dnyaneshwari audio

ज्ञानेश्वरी अर्थासहित

ज्ञानेश्वरी (dnyaneshwari) अर्थासहित, विडिओ आणि ऑडिओ सहित वाचण्यासाठी खालील ज्ञानेश्वरी अध्यायांवर क्लिक करा


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय २


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ३


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ४


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ५


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ६


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ७


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ८


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ९


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १०


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय ११


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १२


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १३


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १४


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १५


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १६


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १७


सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय १८


संत ज्ञानेश्वर

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ह्यांनी गीतेवर रचिलेली टीका. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी ह्याग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे तथापि संत नामदेवांनी ह्या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशीनावे पुढीलांनी रूढ केली असावीत.

शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस एक कालनिदर्शक ओवी आहे :

शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ (राजवाडे प्रत, १८११).

तथापि ही ओवी ज्ञानेश्वरांची नसावी, अशी शंका अभ्यासकांनी उपस्थित केली आहे. ह्या शंकेमागची कारणे अशी : (१) ज्ञानेश्वर आपला उल्लेख सर्वत्र ज्ञानदेव असा करतात. असे असता, ह्या ओवीत मात्र ‘ज्ञानेश्वरें’ असा उल्लेख आढळतो. हे अपवादात्मक आहे. (२) त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथांत कालोल्लेख आढळत नाही. येथे मात्र तो आढळतो. (३) अठराव्या अध्यायात उपर्युक्त ओवीच्याच आधी ग्रंथ समाप्तीची एक ओवी येते, ती अशी :

पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती ।
सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥ (राजवाडे प्रत, १८१०)

ग्रंथसमाप्तीची ही ओवी झाल्यानंतर पुन्हा एक ओवी रचण्याचे प्रयोजन कळत नाही. ह्या शंकांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. ज्ञानेश्वरी लिहून घेणाऱ्या सच्चिदानंदबाबांनी ही ओवी लिहिली असण्याचा संभवआहे तथापि ह्या ओवीतील कालोल्लेख मात्र संशयातीत आहे. ज्ञानेश्वरीजेथे सांगितली, ते निश्चित आहे. तसा स्पष्ट उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे.( राजवाडे प्रत, १८०२–०६).

ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर तीत पुढे अनेक अपपाठ शिरल्यामुळे ⇨ संत एकनाथांनी (१५३३–९९) तिची शुद्ध प्रत तयार केली आणि तीत अपपाठ घुसवणाऱ्यांना असा इशारा देऊन ठेवला :

ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाठी ।
तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली॥

ज्ञानेश्वरीची एकनाथपूर्वकालीन विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. तिची जुन्यात जुनी प्रत मिळविण्याचे अनेक प्रयत्न झाले व अद्याप होत आहेत. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी मिळवलेली प्रत जुनी मानली जाते तथापि १९७७ साली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे ह. भ. प. नानामहाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरीची जी प्रत भाविक आणि वारकरी ह्यांच्यासाठी तयार केली, ती आधारभूत मानून आणि तिच्यात अत्यावश्यक ते बदल करून ती प्रसिद्ध केली.

पूर्वी महाराष्ट्र शासनाने ज्ञानेश्वरीच्या ज्या प्रती प्रसिद्ध केल्या होत्या, त्यांसाठी ह. भ. प. सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेली इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संशोधिलेली ज्ञानेश्वरीची प्रत आधारभूत मानली होती. एक गोष्ट स्पष्टपणे नमूद केली गेली आहे आणि ती म्हणजे आजवर निर्विवादपणे ज्ञानेश्वरीची म्हणता येईल, अशी अस्सल प्रत मिळालेलीच नाही.

ज्ञानेश्वरीच्या निर्मितीला १९९० मध्ये सातशे वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने जे उपक्रम संयोजिले गेले, त्यांत ज्ञानेश्वरीची गीतारहित आवृत्ती प्रकाशित करणे हा एक होता. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध आवृत्त्यांत गीतेतल्या एकेका अध्यायावरती एकेका श्लोकावर ज्ञानेश्वरांनी केलेले ओवीबद्ध निरूपण, अशी मांडणी सामान्यतः केलेली आढळते. गीता आणि ज्ञानेश्वरी यांत ज्ञानेश्वर द्वैत मानीत नव्हते. गीता आणि ज्ञानेश्वरी ह्यांप्रमाणेच गुरू आणि शिष्य, वक्ता आणि श्रोता, कृष्ण आणि अर्जुन ही त्यांच्या मते द्वैते नसून शिवशक्तीची युग्मे होती. त्यामुळे गीतारहित ज्ञानेश्वरीच्या कल्पनेमागे गीतेचा अधिक्षेप नाही. गीतेचे महत्त्व कमी करण्याचा हेतूही मुळीच नाही, असे मत मांडले गेले आहे.

ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे. निवृत्तिनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन आहे तो एक श्रोतृसंवाद आहे. ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधलेला आहे. तो संवाद असा आहे की, ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत, असे आपल्याला वाटते पण असे असूनही ज्ञानेश्वरी कधी बहिर्मुख होत नाही तिची अंतर्मुखता ती सोडत नाही.

गीतेवर अनेकांनी टीका लिहिल्या आहेत. उदा., शंकराचार्य, दासोपंत, वामनपंडित ह्यांसारखे पंडित-कवी अर्वाचीनांपैकी लोकमान्य टिळक, योगी श्रीअरविंद, रा. गो. भांडारकर, ओल्डेनबर्गसारखे आधुनिक चिकित्सक, ॲनी बेझंटसारख्या थिऑसॉफिस्ट, डॉ. राधाकृष्णन् ह्यांच्यासारखे तत्त्वज्ञानीयांनी गीतेवर लहानमोठे निबंध, टीका वा भाष्ये लिहून गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तथापि ज्ञानेश्वरी ही गीतेवरील सर्वश्रेष्ठटीका होय, असे मत गुरुदेव ⇨ रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथात व्यक्त केले आहे. गीतेच्या तात्पर्यार्थाचे त्यांनी केलेले विवेचन थोडक्यात असे :

ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते. सर्व विश्वाचे आदिकारण, त्याचा कर्ता आणि नियामक ईश्वर मानला पाहिजे, हे ज्ञानेश्वरांनी विश्व-प्रपंचावरून सिद्ध करणारे प्रमाण उत्कृष्ट रीतीने मांडले आहे (९.२८०–२८५). न्यायशास्त्रातील निरनिराळ्या प्रमाणांचा – विशेषतः बुद्धिप्रामाण्यव शब्दप्रामाण्य ह्यांचा – फोलपणा दाखवून ज्ञानेश्वरांनी भक्तीचा सिद्धान्त प्रस्थापित केला आहे. कोणतेही तार्किक प्रमाण मायानदी तरून जाण्यास उपयोगी पडत नसून त्यासाठी सद्गुरू, भक्ती आणि आत्मानुभव ह्यांचाच आधार घ्यावा लागतो.

तो घेऊन मायानदी उतरून जाण्यास आरंभकेला, की तरून जायला तिच्यात पाणीच शिल्लक उरत नाही. भक्ती हा दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एकमेव मार्ग होय, हा सिद्धान्त ज्ञानेश्वरांनी मांडला. साधक भक्तिमार्गाची वाट चालत असताना त्याच्या शरीरावर आणि मनावर काही प्रतिक्रिया घडून येतात. हेच अष्ट सात्त्विक भाव होत. त्यांचे मनोज्ञ चित्रण ज्ञानेश्वरांनी केले आहे.

त्याचप्रमाणे आनंद आणि शांती ह्या विरोधी भावना आत्मसाक्षात्कारात कशा एकत्व पावतात, हेही त्यांनी उत्तम प्रकारे दाखविले आहे. देव आणि भक्त यांच्या अंतिम ऐक्याचा विचारही त्यांनी विविध प्रकारे मांडला आहे पण हे ऐक्य संपूर्ण होत नाही. साधक ईश्वराच्या अधिकाधिक निकट जात असला, तरी देव आणि साधक ह्यांच्या ऐक्यात काही उणेपणा राहतो.

जसे चतुर्दशीचे चंद्रबिंब पौर्णिमेच्या चंद्राहून किंचित उणे असते. असे होण्याचे कारण देह, मन इ. बंधने आहेत. ती असेपर्यंत देव तो देव आणि भक्त तो भक्त असेच हे नाते राहणार. प्रवासास निघाल्याबरोबर कोणी इष्ट स्थळी पोचत नाही. चांगल्या संगतीने इष्ट स्थळी आनंदाने पोचता येते. तरी प्रवास संपण्यासाठी काही वेळ लागतोच. साधकाच्या अंतिम विजयाचे ज्ञानेश्वरांनी जे रूपकात्मक वर्णन केले आहे, ते अतुलनीय असेच आहे.

रानडे ह्यांच्या मते ज्ञानेश्वरांनी केलेला गीतेचा तात्पर्यार्थ पूर्णपणे साक्षात्कारपर असून एका दृष्टीने शंकराचार्यांच्या वेदान्तपर अर्थाच्या पलीकडचा, वरचा आहे. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती ह्यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय.

ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगितली त्यांच्याशी वेळोवेळी संवादही साधला. त्यांच्या या श्रोतृसंवादाची काही वैशिष्ट्ये पाहिली, तर असे दिसते, की त्यांचा श्रोतृसंवाद हा खऱ्या अर्थाने श्रोतृसंवाद आहे.त्या संवादाचे एक महत्त्वाचे आणि अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे श्रोताहा निर्मितिप्रक्रियेत सहभागी आहे, ह्याची स्पष्ट जाणीव त्यांना आहे तसेच हे संवाद सविस्तर आणि मनापासूनचे आहेत. त्यांतून त्यांच्या अलौकिक, आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार झालेला आहे. त्यामुळे ते भावकाव्याच्या पातळीवर जातात. आपले विवेचन फुलवताना ज्ञानेश्वर श्रोत्यांच्या प्रगट व संभाव्य प्रतिक्रिया लक्षात घेतात. ज्ञानेश्वरांच्या श्रोतृसंवादात अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचाच एक भाग होतो.

ज्ञानेश्वरांवर दोन संप्रदायांचे संस्कार होते. एक, ⇨ नाथसंप्रदाय आणि दुसरा भागवत संप्रदाय. ह्या दोन संप्रदायांतील विचारसरणींचे ऐक्य ज्ञानेश्वरांनी घडवून आणले आणि ज्ञानभक्तीचे एक नवे तत्त्वज्ञान जगाला दिले. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस त्यांनी आपली नाथपंथीय गुरुपरंपरा दिलेली आहे. ह्याच उताऱ्यात ‘शक्तीच्या गिरिवुहरी’, ‘शांभव अद्वयानंदवैभव’, ‘समाधिधन’ इ. नाथसंप्रदायातील परिभाषा येते. तसेच ज्ञानेश्वरीच्यासहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीच्या संदर्भात जे विवेचन केले आहे, ते सर्व नाथपंथातील विचारसरणीचे आहे.

नवव्या अध्यायात आलेल्या हठयोगाच्या विषयाकडे ज्ञानेश्वर नाथपंथीयांच्या दृष्टीनेच पाहतात. नाथपंथाच्या अशा खुणा ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी दिसतात. भक्तीचे तत्त्व पुनःपुन्हा मांडलेले दिसते. ज्ञानेश्वरीचे मुख्य अधिष्ठान भक्ती हेच आहे, असे दिसते, असे मत डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी मांडले आहे. ज्ञानेश्वरांनी मुख्यतः शंकराचार्यांचे अनुकरण केले आहे, असे डॉ. शं. दा. पेंडसे ह्यांचे मत आहे.

ज्ञानेश्वरीचे एक गाढे अभ्यासक डॉ. द. भि. कुलकर्णी ह्यांच्या मते गीतेने अद्वैत परोपरीने सांगितले परंतु हे अद्वैत द्विदल आहे, हे फक्त ध्वनित केले. गीतेच्या ह्या ध्वन्यर्थाचा ज्ञानेश्वरांना साक्षात्कारच झाला होता. त्यामुळे जीव, जगत व जगदीश्वर ही विभक्त त्रिपुटी नसून सर्वच शिव-शक्तीचे युग्म आहे, अशी त्यांची स्पष्ट प्रतीती होती आणि ह्याच युग्मात्मक प्रतीतीतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण झाला. ⇨ काश्मीर शैव संप्रदाय(शैव मताची अद्वैतवादी शाखा) आणि ज्ञानेश्वरी ह्यांच्यातील संबंधस्पष्ट करताना ते म्हणतात, की वसुगुप्तापासून अभिनवगुप्तापर्यंतच्या काश्मीर शैव संप्रदायाच्या आचार्यांनी जे विश्वभाष्य केले, त्याची साक्षात अनुभूती ज्ञानेश्वरांना आली होती. अमृतानुभवात त्या अनुभूतीचे बौद्धिक आलेखन आहे, तर ज्ञानेश्वरीत त्या अनुभूतीचा भावगर्भ आविष्कार आहे. त्यामुळेच गीतेचा केवळ कर्मयोगपर, ज्ञानयोगपर, संन्यासयोगपर किंवा भक्तियोगपर अन्वयार्थ न काढता ज्ञानेश्वर तिचा समन्वयात्मक आणि साक्षात्कारात्मक अन्वय लावतात.

ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान ⇨ चिद्विलासवाद ह्या नावाने ओळखले जाते आणि विश्वातील नाना पदार्थांच्या रूपाने एकच चैतन्य विनटलेले आहे, हा त्या तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती विचार आहे. हे तत्त्वज्ञान अद्वैती आहे तथापि शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाहून फारच भिन्न किंबहुना विरोधी आहे, असे मत मुख्यतः पंडित बाळाचार्य खुपेरकर ह्यांनी प्रतिपादिले आहे. ज्ञानेश्वरांनी जगास शंकरार्चांप्रमाणे मिथ्या मानले नाही. जग ही सद्वस्तूची प्रभा, आत्म्याचे स्फुरण, चैतन्याचा विलास आहे. शंकराचार्यांचे अद्वैत हे द्वितीय पदार्थांचा निरास करते ज्ञानेश्वरांचे अद्वैत हे द्वितीय पदार्थाच्या सामरस्याने निर्माण होते, असे त्यांचे म्हणणे आहे. हा फरक पडतो, कारण ज्ञानेश्वर हे नाथपंथीय होते आणि नाथपंथाचे तत्त्वज्ञान काश्मीर शैव संप्रदायाशी जुळणारे आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या मते, ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद हा शंकराचार्यांपेक्षा अधिक प्रगत झालेली दृष्टी आहे. मोक्षपुरुषार्थाच्या साधनेत संन्यासाला अग्रस्थान देण्याचा आग्रह ज्ञानेश्वरांनी बाजूला ठेवला. अंतिम दृष्टिकोणातून अविद्याखंडन वा अज्ञानखंडन शंकराचार्यांपासूनअनेक अद्वैत वेदान्त्यांनी केले आहे. परंतु अज्ञानखंडनाच्या आधारावरच ज्ञानेश्वरांचे परतत्त्वदर्शन शंकराचार्यांच्या व इतर अद्वैत वेदान्तांच्या पुढे गेले आहे. ब्रह्म परमार्थ सत्य होय, ह्या मूळ सिद्धान्ताला बाधा न येता किंवा मर्यादा न पडता, ज्ञानेश्वर विचारक्षेत्रातला नवीन विजय मिळवीत आहेत. चिद्विलासवाद हाच तो विजय होय.

ज्ञानेश्वरीच्या भाषेचा विचार केला, तर गीतेसारख्या तात्त्विक ग्रंथावरील ही काव्यरूप मराठी टीका आहे पण येथे काव्य आणि तत्त्वज्ञान यांचे विलक्षण ऐक्य प्रत्ययास येते. मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठीचे स्पष्ट भान ठेवले आहे. मराठीबद्दलचा अभिमान ठसठशीतपणे व्यक्त केला आहे. मराठीच्या आविष्कारक्षमतेविषयी त्यांना विश्वास होता. संस्कृतातील अनेक संदर्भ ज्ञानेश्वरीत आले असले, तरी भाषेच्या बाबतीतला तिचा खणखणीत देशीपणा टिकून राहिलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात मराठी नुकतीच वाङ्मयत्व पावली होती. तथापि ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेचे सुंदर रूप पाहिले, की भाषेचे वैभव काय असते, ह्याचा आनंददायक प्रत्यय येतो. ज्ञानेश्वरांनी अनेकदा श्रोत्यांपुढे आपली नम्रता प्रकट केली आहे तथापित्या नम्रतेमागे त्यांच्या कवित्वशक्तीचा भक्कम अभिमानही आहे. 

ज्ञानेश्वरीचा इंग्रजी अनुवाद व्ही. जी. प्रधान ह्यांनी दोन भागांतकेला आहे. (ज्ञानेश्वरी : ए साँग सर्मन ऑन द भगवद्गीता, भाग १ संपा. एच्. एम्. लॅबर्ट, १९६९, पहिले भारतीय पुनर्मुद्रण १९७८ भाग२, १९६९).

ज्ञानेश्वरीतील पसायदान ही एक अत्युत्कट प्रार्थना आहे. विश्वात्मक देवाला म्हणजेच श्रीविश्वेश्वरावाला ज्ञानेश्वरांनी पसायदान देण्याची विनवणी केलेली आहे. पसायदान म्हणजे कृपाप्रसादाचे दान. हे दान ज्याच्याकडून अपेक्षित आहे तो विश्वात्मक देव वा श्रीविश्वेश्वराव म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरू प्रत्यक्ष निवृत्तिनाथ होत.

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान असून ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ह्या पसायदानात विश्वात्मक देव, श्रीविश्वेश्वराव ह्या शब्दांनी ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुरू निवृत्तिनाथ ह्यांचा निर्देश केला आहे, असे दिसते. ह्या पसायदानात ज्ञानेश्वरांनी व्यक्तिशः स्वतःसाठी म्हणून काहीच मागितलेले नाही. त्यांची प्रार्थना प्राणिजातांसाठी आहे.

जे खलप्रवृत्तीचे असतील त्यांना सत्कर्मांत रस निर्माण व्हावा सर्वांमध्ये जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी, जो जे वांछिल ते त्यालामिळावे जे चंद्रासारखे आहेत, पण ज्यांच्यावर चंद्रावर असतो तसा कलंक नाही जे सूर्य आहेत, पण ज्यांचा ताप जगाला होत नाही, त्यांच्याशीसर्वांचे नाते जडावे, अशी विनवणी त्यांनी केली आहे. विश्वकल्याणासाठी केलेली ही प्रार्थना विश्वेश्वरावाने मान्य केल्याचे म्हटल्यामुळे ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ असे त्यांनी म्हटले आहे. ज्ञानेश्वरांचे हे पसायदान म्हणजे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे.

sant dnyaneshwar संत ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (समांतर दृष्टिकोन) : या दोन विषयांना गूढत्वाचा, प्रकटीकरणाचा आणि तटस्थतेचा स्पर्श आहे. गूढ अशासाठी, की ज्ञानेश्वरांच्या चरित्राबद्दलची माहिती फारच त्रोटक आहे किंवा जवळ जवळ नाहीच असे म्हणावे लागते. त्यांच्याबद्दल इतर काय म्हणाले ही गोष्ट ऐतिहासिक साधन म्हणून मान्यताप्राप्त नाही.

ज्ञानेश्वर स्वतःबद्दल बोलण्याचे कटाक्षाने टाळतात. त्यांच्या मधला ‘मी’ जेव्हा प्रकट होतो तेव्हा ते केवळ त्यांच्या लिखाणाबद्दल बोलतात, पण तेही निवृत्तिनाथांचा शिष्य म्हणून. त्यांचे आयुष्य किंवा भावविश्व संपूर्णपणे निवृत्तिमय आहे आणि गीतेवरची टीका त्यांनी निवृत्तिनाथांच्या आज्ञेवरून प्राकृतात आणली आहे. ह्या ओघात आलेले श्रीकृष्णाच्या माहात्म्याचे वर्णन निवृत्तिनाथांच्या प्रेरणेतून आले आहे.

गूढपणाचा दुसरा भाग निवृत्तिनाथ ह्या नावात आहे. त्या नावात नाथ आहे आणि तो नाथसंप्रदायाचा द्योतक आहे. पारंपरिक इतिहास असेसांगतो, की निवृत्तींना त्र्यंबकेश्वरी एका गुहेत ह्या संप्रदायाची दीक्षा मिळाली. नाथ संप्रदाय शैव आहे आणि तो संप्रदाय शंकर ह्या एतद्देशीय अनार्य (!) देवतेला बांधलेला आहे.

मुळात द्वैती असलेल्या ह्या संप्रदायाने पुढे अद्वैत विचार मान्य करून एक वैशिष्ट्यपूर्ण शिवशक्तिरूप नवे दर्शन मांडले. त्यात दोन किंवा द्वैत नामयोजना असली, तरी ही दोन तत्त्वे एकमेकांशिवाय अर्थहीन आणि अस्तित्वहीन आहेत, अशी कल्पना पुढे केली. ह्या अभिनव अद्वैती दर्शनाच्या उद्गात्याचे नावही अभिनवगुप्त हा काश्मीरचा. पाणिनी जसा व्याकरणाचा निर्माता, तसा हा अभिनवगुप्त भाषेमधल्या रसांचा, अलंकारांचा आणि त्यातील ध्वनिमाहात्म्याचा उद्गाता होता. त्याचे भाषा-प्रभुत्व आणि त्याने गुहेत शिरून घेतलेली समाधीह्या गोष्टी ज्ञानेश्वरांच्या चरित्राशी समांतर आहेत. ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांमध्ये गोविंद हरिहर आणि विट्टल अशी नावे आहेत. 

गोविंद हे नाव विष्णूचे हरिहर, विष्णू आणि शंकराचे विठ्ठल हे नाव विष्णुस्वरूप असले, तरी मुळात हे विठ्ठल दैवत शैव होते. पुढे त्याला तिथल्या यादवांनीविष्णुरूप केले, पण त्या मूर्तीवर शंकराची दिंडी प्रस्थापित केली, असाही इतिहास सांगितला जातो. हा सर्व तपशील बघता शेवटचे आणि महत्त्वाचे गूढ समोर येते ते असे, की शैव नाथसंप्रदायाचे वळण असलेल्यानिवृत्ति – ज्ञानेश्वरांनी टीका करणाऱ्यांसाठी श्रीकृष्णाने म्हणजे विष्णूच्या अवताराने सांगितलेली गीता का निवडली ⇨ शैव आणि नंतरचा नाथ-संप्रदाय एतद्देशीय म्हणून लोकाभिमुख खरेच, परंतु त्या संप्रदायालागूढतेचा जबरदस्त स्पर्श आहे. हटयोग, कुंडलिनी, प्रखर तपश्चचर्या ही त्या पंथाची वैशिष्ट्ये आहेत.

पण भारताच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन इतिहासात महाभारताच्या तोडीची दुसरी संपन्न आणि लोकप्रिय रचना नाही आणि त्यांतले सर्वात महत्वाचे रत्न, गीता असून ते गोष्टीरूप तत्त्वकाव्य श्रीकृष्ण सांगतो, तेही एका अर्थाने अद्वैती तत्त्वज्ञान आहे आणि ते भारताच्या एका महत्त्वाच्या संक्रमणावस्थेत सांगण्यात आले आहे. महाभारतातले युद्ध शहरवासीयांमधले आहे. अर्थव्यवस्था उदयास आली आहे. समाजरचनेचे नियम तयार झाले आहेत. त्या युद्धातली व्यूहरचना, डावपेच, त्या आधीची मुत्सद्देगिरी आणि युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रांना आधुनिकतेचा स्पर्श आहे. पुढे येणाऱ्या भारताच्या इतिहासाची बीजे महाभारतात जशी सापडतात तशी इतरत्र सापडत नाहीत.

गीतेतले औपनिषदिक तत्त्वज्ञान तत्कालीन तत्त्वदर्शनांवर आधारित आहेत. त्यांतील योगशास्त्र (पतंजली), अणुशास्त्र (कणाद), सांख्यदर्शन (कपिल), न्याय किंवा तर्कशास्त्र (गौतम) ही निरीश्वरवादी आहेत. त्यावर औपनिषदिक वेदान्त उभा आहे. नाथसंप्रदायाचे आणि सांख्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाचे नाते जुने आहे आणि योगशास्त्राचा विकास नाथसंप्रदायाने निराळ्या तर्‍हेने केला असला, तरी तेही एक दृढ नाते आहे. अशा संपन्न, अद्वैती, संचितावर ज्ञानेश्वरांसारख्या व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वाने स्पष्टीकरण मांडावे, असे निवृत्ति-नाथांना वाटणे स्वाभाविक होते.

याचे आणखी कारण म्हणजे खुद्द शंकराचार्यांनी केलेली गीतेवरची टीका. शेवटी शैव शंकराचार्यांनी भज गोविंद अशीही रचना केलीच आहे. ह्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरीतले पहिल्या अध्यायाच्या आधीचे मंगलाचरण मोठे उद्बोधक ठरते आणि तिथेच ज्ञानेश्वर प्रकट होतात. पहिल्या ओवीतले चारही कळीचे शब्द गीतेत नाहीत (आद्या वेदप्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा) . दुसऱ्या ओवीत अथर्वातला गणपती येतो आणि त्याचबरोबर निवृत्तिनाथांचा उल्लेख येतो.

स्मृतींची आठवणकेली जाते, साहित्याचा आढावा घेतला जातो, मग तत्त्वदर्शनांनी गणपतीची मूर्ती सजते. त्याच्या शिरावर औपनिषदिक ज्ञान मढवले जाते. त्याच्या थोड्या खाली कपाळाच्या दोन भागांना द्वैत तत्त्वज्ञानाचे रूपक बहाल होते. महाभारताचा गौरव अनेक ओव्यांमधून केला जातो. व्यास नावाच्या संपादकावर स्तुतिसुमने वाहिली जातात. सरस्वती आणि गुरूंवर अर्थपूर्ण ओव्या सांगितल्या जातात. शंकर-पार्वतीचा संवाद होतो. त्यात शंकर पार्वतीला उद्देशून तू गीतेसारखी दर वेळी मला नवी भासतेस असे विधान करतो.

मग गीतेला कशी आत्मसात करावी ह्याचा निर्णय सांगितलाजातो आणि मगच श्रीरंगाचा म्हणजेच विष्णूचा किंवा श्रीकृष्णाचा उल्लेख येतो. श्रीकृष्ण ह्या संपन्न परंपरेचा उद्गाता आहे असे ज्ञानेश्वर नावाचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व अप्रत्यक्षपणे म्हणते आणि तेच ज्ञानेश्वर मग निवृत्तिनाथांच्या आश्रयाखाली जे श्रीकृष्णमय होतात ते पसायदानापर्यंत.तिथे ते परत विश्वात्मके देवे म्हणतात आणि त्या दोन शब्दांत ‘जग हे असकि वस्तुप्रभा’ हे आपले तत्वज्ञान मांडतात. मधल्या भागात ते खूप काही अप्रतिम भाषेत रसपूर्णपणे सांगतात, पण त्यातही गुरुभक्ती आणि योगसाधना हे नाथसंप्रदायी विशेष सर्वत्र पेरत राहतात.

विश्वाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर सर्वाधिक रमतात. आकाशातील ताऱ्यांचे तेज, ते एकमेकांवर आपटल्यावर होणारा चक्काचूर, आकाशा-तीलच रंगांची वर्णने, ढगांची हालचाल, त्यांच्यामागे लपणारा सूर्य-जो स्वतःच लपून ढगाचे दर्शन घडवतो, आकाशात झेपावणारे चिलट त्यात भरारी आणि बुडी मारणारा पारवा आणि विहार करणारा गरुड किंवा झाडावर झेप घेणारा पक्षी ही सर्व उदाहरणे तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविण्यासाठी वापरली आहेत.

आकाशातून पृथ्वीवरच पडणारा अणू, जेव्हा आकाश नव्हते तेव्हाची गोष्ट, आकाशाचे प्रसरण, होडीच्या उलट्या दिशेने पळणारी झाडे, स्तब्ध सूर्याची भासमय प्रदक्षिणा, विस्तवात जगू न शकणारी वाळवी, पांडुरोगातली फसवी सूज किंवा गुराच्या त्वचेला लपकलेला गोचीडएवढेच नव्हे, तर विश्वरूपात अणुपरमाणू मावेल एवढीही पोकळी चैतन्य सदृश्य श्रीकृष्णाने ठेवलेली नाही हा विचार सर्वार्थाने वैज्ञानिक आहे. पशुपक्ष्यांची तर खैरात आहे. मुंगी आणि हत्ती आहेत.

भुंगा, टिटवी, मोर आणि कोकिळेची गोष्ट आहे. जळणारे गवत विझल्यावर गवत आणि अग्नी दोन्ही कशी मिटतात, असे समाधीचे वर्णन आहे, चैतन्याच्या खांबाभोवती प्रकृती कशी वेटोळे घालत एखाद्या वेलीसारखी सरसर चढते असे दृश्य आहे आणि फळांचा राजा म्हणजेच आंबा हा रसरूप गंध असल्या ज्ञेयाच्या उदाहरणासाठी वापरून शेवटी तो एकच कसा असतो असा तात्त्विक निर्णय सांगितला आहे. चेंडूच्या मागे पळणारा कुत्रा आहे. आपटून परत येणारा चेंडूही आहे आणि आकाशातल्या चांदोबाचा चेंडू हट्टाने मागणारे बाळही आहे. ज्ञानेश्वरीत स्त्रियांची वर्णने चौफेर आहेत. त्यात साध्वी, सवत आणि स्वैरिणी आढळतात.

इथे तारुण्यात प्रवेश करणारी नव्हाळी आहे आणि सौंदर्याचे लक्षण म्हणून वृद्ध पतिव्रतेचे उदाहरण आहे. इथे सरळ प्रेम करणारी वाकड्या पाठीची कुब्जा आहे, पती किंवा प्रियकरापासून दुरावलेली आणि म्हणून झुरणारी स्त्री आहे आणि स्वप्नात अलिंगन देऊन पुरुषाला कामवश करणाऱ्या स्त्रीचे दर्शनही घडते. स्वार्थ, सत्ता, ईर्षा, दुर्गुण यांचे वर्णन करतांना मस्तवाल आणि अज्ञानी पुरुषांची रेलचेल आहे.

स्वर्गातल्या स्त्रियांना प्राप्त करण्यासाठी कर्मकांडी यज्ञ करणारे पुरुष कसे शिड्या लावतात, बापावर केलेल्या अन्यायाची सल मनात ठेऊन मुलगा कसा डूक धरून संधीची वाट बघतो आणि तपश्चर्याने ऋद्धिसिद्धी प्राप्त झालेले पुरुष सत्तेच्या गर्वात असताना क्षुल्लक मोहाला कसे बळी पडतात ⇨ असली उदाहरणे सर्वकालीनच समजायला हवी. ज्ञानेश्वरीत लोहार, सुतार, कुंभार आणि सोनार भेटतात.

निरनिराळ्या प्रसंगांत कोल्हाटी, गुराखी, गारुडी भेटतात आणि नागाचे प्रदर्शन करत पैसे मिळवणारा गारुडी, खरे तर लबाड भिकारी आहे असे वर्णन येते. कोठलेही जगाच्या पाठीवरचे तत्त्वकाव्य इतके प्रत्ययकारी आणि समृद्ध नाही आणि पुढे होईल असे वाटत नाही आणि एवढे सगळे करून शेवटी ज्ञानेश्वर तटस्थच राहतात. अंताला विश्वात्मके देवे म्हणून पंथ, धर्म आणि वैयक्तिक दैवताच्या पलीकडे जाऊन ते शांतपणे उभे राहिल्याचे दृश्य समोर उभे राहते. पुढे अमृतानुभवात ते हरी आणि हर ह्या दोघांना आठवणारच आहेत आणि अज्ञान गळून पडले म्हणून ज्ञान होते हा निर्णय कालबाह्य ठरवणार आहेत.

ते म्हणतात ज्ञान झाल्यावर मी उरत नाही. मग ज्ञान कोणाला झाले असे म्हणायचे ⇨ आणि मी जोवर शिल्लक आहे तोवर अहंकार आणि ती ‘स्व ‘ची ओळख ज्ञानापासून दूरच ठेवते. तसे बघायला गेले, तर त्यांच्या तिन्ही महत्त्वाच्या विवेचनात (ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, आणि चांगदेवपासष्टी) विठ्ठलाचा उल्लेख नाही. नामदेवांचा हात धरून आम्हीच त्यांना वारकरी केले. ते विठ्ठलासारखेच आपले म्हणणे सांगून झाल्यावर कंबरेवर हात ठेऊन अंतर्धान पावले आहेत, असेच म्हणायला हवे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar  dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari

3 thoughts on “ज्ञानेश्वरी अर्थासहित”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *