संत सोपानदेव

संत सोपानदेव

संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. ते यांतील सर्वात थाकटे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण. ही भावंडे सतत एकमेकांसोबत राहिली, वावरली. त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. आपल्या जन्मापासून समाधीपर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाहीत. जणू ही चार मानवी शरीरे असली तरी त्यांचा आत्मा एकच असावा, एवढे त्यांचे वावरणे एकात्म होते. सोपानदेवांचे चरित्र अभ्यासताना ही बाब विशेषत्वाने लक्षात घ्यावी लागते.

हे पण वाचा:- संत सोपान मंदिर सासवड माहिती 

संत सोपानदेव – जीवनकथा

विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत. आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी ही भावंडे लहान होती. सोपानदेवांचे वय तर अजाणतेच म्हणावे लागेल. अगदी संत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ अर्थात ‘भावार्थदीपिका लिहिली तेव्हा म्हणजे शके १२१२ (इ.स. १२९०) मध्ये त्यांचे वय अवघे पंधरा- सोळा वर्षांचे होते. सोपानदेव आपले थोरले बंधू निवृत्तीनाथापे्षा सहा वर्षांनी, संत ज्ञानदेवांपेक्षा तीन वर्षांनी धाकटे होते, तर संत मुक्ताबाई पेक्षा तीन वर्षांनी मोठे होते.

संत सोपानदेव – बालपण

संत जनाबाईंच्या अभंगास प्रमाण मानल्यास सोपानदेवांचा जन्मशक ११९६ (इ.स. १२७४) गृहित धरावा लागतो. त्यांचे बालपण प्रारंभी आई वडिलांच्या छत्रछायेखाली गेले असले तरी तरी हे प्रेम त्यांना अतिशय अल्पकाळ मिळाले होते. त्यांनतरचे त्यांचे बालपण निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्याच सान्निध्यात गेलेले आहे. सोपानदेवांना आपल्या आई वडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होताच, शिवाय त्यानंतर थोरल्या भावंडांनीही त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले आहे. आई वडिलांच्या समवेत त्र्यंबकेश्वराची यात्रा त्यांनी अतिशय लहानपणी केली. त्यावेळी निवृत्तीनाथांच्या गर्भगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात विस्मरणीय ठरला असावा. पुढे भावंडासोबत शुद्धिपत्र मिळविण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले. परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता. नंतर भावंडासोबत पंढरपुरची वारी आणि नामदेवादी संतांबरोबर तीर्थटनही त्यांनी केले. अशाप्रकारे त्यांना बालपणातच एकप्रकारची भटकंती करून जीवन कंठावे लागले होते.

संत सोपानदेव : शिष्यपरिवार

सोपानदेव वयाने लहान असले तरी अध्यात्मातील अधिकारी पुरूष होते. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक प्रगती साधलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणे साहजिक होते. काही संतजनानी त्यांचे शिष्यत्व पत्करल्यांची नोंद विविध अभंगांतून मिळते.

आदिनाथ

मच्छिंद्रनाथ

गोरक्षनाथ

गहनीनाथ

निवृत्तीनाथ

सोपान

विसोबा

नामदेव

परिसा भागवत

चोखा

वारकरी सांप्रदायामध्ये विसोबांना कुठे ज्ञानदेवांचे तर कुठे मुक्ताबाईंचे शिष्य मानलेले आहे. मात्र स्वतः विसोबा खेचर यांचा खालील अभंग प्रमाण मानल्यास त्यात ते स्वतःचा उल्लेख सोपानदेवांचा शिष्य असाच करतात. सोपानदेवांना ते सद्गुरू म्हणून त्यांनी आपल्या माध्यावर कृपेचा हात टेवल्याची नोंद करतात.

माझी मुळ पीटिका सोपान सद्गुरू । तेणे माथा कप टेवियेला ।।१।।

त्याचे कृपेकरून मीपणा ठकलो । देहेभावा गेलो विसनिया ॥२॥

चांगयावा अगिकार मुक्ताईने केला । सोपान वोळला मजवरी ॥३॥

जन्ममरणाचे भय नाही आता । खेचरी तत्त्वता मुद्रा दिली ॥४॥

जिकडे पाहे तिकडे आनंद भरला । खेवर सामावला तयामाजी॥५॥”

त्यांच्या अभंगरचनेचा दाखला देत प्र.न.जोशी लिहितात, “पैठणजवळच्या ‘मुंगी’ या गावचे राहणारे हे विसोबा खेचर. ज्ञानेश्वर-नामदेवांच्या उत्तरेतील यात्रेत इतर संतांबरोबर हे होते. औंढ्या नागनाथ या पुरातन अशा शिवक्षेत्री यांचे वास्तव्य नेहमी असे. यांनी सौपानदेवांना आपले गुरू मानले होते. काही संशोधक विसोबांना ज्ञानेश्वरांचे शिष्य मानतात. विशेष म्हणजे ज्या ग्रंथात प्र.न.जोशी यांनी वरील लेख लिहिला आहे त्याच ग्रंथात त्याचे संपादक ल.रा.पांगारकर विसोबा खेचर हे ज्ञानेश्वरांचे शिष्य व त्यांचे शिष्य नामदेव.” असा उल्लेख करतात. यामुळे स्वतः विसोबांचाच अभंग प्रमाण मानावा आणि विसोबा खेचर हे सोपानदेवांचेच शिष्य होते, हेच मत योग्य वाटते.

संत सोपानदेव – अवतार समाप्ती

ज्ञानेश्वरादी भावंडे निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात सतत एकमेकांसोबत राहिली. आलेली सारीसंकटे त्यांनी एकत्रितपणे झेलली. सर्वच प्रसंगांना सारी मिळून सामोरी गेली. पैठणचा प्रवास असी,की पंढरीची वारी असो. तीर्चाटन असो की, माधुकरी मागणे असो. सर्वत्र ही चारही भावंडे एकमेकांसोबत सावलीसारखी वावरली. मात्र ज्ञानदेवांच्या प्रयाणानंतर ही घडी विस्कटली. त्यांच्या जीवनातील आनंदच हरपल्यासारखा झाला. आपणही आता समाधी घेऊन या जगाचा निरोप घ्यावा, अशी भावना सर्वांच्याच मनात येत असावी. ती सर्वप्रथम बोलून दाखविली सोपानदेवांनी. ज्ञानदेवांनतर आधार गेल्यामुळे म्हणाकिंवा विरक्ती वाढल्यामुळे म्हणा, पण सोपानदेवांना समाधी घेण्याची घाई झाली असावी. त्यातूनच ज्ञानदेवांच्या समाधी सोहळयानंतर अवध्या एका महिन्यातच सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य १३ रोजी सासवड येथे समाधी घेतली.

सोपानदेवांचे वाङ्मयीन कार्य

निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांसारख्या प्रज्ञावंत भावंडांच्या सहवासात सतत राहिल्यामुळे, मुळात करूणावतार असलेल्या सोपानदेवांना लेखनाची उर्मी असणे नैसर्गिकच होते. नेवासे येथे ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी चे निरूपण केले, ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ लिहिला. पुढे चांगदेवाच्या पत्राच्या निमित्ताने ‘चांगदेवपासष्टी’ हा ग्रंथ सिद्ध झाला. निवृत्तीनाथ व मुक्ताई यांनीही अमंगरचना केली. यांच्या सहवासामुळे सोपानदेवांनीही लेखन केले आहे. त्यांच्या नावावर ‘सोपानदेवी’ हा ग्रंथही असल्याचे काही संशोधक मानतात. मात्र तो उपलब्ध नाही. तथापि, त्यांनी लिहिलेले अभंग उपलब्ध असून त्यांचा विचार येथे केला आहे.

संत सोपानदेव यांची अभंगरचना

संत सोपानदेवांनी केलेल्या अभंगरचनेकडे संख्यात्मक दृष्टीने पाहिल्यास ती अतिशय कमी आहे. मात्र त्याकडे भावात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील मूल्ये लक्षात येतात. याव अनुपंगाने त्यांचा अभ्यास येथे केला आहे. सोपानदेवांच्या अभंगाचे मर्म नेमकेपणाने सांगताना प्रा. कृष्णा गुरब लिहितात, “संत श्रीसोपानदेव महाराजांच्या अभंग अक्षय ज्ञानगंगेत प्रवेथ करताच आपल्या मेंदूवरील जन्माजन्मांच्या क्षुद्रातिक्षुद्र विचारांचे चिकट चिकट, अतीअती चिकट, थरच्या थर अगदी सहजरीत्या विरघळून निघून जातात.

कमालीचे अंतर्मुख करणारे जीवनविचार सांगून बुद्धीची मलीनताच दूर करण्याचे पहिले कार्य श्रीसोपानदेव करतात.”वस्तुतः कोणत्याही वारकरी संताने निर्मिलेले अभंग ठरवून एखाद्या साच्यात बसवलेले नाहीत. ती काही त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली उठाठेव नाही. त्यामागे निखळ भक्तिभाव आहे. त्या त्यांच्या मनातील भक्तीच्या भावना आहेत. त्यामुळे या अभंगांची स्पष्ट वर्गवारी करता येत नाही. मात्र ज्या विषयाचे प्रतिपादन त्या अभंगात केंद्रस्थानी आढळते, त्यामध्ये त्याचे बर्गीकरण करावे लागते.

संत सोपानदेव – अभंग 

पंढरीमाहात्म्य व नामपर

संत सोपानदेवांनी निर्मिलेल्या अभंगातील जवळपास निम्मे अभंग पंढरीचा महिमा वर्णन करणारे व पांडुरंगाच्या नामस्मरणाचे माहात्म्य सांगणारे आहेत. वारकरी संतांना पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे. याठिकाणी आले, पंढरीची वारी केली की, स्वर्गाची प्राप्ती होते ही या संतांची आणि समस्त वारकरी संप्रदायाच्या अनुयायांची श्रद्धा आहे. पांडुरंगाच्या पायाचे दर्शन व नामस्मरण जीवाला मुक्ती मिळवून देण्यास पुरेसे आहे ही त्यांची श्रद्धा असते. सोपानदेवांनीही या श्रद्धायुक्त अंतःकरणानेच या रचना केलेल्या आहेत.

उघडली दृष्टी इंद्रिया सकट । वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥

दृष्टीभरी पाहे दैवत । पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।।

हाची मार्ग सोपा जनासी उघड | विषयाचे जाड टाकी परते ॥३॥

सोपान म्हणे गुफसी सर्वथा। मग नव्हे उत्तथा भक्तिपंथे ॥४॥”

आपली दृष्टी उघडली असून म्हणजे आपणास नवे भान आले असून पंढरीला जाणे म्हणजे वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्रशस्त करणे होय. तेथे गेल्यावर आपले आराध्य विठ्ठलाचे दर्शन झाले म्हणजे माझे मनोरथ पूर्ण झाल्यासारखे आहे. यासाठी सोपानदेव सर्वसामान्य जनांस विनंतीपूर्वक सांगतातकी हाच सोपा मार्ग आहे वैकुंठाच्या प्राप्तीसाठी. यासाठी सर्वांनी पंढरीची वारी केली पाहिजे.

चलारे वैष्णवलो जाऊ पंडरीयेसी । प्रेमामृत खुण मागो त्या विलासी ॥१॥

चालिले गोपाळ वाहताती वाकुल्या । भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ॥२॥

दिंड्या गरूडटके मृदंगाचे नाद । गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ।।३।।

प्रावले पंढरी भीमा देखीयेली दृष्टी । वैष्णवांवा गजरू आनंदे हेलावली सृष्टी ॥४॥

गजरू गोपाळांचा श्रवणी पाडेयेला । शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला ॥५॥

कासवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला । सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला ॥६॥

सकल वैष्णव भक्तांना सोपानदेव पंढरपुराला येण्याचे आवाहन करतात व आपण सारे विठ्ठलापाशी प्रेमामृत मागू असे सांगतात. सारे गोपाळ एकत्र आल्यावर प्रत्यक्ष स्वर्गातील देवांना वाकुल्या दाखवीत आणि टाळी वाजवीत आहेत. टाळ, मृदुंगाच्या गजरात या विठ्ठलभक्तांच्या दिंड्या चालल्या आहेत. अशा भक्तांचा हरीनामाचा गजर कानी पडल्यावर शंखचक्रांकित विठ्ठलच या भक्तांच्या भेटीसाठी सामोरा आला आहे. सोपानदेव म्हणतात, या दर्शनाने आनंदलेल्या भवतांनी मग पंढरीच्या वाळवंटात काला केला.

आणीक ऐके गा दुता । जेथे रामनाम कथा तेथे करद्वय जोडूनी हनुमंता । सदासन्मुख असिजे ।।१।।

रामनामी चाले घोष । तो धन्य देशु धन्य दिवसु । प्रेम कळा महा उल्हासु । जगन्निवासु विनवितुसे ।।२।।

दिंड्या पताका मृदंग । टाळ घोळ नामे सुरंग । तेथे आपण पांडुरंग । भक्तसंगे नाचत ॥३॥

तथा भक्ता तिष्टती मुक्ती । पुरुषार्थ तरी नामे कीर्ति । रामनामी तया तृप्ती । ऐसे त्रिजगती यमु सांगत ।।४।।

ज्या नामे शंकर निमाला। गणिका अजामेळ पद पावला। अहिल्येचा शाप दग्ध माला । तोची पान्हा दिवला पांडुरंगे ॥५॥

चित्रगुप्त म्हणती यमा । काय करावे गा धर्मा। लोक रातले रामनामा । पुरुषोत्तमा विठ्ठलदेवा ॥६॥

कलिकालासी दाटुगे नाम । रुखे घरीले मला प्रेम । त्रिभुवनी विस्तारीले सप्रेम । रामनाम उच्चारी यम तोही तरला जाणा ।७।।

ऐसे नाम अगाध बीज । उच्यारी तो होय चतुर्भुज सोपान म्हणे है गुज । उमाशंकर देवाचे ॥८॥

ज्याठिकाणी रामकथा चाललेली असते त्याठिकाणी हनुमान दोन्ही हात जोडून उभा असतो. जेथे रामकथा चालते तो देश व तो दिवस धन्य आहे. टाळ व मूदुंगाच्या जयथोषात भक्तांच्या दिंड्या आल्या म्हणजे स्वतः विठ्ठल त्यांच्यासोबत आनंदाने नाचत असतो. अशा ठिकाणी जो आनंद मिळतो त्याचा प्रत्यक्ष मुक्तीलाही हेवा वाटतो. ज्याच्या नामस्मरणात शंकर दंग होतो, ज्यामुळे गणिका, अजामेळा, अहिल्या यांचा उलद्वार झाला तो हा विट्ठलच आहे, असा भाव संत सोपानदेव व्यक्त करतात. चित्रगुप्त यमाला विचारतात की, या विठ्ठलाच्या अथवा रामनामाच्या स्मरणात दंग झालेल्या लोकांसमोर काय करावे? यांना अमरत्व प्राप्ती झाल्यामुळे आमचा उपाय चालत नाही. अखेरीस सोपानदेव ग्वाही देतात की, अशाप्राकरचे हे रामनाम, विठ्ठलाचे नाम असून त्याच करणाच्याचा उखार झाल्याशिवाय राहणार नाही, हे प्रत्यक्ष उमाशंकर देवाचे वचन आहे.

“सर्वकाल ध्यान हरिरुप ज्याचे । तथा सर्व रुप साचे जवळी असे ॥ हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोचि धन्य ।।१।।

हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोची धन्य।।२।।

हरि हेचि मन संपन्न अखंड । नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।।

सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु । हरि रूपी रतु जीव शिव ॥४॥”

जो सदा सर्वकाळ श्रीहरीच्या रूपाचे ध्यान करतो, त्याच्याजवळ श्रीहरी त्या रूपात वावरत असतो. श्रीहरीच्या स्मरणात ज्याने प्रपंचाचा त्याग केला तो श्रीहरीच्या रूपातच विलीन होतो. ज्याचे मन श्रीहरीमग्न झाले आहे त्याला ब्रह्मांडरूप प्राप्त होते. सोपनदेवांना अशीच विदेहावस्था प्रात्प झाली असून तो हरीरूपात रममाणझाला आहे.

“मनाचे मवाळ हरिरुप चितिती । रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।।

रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वधा । न पवेल आपदा नाना योनी ॥२॥

हरि ध्यान जप मुक्त पै अनंत । जीव शिवी रत सर्वकाळ ॥३॥

सोपान प्रेमा आनंद हरीचा । तुटला मोहाचा मोहपाश ॥४॥

जे मनाने मवाळ असतात असे भगवंताचे भक्त सतत हरीरूपाचे चिंतन करतात. त्यांच्या स्मरणात सतत रामकृष्णाची मूर्ती असते. त्याच्या ध्यानात ते सदा रत असल्यामुळे अनेक योनीतून होणाऱ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांचा मुक्तता होते. अशाप्रकारे जे सदोदित हरीनामाच्या प्रेमात बुडालेले आहेत त्याचे मोहाचे पाश तुटून पाडतात, असे सोपानदेव म्हणतात.

आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे । नाममार्गे वळगे निषे रया ।।१।।

नाम परब्रह्म नाम परब्रह्म । नित्य रामनाम जपीतुसे ॥२॥

अंतरीच्या सुखे बाहिरिलिया वैखे पर्रह्म सुखे जपतुसे ॥३॥

सोपान निवांत रामनाम मुखात । नेणे दुजी मात हरिविण ।।४।।

नामस्मरण करणे हाच आपला आवडीचा मार्ग आहे. हे नामच परब्रह्माचे स्वरुप आहे. यासाठी आपण नित्य रामनामाचा जप करतो, सतत मुखात रामनामच असल्यामुळे आणि त्याशिवाय दुसरे काहीही करीत नसल्यामुळे आपल्याला मुक्ती निश्चित मिळणार आहे. ही खात्री असल्यामुळे आपण निवांत आहोत, असे सोपानदेव सांगतात.

“सबाझ कोंदले निरवात उगले । रामरसे रंगले अरे जना ।।१।।

हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण । दिननिशी प्रश्न मुखे करा ॥२॥

तरा पै संसार रामनामे निरंतर । अखंड जिव्हार रामरसा ॥३॥

सोपान जपत रामनामी रतु । नित्यता स्मरतु रामकृष्ण ॥४॥”

जे अंतर्बाह्य ‘रामकृष्ण हरी च्या नामात रंगलेले असतात, ते या संसाररूपी भवसागर तरून सहज पैलतीरी जातात. यासाठीच सोपानदेवही सतत रामनामाचा जप करतात व नित्य या भगवंताचे स्मरण करतात.

“अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी । निषधे माजि घरी दडोनिया ॥१॥

तैसे नका करू प्रगट सर्वेश्वरू । हरिनाम उच्चास जपा वाचे ।।२।।

विज्ञानी पै ज्ञान आटलेसे संपूर्ण । उभयता चैतन्य तैसा हरि ॥३॥

सोपान निवांत रामनामी रत । संसार उचित रामनामे ।।४।।

विज्ञानाच्या या युगात खरे ज्ञान लोप पावत आहे, मात्र एक श्रीहरीच या दौन्हींमध्ये चैतन्य भरण्यास समर्थ आहे, असे सोपानदेवांना वाटते. एवढा विश्वास असल्यामुळे सोपानदेव अतिशय निवांत असून रामनामाच्या स्मरणात रत झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा संसार रामनामस्वसूप झाला आहे.

“मोकषालागी धन वेचावे नलगे । रामकृष्ण वोळगे जपीतुसे ।। १।।

रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे। तो जाय विशेषे बैकुठभुवनी ॥२॥

वेगाचेनि वेगे जपा लागवेगे । प्रपंथ वाजगे हरिनामे ॥३॥

सोपान संचित रामनामामृत । नित्यता सेवित हरिकथा ॥४॥”

मोक्षाच्या प्राप्तीसाठी धन खर्च करावे लागत नाही, तर फक्त मुखात सतत रामनाम असावे लागते. अशी व्यक्तीच वैंकुंटाची अधिकारी होते. ज्याच्या मुखात सदा हरीनाम असते तो घन्य असून तोच हा भवसागर तरून जाण्यास समर्थ आहे, अशी वेदाची साक्ष सोपानदेव काढतात. यासाठी रामनामाचा जप करण्यास सत्वर तयार व्हावे, प्रपंचाच्या गुंत्यात वावगे गुंतू नये. सोपनदेव म्हणतात की आमचे पूर्वजन्मीचे संचित म्हणून आम्ही रामनामामृताच्या प्राप्तीचे थनी झालो आहोत आणि नित्य हरीकथेचे सेवन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.

ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी । तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।

हरि हाचि आत्मा तत्व पै सोहपे । लरितील पापे लरिनामे ॥२।।

वैकुठीचे सुख नलगे पै चित्ती । हरि हेचि मुर्ति विद्ठल ध्यावो ।।३॥

याचेनि स्मरणे कैवल्य साचार । सोपान विचार हरि जपे॥४॥”

ज्याच्या मुखात सदा हरीनाम असते, तो या जगात धन्य आहे. तोच हा संसार तरून जातो. अशी वेदवाणी आहे. श्रीहरी हाच आत्मस्वरुप आहे हे सोपे तत्त्व सांगून सोपानदेय म्हणतात की, त्यामुळे आपली सारी पापे हरण होतात. श्रीहरी विठ्ठलाच्या मूर्तीचे ध्यान करणे, यापुढे प्रत्यक्ष वैकुंठाच्या प्राप्तीचे सुखही आम्हाला नकोसे वाटते. यास्तव सतत ज्याच्या स्मरणात कैवल्याची प्राप्ती करून देण्याची शक्ती आहे त्या पांडुरंगाचे नाम जपण्यातच सोपानदेव यन्यता मानतात.

हरिनाम जपे सहस्त्रवरि सोपे । जातीलरे पापे अनंतकोटी ।। १।

हरिविण नाम नाहीपारे सार । दुसरा विधार करू नको ॥२॥

हरि ध्यान चोख पवित्र परिकर । नित्यता शकर हरिष्यानी।।३॥

शा सोपान म्हणे हरि जप करारे सर्वथा । न पावाल व्यथा भवजनी ॥४॥

जो सतत हरीनामाचा जप करतो त्याची अनंतकोटी पापेही जळून खाक होतात. श्रीहरीच्या नामाएवढे सोपे नाम दुसरे नाही. त्यामुळे दुसरा विचारही मनात येऊ नये. प्रत्यक्ष भगवान शंकर ज्याचे स्मरण करतात त्या रामनामाइतके ‘पवित्र’ व ‘चोख’ नाम दुसरे नाहीच. यासाठी सतत हरीनामाचा जप करावा आणि भवसागरातून मुक्ती मिळवावी, अशी विनंती सोपानदेव सकल भक्तांना करतात.

“कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा । तब मार्ग येसरा तुजमाजी ।।१।।

आदि ब्रह्ममूर्ति तूचि विष्णु स्थिती । तुज कैवल्यपती मोल नाही ।।२॥

अमोल्य जे वस्तु पुंडलिक देवा । जगाचा विसावा जनकु माझा ॥३॥

सोपान म्हणे साफडे तुजचि सर्व कोडे । विनवितु मी बाडे वरणापाशी ॥४॥

नामस्मरण करणे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने दाखविलेल्या भक्तिमार्गावरून चालणे आहे, हे नाम अनमोल असून प्रत्यक्ष ब्रह्मा आणि विष्णूच्या तोलामोलाचे आहे. भक्त पुंडलिकामुळे हे अमोल थन आपणास सापडले आहे, याची आठवणही ते करून देतात. यासाठी सर्व अज्ञ जीवांनी आपल्या कल्याणासाठी भगवंताचे नित्य नामस्मरण करावे, असे साकडे घालून सोपानदेव सर्वांची विणवणी करीत आहेत.

राम कृष्ण मूर्ति या पुजीतसे भावे । सर्व तुवा व्हावे केशीराजा ॥१॥

रामकृष्ण म्हणे नित्य काळसदा । नेणे दुजा बंदा तुजविण ॥२॥

माहेर आठवे करिता कामना । तुझ्या चरणी वासना जडोनि ठेली ॥३॥

सोपान म्हणे सरते तुजचि आवडते । माझया मनोरथे तूची आशा ॥४॥

मी राम कृष्णाची मूर्तीची मनोभावे पूजा करीत असून हे केशीराजा माझे सर्वस्व तुझेच आहे. त्यांचे स्मरण करण्यावाचून मला दुसरे काही कामच राहिले नाही. या भगवंताच्या चरणावरच माझे माहेर असून त्यामुळेच माझी वासना नाश पावली आहे. भगवंताला जे आवडते तेच मी करीत असून तुझी प्राप्ती हेच माझे मनोरथ आहे, असे सापानदेव म्हणतात.

भी नेणे ती भक्ति नेणे त्या मुक्ति । तुझ्या नामपंथी मार्गु मना ॥१॥

हेचि मज चाड न करि मी आशा । तुज हषीकेशा चितितुसे ।।२।

तूची माझे धन जोडी हे निजाची । जननी तू आमुची जीवलगे ।।३।।

सोपान म्हणे तुजविण न कळे । तुजमानी सोडळे मने केले ॥४॥

देवाची भक्ती कशी करावी, मुक्ती कशी मिळवावी, हे मी काहीही जाणत नाही, तुझ्या नामस्मरणाच्या मार्गावर चालणे एवढेच मला कळते. तुझ्या विंतनाशिवाय माझी दुसरी काहीही आशा नाही. तुझी प्राप्ती होणे हेच माझे धन आहे. असे सोपानदेव मानतात.

सर्वपटी रुप समसारिखे आहे। म्हणोनिया ते सोय आम्हा भक्ता ।।१।।

निर्गुणी सगुण गुणामाजी गुण । जन तू संपूर्ण दिससी आम्हा ॥२॥

तेचि रुप रूपस दाविसी प्रकाश । पंढरीनिवास होऊनी ठासी ॥३॥

सोपान सलगी न बोलता उगा । तुजविण वाउगा ठाव नाही ॥४॥”

तुझे रुप सर्व प्राणीमात्रांमध्ये समान आहे. तू सगुण आहे की निर्गुण हेच कळत नाही मात्र तुझे रुप पंढरीत प्रकाशरुपाने उभे राहिले आहे. अशा या पंढरीनाथाशिवाय दुसरीकडे मला ठाव नाही, असे सोपानदेव सांगतात.

“सागरीचे सोय जगा निवारीत । मागुते भरीत पूर्णपणे ।। १॥

तैसे आम्ही दास तुज माजी उदास । तू आमुचा निवास सर्व देवा ॥२॥

तुजमाजी विरो सुखदुः विसरो । तुझ्यानामे तरो येची जन्मी ।।३।।

सोपान निकट बोलोनी सरल । तुष्टला गोपाळ अभय देत ॥४॥

ज्याप्रमाणे सागराचे पाणी जगाला पावसाच्या रुपाने जीवन देते आणि ते पाणी वाहत येऊन पुन्हा सागरालाच मिळते, त्याप्रमाणे आम्ही तुझे भक्त असून तुझ्या भक्तीत राहिल्यामुळे आम्ही संसाराच्या तापापासून मुक्त झालो आहोत, आम्हाला विरक्ती प्राप्त झाली आहे. माझे सारे सुखदुःख तुझ्याच ठायी आहे असे सोपानदेव सांगतात आणि हे ऐकून प्रत्यक्ष भगवंत आनंदी होऊन अभयदान देत आहे.

“हरिसुखवेषे नाचतो सर्वदा । गोविंद परमानंदा हरिबोधे ॥१॥

रामकृष्ण नामी या नामी आनंदु । नित्पनित्य गोविंद आम्हाधरी ॥२॥

निगुण नेणे सगुणाचार । सगुण विचार सर्वकाळ ॥३॥

सोपान पावप अवघेचि हरिरुप । हरिविण स्वरुप ने चित्ती॥४॥”

हरिनामाच्या सुखात आम्ही नाचत असल्यामुळे आणि ‘रामकृष्णहरी’च्या नामघोषात आम्हाला आनंद वाटत असल्यामुळे आमच्या घरी ‘गोविंद’ कायम वास्तव्यास आहे, असा विश्वास सोपानदेव व्यक्त करतात. आम्ही निर्गुण नव्हे तर सगुणसाकार पांडुरंगाचेच भक्त आहोत. त्यामुळे त्या श्रीहरीच्या स्वरुपाशिवाय आमच्या चित्तात दुसरे काहीच नाही.

गोपाळ अच्युत हा नाममहिमा । नित्यता पूर्णिमा आम्हा देही ॥१॥

रामकृष्ण नाम हा जप परम । ऐसा नित्य नेम सारू रया ॥२॥

वासना वोढाळ नेषो पै बरळ । नित्यता अढळ गोपाळ सेवू ॥३।।

सोपान सार जपतुसे नाम । दिननिशी नेम हृदयात ॥४॥

गोपाळ’, ‘अच्युत’ यांच्या नामस्मरणाचा महिमा असा की, आमच्या धर नित्य पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे आनंद असतो. आम्ही वासनेच्या ओढाळपणामुळे वाया जाणार नाही, कारण आम्ही नित्य गोपाळाचे नामात गुंतलेलो आहोत. हेच नाम सोपान सतत जपत असतो व तोच नेम सतत त्याच्या हृदयात राहतो आहे.

गोविंद मायव हा जपु आमुचा । नाही प्रपंचाचा आम्हा लेशु ॥१॥

गोविंद स्मरणे नित्यता पारणे । हरिनाम पटणे मोभमुक्ति ।। २।॥

नलगती तीर्थे एक गोविंद पुरे । वेगी कृष्ण धुरे बोलगो सदा ॥३॥

सोपान सांगत गोविंद स्मरणे । नित्यता ध्याने गोविंद ऐसे॥४॥”

‘गोविंद’, ‘माधव’ याच नामाच आमचा जप चालू असतो, त्यामुळे आमच्या मनात प्रपंचाचा लवलेश राहिलेला नाही. अशा नामस्मरणामुळेच आम्हाला मोक्ष लाभून मुक्ती मिळते. एका गोविंदाच्या नामस्मरणापुढे आम्हाला कुठल्या तीर्थटनाचीही गरज वाटत नाही. यासाठी सदा गोविंदाचेच स्मरण करावे, असे सोपानदेव सांगतात.

“विठ्ठल पै सार हा जपु आमुचा । आणि त्या शिवाचा नित्यनेमु ।।१।।

गोविंद श्रीहरि हेचि तो उच्चारी । शिव वराचरी आत्माराम ।।२।।

नामेविण नेणे दुनियाची मातु । गोविंद स्मरतु शिवराणा ॥३॥

सोपान धारणा गोविंद पाठाची । कोटि पै कुळाची कुळवडी ।।४।।

श्रीविठ्ठला’व्या नामाचा जप आम्ही करतो, तो भगवान शंकरांनीही केला आहे. ‘गोविंद’, ‘श्रीहरी’ या नामाचा सतत उच्चार करणे, या नामाशिवाय दुसरा विचार न करणे, ही भगवान शिवाचीही धारणा आहे. यामुळेच या नामाचाच पाठ करण्याची सोपानदेवांचीही धारणा पक्की झाली आहे, ज्यामुळे आमच्या कोटी कुळांचा उद्धार होईल.

“हरिविण दुजे न देखे चित्त माझे । म्हणोनि सहजे विचरतु १॥

सर्व हरि हरि तो माझा कैवारी । दुजी भरोबरी नेघो आम्ही ॥२॥

राम हा सकळ सर्व आम्हा आहे । दुजे ते न साहे परब्रह्मी ॥३॥

सोपान सलगी विनवितो तुम्ता सर्व हा परमात्मा आम्ता दिसे ।।४।।

श्रीहरिशिवाय दुसरे काहीही माझ्या चित्तात येत नाही. माझा कैवारी असलेला श्रीहरी असल्यामुळे त्याची बरोबरी दुसऱ्या कशाचीही होणार नाही. हा सर्वव्यापक परमात्मा आम्हाला लाभल्यामुळे सोपानदेव सर्वांना त्याची भक्ती करण्याची विनंती करतात.

“हरिविण दुजे नावडे पै दैवत । जी समर्थ बोले सृष्टि ।।१।।

हरिराम गोविंद नित्य हाचि छंद । हृदया आनंद प्रेमबोधु ॥२॥

हरि हेचि दैवत समर्थ पै आमूचे । बोलणे वेदांचे बोलती मुनी ॥३॥

सोपान आलगटु नामपाठ वावे । नित्य विठ्ठलाचे चरण सवयी ॥४॥

अशाप्रकारे पंढरपूर या नगरीचे माहात्म्य आणि आपले आराध्य दैवत पांडुरंग यांचा गौरव सोपानदेवांनी केलेला आहे. पंढरीची तुलना ते वैकुंठाशी करतात. ते पंढरीला भूवैकुंठच मानतात. पांडुरंग हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. तोच पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरीला आला आहे.

यामुळेच त्याला सोपानदेव ‘गोविंद’, गोपाळ’, ‘श्रीहरी’, ‘अच्युत’, ‘माधव’ अशा अनेक नावाने पुकारतात. पंढरीची वारी आणि पांडुरंगाचे नित्य स्मरण करणाऱ्यास अन्य देवाची भक्ती करण्याची, अन्य तीर्थाची यात्रा करण्याची गरजच नाही. केवळ एवढ्याच गोष्टीमुळे त्याला वैकुंठप्राप्ती होते, त्याचा जन्ममरणाचा फेरा थांबतो, अनेक योनीतून करण्याचा प्रवास थांबतो. पंढरीची वारी व पांडुरंगाचे नित्य स्मरण, ‘रामकृष्ण हरी’ या नामाचा जप करणे, यामुळे प्रपंचातून मुक्ती मिळेल, असा सोपानदेवांचा दृढ विश्वास आहे.

संत सोपानदेव – श्रीनिवृत्तीनाथ कृपा

श्रीनिवृत्तीनाथ हे या सकल भावंडांचे गुरू. ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताई या सर्वांनाच त्यांनी गुरूदिक्षा दिली. त्यामुळे या सर्वांनाच निवृतलीनाथांबदल खूप आदर आहे. या सर्वांनी निवृत्तीनाथांची आपल्यावर असलेली कृपादृष्टी व प्रेम व्यक्त करण्यासाठी अभंगरचना केली आहे. सोपानदेवाचेही असे काही अभंग असून त्याचाच परामर्श येथे घेतला आहे.

नाही नाही भान न दिसे प्रपंच । रोहिणी आहाव मृगजळ ।। १।।

तुटलासे साटा वासना चोखाळ । दिननिशी फळ राम झाला ॥२॥

रामेविण दुजे नाही पै हो बिजे । बोलतु सहजे वेदु जाणा ॥३॥

निरवृत्ति खुणा विज्ञान देवा हरि । सोपान झडकरी झोबियेला ॥४॥”

आम्हाला प्रपंचाचे भान राहिले नाही, वासनेपासून आम्ही अतिशय दूर आहोत. कारण आमच्या मनात रात्रंदिन रामाचे नाम आहे. रामाशिवाय आम्हाला दुसरे काही सूचत नाही, हेच आम्हाला वेदांनीही सांगितले आहे. हे सारे ज्ञान आम्हाला निवृत्तीकृपेने मिळालेले असून सोपानदेवाने ते आत्मसात केले आहे.

तुझा तुचि थोर तुज नाही पार । आमुचा आचार विद्वलदेव ।। १।।

आपी सधर सर्व हा श्रीधर । सर्व कुळाचार पांडुरंग ॥२॥

न दिसे दुसरे निर्धारिता खरे । श्रीगुरूविचारे कळले आम्हा ॥३॥

सोपान म्हणे रखुमादेवीवर । तूचि आमुचे पर कुछवटी ॥ ४ ॥

तू थोर आहेस, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा आधार नाही, असा तू विठ्ठल आमच्या कुळाचा कुळाचार आहे. विठ्ठलाशिवाय आम्हाला दुसरे काही दिसत नाही, याचे भान आम्हाला श्रीगुरूच्या विचाराने मिळाले आहे. यामुळे आमच्या कुळाचा उद्धार ‘बापरखुमादेवीवर’ विठ्ठलच करील, असे सोपानदेव सांगतात.

“मी माझी कल्पना पळाली वासना । जनी जनार्दना सेवितुसे ॥१॥

तू तव संपन्न आमुवे हो थन । सांगितली खूण निवृत्तीदेवी ॥२॥

तुजमाजी प्रेम गेले सप्रेमे । जप व्रत नेम हारपले ॥३॥

सोपान सगळा न दिसे इही डोळा । तूची बा गोपाळा आत्माराम ॥४॥

माझी ‘कल्पना’, ‘वासना’ पूर्णपणे नष्ट झाल्या असून विठ्ठलच आमचे ‘थन’ आहे. ही महत्त्वाची खूण आम्हाला निवृत्तीनाथांनी सांगितली आहे. तुझ्याठायी आमचे एवढे प्रेम आहे की, त्यापुढे इतर सारे जप, तप आणि व्रत व्यर्थ आहेत. सोपानदेवांना यामुळेच दुसरे काही दिसत नसून केवळ गोपाळ हाच त्यांचा ‘आत्माराम आहे.

आत्मरुप सुख आत्मपणे चोख । निर्गुणीचे चोख सगुणी जाले ।।१।।

रुप अरुप रूयामाजी सर्व । रूपी भावाभाव नाटवती ।॥२।।

बुडाले सगुण नाही मी तू पण । अंतराची खूण मावळली ॥३॥

सोपान गुरू ते ते ब्रह्म पुरते । पुसोनी आरूते ठाकियेले ॥४॥

आत्मरूप असलेले निर्गुण रुप ‘सगुण’ झाले आहे. रुप आणि अरुप हे सारेच या रुपात सामावले आहे. या सगुण रूपात माझे मी-तू पण हरवले आहे आणि अंतरीची खूण मावळली आहे. हे सारे मला श्रीगुरूच्या कृपेने लाभले आहे असे मनोगत सोपानदेव व्यक्त करतात.

पहाते न नटे मन तिये वाटे । बोलणेची खुटे बोलणेपणे ॥१॥

परतल्या श्रुती पडियेले मौन । शास्त्र ते संपन्न नेणे तया ॥२॥

गेला तो आचार आवघाची विचार । परे परता पर परब्रह्म ॥३।।

शा सोपान दयाळ गुरूनामे बळ । आपण निखळ आपरूपे ॥४॥

पाहूनही ज्याची ओळख होत नाही, मनाला ज्याचा ठाव लागत नाही, ज्याच्या स्वरुपाची ओळख सांगण्यासाठी श्रुती आणि शास्त्रेही कमी पडतात, अशा परम परमात्म्याची ओळख आपणास आहे आणि ती केवळ श्रीगुरूच्या आशीर्वादाने झाली आहे, असे गौरवोद्गार सोपानदेवांनी काढले आहेत.

“दिन व्योम तारा ग्रहगण शेखी । एक हपीकेशी सर्व आम्हा ।।१।।

ब्रह्मेविण नाही रिता ठावो पाही । निवृत्तीच्या ठायी बुडी देत ।॥२॥

सर्व हे निखळ आत्माराम सर्व । नाही देहभाव विकल्यता ।।३।।

सोपान निकट गुरूनामपेठे । नित्यता वैकुंठ जवळी असे ॥४॥”

ग्रहताऱ्यांनी कितीही शेखी मिरवली तरी आम्हाला त्याची तमा नाही. आमच्याजवळ प्रत्यक्ष हृषिकेश आहे.. आम्हाला आत्मारामाची ओळख झाली आहे. श्रीगुरू निवृत्तीनायांच्या निकट सान्निध्यामुळे आम्हाला वैकुंठाचीच प्राप्ती झाल्याचा भास होतो, असे सोपानदेव सांगतात.

आम्ही नेणो माया नेणो ते काया । ब्रह्म लवलाह्या आम्हामाजी ।।१।।

मी तू गेले ब्रह्मी मन गेले पूर्णी । वासना ते जनी ब्रह्म जाली ॥२॥

जीवशिवभाव आपणची देव । केला अनुभव गुरूमुखे ।।३॥

सोपान ब्रह्म वर्ततसे सम । प्रपंचाचा अम नाही नाही ॥४॥

मायेच्या मोहपाशात आम्ही गुंतणार नाही कारण आमच्या अंतरंगात ब्रह्मस्वरूपाचा वास आहे. आमच्यातील मी-तूपणाची व वासनेची भावना स्वतःच ब्रह्ममय झाली आहे. प्रपंचाच्या भ्रमरूपी मायाजालापासून आम्ही मुक्त असून ही सारी श्रीगुरूंची कुपा आहे, असे सोपानदेव सांगतात.

“दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले । अद्वैत बिंबले तेजोमय ।। १ ॥

तेजाकार दिशा बिंबी बिंब एक । निवृत्तीने चोख दाखविले ॥२॥

निमाली वासना बुडाली भावना । गेली ते कल्पना ठाव नाही ॥३॥

सोपान नैश्वर परब्रह्म साचार । सेवितु अपार नाम घोटे ॥४॥”

मी-तूपणाची निर्मिती करणारी द्वैतभावना आमच्यात राहिली नाही, आम्ही अद्वैतवादी आहोत. हातेजोमय मार्ग आम्हाला श्रीगुरू निवृत्तीनाथांनी दाखविला आहे. आमच्यातील वासना, भावना आणि कल्पना हे विकार नष्ट झाले आहेत आम्ही आता केवळ परब्रह्माच्या नामात दंग आहोत आणि हे सारे आम्हाला श्रीगुरूच्या कृपेने लाभले आहे, अशी कबुली सोपानदेव देतात. अशाप्रकारे आपले जेष्ठ बंधू आणि श्रीगुरू निवृत्तीनाथ यांच्यामुळेच आपणास हा भक्तिमार्ग सापडला, माया, वासना व विकारांपासून आपली सुटका झाली आणि खऱ्या परमेश्वराकडे जाण्याचा आध्यात्मिक मार्ग सापडला, अशी आदरपूर्वक आणि नम्र भावना सोपानदेवांनी या अभंगांतून व्यक्त केली आहे.

संत सोपानदेव – उपदेशपर

ज्ञानदेवादी भावंडांना व इतरही संतांना परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीने परमेश्वराला ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले होते. मात्र ही किमया सर्वसामान्य भक्तांना साधता येणे शक्य नसते. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणती साधना करावी, कोणत्या मार्गाने जावे हे सामान्य जणांना समजत नाही.

त्यासाठी ज्यांना परेश्वराकडे जाण्यावा मार्ग सापडला आहे, त्या संतांवर इतरांना तो मार्ग दाखविण्याची जबाबादारी आपोआप येते. यामुळे बहुतेक संतांनी समस्त भोळ्याभाबड्या वारकऱ्यांना सोप्या व योग्य भक्तिमार्गाची ओळख करून देण्यासाठी आपल्या अभंगांतून मार्गदर्शन केले आहे. सोपानदेवांनीही आपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या आधाराने जनतेला काही उपदेश अभंगांतून केलेला आहे. या अभंगांची संख्या अल्प असली तरी त्यातील उपदेश मोलाचा आहे.

हरि असे देही हाचि भावो खरा । वाया तू सैरा धावू नको ॥१॥

धावता अवचटे पडसील व्यसनी । संसारपसणी योनिमाळे ॥२॥

हरिचेनि ध्यान निरंतर करी । बाह्य अभ्यंतरी एकु राम ॥३॥

सोपान म्हणे राम नादे सर्वा घटी । विधी जगजेठी क्षरलासे ॥४।।

ज्याच्या प्राप्तीसाठी सारे जग धावते आहे, त्या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी इतरत्र सैरावैरा धावण्याची गरज नाही, तो श्रीहरी आपल्या देहातच वास करीत असतो. इतरत्र धावत सुटल्यास व्यसनांचा बळी होण्याचा आणि संसारात गुंतल्यामुळे लक्षयोनीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यासाठी ज्याचा वास देहाच्या आत आणि बाहेर राहतो त्या एका श्रीरामाचे ध्यान निरंतर केले पाहिजे. हा श्रीराम सर्व प्राणमात्रांच्या देहात राहतो, याचे भान ठेवा असा उपदेश सोपानदेवांनी केला आहे.

“हरि नांदे देही ऐसा भावो आहे। परतोनि पाहे अरे जना॥१॥

परतलिया दृष्टि चैतन्याची दृष्टि । नामेव वैकुंठी पावे जना ॥२॥

हा बोध श्रीरंगे अर्जुना उपदेशु । सर्व हृषीकेशु सर्वा रूपी ॥३॥

सोपान धारणा हरि नांदे सर्वत्र । त्याचेचि चरित्र करलेसे ।॥४ ॥

श्रीहरी देहामध्ये वास करतो हा भाव मनात असला पाहिजे. त्यामुळे केवळ त्याच्या नामस्मरणाने बैकुंठाची प्राप्ती होते. हाच उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला केला होता की, भगवंत सर्वाघटी भरलेला आहे. त्यामुळे या सर्वव्यापी भगवंताचेच स्मरण करावे असे सोपानदेव सांगतात.

“हरिविण भावो न धरावा पोटी । सर्वभावे सृष्टि एकातत्त्वे ॥१॥

तत्त्वता श्रीहरि सर्वाघटी आहे । उभारोनि बाहे वेद बोले ।॥२॥

हरिविण नाही जीवशिव पाही। शिवाच्या हो देही आत्मा हरि ॥३॥

सोपान म्हणे हरिविण नाही तत्व । हरि हाचि सर्वत्र सर्वी वसे ॥४॥”

श्रीहरिशिवाय मनात दुसरा कोणताही भाव धरू नये कारण तोच सर्व सृष्टीत भरलेला आहे. हेच बेदांनीही सांगितलेले आहे. सर्व जीवांच्या ठायी पाहिले तरी फक्त श्रीहरीच दिसेल, तो भगवान शिवाच्याही देहात वास करतो. यास्तव श्रीहरीशिवाय दुसरे कोणतेही तत्त्व नसून तोच सर्वत्र भरलेला आहे हे ध्यानात घ्यावे, असे सोपानदेव सांगतात.

शरीर निर्मळ वासना टवाळ । का रे तु वरळ भक्तिविण ।।१।।

सर्व ब्रह्म हरि नेणसि सोवळे । एकाचि गोपाळे जन वन ॥२॥

आप पृथ्वी तेज वायो व्योम । पंचभूती सम वर्ततसे ॥३॥

सोपान म्हणे गुरूचा उपदेश शुद्ध । तरीच वासना प्रबुद्ध तया नरा ॥४॥”

शरीर हे मुळात निर्मळ असते मात्र वासना त्यालाअशुद्ध बनवते. यासाठी भक्तीमार्गाचा अवलंब करावा जेणेकरून मनुष्य वासना विकारापासून दूर राहतो. श्रीहरी हा सर्व ब्रह्मांडात भरलेला असून जल, पृथ्वी, अग्नी, वायू व आकाश अशा सर्व ठिकाणी तो सारखाच वास करतो. यास्तव त्याची भक्ती करण्यासाठी वासनेचा त्याग करावा आणि हे केवळ श्रीगुरूच्या उपदेशामुळे साध्य होते,असे सोपानदेव सांगतात. ज्ञानदेव व इतर भावंडे सोशिक मनोवृत्तीचे होती. तथापि, सोपानदेवांची वृत्ती मात्र समाजाला फटकारण्याची होती. या भावंडांना ब्राह्मणांनी वाळीत टाकेलेले होते. त्यांच्यावर उपनयन संस्कार झालेले नव्हते.

“उपनयनाथिकार ज्यांना हेतुतः नाकारला, ते समाजात नुसतेच अप्रतिष्ठ शूद्र ठरत नसत, तर अस्पृश्यही ठरत. त्यांचा छायास्पर्शही निषिद्ध मानला जाई; त्यांच्या स्पशाने विटाळ होतो, असे भय बाळगले जाई. याचा त्यांना कमालीचा संताप वाटत असे. सोवळ्या-ओवळ्याचा आणि पवित्र-अपवित्राचा निर्णय करण्याची ही मूढ रीत त्यांना सर्वस्वी अमान्य होती. देह सर्वांना सारखाच प्राप्त झाला आहे, एकाच निर्मितीप्रक्रियेतून प्राप्त झाला आहे, त्यामुळे देहाचा विटाळ समर्थित होत नाही. विटाळ मानायचाच असेल, जर अभद्र वासनेचा मानला पाहिजे, असे सोपानदेवांचे रास्त म्हणणे आहे.” ०४ असा अभिप्राय रा. चि. ढेरे यांनी नोदविला आहे.

“मन आधी मुंडी वासनेते खंडी । विद्ठल ब्रह्मांडी एक आहे ॥ १॥

मन हे सोवळे सदा शौच करी । तुज निरंतरी हरि पावे ॥२॥

विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य । सोवळा आरोग्य हरि देख ॥३।।

सोपान नेणे सलगीचा सोवळा । त्याने वेळोवेळा स्मरे हरि ॥४॥

आधी मनातील वासना दूर करावी म्हणजे सर्व विश्वात श्रीविठ्ठल भरलेला आहे, याचा अनुभव येईल. यासाठी अगोदर मनात शुद्ध भाव असावयास हवा. विवके, वैराग्य आणि ज्ञानाच्या अंगिकाराने श्रीहरीचे दर्शन होते. हे सारे अंगिकारल्यामुळेच आपणास श्रीहरीचे सतत स्मरण होते, असे सोपानदेव सांगतात.

“पृथ्वी सोवळी आकाश सोवळे । मन हे बोवळे अमक्ताचे ॥ १॥

ब्रह्म है सोवळे न देखो वोवळे । असो खेळेमेळे इये जनी ॥२॥

ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी । तारिसी निर्धारी एका नामे ॥३॥

सोपान अखंड सोवळा प्रचंड । न बोलो वितंड हरिविण ।।४।

पृथ्वीपासून आकाशापर्यंत सारे विश्व शुद्ध आहे मात्र अभक्ताचे मनच अशुद्ध असते. ब्रह्म हे सोवळेच आहे. या ब्रह्मांडातील पंढरी हे क्षेत्रही शुद्ध व पवित्र आहे. तेथे वास करणाऱ्या पंढरीनाथाच्या नामाने हा भवसागर तरून जाणे सोपे होते. यामुळेच सोपानदेव श्रीहरीशिवाय इतर कसल्याही वितंडवादात पडत नाहीत. सोपानदेवांना गुरुकृपेमुळे भगवंताच्या प्राप्तीचा आनंद मिळालेला होता. त्यांना पवित्रतेचा अनुभव मिळालेला होता.

“संतांचे जीवन हे विवेकमंडित असते आणि विवेकाचे स्वरुप अग्नीसारखे असते. दांभिकांना ते दाहक वाटते तर भाविकांना पावक वाटते तपःपूत मातापित्यांच्या पोटी जन्म घेऊनही आपल्याला वरिष्ठवर्णीयांनी पतित मानून नाकारावे आणि प्रायश्चित्तानेही परत प्रतिष्ठित होण्याचे मार्ग रुद्ध करावे, ही घटना सोपानदेवांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उमटविणारी ठरली. समाजातील सारे दलित-पतित त्यांच्या दृष्टीपुढे उभे राहिले आणि त्यांनी अत्यंत निर्भय वृत्तीने आपणांस पतितांच्या श्रेणीत बसवून, पतितांनाही आत्मबलाने प्रतिष्ठा प्राप्त करता येते, असा उद्घोष केला.”०५ हेच या अभंगा लक्षात येते.

संत सोपानदेव – ज्ञानपर

सामान्य वारकरी भक्तांसाठी सोपानदेवांनी अभंगांची रचना केली आहे. त्यामध्ये पंढरीच्या क्षेत्राचे माहात्म्य, विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन, नामाचा महिमा, संतांची थोरवी, भोळ्या भक्तांना उपदेश आणि श्रीगुरुचा महिमा वर्णन करणारे अभंग आतापर्यंत आपण अभ्यासले आहेत. तथापि, ज्यांना आध्यात्मिक ज्ञानाची भूक आहे, जे भगवंतांच्या प्राप्तीसाठी लागणारी योग्यता प्राप्त करण्यास पात्र आहेत, अशा भक्तांना हे ज्ञान मिळावे ही इच्छा सोपानदेवांच्या ठायी दिसून येते. याच भावनेतून त्यांनी ‘ज्ञानपर’ अभंगांची रचनाकेली असावी. ही रचना संख्येने अल्प असली तरी तिच्यात भरलेला ज्ञानाचा ठेवा मोठा आहे.

राम सर्वोत्तम या नामे निखळ । जन हे सफळ दिसताहे ।।१।।

भिन्न नाही दुजे सर्व आत्मराज । नाचताती भेज योगीराज ।।२।।

माता पिता देव गृह दारा जन । सर्व जनार्दन सर्वा रूपी ॥३॥

सोपान खेचर ब्रह्म माजिवडे । ब्रह्मांडा एवढे आत्माराम ॥४॥”

सर्वोत्तम अशा रामनामामुळे सकल जनांचे कल्याण होते. हे नाम आणि आत्मा भिन्न नाहीत, हे दोन्हीएकच आहेत हे योगीजनांना कळलेले आहे. माता-पिता, घर-दार, पत्नी, देवता एवढेच काय पण साऱ्या जीवांच्या ठायी तो रामच आत्म्यस्वरुपात वास करतो. हा आत्माराम सकल ब्रह्मांड व्यापण्याएवढा विशाल आहे, असे सोपानदेव सांगतात.

“काढले कुटाळ वासना बळ । सर्व हा गोपाळ भरियेला ॥१॥

गेला पै परते शरीर हे रिते । नाशिवंत भुते दुरी केली ॥२॥

स्थावर जंगम स्थावरिला राम । सर्व शाम निःसंदेह ॥३॥

सोपान विनटे परब्रह्म घोटे। प्रपंच सपाट निर्वटियेला ।।४।।

वासनेचे कुटाळ एकदा बाहेर काढले की शरीरात गोपाळ भरून राहतो. जी नाश पावणारी आहेत, अशी पंचमहाभुते दूर करून शरीर रिकामे केल्यावर तेथे फक्त श्रीराम शिल्लक राहतो. हे ज्ञान मिळाल्यामुळे सोपानदेव या प्रपंचाच्या पाशातून मुक्त झाले आहेत.

हरि असे देही सर्वकाळ संपन्न । म्हणोनि चिंतन निरंतर ॥१॥

हरिविण नाही हरविण नाही । दिशा द्रुम पाही विंबलासे ।॥२॥॥

हरिविण देवो नाही अन्य भावो । हरि असे सर्व देहभावी ।।३।॥

सोपान सांगत हरि सर्वत्र वसे । भाग्यवंता दिसे सर्व काळ ॥४॥”

श्रीहरीचा वास देहामध्ये सदा सर्वकाळ असतो, म्हणून त्याचे निरंतर चिंतन केले पाहिजे. कोणत्याही दिशेला पाहिले तरीआपणास हरीविण दुसरे काही दिसणार नाही. शिवाय श्रीहरीशिवाय दुसरे दैवतच नाही की जे सर्व देहांमध्ये वास करून आहे. यामुळे अशा सर्वत्र वास असलेल्या श्रीहरी महिमा सोपानदेव सांगतात आणि तो भाग्यवंतास सततदिसतो अशी पुष्टी देतात. एकतत्त्वेसी हरि एक रुप माझा । मिन्न भाव दुजा नाही नाही ॥२॥

“पाहाणे परिसणे नामरूपी गेले । निराकारी ठेले एकतत्वेसी ॥१॥

एकतत्वेसी हरि एक रूप माझा । भिन्न भाव दुजा नाही नाही ।।२।।

संग परिकर सापडला आम्हा । सर्व आत्माराम पूर्णपणे ॥३॥

सोपान देव्हडे मन माजिवडे । ब्रह्मांड येवढे गिनियेले ॥४॥”

त्याचे रुप पाहणे, ऐकणे आणि त्याचेच नामस्मरण करणे हे एकच महत्वाचे तत्त्व आहे. या तत्त्वातच माझा श्रीहरी एकरुप झालेला असून त्याबाबत माझ्या मनात शंका नाही. संतांच्या सहवासाने आम्हास हे आत्मारामाचे स्वरुप पूर्णपणे कळाले आहे आणि हे स्वरुप ब्रह्मांड गिळून टाकण्याएवढे विशाल आहे. असे सोपानदेव सांगतात.

“ना रुप ठसा निरालंब जाला । सगुणी उदेला तेजाकार ॥१॥

तेजरुप तेजी आरुप काजी । जीव शिव भोजी नांदताती ॥२॥

राहाते पाहाते जिवाचे पोखीते । आपणची उखीते दिसे एक ॥३॥

सोपानी नलगे प्रपंची वियोग । ब्रह्मार्पण भोग नुरे तोही ॥४॥”

ज्याच्या रूपाचा ठसा मनावर कोरला गेला आहे असा भगवंत सगुण साकार अवतीर्ण झाला आहे. या तेजोमय रूपामध्ये जीव आणि शीव दोन्ही एकत्र नांदतात. तोच जीवाचे रक्षण करतात आणि तो जीवच होतो. या ज्ञानामुळेच सोपानदेवांचा प्रपंच सुटला आणि त्यांनी सारे भोग ब्रह्मस्वरूपी अर्पण केले, म्हणूनच त्यांना भगवंताची प्राप्ती झाली.

“नाद रसी लीन ब्रह्म सामावले । त्यामाजि सानुले ब्रह्म चोख ।।१।।

मन हे निकट ब्रह्मारूपे चोख । ब्रह्मी ब्रह्म लेख एकपणे ॥२॥

साशकित गावी जाला परिमाण । घट मटा दिन हारपला ॥३॥

सोपान सोपारे निरालंब निर्धरि । नंदाचे गोजिरे माजि खेळे ॥४॥”

मन एकवेळ ब्रह्मस्वरूपात लीन झाले म्हणजे ते दोघे एकरूपच होतात. जे याबाबत शंका घेतात त्यांचा जन्म वाया जातो. सोपानदेव सांगतात की माझे मन निर्धारपूर्वक श्रीहरीपाशी लीन झाल्यामुळे तो गोकुळात खेळणारा भगवान परमात्मा श्रीकृष्ण आम्हाला प्राप्त झाला.

नाद ब्रह्म मुसे नादरुप वसे । तैसा जनी दिसे आत्मपणे ।।१।।

बाहेर साबडा आम्हा दिसे घड़ा । मातियेचा वेढा जीवनालागी ।।२।।

तैसे हे शरीर आत्मपणे नीट । मन हे निकट बोखाळपणे ।।३।।

सोपान साजिरे ब्रह्म ते गोजिरे । जीवन साकार ब्रह्म हेतु ॥४॥”

मुळात आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे. मात्र जनांमध्ये तो आपणास मातीने बनविलेल्या घड्याप्रमाणे आव बद्ध दिसतो. शरीरात मन हे चोखपणे नांदत असते. हे ब्रह्मस्वरूप सोपानदेवांना उमगल्यामुळे त्यांचे जीवन ब्रह्ममय झाले आहे.

“शांति दया क्षमा तेथील उपाया । निर्गुणी ते माया आपरूप ॥१॥

ज्योतीरुप छाया सर्व हे निर्गुण । आत्मारामी भिन्न नाही नाही ।॥२।।

मौन्य परे मिठी पश्चंतीसी नुठी । मध्यमेच्या बेटी खुंटे तारू ।।३।।

सोपान वैखरी देहामाजी भारी । पुर्ण तो श्रीहरी बिंबी बिंब ॥४॥”

दया, क्षमा व शांती हे गुण अंगिकारल्यास मायेच्या पाशातून मुक्त होता येते. आत्माराम हा ज्योतीस्वरुप व निर्गुण असून त्याशिवाय वेगळे काहीही नाही. परा, पश्चंती, मध्यमा या त्याच्या स्वरूपाचे महिमान व्यक्त करण्यास असमर्थ असून सर्वत्रपूर्णपणे भरून राहिलेल्या श्रीहरीचे वर्णन सोपानदेव वैखरी वाणीनेच होते असे सांगतात.

“वैकुठ आगळे न करू वेगळे । मन ब्रह्मेळे एक ठेले ।॥१॥

उपमे वैकुंठ ब्रह्म हे तत्त्वबीज । सूचना अखंड सर्वाभूती ॥२॥

उदयोस्तु परिमाण ब्रह्म । चंद्र सूर्य नेम हरपले ॥३॥

सोपान तो क्षत्री जन हेची क्षेत्र। तेथे तो विचित्र हारपला ॥४॥”

भगवंताचे निवास असलेले वैकुंठ हे एक वेगळे म्हणजेच अलौकिक स्थान आहे. याला दुसरी उपमा नाही. वैकुंठाचे मूळतत्त्व असे बीज म्हणजे ब्रह्म आहे. चंद्रसूर्याची ग्रहगोलांचे उदयास्त याच्याच ठाई आहेत. सोपान हा क्षेत्रूपी जनातील एक असल्यामुळे तोही त्या ब्रह्मस्वरूपापुढे हरपून गेला आहे.

ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न । प्रपंचाचे भरण तेथे नाही ॥१॥

स्वरूपाची खूण होऊनी सफळ । भोगी सर्वकाळ चित्सत्ता ॥२॥

आत्मापरमात्मा भेदाभेद द्वंद्ध । एकतत्त्व अभेद जनी वनी ॥३॥

सोपान दीप दिपी ते जीवन । तयामाजी जीवन एक झाले ॥४॥

ज्ञानदेवांनी जेज्ञान दिले त्यामुळे प्रपंच दूर झाला आणि स्वरूपाची खूण पटल्यामुळे सारे जीवन सफळ झाल्यामुळे सर्वकाळ चिदानंदरूपाची प्राप्ती झाली. आत्मा व परमात्म्यातील भेद नाहीसा होऊन त्याचे एकतत्व समजून आले. दीप आणि दीपी यातील भेद जाणवल्यामुळे त्यामध्येच सोपानदेवाचे जीवनही एकतत्त्वी झाले आहे.

“निष्काम निश्चळ निश्चित स्वरुप । तेथे निर्विकल्प मन गेले ॥१।।

ध्येय गेले ध्यान ध्याता माजी पूर्ण । आपण सनातन होऊनी ठेला ॥२॥

निर्गुण निरालंब निर्विकार फळ । आपणची सकळ होऊनी ठेला ॥३॥

सोपान जिव्हाळे मनाचे ते आळे । परब्रह्मा सावळे तयामाजी ॥४।।

जे निष्काम, निश्चल, निश्चित स्वरूपी आहे, त्याच्याठाई मन गेले आहे. माझे ध्येय आता ध्यानामध्ये पूर्ण विसावले आहे. त्यामुळे मला सनातनस्वरुपाची प्राप्ती झाली आहे. निर्गुण, निर्विकार अवस्था आपणास प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे आपणामध्ये ते सावळे परब्रह्म सामावले आहे, असे सोपानदेव सांगतात.

“आपरुप हरी आपणची देव । आपणची भाव सर्व जाला ।।१।।

सर्व हरी हरी ब्रह्म अभ्यंतरी । एक चराचरी आत्माराम ।।२।।

सर्व काळ सम नाही तेहो विषम । आयणची राम सर्व ज्योती ।।३।।

सोपान तिष्ठत रामनामी लीन । मन तेथे मौन्य एकपणे ॥४॥

आपणास हरिरुपाची प्राप्ती झाली असून आपण देव असल्याची अनुभूती येत आहे. सर्वत्र श्रीहरी भरलेलाअसून चराचरात आत्माराम वास करीत आहे. तो सार्वकालीक असून तोच रामस्वरूप आहे. अशा सर्वव्यापी रामनामात सोपानदेवही लीन झाले असून त्याच्याठाई मन लावल्यामुळे त्यासोबत एकत्वाची प्राप्ती झाली आहे.

हरिविण नाही वेदांदिका मती । श्रुती त्या संपत्ती जया रूपी ॥१॥

हरी हाची सर्व उपनिषद भाव । रोहिणीची माव जनी दिसे ।।२।।

सर्वघटी राम जीवशिव सम । सर्वरूपे ब्रह्म भरले सदा ॥३॥

सोपान निकट परब्रह्म सेवी । सर्व हा गोसावी विड्ठलराज ।।४।।

श्रीहरिशिवाय वेदांनाही काही अर्थ उरत नाही. हीच श्रृतींची संपत्ती आहे. तोच उपनिषदांचेही भावरूप आहे. श्रीराम सर्वाघटी व्यापलेला आहे. सर्वत्र ब्रह्मच भरलेले आहे. सोपानदेवांनी या परब्रह्मस्वरूपाची अनुभूती घेतली असून त्यांना सर्वत्र श्री विठ्ठल भरलेला दिसतो आहे. सोपानदेव व त्यांचे अभंग यावर भाष्य करताना प्रा. कृष्णा गुरव लिहितात,

“वेदप्रणीत महाविचारांचे सार म्हणजे श्रीसोपानदेव. वेदांतील समृद्ध पारमार्थिक महाविचारांतूनही परमकैवल्यधाम दर्शविणारे सारभूत विचार श्रीसोपानदेव स्वतः जगले आणि मानवाने केलेली सर्व प्रकारची अवहेलना संतोषपूर्वक सहन करूनही या मानवाच्याच परमउद्धारार्थ सोपानदेवांनी हे ‘महाविचारांचे सार’ आपल्या अभंगांच्या रुपाने जगासमोर ठेवले. ही सोपानदेवांची परमकरूणेची परमसीमा होय.

संत सोपानदेव – समारोप

निवृत्ती, ज्ञानदेव या थोरल्या भावंडांच्या व मुक्ताई या धाकट्या बहिणीच्या सदैव सहवासात राहिलेल्या सोपानदेवांनी समाजाची अनेक रूपे पाहिली होती. त्यांचा छळ करणारा उच्चवर्ग व अज्ञानी व दरिद्री असूनही त्यांच्यावर प्रेम करणारा बहुजन वर्ग, या दोहोंचीही प्रचिती त्यांना आली होती. हा अडाणी समाज भगवंताच्या चरणी लागावा व त्याचा उद्धार व्हावा ही त्यांची भावना तयार होणे साहजिक होते. या सर्वच भावंडांच्या मनात सामान्य जनाविषयी करूणा होती. तशीच ती सोपानदेवांजवळ होती. श्रीहरी हा सदासर्वकाळ असणारा व नित्य आहे, तोच जगाचा चालक व पालक आहे. तो सर्वत्र नांदत असतो.

हा निर्गुण निराकार श्रीहरी पंढरपुरी पांडुरंगाच्या रुपाने भक्तांच्या कल्याणासाठी उभा ठाकला असून त्याच्या पायावर माथा ठेवून सर्वांनी आपले कल्याण करून घ्यावे. तोच या भवसागरातून तरून जाण्यासाठी मार्ग दाखवील, असा त्यांच्या अभंगातून उपदेश पहावयास मिळतो. यामुळेच सोपानदेवांच्या अभंगात या सामान्य जनतेच्या हितासाठी भगवंताचा धावा केलेला दिसतो.

मानवाने भगवंताच्या चरणी लीन व्हावे, यातच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असा त्यांच्या अभंगाचा मतितार्थ आहे. या भावंडांतील ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य १३, शके १२१८ या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर, सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी घेतली. यानंतर विरक्ती अवस्था प्राप्त झालेल्या सापानदेवांनीही त्यानंतर केवळ एका महिन्यात शके १२१८ मध्येच मार्गशीर्ष वद्य १३ रोजी सासवड गावी कडेच्या तीरावर वटेश्वराच्या राऊळाजवळ समाधी घेतली व आपली जीवनयात्रा संपविली.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

संत सोपानदेव माहिती मराठी । संत सोपानदेव समाधी | संत सोपानदेव चरित्र| संत सोपानदेव चरित्र मराठी|संत सोपानदेव अभंग| sant sopandev information in marathi| sant sopandev samadhi place| sant sopandev abhang

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *