संत बाळूमामा

संत बाळूमामा

बाळूमामांचे बालपण

संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गांव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ ( दि. ३-१०-१८९२ ) हा होता.

संत बाळूमामा बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटूंबीयांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होवून, बहीण गंगुबाई हि-याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेंव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधुना तृप्त केले. साधुनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरूद्ध पण आई-वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगुबाईची मुलगी सत्यव्वा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला.

बकरी चारत असताना अरे बाळू, तू गुरू करून घे…अशी आकाशवाणी झाली. तेंव्हा बाळूमामांनी ठरवले की, मी भुते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गूरू करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू, भुते काढलेले १२० रूपये मला दे…हे उद्गार ऐकून मामांनी गुरू म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले.

लग्नानंतर सुमारे ९ वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेंव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बक-यांचा कळप घेवून महाराष्ट् आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिध्दीस आले.

किर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्याना हाव, अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याण्यासाठी प्रसंगानुसार त्यानी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामिण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, निती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. लहनापासून थोरापर्यंत, गरीबापासून श्रींमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत.शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापूरी चप्पल हा त्यांचा पेहराव…भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो..बक-यांसवे शिवारातचं त्यांचा मुक्काम असे.गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव चालू केला.

बाळूमामांचे आदमापूर – दुजे झाले पंढरपूर

आदमापूर येथे सदगुरू संत बाळूमामा यांच्या समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणा-या ठसठशीत ओव्या पहात रमतो. एवढ्यात त्याची नजर समोरील गाभा-यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सदगुरू परमहंस मुळे महाराज, गारगोटी यांची मुर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे.

गाभा-यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेल्या आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभा-यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे.

सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तुंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांची मनं वेधून घेतात.स्नान वैगेरे आटोपून पवित्रपणा शिवाय गाभा-यात कोणी जात नाही. बाहेरूनचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तिर्थ आणि भंडारा ( हळदपूड) देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. येथे दक्षिणा वैगेरे काही मागणे जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशिर्वाद मागावा, इच्छेनुसार दान पेटीत टाकावा.भक्तगणांनी आणलेले नारळ भंडा-यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात. अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात. आपले जेवण आपण घरून आणायचे. मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदिक्षिणा घालायची अशी पद्धत आहे. असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मुर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहात मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात.मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत, शीतल छायेत श्री गुरू दत्तात्रयांची मूर्ती असून असून त्यांचेही दर्शन घेवून प्रदक्षिणा घालतात.मंदिरामागे दुमजली सिमेंट क्रॉक्रिटची धर्मशाळा आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही पूर्व बाजू असून येथे भव्य दिपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळवृक्ष आहे. येथून जवळच आदमापूर गाव आहे.

विना चमत्कार, नाही नमस्कार

समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो.संतांना चमत्कार करण्याची इच्छा-हौस नसते. पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांनासुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले, ही वास्तवता होय.

संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यावाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामानी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. आपण शिंप्याचे उदाहरण घेवू. शिलाई यंत्र, शिवण्याचे तंत्र, इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना, पण एखादा शिंपी विशेष डौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो. त्याप्रकारे तो चमत्कार केलेल असतो. ईश्वरकृपेचे सामर्थ्य किंवा योगसामार्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये.बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय.भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पीत असते. दुसरे काहीही घातले तरी खात नसे. इतरवेळीसुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहरी असे.

मामांच्या सहवासात असणा-याने किंचीत खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होवून त्याला पश्चाताप होत असे. आजही मंदिरात किंवा बक-यांच्या कळपात गैरवर्तन करणा-यांना पदोपदी प्रचिती येत असते. एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करत. मामांची गोडी चारणारा दादू गवळी अनावधानाने झोपला असता मामांनी त्याला नागरूपात जागे केले.

  ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते. याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता.देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती. त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो. अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीचेच असत. स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत. याबाबतीत ते माणिकप्रभू महाराज ( हुमनाबाद- गुलबर्गा ) यांच्या सारखेच होते.

आदर्श कर्मयोगी संन्याशी बाळूमामा

स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रूमाल ( फेटा ), पायात कोल्हापूरी कातड्याच्या चप्पला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे पाऊणेसहा फूट उंची, प्रमाणबध्द बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा-सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबध्द चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत, दूरूनचं दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत.जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग-उ़डदाची आमटी, हरभ-याची-अंबा़ड्याची पालेभाजी, वर्णा-पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते.

संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोली भाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते.दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुधा चिखल लागत नसे. त्यांना भक्तीप्रेमाने चाललेले भजन फार आवडे. नाटकीपणाची त्यांना चिड असे. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रध्दा यांना त्यांचा प्रखर विरोध असे.बाळूमामा क्षणात समोरील माणसाचे अंतःकरण जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. त्यांची वाचासिद्धी होती. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांना धन, मान आणि संसारासुखे मातीसमान वाटत. ऐन तारूण्यात मामांची आज्ञा न पाळल्यामुळे पत्नी

सत्यव्वा रिंगण तोडे | सवेची गर्भही पडे । 
मामांचा वंश खुडे । स्त्रीहट्टापायी ।। 
मामा झाले अति खिन्न । टाकले पाणी तथा अन्न ।
सत्यव्वाशी माघारण । आयुष्यभरी ।।

त्यानंतर मामांनी संसाराचा विचारही केला नाही. जगाचा संसार हाच आपला मानला. आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून “ मी आणि माझे “ अंतरंगातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नाथासारखे राहिले. मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आई-बाप वाटत.इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असतात. बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानात-शिवारात येत अशत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होते. मात्र ऐक गंमत होती. कांही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू त्या शिव्यादेण्यामागे असे. पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरचं राहत असे.

अभिनव धनगर देवावतारी संत

विविध समाजात घटकात अनेक असाधारण संत झाले. संत कनकदास, मुगळरवोडचे ( ता. रायबाग, जि. बेळगाव ) यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणा-या या धनगर समाज घटकात उमामहेश्वरानी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालु्क्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध द्वादशी शके १८१४, दिनांक ३ ऑक्टोंबर १८९२ साली दुपारी चार वाजून तेवीस मिनीटांनी शंकर भगवान स्वतः आपल्या अचिन्त्य मायेचा स्विकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले.पावसाळा संपत आलेला. छान उन्हे पडलेली, सृष्टी देवता सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्नपणे हसत होती. बळी राजाच्या कष्टाचं सोन झालं होतं. सीमोलंघन साजरं करून नवन्न पौर्णिमेस भूमातेची पूजा करण्यासाठी आतूर झाला होता. तो लाखो लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधार घालवून त्याना सुखाचा संसार नि आनंदाचा भक्तीमार्ग दाखविणारा महात्मा प्रकट झाला होता.

मायाप्पा एक सतशील धनगर. त्याची पत्नी सत्यव्वा मोठी सुशील आणि भाविक होती. ती विठ्ठलोपासक होती. बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाभळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे, अव्दैतअवस्थास्वरूपात समाधीत तासन् तास डुंबणे, सांकेतीक भाषेत सूचक बोलणे वैगेरे त्यांचे प्रकार समान्यांना अनाकलनीय होते. महापुरूषांना पुण्यवंत प्रेमळ भक्तमंडळीचं थोडेफार ओळखत असतात.बालपणानंतर एका शेटजीच्या घरी नोकरी, नंतर बहिणीच्या सासरी कामावर राहणे, यात काही दिवस गेले. तिच्या घरी असतानाच तिच्या सत्यव्वा नावाच्या कन्येशी मामांचा विवाह करण्यात आला. बळे-बळेच आणि अनिच्छेने पडलेली जबाबदारी स्विकारून बाळूमामा स्वतंत्रपणे मेंढपाळीचा व्यवसाय करू लागले.

मंदिरातील उत्सव

श्री सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनाला व सेवेला अहोरात्र माणसे येत असतात. या क्षेत्राच्या ठिकाणी काही विशेष महत्वाचे उत्सव व दिवस असे आहेत.

 • १) भंडारा यात्रा – फाल्गुण वद्य एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो. लाखो लोक याचा लाभ घेतात. त्रयोदशीला पालखी, घोडा यांसह मिरवणूक मरगुबाई मंदिरात जावून, गावभर फिरून, विहीरीवरून मंदिरात येते. यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील, सरबत, फराळ दिला जातो. ढोलांच्या गजरात, गगनभेदी आवाजाने, भंडा-याच्या उधळण्याने एका आगळ्या वेगळ्या मांगल्याची प्रचिती येते. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. लागलीचं अमावस्या आलेली असते. नंतर गुढी पाडवा. या दिवशी बक-यांच्या कळपात लाख घालण्याचा कार्यक्रम केला जातो.
 • २) दर अमावास्येला यात्रा भरते. अमावास्येला वारी समजून येण्याची पद्धत आहे. रविवारी वारी करणा-या भक्तांचीही संख्या खूप मोठी आहे. सर्वांना नाचणीची अंबील प्रसाद म्हणून दिली जाते. कॅल्शीयमयुक्त, सकस, जीवनसत्वयुक्त नाचणीचा प्रसाद हे इथले वैशिष्ट्य होय.
 • ३) एकादशीला निरनिराळ्या गावांहून भजनी मंडळी येवून भजन सेवा करतात. वारीच्या भावनेने काही भक्त एकादशीला येतात. द्वादशीला काही येत असतात.
 • ४) श्रावण वद्य चतुर्थी – मामांची पुण्यतिथी. या निमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो. ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण, नामजप, प्रवचन, किर्तन व रात्री भजनाचे कार्यक्रम असतात.
 • ५) भाद्रपद अमावस्या – घटस्थापनेपासून दस-यापर्यंत नवरात्र उपवासकरी मंदिरात नामजप, भजन आदी कार्यक्रम करत असतात.
 • ६) आश्विन शुद्ध द्वादशी – मामांची जन्मतिथी, पहाटे समाधीला अभिषेक होतो. भजन कार्यक्रम असतात. सकाळी 9 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू असतो. दुपारी 4 वाजून 23 मिनीटांनी किर्तनोत्तर पुष्पवृष्टी होते.
 • ७) आश्विन वद्य द्वादशी ( गुरूद्वादशी ) – बाळूमामांच्या पंढरपूर वारीची ही तिथी. एकादशी दिवशी भक्तगण पंढरपूर मुक्कामी येतात. द्वादशीला विठ्ठल रखुमाईंना अभिषेक करून प्रसाद भोजनाचा कार्यक्रम होतो.
 • ८) कार्तिक शुध्द प्रतिपदा- दिपावली पाडवा – मरगुबाई मंदिराजवळ बक-यांची लेंडी म्हणजे लक्ष्मी समजून त्यांची रास करून पुजा केली जाते. यावेऴी दूध ऊतू घालविणेचा कार्यक्रम केला जातो. बक-यांना ओवाळून, पूजा करून नंतर बकरी बुजविण्याचा ( पळविण्याचा ) कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो. इतर ठिकाणी असणा-या मामांच्या सर्व बक-यात असाचं कार्यक्रम केला जातो.
 • ९) मंदिरातील दैंनदिन कार्यक्रम – पहाटे चार नंतर षोडशोपचार पूजा, पाच वाजता आरती, सकाळी भोजनाचा नैवेद्य होतो. संध्याकाळी आरती सात ते साडेसात वाजता होतो. रात्री पु्न्हा नैवेद्य होतो. प्रवचन, किर्तन, भजन वैगेरे कार्यक्रम कधी कधी असतात.
 • १०) मंडप – मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस 105 बाय 55 लांबी रूंदीचा मंडप असून याचे रूफकाम आधुनिक पद्धतीने केले आहे.
 • ११) दर्शन मंडप – मंदिराच्या वायव्य बाजूस 100 बाय 100 लांबी रूंदीची पाच मजली इमारत आहे. तळमजल्यावर उपहारगृह व दुकान गाळे आहेत. वरील सर्व मजल्यावर प्रत्येकी आठ हॉल आहेत. संडास बाथरूमची हॉलमधे सोय आहे.

समाधी

वयाच्या ७४ व्या वर्षी मामा सगुणरूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी एक दोन वर्षे सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. गूढ वेदान्तशास्त्रपर वचने बोलत होते. तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होवू शकला नाही.

अनेक भक्तांना स्वप्नात तशाप्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणंना प्रत्यक्ष प्रकट होवून आपल्या समाधीसंबंधी आवश्यक ते सांगितले होते. अकेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रत्द्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय, मरगुबाईचे मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. परब्रत्द्माला म्हणजे अनादी देवाला उपनिषदे ( वेद ) प्रकाशरूप असेच समजतात.

श्रावण वद्य चतुर्थी शके १८८८ म्हणजे ४ सप्टेंबर १९६६ रोजी मामा सगुणरूप सोडून निजधामाला गेले.

संत बळूमामा चे जीवन चरित्र

wikipedia.org

लेख

1 thought on “संत बाळूमामा”

Leave a Comment

Your email address will not be published.