्याची इच्छा आहे .खरा दास कसा बनतो, याचे रहस्य मला माहीत नाही; पण तू आपला पतितांना पावन करण्याचा धर्म पाळ आणि मला तुझा दास करून घे .माझी बडबड म्हणजे भक्तीभावाविन केलेली पोकळ वाचळता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे ढोंग मी करू शकतो; पण भक्तीचे योग्य वर्म मी जाणत नाही .


अभंग क्र.193
पूजा समाधान । अतिशय वाढे सीण ॥१॥
हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
पहिले पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥
तुका म्हणे माथा । पायीं माझा तुम्हां संतां ॥३॥

अर्थ

साधुची वृत्ती समाधानी असली पाहिजे अन्यथा लोकांकडून अपमान होतो .हे संतसज्जनहो, तुम्हीही अशीच वृत्ती ठेवा.नितीने वागणे हेच साधुत्व आहे .परमार्थ तुम्ही सहजपणे केला पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या नीतिमान संतांच्या पायांवर मी माझा माथा ठेवतो .


अभंग क्र.194
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया शेवटीं । जागे लटिकें सकळ ॥१॥
वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरी आहे ॥ध्रु.॥
सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥
तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥

अर्थ

अज्ञानाच्या निद्रेत मला जन्म-मृत्युने वेठिला धरले होते, ब्रम्‍हज्ञानाची जागृति आल्यावर शेवटी या गोष्टी खोट्या ठरल्या.मी विनाकारणच व्यर्थ हरीला जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी करून भाकणे कारण खरे पाहिले तर हे जग म्हणजे एक प्रकारचे स्वप्नच आहे, हे मला नंतर कळुन चुकले, की ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरीब-श्रीमंत असा भेदाभाव केला जात नाही .प्रपंच्यात सुख दुःख, वेदना सहन केल्या; पण त्या स्वप्नवत वाटल्या.प्रपंच्यातील दुःखमुळेच परमार्थाकडे वळलो आणि ब्रम्‍हज्ञानाची प्राप्ती झाली .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्यातुन बाहेर पडण्यासाठी मला संतांनी मोलाची मदत केली, त्यामुळे मला ब्रम्‍हज्ञान प्राप्त झाले, नाहीतर हरिभक्तीविना मी तसाच प्रपंच्यात अडकून पडलो असतो .


अभंग क्र.195

आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥
याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥
काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥२॥
तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांठविलें ॥३॥

अर्थ

एखादा मनुष्य अंतकरणात राक्षसी स्वभावाचा, निर्दयीअसेल तर मग तो कितीही श्रेष्ट, उच्च कुळातील असला तरी व्यर्थ! कारण कुळापेक्षा गुणांना ज्यास्त महत्त्व आहे.पीतळ आणि सोने पिवळ्या रंगाचे असले तरी पितळाला डाग पडतात, सोन्याला नाही,सोने या धातूच्या अंगाचे गुणच येथे साक्षी ठरतात .तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने भक्तीचे नवनीत पोटात म्हणजे अंतकरणात साठविले आहे, तो श्रेष्ठ, उच्च जातिकुळातील मानाव आहे, त्याची भेट घ्यावी .


अभंग क्र.196
वासुगीच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांग वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।
मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।
उल्लंघिले आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । येईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥

अर्थ

रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला वासुकीच्या वनांमध्ये आणून ठेवले त्यावेळेस सीता शोक करत त्रिजटेला म्हणते हे त्रिजटे का बरे रघुनाथ माझ्यापासून दूर अंतरले असतील, मी माझ्या पर्णकुटी मध्ये होते दुष्ट रावण तेथे आला व माझे हरण केले आणि अवघड अशा अलंकापुरी मध्ये मला त्याने का बरे आणले? हे माझे सखये त्रिजटे मला सांग माझे रघुनाथ मला भेट देतील की नाही, रघुनाथाना भेटण्यासाठी माझे मन फार उताविळ झाले आहेत परंतु ते तर माझ्यापासून खूप दूर आहेत आणि आता माझा प्राण देखील या कुडीत राहीनासा झाला आहे. हे सखये मी असे कोणते दुष्ट आचरण केले होते किंवा कोणाची तीर्थ किंवा व्रत भंग केले होते काय, हे सखे मी कधी गाई आणि वासरू किंवा पत्नी आणि पती यांची ताटातूट केली होती काय मला माझे संचित काही कळेनासे झाले आहे का बरे मला रघुनाथांच्या चरणांचे अंतर पडले असेल? सोन्यासारखी कांती हरणा मुळे मी फसले मला वाटले त्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालावे त्यामुळे मी रघुनाथ यांना त्या हरणाच्या पाठीमागे पाठविले. लक्ष्मणाच्या आज्ञेचे उल्लंघन केले मला काय माहित त्या दृष्टा ची माया काय आहे, मी लक्ष्मण रेषेचे उल्लंघन करताच रावण रुपी कुत्रे यांनी माझे अपहरण केले. हे माय एका रघुनाथा वाचून मला दुसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही. मला सोडवण्यासाठी जटायू पक्षाने धाव घेतली त्यावेळी रावणाने जटायू च्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले जटायू पक्षी पाण्याच्या वेढ्यामध्ये पडला त्यामुळे माझेही तेथे काहीच चालले नाही. तुकाराम महाराज म्हणतात जनकाची मुलगी जानकी अशाप्रकारे दुःखाने वेढली गेली हरणाची व पाडसाची जशी चुकामुक व्हावी अशा प्रकारची स्थिति जानकीची झाली त्यावेळी त्रिजटा सीतेला शांत करत म्हणाली सिते शांत हो तुकयाचा स्वामी राम अलंकापुरी ला येईल आणि संपूर्ण अलंकापुरी जिंकून घेईल.


अभंग क्र.197
विट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥
तरीच तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥
आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥

अर्थ

ज्याचा कंटाळा येणार नाही किंवा जे पोटाला बाधणार नाही, असे अन्न शिजवावे .तरच ते गोड वाटेल व् पचेल .असे रसदार, चविष्ट, पाचक अन्न पोटात गेले तर ते आपल्या शरीरावर प्रभाव दाखवेल .तुकाराम महाराज म्हणतात, असे शुद्ध अन्न सेवन केल्याने शुद्ध भाव, शुद्ध चित्त निर्माण होते .(म्हणजे कर्म असे करावे की जे चांगले असेल व आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला चांगले मिळेल व दुसऱ्याला ही त्याचा फायदा होईल असेच आपण कर्म करावे.


अभंग क्र.198
नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥
पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥
लटिक्याचे पुरीं । गेलों वाहोनियां दुरी ॥२॥
तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥३॥

अर्थ

मी परमार्थाविषयी सावचित्त नव्हतो म्हणून माझे अहित झाले .संसार वाढविता वाढविता मला नामाचा विसर पडला .प्रपंच्यातील खोट्या लोभाला भुललो त्यामुळे पर्मार्थापासून दूर गेलो .तुकाराम महाराज म्हणतात , विठ्ठलरूपी नाव(नौका) सापडल्यामुळे या भवसागरातून आम्ही तरुण जाऊ .


अभंग क्र.199
अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥
आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥
देखोनि जीवन जरि जाय तहान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥
देखोनियां छाया सुख न पाविजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥
हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावेंचि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥५॥

अर्थ

अन्नाच्या वासाने जर पोट भरले असते तर स्वयंपाक करण्याचे कारणाच काय होते .नुसत्या शब्दाने कधी प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही; त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रामाचे सतत स्मरण करा .पाणा फक्त पाहुन जर कोणाची तहान भागत असेल तर पाण्याचा साठा का करावा ? वृक्षाची सावली दुरुण पाहुन त्याचा अनुभव घेता येत नाही, त्याखाली बसावे लागते .तसे हरिनाम प्रत्यक्ष गावे, एकावे लागते, त्यावर दृढ़ भक्तीभाव ठेवावा लागतो .तुकाराम महाराज म्हणतात, तू जर दृढ भक्तीभावाने हरिभक्ती केलीस तर तू निश्चितच मुक्त होशील .


अभंग क्र.200
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥
ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥

अर्थ

आम्हाला विठ्ठलाच्या पायाजवळ काय कमी आहे; आम्हाला तेथे कोणतीही उणीव भासत नाही .हे सुख सोडून इतरांच्या दारोदारी सुख शोधण्यासाठी आम्ही भिकाऱ्यासारखे भटकत नाही .माझ्या विठ्ठला पेक्षा बलवान दुसरा कोणीही नाही .तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठालाच्या गावी मोक्षाची कोठारे आहेत, त्याची लयलुट करा .


सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200 समाप्त .

9 thoughts on “सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200”

  1. Jayshree Bhoite

    तुकाराम पोथी अर्थ सहित वाचायला मिळाली. ज्ञानेश्वरी पण अर्था सहित आहे. अजून बरीच माहिती आहे. फारच छान ब्लॉग आहे. तुम्ही ब्लॉग बनवला त्या साठी जी मेहनत घेतली आहे ती खरंच कौतुकस्पद आहे

  2. खुप छान तुकाराम महाराज गाथा भावार्थ
    वाचुन आनंद वाटतो असेच आनखी भावार्थ पाठवा
    तुमचे मनपूर्वक अभिनंदन
    ह.भ.प.श्री संदिपबापू दत्तात्रय गावडे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *